Friday, July 26, 2019

आम्ही दोघी मैत्रीणी

रोहिणीशुभदा
माझी आणि शुभदाची ४० वर्षानंतर भेट झाली !!! विश्वासच बसत नाही अजून. फेबुवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि शिवाय निरोपही लिहिला की मी रोहिणी घाटे-गोरे. आपण एकाच शाळेत होतो. आठवी नववी दहावी. अमेरिकेच्या दुपारी म्हणजे भारतातल्या मध्यरात्री मी तिला मैत्रिण विनंती पाठवली. विचार करत होते की ही फेबुवर अक्टिव्ह आहे की नाही?


आमच्या रात्री १० ला पाहिले तर शुभदा दिसली, निरोपही वाचला आणि दोन्ही कडून एकच प्रश्न फोन नं दे. मी म्हणाले तुझा फोन नं दे मी तुला फोन करते. हर्षवायू झाल्यावर आपण कसे मोठमोठ्यांने बोलतो ना तशी मी बोलत होते फोनवर. तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. ती म्हणाली तुझा फोन झाल्यावर मी पहिला माझ्या आईला फोन करून सांगणार की रोहिणी सापडली. तिला काही आठवत होते मला काही आठवत होते. तासभर बोललो. नंतर झोप लागता लागेना. डोळ्यासमोर सगळे काही येत होते. परत परत येत होते. शाळा स्पष्ट दिसत होती. प्रत्येक वर्षीचे वेगवेगळे वर्ग दिसत होते. आम्ही दोघी पहिल्या बाकावर शेजारीशेजारी बसायचो.
मधल्या सुट्टीतले डबे आठवत होते. तिच्या डब्यातली कांद्याची चटणी आणि माझ्या डब्यातले बटाटेवडे आठवले. शाळेच फाटक आठवले.





फाटकातून घेतलेल्या चिंचा आठवल्या. काय काय मजा करायचो आम्ही. अमिताभ जयाला अमिया जमिया म्हणायचो. शुभदाचे अक्षर मला खूप आवडायचे. सुवाच्य अक्षर फाउंटन पेनने काढलेले. वह्या पुस्तके, दप्तर.
ती म्हणाली की मी दप्तर म्हणून हिंडालियमची पेटी आणायचे. मला आठवले आणि इतके काही छान वाटले. तिचे फेमस गाणे मेघा छाए आधी रात आणि माझे फेमस गाणे पिया बिना बासिया. दोघीही गायचो.



काही वेळेला मधल्या सुट्टीत शिपायाला आम्ही काहीतरी कारणे सांगून मैदानावर जायचो आणि मग तिथून घरी जायचो. ती म्हणाली आपण दोघी ४० पैशात रस प्यायचो. शाळेत एकदा कँप होता तिथे शाळेत राहिलो होतो. सगळे वर्गशिक्षक आठवले. त्यातल्या एका जोडीला आम्ही राजकपूर नर्गिस म्हणायचो. दोघे शिक्षक नवरा बायको होते. बायको जीवशास्त्र आणि तिचा नवरा रसायनशास्त्र शिकवायचे.



आम्ही दोघी आणि आमच्या मैत्रिणीही डेक्कन जिमखान्याला बसला बसायला यायच्या. खूप धावत धावत यायचो.बसला खूप मोठी रांग असायची. माझी बहिणही असायची. शुभदाचे युनिव्हरसिटीमधले घर अजूनही मला आठवते. तिथला निसर्गरम्य परिसर खूप छान होता. मी व माझी बहीण युनिव्हरसिटीमध्ये जायचो. मी शुभदाकडे आणि रंजना तिच्या मैत्रिणीकडे जायची. रंजना, तिची मैत्रिण ऋचा आणि त्यांचा एक मित्र हे योगायोगाने भेटले. गप्पांमध्ये मित्रमैत्रीणींचा विषय निघाला आणि यातूनच माझी आणि शुभदाची फेबुवर भेट झाली. या योगायोगाला काय म्हणाव?


शुभदाशी बोलणे झाल्यावर २ दिवस माझी अवस्था खूप वाईट होती. अर्थात चांगल्या अर्थाने. मी आणि शुभदा यांच्या जबरदस्त इच्छाशक्तिमुळेच ही भेट परमेश्वराने मैत्रिणींच्या मार्फत घडवून आणली. पूर्वीचे आठवत होते. डोळ्यासमोर दिसत होते पण त्या दिवसांमध्ये मागे कसे जाता येईल? डोक्याला खूप मोठा झटका बसल्यासारखे झाले आहे. आज मी पूर्ववत झाले. २ दिवस आठवणी डोक्यामध्ये नुसत्या पिंगा घालत होत्या. शुभदाचेही असेच झाले आहे. ती मला म्हणाली. मी संगळ्यांना वेड्यासारखी सांगत सुटली आहे रोहिणी मिळाली म्हणून ! ३ वर्ष (आठवी, नववी दहावी ) तर आम्ही दोघी पहिल्या बाकावर बसायचो. बहुतेक आम्ही ५ वी पासूनच होतो एकत्र. डोक्याला किती ताण द्यायचा ना? किती आठवायचं ना? ते सुद्धा ४० वर्षापूर्वीचे ! Rohini Gore












 शुभदाने मी पाठवलेली पत्रे अजुनही जपून ठेवली आहेत. किती छान ना !! 


Friday, July 19, 2019

सूर्यास्त १९ जुलै २०१९


आजचा सूर्यास्त काही वेगळाच होता. ढगा आड लपला होता.





Thursday, July 18, 2019

सूर्यास्त १० ऊन २०१९

आज मी कामावरून बाहेर पडायला आणि पाऊस कोसळायला अगदी एक गाठ पडली. छत्री उघडली आणि चालायला सुरवात केली. १० मिनिटांचा खेळ असेल पण पावसाने आज मला खूप आनंद दिला. कोसळणाऱ्या धारा छत्रीवर टपटपटप पडत होत्या. त्या टपटपणाऱ्या पावसाचा आवाज सुख देत होता. चालताना जमिनीकडे पाहिले तर पावसाचे थेंब जमिनीवर थुईथुई नाचत होते. हा खेळ १० मिनिटे चालला. नंतर पावसाने दडी मारली आणि उन बाहेर पडले. लखलखीत उन ! जमिनीवर साठलेल्या पाण्याचे तरंग एकापाठोपाठ वाहत होते. फूटपाथच्या बाजूने ओहोळ वाहत होते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आकाशात जिकडे पाहावे तिकडे निरनिराळ्या आकाराचे ढग इकडून तिकडे ये-जा करत होते. काही ढग रंग बदलत होते. अशीच एक संध्याकाळ - १० जूनची, वेगळी आणि आकर्षित करणारी होती.
रोहिणी गोरे





सूर्यास्त १७ जुलै २०१९











आजचा सूर्यास्त म्हणजे निळेशार आकाश, त्यात वेगवेगळ्या आकाराचे ढ्ग आणि नंतर त्या ढगांमध्ये निर्माण झालेले विविध रंग म्हणजे निव्वळ सूख ! सोनेरी, आकाशी, पांढरा, पिवळा, तांबूस, करडा अशा रंगांची आकाशातली उधळण पाहून मन प्रसन्न होते नेहमीच. Sunset 17th July 2019 - Hendersonville NC

सूर्यास्त १८जुलै २०१९









आज सूर्यास्ताच्या वेळी रंगांचे फरांटे होते. जसजशी संध्याकाळ दाट होत गेली तसतसे रंगही गडद होत गेले. क्षितीज्यावरचे गडद रंग फिकट होत गेले आणि रात्र अवतरली. Sunset -18th July 2019 - Hendersonville NC

Monday, July 01, 2019

बिग बॉस मराठी सीझन नं २

बिग बॉस मराठी सीझन नं २- टाळ्यांचा कडकडाट करावा अशा अफलातून कलाकारांचा शो. वावा किती छान शिविगाळ, आरडाओरडा. आणि मारामारी. पहिल्याप्रथम शिवानीचे कौतुक करू. काहीही कारण नसताना आग पाखड. नेहाही तसलीच. तिचा किरकिरा आवाज. वैशाली तर खेळायला आली नसून फक्त झोपा काढायला आल्यासारखी वाटते. सुरेखा तर एकेठिकाणी बसायचा कंटाळा आला की दुसरीकडे जाऊन बसते. रूपालीचा स्वर जास्त वेळा लागत नाही पण एकदा लागला की सारेगपम च्याही वरचा स्वर लागतो तिचा. अर्थात बिचुकल्याला याच स्वरांनीच तर त्याला जागचे हालवले. ततपप झाली त्याची. रूपाली चांगली वाटली मला. वीणाही आधी चांगली वाटली पण प्राध्यापक मांजरेकरांनी तिच्या डोक्यात इतकी हवा भरली की तिला वाटले पराग कोण? कुठला? शिव बद्दल आकर्षण पण मी नाही बाई त्यातली असा फुकटचा आव आणणारी.
केळकर महाराज दुसऱ्याची मदत घेऊन खेळणारा. हिम्मत असेल तर डोक लावून खेळ. बाप्पा म्हणजे कुणीतरी फुकटचा आग्रह केला म्हणून आला. दिगंबर आधी नीट खेळत नव्हता पण वर्गशिक्षक म्हणून त्याने लोकनाट्याबद्दल चांगले शिकवले. ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला बिगबॉसने घरात येण्याची परवानगी कशी काय दिली बुवा? ज्याने आईबहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या, इतक्या की त्या म्युट कराव्या लागल्या आणि त्याबद्दल प्राध्यापक मांजरेकर काहीच बोलले नाहीत? तर इज्जत का फालुदा झाल्याने घरातल्या पुरूषांवर आरडाओरड केली. की तुम्ही बिचुकल्यावर का नाही रागावलात? का नाही त्याच्या मुस्कटात लगावून दिलीत. भिचुकल्याला भितात का ते?



किशोरी बऱ्यापैकी खेळत होती. सगळ्यांना सांभाळून घेत होती. बिगबॉस मधले टास्क ज्याला कळले आहेत असा एकमेव माणूस म्हणजे पराग. आणि मुख्य म्हणजे त्याला माणसे ओळखता येतात. तो शेफ आहे. त्याला टक्कल आहे. त्यावरून पहिल्यापासूनच घरातल्या सर्वांचा त्याच्यावर इतका राग का? त्यावरून त्याची किती टिंगल उडवत होते? परागचे फक्त एक खटकले की त्याने ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुप मध्ये जायला नको होते. केळकर महाराजांनी शिवचे कान भरले आणि त्यानुसार तो वागला आणि त्यात नेहा पडली. तिचे ढोपरे फुटले. तरी तिला पुढे सारून तो कंफेशन रूम मध्ये गेला. तसाच तो टास्क होता. शिव बलाढ्य आहे त्यामुळे त्याने जोर लावला. त्या ढकलाढकलीत नेहा पडली. माधव तर नेहमी सगळ्यांबरोबरच असतो. म्हणजे काय चालू आहे, कोण काय बोलतयं हे पाहण्याकरता. तिथे ते दोघे काय करत होते? नेहा पडल्यावर केळकर महाराजांनी तिची माफी लगेच मागितली नाहीच. शनिवारच्या शाळेमध्ये माफी मागितली. हीना फक्त सगळ्यांना तिचा नाच दाखवायला आली आहे. बरं जेव्हा नेहा पडली तेव्हा लगेचच परागने तिची बाजू समजून घेतली. ते सर्व विसरून नेहाने शिवला
आणि केळकर महाराजांना स्वर्गात टाकले आणि परागला नरकात. स्वर्ग नरक या टास्क मध्ये.



घरातले इतर सर्व सदस्य परागला पाण्यात पाहतात. आणि जाणून बुजून एका टास्कमध्ये परागला इतका त्रास दिला नेहाने आणि वैशालीने आणि इतर सर्वांनी मिळून त्याला शेवटी खाली पाडले. खरे तर खुर्चीवरून उठून जाण्याच्या टास्क मध्ये तो सर्व त्रास सहन करून अगदी जिंकायलाच आला होता पण शेवटी त्याला ढकलून देवून खाली पाडले. एकावर एक झालेली टिंगल टवाळकी आणि टास्क मध्ये झालेला सर्व त्रास सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्याने नेहाच्या थोबाडीत मारली आणि त्याला बिग बॉसने घरातून त्या क्षणी घालवून दिले. त्याची चूक आहे मान्य पण त्याला दिलेला त्रास प्रेक्षकांनी पाहिला आहे. तो त्रास पाहून कोणीही हेच म्हणेल आणि सर्व सोशल मिडियावर हेच म्हणले आहे की परागच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यातून त्याची चूक घडली. खुर्चीवरून उठून जाण्याच्या टास्कमध्ये किशोरीला खूप त्रास दिला नाही. शिवलाही नाही. शिवच्या मांडीवर तर हीना जाऊन बसली. तो कशाला उठेल?



घरातून गेल्यावर फक्त परागचा अपमान करण्यासाठीच त्याला घरात आणले होते. आणि त्याचा प्राध्यापक मांजरेकर आणि घरातल्या सर्व सदस्यांनी (त्याच्याबरोबर असणाऱ्या वीणा, किशोरी आणि रूपालीनेही) फक्त आणि फक्त त्याचा अपमानच केला. परागने किडनी डोनेट केली आहे. खुर्चीवर उठून जाण्याच्या टास्कमध्ये त्याला वैशालीने नखे टोचली. तिथे वजने ठेवली होती त्यामुळे वजनावर बसणे शक्य नव्हते. त्यामुळे तो तिरका बसला होता. नेहा तर परागला राग येईल असेच वाट्टील ते बोलत होती. या सर्वाचा त्याला खूप त्रास झाला आणि त्याने सांगितले की त्याच्या पोटात अजूनही दुखत आहे. त्याला झालेल्या त्रासाबद्दल एकानेही एक चकार शब्दही काढला नाही. त्रास देणाऱ्या सदस्यांचे तर प्राध्यापकांनी कौतुक केले.



परागला नक्कीच या सगळ्याचा त्रास झाला असेल. पण त्याला घरात राहू दिले नाही हे एका अर्थी बरेच झाले. सुटला बिचारा सगळ्यांच्या तावडीतून ! बिग बॉस, प्राध्यापक मांजरेकर आणि इतर सदस्य यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. असो. या आधीचे बिग बॉस बघितले होते ते चांगले वाटले म्हणून सीझन नं २ बघायला गेलो तर निराशा झाली असे म्हणण्यापेक्षा लोकांचे खरे रंग कळाले.

पहिल्यादिवसापासून शिव्या आणि भांडणेच बघितली. वाटले होते पराग, किशोरी, वीणा आणि रूपाली यांचा चांगला ग्रुप झालाय. काहीतरी चांगले बघायला मिळेल. आता बिग बॉस वर कायमची काट.....Rohini Gore