Thursday, September 14, 2017

अनामिका ... (१०)


चार दिवस उलटून गेले तरी अजून अमितचा फोन का आला नाही या विचारातच संजली असते. ती विचार करते की इतका लांबचा प्रवास आहे तिकडे पोहोचल्यावर झोपेचं झालेलं खोबरे, दगदग, नंतर आप्गीसला जॉईन होणे यामध्येच त्याचा वेळ जात असणार हे नक्किच ! आपण
 अजून
आठ दिवस तरी त्याच्या फोनची वाट पहायला नको. आपणही आता कामाला लागायला हवे. घरातले पसारे पाहून तिचे तिलाच खूप हासू येते.आणि स्वतःच्याच मनाशी म्हणते आपण नव्हतो तर या बापलेकाने मिळून किती पसारे घालून्न ठेवलेत ! एक गोष्ट जागेवर नाही. संजली हळूहळूपसारा आवरायला घेते खरी पण मन मात्र घडलेल्या प्रसंगातच बुडून गेलेले असते. काय हा योगायोग !



ती स्वतःच्या मनाशीच हसते. तिच्यामुलाच्या ओरडण्यानेच ती भानावर येते. अगं आई मी तुला किती वेळा सांगितले की मला भूक लागली आहे म्हणून पण तुझे क्षच नाहिये.होरे. ओरडू नकोस. स्वयंपाक तयार आहे , जा जेवून घे. "आई वाढ ना ग मला जेवायला" अरे घे ना वाढून तुझे
 तू. मला बरीच कामे आहेत.
आई अशी काय वागते आहे आज, कामे तर हिला नेहमीच असतात. दैनंदिन जीवनक्रमा मध्ये संजली परत खूप बिझी होऊन जाते.



८,१०,१५ ! इतके दिवस उलटूनही अमितचा फोन आलेला नसतो. आता मात्र संजली खूप रडकुंडीला येते. विसरला का अमित आपल्याला? काय गं संजली तू रडतेस? अनिल विचारतो. कुठे काय? मी नाही रडत. आल्यापासून सतत कामाला जुंपली आहे. मी नव्हते तर घराची काय अवस्था होती, किती पसारा घातला होता? काम करता करता संजली कॉटवर बसते आणि तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागतात. अनिल तिच्या जवळ येऊन बसतो आणि विचारतो काय झाले तुला संजली? मुंबईवरून आल्यावर किती खुशीत होतीस आणि आता एकदम रडायला लागलीस? खूप दमलीस ना? मी मदत करतो तुला असे म्हणून अनिल संजलीला मदत करायला सुरवात करतो. नको राहू देत. मी आवरते सर्व. तू ऑफीसला जा. अमित म्हणतो, ओके. चल मी निघतो ऑफीसला. आज महत्त्वाची मिटींग आहे. घरी आलो की आपण दोघेच मिळून कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया. असे म्हणून अनिल संजली ला टाटा करतो. संजलीचा मूड थोडा ठीक होतो.
दुपारची जेवणे आटोपल्यावर संजली वाड्यातल्या झोपाळ्यावर आडवी होते.  जेवणानंतर झोपळ्यावर थोडे आडवे होणे ही तिची नेहमीची सवय असते. संजली आडवी होते आणि तिला थोडी डुलकी लागते. उठते तेव्हा तिचा फोन वाजत असतो. ती घाईघाईने फोन उचलते आणि हॅलो म्हणते तर पलीकडून आवाज येतो हॅलो संजली मी अमित बोलतोय. ओह ! अमित तु बोलतो आहेस. खूप मोठ्या झोपाळ्यावर आडवी पडलेली संजली उठून बसते. किती दिवसांनी फोन? कसा आहेस? वेळेवर पोहोचलास का? आता किती वाजले तिकडे? एक ना हजार प्रश्न. अमित म्हणतो अंग इथे आता पहाटेचे ४ वाजलेत. काय? ती जवळजव्ळ  ओरडतेच. अंग हो मला फोन करायला आताच थोडा वेळ मिळतोय. बरं मी तुला असाच आता या वेळेला फोन करत जाऊ का? तुला कोणती वेळ सोयीची आहे? संजली म्हणते ही वेळ खरी तर मला खूपच सोयीची आहे. पण तुला इतक्या पहाटे उठायला लागेल? तुला खूप त्रास होईल त्याचा. अगं संजली त्रास नाही होणार मला. कामा निमित्ताने मला काहीवेळा रात्रभर जागायला लागते. मी आता ऑफीस मधूनच बोलतोय. तुझा ईमेल आयडी आहे का? तिकडे बोलत जाऊ. मला तुला फोन करायला तसे अवघडच आहे. पण जमेल तसा तुला फोन करत जाईन. पण तुझा ईमेल आयडी असेल तर तिथे बोलू शिवाय फोन वरून बोलायची वेळही ठरवता येईल. संजली सांगते नाही रे. माझा काही ईमेल आयडी वगरे नाही. मला कंप्युटर मधले ओ की ठो कळत नाही. मला फोनची खूप सवय आहे. त्यावरून माझी सगळी कामे होतात आणि बोलणे पण होते. पण मी मैत्रिणींना विचारून तुला मेल पाठवीन. अर्थात तुझा काय आहे ईमेल. पण आता त्या भानगडी नकोत. सध्या तरी आपण फोनवरूनच बोलू. पण ही वेळ मला खूप सोयीची आहे.




बरे अमित, तू सांगितलेस म्हणून मी अनिलला अजून काहीही सांगितले नाहीये की आपण भेटलो म्हणून. अमित म्हणतो होहो नकोस सांगूस इतक्यात. मला पुढच्या भारतभेटीत त्याला सरप्राईज द्यायचे आहे.  अमित म्हणतो. आता काय करतेस? कशी आहेस. तुझाही मुंबई पुणे प्रवास कसा झाला. संजली म्हणते मि मजेत आहे. अरे प्रवासात मला आपल्या टीबद्दलच सारखे आठवत होते. लग्नात आम्ही मैत्रीणींनी खूप मजा केली. मला पण चेंज मिळाला. आता घरी आले आणि परत  कामाला जुंपलेली आहे. खरे तर माझे कशात लक्षच लागत नाहीये. तुझ्याशी खूप बोलावेसे वाटत आहे. अमित म्हणतो तुला आठवत आहे का काही अजून पूर्वीचे. तसे संजली म्हणते की हो काही आठवत आहे. काही नाही. अमित संजलीला विचारतो की माझे कॉलेज संपल्यावर मी तुमच्याकडे पेढे घेऊन आलो होतो ते आठवत आहे का तुला? संजली खुदकन हासते आणि म्हणते हो. चांगलेच आठवत आहे. तु माझी सकाळी सकाळी येऊन झोपमोड केली होतीस. अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो.   

संजली अमितचा फोन नंबर "अनामिका" या नावाने सेव्ह करते. आणि परत झोपाळ्यावर आडवी होते. मागचे दिवस तिला आठवतात आणि त्या दिवसातच ती रमून जाते. संध्याकाळी आवरून भाजी आणते. स्वयंपाक करते. अनिल आल्यावर ती खरे तर दोघेच बाहेर जाणार असतात. अनिल ऑफीस मधून आल्यावर संजलीला बाहेर जाण्याबद्दल विचारतो तर ती म्हणते जाऊ देत. घरीच जेवु. परत कधीतरी जाऊ बाहेर जेवायला.


 क्रमश : ....

Tuesday, September 05, 2017

हवेशीर घर


अपार्टमेंट सी सेव्हन मला पाहताच क्षणी आवडून गेले. एकमात्र तोटा होता की, या घरामध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघराला एक छोटी खिडकी होती. स्वयंपाक करता करता सहजच खिडकीतून डोकावले जायचे. एखाद्दुसरी बाई स्ट्रोलरमध्ये बाळाला बसवून चालत जाताना दिसायची. स्वयंपाकघराला लागूनच मोठाच्या मोठा हॉल होता. हॉलला आणि स्वयंपाकघराला लागूनच डाव्या बाजूला दोन मोठ्या बेडरूम होत्या. हॉलच्या एका बाजूला काचेची सरकती दारे होती. ही काचेची दारे आणि प्रवेशाचे दार उघडे ठेवले की, हवा खूप खेळती राहायची आणि म्हणूनच आम्ही एक आरामदायी खुर्ची या जागेच्या आणि पर्यायाने खेळत्या हवेच्या मधोमध ठेवली होती. या खुर्चीवर खास हवा खाण्याकरिता म्हणून बसणे व्हायचे.


घराच्या दोन्ही बाजूला मोठाल्या बाल्कन्या होत्या. घराच्या प्रत्येक खोलीत सीलिंग फॅन होते. सीलिंग फॅन आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचे होते. ऐन थंडीत हिटर लावलेला असतानाही डोक्यावर फिरणारा पंखा आम्हाला हवाच असतो आणि म्हणूनच मला हे घर जास्त आवडले होते. घराच्या दोन्ही बाजूला बाल्कन्या आणि खेळती हवा ही तर अजूनच मोठी जमेची बाजू होती. स्वयंपाक करता करता हॉलमध्ये ठेवलेला टीव्ही बघता यायचा. बाल्कनीला लागूनच एक जिना होता. या जिन्यात मी दुपारचा चहा पीत बसायचे. स्वयंपाकघराला लागून जी बेडरूम होती ती पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. तिथे बसून मी जे काही सुचेल ते लिहायचे. कधीकधी मध्यरात्री उठून या दुसर्‍या बेडरूममध्ये यायचे. लॅपटॉपवर मैत्रिणींशी बोलायचे आणि मग तिथेच झोपून जायचे. या बेडरूमच्या बाहेर अनेक हिरवीगार झाडे होती. पहाटेच्या सुमारास या झाडांवरच्या पक्ष्यांंची किलबिल सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर पाहिले, तर काही वेळेला आकाशात रंग जमा झालेले असायचे. मग लगेच मी कॅमेरा घेऊन बाल्कनीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत बसायचे.




बाल्कनीत उभे राहिले की, उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा, तर डाव्या बाजूला सूर्यास्त. उन्हाळ्यातली वाळवणं मी याच बाल्कनीत वाळवायला ठेवत असे. दुपारच्या वेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेली असताना काही वेळा अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. सरकत्या काचेच्या दारातून मुसळधार पावसाला बघत राहायचे मी. या दोन्ही बाल्कन्यांच्या कठड्यावर अनेक पक्षी येऊन बसत. या घरातला हॉल इतका मोठा होता की, रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जायचा कंटाळा आला की, हॉलमध्येच शतपावली घातली जायची.
या घरातल्या स्वयंपाकघरात सणासुदीच्या दिवशी साग्रसंगीत पदार्थ केले जायचे आणि नैवेद्याचे ताट वाढून मी फोटोकरिता हॉलमध्ये यायचे. हॉलमध्ये असलेल्या आरामदायी खुर्चीवर ताट ठेवून फोटो काढायचे. पदार्थांचे फोटो काढण्याकरिता हा स्पॉट जणू ठरूनच गेला होता. या घरातल्या मास्टर बेडरूमच्या खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा. चंद्राला बघून आपोआप गाणे गुणगुणले जायचे- ‘ये रात भीगी भीगी, ये मस्त नजारे, उठा धीरे धीरे वो चॉंद प्यारा प्यारा…’
असे हे माझे सुंदर-साजिरे घर माझ्या आठवणींचा ठेवा बनून राहिले आहे…
रोहिणी गोरे
वॉशिंग्टन, युएस

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशी म्हणली की माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचे दिवस येतात. किती छान मिरवणूक निघायची. पहाटे उजाडायच्या आत मिरवणूक संपत आलेली असायची. आम्ही दोघी बहिणी आणि आई नवीपेठेत राहणाऱ्या
मामाकडे यायचो आणि दुपारी १२ ते १ च्या सुमारास आम्हाला पहिल्या ५ मानाच्या गणपतीचे दर्शन व्हायचे ते अल्का टॉकीजजवळ. गुलाल उधळलेले रस्ते छान दिसायचे. ढोल ताशांचे रिदम हृदयाला भिडायचे. संध्याकाळी ७ नंतर आम्ही तिघी आणि मामी अल्का टॉकीजच्या जवळच्या फूटपाथवर संतरंज्या घालून बसायचो. नंतर साधारण रात्री ९ च्या सुमारास नारायणपेठेत राहणाऱ्या मामाकडे सगळी जनता जमायची.



आमची एक मामे बहीण तिच्या घरातील गणपतीचे विसर्जन करून यायची. सदाशिव पेठेतले मामेभाऊ आणि बहिणी यायच्या. नवी पेठेत राहणारे मामेभाऊ यायचे. मग नारायण पेठेत आमच्या सर्व भावंडांचा आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींचा एक अड्डा जमायचा. त्या घरी राहणाऱ्या मामाकडे रात्रीचे जेवण व्हायचे. नंतर माझी आई आणि माम्या झोपायच्या आणि आम्हाला बजाऊन सांगायच्या की दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती आला की लगेच आम्हाला सांगायला या. नंतर आम्ही मामेबहिणी घोळक्याने एकमेकींच्या हातात हात घालून अल्का टॉकीज ते मंडई पर्यंत चालायचो. मध्येच एका गल्लीत जाऊन भेळ खायचो. मध्यरात्री सुजाता हॉटेल मध्ये जाऊन बटाटावडा खायचो. पिपाण्या वाजवायचो. थोड्याश्या तारवटलेल्या डोळ्यांनीच परत नारायण पेठेतल्या मामाच्या घरी यायचो. आमचे सर्व मामे भाऊ मिरवणूकी सामील झालेले असायचे.ढोल ताशे पण वाजवायचे. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती मिरवणूकीत विसर्जनासाठी सामील व्हायचे त्या आधी ११ च्या सुमारास लाईटिंगचे गणपती जायला सुरू व्हायचे. काळ्या कुट्ट अंधारात लाईटिंगचे गणपती खूपच देखणे दिसायचे. मोठमोठाल्या मूर्ती ट्रक मध्ये असायच्या. आजुबाजूला मुल., तरूण मंडळी असायची. तर काही जण गणपतीच्या बाजूलाच गणपतीच्या भव्य मूर्तीची काळजी घ्यायला असायचे. एकेक करत ओळीने गणपती मंडईपासून निघालेले असायचे विसर्जनासाठी जायला.



दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती पाहण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. त्यांच्यापुढे ढोल ताशे तर असायचेच पण लेझीम खेळणारी मुले पण असायची. खूप फटाके वाजायचे. हे २ गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी. गर्दीला आवरणासाठी कडक व्यवस्था होती. सर्वजण साखळी पद्धतीने हातात हात घालून गर्दीला आवरायचे. या दोन्ही गणपतींना पाहत बसावे, ही मिरवणूक पुढे सरकूच नये असे वाटायचे. त्यावेळेला प्रत्येक चौकात खूप स्वागत व्हायचे. खूप शिस्त होती त्यावेळेला. ढोल ताशांचे रिदमही अजिबात संपू नये असे वाटायचे.
आम्ही सर्व जण पहाटे हे दोन्ही गणपती पहायला लक्ष्मीरोड वर हजर व्हायचो. गणपतीला डोळे भरून पहायचो. नमस्कार करायचो. हा सर्व सोहळा डोळ्यात साठलेला असायचा मिरवणूकीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ! मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.



चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!
त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला.

आमच्या घरचा गणपती 2017