Tuesday, December 29, 2020

२०२० डायरी

 दोन हजार एकोणीस संपता संपता न्यू जर्सी मध्ये आलो. एखाद दोन महिने स्थिरस्थावर होण्यात गेले आणि लगेचच कोरोनाचे वारे वाहूलागले. न्यूज वाचली होती कोरोनाची पण तो एवढा विस्तारेल अशी कल्पना आली नाही. चिनीज आपल्या मायदेशी गेले आणि बरोबरकोरोनाला घेऊन आले आणि हा हा म्हणता सगळ्या जगभरात कोरोनाची लागण झाली. नेमके याच वेळी विनायकला न्यूयॉर्कला जावे लागले. जाणे अत्यंत जरूरीचे होते. विनायक एका वकीलाकडे जाऊन महत्त्वाची साक्ष देणार होता. ही साक्ष एका छोट्या कंपनीतर्फे देणार होता आणि ही साक्ष होती एका मोठ्या नावाजलेल्या कंपनी विरूद्ध. छोटी कंपनी विनायकला जाण्या येण्याचा, जेवणाचा, होटेल मध्ये राहण्याचा खर्च आणि २ दिवस कंपनीत रजा घ्यावी लागणार, त्याच्या भरपाईचा खर्च असे सर्व काही देणार होती . त्यात असेही नमूद केले होते की तुम्ही उबर टक्सीने जरी आलात तरी तोही खर्च आम्ही देऊ. आमच्या घरापासून एडिसन रेल्वे स्टेशन चालण्याच्या अंतरावर आहे. मला रेल्वेने प्रवास खूप आवडतो त्यामुळे आम्ही दोघे ठरवत होतो की एकदा रेल्वेने न्यूयॉर्कला जाऊन यायचे. मी विनायकला म्हणाले आपण फिरायला जाणे वेगळे आणि तुला कामासाठी जायचे आहे, त्यात कोरोना चालू झाला आहे तर रेल्वेने जाऊ नकोस, उबरने जा. विनायक २ दिवसासाठी न्युयॉर्कला जाऊन आला पण माझ्या मनात थोडी भीती होतीच. सूचनांचा भडिमार बायको नेहमीच करते त्याप्रमाणे मीही विनायकला सूचना देत राहिले. शेकहँड करू नकोस, कोणाच्याही जवळ बसू नकोस, हॉटेलमध्ये असणाऱ्या उपहारगृहातच जेव वगैरे वगैरे. तसा तर मी त्याच्या साठी काही कोरडे पदार्थ दिलेच होते.

 

विनायक न्युयॉर्कला जाऊन आला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी अमेरिकेत लॉक डाऊन सुरू झाले. ग्रोसरी स्टोअर्स सोडल्यास सर्वच्या सर्व बंद झाले. मुख्य म्हणजे ज्या ज्या स्टोअर्स मध्ये जाऊ तिथे तिथे रिकामे रॅक दिसू लागले. सॅनिटाईझर गायब, टिश्यू पेपर गायब,इतकेच नाही तर आम्हाला पिण्याचे पाणी आणि दूधही मिळेनासे झाले. आम्ही दर शनिवारी सकाळचा चहा झाल्या झाल्या स्टोअर्स मध्येजाऊन जे काही पाहिजे आहे ते ते सर्व आणायला लागलो. त्याकरता आम्हाला २ ते ३ स्टोअर्स हिंडावी लागत होती. हेच पाहिजे, असेचपाहिजे, अश्या तक्रारी न करता समोर दिसत आहे ना? उचला पटापट, नंतर नाही मिळाले तर? असेच सर्वजण करत होते. सगळे जणवेड्यासारखा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या गोष्टींचा साठा करून ठेवत होते. स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या माणसांची धांदल उडत होती.सर्वांना सर्व काही मिळेल या हिशोनाबे शेवटी स्टोअर्स मध्ये " एका फॅमिली करता एकच उचला" अश्या पाट्या दिसायला लागल्या. सुरवातीला तर मी ५ किलो कांदे बटाटे पण आणून ठेवले. काही फ्रोजन बीन्स आणून ठेवले.विनायक संशोधक असल्याने त्याला वर्क फ्रॉम होम नाही त्यामुळे आमच्या रूटीन मध्ये काहीही बदल झाला नाही. चार भिंतींमध्ये आम्हीदोघे एकमेकांची तोंडे सततची न पाहिल्याने आमच्यात भांडणे झाली नाहीत. विनायकच्या ऑफीस मध्ये अंतरा अंतरावर बसण्यासाठीजागा करून दिल्या होत्या. अजूनही तसेच आहे. रोजच्या रोज ऑफीस मध्ये प्रत्येकाने शरीराचे तापमान आपले आपण घ्यायचे आणि ते लगेच मेलने कळवायचे असे रूटीन होते. आणि काम करताना मास्कही लावायचा हे सक्तीचे केले त्यामुळे काळजी नव्हती. तसेही लॅब मध्ये काम करताना ग्लोव्ज आणि पांढरा ओव्हरकोट घालावा लागतोच त्यात मास्कची भर पडली होती.
 
 
नंतर कोरोना इतका काही वाढला की स्टोअर्स मध्ये गेल्यावर रांगेत उभे राहावे लागत होते. एका वेळी १० जणांना स्टोअर्सच्या आतमध्ये घेत होते. स्टोअर्सच्या समोर थंडीच्या दिवसात माणसे रांगा लावत होती. आणि अर्थाताच सॅनिटाईझर आणि मास्क सक्तीचे होतेच. कामासठी रांगा लावणे हा प्रकारच विसरायला झाला होता. रांगांमुळे गर्दी कमी होत गेली. बहुतेक सर्वजण ऑनलाईन ऑर्डर करायला लागले. आम्ही मात्र दोघच्या दोघं असल्याने दर शनिवारी ग्रोसरी करत होतो. मला स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या लोकांची खूप काळजी वाटत होती. मास्क लावून काम करायचे हे किती अवघड आहे याची कल्पनाही करवत नव्हती. तिथल्या लोकांना कामाचा बोजा किती पडत असेल याचा विचार करत होते.कोरोना इतका काही वाढला की अमेरिकेचे राज्यानुसार कोष्टक बघून घाबरायला होत होते. आधी युरोप मधले वाढलेले आकडे पाहत होतोनंतर अमेरिकेचे वाढलेले आकडे पाहायला लागलो. रोजच्या रोज ८०० ते १००० मृत संख्या वाचताना पोटात धस्स होत होते. न्युयॉर्क मध्ये तरमृत्युचा जणू काही सापळाच रचलेला होता !साधारण ६ महिन्या नंतर न्यूयॉर्क न्युजर्सी मध्ये कोरोना केसेस खूप कमी झाल्या आणि डेथ रेट पण कमी झाला . पण आताअमेरिकेतल्या इतर राज्यातून कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. खूपच वाढत आहे. न्युजर्सी राज्यात क्वारंटाईनचे निर्बंध असे आहेतकी तुम्ही दुसऱ्या राज्यात जरी गेलात तरी परत आल्यावर स्वतःला १४ दिवस क्वारंटाईन करायचे.सर्व लाँग वीकेंड वाया गेले.
 
 
प्रत्येक देशाच्या लॉक डाऊनला सर्वांनाच सामोरे जावे लागले. आता प्रत्येकाला कळून चुकले आहे की आता आपल्याला कोरोना बरोबरच राहायचे आहे. काळजी मात्र घ्यायलाच हवी.कोरोनाच्या काळात घरीच बसायचे. अन्न पाणी आणण्याकरताच फक्त बाहेर जायचे. मग करायचे काय घरी बसून ! हा प्रश्न भेडसावाय्ला लागला. नेटफ्लिक्स कामाला आले. बऱ्याच स्पनिश मालिका बघितल्या. सिनेमे बघितले. होटेल्स बंद म्हणून बाहेर काही खाणे झाले नाही. ऑर्डर देवून आणता येत होते. पण कंटाळा यायचा. जायचे, यायचे आणि ऑर्डर केलेले पदार्थ परत गरम करून घ्यायचे. म्हणजेभांडी घासले आलेच परत.चमचमीत काहीतरी करावे आणि खावे असे ठरवले आणि केले पण ! जास्तीचे काही केले की भांडी घासून घासून प्रचंड दमणूकव्हायला लागली. तसे तर इथे भांडी घासायला लागतातच, २ माणसे असली तरीही भरपूर भांडी पडतात. पदार्थ करून रेसिपी लिहायचेते दिवस आठवले. डिपेंडंट विसावर हेच तर करत होते मी, तेव्हाही क्वारंटाईन होतेच की ! अमेरिकेतल्या थंडीत कुठे बाहेर फिरायला जातो?
व्यायाम होईनासा झाला. मग चालणे करायचे मास्क बांधून आणि आठवड्यातून एकदा तरी व्यायाम हा झालाच पाहिजे असे ठरवले व केले.चालणे आणि व्यायाम झाला नाही तर प्रतिकार शक्ती कोठून येणार?स्मृती ब्लॉग मध्ये अजून काही लिहायचे होते ते लिहिले. म्हणजे काही लेखाचे काही भाग लिहून झाले होते आणि आता या पुढचा लेख पुढीलभागात असे लिहिले होते ते सर्व पुढील भाग जितके जमतील तितके लिहिले. काही जुने फोटोज स्कॅन केले. हे सर्व करूनही पुढे काय?हे प्रश्नचिन्ह उभे राहतेच. तसेही कोरोना नसता आला तरीही पुढे काय हा प्रश्न उरतोच माझ्या आयुष्यात. 
 
 न्युजर्सी मध्ये आल्यावर नोकरीचा प्रयत्न केला होता. दोन ठिकाणाहून मुलाखतीसाठी बोलावणे पण आले पण त्यावेळी नेमकी माझी तब्येत बिघडली होती. आता असे वाटते की होते तेचांगल्यासाठीच. इंगल्स हँडरसनविल मध्ये काम करताना इतके काही दमायला व्हायचे की नोकरी सोडाविशी वाटायची आणि सोडली तर काय करायचे या विचारात कॉलेज मध्ये जाऊन स्पॅनिश शिकावेसे वाटत होते. ही स्पॅनिश शिकण्याची इच्छा कोरोनाच्या काळात पूर्ण झाली.कोर्सेरा वर स्पेशलाईझेशन इन स्पॅनिश व्होकॅब्युलरीची ५ कोर्सेसची सिरीज पूर्णत्वास नेली. वेगळी भाषा प्राथमिक लेव्हलला शिकायला मिळाली. यामुळे वेळ चांगला गेलाच आणि मन बिझी होऊन गेले. घरातले काम आणि अभ्यास यामध्ये इतकी व्यग्र होऊन गेले की डोक्यात इतर फालतू विचारांना थारा मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीदायक काळात मे ते डिसेंबर महिने कधी गेले ते कळले नाही.सणवार तर आपण करतोच. काळ कोणताही असो. सणावारा निमित्त आपण जे करतो त्याने थोडातरी उत्साह येतोच. मी ब्लॉगवर जे नवीन लेखन केले ते लेख तुम्हाला २०२० या लेबल मध्ये दिसतील. त्या लेखाची शीर्षके आहेत अनुक्रमे, पीठाची गिरणी, टेलिव्हिजनचे दिवस, वेणीफणी, कॅसेट, आहार, व्यायाम, वजनातील घट आणि वाढ एक स्वानुभव, एका कथेचा जन्म, आणि संभ्रम या दोन अतिलघूकथा ब्लॉगवर लिहिल्या. महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला माझ्या आईवरचा लेख, ऍपल पिकींग, कोर्सेस, बर्थडे गर्ल - आई, रोजनिशीची काही पाने, रस्ते,आईच्या आठवणी, बैठे खेळ, मला सुचलेली एक प्रेमकविता आणि एक फिलोसॉफिकल कविता ब्लॉग वर लिहिली. बाबांवर केलेली कविता, क्लेमसनच्या आठवणींचे काही लेख, नेटफ्लिक्सवर स्पॅनिश सिरीज पाहिल्या त्याचे थोडक्यात रसग्रहण, त्यात एका सिरीजचे रसग्रहण केले आहे. त्याचे पुढील भाग लिहायचे बाकी आहेत. अजून काही सिरीजचे रसग्रहण लिहायचे मनात होते पण लिहिले गेले नाही.
 
 
साडी चॅलेज मध्ये साडी नेसली गेली. फेसबुकवर काही खेळ टाकले होते. गाळलेल्या जागा भरा. यामध्ये इंग्रजी शब्द होते. काही अक्षरे लिहियची आणि काही अक्षरे गाळलेली जागा. अजून एक म्हणजे जुन्या-नव्या चित्रपटांची नावांची अक्षरे उलटीसुलटी करून द्यायची आणि ती ओळखायला सांगायची. जो ओळखेल त्याने पुढील चित्रपटाचे नाव द्यायचे. एक खेळ असा टाकलाहोता की दोन पैकी एक पर्याय निवडा. व परत दोन पर्याय द्या. यामध्ये काही जणींनी भाग घेतला होता. कोरोना काळातला हा एक टाईमपासकेला. जे काही ठरवले होते ते करता आले नाही. एडिसन रेल्वे स्टेशनवर बसून न्युयॉर्कला जाणार होतो. इथे काही पाहणार होतो. टेकटूरच्या २ ते ३ दिवसाच्या छोट्या ट्रीप करणार होतो. खूप चांगल्या ट्रीप्स होत्या. लाँग वीकेंडला या ट्रीप झाल्या असत्या. ७ ते ८ महिन्यांनी जेव्हा उपहारगृहामध्ये डाईन इन सुरू झाले तेव्हा १५ दिवसातून एकदा बाहेर जेवायला लागलो. घरी माझ्या स्वतःच्या हाताच्या चवीने खाऊन खाउन तोंडाची चवच निघून गेली होती. काहीतरी चमचमीत करत होते उत्साह वाढवण्यासाठी पण भांडी बरीच पडत होती. मग शेवटी वेगवेगळेपदार्थ करणे थांबवले. रगडा पॅटीस, मसाला डोसा, चकोल्या, दुधी हलवा, गाजर हलवा, असे काही ना काही पदार्थ केले होते. जेव्हा लॉकडाऊन उठले तेव्हा बाहेर काय परिस्थीती आहे ते पाहण्यासाठी एका मॉल मध्ये गेलो. तिथे शुकशुकाटच होता. परिस्थितीगंभीर वाटत होती. काही उत्साही बायका खरेदी करत होत्या. मला तर तिथल्या कपड्यांना हात पण लावावासा पण वाटत नव्हता. फिटींगरूम अजूनही बंदच आहेत.
 
 
२०२० किती वेगळे गेले ना ! ग्रोसरी शिवाय बाहेर जाणे नाही, खरेदी नाही. लाँग वीकेंडला वेगळेपणा नाही.
आधी जी मनात भीती साठून राहिली होती ती कमी कमी होत गेली. कोव्हिड केसेस किती वाढल्या, कितीजण मृत्युमुखी पडले हीकोष्टके बघणेही संपले. हळूहळू न्युयाॅर्क व न्यू जर्सी मधल्या केसेस खूप कमी झाल्या. थोडे हायसे वाटले खरे पण हे सर्व कधी संपणारही टांगती तलवार अजूनही आहेच आणि लस येईपर्यंत राहीलही. माणसांना कोरोनाची सवय होऊन गेली.२०२० संपता संपता लस तर आली पण तरीही टांगती तलवार गेलेली नाही. २०२० पेक्षा २०२१ बरे असे म्हणावेसे वाटते. कदाचित २०२२ची पहाट चांगली असेल अशी आशा करायला हारकत नाही.
प्रत्येक देशाचे लॉकडाऊन वेगळे त्यामुळे प्रत्येकालाच त्या त्या देशाच्या अंतर्गत कोव्डिडचा सामना करावा लागला आहे. तसे तर २०२० वर्षाने शिकवले पण खूप ! असे वाटते निसर्गाने सूत्र हातात घेतली आहेत का? कोरोना निमित्तमात्र आहे. कोरोनाने ज्यांचे बळी घेतले त्यांच्या घरात किती दुःखाचे सावट पसरलेले असेल याची कल्पनाही करवत नाही. Wishing you All a Very Happy and healthy New year 2021 !
 
 

Friday, December 18, 2020

२०२० डायरी फोटो (४)


 आज १८ डिसेंबर २०२०,, माझा वाढदिवस,, शुक्रवार वेगळाच होता. वाढदिवसाच्या दिवशी माझे डोके खूप दुखत होते. गुरवारी बर्फाचे फोटो काढायला बाहेर पडले. स्नो पडताना इतकी थंडी नसते. नंतर ती खूप वाढते. त्यामुळे शुक्रवारी मी पडून होते स्वेटर घालून. अधून मधून खिडकीतून बाहेरचा पांढरा शुभ्र स्नो पाहत होते. बुधवारी आणि गुरवारी वेगळे काहीतरी खायला केले आणि भांडी पण खूप पडली घासायला.   वाढदिवसाबरोबर स्नो डे पण साजरा झाला. बुधवारी गरम गरम वडा सांबार केले आणि गुरवारी मनसोक्त आवडीचे साबुदाणे वडे केले. बर्फाचे फोटो काढायला बाहेर फेरफटका मारला. एफबीवर नेहमीप्रमाणे छान छान शुभेच्छा आल्या. त्यातल्या काही वेगळ्या  शुभेच्छांचे फोटो इथे देत आहे. हा वाढदिवस स्नोडे मुळे जास्तच लक्षात राहील. २०२० चा वेगळेपणा.

 

मी जिथे काम करत होते तिथल्या एका मैत्रिणीने या शुभेच्छा पाठवल्या. तिचे नाव विकी.

माझी मामेबहिण विनया ताई हिने या शुभेच्छा पाठवल्या. तिने बनवलेले अळीवाचे लाडू आणि  तिच्या बागेतले गुलाबाचे फूल. गुलाबाच्या फूलाचा रंग माझ्या आवडीचा आहे.

 
माझ्या चुलत नणंदेने (प्रतिभा गोरे - जोशी) वरील फुलांच्या शुभेच्छा पाठवल्या. तिच्या बागेतली ही फुले.
 

माझ्या डोंबिवलीच्या मैत्रिणीने (सुषमा) वरील शुभेच्छा पाठवल्या. आणि माझ्या २ मैत्रिणी शिवाली आणि मोनिकानेही शुभेच्छा पत्रे पाठवली. ती मला
खूपच आवडली. मेघना हिने पण खूप छान शुभेच्छा पत्र पाठवले.
 



 
 
 
Happy Birthday Rohini tai 🎂😊..Warm wishes from Monica,Sachin and Devashree 
 

मोहिनी घारपुरे-देशमुख हिने बनवलेला ऑरेंज केक तिने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून पाठवला. मोहिनी खूप उत्साही आहे.
मोहिनी अंताक्षरी वर रोज काही ना काही थीम टाकत असते. गाणी गुणगुणताना छान विरंगुळा होतो आणि उत्साह वाढतो.
 


 


भावंडांच्या ग्रुपवर पण सर्वांनी छान शुभेच्छा दिल्या. 

सुबोध  दादाने गुलाबांचा गुच्छ पाठवला. सुहासदादा पण म्हणाला की माझा वाढदिवस
त्याच्या लक्षात राहतो कारण की  त्याच्या धाकट्या भावाचा वाढदिवस सुनीलचा वाढदिवस ७ डिसेंबरला असतो. पूर्वीची आठवण आली. माझा आणि सुनीलचा वाढदिवस
२/४ वेळेला एकत्र झाला होता. आणि बासुंदी पुरीचा बेत होता. 

 


 श्री व सौ नेर्लेकर मला व विनायकला आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ते आमचे कुटुंब मित्र आहेत.

आता २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर ला काही वेगळे केले किंवा घडले तर त्याचे फोटोज इथे देईनच.
 म्हणजे खऱ्या अर्थाने २०२० डायरीची सांगता होईल. आणि जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात २०२० डायरी असा वेगळा लेख लिहीन.

 

B for Birthday !
 
FB memory 2019..............
 
भारतात जेव्हा १८ तारीख उजाडली तेव्हापासून माझा वाढदिवस सुरू झाला. त्यामुळे अमेरिकेतल्या १७ च्या रात्री जेवण श्रीखंड पोळी, १८ तारीख जेव्हा इथे उजाडली तेव्हा फेबुवरच्या शुभेच्छा वाचून आनंद झाला. दुपारच्या जेवणाला फोडणीची पोळी केली. त्यात हिरवी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, कांदा दाणे असे सर्व असल्याने आणि आवडीची फोपो अगदी क्वचित होत असल्याने खूप बरे वाटले. संध्याकाळी चहाबरोबर कोथिंबीरीची भजी केली. ही भजी पण क्वचितच होतात. तर असा होता एकंदरीत आजचा दिवस. दुसरे म्हणजे फेबू मेमरी वाचल्यानेही छान वाटले. केकशिवाय काही शुभेच्छा पत्रेही मेमरीमध्ये होती. Thank you All for your Birthday wishes ! ❤ :) 

FB Memory - 2018 .............
 
Thank you All for your Birthday Wishes ! ❤ 🙂 😃 

FB Memory - 2016 .......... 

भारतात १८ डिसेंबर उजाडला तेव्हाच माझा वाढदिवस साजरा झाला. १८ ची सकाळ म्हणजे अमेरिकेतल्या रात्रीच्या जेवणाची वेळ. कांदे बटाट्याचा रस्सा, पोळ्या आणि माझ्या आवडीची शेवयाची खीर केली होती. 🙂 झोपायच्या आधी फेसबुकावर चक्कर मारली तर शुभेच्छा यायला सुरवात झाली होती. आणि ...... शुभेच्छा येतच राहिल्या त्या अमेरिकेतल्या १८ च्या अखेरपर्यंत. तुमच्या सर्वांच्या छान छान शुभेच्छांमुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये मी डुंबत आहे. 😃 अनेक अनेक धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, आणि नातेवाईकांनो. ❤ You All 🙂 


FB Memory - 2017 ......Thank you Everyone for your lovely birthday wishes ! ❤
🙂 
 
FB Memory - 2015 .......... 

Priय Mitra मैत्रिणींनो,, Tuम्हां sarvanच्या
shubheच्छा खूप Aavadaल्या ! छाN गेला 18 डिसेंबर ! Aनेक धन्यvaad ! 🙂 😉 😃 
 
FB Memory - 2014 ............
 
आज माझा हॅपीवाला जन्मदिवस खूप छान गेला 🙂 किती सुंदर सुंदर शुभेच्छा होत्या तुम्हां सर्वांच्या ! आहा ! दुपारचे जेवण मेक्सिकन उपहारगृहात, संध्याकाळी चहा बरोबर खायला पातळ पोह्यांचा चिवडा केला, आणि रात्रीच्या जेवणाला भाजणीची थालिपीठे. दिवसभर विविधभारतीवरची हिंदी गाणी ऐकली. अजून काय हवे? दिवसभर शुभेच्छांना लाईक करून करून दमले मी 🙂 झोपते आता. बाऽऽऽऽय 🙂 😃 😉 Thanks everyone for good wishes on my b'day ! ❤ U All 

FB Memory - 2013 ......
 
तुम्हां सर्वांच्या वाढदिवस शुभेच्छा खूप खूप आवडल्या ! अनेक धन्यवाद ! 

FB Memory - 2012 .........
 
आपणा सर्वांच्या वाढदिवस शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद !! मस्त गेला आजचा दिवस ! :))) 

FB Memory - 2010 .........
 
Dear Friends, Thank you so much for your wonderful wishes on my birthday! 

 
एफबी मेमरीज येतात त्या वाचताना पण खूप मजा येते. तशी आज पण आली. त्या इथे कॉपी पेस्ट केल्या आहेत. प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी काही ना काही वेगळे घडते ते लिहिले आणि एकत्रित केले की नंतर वाचताना खूप मजा येते. 

२५ डिसेंबरला सामोसे आणि शेवयाची खीर केली होती. २५ डिसेंबरला काही ना काही आतापर्यंत वेगळे केले गेले. मागच्या वर्षी मंदार भालेरावला जेवायला बोलावले होते. तेव्हा मसाला डोसा केला होता. एके वर्षी वेस्ट कोस्टच्या ट्रीपला गेलो होतो. असे काही ना काही घडतेच.
 
 


 
 २०२० अखेर खूप छान झाली. मोहिनी अंताक्षरीवर मोहिनीने एक स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा चकित स्पर्धा होती. ३१ डिसेंबरला म्हणजे अमेरिकेतल्या रात्री ही स्पर्धा तिने घोषित केली म्हणजे भारतीय वेळ सकाळी ७ ते १२. त्यामध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर जिकले. मला २०२१ ला सकाळी एक सुखद धक्का बसला. त्याचा एक लेख लिहिला आहे. तो तुम्हाला २०२० लेबल मध्ये दिसेल.
 

 
 




 

Thursday, November 19, 2020

२०२० डायरी फोटो (3)

 




कोरोनामुळे फिरणे झाले नाही त्यामुळे यावर्षीचे वसंत रूतमधले आणि फॉल मधले जास्त फोटोज घेता आले नाहीत. फक्त मी जेव्हा बाहेर अपार्टमेंटच्या आवारात फिरायला जायचे त्यावेळी घेतलेले हे काही फोटोज इथे अपलोड करत आहे.

 

Specialization of Spanish Vocabulary (5 courses) beginners level  at coursera dot org  पूर्ण केले त्याची प्रमाणपत्रे








स्वरदाकडून केलेली ऑनलाईन खरेदी


 







 







थँक्स गीव्हींग मोठ्या सुट्टीत कुठेही जाता आले नाही. त्यामुळे कंटाळा जाण्याकरता थोडेफार नेहमीचेच पदार्थ केले त्याचे फोटोज.