Tuesday, May 23, 2023

मी आणि माझी नोकरी... (1) Prav Electrospark Pvt. Ltd.

 

माझी पहिली नोकरी मला गणपतीच्या देवळात सुचवली गेली. आईची मैत्रिण नाईक काकू पण आल्या होत्या देवळात. त्यांनी सांगितले. त्यांची मुलगी माणिक प्राव्ह इलेक्ट्रोस्पार्क प्रा. ली. मध्ये होती. तिथे पर्चेस डिपार्टमेंटला एक व्हेकन्सी होती. त्यावेळेला मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होते. हे गणपतीचे देऊळ चतुर्श्रुंगीच्या पुढे अनगळांच्या वाड्यात आहे. मला सर्वांनी सल्ले दिले की शिक्षण एकीकडे होईल पण तुला नोकरीचा चान्स आला आहे तर तू नोकरी कर. माझ्या मनात नोकरी करायची नव्हती. पर्चेस डिपार्टमेंटला काम इतके काही होते की मानेवर खडा ठेवून टायपिंग करायला लागायचे. टेबलावर चार कप्यांचा एक ट्रे होता. त्यात एकात लेटर, एकात पर्चेस ऑर्डरी, एकात परदेशातल्या कंपनी करता असणारी लेटर्स, तर एकात कोटेशन्स, अशी सर्व एकेक जण त्यात टाकत असत. तिथे पटर्वधन नावाचे पर्चेस ऑफीसर होते आणि जाळिंद्रे नावाचे पर्चेस मॅनेजर होते. टायपिंग शिवाय तिथे मला फायलिंग, लेटर्स डिसपॅचला देणे म्हणजे फोल्ड करून ती पाकीटात घालणे असे सर्व काम होते. पाकिटात पत्र फोल्ड करताना ती एका विशिष्ट पद्धतीने करावी लागतात. पाकीटावर पत्ता टाईप कसा करायचा हे पण शिकले. फायलिंग करताना ते कश्या पद्धतीने करायचे हे पण कळाले. त्यात बॉक्स फाईल्स व फ्लॅट फाईल्स असायच्या. हा सर्व अनुभव मला या नोकरीत मिळाला.
शिवाय तिथे एक कंसाईनमेंट सोडवण्यासाठी मला Accounts डिपार्टमेंटला पैसे आणण्यासाठी जावे लागे. ते वरच्या मजल्यावर होते. पर्चेस डिपार्टमेंटच्या टायपिस्टने कोणालाही मदत करायची नाही असा फतवा होता. श्री पटवर्धन यांनी मला कागदपत्रे कोणती आधी आणि कोणती नंतर टाईप करायची हे पण सांगितले. माझ्या मागे उज्वला नावाची स्टेनो टायपिस्ट बसायची. ती प्रकाश आणि रवि रत्नपारखींची सेक्रेटरी होती. वेड्यावाकड्या रेषेत ती डिक्टेशन उतरवून घेत असे आणि खूप सुवाच्य टायपिंग करायची. मी टायपिंग शॉर्टहॅंड शिकले होते. टायपिंग ५० ची परिक्षा आणि शॉर्टहॅंडची ८० ची परिक्षा मी अ ग्रेड मध्ये पास झाले होते. टायपिंग ६० आणि शॉर्टहॅंड १००/१२० च्या परिक्षेसाठी अर्ज भरला होता. उज्वलाने मला टाईपराईटरची रिबीन कशी बदलायची, कॉपीज काढताना कार्बन पेपर कसे लावायचे, टाईप करताना चूक झाली तर व्हाईट फ्लुएड कसे लावायचे/रबरानेही कसे खोडायचे हे सर्व सांगितले. तिथे इम्पोर्ट एक्स्पोर्ट डिपार्टमेंटला किशोर दामले होते. शिवाय टेंबे, केमकर होते. सर्वजण त्या ट्रे मध्ये टायपिंगसाठी काय काय आणून टाकत त्यांच्या हस्ताक्षर मध्ये लिहिलेले.
जेवणाच्या सुट्टीनंतर परत आपल्या जागेवर येऊन बसावे तर ट्रे भरलेला असे. मी त्यावेळेला पंजाबी ड्रेसेस घालायचे. ओढणी असायची. मला ओढणी हा प्रकार खूपच आवडतो. हे सर्व ड्रेसेस आई शिवायची. मला अजूनही या सर्व ड्रेसेसचे रंग आठवत आहे. गुलाबी, आकाशी, राणी रंग, सफेद याप्रमाणे. तिथे एक कॉफीवाला येत असे. कामावर आल्यावर सर्वांना तो विचारी चहा की कॉफी? त्याप्रमाणे गरमागरम चहा/ कॉफी तो आमच्या टेबलावर ठेवी. ही कंपनी पुणे सातारा रोडवर होती. मी २ बस बदलून जायचे. त्यावेळेला बेताब नावाचा चित्रपट आला होता आणि त्यातले गाणे लागायचे जब हम जवा होंगे जाने कहा होंगे. हे गाणे मी कंपनीत जाण्याच्या रस्त्यावरून चालत जाताना लागायचे. त्यावेळेला लाऊड स्पिकरवर गाणी लावली जायची कधी कोणता समारंभ असेल तर.
प्राव्ह कंपनीत आल्यावर आम्हाला सर्वांना कार्ड पंच करायला लागायचे. एक मिनिट उशीर झाला तर लेट मार्क असायचा. एकाच वेळी सर्व जण आले तर तिथला पर्सनल डिपार्टमेंटचा क्लार्क आम्हाला सांगायचा काळजी करू नका. या कंपनीत भोंगे होत असत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याने वेळ होती ८ ते ५ गुरूवारी सुट्टी असायची. त्या दिवशी मी कॉलेजला जायचे. प्रेझेंटीची बोंबाबोंब होती. अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. त्यामुळे टक्केवारी खाली गेली.
जेवणाच्या सुट्टीत आम्ही सर्व बायका एका conference hall मध्ये बसायचो. आमच्या भाज्यांचे डबे मधे ठेवायचो. पोळीशी सर्व भाज्यांचा आस्वाद आम्हाला घेता यायचा. त्यात काही जणी चटणी लोणचे आणायच्या तर काही जणी दही भात आण्यायच्या. मी ताक घेऊन जायचे. माझे ताक खूप फेमस झाले होते. सर्वजण घोट घोट घेत असत. आई मला छान डबा भरून द्यायची. एका पोळीला तूप साखर लावायची. एका पोळीत चटणी. शिवाय भाजी आणि एका बाटलीत ताजे ताक द्यायची.
त्या कंपनीत मी सर्वात लहान होते. पर्सनल डिपार्टमेंटला माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी माणिक कामाला होती. तिथे इडली - डोसे आणले जायचे. अजून एक तिखट कोरडी भेळही आणली जायची. त्या कंपनीत शिपाई होते. ते मला निरोप द्यायचे रोहिणी बाई तुम्हाला खाली बोलावले आहे. मग मी तिथे जाऊन इडली डोसे जे काही असेल ते पटकन खाऊन वर यायचे. पुणे सातारा रोडवरच त्या कंपनीचे एक सेल्स ऑफीस होते. तिथले एक जण आमच्या ऑफीसला यायचे. दामले आणि ते कामाविषयी काही बोलत असत. बरेच वेळेला माझ्या मागे बसणारी उज्वला, दामले, त्यांचे मित्र आणि मी ऑफीस सुटल्यावर होटेल मध्ये जाऊन खादाडी करायचो. पुणे सातारा रोडवर मी व उज्वला बस स्टॉपवर उभ्या असायचो. काही वेळा पटवर्धन किंवा दामले आम्हाला दोघींना त्यांच्या बाईकवरून लिफ्ट द्यायचे डेक्कन पर्यंत. त्यात आमचा वेळ खूप वाचायचा.
त्यावेळेला टेलीफोन ऑपरेटर अशी पण एक पोस्ट होती. टेलीफोन ऑपरेटरचे नाव रोहिणी होते. तिच्यासमोर भला मोठा कपाटासारखा दिसणारा एक बोर्ड असायचा. त्यात अनेक वायरी. फोन आला की ती पिना इकडून तिकडे खोचायची व त्या त्या डिपार्टमेंटच्या माणसांना फोन जोडून द्यायची. दसऱ्याला मी आमच्या डिपार्टमेंट मध्ये रांगोळी काढली. त्यादिवशी मी लाल रंगाची जरीवर्क केलेली साडी नेसले होते. आईने आम्हाला दोघींना एकेक साड्या हळदी कुंकूच्या समारंभासाठी नेसायला घेतल्या होत्या. एक लाल रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची व त्याला मरून रंगाचे काठ होते. टाईपराईटर मी व उज्वलाने सजवले. पेढे बर्फी, बटाटा वेफर्स सर्वांना वाटले. आम्ही सर्व त्या दिवशी एकमेकांच्या डिपार्टमेंटला जाऊन मस्त खादाडी केली. खूप मजा आली होती त्यादिवशी !Rohini Gore
 
क्रमश : ....