Showing posts with label रोजनिशी २०१७. Show all posts
Showing posts with label रोजनिशी २०१७. Show all posts

Friday, May 05, 2017

५ मे, २०१७

आजचा दिवस भूतकाळात रमणारा होता. माझ्या बाबांचे मित्र सरपोतदार काका फेसबुकावर आले आहेत. त्यांना मी फोन केला. शिवाय त्यांच्या मुलीशी सविताशी पण आज बोलले. आज माझा मूड गोखले नगर मूड होता. नंतर सुरेखा, जोशी काकू सगळ्यांना फोन लावले आणि बोलले. भाग्यश्रीला ही फोन लावला. जोशी काकू म्हणाल्या की तू भारतात आलीस की तुम्ही सर्व मैत्रिणी आमच्या घरीच जमा, मजा करा आणि खूप गप्पा मारा. त्या इतक्या काही प्रेमाने हे बोलल्या की मनाने मी लगेच गोखले नगरला जाऊन पोहोचले देखील.

गोखले नगरची आठवण येण्याचे अजून एक कारण असे आहे की आम्ही सध्या जिथे राहतो तो डोंगराळ प्रदेश आहे. पुण्यातील गोखले नगरचा भाग ही असाच डोंगराने व्यापलेला आहे. वेताळचा डोंगर, गणेश खिंड, पॅगोडा, हनुमान नगर, पत्रकार नगर, कांचन बन, चतुर्श्रींगी, पुणे विद्यापीठे, कमला नेहरू पार्क हे सर्व एकाच लाईनीत येते. आम्ही सर्व मैत्रीणींचे लहानपण, शाळा कॉलेजमधले दिवस ते अगदी आमच्या सर्वजणींची लग्न होईतोवर
आम्ही गोखले नगरला रहायचो.

आज मी आईशी फोनवर बोलतानाही तिला सांगितले की यावर्षीच्या भारतभेटीत मला गोखले नगर पहायचे आहे.
 आता मला त्याचे खूप वेध  लागलेत की मी सगळ्या मैत्रिणीना भेटून खूप गप्पा मारणार आणि खूप फोटोज घेणार. मुख्य म्हणजे आमच्या जुन्या घरी जाऊन मला माझ्या जाईला बघायचे आहे. जाईच्या फुलांचे आणि झाडाचे फोटोज घ्यायचे आहेत. हे मी जेव्हा प्रत्यक्षात करीनही पण त्याहीपेक्षा आज मी मनानेच तिथे जाऊन पोहोचले आणि सगळ्यांना भेटले आणि त्यामुळेच आज माझा सर्व दिवस भूतकाळात रमला.
 

वर जो फोटो आहे तो आम्ही जिथे राहतो तिथला  आहे.

Thursday, March 16, 2017

१६ मार्च २०१७

आजचा दिवस खुप बरे वाटले असे आपण म्हणतो ना तसाच आहे अगदी. काल आणि आज प्रचंड थंडी आहे. त्यामुळे काल कामावर जाऊ नये असेच वाटत होते. आज सुट्टी असल्याने आरामात उठले. कालच आजचा विनायक ला द्यायचा डबा तयार केला आणि माझ्यासाठीही पोळीभाजी.


थंडी म्हणजे महाभयंकरच आहे. त्यामुळे अंगदुखी आणि सोबत डोकेदुखीही आहे. आज मी  माझ्या मामेबहिणीशी बोलले. ती म्हणाली आम्ही काही बहिणी तिच्या लग्नात खूप लहान होतो. तिने आठवण सांगितली आणि मलाही ते आठवले आणि इतके काही छान वाटले ना ! ती म्हणाली तुम्ही माझ्या लग्नात रडलात, आणि विचारले तर म्हणालात ती रडली म्हणून मी रडले. आणि लग्नात रडायचे असते म्हणून आम्ही रडलो असे सांगायचात. मलाही ते आठवले आणि इतके हासू फुटले , विचार केला की असे हुकमी रडायला कसे काय आले आपल्याला? मजा असते ना लहांपणची ही.

आज मोनिकाशी फोनवर खूप बोलले. तिनेही तिच्या घरी तिची चुलत बहीण आली होती आणि त्या बहिणीची छोटी मुलेही आली होती. ती सर्व आल्यावर काय काय मजा केली असे तिने सांगितले. आणि तिची मुले कशी गोड आहेत हे वर्णन केले त्यामुळे अगदी तसेच्या तसे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. तिने केलेले वर्णन ऐकून खूपच छान वाटले मला. मग मी पण मी काय काय योजले आणि माझ्या मनात काय काय करायचे आहे भारतभेटीमध्ये ते तिला सांगितले.
 
 
आज एका म्युझिक ग्रुपवर एक थीम होती त्यामध्ये मी जैसे राधाने माला जपी हे गाणे टाकले. गाणे थोडे गाऊन पाहिले. मला हे गाणे पाठ आहे आणि जसेच्या तसे म्हणताही येते. पण म्हणायला तसे अवघड आहे. सराव करायला लागेल. मग मी रिमझिम गिरे सावन गायले आणि रेकॉर्ड केले. युट्युबवर अजून अपलोड करायचे आहे. छान गायले गेले माझ्याकडून. जाणवत आहे अगदी.

 तर आज गाण्यांवरून आठवत गेले आणि मग थोडेसे त्याबद्दल लिहून फेबुवर टाकले. आजचा दिवस खूप वेगळा आणि बरे वाटण्याचा गेला म्हणून मग रोजनिशीत तो लिहिला. आता झोपायला हवे. उद्या कामावर जायचे आहे. :( पण उद्या हवा तशी बरे आहे ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणायचे. फेबुवर लिहिलेले इथेही रोजनिशीत लिहीत आहे.
 
 
"लालला ललालाला लाललललल लललललाला" हा आलाप आहे "ये दिल और उनकी निगाहोंके साये" या गाणामधला. पूर्वी भारतात असताना आम्ही जेव्हा मोठाच्या मोठा टेप रेकॉर्डर घेतला होता त्याला स्टिरिओ साउंड होते त्याचे वेगळे बॉक्सेस होते. ज्या गाण्यांमध्ये बरीच वाद्ये आहेत अशी गाणी त्यावार जास्त चांगली वाजली जातात. प्रत्येक वाद्यवृंदाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. तेव्हा ये दिल और उनकी अगणित वेळा ऐकले आहे.




आयायटीत असताना जेव्हा आम्ही टु इन वन घेतला तेव्हा आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती ती होती आँधी आणि मौसमची. तेव्हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले होते. ब्लॉक्स नवीन असल्याने खोलीत गाण्याचा आवाज घुमायचा. या जागेत आम्ही" इस मोडसे जाते है" हे गाणे अगणित वेळा ऐकले आहे.
अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा आलो त्या जागेत टु इन वन घेतला. डॅलसवरून तेव्हा हिंदी गाणी २४ तास रेडिओवर प्रसारित व्हायची. तेव्हा "राधा कैसे न जले" हे गाणे रोज लागायचे. हे गाणे मी अगदी रेडिओला कान देवून ऐकायचे. काही रिकाम्या कॅसेट विकत घेतल्या त्यात एका विद्यार्थ्याने आम्हाला "मनमें नाचे मनकी उमंगे" हे गाणे रेकॉर्ड करून दिले होते. हे गाणे असेच अनेक वेळा ऐकले. या गाण्यात लताचा आवाज इतका काही मधुर आहे की कोणीतरी आपल्या कानात मध ओतत आहे असेच वाटते.



"अब कब आओगे बालमा" हे गाणे क्लेम्सन मध्ये राहत असताना बरेच वेळा ऐकले आहे. पाऊस पडतोय, आकाशातून ढग चालले आहेत आणि हे गाणे असे मिश्रण असायचे बरेच वेळा त्या खोलीत. क्लेम्सन मध्ये असताना डेस्क टॉप घेतला होता आणि त्यावेळी म्युझिक इंडिया ऑनलाईन वर बरीच आणि पाहिजे ती गाणी ऐकता येतात हे नव्यानेच कळाले होते. याच डेस्कटॉपवर "डोला रे डोला रे डोला रे डोला" आणि "होठोमें ऐसी बात" बरेच वेळा ऐकलेले आहे.




विल्मिंगटन मध्ये राहत असताना परत एकदा नव्याने टु इन वन आणला तेव्हा तेरे मेरे सपनेमधली गाणी बरेच वेळा ऐकली होती. काही कॅसेट आम्ही भारतातून येताना आणल्या होत्या तेव्हा त्यातली एक माझी अत्यंत आवडती कॅसेट म्हणजे तेरे मेरे सपने ची.





"देव माझा विठू सावळा" हे गाणे आणि झोपेतून जागे होणे अगदी एकाच वेळेला. पाऊस पडतोय. रेडिओवर भक्तीगीते लागलेली आहेत. उठावे तर लागणारच आहे. शाळा आहे ना !
गाण्यांच्या आठवणींमध्ये मन तरंगत तरंगत कुठच्या कुठे निघून जाते ना !
 
 

Tuesday, February 14, 2017

१४ फेब्रुवारी २०१७











आजचा दिवस आणि कालचाही छानच गेला. २ दिवस सुट्टी असल्याने थोडे विश्रांतीही झाली. जास्तीची कामे मात्र झाली नाहीत. हवा क्षणाक्षणाला बदलत आहे. प्रचंड बोचरे वारे आहेत. थंडी तर असणारच. हिवाळा संपत आलाय तरीही थोडीफार कमीजास्त होतच असते. काल आणि आज मुख्य म्हणले आईबाबांना , माझ्या बहिणीला आणि भाचीला विडियो कॉलवर बघता आले. आईबाबा सध्या ८ दिवस माझ्या बहिणीकडे रहायला आले आहेत. त्यांच्या आवडीचे आणि जे खावेसे वाटते असे सर्व लाड ती त्यांचे करत्ये हे पाहून खूप समाधान झाले. माझ्यासारखीच माझी बहिण पण गाते म्हणजेच गुणगुणते.  तीने गायलेले गाणे मी बऱ्याच वर्षात ऐकले नव्हते ते आज ऐकले. तिचा गायचा सूर माझ्यापेक्षाही छान आहे. तिचे गाणे ऐकून छानच वाटले. बाबांनिही गाणे गायले. आईनेही थोडे गायले. मी आईलाही म्हणते तू गात जा. तर म्हणते माझा आवाज गेला आता.   आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आईबाबा, रंजना, सई, विनायक आणि सुरेश (आमचे नवरे) गाण्याची प्रचंड आवड आहे. सतत गाणी ऐकत असतो.


 आज मधुबालाचा  वाढविवस आणि व्हॅलेनटाईन डे एकत्र असल्याने तिची आणि काही रोमँटिक गाणी काल आणि आजही युट्युबवर पाहिली. आता उद्या आणि परवा कामाला जाताना उत्साह येईल कारण की गेले २ दिवस वेगळे आणि छान गेले. मैत्रिणीशी फोनवर खुप बोलणे झाले. आज तिखटामिठाचा शिराही बरेच दिवसांनी केला त्यामुळे खाताना खूप छान वाटत होते. चवीत बदल झाल्यासारखे. बरेच दिवसांनी आज रोजनिशी लिहीली. कामामुळे वेळ आणि एनर्जीही मिळत नाही. असो. २०१७ सालामधली ही पहिली रोजनिशी. असेच काही वेगळे आणि उत्साह देणारे असेल तर नक्कीच लिहीन.



Henderonville, Horseshoe, Etowah, Laurel Park,  Pisgah National forest, Chimney Rock, Fruitland,  Brevard, Arden, Asheville, North Carolina हा सर्व प्रदेश छोट्या छोट्या डोंगराळ भागात वसला आहे.  प्रत्येक छोट्या शहराची लोकसंख्या ८  ते १५,००० च्या दरम्यान  इतकीच आहे. महिना झाला असेल  आम्ही दुसऱ्या अपार्टमेंट मध्ये राहायला आलो आहोत. आज मला कामावर सुट्टी असल्याने  अपार्टमेंटच्या आवारात  चक्कर मारायला गेले होते. तिथले फोटोज घेतले. रमत गमत गेले. साधारण ५० मिनिटे लागली. माझे कामाचे ठिकाण आता १५ मिनिटांच्या चालण्याच्या वाटेवर आले आहे. हे ठिकाण उतारावर आहे. येताना मला थोडा चढ चढावा लागतो. या आधी राहात होतो तिथे मला चालत ४५ मिनिटे लागायची. सुरवातीला बराच उतार होता. नंतर थोडी चढण होती. मग थोडा  सरळ रस्ता होता.  तिथल्या अपार्टमेंटच्या आवारात शिरल्यावर अजून थोडा चढ आणि खूप मागच्या बाजूला आमचे घर होते. एकूणच वर लिहिलेल्या छोट्या शहरांमध्ये  एकही रस्ता सरळ नाही. वळणावळणाचे रस्ते पसरलेले आहेत. खूप रमणीय भाग आहे हा नॉर्थ कॅरोलायनाचा.