लग्नाच्या आधी आईबाबांकडे रहात असताना आमचे फॅमिली डॉक्टर होते ते घरापासून खूप जवळ होते. सर्दी खोकला ताप आला की आम्ही त्यांच्याकडे जात असू. डॉक्टर ताई आम्हाला एक इंजेक्शन द्यायच्या किंवा एका पुडीत गोळ्या बांधून द्यायच्या की आम्हाला लगेच बरे वाटायचे. खर्चटले, पडलो, धडपडलो तरी सुद्धा त्यांच्याकडे गेल्यावर लगेच त्या जखमेवर मलम लावून ड्रेसिंग करायच्या. लग्नानंतर डोंबिवलीत रहात असताना ट्ण्णु डॉक्टर होते. तेही असेच गोळ्या देणार. इंन्जेक्शन देणार की लगेच बरे वाटणार. त्यांच्याकडे सुद्धा चालत जाता येत होते.
किंवा अगदी चालवत नसेल तर रिक्शाने जाता येत होते. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन कोणत्याही मेडिकल दुकानात जाऊन लगेच त्या गोळ्या घरी आणून घेता येत होत्या. पूर्वी तर डॉक्टर घरीच पेशंटला तपासायला येत असत. घरगुती उपाय तर आपण सगळेच करतो. गरम पाणी पितो, काढे बनवतो. साध्या डोकेदुखीला अमृतांजन, विक्स यासारखी औषधे तर आपल्या घरीच असतात. इथे अमेरिकेत डॉक्टर कडे जाणे म्हणजे जायलाच पाहिजे का? नाही गेले तर चालणार नाही का? असे होते. एक तर इथे जीवनविमा असल्याशिवाय डॉक्टर तुम्हाला तपासत नाहीत. औषधेही देत नाहीत. चालण्याच्या अंतरावर डॉक्टर नसतो. आधी डॉक्टरांची फोन वरून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. पहिल्यांदाच जेव्हा डॉक्टर कडे गेलात तर तिथले किचकट फॉर्म आधी भरावे लागतात. त्या फॉर्ममध्ये या आधी कोणता रोग होऊन गेला आहे का? अनुवंशिक काही रोग आहेत का? झाले असल्यास किती दिवस, कोणाकडे औषध घेतले, कोणते औषध घेतले हा सर्व इतिहास आपल्याला त्या फॉर्मवर लिहावा लागतो. दवाखान्यात डॉक्टरांकडून गोळ्या मिळत नाहीत. डॉक्टर आपले प्रिस्क्रिप्शन आपण लिहून दिलेल्या फार्मसी कडे (Medical store) पाठवतात व तिथून गोळ्या आणाव्या लागतात. त्याकरता सुद्धा फार्मसीला आधी फोन करावा लागतो. औषधे तयार आहेत का असे विचारावे लागते. किंवा फार्मसीचा आपल्याला फोन येतो की औषधे तयार आहेत, घेऊन जा. इथे काही औषधे अशी आहेत की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेता येतात. अशी सर्व औषधे इथल्या अमेरिकन दुकानात मिळतात.
आम्ही भारतात असताना डोकेदुखी, अंगदुखीसाठी क्रोसीन घेत होतो. इथे आल्यावर Ibuprofen नावाची गोळी घेतो. लगेच बरे वाटते. डोंबिवलीत रहायला आल्यावर मला काविळ आणि विनुला फ्ल्यु झाला होता. इथे आल्यावर आम्हाला दोघांनाही फ्ल्यु झाला होता. मी डे केअर मध्ये काम करत होते तेव्हा मला मुलांकडून ताप आला. माझा ताप बरा झाल्यावर लगेच विनायकलाही आला. फ्ल्यु मध्ये ताप आणि अंगदुखी खूप झाली होती. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी अंटिबायोटीक prescribe केले. काहीही उपयोग झाला नाही. शेवटी एका ओळखीच्या गुजराथी माणसाने एक औषध सांगितले ते म्हणजे Theraflu ही एक पावडर असते. ती गरम पाण्यातून घ्यायची. आम्हाला दोघांनाही लगेच बरे वाटले. इथे पानगळीच्या सीझनमध्ये फ्ल्यु ची लस टोचून घ्यावी लागते म्हणजे फ्ल्यु होत नाही. इथे थंडी इतकी जबरदस्त असते आणि हवेत खूप विषाणू असतात त्यामुळे फ्ल्यु होउ शकतो. फ्ल्यु झाला की प्रचंड अंगदुखी होते. ती आम्ही दोघांनीही अनुभवली आहे. कामवाली बाई नसते त्यामुळे तापातही भांडी घासावी लागतात. इथे काही औषधे आम्ही घरात कायम ठेवतो. कफ सिरप, Theraflu, Ibuprofen , अंटिअलर्जी च्या गोळ्या आणतो. वसंत ऋतुत इथे परागकणांची (pollen) ऍलर्जी होते. त्याकरता Anti-Allergy गोळ्या इथल्या दुकानात मिळतात. एकदा माझी दाढ दुखत होती. मुंबईत रहात असताना मी लवंगेचा अर्क कापसात भिजवून तो दाढेत ठेवायचे व आराम मिळायचा. इथे एक स्ट्रिप मिळते ती दुखणाऱ्या दाताला चिकटवायची. खायचे प्यायचे नाही. थोड्यावेळात आराम मिळतो. ती पट्टी तोंडातच विरघळते. यात पण काहीतरी लवंग अर्केसारखेच असते. ते गिळून टाकायचे. ही सर्व औषधे घरात कायम असतात. जसे की भारतात आपण काही आयुर्वेदीक औषधे कायम ठेवतो. (अडुसळा, कैलासजीवन, अशोकारिष्ट) वगैरे. इथे आयुर्विमा असून सुद्धा बील जास्तीचे येते. त्यामुळे पैसे भरावेच लागतात. माझी एक दाढ किडली होती. root canal करून घेण्यापेक्षा ती दाढ काढून टाका असे डॉक्टरांनी सांगितले. विमा असूनही दाढ काढल्याचे ५०० डॉलर्स जास्त भरावे लागले. विनायकसाठी आयुर्विम्याचे पैसे त्याची कंपनी देते पण माझ्यासाठी विनायकच्या पगारातून पैसे भरावे लागतात. मला काहीच होत नसल्याने आत्तापर्यंतचे सर्वच्या सर्व पैसे विमा कंपनीच्या बोकांडी ! डॉलर्सचे पैशात रूपांतर केले तर आमचे लाखो रूपये विमा कंपानीत जमा झालेत. इथे कार साठीचा विमा आणि जीवन विमा काढावाच लागतो.
अमेरिकेतली सर्व घरे लाकडी असतात तर भारतात सिमेंट काँक्रीटची असतात. इथल्या घरामध्ये दिव्यांच्या बटणांची उघडझाप वेगळी आहे. जसे की भारतात आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपण दिव्याचे बटण खाली करतो. इथे दिव्याचे बटण वर केले की दिवे लागतात. रस्ता क्रॉस करताना इथे चालणाऱ्यांना पहिले प्राधान्य आहे. चालणाऱ्यांना प्राधान्य आहे हे माहीती असूनही वाहन आले तरी मी आपोआप थांबतेच. काही माणसे आरामात जातात. इथे तारीखही वेगळी लिहिली जाते. पहिले महिना लिहिला जातो, , नंतर तारीख लिहिली जाते, आणि नंतर वर्ष उदाहरण - ०३-२८-२०२३ म्हणजे २८ मार्च २०२३ याप्रमाणे. तिकडे कार चालवणारा उजवीकडे बसतो तर इथे डावीकडे. भारतात रहात असताना वेळेचे गणित असते ते माहीती नव्हते. माहिती असण्याचे कारणच नाही ना ! उदाहरण द्यायचे झाले तर १ तारखेला भारतात रात्र असेल तर अमेरिकेत त्याच तारखेला सकाळ झालेली असते. तिकडे रात्र तर इकडे सकाळ आणि इकडे रात्र तर तिकडे (भारतात) दुसऱ्या दिवशीची सकाळ. अमेरिकेत सकाळचे ९ वाजले असतील तर भारतात संध्याकाळचे साडेसहा (6.30) न्यु जर्सी मध्ये सकाळचे ९ तर कॅलीफोर्नियात पहाटेचे ६, तर अलाबामा राज्यात सकाळचे 8 अमेरिकेत सकाळचे ९ वाजले असतील तर इंग्लंड मध्ये दुपारचे २ वाजलेले असतात. ५ तासांचा फरक आहे. माझी एक मैत्रिण याहू मेसेंजर वर आमच्या सकाळी यायची आणि मला रोहिणी उठलीस का गं , चहा झाला का? असा मेसेज यायचा. त्यामुळे मला माहिती झाले. मनोगत संकेतस्थळावरची बरीच मित्रमंडळी याहू मेसेंजरवर होती. जवळपास ५० जणांना मी ऍड केले होते. मनोगती जगभरात होते. त्यामुळे डेस्क टॉपवर सकाळी उठल्या उठल्या एकेक जण येत असत ते रात्री - मध्यरात्री पण ! कारण इथल्या मध्यरात्री भारतातले उगवायचे !
अमेरिकेत पण 4 टाईम झोन आहेत. कॅलीफोर्निया चे घड्याळ न्युयॉर्क पेक्षा ३ तास मागे आहे.
4 standard time zone in USA - Eastern, Central, Mountain, and Pacific
अमेरिकेत जगभरात असलेली माणसे येतात. त्यामुळे प्रत्येकाचे इंग्रजी उच्चार वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या मातृभाषेचा ढंग इंग्रजी बोलताना जाणवतो. अमेरिकन बोलताना इतके तोंडातल्या तोंडात बोलतात की कान टवकारून ऐकावे लागते. नंतर सवयीने कळते. तसे तर इथे ऑफीसमध्येच बोलायचा प्रश्ण येतो. बाकी दुकानात गेल्यावर फक्त काही वस्तू सापडत नसतील तरच तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलतो. इथे प्रत्येक वस्तु/भाजी/धान्य वगैरे वर किमतीचे लेबल लावलेले असते. इथे बारगेनिंग नाही. इथे माणसांपेक्षा मशीनशी जास्त संबंध येतो. कार मध्ये पेट्रोल भरायचे असेल तर ते सुद्धा आपले आपणच भरायचे असते. न्यु जर्सी मध्ये रहायला आलो तेव्हा मात्र इथे पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल (Gas station ) भरण्यासाठी माणसे दिसली जशी भारतात दिसतात तशी.
अमेरिकेत आल्यावरच इंग्लिश बोलायला लागते असे नाही. भारतात कंपनीमध्ये काम करताना तमिळ-तेलुगू-मळ्यालंम लोकांशी इंग्रजीतूनच बोलावे लागते. त्यांना हिंदी येत नाही. अर्थात काही जण पुण्यात बरीच वर्षे राहिली आहेत किंवा शिकली आहेत ते फक्त मराठीतून बोलतात. किंवा मराठी माणूस इतर प्रांतात गेल्यावर तिथली भाषा सवयीने बोलू लागतो. मराठी लोकांचे इंग्रजी बोलताना स्पष्ट उच्चार असतात तर तमिळ-तेलुगू लोकांचे त्यांच्या भाषेत जसे हेल काढून बोलतात तसाच हेल त्यांच्या इंग्रजी बोलण्यातून जाणवतो. अमेरिकेत मेक्सिकन, चिनी, फिलिपिनी, भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन असे सर्वच असल्याने प्रत्येकाचे उच्चार वेगवेगळे.
इथले अमेरिकन इंग्रजी वेगळे आहे. आपण भारतीय ब्रिटिश इंग्रजी शिकलेलो आहोत . त्यामुळे काही इंग्रजी शब्द वेगळे आहेत. स्पेलिंग पण वेगळे आहे जसे की खाली यादी दिली आहे. आपण जे शब्द वापरतो तो डावीकडे लिहिला आहे आणि अमेरिकन इंग्रजी शब्द उजवीकडे लिहिला आहे. इथली मोजमापे पण वेगळी आहेत.
Petrol – Gas,, Petrol pump - Gas Station,, Lift – Elevator,, (धनादेश) Cheque – Check,, (वजन – माप) Pound - औंस – Kilo kilogram ,, (kilometer) – Mile,, (तापमान) Fahrenheit/Celsius,, (वांगे) Brinjal – Eggplant,, (ढब्बू मिरची) Capsicum – Bell pepper,, (भोपळा) Pumpkin – Squash,, (दही) Curd – Yogurt,, Gore (गोरे),, Gore (गोअर),, ( भेंडी) Ladies finger – Okhra,, Colour – Color,, (सुलभ सौचालय) Toilet – Wash room – Rest Room,, (औषधाचे दुकान) Medical Store - Pharmacy,, Aeroplane - Airplane
सर्वांनाच माहिती आहे की अमेरिकेतले चलन हे डॉलर्स मध्ये मोजले जाते आणि भारतातले चलन हे रूपयांमध्ये. जसे भारतात नोटांना रूपये आणि नाण्यांना पैसे म्हणतात तसे इथे नोटांना डॉलर्स व नाण्यांना सेंट म्हणतात. १ पैसा म्हणजे इथे १ सेंट, १० पैसे म्हणजे १० सेंट, पण १० सेंटला इथे डाईम म्हणतात. २५ पैसे म्हणजे ४ आणे, २५ सेंटला इथे क्वार्टर डॉलर म्हणतात. ५ पैसे, ५ सेंट. रूपये म्हणजे १, 2,५, १०, २०, ५०, १०० या नोटा वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या असतात. डॉलर १, ५, १०, २०, ५०, १०० हे सर्व एकाच आकाराचे व रंगाचे असतात. इथे कोणीही नोटा व पैसे वापरत नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरतात. काही दुकानातून ५ डॉलर्सच्या आत खरेदी केली तर नोटा व सुटे पैसे द्यावे लागतात. इथे काही अमेरिकन, मेक्सिकन लोक असे पैसे देताना दिसले. इथे सुटे पैसे फक्त धुणे धुण्यासाठी वापरायला लागतात. किंवा car पार्किंगसाठी पैसे टाकण्यासाठी मशीन असतात तेव्हा. एका तासाला अमूक नाणी टाका असे लिहिलेले असते तेव्हा नाणी लागतात. वॉशर आणि ड्रायर साठी इथे क्वार्टर डॉलरची नाणी धुण्याच्या मशिनमध्ये घालण्याकरता वापरतात. इथले धनादेश पण आकाराने खूप छोटे असतात तर भारतातले धनादेश मोठ्या आकाराचे असतात. पूर्वी मी जेव्हा नोकरी करायचे तेव्हा मला पगार कॅश मध्ये मिळायचा (1983-1993) इथे नोकरी करताना मला चेक मधून पगार मिळाला. नंतरच्या नोकरीत माझा पगार थेट बॅंकेत जमा व्हायचा. तसे भारतात पण आता थेट बॅंकेत जमा होतो. इथे बॅंकेत आपल्या खात्यात जमा झालेल्या पैशावर व्याज मिळत नाही. फिक्स डिपॉझिट करून त्यावर व्याज मिळून दुप्पट पैसे जमा होतात हा प्रकार इथे नाही. इथे काही ठिकाणी लोकांना कॅश स्वरूपात पगार मिळतो.Rohini Gore