फॉल ऋतू सुरू झाला की पानगळतीला सुरवात होते. पानगळतीच्या आधी झाडांवरची पाने त्यांचे रंग बदलायला सुरवात करतात. प्रत्येक झाडावरचे रंग वेगवेगळे ! पिवळा, लाल, तपकिरी, नारिंगी अश्या विविध रंगांमध्ये सर्व झाडे नटून जातात. पानांचे रंग बदलले की ती वाळतात व पडून जातात. झाडांच्या बुंद्याखाली पानांचा पसारा झालेला दिसतो. काही वेळेला मात्र पानांचे रंग तर बदलतात पण ते तितके आकर्षक दिसत नाहीत. पानांनी रंग बदलला आणि पाऊस पडून गेला तर पाने गळून तर पडतातच , शिवाय रंगांचा ताजेपणाही नाहीसा होतो.
हे झाडांचे रंग दिवसादिवसाला बदलत राहतात. आज आकर्षक दिसणारे झाड हवामान थोडे बदलले की फिकट दिसायला लागते. रंगांचा बहर एका विशिष्ट प्रकारच्या तापमानात येतो. हवा थंड तर लागतेच पण खूप नाही. थोडी आर्द्रताही लागते. हवेच्या या विशिष्ट प्रकारच्या तापमानात रासायनिक प्रक्रिया होते आणि रंग बदलतात. काही झाडांची पाने मात्र हिरवीच्या हिरवीच रहातात.
हा रंगांचा बहर इतका काही सुंदर दिसतो की अगदी बघत बसावेसे वाटते. एखादे डेरेदार झाड पूर्णपणे नारिंगी होऊन जाते तर एखादे लालचुटूक ! काही झुडुपांमध्ये सगळे रंग एकत्र आलेले असतात एखादी नवीन नवरी नटावी तसे ! काही झाडे ओळीने पिवळ्या रंगाची झालेली दिसतात. ही झाडे समोरासमोर असतील तर मंडप घातल्यासारखे द्रुष्य दिसते. हिरव्यागार गवतावर रंगीबेरंगी पानांचा सडा तर खूपच खुलून दिसतो. फक्त पिवळ्या पानांचा सडा तर खूपच छान दिसतो. रंगांची बहार संंपून गेली की पाने पूर्णपणे सुकतात आणि गळून पडतात. झाडांवर फक्त काटक्या दिसतात.
छोटे दिवस आणि मोठाल्या रात्री
असा हा निसर्गाचा चमत्कार मनाला खूप आनंद देवून जातो.