Showing posts with label माझे अमेरिकेतील अनुभव. Show all posts
Showing posts with label माझे अमेरिकेतील अनुभव. Show all posts

Monday, July 06, 2026

मी अनुभवलेली अमेरिका ... (२)

मी व माधवीने जे २ विसावर वर्क पर्मिट काढले व नोकरी शोधण्यास सुरवात केली. तिला डे केअर मध्ये नोकरी मिळाली. नंतर तिने शाळेत substitute शिक्षिकेची नोकरी केली. नंतर तिने पाकिस्तान मधल्या लैला नावाच्या मुलीची शिकवणी घ्यायला सुरवात केली. ती तिच्या घरी यायची. माधवी ही तेलुगू असून हैद्राबाद मध्ये रहाणारी होती व तिथे ती कॉलेज मध्ये प्रोफेसर होती. ती M.SC (Maths) गणित या विषयात Gold Medalist होती/आहे. मला डे केअर मध्ये नोकरी मिळत होती पण माझे वर्क पर्मिट आलेले नव्हते. एक वर्षाच्या आत आम्ही क्लेम्सनला गेल्यावर वर्क पर्मिट रिन्यु केले त्याचा मला पुरेपूर फायदा झाला. मला Day-care मध्ये नोकरी मिळाली व वेगवेगळे अनुभवही आले. क्लेम्सन मध्ये पिएचडी (PhD) करणारी काही मंडळी होती. एकटे असाल तर शिष्यवृत्ती पुरते पण लग्न झाले असेल तर पुरत नाही त्यामुळे बेकायदेशीर नोकऱ्या कराव्या लागतात. पि एच डीचा विसा फ़ १ (F 1)असतो तर त्याच्या बायकोचा (F 2) फ़२ असतो आणि फ़२ वर पर्मिट काढता येत नाही.


बेकायदेशीर नोकऱ्या इथे बरेच जण करतात. यामध्ये कॅश स्वरूपात पैसे दिले जातात ज्याची नोंद कुठेही होत नाही. नोकरी देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही जरूर असते त्यामुळे मुद्दाम कोणी तक्रार करत नाही. पण जर का कुणी केली तर त्याला/तिला अमेरिकेतून हाकलून दिले जाते आणि परत इथे कधीही येता येत नाही.
माझी एक मैत्रिण रेणुका हिला पैशाची गरज होती कारण तिचा नवरा केमिस्ट्री मध्ये पिएचडी करत होता. त्याच वेळेस एका अमेरिकन बाईला तिच्या जुळ्या मुलींना सांभाळण्यासाठी कुणीतरी हवे होते. तिच्या एका मुलीत थोडा प्रोब्लेम होता त्यामुळे ती तिला डे केअर मध्ये ठेवत नव्हती. रेणूका या कामाला इतकी बांधली गेली होती की तिला कुठेही बाहेर नवऱ्याबरोबर ४/५ दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जाता येत नव्हते. तेव्हा तिने मला विचारले होते की तु माझ्यासाठी ४ दिवसाची ही नोकरी करशील का? तेव्हा मी ती केली होती. त्या अमेरिकन बाईकडे ही नोकरी घरी ७ ते ५ या वेळात तिच्या घरी जाऊन करायची होती. मी त्या २ जुळ्या मुलींना ४ दिवस सांभाळले पण मला असे वाटले की कुणीतरी मला डांबून ठेवले आहे. कारण की इथे हीटींग/कुलींग करता घराची दारे/खिडक्या बंद कराव्या लागतात. इतक्या लहान मुलींना (या मुली रांगतही नव्हया इतक्या त्या लहान होत्या) लहान बाळांची जबाबदारी खूपच असते. मला रेणुका किती कष्ट करत आहे याची कल्पना आली आणि तिचे खूप कौतुकही वाटले. नवऱ्याला ती आर्थिक मदत करून संसाराला हातभार लावत होती.


ती अमेरिकन बाई मला पण ओळखत होती कारण की मी ज्या डे-केअर मध्ये काम करायचे तिथे तिचा मोठा मुलगा येत होता. त्या बाईने मला रेणुकाला जितके पैसे ती देत होती त्यापेक्षा जास्त पैसे मला दिले. बदली कामगाराला नेहमीच जास्त पैसे दिले जातात (जसे की भारतात कामवाली बाईच्या बदल्यात जी बाई येईल तिला) रेणुका मला म्हणाली की ती तिथे २/३ वर्षे तरी काम करत आहे आणि अजूनही तिला काम करावे लागणार आहे पण तरी सुद्धा त्या बाईने तिचा पगार वाढवला नव्हता. मनात म्हणाले अमेरिकन पण चिंगुस असतात तर ! असेच एक जोडपे होते उत्तर भारतीय संगिता व तिचा नवरा. मनिष पिएचडी करत होता. या जोडप्याची ओळख आम्हाला येमुल-सुनिताच्या घरी झाली. संगितानेच मला इथल्या बटरचे साजूक तूप कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक तिच्या घरी दाखवले होते. ती पण काटकसरीने संसार करत होती. इथे डॉलर जनरल (Dollar General ) या अमेरिकन दुकानात १ डॉलरला प्लॅस्टीकच्या बऱण्या मिळतात पण ती विकत नाही आणायची. इथे प्लॅस्टीकच्या बादल्यातून आईस्क्रीम मिळते. (आता तसे मिळत नसावे) त्या बादल्या रिकाम्या झाल्या की त्या घासून पुसून लक्ख करायची व त्यात धान्य भरायची. दह्याचे प्लॅस्टीकचे डबे धुवून पुसून त्यात चहा साखर ठेवायची. स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये (एकच खोली, त्यातच वॉश रूम) ती दोघे रहायचे. आम्ही पण क्लेम्सनला जागा मिळत नव्हती म्हणून शेवटी स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये रहाण्याचा निर्णय घेऊन अडीच वर्षे राहिलो होतो. 
 
 
आम्ही ज्या मोटेल मध्ये उतरलो होतो त्या मोटेल मध्ये ही दोघे नवरा बायको काम करायची. अर्थात साफसफाईचे नाही, काउंटर वर बसण्याचे काम. त्यांच्याकडे टिव्ही वर सर्व भारतीय चॅनल दिसायचे. डिश असल्याने हे सर्व चॅनल , विशेष करून झी आणि सोनी (हिंदी). मोटेलचे मालक गुजराथी होते. मोटेलचे काम पण असेच बांधील असते त्यांना कुठेही बाहेर फिरायला किंवा मित्रमंडळींकडे जाता येत नाही. म्हणून जेव्हा गुजराथी कुटुंबाला कुठे बाहेर जायचे असेल तर ते या दोघांना मोटेल मधे राहून त्या दिवसांचे काम द्यायचे. तिथे संगिता व तिचा नवरा रहायलाच जायचे ५/६ दिवसांचे कपडे घेऊन जसे आपण ट्रीप ला जातो तसे. तिथेच जेवण, अंघोळी पांघोळी सर्व. शिवाय टिव्ही पण बघता यायचा. त्यांच्या घरचे डाळ-तांदुळ व भाज्या वापरून स्वयंपाक करायचा. 
 
 
ही जी मोटेल्स असतात ही सर्वात खालच्या दर्जाची असतात. तिथे साधारण रस्त्यावर इलेक्ट्रीकची कामे खांबावर चढून जी करतात ती रहायला यायची. counter म्हणजे तिकिट विंडो सारखा. आत यायला मुभा नाही. गिऱ्याईका कडून पैसे घ्यायचे व किल्ली द्यायची. क्लेम्सनच्या आजुबाजूला कमी लोकसंख्या असलेली २ छोटी शहरे होती ती म्हणजे Anderson व Seneca तिथेही गुजराथी लोकांची मोटेल्स होती. तिथेही हे जोडपे जात होते. एक वेळ अशी आली की तिनही ठिकाणी माणसांची गरज होती. तेव्हा संगिताने येमुल व येमुलने आमचे नाव सुचवले होते. आम्हाला पैशाची अजिबात गरज नव्हती पण तरीही आम्ही गेलो. एक अनुभव मिळाला. तिथेही आम्हाला दोघांना खूपच कोंडल्यासारखे झाले होते. मोटेल वाल्यांच्या घरी असलेल्याच डाळ तांदुळ व भाज्या वापरून मला आमच्या दोघांचा स्वयंपाक करायचा होता. शिवाय बघायला टीव्ही होताच. त्यावेळेला आमच्याकडे कार नव्हती म्हणून मोटेल वाले आम्हाला घरी घ्यायला व सोडायलाही आले होते. नंतर एकदा आम्ही ज्या मोटेल मध्ये उतरलो होतो त्यांनी आम्हाला विचारले की ४/५ तासांकरता एखाद्या शनिवार/रविवार यायला तुम्हाला जमेल का? तर आम्ही हो सांगितले. नंतर आम्ही २/३ वेळेला आमच्या कार मधून मोटेल सांभाळण्यासाठी गेलो होतो. त्या गुजराथी मोटेल सांभाळणाऱ्या नवरा बायकोला खूप हायसे वाटले होते. इथे कार सर्व जण घेतात विद्यार्थी सोडून. काही वेळा एक विद्यार्थी कार घेतो व त्यात बाकीचे बसून सर्व किराणामाल भाजीपाला आणतात. second hand car इथे खूप स्वस्तात मिळू शकते. १५००/२००० डॉलर्स ते ५ ते १०,००० डॉलर्स पर्यंत मिळते. आम्ही २००४ साली ५००० डॉलर्सचि घेतली होती. मायलेज पण कमी होते. 
 
 
कोरी करकरीत कार २०,०० डॉलर्स ते ५०,००० हूनही जास्तीची मिळते. आधी सर्वच सेकंड हॅंड कार घेतात कारण की कार चालवायची सवय व्हायला हवी आणि कारला अपघात झालाच तर नवीन कारला पोचे यायला नकोत. इथे कार घेतली की तिची हार घालून हळदी कुंकू वाहून पूजा करत नाहीत जसे की भारतात करतात. इथे कार Luxury लझकी नाही तर Necessity आहे. पब्लिक ट्रास्न्स्पोर्ट ची बोंबाबोंब आहे. काही मोठ्या शहरात रेल्वेच जाळे आहे. जसे पुण्यात कामावर जाताना टु व्हिलर घेऊन जातात तसेच इथे कार घेऊन जातात इतकाच फरक आहे. कामावर जायला व वाण सामान, भाज्या वाहून आणण्याकरिता येथ कार घ्यायलाच लागते. भारतात संध्याकाळचे फिरायला गेले आणि येताना भाजी आणली तसे इथे होत नाही. इथे रस्त्यावर विक्री होत नाही. दुकाने दूरवर असतात. Rohini gore

Monday, June 29, 2026

मी अनुभवलेली अमेरिका.... (१)

 

अमेरिकेतले जीवन कसे आहे ते इथे येणाऱ्या मुलींकडून कळते म्हणजे त्या व्हिलॉग करतात. विडिओच्या माध्यमातून बोलून थेट ते सर्वांपर्यंत पोहोचते. पण खूप पूर्वी म्हणजे आम्ही आलो २००१ साली, त्याही आधी इथले जीवन कसे आहे ते सर्वांपर्यंत तर नाहीच नाही तर आईवडिलांना पण सांगता यायचे नाही. कॉलिंग कार्डवर खूप कमी मिनिटे मिळायची. त्यात एकमेकांच्या तब्येती बद्दलच बोलले जायचे. परदेशातच नाही तर भारतात स्वत:चे जन्मस्थान सोडून मुली लग्न होऊन/नोकरी-शिक्षणा निमित्ताने तर मुलं शिक्षण/नोकरी निमित्ताने त्याच राज्यातल्या दुसऱ्या शहरी किंवा दुसऱ्या राज्यातल्या शहरात गेले तर मिळतेजुळते घ्यावे लागते. मदत मिळते पण संघर्ष खूप करावा लागतो. नंतर रूळले जाते. पूर्वी पण घरोघरी फोन नव्हतेच. त्यामुळे सुट्टी/रजा मिळेल तेव्हा येणे होत असे. एरव्ही पत्रातून खुशाली कळवली जायची. दुसऱ्याच्या घरी रहाताना किंवा पेईंग गेस्ट असलेल्या ठिकाणी तिथल्या माणसांची मिळतेजुळते घ्यावे लागते. 
 
 
त्यातून प्रायव्हेट कंपनी असेल तर कामाचे तास जास्तीचे. रजा/सुट्या कमी असतात. ज्यांना जन्मस्थान सोडून कुठेही जावे लागत नाही आणि त्यात सरकारी नोकरी असेल तर भरपूर सुट्या, रजा, कामाचे तास कमी, युनियनचा पाठींबा, निवृत्ती नंतर पेंशन. त्यातही महागाई वाढली की महागाई भत्ता पण वाढतो. असे सर्व भाग्यवान ! त्यांना संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळेच जेव्हा पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या त्यांना नोकरी जाईल असा ताणतणाव नसायचा. तिथे ताणतणाव नाहीच असे काही माझे मत नाही पण तुलनेने दुसऱ्या शहरात इतरांशी मिळतेजुळते घेऊन प्रायव्हेट नोकरी टिकवायची हे जास्त कष्टदायक आहे. 
 
 
अमेरिकेत एच वन विसा मिळाल्यानंतरही टांगती तलवार असतेच. कोणत्याही कारणानिमित्त नोकरी गेली की ठराविक दिवसाच्या आत तुम्हाला देश सोडावा लागतो. नवऱ्याच जे वन विसा बायकोचा जे २ विसावर वर्क पर्मिट काढता येते. नवऱ्याच्या एच वन विसावर बायकोचा डिपेंडंट विसा होतो तो असतो एच ४ की ज्यावर वर्क पर्मिट काढता येत नव्हते. आता येते असे ऐकले आहे. अमेरिकेत आल्यावर कुणाला कधी पाहण्याची शक्यताच नाही असे सर्वजण एकमेकांना मदत करतात. जसे की आम्ही जेव्हा आलो तेव्हा संपतकुमार व त्याची बायको सत्या यांना दुसऱ्या शहरात संशोधनासाठी जावे लागले. त्यामुळे त्यांना लीज टेकओव्हर कुणी केले तर बरे होईल असे वाटत होते. त्या दरम्यान आम्ही तिथे होतो. तिथे आम्ही काही अपार्टमेंट पाहिली तर कोणतीच पसंत पडत नव्हती. निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता. ऍलन यांनी आम्हाला सुचविले की तुम्ही संपतकुमारचे लीज टेकओव्हर करा आणि तसे आम्ही केले कारण की विसा १ वर्षाचाच होता आणि जरूरीचे फर्निचर त्या जागेत होते की जे त्यांचेही नव्हते. असेच कुणी कुणी जाताना ते सोडून गेले होते. संपतकुमारने आमचे आभार मानले. त्यांचे बरेच पैसे वाचले आणि आम्हालाही इथल्या जागेत राहण्याची सुरवात करायची होती.
 
 
पवनकुमारची बायको गरोदर होती तेव्हा भारतावरून तिच्या बाळंतपणासाठी कोणी येणार नव्हते. तिला आई नव्हती. तिचे बाळंतपण शेजारी रहाणाऱ्या प्रविणाने केले. तिचे डोहाळेजेवण पण केले. इथे काही भारतासारखे नसते. डोहाळेजेवण एकदाच होते ते सुद्धा मैत्रिणी मिळून ठरवतात. प्रत्येक जण एकेक पदार्थ आणतात सर्वांना पुरेल असा. येताना त्या बाळाला लागणाऱ्या सर्व वस्तु/कपडे आणतात. तेही कोणी काय काय आणायचे ते ठरवतात. भारतात बाळ जन्माला आल्यानंतर कपडे दिले जातात. शिवाय ज्या मुलगी गरोदर आहेत तिचे सर्वजण कौतुक करतात. नातेवाईक मित्रमैत्रीणी असे सर्वजण तिचे वेगवेगळे डोहाळेजेवण करतात.
आम्ही दोघे कविताच्या डोहाळेजेवणाला हजर होतो. खरे तर दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या राज्यातल्या एका शहरात जाण्याकरता निघणार होतो. विनुला २ वर्षासाठी संशोधन करण्याचा विसा मिळाला होता. प्रविणा म्हणाली तिच्या नवर्याला की आपण रोहिणी गेली की कविताचे डोहाळेजेवण करू. पण श्रीनिवास म्हणाला की ती असतानाच कर. तिला पण एंजॉय करू देत. आमच्या सामानाची बांधाबांध सुरू होती म्हणून आम्हाला कागदी डिशा, पेले आणि २/३ प्रकारची थंड पेये घेऊन जायची होती. ५ जणींनी ओटी भरायची असते तर मला आधी भरायला सांगितली कारण मी त्या ५/६ बायकांमध्ये मोठी होते. डोहाळेजेवणाला फक्त ४-५ फॅमिलीच होत्या.
 
 
माझी व माधवीची छान मैत्री झाली होती. ती लग्न झाल्यावर लगेचच अमेरिकेत आली होती. दिवाळीच्या दिवशी आम्ही त्या दोघांना जेवायला बोलावले होते. ती म्हणाली की ते दोघे मंदीरात जाणार होते. त्यांच्याकडे कार होती. मला म्हणाली की तुम्ही दोघे पण या. मी म्हणाले नाही. तुम्ही दोघे जा. तुमचे नवीन लग्न झाले आहे म्हणूनच मी तुम्हाला दिवाळीचे बोलावले आहे. मंदीरात जाऊन लगेच आमच्याकडे जेवायला या. आमच्या घरी मल्लीकार्जुन नावाचा एक जण ४ दिवस राहिला होता. त्याला अपार्टमेंट मिळत नव्हते. म्हणजे त्याला अजून कोणीतरी अपार्टमेंट शेअर करण्यासाठी हवे होते. तसेच क्लेम्सनला प्राध्यपक डीटर यांनी आमच्यासाठी मोटेल मध्ये बुकींग केले होते. आमची थेट फ्लाईट चुकली होती त्यामुळे सव्यापसव्य करून १२ तासांनी आम्ही क्लेम्सनला पोहोचलो होतो. रात्रीचे १२ वाजले होते. खूपच दमायल झाले होते. सकाळी उठल्यावर एक सुखद धक्का बसला. मोटेलचे मालक गुजराथी होते. त्यांनी आम्हाला गरम गरम मसाला चहा आणून दिला. ते म्हणाले आम्ही असे कुणाला देत नाही. तुम्ही भारतीय आहात आणि खूपच दमलेले दिसत आहात म्हणून देत आहोत. चहा प्यायल्यावर आम्हाला दोघांनाही खूपच तरतरी आली. चहा पिऊन आम्ही लगेच मोटेल सोडले. 
 
 
क्लेम्सन मध्ये आम्हालाही अपार्टमेंट मिळत नव्हते. डेंटन (टेक्सास) सोडण्या आधी अपार्टमेंट फाईंडर पुस्तकातून मी फोन लावले होते पण कोणतेही मिळाले नाही. डॉक्टर डीटर यांनी येमुल-सुनिताला पटवले होते की एक कपल येत आहे त्यांना तुम्ही तुमच्याकडे ठेऊन घ्या त्यांना जागा मिळेपर्यंत आणि म्हणूनच आम्ही येमुल-सुनिताकडे ८-१० दिवस राहिलो होतो. येमुल सुनिता कडे गेल्यावर सुनिताला खूप बरे वाटले. ती म्हणाली बरे झाला तुम्ही आलात ते. इथे कोणीच माझ्याशी बोलायला नाही. मी तिच्याकडे रहात असताना पोळ्या करायचे. मी प्रथमेश (तिचा मुलगा) ला सांभाळायचे त्यामुळे तिची कामे व्हायची. येमुल पण संशोधन करत होता. त्यांच्याकडे जी कार होती ती चांगली नव्हती. मध्येच बंद पडायची. त्यामुळे तो फक्त ग्रोसरी आणण्याकरता कार वापरत असे. त्यांचे घर डोंगरावर होते. विनु रोज सकाळी डोंगर उतरून व येताना चढून लॅब मध्ये ये-जा करायचा. आम्हाला जेव्हा अपार्टमेंट मिळाले तेव्हा मी सुनिताला बोलावले. येमुल एका कॉन्फरस्न साठी जाणार होता. तिला म्हणाले सकाळपासूनच ये. सकाळी न्याहरी साठी तिखटामिठाचा शिरा बनवला. नंतर जेवण केले व तिला सांगितले की तू झोप थोडा वेळ. मी प्रथमेश कडे लक्ष देते. निवांत झोप. ती झोपेतून उठल्यावर तिला गरम चहा दिला. मला म्हणाली की मला इतकी शांत झोप लागली होती त्यामुळे खूप बरे वाटले.
येमुल सुनिताला काही कारणाने संशोधन सोडावे लागले व भारतात कायमचे जावे लागले. निघायच्या आधी ४ दिवस ती दोघे, प्रथमेश व आम्ही दोघे आमच्या एका खोलीत रहात होतो. मी तिला तिच्या ४ बॅगा व्यवस्थित लावून दिल्या. ती म्हणाली तुम्ही होतात म्हणून. नाहीतर मला काही सुधारलेच नसते. तिच्या मुलाला ती सांभाळायची व आमच्या चौघांचा स्वयंपाक मी करायचे. सुनिताला जेवताना मी म्हणले की भरपूर आईस्क्रीम खाऊन घे. भारतात गेल्यावर इतके खूप मिळणार नाही. आमच्या सगळ्यांच्याच घरी फ्रीझर मध्ये आईस्क्रीमचे डबे असायचे. एक आठवण म्हणून मी प्रथमेशला एक ड्रेस घेतला होता. सुनिता खूप खुश झाली होती. copy right rohini gore
क्रमश : ....
See less

Friday, October 21, 2022

मी अनुभवलेली अमेरिका (9)

 

मुंबईत राहत असताना मी किराणामालाची यादी फोनवरून सांगायचे की २ तासात घरपोच सामान यायचे. तसेच वर्षभराचे तिखट, हळद आणि गोडा मसालाही घरी करण्याची सवय होती. दाणे भाजून त्याचे कूट करण्याची सवय होती. शिवाय ताजा नारळ खरवडून तो वापरायचीही सवय होती. इथे अगदी याच्या विरूद्ध आहे. किराणामाल म्हणजे तेल, साखर, चहा, डाळी आणि पिठे सर्वच्या सर्व आपण दुकानात जाऊन आणायला लागते. त्याकरता एक दुकान पुरत नाही. ३ ते ४ अमेरिकन स्टोअर्स फिरायला लागतात. डाळी, मसाले, पोहे, रवा आणि इतर याकरता
भारतीय दुकानात जावे लागते आणि हे भारतीय दुकान प्रत्येक शहरात जवळ कधीच उपलब्ध नसते. अगदी क्वचित ठिकाणी असते जिथे भारतीयांची लोकसंख्या बरीच आहे ति शहरे. आम्हाला आतापर्यंत जवळच असलेले भारतीय दुकान नशिबी नव्हते. अगदी आता ज्या शहरात राहतो तिथपासून सुद्धा ते १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे. नेहमी लागणारा किराणामाल घाऊक प्रमाणात काही दुकानातून मिळतो जसे की तेल, साखर, दाणे, इ. इ. आणि बाकीचे किरकोळ काही आणायचे झाल्यास इतर काही ग्रोसरी स्टोअर्स असतात तिथे जावे लागते.
 
 
 
आता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा. हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा. तसेच चिरलेला लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.
 
 
 
मुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले. स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने ाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि चव चाखली. इटालियन, ेक्सिकन, चायनीज, पण तितकी चव आवडली नाही. आणि भारतीय उपहारगृहात सुद्धा मसालेदार चव कधीच नसते. त्यामुळे आवडणारे सर्व चमचमीत पदार्थ घरी करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. बटाटेवडे, सामोसे, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, इडली सांबार, मसाला डोसा, भेळ, रगडा पॅटीस हे सर्व पदार्थ इथे घरी केले तरच खायला मिळतात अन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे मोठमोठाली असल्याने चवीला अजिबातच चांगली नाहीत.
 
 
शिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणि फक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा तिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत.

Thursday, February 21, 2019

ट्रींग ट्रींग .... ( भाग २)

लँडलाईनचा जमाना गेला आणि मोबाईलचा जमाना आला. मोबाईलच्या जमान्यात आम्ही कधीच नव्हतो. २००१ साली आम्ही जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा विद्यापीठाच्या लायब्ररीतून "आम्ही सुखरूप पोहोचलो" अशी एक मेल पाठवली होती. अपार्टमेंट मध्ये राहाणाऱ्या शेजारील एका भारतीय कुटुंबाने आम्हाला फोन कार्ड बद्दल सांगितले होते. ९९ सेंटस या नुकत्याच सुरू झालेल्या बांगलादेशी दुकानातून एक कार्ड विकत घेतले होते. हे कार्ड डेबिट/क्रेडिट कार्डासारखे दिसायला होते. त्यावरचा नंबर दिसण्यासाठी तो आधी खोडावा लागायचा. मग ऍक्सेस नंबर दिसायचा आणि मग तो फिरवून अजून काही डिजिटचा नंबर फिरवला की कॉल लागायचा. पण ही कार्डे अजिबात टिकली नाहीत. आम्ही पोहोचलो हे सांगण्याकरता हे कार्ड घेतले होते. त्यावर आवाज तर नीट ऐकू येत नव्हताच. पण मिनिटेही मोजकीच होती.



भारतात फोन करण्यासाठी आम्हाला आधी अमेरिकेतला लँडलाईन फोन घ्यावा लागला. व्हराईजन या टेलीफोन कंपनीत आम्ही आमचे नाव नोंदवले व फोन सुरू झाला. त्या फोनवरून इथे अमेरिकेत आल्या आल्या २ ते ४ दिवसांनी मी रंजनाला कॉल केला होता.मी अगदीच मोजकी २-ते ३ वाक्ये बोलली असेन. म्हणजे 1 की २ मिनिटेच. पटकन फोन खाली ठेवला, बील येण्याच्या भीतीने. बील आले १० डॉलर्स !



नंतर आमच्या मित्रपरिवारातून आम्हाला काही साईटी कळाल्या. त्यावरून आम्ही दर महिन्याला ४० डॉलर्सची ऑनलाईन कार्डे विकत घ्यायचो. एक सासरी एक माहेरी एक बहिणीकरता. १० डॉलर्स मध्ये २० मिनिटे मिळायची.. या २० मिनिटात बोलणे जास्त व्हायचेच नाही. एका आठवड्याला एक 10 डॉलरचे कार्ड वापरायचो.
फोन लावण्यासाठी आधी १० आकडी ऍक्सेस नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १० आकडी पीन नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १५ आकडी ( इंटरनॅशनल कोड, भारताचा कोड, शहराचा कोड, आणि मुख्य टेलीफोन ८ आकडी लँडलाईन फोन ) नंबर फिरवायला लागायचे. हे सर्व मिळून ३५ डिजिटचे फोन नंबर फिरवल्यानंतर फोन लागायचा. त्यात ऐकू यायचे. पण कधी कधी फोन मध्येच तुटायचा. मग परत सर्व डिजिटचे नंबर फिरवण्यासाठी फोन वरची मग बटने दाबायला लागायची. त्यात मग तुमची काही मिनिटे बोललेली/वापरलेली कट करून उरलेली मिनिटे शिल्लक रहायची. बोलणे जास्तीचे व्हायचेच नाही. तब्येतीची चोकशीच जास्त केली जायची. आणि बोलताना आईला/रंजनाला/सासूबाईंना सांगायला लागायचे की आता मिनिटे संपत आली आहेत. फोन आपोआप कट होईल. यामध्ये नंतर ही ऑन लाईन विकत घेतलेली कार्डे थोडी स्वस्त झाली.





यात रिलायन्सची कार्डे जास्त चांगली होती. नंतर नंतर ५ डॉलर्सला ३० मिनिटे, आणि नंतर ६० मिनिटे दिली जायची. या फोनकार्डाबरोबर आम्हाला कस्टमर सर्विसचा नंबरही दिला जायचा. आम्ही मोबाईल फोन कधीच घेतला नाही. का ते पुढील लेखात...नंतर मोबाईल घेतला त्याचे नाव ट्रॅक फोन. अगदी छोटुसा फोन होता हा.. मी जेव्हा पब्लिक लायब्ररीत Voluntary work करायला जायला लागले तेव्हा हा मोबाईल घेतला. आणि त्याचा वापर अगदी जरूरीपुरताच.


क्रमश : ....

Wednesday, February 20, 2019

ट्रींग ट्रींग.....(1)

आमच्या वेळी म्हणजे शाळा कॉलेजात असताना फोनपर्व नव्हते. अगदी मोजूनच काहीजणांकडे फोन होते. ज्यांच्याकडे फोन असायचा त्यांचा टेलिफोन नंबर त्यांना विनंती करून घ्यायला लागायचा आणि अगदी महत्वाचा निरोप असेत तरच तुमच्याकडे आमच्याकरता फोन येईल हे सांगावे लागायचे आणि तेही आनंदाने द्यायचे. काही जण फोन करण्यासाठी किंवा निरोप देण्ञासाठी पैसे घेत असत. १ रूपया किंवा 50 पैसे असत. आम्हां दोघी बहिणींच्या लग्नानंतर आमच्या घरी फोन आला. मी डोंबिवलीवरून पुण्याला आईकडे जायचे तेव्हा गेल्या गेल्या रंजनाला तिच्या ऑफीसमध्ये तिला फोन करायचे. डोंबिवलीच्या आमच्या घरी आम्ही फोन घेतलाच नव्हता. तिथेही आमच्या सोसायटीत वर मामी राहतात त्यांच्याकडे काही निरोप असल्यास फोन येत असे.
लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहायचो तेव्हा पण वसतिगृहाच्या खाली एक सार्वजनिक फोन होता. तिथे मला आईबाबांचा फोन यायचा. खुशाल आहात ना? असे फोनवरून ऐकल्यावर खूपच छान वाटायचे.
वसतिगृहाच्या खाली बसलेला वॉचमन फोन आला की आमच्या खोल्यांचे नंबर पुकारायचा. आणि मग मी तिसऱ्या मजल्यावरून खाली जिन्याने भराभर उतरून यायचे. पूर्वी सर्वजण आपापली खुशाली पत्राद्वारे कळवत असत. फोन फक्त गरजेपुरताच होता.




जेव्हा टेलिफोन बूथ निघाले तेव्हा मग जरा काही जास्तीचे बोलायचे असेल तर फोन करत असे. डोंबिवलीत राहत असताना आमच्या सोसाटीच्या इमारतीच्या समोरच्या इमारतीत एक बूथ झाला होता. तिथे जाऊन मी आईला आणि रंजनालाही फोन करत असे. आम्ही जेव्हा अंधेरीत कंपनीच्या जागेत रहायला गेलो तेव्हा आमच्याकडे फोन आला. तोपर्यंत आम्ही फोन घेतला नव्हता. एक तर मी दर २ ते ३ महिन्यांनी पुण्याला सासरीमाहेरी जायचे. त्यामुळे नुसती खुशालीच नाही तर भरपूर गप्पाही व्हायच्या आणि प्रत्यक्ष भेटल्याचा आनंदही व्हायचा. अंधेरीच्या जागेत रहायला गेल्यावर आमच्याकडे फोन आला. आणि मग आम्ही फोन करायचो पण खूप नाहीच. आईचा फोन यायचा, फक्त ती कुठे बाहेरगावी जाणार असेल तर तसे सांगायला मला फोन करायची.



नंतर घरोघरी फोन झाले. आणि अमाप गप्पाही सुरू झाल्या. एवढेच नाही तर फोनवर रेसिप्याही सांगितल्या जायच्या. फोनची बिले जेव्हा अवाच्या सवा यायची तेव्हा घराघरात ओरडे खायला लागायचे. नंतर फोनही स्वस्त झाले. ऑफिसमध्ये जेव्हा कामाला होतो तेव्हा मला आठवतय ऑफीसमध्ये वेगळी टेलिफोन ऑपरेटरची पोस्ट असायची. ती बसायची त्यापुढे एक भले मोठे कपाटासारखे काहीतरी असायचे आणि त्यात अनेक वायरी असायच्या. टेलिफोन आला की ज्या कुणाला फोन आला असेल त्याच्याशी वायरी जोडून तो फोन त्या व्यक्तिसाठी उपलध करून द्यायची. पहिली नोकरी सोडून जेव्हा दुसरी नोकरी सुरू झाली तिथे पण एक टेलिफोन ऑपरेटर होती. पण ऑफीस छोटे असल्याने ती व्यक्ती फोनपाशी येऊन बोलतअसे. नंतर त्या ऑफीसमध्ये इंटरकॉम सिस्टीम आली.


महाराष्ट्राच्याबाहेर जर फोन लावायचा असेल तर ऑपरेटर कॉल बुक करायची. आमच्या ऑफीसमधली टेलीफोन ऑपरेटर टेलीफोन खात्यातील टेलीफोन ऑपरेटरला फोन करायची. मग तिथली ऑपरेटर ज्या माणसाला फोन लावायचा आहे त्याचा नंबर घ्यायची. आमच्या कंपनीचा फोन नंबर घ्यायची आणि वेळ सांगायची. सांगितलेल्या वेळेला कॉल यायचा आणि म्हणायची की पार्टीशी बोला. एकदा सिंगापूरला कॉल बुक केला होता आणि तोही १० मिनिटांकरिता.

क्रमश : ....

Thursday, January 10, 2019

बाजारहाट (४)

जेव्हा आमच्या अपार्टमेंट मध्ये आम्ही रहायला आलो तेव्हा मुख्य प्रश्न होता तो फोडणीचा. फोडणीला लागणारे साहित्य मोहरी, हिंग, हळद आमच्याकडे नव्हते ते मी प्रविणाकडून उसने आणले. ती म्हणाली आम्ही जेव्हा भारतीय दुकानात जाऊ तेव्हा तू मला तुला हव्या असणाऱ्या सामानाची यादी दे. तेव्हा मी अगदी मोजकीच यादी दिली होती. ती म्हणजे पोहे, रवा, मोहरी, हिंग हळद. बाकीचे सर्व सामान सॅक अँड सेव्ह मधून आणले होते. दूध, दही, साखर, भाज्या, टुथपेस्ट, ब्रश, कपडे धुण्याची पावडर, टी-बॅग्ज वगैरे अनेक गोष्टी. सुरवातीचे काही दिवस संध्याकाळच्या खाण्याला काय करायचे हा एक प्रश्नच होता. कारण की पोहे उपमे मी संध्याकाळच्या खाण्याला भारतात असताना करायचे. सकाळच्या न्याहरीचा प्रश्न कधी आला नाही कारण की सकाळी आम्हाला दूध पिण्याची सवय होती ती तशीच अजूनही कायम आहे. दूधामध्ये कॉर्नफ्लेक्स किंवा बोर्नव्हिटा घालून दूध किंवा ड्राय फ्रुटसची पावडर घालून दूध घेण्याची सवय असल्याने सकाळी न्याहरीचा प्रश्न सुटला होता. दुपारी मी मैद्याच्या पोळ्या लाटत होते आणि लाँग ग्रेन राईसचा भात आणि फ्रोजन बीनची भाजी करायचे.



सॅक अँड सेव्ह मधून संध्याकाळच्या खाण्याला मल्टीग्रेन ब्रेड खायचो.सोबत कॉफी. तिथे आम्हाला साधे कप केक दिसले. शिवाय बटाटा चिप्सच्या अनेक व्हराईटी दिसल्या. भाज्यांपैकी कोबी, फ्लॉवर, वांगी, श्रावणघेवडा, सिमला मिरची अश्या भाज्या होत्या. पण त्या सतत उपलब्ध नसायच्या. मग व्हरायटी म्हणून फ्रोजन बीन्स आणायला सुरवात केली. ब्रेड बटरने जरी संध्याकाळच्या खाण्याचा प्रश्न सुटला असला तरी पोहे उपम्यांची इतकी काही आठवण यायची की त्याने जास्तच भूक लागायची. ब्रेड, अंडी, चीझ, आम्हाला दोघांनाही आवडत नाही आणि पचतही नाही.वडा पाव, भेळ,, पाणीपुरी, इडली, डोसे, उतप्पा असे भारतात मिळणारे पदार्थ इथे मिळत नसल्याने त्याचीही तीव्रतेने जाणीव व्हायची. आपली खूप उपासमार होत आहे हे जाणवायचे. तसे तर भारतात असताना हे पदार्थ आपण काही रोजच्या रोज खात नाही पण अजिबात दिसतही नाहीत आणि त्यामुळे मनात आणले तरी खायला मिळत नाही हे इथे अमेरिकेत आल्यावर प्रकर्षाने जाणवले. डेंटन पासून डॅलसला जाण्याकरता कारने तास लागायचा. एके दिवशी प्रविणा आणि नागा यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर भारतीय दुकानात नेले आणि आम्ही भली मोठी खरेदी केली. आमची कार्ट पूर्ण भरून वाहत होती. ते पाहून ते दोघे हासायला लागले होते. आम्ही सर्व काही घेतले. कणीक, तांदुळाचे पीठ, हरबरा डाळीचे पीठ, पोहे, रवा, साबुदाणा, डाळीमध्ये तुरीची आणि मुगाची डाळ घेतली. लाल तिखट, हळद, मोहरी, हिंग, धनेजिरे पूड हेही सर्व घेतले. त्यानंतर आमचे संध्याकाळचे खाणे सुरू झाले. कणीक इतकी काही चांगली नव्हती. पण कणकेच्या पोळ्या इतकेच समाधान होते. भारतीय भाज्याही घेतल्या होत्या. गवार, तोंडली, कारली, भेंडी, इ. इ. सॅक अँड सेव्हला ५० सेंटला बटाट्याचे खूप तिखट चिप्स मिळायचे. ते खाल्ल्याने समाधान व्हायचे. आयस्क्रीमच्या बादल्या मिळायच्या. आयस्क्रीमचे सर्व प्रकारचे फ्लेवर्स मिळायचे. तेही आणायचो. सॅक अँड सेव्हला भाज्यांचा मात्र बरेच वेळा खडखडाटच असायचा.



एके दिवशी प्रविणा आणि नागाने आम्हाला सॅम्स क्लब मध्ये नेले. इथे सर्व काही घाऊक मिळते. त्यासाठी वर्षाची ३० डॉलर्सची मेंबरशिप घ्यावी लागते. एकाकडे कार्ड असले तरी बाकी काही जणांना त्यांच्याबरोबर जाता येते. तिथे आम्ही बासमती तांदुळ घेतले होते. एका पूर्ण फॅमिलीसाठी हे दुकान चांगले आहे. नंतर पुढे आम्ही जेव्हा क्लेम्सनला आलो तेव्हा प्रत्येकी १० डॉलर्स प्रमाणे आम्ही तिघात एक मेंबरशिप घेतली होती. त्यामध्ये २ कार्डे आम्हाला दिली. एका कार्डावर एकाचा फोटो तर दुसऱ्या कार्डावर दुसऱ्या फॅमिली मेंबरचा फोटो होता. क्लेम्सन सोडल्यावर जेव्हा विल्मिंगटनला आलो तेव्हा आम्ही ३० डॉलर्स भरून मेंबरशिप घेतली. या दुकानातून आम्ही बरेच काही आणतो की जे नेहमीच वापरात असते. ते म्हणजे, बासमती तांदुळाचे पोते, साखर, मीठ, धुण्याचा डिटर्जंट, भांडी घासायचे लिक्विड, फरशी पुसायचे ओले पेपर टावेल्स, फर्निचर पुसण्यासाठीचे ओले टावेल्स, दाणे, साबण, हँड वॉशचे लिक्विड, ब्रश केल्यानंतरचे खळखळून चूळ भरायचे लिक्विड, तूप करण्यासाठीचे बटर इ.



सॅम्स क्लब मध्ये महिन्या दोन महिन्यातून एकदा गेले तरी पुरते. बाकीचे इतर सर्व सामान आणण्यासाठी वाल मार्ट मध्ये जातो. तिथे दर आठवड्याला दूध, दही, ज्युस, भाज्या, कांदे बटाटे, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो काकडी, आणि पिण्याचे पाणी, आणतो. सॅम्सला सुरवातीला भाज्याही आणायचो पण नंतर आणणे बंद केले. फ्रोजन चिरलेल्या भाज्या मात्र मी कधीच आणल्या नाहीत. एक दोन वेळा आणून बघितल्या पण आवडल्या नाहीत. आम्ही नेहमीच फ्रेश भाज्याच आणतो. भारतीय दुकानात मात्र महिन्यातून एक वेळा जातो की जे सध्याच्या शहरापासून एका तासाच्या अंतरावर आहे. त्या आधी विल्मिंग्टनला राहत असताना रॅले शहरातून भारतीय किराणामाल आणायला लागायचा. त्याकरता येऊन जाऊन ५ तास जायचे. म्हणून मग मी जास्तीचे सामान आणायला लागले. ते इतके जास्ती होत गेले की घरातच एक दुकान बनले. नंतर आम्ही इतक्या लांब जाणे सोडून दिले. विल्मिंग्टनला राहत असताना एक भारतीय दुकान सुरू झाले होते पण ते ६ महिन्यात बंद झाले. भारतीय वस्ती कमी असल्याने ते म्हणाले की आमच्या दुकानात कोणीच येत नाही त्यामुळे आमचे नुकसान व्हायला लागले होते म्हणून बंद केले. क्लेम्सनला असताना एकदा मी आणि उमाने मिळून भारतीय किराणामालाची यादी ऑनलाईन ऑर्डर केली होती. तेव्हा १०० डॉलर्सच्या वर बील झाले तर फ्री शिपिंग होते. मग माझी आणि तिची मिळून साधारण १२० डॉलर्सचा किराणामाल आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता.
विल्मिंग्टनला राहत असताना भारतीय भाज्या खाण्याचे विसरून गेलो होतो. अमेरिकन स्टोअर्स मधून त्याच त्याच भाज्या खाऊन खूपच कंटाळून गेलो होतो. त्याच त्याच भाज्यांमध्येच थोडे बदल करून भाज्या करायचे. आता मात्र राहत्या शहरापासून एका तासाच्या अंतरावर भारतीय दुकान असल्याने तोंडली, गवार, भेंडी, कार्ली, घेवडा, दुधी भोपळा या भाज्या खाता येतात. शिवाय बाकीचे सटर फटरही आणता येते. ग्लुकोज बिस्किटे, फरसाण, चुरमुरे,, खारी, इ.इ. विल्मिंग्टनला आणि क्लेम्सनला एक थायी दुकान होते तिथे काहीवेळेला भारतीय किराणामाल दिसायचा. पण क्वचित काही मिळायचे. त्याचेही अप्रुप वाटायचे. तिथे काही वेळेला पार्लेजीची बिस्किटे दिसायची, तर काही वेळेला उडदाचे पापड, तर काहीवेळेला टोमॅटो केचप , पोहे आणि रवाही दिसायचा. काही फ्रोजन पराठे दिसायचे. अमेरिकेतल्या मोठ्या शहरातून अनेक भारतीय दुकाने आणि उपहारगृह असतात. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना दूर दूर जायला लागत नाही. अमेरिकेतल्या इतर ग्रोसरी स्टोअर्सची माहीती पुढील भागात.
क्रमश : ----

Tuesday, January 01, 2019

आठवणी वर्षाअखेरीच्या आणि वर्षारंभाच्या

 1 Jan 2019

संध्याकाळच्या सुमारास साडेसात वाजता मी भाजी फोडणीला टाकली आणि ध्यानीमनी नसताना वीज गेली. चोहीकडे दाट अंधार पसरला. स्वयंपाकाघरातल्या एका कपाटात मी नेहमीच एक मेणबत्ती आणि काडेपेटी ठेवते. अंधारातही न चाचपडता ती मेणबत्ती आणि काडेपेटी काढली. आणि लावली. लगच्यालगेच निर्णय घेऊन बाहेर जेवायला गेलो. कारण की इथे इलेक्ट्रिक शेगड्यांवर स्वयंपाक असतो. आता कधी वीज येईल आणि बाकीचा स्वयंपाक होईल याचा विचार करत बसलो असतो तर उपाशीपोटी झोपायला लागले असते. बाहेर जेवायला जाण्याअगोदर आठवणीने मेणबत्या विझवल्या. भाजी फोडणीला टाकली होती ती शेगडी बंद केली आणि बाहेर पडलो.



बाहेर पडून चौकात गेलो तर तिथे खूप मोठा राडा झालेला होता. ऍक्सीडेंट झाला होता. पोलीसच्या गाड्या उभ्या होत्या. कोणी जखमी झाले असेल तर त्यांना हॉस्पीटल मध्ये पोहोचवण्यासाठीच्या गाड्याही उभ्या होत्या. सिग्नल्स चालू नव्हते. चौक बंद करून ठेवला होता. त्यामुळे दुसऱ्या लेन मध्ये जाऊन उजवीकडे वळून परत मुख्य रस्त्याला लागलो. नंतरच्या रस्त्यावर लाईटी होत्या. ठार अंधार आणि नंतर लगेच लाईटी दिसल्या तर अगदी झगमगाट झाल्यासारखाच भास झाला. एक तर वीज गेलेली आणि त्यात हा झालेला अपघात. अर्थात नंतर कळाले की या अपघातामुळेच काही ठीकाणची वीज गेली होती. एका खांबाला एक कार आदळ्याने असे झाले होते.
जेवण करून घरी आल्यावर परत मेणबत्या लावल्या आणि झोपलो. पण झोप कुठची यायला. नशीबाने थंडी नव्हती. थंडी असती तर खूपच कुडकुडायला झाले असते. वीज खात्यात फोन केला तर रात्री ११ वाजता वीज येईल असे सांगितले. गादीवर पडून राहणे याशिवाय दुसरे काहीही करता येत नव्हते. ना इंटरनेट, ना टिव्ही, ना फेबुवर जाता येत होते. वीज केव्हा येईल याची वाट पाहता पाहता केव्हातरी थोडा डोळा लागल्यासारखे झाले आणि नंतर सर्व घरामध्ये लक्ष लक्ष दीप उजळले आणि जाग आली. इतके काही हायसे वाटले. जीव
आल्यासारखा वाटला. डुलकीतून जाग आली तेव्हा २०१८ संपत आले होते आणि २०१९ ची सुरवात झाली होती. घड्याळ पाहिले तर ३१ डिसेंबरचे १२ वाजून काही मिनिटे झाली होती. फोडणीला घातलेली भाजी केली आणि नंतर कॉफी करून प्यायली. झोप उडाल्याने आणि मला काहीतरी खरडावेसे वाटले. नेट चालू झाल्याने आजच्या सारख्या अजून २ आठवणीही लिहिण्याचे ठरवले. आणि नवीन वर्षाच्या सुरवातीला टंकण्याचे काम करून मी झोपेन.




२००१ सालची गोष्ट. टेक्साज मध्ये आमच्या ४ कुटुंबांचा एक ग्रुप झाला होता. ३१ डिसेंबर २००१ चे सेलीब्रेशन काही वेगळेच होते. ३ तेलगू कुटुंबीय आणि आणि आम्ही गोरे मराठमोळे. मी नेहमीप्रमाणेच बटाटेवडे केले होते. ८० बटाटेवडे तळले आणि राहत्या अपार्टमेंटचा स्मोक डिटेक्टर वाजायला लागला. थंडी तर मरणाची होती. मायनस ५ अंश सेल्सियस मध्ये तापमान आणि हिमवृष्टीही चालू होती. दार काही मिनिंटाकरता उघडे ठेवले तेव्हा तो स्मोक डिटेक्टर वाजायचा थांबला. आम्ही दोघे प्रविणा आणि नागाच्या कारमध्ये बटाटेवड्यांचा डबा घेऊन बसलो. एकीने गुलाबजाम, एकीने पुलीहरा, एकीने लेमन राईस, तर स्वीट डिश म्हणून गुलाबजाम केले होते. शिवाय केकही होता. दिवसभर आम्ही सगळ्याजणी ठरवलेले पदार्थ करत होतो. शिवाय दुपारचे जेवण, त्यानंतरची भांडी घासली. परत ठरवलेले पदार्थ करून तीही भांडी घासली. सगळे करून खूपच दमायला झाले होते. एकीच्या घरी जमलो. आणि गप्पा टप्पा केल्या. त्यात अंताक्षरी खेळलो.





अंताक्षरी मध्ये हिंदी, मराठी, आणि तेलगू गाणी होती. मग थोडे जेवलो. जेवण कुणालाच नीट गेले नाही. १२ वाजता सर्वांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि घरी परतलो. दुसऱ्या दिवशी डॅलसला मंदीरात जाणार होतो. पण दुसऱ्या दिवशी हिमवृष्टी बरीच वाढली असल्याने बेत रद्द केला. आदल्या दिवशीचे बनवलेले जेवण सगळ्यांनीच वाटून घेतले होते त्यामुळे नवीन वर्षाचा दुपारच्या जेवण करायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या अन्नाची चव खूपच छान लागली. अश्या रितीने नवीन वर्षाची सुरवात आगळीवेगळी
झाली. त्याचप्रमाणे २०१९ ची सुरवातही झाली. अशीच एक आगळी वेगळी सुरवात नव्या वर्षाची म्हणजेच १९८४ सालची. १ जानेवारी १९८४ साली माझ्या सासूबाईंनी आमच्या दोघांचा कांदेपोहे कार्यक्रम अचानक ठरवला. सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला. कांदेपोच्यांचा कार्यक्रमानंतर मी कामावर गेले. विनू त्याच्या आईवर खूपच चिडला होता. त्याने नोकरी सोडून पिएचडी करण्याचा निर्णय घेतला होता. माझा चेहराही चांगलाच वाकडा झाला होता. कारण मला काहीही केल्या पुणे सोडायचे नव्हते. सासूबाईंनी माझ्या हातात कांदेपोच्यांची डिश आणून दिली. चहाही दिला. आम्ही दोघे एकमेकांकडे अधून मधून कटाक्ष टाकत होतो. आम्ही दोघे काहीच बोललो नाही.
विनुने मला फक्त एक प्रश्न विचारला "तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करता? " तर मी उत्तर दिले "पर्चेस" आमच्या दोघांचे आईवडील खूप गप्पा मारत होते. आई आणि सासऱ्यांचा पनवेली गप्पा तर बाबा आणि सासूबाईंच्या पुणेरी गप्पा. मध्ये ४ वर्षे गेली. बरेच काही घडले.









आणि सरतेशेवटी १९८८ साली आम्ही दोघे विवाहबद्ध झालो. आणि आयायटी पवई वसतीगृहात रु.१२०० शिष्यवृत्तीमध्ये आमच्या दोघांचा संसार सुरू झाला. Wishing you All A very Happy New Year 2019
rohini gore :)


Monday, December 10, 2018

वादळाची कथा





हिमवादळ येणार याची वार्ता आम्हाला वेदर न्युजवर कळाली. तसे तर कामावर जाताना रोजच्या रोज हवामान बघावेच लागते. विशेष करून थंडीच्या दिवसात पाहावेच लागते. विंडचिल किती आहे, थंडीमध्येही पाउस आहे का, तापमान मायसन मध्ये आहे का, तर वेदर चॅनलवर आम्हाला  वादळाबद्दल कळाले. वेस्टर्न नॉर्थ कॅरोलायना मध्ये म्हणजे आम्ही  जिथे डोंगराळ भागात राहत होतो तिथे हिमवादळ येणार आणि १८ ते २० इंच स्नो पडणार आहे हे कळाल्यावर इथे राहणारे सर्व पब्लिक पॅनिक झाले. मी ग्रोसरी स्टोअर्स मध्ये डेली सेक्शनला काम करत असल्याने लोक किती पॅनिक होतात हे जास्त कळत होते. पॅनिक होणे साहजिक आहे कारण की पॉवर जाणार आणि ती गेल्यावर इथे इलेक्ट्रिक शेगड्या बंद होतात आणि स्वयंपाक बनवता येत नाही. अर्थात जे लोक घरी बनवतात त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येतो.  जे जेवण घरी बनवत नाहीत त्यांना ब्रेड आणि बटर बाहेरूनच
जास्तीचे विकत घ्यावे लागते. हातात वेळ आहे ना, होता येईल तितके सामान भरून घ्या असे सर्वांचे होते.




शुक्रवारी कामावर खूपच वैताग आला होता. हॉट बार, सब बार, मीट सेक्शन सगळीकडे रांगाच रांगा. आम्ही म्हणजे मी , विकी आणि कार्मेन उदपादन विभागात होतो. आम्हाला सँडविचेस बनवायला जे मीट लागते त्याची यादी आम्ही मिट केस मधल्या लोकांना देतो त्यांनाही इतके काम होते की आम्हाला लागणारे मांस सर्वच्या सर्व कापून देता आले नाही. कारण तिथेही लोकांनी गर्दी केली होती. उदपादन विभागात बरेच काही बनवून ठेवा असे आम्हाला आमच्या मॅनेजर जेमिने सांगितले. कस्टमर फर्स्ट त्यामुळे आम्हाला खूपच वैताग आला. हॉट बार, सब बारला आम्हाला मदतीसाठी जावे लागत होते आणि शिवाय आमचेही काम करायचे होते. खुपच दमायला झाले होते. डोकेही खूप दुखत होते. घरी आले आणि विनायक पुरते जेवण बनवले. मी कामावरून आल्यावर पोहे करून खाल्ले आणि चहा प्यायला होता त्यामुळे मला विशेष भूक नव्हती आणि काही खावेसे पण वाटत नव्हते. डोळे मिटून शांतपणे झोपावेसे वाटत होते. आणि तसेच केले. शनिवारी सकाळी उठल्यावर जरा बरे वाटले पण भूक खूप लागली होती.शनिवारी सकाळी उठल्या उठल्या शांतपणाने बसून चालणार नव्हते. कामाला जुंपून घ्यावे लागणार होते. पॉवर जाण्याची शक्यता असते आणि इथे तर इलेक्ट्रिक शेगड्या असतात त्यामुळे पॉवर नाही तर शेगड्यांचा काही उपयोग नाही.शॉवरला गरम पाणीही मिळत नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी आम्ही दोघे उठलो आणि कामाला लागलो. तसा तर शनिवार असल्याने पुढील आठवड्याची ग्रोसरी करायचीच होती. त्याची यादी करून विनायकला दिली. आणि विनायक अंघोळ करून बाहेर पडला. विनायकने आठवड्याची ग्रोसरी करून आणली.



आणि मी उठल्यापासून दिवसभर स्वयंपाकच करत होते. शनिवारी वडा सांबार केला. वडा सांबार करण्यासाठी डाळ वाटून घेतली. इंस्टंट शेवया खीर केली. लोणी कढवले. लसूण चटणी आणि ओल्या नारळाची चटणी वाटून घेतली. रविवारचाही दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून ठेवला. पोळी भाजी. कोशिंबीर, थोडा भातही लावला कूकरला. सांबार थोडे जास्तीचे केले.   जर का पॉवर गेलीच तर सोमवारी ब्रेड बरोबर चटण्याही खायला होतील म्हणून जास्तीच्या करून ठेवल्या. फळे आणि बटाटा चिप्सही आणले. सगळी जय्यत तयारी केली. दुपारी जेवताना वडा सांबार , चटणी खाताना खूप छान वाटत होते. आणि त्याच वेळेला स्नो फॉल व्हायला सुरवात झाली. गरम गरम तिखट तिखट सांबाराने तोंडाला चव आली.


मला शुक्रवारी खूप दमायला झाले होते. आणि डोके दुखत असल्याने केळे आणि कॉफी पिऊन झोपले होते त्यामुळे अजिबात चांगली झोप लागली नाही. खूप गरम होत होते म्हणून रात्री हीटर थोडा कमी केला तेव्हा झोप लागली. शुक्रवारचा दिवस डोकेदुखीचा, शनिवारचा दिवस कामाचा गेला. रात्री ढो ढो भांडी पडली. सगळी भांडी विनायकला आधी विसळून दिली. मग त्याने ती घासली आणि नंतर मी विसळली. कचराही टाकून आलो.




रविवारचा दिवस उजाडला. मला कामावर जायचे होते. मफलर टोपी, हातमोजे, जाकीट सर्व तयारीनिशी खाली गेलो आणि पार्किंग लॉट मधून कार बाहेर काढायला लागलो. कार नेहमीसारखीच बर्फाने झाकून गेली होती. थंडीत नेहमीच  जायच्या आधी  कार १५ मिनिटे गरम करून ठेवायला लागते. तसे तर विनायकने कार गरम करून ठेवलीच होती. अपार्टमेंटच्या खाली एक फावडे होते. ते घेऊन कारच्या आजुबाजूचा बर्फ विनायकने काढायला सुरवात केली. मी  कारवरचा बर्फ साफ करायला सुरवात केली. ते फावडे इतके काही जड असते ना की माझ्याच्याने तर ते उचलतच नाही. कार सुरू करण्यासाठी कारमध्ये आम्ही दोघे बसलो. कार पटकन कधीच बाहेर येत नाही. बर्फ पडताना तो भुसभुशीत असतो त्यामुळे लगेच निघतो. पण जर का तापमान खाली गेले तर तो सगळीकडेच चिकटतो. कारच्या आजुबाजूचा वरवरचा बर्फ भुसभुशीत होता पण अगदी खालचा घट्ट झाला होता. त्यामुळे कारची चाके तिथल्या तिथेच फिरत होती. अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या एका माणसाने आम्हाला कारच्या आजुबाजुला साठलेला बर्फ पटापट फावड्याने साफ करून द्यायला मदत केली. विनायक कार सुरू करत होता. थोडी मागे, थोडी पुढे अशी कारची कसरत चालली होती.

कार थोडी मागे आणून वळवणार, पण वळतच नव्हती. परत आम्ही दोघे खाली उतरलो. चाकाच्या आड भला मोठा बर्फाचा थर आडवा आला होता. तो विनायकने साफ केला. हे सर्व करत असताना फ्रीजिंग रेन पडायला सुरवात झाली होती. बर्फ खूपच साठला होता. चालण्यासाठी बर्फामध्ये पाय घालावा तर तो पटकन खाली जात होता. त्यामुळे बुटात बर्फाचे पाणी साठले. मोजे ओले झाले. एकीकडे फ्रीजींग रेन, एकीकडे बर्फ साफ करतोय, परत एकदा कारमध्ये बसून वळवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण कार जागची हालत नव्हती.



त्या माणसाने आमची   कसरत बघितली आणि परत एकदा तो मदतीसाठी आला. तो म्हणाला. मी ट्राय करू का? मग त्याने आमची कार वळवून दिली. आम्ही त्याचे आभार मानले. विनायकने मला कामावर सोडले. मी जिथे कामाला जाते तिथला  पार्किंग लॉट आणि जाण्यायेण्याचा रस्ता साफ करून ठेवतात. म्हणजे तसे काम देऊ केलेले असते. हायवे वर पण मीठ टाकून ठेवलेले असते बर्फ वितळण्याकरता. शिवाय रस्त्यावरचा बर्फही साफ करून ठेवायला गाड्या फिरत असतात.रविवारचा कामावरचा दिवस खूपच वेगळा होता. खूपच तुरळक माणसे कामावर रूजू झाली होती. माझे घर कामाच्या ठिकाणापासून खूपच जवळ आहे म्हणून मी कामावर गेले होते. डोंगरावर आमचे घर आणि डोंगर उतरला की माझे कामाचे ठिकाण. इंगल्स मध्ये खूप वेगळे वातावरण होते. सर्व स्टोअर्स जवळ जवळ रिकामेच होते. गर्दी असलेले स्टोअर आणि रिकामे स्टोअर एका पाठोपाठ डोळ्यासमोर येत होते आणि असा बदल पाहून मजाही वाटत होती. असा खूप वेगळा कामावरचा दिवस अनुभवायला मिळाला. डेली सेक्शनला ऍसिस्टंट मॅनेजर, मी आणि अजून दोघी होत्या. आणि दोघे पुरूष माणसे होती. ब्रेकफास्ट साठी आणि जेवणासाठी काहीजण आली होती.



मी मला होता होईल तितके काम केले आणि एकीने मला घरी सोडले. मी तिचे खूप आभार मानले. घरी आले आणि चहा घेतला. शनिवारचे जेवण बनवलेले रविवारी आणि सोमवारी सकाळीही कामाला आले. पॉवर गेली नाही  पण इंटरनेट अधून मधून जात होते. रविवारी पण खूप दमायला झाले. चहा घेऊन पांघरूण घेऊन झोपले. स्वयंपाकाचे काम नव्हते त्यामुळे रिलॅक्स वाटत होते.सकाळी सकाळी बर्फ काढायचा व्यायाम झाला. आणि कामावर पण उदपादन विभागात मी एकटीच असल्याने दमायला झाले. रात्री काही करायचे नव्हते. जेवून झोपलो. पण मला काल आणि परवाही अजिबात चांगली झोप लागली नाही.




आज सकाळी लवकरच जाग आली. आजचे तापमान वाढले होते.  बर्फ वितळायला सुरवतही झाली. आज दुपारी पण फक्त भाजी केली. पोळ्या केलेल्याच होत्या. त्या कामी आल्या. आज दुपारी जेवल्यावर मात्र जरा चांगली झोप लागली. उठल्यावर अर्थातच चहा आणि परत थोडी आडवी झाले. संध्याकाळी अपार्टमेंटच्या आवारात एक चक्कर मारून आले. छान वाटले चक्कर मारताना. निसर्गाचे रूप बघताना फ्रेश वाटते नेहमीच !


शुक्रवारी दुपारपासून सोमवार पर्यंत स्नो पडत राहिला. कधी हळू हळू तर कधी खूप जोरात. तर कधी स्नो थोडी विश्रांतीही घेत होता. १८ इंच स्नो पडेल असे वर्तवले होते. पण १४ इंचच पडला. मायनस मध्ये तापमान तिनही दिवस होते.  प्रत्यक्षात जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कळाले की बराच स्नो फॉल झालेला आहे. तापमान सारखे बदलत होते. शून्य डिग्री सेल्सिअस, तर कधी थोडे जास्त, तर कधी मायनस मध्ये. त्यामुळे काही वेळ बर्फ न साचता खाली भुसभुशित झालेला होता. या वादळामध्ये विंडचिल नव्हती ते एक बरे झाले. सतत ३ दिवस थोडा थोडा करत स्नो पडला. वादळामुळे तिनही दिवस वेगवेगळे गेले. भरपूर काम, नंतर आराम, जीवनात वेगळे असे काहीतरी
घडले की बरे वाटते. मन नव्याने प्रफुल्लीत होते !!



Saturday, September 15, 2018

फ्लोरेन्स नावाचे वादळ

फ्लोरेन्स नावाचे प्रचंड मोठे वादळ आले त्यात विल्मिंग्टन या शहराची खूपच मोठी हानी झाली आहे. खूप वाईट वाटत आहे. या शहरात आम्ही २००५ ते २०१५ पर्यंत राहत होतो. जवळपास असणारे सर्व समुद्रकिनारे पाहिलेत. तिथले बरेच फोटोज घेतले आहेत. केप फिअर नदीवर तर दर शनिवार रविवार पैकी एक दिवस चालायला जायचो.नदीवर बरेच सूर्यास्त पाहिले. तिथे तर पाणीच पाणी झाले आहे. एका विडिओ मध्ये आणि न्यूज चॅनलवर सर्व प्रकारची झालेली हानी दाखवत आहेत. पेट्रोल पंप उध्वस्त झाले आहेत. कॅरोलायना बीचवर एकीकडे समुद्र आणि एकीकडे रस्त्यावर पाणी आहे. राईटसवील समुद्रकिनाऱ्याची तर खूपच वाट लागली आहे. मोठमोठाली झाडे मुळासकट खाली जमिनीवर पडली आहेत. सर्व रस्तेच नाही तर विल्मिंग्टनपासून सुरू होणारा महामार्ग ४० नेस्तनाबूत झाला आहे. रस्ता दिसतच नाहीये. तिथे फक्त पाणी चिखल आणि असंख्य पाने आणि झाडे पडली आहेत. घरांची छपरे उडाली आहेत. जवळजवळ ४० इंच पाऊस झाला आहे. न्युजमध्ये असे सांगत आहेत की तिथे महिनाभर इलेक्ट्रीसिटी नसणार आहे. न्यू बर्न जॅक्सनविल या छोट्या शहरांची पण खूप नासधूस झाली आहे. हे वादळ आले तेव्हा ते प्रचंड मोठे म्हणजे ५०० मैल व्यासाचे होते.




विल्मिंग्टन पासून ऍशविल पर्यंत आम्ही ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच रस्त्याने हे वादळ येत आहे. विल्मिंग्टन शहरातून बाहेर पडण्यासाठी आधी ७४/७६ रस्ता नंतर महामार्ग ९५ नंतर २० कोलंबिया - साऊथ कॅरोलायना, नंतर ते २६ स्पार्टनबर्ग महामार्गाने ऍशविलला म्हणजे उद्या येईल. पण हे वादळ इथे येईपर्यंत पार मरतुकडे होऊन गेलेले असेल. वादळ जरी साऊथ कॅरोलायना कडे सरकले असले तरीही अजून विल्मिंग्टन, रॅले मध्ये पाऊस पडत आहे.मनात विचार चालू आहेत की आपण आत्ता तिथे राहत असतो तर काय करावे लागले असते? पहिले म्हणजे शहर सोडायलाच लागले असते आणि ते सुद्धा वेळेवर. नंतर विचार करून जाऊ कि नको असे करत बसलो तर अजूनच बरेच अडथळे निर्माण झाले असते. घर सोडून जाताना एक आठवडा पुरेल असे सर्व काही घ्यायला लागले असते. कपडे, औषधे, थोडे अन्न आणि पाणी. शिवाय होॅटेल बुक करून जास्तीत जास्त उंचावर म्हणजे आम्ही आता जिथे राहत आहोत तिथे आलो असतो. डेबिट क्रेडीट कार्डे, फोन, लॅपटॉप, कॅश, असे सर्व काही बरोबर घेऊन जे जे काही सुचेल तेही बरोबर घेऊन जरी निघालो असतो तरी वाहतुक मुरंबा लागला असता.










आणि वादळ शमून गेल्यावरही परत आपल्या शहरात गेल्यावर म्हणजे तसे पटकन जाताही आले नसते. कारण रस्त्यावरून जाता आले नसते. शिवाय तिथे गेल्यावर घरातल्या वस्तुंची काय हानी झाली असेल? याचे विचार मंथन, शिवाय पॉवर नाही. त्यामुळे इंटरनेट नाही. फोन नाही. असे एकेक करून बरेच विचार मनात येत आहेत. विल्मिंग्टन शहरातले दिवस आठवत आहेत. या शहराची प्रलयासारखी झालेली अवस्था न्युज मध्ये पाहून खूप वाईट वाटत आहे. :( Rohini Gore

Thursday, June 28, 2018

२८ जून २०१८

आज सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा विनू म्हणाला "वीज नाहीये" मोबाईल data वरून गुगलमध्ये शोधले असता वीज रात्री ८ वाजता येईल असे कळाले. काल मध्यरात्री २ वाजताच वीज गेली होती आणि म्हणून विनुची झोप उडाली होती. मी २ वाजेपर्यंत जागी असल्याने मला २ नंतर झोप लागली होती :D वीज गेल्यामुळे सर्व कारभार ठप्प होतातच पण इथे अमेरिकेत ते जरा जास्तीच ठप्प होतात. भारतामध्ये वीज जाते तेव्हा घरात गॅस सिलिंडर असल्याने स्वयंपाक, चहा, अंघोळीचे गरम पाणी या सर्व गोष्टी तरी करता येतात. इथे अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रीक शेगड्या असल्याने स्वयंपाक करता येत नाही. शॉवरला गरम पाणी नाही. शिवाय मायक्रोवेव्ह मध्ये चहा पण करता येत नाही. नेट बंद असल्याने सोशल मिडिया वर जाता येत नाही. व्होनेज फोन नेटशी जोडलेला असल्याने आंतर-राष्ट्रीय कॉल करता येत नाहीत. :(



हीटर कूलर नाहीत म्हणजे थंडी असेल तर बसा कुडकुडत ! :D सध्या उन्हाळा सुरू असल्याने कूलर जरी बंद असला तरी आमचे तरी फारसे अडत नाही. आम्ही खिडक्यांची दारं नेहमीच थोडी उघडी ठेवतो. जरा तरी बाहेरची हवा येऊद्या ना राव ! आज मला कामावर जायचे नव्हते .उद्या परवा आणि तेरवाही कामावर जाण्याचे वेळापत्रक आहे. आम्ही दोघेा कामावर जातो त्यामुळे मी आदल्यादिवशीच दोघांचे जेवणाचे डब्बे करून फ्रीज मध्ये ठेवते त्यामुळे आज खूप काही अडले नाही. विनुने थंडगार दूधातच प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायले. तसे इथले लोक थंडगार दूधच पितात पण आम्हाला दूध गरम करून पिण्याची सवय आहे. शॉवरला थोडेफार कोमट पाणी असल्याने विनुने अंघोळ केली आणि तो कामावर निघून गेला. मला म्हणाला चहा ऑफीसमध्येच घेईन. मी पण कोमट पाणी तर कोमट पाणी, थंड नाही ना ! म्हणून लगेचच अंघोळ करून घेतली. थंडगार दूधात इंन्स्टंट कॉफी आणि साखर घालून कोल्ड कॉफी प्यायली. ती खूपच छान लागली. विचार केला की आपण कधीच उपवास करत नाही, या निमित्ताने करू. आणि जशी भूक लागेल तसे खाऊ. म्हणजे आज जेवणासाठी तेल तिखट मीठ पोहे खाऊ असा विचार केला पण तो फक्त विचारच राहिला. भाजी होती पण कणीक भिजवलेली नव्हती. अर्थात कणीक भिजवलेली असली तरी पोळ्या कश्या करणार होते मी? ज्यांना सकाळी उठल्यावर गरम चहा प्यायची सवय असते त्यांची अवस्था चहा न मिळाल्याने खूप वाईट होते, तशीच माझी झाली. अंघोळ करूनही चहा न प्यायल्याने पारोसे असल्यासारखेच वाटत होते.



सकाळचे १० वाजले आणि पोटात कावळे "काव काव" करायला लागले. ड्रेस घातला आणि इंगल्स मध्ये गेले. तिथे सँडविच खाल्ला. कोक प्यायला. संध्याकाळच्या खाण्याला कूकीज आणि पोटॅटो चिप्स घेतले आणि थोडावेळ कॅफेत बसून निघताना कॉफी घेतली आणि १ वाजेपर्यंत घरी आले. कूलर नसल्याने खूप गरम होत होते. सगळेच ठप्प असल्याने आडवी पडून राहिले. झोप लागली नाहीच पण खूप पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले. तसे तर इथे स्मशान शांतताच असते. वीज गेल्याने त्यात जरा जास्तीच भर पडते. वीज असल्याने गाण्यांचा आवाज, आपलीमराठीवर मराठी मालिकांचा आवाज येत असतो त्यामुळे घर भरल्यासारखे वाटते आणि आवाजांच्या सान्निध्यात राहिल्याने आपण एकटे नाही याचा खोटा का होईना दिलासा मिळतो. आजच्या दिवसाचे वीज नसल्याचे कारण कळाले नाही. बहुतेक ट्रान्सफॉर्मर जळाल्याने फक्त शहराच्या काही भागातच काम चालू असल्याने वीज पुरवठा नव्हता असे मला इंगल्स मध्ये कळाले. या आधी २ ते ३ वेळा वीज नसल्याचे दिवस काढले होते पण त्यावेळेला वादळ वारे आणि पाऊसही होता.



रात्री ८ वाजता येणारी वीज ४ वाजताच आल्याने बरे वाटले. लगेचच पहिला चहा करून प्यायला आणि गरम गरम तिखट तिखट पोहे खायला केले. दुखणारे डोके बऱ्यापैकी शांत झाले. आज आता रात्री नेहमीप्रमाणेच पोळी भाजी करीन. डब्बे भरीन आणि उद्या कामाला जाईन. वीज गेल्याने आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा गेला.
Rohini Gore

Tuesday, March 06, 2018

फूटपाथ

फूटपाथ आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. फूटपाथ म्हणजे मुख्य रस्ताच्या बाजूने काढलेली एक पायवाट की ज्यावरून आपण सुरक्षित चालू शकतो. एकीकडे वाहनांची वर्दळ असते. वाहने कशी जात आहेत यावरून एक नजर टाकता येते. तसेच वाहने चालवणाऱ्यांनाही एक नजर फुटपाथाकडे टाकता येते. असा हा फूटपाथ माझ्या आयुष्यात आला. त्याचा सहवास साधारण सव्वा ते दीड वर्षांचा होता. किती आधार वाटायचा मला याचा !

तब्बल १० वर्षानंतर आम्ही आमचे राहते घर सोडले आणि विनायकच्या नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात आलो. ज्या जागेत आलो ती आम्हाला घ्यावीच लागली. अपार्टमेंटच्या शोधकार्यात चांगला अनुभव आला नाही. शिवाय जे अपार्टमेंट उपलब्ध होते ते मागच्या बाजूला की जिथून फक्त आणि फक्त झाडेच दिसायची. आम्हाला दोघांनाही चालायला खूप आवडते. एके दिवशी विनायक बाहेर फिरायला म्हणून पडला आणि मला येऊन सांगितले की "आपल्या अपार्टमेंटच्या आवारातून बाहेर पडल्यावर एक फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स ग्रोसरी स्टोअर्स पर्यंत पोहोचतो. तू पण फिरून ये एकदा"



नवीन शहरी विनायक ऑफीसला जायला लागला पण ऑफीसला जाताना पाऊण तास आणि येताना पाऊण तास वेळ. त्यामुळे दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचा. सकाळी ८ ला निघायचा ते रात्री ७ ला यायचा. दिवसभर मी एकटीच ! आधी ज्या शहरात आम्ही राहत होतो तेव्हा विनायक दुपारच्या  जेवणाला घरी यायचा. त्यामुळे मला थोडीका होईना त्याची सोबत मिळायची व बाकीचा वेळ मी एकेक उद्योग करत रहायचे. दहा वर्षे करत राहिले. रेसिपी लेखन, इतर लेखन, फोटोग्राफी,बदकांना तळ्यावर जाऊन
ब्रेड घालणे, पब्लिक लायबरी मध्ये जाऊन काम करणे, कॉलेजला जाणे. इ. इ. इ. बरेच काही केले. प्रत्येकाला कुठेतरी पुर्णविराम द्यावा लागतो. तेच तेच करण्यातकुठेतरी खूप कंटाळवाणे होऊन जाते आणि नंतर दुसरे काही उद्योग शोधून त्यात मग्न होऊन जातो.



या फूटपाथने मला दुसरे काही शोधण्यात मदत केली. मी खूप ऋणी आहे या फूटपाथाची ! यावरून चालताना मला आधार तर वाटायचाच पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चालताना अनुभव व आनंद मिळाला. चालायला ५० मिनिटे लागायची. या फूटपाथवरून चालत जाऊन इंगल्स मध्ये थोडा वेळ घालवल्यामुळे एकदा नोकरीबद्दलचे विचारले असता मला इथे इंगल्स मध्ये नोकरी लागली. सुरवातीला मी वेळ जाण्याकरता या फूटपाथावरून चालत जायचे आणि यायचे. जाताना, येताना व इंगल्स्मध्ये थोडा वेळ बसून, तिथली स्टार बक्स मधली कॉफी पिऊन यायचे. सर्व मिळून माझा तीन तासांचा वेळ जायचा. छान वाटायचे. सकाळी आवरून १० ला निघायचे ते १ पर्यंत जेवायच्या वेळेला घरी यायचे. डोंगराळ भाग असल्याने रस्त उंचसखल आहेत. कधी चढण तर कधी उतरण. एके ठिकाणी थांबायचे थोडे. सिमंटचे दोन कट्टे आहेत समोरासमोर थोडे उंचीला लहान सहज बसता येण्याजोगे. त्यावर बसून थोडा दम खायचे आणि मग निघायचे.

जेव्हा मला इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा कामावरून येताना फूटपाथवरून चालत यायचे. कामावरून
निघण्याची वेळ ४ होती. निघण्यापूर्वी मी कॉफी आणि थोडेसे काही खाऊन निघायचे. कामाला जाताना जी बॅग होती त्यामध्ये जय्यत तयारी असायची. इथे पाऊस केव्हाही पडतो. कामावर सकाळी जाताना वेदर चॅनलवरचे हवामान पाहायचे. शिवाय हवामानाच्या वेबसाईटवर तासातासाचे हवामान पण नोंदवलेले असते. ते पाहून ४ वाजता नक्की कोणत्या प्रकारचे हवामान आहे हे बघावेच लागायचे. पाऊस असेल तर छत्री आठवणीने न्यावी लागायची. नुसता झिमझिम पाऊस असेल तरी सुद्धा !

थंडीमध्ये कोट, टोपी, मफलर, हातमोजे ठेवायचे. पाणी पिण्याची बाटली, शिवाय थोडीफार कुकीज असायचे. माझे कामावरचे दिवस आठवड्यातून ४ दिवस, त्यातले २ दिवस सोमवार ते शुक्रवार मधले असायचे. प्रत्येक दिवस वेगळा असायचा. कधी झिमझिमणारा पाऊस तर कधी विजा चमकून कोसळणारा. थंडी मध्ये कधी झोंबणारे वारे तर कधी वारे अजिबात नसून
फक्त गोठवणारी थंडी असायची. कधी खूप ढगाळलेले वातावरण तर कधी उनसावलीचा खेळ ! उन्हाळ्यात प्रखर उन. या दिवसात कोट छत्रीचे ओझे नसायचे. पण उन्हाचे चटके खूप बसायचे. जसे थंडी मध्ये खूप थंडी लागू नये म्हणून झपाझप चालणे तसेच उन्हाळ्यात चटके
बसू नयेत म्हणून
पाऊले पटापट उचलायला लागायची. जेव्हा ढगाळलेले वातावरण असायचे तेव्हा रमतगमत छान वाटायचे चालायला.
 एक ना अनेक वेगवेगळ्या तऱ्हा. स्नो पडून गेल्यावर व पडत असताना मजा काही वेगळीच. जेव्हा थंडी आणि बोचऱ्या वाऱ्याची भर असायची तेव्हा मफलर खूपच उपयोगी पडायचा. चालताना समोरून वारे यायचे ते अडवण्याकरता नाकापाशी मफलर धरायचे.

क्रमश : .....

Thursday, December 21, 2017

भेटवस्तुंची देवाणघेवाण

भेटवस्तुंची देवाण घेवाण : - किती छान वाटते ना ! :) तर आज आमच्या इंगल्स स्टोअर्स मध्ये सगळ्यांसाठी स्नॅक्स आणि कोल्ड्रींक होते. दोन तीन प्रकारच्या कुकीज, दोन तीन प्रकारची चॉकलेटे, केक, बटाटा चिप्स, इ. इ. होते. तिथे भेटवस्तू पण रॅप करून ठेवल्या होत्या. त्या वस्तू म्हणजे सिक्रेट सांता त्याकरिता आधी आपले नाव यादीत द्यावे लागते. २ वर्षांपूर्वी मला नोव्हेंबर मध्ये नोकरी लागली होती तेव्हा काही माहीती नव्हते. दुसऱ्या वर्षी माहीती झाले होते पण कार्मेन म्हणाली की ती यामध्ये भाग घेत नाही म्हणून मी पण भाग घेतला नव्हता. तर आधी यादीत आपले नाव द्यावे लागते आणि जी भेटवस्तू द्यायची असते ती १० डॉलर्स च्या खाली असता कामा नये. १० डॉलर्स च्या वरती कितीही चालेल. आणि नंतर २ दिवसांनी आपल्याला एक चिठ्ठी उचलायची असते. त्या चिठ्ठीत कोणाला भेटवस्तू तुम्ही देणार आहात त्याचे नाव लिहिलेले असते. पण आपण ज्याच्याकरता भेटवस्तू देणार आहोत ते त्याला कळवून द्यायचे नसते. तर आज काहींना ज्या भेटवस्तू मिळाल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 


विकीला के कडून भेटवस्तू मिळाली ती म्हणजे कानातले आणि काचेची एक बाहूली. खूप छान होती. पिझ्झा बार मध्ये एक मेक्सिको देशातली मुलगी आहे तिला मोठा मेक अप बॉक्स मिळाला. हा बॉक्स तिला बेकरी मध्ये काम करणाऱ्या मुलीकडून मिळाला. मेक अप बॉक्स मिळाल्यावर ती खूपच खुष झाली होती. ती रोज चेहऱ्याला काय काय लावून येते. काजळ, लाली, डोळे वाढवते. पापणीच्या वर रंग लावते. त्या रंगांमध्ये चमचम पण असते. तिला ते खूप छान दिसते. एकीला प्रोड्युस मधल्या मॅजेजर कडून एक उबदार पांघरूण मिळाले. विकीने एकीला पिझ्झाचे गिफ्ट कार्ड दिले. आता ही झाली सिक्रेट सांता देवाण घेवाण. पण ख्रिसमस च्या निमित्ताने काहीजणी एकमेकींना अश्याच काही भेट वस्तू देतात. त्यात असेच काही उपयुक्त वस्तू असतात आणि काही चॉकलेटेही असतात.



विकीने मला यावर्षी पॉपकार्नची बॅग दिली की जी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यावर पॉपकॉर्न तयार होतात टणटण उड्या मारत. शिवाय दोन तीन प्रकारची चॉकलेटे आणि कोकोआ मिक्स दिले. तर या ज्या भेटवस्तू देतात ना त्या सजलेल्या पिशव्याच जास्त छान असतात ! मी मागच्याच्या मागच्या वर्षी चॉकलेटे दिले. आणि मागच्या वर्षी लोंबते कानातले दिले. सर्वजणी खूप खुष होत्या. २ वर्षापुर्वीच्या भारतभेटी मध्ये मी तुळशी बागेतून सगळ्यांना कानातले खरेदी केले. सर्वांना आवडले. यावर्षी माझ्या मनात नेकलेस द्यायचे होते पण बाहेर जायला अजिबातच जमले नाही. आता मी पुढील वर्षी छोट्या सजवलेल्या पिशव्यांमधून एक लिपस्टिक, एक नेलपॉलिश व चॉकलेटे देणार आहे.



विकी व कार्मेन ला मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण काहीतरी देते. एकदा कार्मेनला चॉकलेटे दिली.एकदा कानातले दिले. विकीला एकदा एक कप केक आणि फुगा दिला. आता यावर्षी मी दोघींना भारतातला गुलमोहोर प्रिंट करून आणि तो फ्रेम मध्ये घालून देणार आहे असा विचार आहे. :)



यावरून मला एक कल्पना सुचली. आपल्याकडे सिक्रेट संक्रांती करता येईल :) तीळगुळाबरोबर भेटवस्तू अर्थात ऑफीस मध्ये. संक्रांतीचे हळदी कुंकू ज्या बायका घरी करतात त्यात ज्या लुटायच्या वस्तू देतात तर काही बायका चिठ्ठ्या ठेवतात आणि मग त्या चिठ्ठीत जी वस्तू येईल ती त्या बाईला मिळते. असे आपल्याकडेही आहेच की !!! :) :)

 

Thursday, December 07, 2017

पोलीसीखाक्या

आमची कार महामार्ग ४० वरून खूप जोरात धावत होती. डीसीवरून निघालो होतो. महामार्ग ९५ हा आम्हाला खूप आवडतो. या रस्त्यावर खूप शिस्तीत वाहतूक चालते. निघायला उशीर झाला होता. थंडीचे दिवस होते त्यामुळे ५ ला निघतानाच अंधार झाला होता. एकापाठोपाठ एक अश्या कार टेकलेल्या होत्या. तरीही कुठेही वाहतुक मुरंबा झाला नाही. सर्वजण ठरवून दिलेल्या वेगानेच जात होते. आमच्या  प्रवासाला ५ तास उलटून गेले होते आणि केव्हा एकदा घरी पोहोचत आहोत असे होऊन गेले होते. विल्मिंग्टनला येण्यासाठी महामार्ग ४० घ्यावा लागतो
आणि त्यावर लागणारी मोठी शहरे ओलांडली की विल्मिंग्टनला जाण्यासाठीचा हा रस्ता एकदम ओसाड होतो. वाहतूक खूपच तुरळक होते.   विल्मिंग्टन -( नॉर्थ कॅरोलायना ) शहरात हा महामार्ग संपतो. तसा तर हा महामार्ग ईस्ट आणि वेस्ट कोस्टला जोडणारा प्रचंड मोठा आहे. नॉर्थ कॅरोलायना मधून सुरूहोतो ते कॅलिफोर्नियात संपतो.
विल्मिंग्टन शहर जिथे आम्ही पूर्वी राहत होतो तिथे समुद्रकिनारे आहेत पण ते इतके काही फेमस नाहीयेत त्यामुळे या शहरी कोणीही येत नाही.
तर रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. डाव्या बाजूच्या लेनवरून आमची कार जात होती. एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात मला वीज चमकल्यासारखे वाटले. मी म्हणाले पण विनायकला की वीज चमकली. पाऊस येणार की काय? पण वातावरण तर तसे दिसत नाहीये. हे मी म्हणायला आणि विनायकने अतिमंद वेग करत करत कार रस्त्याच्या  डाव्या बाजूला घ्यायला एकच गाठ पडली. विनायक म्हणाला " वीज चमकत नाहीये. मागे बघ. पोलीस आहेत" मि पण मागे वळून पाहिले तर पोलीसची गाडी आमचा पाठलाग करत होती. माझ्या पोटात खूप मोठ्ठा गोळा आला. मी म्हणाले काय झाले? आपले काय चुकले? माझ्या डोळ्यासमोर तर मी व वि कारागृहात आहोत असे चित्र तरळले. :D  विनायक म्हणाला मला पण माहीती नाहीये काय झाले ते. आणि आता तू पोलिसांच्या समोर बडबड करू नकोस. गप्प रहा. :D तसा तर विनायकचा चेहराही पडला होता. आम्हाला पोलीसांनी पकडले असे आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होते. विनायकने
कार बाजूला घेउन थांबवली व कारच्या बाहेर आला. मी पण बाहेर येऊका? अश्या प्रश्नार्थक नजरेने सीट बेल्ट काढत होते. पोलीस म्हणाले "नको"   तू जागेवरच बस. कारचे दार लावले. पोलीस आणि विनायक काहीतरी बोलत होते. माझ्या चेहऱ्यावर "काय बोलतायत एवढे? काहीही झालेले नसूदे" असे भाव चेहऱ्यावर होते.  १ ते २ मिनिटांनी विनायक कार मध्ये येऊन बसला. पोलिसांशी विनायकने हस्तादोंलन केलेले दिसले. आणि माझा जीव भांड्यात पडला.

पोसीस लगेचच निघून गेले आणि मी लगेचच विनायकला विचारले "काय रे झाले होते? " विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात? तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतोय असे आम्हाला झाले आहे. आणि रस्ताही रिकामा आहे. त्यावर पोलीस म्हणाला "तुमचा जीव तुम्हाला प्यारा आहे ना? " मग लक्षात ठेवा. ठरवून दिलेली वेगमर्यादा
पाळत जा. इथे ड्रग घेऊन जाणारे आणि दारू पिऊन चालवणारे बरेच जण असतात. तुमच्या कारचा वेग वाढला आणि अचानक एखादी कार तुमच्या मागे येऊन तुमच्याशी स्पर्धा करायला लागली तर तुम्ही तुमच्या वेगाचा ताबा नीट करू शकणार नाही. नीट लक्षात ठेवा. आमचे नशीब आम्हाला सक्त ताकीदच मिळाली. तिकीट दिले नाही. पोलीसांचे म्हणणे खरे होते. बोलताबोलता कारचा वेग इतका वाढला होता ते आमच्या लक्षातच आले नाही.

महामार्गावर जास्तीची लिमिट ७० असते. तुम्ही फार फार तर ८० ने जाऊ शकता. पण १०० च्या
वर वेग गेला? बापरे ! लक्षात ठेवायला पाहिजे.  विनायक उत्तम कारचालक आहे. १७ वर्षात फक्त २ छोटे अपघात झाले आहेत. पण  त्यावरून बरीच माहीती कळाली. पहिल्या अपघाताचा अनुभव दुसऱ्या अपघाताच्या कामी आला. अपघाताचा अनुभव कसा,  कुठे, कधी आणि त्यासाठी काय का
करावे लागते आणि समजते ते पुढील लेखात बघू. :)

Friday, October 20, 2017

मी अनुभवलेली अमेरिका ... (7)

मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा आमच्या लग्नाला एक तप पूर्ण झाले होते. काही वर्षे नोकरी केली पण गृहीणी म्हणून माझी खरी ओळख आहे. स्वयंपाक नामक जी चीज असते ती मी इथे अनुभवताना माझी सुरवातीला खूप चिडचिड झाली. इथे आल्यावर इलेक्ट्रीक शेगड्या बघितल्यावर माझे डोकेच फिरले. मला गॅसवर स्वयंपाक करायला खूप आवडतो. दुधं तापवायची सवय होती त्यामुळे मी कॅनमधले दूध आधी पातेल्यात ओतले आणि तापत ठेवले. गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवले. साय विरजण्यासाठी दुपारी दुध बाहेर काढले पण सायीचा थर काही दिसेना. अगदी थोडासा पातळ पापुद्रा पसरला होता दुधावर. ४ पर्सेंट फॅटवाल्या दुधावर कशी काय साय धरणार? मला वारणा आणि गोकुळ दुधाची सवय होती. दाट दूध. चहामध्ये अगदी थोडे घातले तरी पुरते. तिथल्या आणि इथल्या चहाची धुंदी वेगवेगळी. इथल्या चहाची धुंदी मला कधी आलीच नाही. पारंपारिक चहा करण्याची सवय इथे पार मोडून गेली. दुपारी मी चहाच्या ऐवजी कोक प्यायला लागले. सुरवातीला टी-बॅग्ज कापून त्यातली चहाची भुकटी घालून चहा बनवायचे. नंतर एका मैत्रिणीकडून कळाले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा बनवता येतो. तसे करून बघितले आणि दुध पाणी आणि चहाचे प्रमाण ठरवून ते निश्चित केले आणि पारंपारिक चहा बनवण्याच्या पद्धतीला काट मारून टाकली. एकतर इलेक्ट्रिक शेगड्या पटकन तापत नाहीत. त्यामुळे
चहा बनवताना आच तीव्र ठेवायला लागायची त्यामुळे चहाच्या पातेल्याची बुडे काळी पडायला लागली आणि मग ती घासून घासून कंबरडेमोडायला लागले. जाड साय नाही म्हणजे सायीचे दही नाही, लोणी नाही. घरचे कढवलेले तूपही नाही. ही सर्व कामे इथे आल्यावर बाद झाली. 

सुरवातीला मी दही भारतासारखेच घरी बनवायचे. दही लावण्याकरता विरजण मी प्रविणा कडून आणले होते. प्रविणा माझ्यासारखीच दही-दूध प्रेमी बघून मला खुप आनंद झाला होता. नंतर दह्याचे डबे आणू लागलो. अर्थात घरचे दही ते घरचे दही. भारतात असताना उसने मी कधी घेतले नव्हते कुणाकडून पण अगदी क्वचित वेळ आलीच आणि शेजारणीकडे मागितले तर नेमके ते त्यावेळी तिच्याकडे नसायचेच. इथे आल्यावर प्रविणा माझ्याकडून उसने घ्यायची. कांदा, बटाटा वगैरे. उसने घेणे आणि ते आठवणीने परत करणे हाही प्रकार बाद झाला इथे आल्यावर. उरलेल्या अन्नाचे काय करायचे? इथे कामवाल्या बायका येत नसल्यानेते कधीतरी त्यांना क्वचित देण्याचाही प्रकार घडला नाही. तसे तर लग्न झाल्यावर मुंबई मध्ये आल्यावर आणि दोघंच दोघे असल्यावर
जेव्हढ्याच तेवढे बनवण्याची सवय असल्याने उरलेल्या अन्नाचे काय करायचे याचा फारसा त्रास झाला नाही. आपण बनवलेला पदार्थमैत्रिणीच्या घरी वाडग्यातून नेवून देणे आणि तिच्याकडला वाडग्यातून आलेला पदार्थ आपणही चवीने खाणे हे मात्र मी खूप छान अनुभवले इथे. आमच्या तिघींचा ग्रुप होता. माझ्याकडून काय येतयं याची वाट बघायच्या मैत्रिणी. त्यांच्याकडूनही रसम, सांबारंम, लेमन राईस आणि पुलीहोरा असे वेगवेगळे पदार्थ माहीती झाले. आपल्याकडची साबुदाणा खिचडी, बटाटेवडे यांची चवही त्यांना आवडली. हळूहळू काळ जसा पुढेपुढे सरकत गेला तसतसे सर्वच्या सर्व कामे आपली आपणच करायची सवय लागून गेली.

भारतातल्या सगळ्या सवयी मोडून गेल्या. जसे की....

-दुधासाठी पिशवी दारात अडकवली की त्यात दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतात.
-दार उघडले की पेपर दारातच असतो.
- केराचा डबा बाहेर ठेवलेला असतो तो कचराही केरवाला घेऊन गेलेला असतो.
-कामवाली बाई आली की धुणे, भांडी, केर, फरशी पुसणे
तीच करते. सर्व प्रकारची दळणे आणून देते.

Monday, October 02, 2017

इंगल्स मार्केट ... (५)

एके दिवशी मी फ्लोअर चेक करत होते त्यादिवशी विकी मला कॅफे मध्ये बसलेली दिसली आणि ती रडत होती. मी मनात म्हणले नक्कीच काहीतरी झालेले आहे. ती आल्यावर मी तिला विचारले काय झाले? तर ती म्हणाली की जेमी डेली मॅनेजरने तिला झापले. मी म्हणाले का? तर म्हणाली जेमिचे असे म्हणणे की "मी (विकी) हॉट बार आणि सब बार ला मदत करत नाही." मी म्हणाले करतेस की तू मदत. आपण सगळ्याजणीच करतो.
डेली सेक्शनला असे आहे की हॉट बार आणि सब बार ला कुणी कस्टमर आले तर Customer Service First तिथे नेमलेल्या बायका असतात पण खूप गर्दी झाली तर आम्ही उत्पादन विभागातल्या, सुशी विभागातल्या बायका त्यांच्या मदतीला जातो. मी विकीला सांगितले रडू नकोस. ती बोलली ते मनावर घेऊ नकोस. बी हॅपी आणि मी तिला हग केले. तसे तिच्या चेहऱ्यावर थोडे हासू उमटले. नंतर २ दिवसांनी माझ्याबरोबर काम करणारी कार्मेन हिने मला सांगितले की विकी जेमिला म्हणाली की रोहिणी तिला मदत करत नाही. तेव्हा जेमी विकिला म्हणाली की रोहिणीला मध्ये आणू नकोस. तेव्हा मी कार्मेन ला सांगितले असे काहीच नाहीये. मी पण हॉट बारला मदत करते. नंतर जेमीने डेली मॅनेजरची जागा सोडली आणि Customer service या पोस्टवर गेली. ती म्हणाली की डेली सेक्शनला खूप कामाचे प्रेशर आहे.नंतर त्या जागी दुसरा डेली मॅनेजर आला. त्याने जेमिकडून ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली आणि १५ दिवसानंतर कामाचे खूप प्रेशर आहे हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून गेला. नंतर आला ऍडम. हा ऍडम मीट केसमध्ये काम करत होता आमच्याच स्टोअरला त्याने हे काम स्वीकारले. त्याने ३ महिने काम केले. काम चांगल्या रितीने सांभाळत होता. आणि नंतर तोही कामाचे प्रेशर खुप आहे. लोक माझे ऐकत नाहीत. मला मॅनेज करणे कठीण जात आहे म्हणून तोही सोडून गेला. आता मॅनेजरची पोस्ट Assistant Manager तेरेसाने घेतली आहे. ती रेसिस्ट आहे.


आम्ही जेव्हा कामावर येतो तेव्हा संगणकावर आल्याची नोंद करतो. शिवाय काम संपवून जातो तेव्हा आणि जेवणाच्या वेळेला जाताना आणि येताना अश्या प्रकारे सर्व प्रकारच्या नोंदी कराव्या लागतात. तिथेच एका चार्टवर कामावर असताना तुमचे वर्तन कश्या प्रकारे असू नये हे लिहिलेले आहे. शिवीगाळ करणे, अश्लील बोलणे-वागणे इ. इ. करू नये. जर का कुणी अश्या प्रकारे वर्तन केले आणि जर का कुणी कुणाची तक्रार केली की लगेचच त्याला/तिला कामावरून काढून टाकले जाते. आमच्या डेली विभागात दोन बायका आहेत त्या सगळ्यांना ऑर्डरी सोडत असतात जणू काही त्याच मॅनेजर आहेत ! हो, असे वाटते काहींना.




हॉट बार - सब बार ला एक आफ्रीकन अमेरिकनची नेमणूक झाली होती. तिच्यावर वर म्हणल्याप्रमाणे मॅनेजर समजून ऑर्डर सोडणारी एक बाई खेकसली. तिला ते सहन झाली नाही आणि तिने डेली मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर कडे तक्रार न करता थेट एचआरडी कडे तक्रार केली. हे तिने उत्तम काम केले. एचआरडी कडून डेली मॅनेजर करवी त्या दोघींना चांगलाच "हग्या दम " मिळाला की "जर पुन्हा असे वर्तन केले तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल" दुसरी जी बाई आहे खेकसणारी तिने एका अमेरिकन बाईला ढकलले आणि हे प्रत्यक्ष डोळ्याने कार्मेन आणि रोझने पाहिले. ती बाई म्हणाली की मी नोकरी सोडते. तर कार्मेन म्हणाली तू कशाला नोकरी सोडतेस. तू तक्रार नोंदव. तुला न्याय मिळेल. अश्या रितीने दोन बायकांनी दोन बायकांविरूद्ध तक्रारी केल्या आणि त्यांना दम भरला की परत जर का असे केलेत तर तुहाला "टाटा बाय बाय" करावे लागेल.


डेली मॅनेजरचा त्या दोघी खेकसणाऱ्या बायका तिच्या मर्जीतल्या आहेत. एके दिवशी असे झाले की मीट केसमध्ये एक अमेरिकन बाई आहे ती आफ्रीकन अमेरिकन बाईला म्हणाली की मी तुला मीट कापून देते. तू तेव्हढे ते रॅप करून घे. माझ्याकडे आज खूप कस्टमर आहेत त्यामुळे मला वेळ नाहीये. तर ती आफ्रीकन अमेरिकन बाई वैतागली जिने तक्रार नोंदवली होती ती ही बाई. तिने मीट केसमधल्या त्या अमेरिकन बाईला तिच्या तोंडावर शिवी दिली. लगेच तिने डेली मॅनेजरला सांगितले आणि डेली मॅनेजरने तिला लगेचच कामावरून काढले.आता हिने तरी शिवीगाळ करावी का? बरे केली तरी शिव्या देण्यापेक्षा एखाद्याला ढकलणे हा जास्त मोठा गुन्हा आहे. डेली मॅनेजरने तिलाही दम भरला असता की एक वेळ सोडून देते. दुसऱ्या वेळी कामावरून काढण्यात येईल. तिला एक चान्स द्यायला हवा होता. बहुतेक डेली मॅनेजरला आफ्रीकन अमेरिकनने एच आरडी कडे तक्रार केल्याबद्दल राग आलेला असावा आणि सहनही झाले नसावे.

Monday, August 21, 2017

खग्रास सूर्यग्रहण - एक अविस्मरणीय अनुभव !!







सूर्यग्रहण पहायला मिळेल असे काही आमच्या ध्यानीमनी नव्हते. अमेरिकेतल्या काही राज्यांमधून ते दिसणार होते. मागच्याच आठवड्यात कळाले की Brevard शहरात खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. Brevard शहर आम्ही राहत असलेल्या Hendersonville शहरापासून साधारण अर्ध्या तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे जिथे विनायक ऑफीसला जातो. सूर्यग्रहण बघण्याच्या काचा आम्हाला विनायकच्या ऑफीसमधून मिळाणार होत्या. २१ ऑगस्ट २०१७ हा दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील खूप आकर्षक दिवस ठरून गेला. सोमवारची मी रजा टाकली होती आणि विनायक बरोबर सकाळी सर्व तयारीनिशी मीही निघाले. विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स हे समोरासमोर आहेत. अगदी समोरासमोर नाही पण ऑफीस मधून २ ते ३ मिनिटे ड्राईव्ह केल्यावर एक मोठा चौक लागतो. हा चौक ओल्यांडल्यावर सरळ गेले की इंगल्स स्टोअर्स लागते जिथे मी काम करते पण मी काम करते ते आम्ही राहत असलेल्या शहरात. आमच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर. या इंगल्स स्टोअर्सची २०० ग्रोसरी आणि इतर अशी दुकाने आहेत २ ते ३ राज्यांमध्ये मिळून. या स्टोअर्समध्ये स्टरबक्स कॉफी आहे. शिवाय इथला कॅफे इतका काही छान आहे की इथे येऊन कोणीही कितीही वेळ बसावे. काहीही करावे. वाचावे, लेखन करावे, लॅपटॉपवर काम करावे.


खग्रास सूर्यग्रहण बघण्याच्या टप्यात विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स असल्यानेच या योग जुळून आला होता. आम्ही सकाळी निघालो ते विनायकने मला आधी इंगल्स मध्ये सोडले आणि तो ऑफीसला गेला. सुमारे १ वाजता मला विनायकने ग्रहण बघण्याच्या काचा आणून दिल्या. त्या आधी मी ९ ते १ कॅफेत बसून होते. ९ ते ११ वहीत बरेच काही लिहिले. ब्लॉगवरचे काही लेख अपूर्ण आहेत ते मला संपवायचे आहेत. लिखाणासाठी जो निवांत वेळ लागतो तो आज मला सूर्यग्रहणाच्या निमित्ताने मिळाला होता. ११ वाजता मी व्हेज सँडविच खाल्ले. combo sub मध्ये सँडविच बरोबर कोक आणि बटाटा चिप्सही मिळतात. जेवण झाल्यावर मी सूर्यग्रहण पहाण्यासाठी इंगल्सच्या पार्कींग लॉट मध्ये एका झाडाखाली येऊन बसले. बरेच जण झाडाखाली अंथरूणे पसरून पहुडली होती. काही जण खुर्च्या आणून त्यावर बसले होते. तर काही जण कार मध्येच कूलींग लावून बसले होते. चित्रपटाची सुरवात झाली. किती छान दिसतोय सूर्य ! मनाशीच बोलले मी ! विस्तीर्ण लांबवर पसरलेले आकाश आणि काचेतून सूर्याचा गोळा एखाद्या श्रिखंडाच्या गोळी सारखा पिवळा दिसत होता. आजुबाजूला काळे निळे, तर काही धुरकट पांढरे ढगही दिसत होते. चंद्राची सूर्यावर सावली पडायला सुरवात झाली. ही चंद्राची काळी चकती हळूहळू पुढे सरकत होती. अधून मधून मी विनायकशी फोनवर बोलत होते. विनायकच्या ऑफिसमधले सर्वजण काम करता करता अधून मधून बाहेर येत होते आणि ग्रहणाला बघत होते. वेदर पार्टली क्लाऊडी
असल्याने काळे निळे ढग ग्रहणावरती येऊन परत बाजूला होत होते, असे दृश्यही बघायला मिळाले. सूर्य तर खूपच देखणा दिसत होता. मी अधून मधून सूर्यग्रहण बघत होते तर अधून मधून झाडाखाली सावलीत बसत होते. असा खेळ दीड तास चालला. २ वाजून ३० मिनिटांनी एक मोठा Climax ्स झाला. Climax तर मध्यंतराच्या आधीच संपला. आता स्टोरीत काही अर्ध उरला नाही म्हणून लोक परतायला लागले. चंद्राने सूर्याला स्पर्श केला तेव्हा दुपारचा १ वाजून ८ मिनिटे झाली होती. चंद्राने मुहूर्त अजिबात चुकवला नाही. स्पर्श करून जेव्हा तो पुढे सरकला तेव्हा तर सफरचंद दाताने तोडून थोडा भाग खाल्यासारखे कसे दिसते तसेच चित्र दिसले. Just like apple product symbol !


 Photo credit - Los Angles Times - from Net
Climax जेव्हा जवळ यायची वेळ आली तेव्हा तर सर्वजण श्वास रोखून सूर्याला आणि त्यावरच्या चंद्राच्या चकतीला पाहत होते. थोडे थोडे करत सूर्य झाकला जात होता. आता अगदी काही क्षणच उरले होते. सरते शेवटी बांगडी फुटलेल्या बारीक काचेचा तुकडा कसा दिसतो तसाच सूर्याचा तुकडा दिसला. आणि नंतर हळूहळू एक टिंब आणि नंतर काही सेंकदातच सूर्य पूर्णपणे झाकला गेला. तेव्हा तर "ये पल तो यही थम जाए तो अच्छा होगा " अशीच माझ्या मनाची अवस्था होऊन गेली. संध्याकाळ नाही तर पूर्णपणे अंधार ! रात्रच जणू ! आकाशात कुणीतरी टॉर्च घेऊन उभे आहे असेच वाटत होते. आता सूर्याकडे काचेशिवाय बघता येत होते. जेव्हा चंद्र उजवीकडून डावीकडे सरकला मात्र !अहाहा ! सर्वांना हिऱ्याच्या अंगठीचे दर्शन झाले. सूर्याची वळ्यासारखी दिसणारी कड आणि मधोमध सूर्याचा तेजस्वी तेजाचा हिऱ्यासारखा चमकणारा खडा ! काय ही निसर्गाची किमया ! देवा तुझी करणी अगाध आहे रे ! खूप गहिवरून आले मला. अश्रू गालावरून ओघळले. आता सूर्याची कोर उजव्या बाजूने दिसायला लागली आणि नंतर वाढत गेली. अडीचला मी परत कॅफेत येऊन बसले आणि हा अवर्णनीय अनुभव वहीत उतरवला. पावणेचारच्या सुमारास मी परत पार्कींग लॉटमध्ये गेले आणि झाडाखाली उभे राऊन सूर्याला परत डोळे भरून पाहून घेतले. आता चंद्राची सावली कमी कमी होत गेली आणि परत सूर्याचा तप्त पिवळा गोळा दिसायला लागला. चारच्या सुमारास कॉफी प्यायली आणि विनायकची वाट पाहत परत कॅफेत येऊन बसले. निसर्गाचे चित्र बदलून रपारप पाऊस पडायला सुरवात झाली. घरी परत येताना वाहतूक मुरंबा ! घरी आलो आणि लगेचच मी हा लेख टंकत आहे. आज मी खूप भारावून गेली आहे !! आता हे भारावलेपण २ दिवस तरी नक्कीच टिकेल. आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सूर्यग्रहणाचा अवर्णनीय सोहळा पहाण्याचा जबरदस्त योग जुळून आला होता तर !!!
Rohini Gore - smruti blog Photo credit - Los Angles Times from Net


Photo Credit - Only in North Carolina Page - Photo taken by Sallie J. Woodring Photography
Downlod from  Internet



Tuesday, March 07, 2017

इंगल्स मार्केट ...(4)

विकी मला "रोरो" म्हणते. आमचा जो ओटा आहे तिथे मध्यभागी एक रेष आहे तर म्हणते हा डावीकडचा माझा ओटा आणि उजवीकडचा तुझा. मी म्हणते "ओके! " तुझे साऊथ कॅरोलायना आणि माझे नॉर्थ कॅरोलायना" डू नॉट क्रॉस द स्टेट लाईन, ओके! :) तर गाल्यातल्या गाल्यात हासते. एकदा तर मजाच झाली. ती सकाळी लवकर येत असल्याने काय काय बनवायचे याची एक यादी तयार करते आणि मला विचारूनच तू काय काय बनवणार आहेस? आणि त्यापुढे "रोरो" लिहिते. एकदा तिने मजेने ROW (रोरो) लिहिले होते. :D पदार्थ लवकर बनव असे म्हणायचे झाल्यास "हरी अप" नाही म्हणत, " हरी हरी हरी" म्हणते. मग मी पण तिला ती पदार्थ बनवताना " हरी हरी हरी" म्हणते. :D ६६ वर्षाची विकी मजेशीर आहे. तिच्याबरोबर काम करताना मजा येते.



मी, विकी आणि कार्मेन (spanish) आम्ही तिघी उत्पादन विभागात आहोत. मला कार्मेन ने काम शिकविले. विकी आणि कार्मेन दोघीही एकमेकींच्या नावाने खडे फोडत असतात. उत्पादन विभागात खूप काम असते. आमच्या मदतीला सुशीवाल्या बायका त्यांच्या मनात असेल तर त्यांचे काम संपवून आम्हाला मदत करतात. त्यात एक लुलू :D नावाची बाई आहे. हे नामकरण विकिनेच केले आहे. ही लुलू नावाची बाई मुळची फिलीपाईन्स देशातली. ही ६३ वर्षाची आहे.




आम्हाला हॉट बारला मदत करावी लागते. कारण की कस्टमर्सना पहिले प्राध्यान्य दिले जाते. एकदा एक बाई आली आणि मी तिथे होते. तर मला म्हणाली दोन ड्र्मस्टीक. मी गोंधळले. विचारले शेजारच्या टबाटाला. ति म्हणाली she wants fried legs Rohini :), oh ! (me) :D ऑर्डर देणाऱ्या बाईने पण ड्रमस्टीक वाजवण्याची ऍक्शन करून दाखवली आणि म्हणाली, it looks like drumsticks ! oh, got it ! (me) :) एका तंगडीची किंमत किती हे यादीत पाहिले आणि त्याप्रमाणे गुणिले २ करून लेबल प्रिंट केले आणि तिला २ तंगड्या दिल्या. इथे ऑर्डर देताना काही जण जेवणाची ऑर्डर देत नाहीत. तर काहीवेळा ८ किंवा १६ पिसेस ऑफ चिकन मागतात. त्यात 8 pieces means 2 breast, 2 thigs, 2 legs and 2 wings. त्याचे मी मनातल्या मनात मराठीकरण केले आणि मनातल्या मनात खूप हासले.




नंतर एके दिवशी एकदा एक माणूस आला आणि मला म्हणाला I want dark meat, मी परत गोंधळले आणि विचारले तर टबाटा म्हणाली he wants legs and wings rohini :)
गोंधळण्याचे कारण की जन्मात कधी मांस आणि चिकन पाहिलेही नाही आणि खाल्लेही नाही. मी मांस त्याच्या रंगावरून ओळखायला लागली आहे. हॅम म्हणजे गुलाबी , रोस्ट बीफ म्हणजे लाल त्याच्या कडा काळपट. बीचवुड हॅम म्हणजे गुलाबी आणि कडा विटकरी आणि फुलासारख्या गोलगोल. मांसाचे बरेच प्रकार आहेत. हॅमच्या पातळ चकत्या म्हणजे आपल्या तांदुळाच्या ओल्या पापड्या रंग वेगळा :) हॅल सलाड म्हणजे दिसायला गाजरहलव्यासारखे रंग वेगळा. :)
सगळ्यांना माहीती झाले आहे की मी पक्की शाकाहारी आहे ते. शिवाय मी दारूही पीत नाही आणि सिगरेटही ओढत नाही ते.




मला एकदा एकीने विचारले की इंडियातले सर्व लोकं असेच आहेत का? तर मी म्हणाले नाही गं ! आमच्यासारखी मोजकीच लोकं अशी आहेत. बाकी सर्वजण मांसाहार करतात, दारू पितात आणि आणि सिगरेटीही फुंकतात. ती हासली :D आणि ओके म्हणाली.


डेली सेक्शनला पुरूष आणि बायका दोघेही कामे करतात. १८ वर्षापासून ते ६७ वर्षांच्या वयोमर्यादेतील सर्वजण आहेत. Arthur नावाचा एक आर्मी मधला मुलगा काही दिवस आमच्या डेली सेक्शनला होता. त्याने मला विचारले की तू कोणत्या देशाची आहेस. मी म्हणाले इंडिया. त्याला खूप आनंद झाला कारण की तो कॉलेजमध्ये cultural studies शिकत होता. त्याने मला विचारले आर यु तमिळ? मी म्हणाले नो, आय एम मराठी. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडलेला दिसला नाही. :D मग मी म्हणाले , आय एम हिंदी. ओह! हिंडी ! याया हिंडी हिंडी ! :D मग म्हणाला खूप प्रकारच्या प्रकारच्या भाषा बोलतात ना इंडिया मध्ये. मी म्हणाले हो.
कॅन यु स्पिक संस्कृत? नो रे बाबा ! माय मदर टंग इस मराठी, बट आय कॅन
स्पिक हिंडी,अँड इंग्लीश, नो तमिळ, नो संस्कृत ! :D त्याला संस्कृत शिकायचेय ! त्याला भारतीय कलचर आवडते हे समजल्यावर मला खूप छान वाटले.





जॉन नावाचा अजून एक मुलगा होता, तो आता आमच्या इथे काम करत नाही. मी टबाटाला म्हणाले की जॉन इथला जॉब सोडून चालला आहे का? अशी नोट वाचली मी जेमीच्या टेबलावर. ती म्हणाली छे गं. :) असे त्याने बरेच वेळा लिहिले आहे. पण यावेळेला खरच त्याला दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला होता. मी त्याचे अभिनंदन केले आणि विचारले कुठे दुसरी नोकरी? तर म्हणाला steakhouse, fancy restaurant, more money ! :)
मजेशीर होता जॉन. लहर आली सगळ्यांना म्हणायचा I love you ! I love you Carmen, I love you lulu, I love you rohini. मग आम्ही पण सगळ्या जणी म्हणायचो मी टू, मी टू :D मग हगची खूण करायचा. मला तशी खुण केल्यावर मी फक्त हासले. त्याला ते कळले असावे. (मनात म्हणले मी नाही हं कुणाला हगबिग करणार. :D मला हगिंग हा प्रकारच आवडत नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री. ) हा टबाटा बरोबर हॉट बार आणि सब बार ला असायचा. १२ तासाची ट्युडी करायचा. अतिशय प्रामाणिक आणि मेहनती होता.
इथे एक स्पॅनिश मुलगा आहे. तो सकाळी कॉलेजला जातो आणि दुपारच्या शिफ्टला कामाला येतो. मला विचारत असतो तुमच्या भाषेत याला काय म्हणतात नि त्याला काय म्हणतात. एकदा विचारले नाईफ ला काय म्हणतात तर मी म्हणाले चाकू. तेव्हापासून तो कामाला आला की मला हाय हॅलो न म्हणता चाकू, चाकू म्हणतो.






आमच्या इथे सब, हॉट, सुशी बार बरोबर आणखी दोन बार सुरू झालेत ते म्हणजे पिझ्झा बार आणि ऐशियन बार. त्याची तयारी काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती पण आज हे २ नवीन बार प्रत्यक्षात सुरू करायचे होते. सुशी बार चा मॅनेजर सगळ्यांना (आम्हाला नाही) सूचना देत होता. ऍडम आमचा डेली मॅनेजर त्याने सांगितले की आज सर्वांनी हजर रहायचे आहे. ज्यांचा डे ऑफ आहे त्यांनी सुद्धा. टु फेस न्यू सिच्युएशन. अजून काही माणसे कामावर रूजू झाली आहेत. इतकी गर्दी छोट्या जागेत की आवाज सहन होत नव्हते. जातायेता एकमेकांवर सर्वआदळत होते. :D आमचे सामान मिळणे कठीण झाले होते. कोल्ड रूम सध्या तरी खूप मागे गेली आहे त्यामुळे बनवलेले पदार्थ तिथे जाऊन ठेवण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे पाय प्रचंड दुखत आहेत. :( कार्मेन मला म्हणाली की मला तर चिकन केस मध्ये कश्या कोंबड्या वावरतात ना तसेच वाटत आहे. :D बाकीचीही बरीच बदलाबदली झाली आहे. गिचमिड गिचमिड. मला तर वाटत होते या आवाजाने आणि गर्दीने मी चक्कर येऊन पडते की काय. :( विकी चा आज फोटो काढण्याचा मूड होता. माझ्या ऍप्रन वर जे स्टीकर्स आहेत ते चिकन सॅलड सँडविचचेे. पदार्थ बनवून झाले की त्याचा कोड प्रिंटर वर टाकून त्यावर आकडा टाकून प्रिंट वर प्रेस केले की पटापट लेबल्स बाहेर येतात. मग ती ऍप्रन ला चिकटवायची आणि मग प्लॅस्टीकच्या डब्यांना. अजून २ स्टीकर्स चिकटवायचे असतात. आज विकी ने माझा आणि सुशीवाल्या दोघीजणींचे फोटोज काढले. मग मी पण एक विकीचा काढला. कार्मेन चा आज मूड नव्हता. मी तिचा पण फोटो काढणार होते. कार्मेन, मी आणि विकी उदपादन विभागात आहोत. नवीन मॅनेजर ने मला विकीसाठी २ दिवस आणि कार्मेन साठी २ दिवस ठेवले असल्याने मला आता शनि-रवी पैकी एक दिवस सुट्टी मिळते. आधीची मॅनेजर जेमी आणि विकीचा ३६ चा आकडा :D असल्याने ती मला कार्मेन साठी ३ दिवस द्यायची पण मला शनि-रवी सुट्टी कधीच मिळायची नाही. विकी म्हणते कि तू माझ्याबरोबर पहाटे ६ लाच कामाला येत जा. :D आणि कार्मेन म्हणते की मला तू ४ दिवस हवीस. :) ती ५ दिवस असते. कार्मेन आणि विकी ह्या दोघीही माझ्याकडे एकमेकींच्या नावाने खडे फोडत असतात. :D आणि मी फक्त ya, ok, इतपतच प्रतिसाद देते.
विकीने माझा फोटो काढल्यावर लुलूला म्हणाली "hey lulu, Look at that stickers girl. she is on sale !


अमेरिका म्हणजे सारे कसे छान छान असे नाहीये. गुळगुळीत रस्ते (काही रस्ते खडबडीत आहेत की ज्यावरून कार चालवली की आपण होडीत बसल्यासारखे वाटते :D ) आणि स्वच्छ हवा (काही ठिकाणी अत्यंत बोचरे वारे आणि हाडे गोठवणारी थंडी असते :( स्प्रिंग्मध्ये परागकणांची ऍलर्जी की काहीजणांना रोजच्या रोज गोळ्या घ्याव्या लागतात नाहीतर श्वास घ्यायला त्रास होतो :( आणि उन्हाळा म्हणजे काही राज्यात रणरणते उन असते. हवा इतकी बदलती असते की एका दिवसात सर्व ऋतू पहायला मिळतात.




इथेही बायकांना बऱ्याच समस्या असतात. मी ग्रोसरी स्टोअर मध्ये काम करते त्यामुळे मला माहीती झाले आहे. कमीतकमी मजूरी प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. प्रत्येक राज्याच्या महागाईनुसार ही मजूरी आहे.
आमच्या स्टोअरमध्ये ज्या बायका काम करतात त्यांचे जीवन कसे आहे ते काही त्यांच्याशी बोलून तर काहींनी ते मला सांगितले म्हणून माहीती पडले. स्टोअरमधला पगार त्याना पुरत नाही. पगार कमी आणि कष्ट खूप.
एक अमेरिकन बाई आहे. वय वर्षे ३० तिचे लग्न झाले आणि तिला ३ मुले आहेत. ती मला म्हणाली की ती तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे. कारण की तिला नवरा दारू पिऊन खूप मारहाण करतो. तो तिला बोलावत आहे परत ये म्हणून पण ती म्हणाली की मी आता मार सहन करणार नाही. काही झाले तरी मी परत जाणार नाही. तिची ड्युटी सकाळी ७ ते दुपारी ३ अशी आहे. ती लवकर उठून मुलांचे व स्वतःचे आवरून मुलांना डे केअर मध्ये सोडते आणि मग कामावर हजर होते. बरे नसताना पण ती कामावर येते. मला म्हणाली की मला पैशांची गरज आहे.




मेक्सिको देशामधल्या ४ बहीणी त्यांच्या चुलत भावांबरोबर अमेरिकेत १९८८ साली आल्या. पोटापाण्याकरता (सर्वजण इथे पोटापाण्याकरताच येतात, मजा मारायला येत नाहीत. ) त्यातल्या २ बहिणी आमच्या इथे काम करतात. दोघींचे नवरे व्हाईट अमेरिकन होते. एकाला रोग होता तो त्याने सांगितला नाही आणि तो लवकर मरण पावला. तिला एक मुलगा आहे. तिच्या बहिणीचा नवराही व्हाईट अमेरिकन होता. त्याने पैशाची अफरातफर केली आणि तो पळून गेला. तिला एक मुलगी आहे. त्यामुळे त्या दोघी बहिणी आणि त्यांची मुले एकत्र रहातात.
एक अमेरिकन बाई आहे तिची आई दवाखान्यात आहे. तिलाही असाच कुठला तरी रोग झाला आहे. पण ती आईकरता तिला होत नसनाही काम करते.
एक अमेरिकन बाई आहे तिला आता Breast cancer झाला आहे. त्यामुळे तिच्या ऑपरेशन करता ती काही दिवस रजेवर होती. मला वाटले की २ ते ३ महिने तरी येणार नाही. पण महिन्याच्या आत रूजू झाली. तिलाही पैशाची गरज आहे.





एक फिलिपियन बाई तिच्या नवऱ्या बरोबर इथे आली. आणि काही वर्षांनी तिचा नवरा वारला. ती ग्रीनकार्डावर आहे. आणि एका बॉय फ्रेंड बरोबर राहते. तिला ५ मुले आहेत. सर्व मुले निरनिराळ्या देशात आहेत.
एक फिलीपियन बाई आहे. ती सिंगापूर मध्ये काही वर्षे काम करत होती. लग्न झाले आणि मुले झाली. तिचा नवरा वारला. सिंगापूरमध्ये तिला एक व्हाईट अमेरिकन भेटला. आणि त्यांचे प्रेम जमले. ५ ते ६ वर्षांनी त्यांनी लग्न केले आणि ती अमेरिकेत आली. तिचा दुसरा नवराही वारल. तिला एक मुलगी आहे. तिच्याकरता ती नोकरी करते. ती पण एका बॉयफ्रेंड बरोबर राहते.



आपल्याला वाटते की अरे, या वयात बॉयफ्रेंड? पण बॉयफ्रेंड म्हणजे नुसता सेक्स नसून बाकीच्याही गोष्टी आहेतच की. कुणाचा तरी आधार आणि भागत नाही म्हणून खर्चासाठी शेअरींग.