Showing posts with label माझे माहेर. Show all posts
Showing posts with label माझे माहेर. Show all posts

Friday, November 10, 2023

लखलख चंदेरी

 

 

दिवाळी आली की लग्नसमारंभासाठी जशी तयारी करतो अगदी तशीच असते ना ! मुहूर्त साधायचा तो अभ्यंग स्नानाचा, लक्ष्मीपूजनाचा. भाऊबीज आणि पाडव्याची वाट पहायची ती भेटवस्तू कशी असेल याची ! दिवाळी आली की प्रत्येकाच्या मनात लहानपणी अनुभवलेली दिवाळी आठवते. डोळ्यांनी साठवून ठेवलेली असते ना ! त्या दिवाळीचे रूपच वेगळे होते. मातीच्या अंगणातली ठिपक्यांची रांगोळी. त्या रांगोळीची किती ती तयारी. बाजारातून रांगोळी आणि वेगवेगळे रंग आणून ठेवायचे. रांगोळीच्या पुस्तकातील कोणती रांगोळी

 
 
फटाक्यात मला लवंगी फटाका खूप आवडायचा. त्यावर लाल आणि हिरवे वेष्णट असायचे. भुईनळे तर फारच सुंदर दिसायचे. त्यातही त्रिकोणी आकाराचा आणि वाटाण्यासारखा गोल होता. वाटाण्यासारखा गोल भुईनळा खूप वेळ उडायचा. याची शोभा काही न्यारीच ! टिकल्या वाजवायला आम्ही दोघी हातोडा वापरायचो. टिकली वाजल्याने पण खूप दचकायला व्हायचे. फुलबाजीमध्ये तडतडी मला नाही आवडायची. साधी खूपच प्रिय होती. संध्याकाळी फटाके उडवायचो तेव्हा फटाक्यांचा उडवलेला पसारा साऱ्या अंगणभर पसरायचा. लक्ष्मीपूजनासाठी करकरीत कोऱ्या नोटा खूप छान दिसायच्या ! या कोऱ्या नोटा बाबा अतिशय जपून ठेवायचे दरवर्षी पुजण्याकरता. भाऊबीज तर खूप दणक्यात व्हायची आमच्या घरी ! आईचे ८ भाऊ, ८ वहिन्या, त्यांची मुले म्हणजे आमचे मामे भाऊ आणि बहिणी. असे सर्व जण आमच्या घरी जमायचे! त्यावेळेला भाऊबीजेत मिळालेले ४, ८ आणे असायचे. खूप किंमत होती या आण्यांना ! सर्व जमून जितकी भाऊबीज होईल त्यात आम्ही बहिणी खूपच खुश व्हायचो ! आई फराळाचे करायची ते अगदी मुबलक प्रमाणात. मोठे पत्र्याचे डबे होते. काही गोल तर काही चौकोनी. यात सर्व फराळ असायचा. येता जाता डब्याचे झाकण उघड आणि चकल्या खा, कडबोळ्या खा. चिवडा घेताना त्यात खवलेला ओला नारळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असली की चिवड्याची लज्जत अजूनच खूप वाढायची. लाडू बिचारे कोपऱ्यात बसलेले. त्यांना विशेष कोणी विचारत नसे. कोरड्या खोबऱ्याचे सारण असलेली करंजी तर सर्वांचीच लाडकी होती. 
 
 
त्यावेळी शेजारीपाजारी फराळाचे ताट देण्याची पद्धत होती. त्यात घरी केलेला सर्व फराळ असे. घरोघरी केलेला फराळ सर्वत्र पोहोचायचा. दिवाळी संपल्यावर काही दिवसांनी उरलेला फराळ असायचा. त्याकरता आई ग्रुप ग्रुपने बोलवायची. फराळासोबत दही मिसळ किंवा रगडा पॅटीस असायचा. चमचमीत खाल्यावर थंडाव्याला दही भात ! अश्या रितीने खरी दिवाळी संपायची. पुढल्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत कोणतेच पदार्थ कुठेही दिसायचे नाहीत आणि त्यामुळे दिवाळीचे अप्रुप होते. अशी ही दिवाळी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली आहे. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ! Rohini Gore


 सर्वांना दिवाळी २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा !
 
 
 
 
वरील लेख दिवाळी अंकात(२०२५) प्रकाशित झाला आहे.  

 

Friday, February 19, 2021

वास्तू (९)

 

माडीवाले कॉलनीतून आईबाबा,आजोबा व मी (वय वर्ष दीड) गोखले नगर पूरग्रस्त कॉलनीमध्ये रहायला गेलो ते वर्ष होते १९६५. माझी बहीण नंतर काहीमहिन्यातच इथे जन्मली. आमचे घर कडेला होते त्यामुळे बाजूची मोकळी जागा पण आम्हाला मिळाली. तिथे आईबाबांनी फुलाफळांच्या बागा फुलवल्या. बाबांनी जाईचा वेल लावला. तो वेल अजूनही त्याच जागी उभा आहे गेली ५५ वर्षे. जाईने आम्हाला भरभरून प्रेम दिले. मागे आणि पुढे आंगण होते की जे आधी मातीचे होते. नंतर फरशी टाकली त्यामुळे ती जागा पण वापरण्यासाठी उपयोगी पडली.
 
 
 
आमच्या दोघींच्या लग्नकार्यात ही जागा खूपच उपयोगी पडली. इथे होमहावन झाले. जेवणाच्या पंगती उठल्या. भोंडला व्हायचा. अर्थात मातीच्या अंगणात पण आम्ही भोंडले साजरे केले आहेत. फरशी टाकल्यावर उन्हाळ्यात बाहेरच्या अंगणात काही वेळा झोपायचो देखील. इथे झोपले आणि वर पाहिले की भव्य आकाश दिसायचे आणि त्यावर चमचमणाऱ्या चांदण्याही दिसायच्या. इथे बसून बाबा भूताच्या गोष्टी सांगायचे.मला आईने हेलवाडे बाईंच्या शाळेत घातले. माझी माँटेसरी सुरू झाली. नंतर महाजन मावशीची शाळा सुरू झाली. महाजन मावशी आईची खास मैत्रीण होती. ती आमच्या चाळीला लागून जी चाळ होती तिथे राहत होती. नंतर मी बाल शिक्षण मंदीर या शाळेत पहिलीत गेले. तेव्हा बाबा मला सायकवर बसवायचे आणि शाळेत सोडायचे. आई मला न्यायला यायची. त्याकरता तिला डोंगर चढून यावे लागे. आईच्या मैत्रिणी सोबत असायच्या. येताना मी आणि आई आरेभुषण इथल्या बस स्टॉपवर यायचो आणि तिथून बसने घरी यायचो. माझ्या बहिणीलाही शाळेत जायचे असायचे. मग आई तिला आजीच्या शाळेत सोडायची. आमच्या शेजारी भालेराव कुटुंब राहयचे. आई रंजनाला एक दप्तर द्यायची. त्यात पाटी पेन्सिल व खाऊचा डबा द्यायची आणि आजीच्या शाळेत सोडायची. ती पाटीवर रेघोट्या मारायची व अनेक गोल गोल काढायची. घरी आल्यावर तिला तिने केलेल्या अभ्यासावर बरोबर किंवा चुक अशी खुण केली की तिचे समाधान व्हायचे. माझे मराठी पुस्तक तिला तोंडपाठ होते. 
 
 
 
नंतर ती महाजन मावशीच्या शाळेत जायला लागली. नंतर आम्हाला केसकरांची रिक्शा लावली शाळेत सोडायला आणि आणायला. रिक्शात मी रंजना आणि भाग्यश्री अशा तिघी जायला लागलो. रिक्शामध्ये बसल्यावर कडेला कोण बसणार यावरून आमच्या तिघींचे रुसवे फुगवे होत असत. केसकर काका म्हणायचे भांडू नका. मी सांगीन कडेला कोण कधी बसणार ते ! सकाळची शाळा असली की आम्ही मेतकुट तूप भात खाऊन जायचो. ५ वीत गेल्यावर सकाळच्या सुधा नरवणे च्या मराठी बातम्या सुरू झाल्या की आम्ही बसने जायला बाहेर पडायचो.दुपारची शाळा असली की ११ वाजता लागणारी मराठी गाणी संपता संपता बाहेर पडायचो. बसने जेव्हा जायचो तेव्हा मधल्या स्टॉपवर बस काही वेळा थांबायची नाही. मग आम्ही शेवटच्या बस स्टॉपवर जायला लागलो. बसने जाता येता आमचे घर दिसायचे. 
 
 
 
बसला गर्दी खूप असायची. शाळा सुटली की डेक्कन जिमखान्यावर बसने जाण्यासाठी यायचो. ही मोठीच्या मोठी रांग असायची. खूप वेळ बस लागलेली नसायची आणि नंतर २ ते ३ बसेस सोडायचे. मग एकच गलका व्हायचा. रांगा तोडून बसमध्ये शिरायला गर्दी व्हायची. त्यावेळेला बहुतेक १० पैसे तिकीट होते. गोखले नगरला ३ बसेस होत्या. एक शनिपार, दुसरी डेक्कन जिमखाना आणि तिसरी पुणे स्टेशन. ९०,५८ आणि १४६ असे बसचे नंबर आठवतात. शेजारचे भालेराव व आमचा खूप एकोपा होता. भालेरावांच्या शेजारी आधी फुले राहयचे. नंतर तिथे शहा कुटुंब रहायला आले. त्यांना तीन मुले अमित, डिंपल आणि सिंपल. आमच्या दोघींच्या साखरपुड्याच्या वेळी आणि लग्नाच्या वेळी उठण्या बसण्याकरता आम्ही त्यांच्या जागा वापरल्या. शेजारच्या आजीला बरे नसले की आई पोळी भाजी द्यायची आणि आईला बरे नसले कि आजी द्यायची. काकाचे लग्न झाले तेव्हा त्याच्या बायकोला आम्ही मामी म्हणायचो. नंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मंदार. हा मंदार आमच्याकडे लोणी खायला यायचा. काकाच्या लग्नात आमची जागा त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना उठाबसायची केली होती.सिंपल डिंपल आमच्या घरच्याच होऊन गेल्या होत्या. भाग्यश्री कडे जेव्हा टेलिविजन आला तेव्हा आम्ही दोघी बहिणी तिच्याकडे रविवारचा संध्याकाळचा सिनेमा पहायला जायचो. 
 
 
 
महाजनमावशीकडे उभ्याच्या गौरी असायच्या. त्यांना घेतलेल्या माळा नंतर ती आम्हाला द्यायची. आमच्याकडे आईबाबा शिकवण्या घ्यायचे तेव्हा त्या मुलांचे आई वार्षिक स्नेहसंमेलन करायची. त्याकरता आई तिखटमिठाच्या पुऱ्या, बटाटेवडे, गुलाबजाम, गोडाचा शिरा असे काय काय करायची. तेव्हा महाजन मावशी व पंडीत मावशी आईच्या मदतीला यायच्या. सविता ही पण आमची बालमैत्रिण. तिचे घर आमच्या घरापासून लांब होते. जोशी काकू, पंडित काकू, आई आणि सरपोतदार काकू या चार जणांची कुटुंब मैत्री होती. महाजन मावशीच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी आई अगदी मुलगी पाहण्या पासून भाग घ्यायची. तिची सून भारतीवहिनी आणि आईची अगदी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत आहे. भारती आणि आई भारी उत्साही. त्या दोघी मिळून ७ किलोच्या दोघींच्या मिळून कुरडया घालायच्या. सामोसेही करायच्या. सामोसे जेव्हा करायच्या तेव्हा आम्ही दिवसभर येताजाता सामोसे खायचो. 
 
 
 
संध्या ठाकूर ही पण आमची कुटुंब मैत्रिण झाली. तिचे वर्कशॉप आमच्या घराच्या समोर होते. ती आमच्याकडे पाणी प्यायला यायची आणि नंतर घट्ट मैत्री झाली ती आजतागायत आहे. पूर्वी चाळ व वाडे संस्कृतीत अशी माणसे जोडली जायची. एकमेकांना हवे नको विचारले जायचे. संकटकाळी एकमेकांना मैत्रीचा हात देत असत. आणि ही मैत्रीची कुटुंबे इतकी वर्षे झाली तरीही एकमेकांना घट्ट धरून आहेत हे विशेष. आता आई ज्या सोसायटीत राहते तिथेही छान वातावरण आहे मैत्रिचे. गोखलेनगर सोडूनही आता बरीच वर्षे झाली. साधारण २००२-२००३ मध्ये आईबाबा रंजनाच्या सोसायटीच्या बाजूच्याच सोसायटीत राहायला आले. गोखले नगरच्या अजूनही काही आठवणी आहेत त्या पुढील भागात लिहीन. वास्तू या शीर्षकाचे ८ भाग लिहून झालेत ते  पुढील दिलेल्या लिंकवर वाचता येतील.
 
 
क्रमश : ....
 





 








Monday, February 06, 2017

वास्तू (८)

 
 
या चित्रात दिसत आहेत ते म्हणजे अमित, सिंपल , डिंपल आणि माझी भाची सई.  आईच्या घराशेजारील  घरात एक गुजराथी कुटुंब राहिला आले तेव्हा डिंपल ६ महिन्यांची होती. तिला आम्ही आमच्या घरी दुपट्यात गुंडाळून घेऊन यायचो. तिच्या गालाला बोट लावले की ती खुदकन हासायची आणि तिच्या दोन्ही गालाला खूप छान खळ्या पडायच्या. आम्ही तिच्या आईला विचारले ही  हिचे नाव काय? तर त्या म्हणाल्या की अजून तिचे नाव ठेवायचे आहे. त्यावर आम्ही त्यांना सांगितले की आम्हीच हिचे नामकरण करतो. तिच्या गालाला खळ्या पडायच्या त्यामुळे आम्ही तिचे नाव डिंपल ठेवले आणि डिंपल ची बहीण सिंपल. अश्या प्रकारे आम्ही दोघी बहिणींनी त्या दोघी बहिणींचे नामकरण केले.

सिंपलचे मी खूप पापे घ्यायची मग ती खूप चिडायची. नको ना गं ताई माझे पापे घेऊ. तिने माझे नाव पापेवाली ताई असे ठेवले. दोघी लहान असताना आमच्या घरी जेवायला यायचा. अमितही यायचा. पण येऊन लगेच पळायचा घरी. माझ्या आईला दोघी मावशी म्हणायच्या. लाडात येऊन कधी कधी माउ असेही हाका मारायच्या या दोघीजणी ! माझे लग्न होऊन मी मुंबईला आल्यावर दर ३ ते ४ महिन्यांनी आईकडे यायचे. मी नेहमी सकाळच्या ट्रेन ने यायचे. घरी आल्यावर विचारायचे अजून सिंपल नाही का आली? डिंपल तेव्हा शाळेत गेलेली असायची. येईल इतक्यात असे आई म्हणायची आणि तेवढ्यातच मावशी अशी हाका मारत तिचे शाळेचे दप्तर घरी टाकून आमच्या डायनिंग वर जेवायला बसायची. मग मी आई बाबा आणि सिंपल असे चौघे जेवण करायचो. मला विचारायची ताई तू कधी आलीस? काका कसे आहेत? जेवण झाले की रंजनाला फोन करायचे मी. मग ती आणि सई यायची. आमच्या दोघी बहिणींच्या लग्नाला या दोघीजणी लग्नाच्या आदल्या दिवशीपासून कार्यालयात आल्या होत्या.

या दोघींची आई पण आम्हाला अधून मधून खायला द्यायची. त्यांचा मटार भात आणि जाड पोह्यांचा चिवडा अजूनही माझ्या लक्षात आहे. सईचा जन्म याच जागेत झाला. मजा म्हणजे माझ्या बहिणीचा जन्मही यात जागेत झाला. दोघी मायलेकी एकाच घरात जन्मल्या. माझा जन्म माडीवाले कॉलनीतला ! त्यावर लिहिणार आहे. आईच्या आठवणी असे लेबल देऊन लिहिणार आहे. आईने त्या जागेच्या सर्व आठवणी मला फोनवरून सांगितल्या आहेत. त्या ऐकून मला खूपच छान वाटले. 
 
सईचा जन्म झाला आणि सिंपल डिंपल तिला खेळवायला लागल्या. फेसबुकावर सिंपल डिंपल मला सापडल्या आणि मला खूप आनंद झाला. अजूनही त्यांना त्या जागेच्या आठवणी येतात.  
 
क्रमश : ....


Saturday, September 13, 2014

वास्तू (७)

माहेरच्या घराचा सर्वात लाडका भाग म्हणजे माळा. आमच्या घरी कोणी लहान मुले आली की ती पहिली माळ्यावर जात. माळ्याच्या कठड्यावरून खाली बघत. त्यांना खूप मजा वाटे. खाली उतरायलाच तयार नसायची. आम्हा दोघी बहिणींचाही हा माळा अतिशय लाडका होता. स्वयंपाकघरातून या माळ्यावर जायला पायऱ्या होत्या. पूर्ण लाकडाचा भक्कम माळा सर्वबाजूने खूप उपयुक्त होता. एक तर माळ्यावर बरेच सामान राहिले होते. तिथे एक कॉट पण होती. स्वयंपाकघरात आजोबांनी केलेली लाकडी मांडणी होती. ती खुप जुनी झाली होती आणि बाकीच्या सोयी करून घेतल्याने जागा अपुरी पडत होती. मग त्या मांडणीचे दोन भाग केले आणि माळ्यावर ठेवले. त्यावर मोठमोठाले डबे ज्यामध्ये आई व आम्ही मुलींनी मिळून केलेली सर्व वाळवणे यात होती. आम्ही अभ्यासाला माळ्यावर बसायचो. जाताना बरोबर भाजलेले पापड पापड्या व भाजलेले शेंगदाणे घेऊन जायचो. वाचनाचा किंवा लेखनाचा अभ्यास करता करता अधून मधून खायचो. आमच्या घरी सतत शिकवण्या असल्याने एक खोली नेहमीच भरलेली असायची आणि आम्ही दोघी बहिणी मोठ्या झालो, अभ्यासही वाढले, त्यामुळे माळा करून घेतला होता. रात्रीच्या जेवणाकरता आई हाक मारायची. पावसाळ्यात तर माळ्यावर बसायला खूप मजा यायची. अभ्यास करताना पाऊस पडला की पावसाचे एक वेगळे म्युझिक सुरू व्हायचे आणि त्याच वेळेला आईने गरम गरम पिठले भात केलेला असायचा. किती छान वाटायचे हे सर्व त्यावेळेला !





बऱ्याच वेळेला आम्हा दोघी बहिणींना बटाटेवडे करण्याची हुक्की यायची आणि आम्ही आईला सांगायचो की आम्ही सारण करून देतो , तू आम्हाला बटाटेवडे तळून वाढ. मग ते बटाटेवडे खाण्यासाठी माळ्यावर जाताना जो लाकडी जिना होता त्या पायऱ्यांवर बसायचे. पण ते असे बसायचे की आई वडे तळताना दिसली पाहिजे म्हणजे डावी मांडी जिन्याच्या पायऱ्याच्या मध्ये आणि उजवा पाय खायच्या पायरीवर सोडून बसायचा. एका पायरीवर स्टीलची ताटली जी ज्यामध्ये गरम वडा आहे. डायनिंगवर एक जण, त्यातून कोणी एक मैत्रिण किंवा बहीण रहायला आली असेल तर ती पण असायची. पायरीवर जो बसायचा त्याचे स्थान उंच. मग डायनिंगवरचे माना वर करून त्याच्याकडे पाहून बोलत. जसे बटाटेवडे पायरीवर बसून खायचो त्याचप्रमाणे अंबोळ्याही खायचो. माळ्याच्या जिन्यावरची जागा पटकन मिळवायला लागायची. मला तर ही जागा प्रचंड आवडायची.  मामेबहिणी आल्या की आमच्या सर्व बहिणींची रवानगी माळ्यावर झोपण्यासाठी असायची. वर एक कॉट व गाद्याही होत्या. त्या घालायच्या, त्यावर पांघरुणे व गप्पा मारत मारत झोपायचो. त्यात खाली ज्या कोणी झोपल्या असतील. शिवय आईबाबा, अजोबा खाली झोपलेले असायचे. मग त्या सर्वांशी माळ्यावरून गप्पा व्हायच्या. काही वेळेला आम्ही माळ्यावर असलेल्या बहिणी हळू आवाजात बोलायचो की आई खालून ओरडायची काय गं पुटपुटताय. मग हशा पिकायचा. काही वेळेला आम्ही बहिणी सिनेमाच्या स्टोऱ्या सांगायचो. थंडीत आणि पावसाळ्यात माळ्यावर झोपायला जाम मजा यायची. खाली उजाडलेले कळायचे नाही.

 क्रमश: ....

Monday, October 08, 2012

वास्तू (६)

"आज आपण आपल्या घरी 'नटसम्राट' हे नाटक पाहणार आहोत" बाबा म्हणाले, बाबा सकाळी पूजा करत होते. त्या दिवशी रविवार होता. आम्ही दोघी बहिणी उशिराने उठून चहा पीत होतो. बाबांचे हे वाक्य ऐकल्यावर आम्ही दोघी म्हणालो " म्हणजे काय बाबा? " बाबा म्हणाले माझे वाक्य परत एकदा नीट ऐका. आज संध्याकाळी टीव्हीवर नटसम्राट आहे ना? आम्ही म्हणालो 'हो' तर मग ते आपण आपल्या घरी पाहणार आहोत. आम्ही दोघी एकदम "म्हणजे आपण टीव्ही घेणार आहोत का? " बाबांनी हसूनच मान डोलाव्वली. आम्हा दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला.








त्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरी टेलिव्हिस्टा टीव्ही आला. खूप छान होता. आम्हा दोघी बहिणींना क्राऊन टीव्ही आवडायचा नाही, याचे कारण या टीव्ही वर सारख्या मुंग्या यायच्या. मुंग्या म्हणजे चित्र धुरकट होऊन अजिबात दिसेनासे व्हायचे आणि नुसते बारीक बारीक अनेक ठिपके दिसायचे. याला आम्ही मुंग्या म्हणायचो. आमच्या दोघींच्या मैत्रिणींकडे क्राऊन टिव्ही होते. आमचा टिव्ही येण्या आधी आम्ही आम्ही आमच्या मैत्रिणींकडे जायचो. अंटीनाला काठीनेच जरा हलवले की टीव्ही परत दिसायला लागायचा.  टेलिव्हीस्टाला सरकते दार होते. या टीव्हीवर घरी विणलेले कापड घालायचो. कृष्ण धवल टीव्ही वर रविवारी संध्याकाळी नाटक सिनेमे असायचे. रविवारी संध्याकाळी आम्ही सर्व जण जय्यत तयारीने टीव्ही पहायला बसायचो. बाबा म्हणायचे मी बाल्कनीत बसणार. बाल्कनी म्हणजे कॉट. कॉटवर आईबाबा बसायचे व आम्ही दोघी फोल्डिंगच्या खुर्च्यांवर बसायचो. या फोल्डिंगच्या खुर्च्या आरामदाय होत्या. नायलॉनच्या कपड्यांनी बांधलेल्या होत्या. त्याच्या पाठी खूप उंच होत्या त्यामुळे टेकून आरामात बसता यायचे. एक आरामखुर्ची होती. ज्यांना कोणाला सिनेमा बघण्यात स्वारस्य नसेल तो आरामखुर्चीवर बसायच व डोळे मिटून सिनेमा ऐकायचा. रविवारी संध्याकाळी सर्व घर आवरून केर काढायचो. खिडक्यांचे पडदे लावून घ्यायचो. दार लावायचो व अंधार करून सिनेमा बघायचो. त्या दिवशी दडपे पोहे ठरलेले असायचे. खुर्चीवर बसून दडपे पोहे खायला सुरवात केली की सिनेमाच्या टायटल्स सुरू व्हायच्या. साप्ताहिकी न चुकता बघायचो. साप्ताहिकीमध्ये पुढील आठवड्याचे कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जायची. रविवारी जर फालतू सिनेमा दाखवणार असतील तर मग आम्ही घरी थांबायचो नाही. बाहेर कुठेतरी फिरायला जायचो. रविवार सकाळची रंगोली आरामात सकाळी उठताना गादीवर झोपूनच पहायची. रंगोलीमध्ये गाणी छान लागायची. अंगावर पांघरूण व डोक्याखाली दोन दोन उश्या घेऊन रंगोली पहायचो. नंतर उठून चहा व बाकीचे आवरणे सुरू व्हायचे.








माझ्या माहेरी सर्व गोष्टी अचानकच आलेल्या आहेत. जसा टीव्ही अचानक घरी आला तसाच रेडिओ आमच्या घरी मी लहान असतानाच आलेला आहे. बाबांनी एकदा बाहेर चहा पिताना सुधीर फडके यांचे विसर गीत विसर प्रीत, विसर भेट आपुली हे गाणे ऐकले. हे गाणे बाबांना इतके काही आवडले की त्या दिवशीच बाबा रेडिओ विकत घेऊन आले. पूर्वी रेडिओ भेले मोठे असायचे. रेडिओच्या डाव्या बाजूला वर एक छोटा आयताकृती डोळा होता. तिथून हिरवा लाईट लागायचा व रेडिओ सुरू व्हायचा. स्टेशने बदलायला छोट्या बरण्यांची झाकणे असायची तशीच गोल चक्रासारखी बटणे असायची. ही बटणे फिरवली की आवाज लहान मोठा व्हायचा. एक बटण स्टेशन फिरवायला होते तर एक बटण बँड बदलायला होते. रेडिओच्या मध्यभागी एका आयताकृती चौकोनात काही अंतरावर आकडे लिहिलेले होते. या आयताकृती चौकोनात एक लाल उभा बारीक दांड्यासारखा एक काटा होता. स्टेशन बदलायचे बटण डावीकडे किंवा उजवीकडे फिरवले ही हा लाल काटा डावीउजवीकडे सरकायचा व स्टेशने लागायची. मुंबई, पुणे, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ अशी सर्व स्टेशने लागायची. आईला मुंबई स्टेशन आवडायचे. त्यावर मराठी गाणी, श्रुतिका लागत असत. मुंबई अ, मुंबई ब, अशी काहीतरी स्टेशने होती. आम्हा दोघी बहिणींना विविध भारती खूपच आवडायचे. मला तर खूपच प्रिय होते. आईने मुंबई लावले असेल तर मी ते लगेच बदलून विविध भारती लावत असे. मग आमच्या दोघींची भांडणे व्हायची. दिवसभर रेडिओ सुरू असायचा.






आईलाही हिंदी गाणी आवडायची पण सारखी नाही. ती म्हणायची इतर स्टेशनांवरही चांगले कार्यक्रम असतात तेही ऐकले पाहिजेत. आईचे हे म्हणणे पटायचे पण हिंदी गाण्यांची इतकी आवड होती की सारखे विविध भारतीच लावले जायचे.  बाबांना रेडिओवर सुधीर फडके यांचे गाणे लागले असेल तर बाबा ओरडायचे "हे गाणे संपले की तुम्हाला हवे तिथे जा" रेडिओवरचा लाल काटा सतत इकडे तिकडे हालत असायचा. शेवटी तो एकदाचा तुटला. तोही दमत असेल. सिलोन, ऑल इंडिया रेडिओ, मुंबई, पुणे अशी बरीच स्टेशने लागायची. रात्री सगळ्यात शेवटी बेलाले फूल लागायचे, ते ऐकूनच मग आमचा रेडिओ बंद व्हायचा. दुसऱ्या दिवशी परत सकाळी ६ वाजता भक्तीगीते व भावगीते या गाण्यांई सुरू व्हायचा. सकाळची शाळा होती तेव्हा ही भक्तीगीतेच आम्हाला जागी करायची. पाऊस पडत असेल, थंडीचे दिवस असतील तर असे वाटायचे की पांघरूणात तयार झालेल्या उबेतून बाहेर येऊच नये. गाणी ऐकत असेच पडून राहावेसे वाटायचे.







एका दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बाबा असाच अचानक टेप रेकॉर्डर घेऊन आले. हा टेप रेकॉर्डर आयताकृती होता व त्याची बटणे आयताकृती चौकोनी आकाराची होती. पियानो वाजवायची बटने कशी दिसतात तशीच होती. त्याला एक माईकही होता. माईकला वायर होती. हा माईक गॅस पेटवायचा लायटर कसा दिसतो तसाच दिसायचा. त्या दिवशी आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो. पहिल्याप्रथम आजोबांनि काही श्लोक म्हणले. नंतर आम्ही सर्वांनीच आमच्या आवडीची गाणी म्हणली. गाणे टेप करायचे. नंतर रिव्हाईंड करायचे व ऐकायचे. आवाज कमी जास्त करायचे एक छोटे बटण होते. ते एका फटीत बसवले होते. ते मागे पुढे फिरवून आवाज कमी जास्ती करता यायचा. कॅसेटवर आम्ही काहीही टेप करायचो. बाळाचे जोरजोरात रडणे, कोणी झोपले असेल तर त्याचे घोरणे, शिंका कुणाला येत असतील तर त्या टेप करायचो. काही वेळा गप्पा मारताना त्या खुप रंगात आल्या की त्या टेप करून मग ऐकायचो. नंतर ऐकायला खूप मजा यायची. गप्पा मारताना आपण जसे काही वेळा खूप जोशात बोलतो ते नंतर ऐकताना मजा वाटायची. एकदा तर खडाजंगी भांडणे टेप केली होती.





आमच्याकडे मामा मामी, व आमची काही मामे व मावस भांवंडे जमलो होतो. गप्पा मारताना काही मुंद्यांवरून वादावादी सुरू होती आणि त्यातच मामा मामीची भांडणे जुंपली. त्या दोघांचेच तावातावाने बोलणारे आवाज आम्ही गुपचुप टेप केले. नंतर भांडणे निवळली. झोपण्याचया आधी गादीवर बसून मामीला लाडात येऊन म्हणालो बघ ना मामी आमचा टेप रेकॉर्डर, कसा आहे? त्यावर मामी म्हणाली ऐकवा ना काहीतरी. मग लगेच टेप ऑन केला आणि भांडणाचा आवाज सुरू झाला. मामी डोळे विस्फारून हे काय गो! आम्हाला वाटले चिडली. पण नंतर तीच हासायला लागली म्हणाली डांबरट्ट आहात हो अगदी. नंतर मग काही दिवसांनी आम्ही भावंडे एकत्र जमलो की ती भांडणाची कॅसेट लावायचो व भरपूर हासायचो.

क्रमशः





Wednesday, March 28, 2012

वास्तू (५)

स्वयंपाकघरात चहा प्यायला फरशीवर आम्ही पाट घेऊन त्यावर बसायचो आणि बाहेरच्या खोलीमध्ये अभ्यासाला बसण्याकरता सतरंजी अंथरून बसायचो. अभ्यासाला वहीत लिहिण्यासाठीही आम्ही पाटाचा वापर करायचो. मांडीवर पाट ठेऊन त्यावर वही पुस्तके ठेऊन पुस्तकाच्या धड्याखालची प्रश्न उत्तरे लिहायचो. डायनिंग येण्याच्या आधी चहा घेण्याकरता किंवा जेवणाकरता पाटावर बसायचो. आई पहाटे उठून सगळ्यांचा चहा ठेवायची. त्यावेळी फरशीवरच गॅस होता. आई बसून चहा करायची. पांढऱ्या शुभ्र कप बशांमधून आई चहा ओतायची व आम्ही सगळे मिळून एकत्र चहा घ्यायचो. त्यावेळी चहा आधी बशीत ओतायचा आणि मगच तो प्यायचा. बशीतला चहा गरम असायचा. कधी तो थंड झाला नाही. २ बशा होतील इतपत चहा असायचा. आई थोडा जास्तीचा चहा करायची. पहिला चहा झाला की अजून कोणाला हवा असल्यास अजून द्यायची. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर अभ्यास करताना जेवायच्या वेळेला मात्र खूप भूक लागलेली असायची. सकाळी ८ ते १० अभ्यास करायचो. नंतर जेवायला बसायचो. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडत असेल तर आणि अभ्यास झाला असेल तर बसल्या बसल्याच पावसाला बघायचो. थंडीत फरशी खूपच गार पडायची. मग दार लावून उरलेला अभ्यास करताना काही वेळा स्वेटर असला तरी गोधडी पांघरून घ्यायचो. जेवायला वेळ असेल तर त्या वेळात एखादा धडा वाचून व्हायचा. अधून मधून आईचा स्वयंपाक कुठवर आला आहे हे पाहण्याकरता पाणी प्यायच्या निमित्ताने स्वयंपाकघरात डोकावायचो. आई म्हणायची वेळ आहे अजून. आईने हाक दिली रे दिली की लगेच स्वयंपाकघरत जाऊन पाने घ्यायचो. आधी पाट मांडायचो. त्यापुढे मोठाली ताटे असायची. आमटीकरता वाटीही पानात ठेवायचो. दोन तांबे पाणी पिण्याकरता घेऊन वाढायच्या आधी आई म्हणायची. ताटे पुसलीत का? आईला ताटे स्वच्छ पुसलेली लागायची. मग आई गरम गरम आमटी व भाजी चे पातेले फरशीवर ठेवायची व एकीकडे पोळ्या करायला घ्यायची. बाबा सकाळीच कामाला गेलेले असल्याने आम्ही दोघी व आजोबाच जेवायला असायचो. आई गरम पोळ्या वाढताना आमच्या तिघांमध्ये एका वेळी एकाला अर्धी पोळी व दुसऱ्या दोघांना चतकोर चतकोर अशा पोळ्या वाढायची. गरम पोळीवर आम्ही तूप घ्यायचो. मधूनच गरम आमटी प्यायचो. डावीकडे चटणी नाहीतर लोणचेही असायचे. शिवाय रोज कोणती ना कोणती कोशिंबीरही असायचीच. पोळी संपली की गरम आमटी भात खाऊन त्यावर एक दोन वाट्या ताजे ताक प्यायचो. डायनिंग टेबल मी नोकरी लागल्यावर पहिल्या पगारात घेतले. मला डायनिंग खूप आवडते. डायनिंगच्या वर ताटाळे होते. त्या ताटाळ्यातच कपबशाळे पण होते. जेवायला बसताना पाने घेणे सोपे झाले. जेवणानंतर डायनिंग टेबलाची मी खूप काळजी घ्यायचे. नीट वेळच्यावेळी पुसून घ्यायचे. डायनिंग वर बसून आई आम्हाला एकीकडे अशाच गरम पोळ्या वाढायची पण मग त्यावेळेला कडप्पा आला होता. कडप्याचा काळा कुळकुळीत ओटा त्यावर गॅस व आई आम्हाला गरम पोळ्या डायनिंगवर बसल्यावर जेवायला वाढायची. उष्टी खरकटी काढणे पण सोपे झाले होते. या आधी खाली बसायचो तेव्हा उष्टी काढल्यावर नंतर फरशी तरटाने पुसावी लागे. डायनिंग आल्यावर पाटाचा उपयोग आमच्याकडे कुणी जास्तीचे पाहुणे आले की व्हायचा किंवा कुणाला केळवण व डोहाळेजेवण असले की मग आम्ही बाहेरच्या खोलीत पाने घ्यायचो. एकावेळी १०-१५ माणसे बसायची. केळवण असले की मग ताटाच्या खाली पण आम्ही पाट ठेवायचो. केळवण, डोहाळेजेवण असले की माझे बाबा प्रत्येक ताटाभोवती सुंदर महिरप काढायचे. जेवणे झाल्यावर मग उष्टी खरकटी काढताना आधी वेगळी रांगोळी एका जागी घेऊन मग ती केराच्या टोपलीत टाकून नंतर दोन वेळा तरटाने पुसून घेत असू. आमच्या घरी आई व बाबा दोघेही शिकवण्या घ्यायचे. आई पहिली ते सातवी घ्यायची व बाबा आठवी ते दहवी पर्यंतच्या मुलांना शिकवत. त्यामुळे आमची बाहेरची खोली सतत भरलेलीच असायची. आई सकाळी सर्व आवरून ८ वाजता शिकवायला बसायची ते १० पर्यंत. नंतर परत दुपारी ३ ते ५ शिकवण्या असायच्या. बाबा संध्याकाळी ऑफीसमधून आले की त्यांच्या शिकवण्या ६ ते ९ चालायच्या. आधी ४-५ सतरंज्या अंथरायचो. नंतर मोठा जाड सुतडा घेतला होता. त्यानंतर कारपेट आले. दर वेळेला शिकवण्यांची मुले गेली की संतरंज्या झटकून टाकायला लागायच्या. सुतडा जास्त दिवस टिकला नाही. कारण की तो धुवायला खूप अवजड होता. कारपेट आले तेव्हा त्यावर केरही काढता यायचा. शिवाय कोणी जेवायला बसले तरी पाने त्यावरच घेतली जायची. शिवाय शिकवण्यांच्या मुलांना बसायलाही छान वाटायचे. कारपेट सुद्धा सारखे पुसून घ्यायला लागायचे. कारण की बाहेरच्या खोलीत सारखी वरदळ असायची. शिकवण्यांची मुले, आलागेला बराच होता. नातेवाईक व आईबाबांचे मित्रमंडळ शनिवार रविवार यायचे. क्रमश:

Thursday, March 08, 2012

वास्तू (४)

पूर्वी दात घासायचो तेव्हा सुरवातीला दात घासायचे ब्रश कुठे होते, आम्ही राखुंडीने दात घासायचो. काळी दंत मंजन व चंचला अशा दोन राखुंड्या होत्या. साबणही हिरवा हमाम असायचा. धुण्याचा साबण ५०१ बार मोठा चौकोनी जाडजूड होता. तो बरेच दिवस टिकायचा. भांडी घासली जायची तीही राखेने. पितळ्याची सर्व भांडी चिंचेने घासली जायची. भांडी घासण्याकरताही वेगळ्या घासण्या नव्हत्या. नारळाच्या शेंड्या आई जमा करून ठेवायची. बाथरूममध्ये जो नळ होता तो पितळी होता. नळाला पाणी यायचे तेही दिवसातून दोनदा यायचे. पहाटे ५ ला यायचे ते सकाळी ८ वाजेपर्यंत असायचे व दुपारी ५ ला यायचे ते रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत असायचे. रात्री झोपताना आम्ही नळ उघडा करून त्याखाली बादली ठेवायचो. पहाटे पाचला नळातून फुर्र फुर्र आवाज करत धोधो पाणी यायचे. पाणी आले की पहिली आई उठून चहा ठेवायची व आम्हाला उठवायची. आम्हाला सर्वांनाच लवकर उठायला लागायचे. एक तर पाणी लवकर जायचे आणि शाळाही सकाळची असल्याने पटपट आवरून ६.४५ ची बस पकडायला लागायचि. दुपारची शाळा असली तरीही लवकर आवरायला लागायचे कारण की सर्वांच्या अंघोळी वगैरे उरकून सर्व बादल्या, बंब व पत्र्याचा ड्रम भरून ठेवायला लागायचा. दुपारचे पाणी यायचे पण ते जर का ते काही कारणाने आले नाहीच तर भरलेले सर्व पाणी सकाळपर्यं पुरवायला लागायचे. आईकडे मोलकरीण असल्याने आम्हा दोघी बहिणींना कधी घरी धुणे भांडी करायला लागली नाहीत. कदमबाईंना खूप कामे असल्याने त्यांची मुलगी आमच्याकडे यायची. शनिवार रविवार ती भांडी कशी घासते ते आम्ही बघायचो व तिला सांगायचो आम्ही पण घासतो ना दोन तीन भांडी. आमच्यावर ती ओरडायची व म्हणायची की नको तुमची आई मला ओरडेल. मग आम्ही तिला म्हणायचो नाही ओरडणार. आम्हाला दोन चार ताटल्या तरी देना घासायला. तशी द्यायची काही वेळेला. ती भांडी घासताना दोन बादल्या पाणी भरून घ्यायची. भांडी घासून झाली की ती घासून झालेली सर्व भांडी एका बादलीत टाकायची त्यामुळे ती बरीचशी बादलीतच स्वच्छ व्हायची व एकेक करून दुसऱ्या बादलीतल्या पाण्याने हाताने पाणी घालून ती सर्व भांडी विसळायची. ही पद्धत आम्हाला खूप आवडली होती. आमच्या घराची झाडलोट पण किती छान व्हायची. पूर्वी झाडू होते. या झाडूने केर काढायचा की खूप खाली वाकावे लागे कारण की हे झाडू बुटके असायचे. नंतर लांबलचक कुंचे आले. कुंच्याने केर काढायला मजा वाटायची. बाजारात गेलो की जास्तीत जास्त उंच कुंचे निवडायचो. खाली न वाकता केर काढायला छान वाटायचे. कुंचे आल्यावर केर काढण्यासाठी आमची भांडणे! दर दोन महिन्यांनी जळमटे काढून फरशी धुवायचो. फरशी धुणे हा एक मोठा कार्यक्रम असायचा. उंच काठीला केरसुणी सुतळीने बांधून भिंतीवरची उंचावरची जळमटे काढायचो व निरानिपटी सर्व कानाकोपऱ्यातून केर काढले जायचे. सर्वात शेवटी फरशी धुण्याचा कार्यक्रम. याकरता आधी फरशीवर असलेले सामान कॉटांवर ठेवायचो. आई बादलीभर उकळत्या पाण्यात धुणे धुवायची पावडर घालायची व त्याचा खूप फेस यायचा. बादलीच्या वर फेस येऊन नंतर तो बादली बाहेरही यायचा. आई हे उकळते पाणी तांब्याने फरशीवर टाकायची व खसाखसा फरशी धुतली जायची. सकाळी लवकर उठून ही कामे उरकायला लागायची. फरशी ब्रशने खसाखसा धुवून झाली की भरपूर बादल्या पाणी फरशीवर ओतायचो. हळुहळू करत सर्व फेस बाहेर ढकलायचो. दोन्ही खोल्यांना दार असल्याने पाणी भराभर अंगणात जायचे. खराट्यानेही पाणी बाहेर काढायला मदत व्हायची. सर्वात शेवटी तरटे घेऊन फरशी पुसायचो. तरटाला लागलेले पाणी एका बादलीत पिळायचो. ते पाणी काळे असायचे. तरटाने बरीचशी फरशी पुसून घेतली तरीही फरशी थोडी ओली असायची. नंतर स्टुलावर रॅलीचा पंखा ठेवून तो सुरू करायचो. मग त्या वाऱ्याने उरलेली ओली फरशी वाळायची. फरशी धुतल्यावर एखाद्या मळकट मुलीला अंघोळ घातल्यावर ती कशी स्वच्छ दिसते तशी फरशी स्वच्छ दिसायची! रॅली पंख्याची पाती लव्हेंडर रंगाची होती. पंखा सुरू केला की ही पाती गरागरा फिरून एक छान रंग निर्माण व्हायचा. हा लव्हेंडर रंग खूप छान दिसायचा. माझ्या मैत्रिणीकडे जो रॅलीचा पंखा होता त्याची पाती शेंदरी रंगाची होती. खूप सुंदर दिसायचे हे पंखे. या रॅली पंख्याला झाकण्याकरता आई एक कव्हर शिवायची. भरपूर पाण्यात फरशी धुण्याची मजा काही औरच होती. क्रमश:

Thursday, March 01, 2012

वास्तू (३)

आईने घरी घालायचे मॅक्सीही खूप शिवलेले आहेत. मॅक्सी हा कपड्यांचा आटोपशीर प्रकार होता. त्यात अम्रेला कट असायचे. फ्रॉकमध्ये चुण्याचुण्याचे व प्लेटीचे फ्रॉक असायचे, कधी कधी बॉक्स प्लेटीचेही! गळ्याला व खाली फ्रॉकला झालर असायची. आईचे ब्लाऊजही आई घरीच शिवायची व त्याला काजेही घरीच करायची. आम्ही दोघी बहिणी ब्लाऊजला व ड्रेसला बटणे आणि हुकलूप लावायचो. घरी सिंगचे मशीन होते. या मशीनला एक ड्रॉवरही होता. त्यात रिळे, सुया , टेप व कात्री ठेवलेली असायची. मशीनचे काम जेव्हा नसेल तेव्हा ते मशीनलाच असणाऱ्या लाकडी चौथऱ्यावर उपडे करून ठेवायचो. हे मशीन बाहेरच्या खोलीत होते आणि ते स्वयंपाकघरात येणाऱ्या दाराच्या बाजूला आडवे ठेवलेले होते. त्याखाली एक लाकडी स्टुलही असायचे. मशीच्या वरती भिंतीवर एक काचेचा आरसा लावला होता. त्या काचेवरच कोरलेली नक्षी होती आणि त्याला लागून काचेचीच आडवी पट्टी जोडली होती. त्यावर पाँड पावडरीचा मोठा डबा एका बाजूला. त्याशेजारी एक छोटा प्लॅस्टीकचा डबा. मोठ्या डब्यातील पावडर आम्ही त्या बाजूला असणाऱ्या प्लॅस्टीकच्या डबीत काढून ठेवायचो. हा डबा गोल आणि त्याचा रंग होता गुलाबी आणि झाकण होते लाल. त्यात एक निळा छोट्या आकाराचा स्पंज होता. त्याने पावडर लावायचो. जाईचे काजळ होते. अफगाण स्नो होता. ओले श्रुंगारचे लाल व काळे कुंकू होते. लाल आईकरता व काळे आमच्याकरता. शिवाय २ कंगवे व एक फणी होती. मोठा कंगवा आमच्या तिघींसाठी व एक लांब निमुळता कंगवा बाबांचा होता. मिसळीच्या आलेल्या उवा व लिखा काढण्यासाठी एक फणी होती. शाळेला वेणी घालून जायचे असेल तर त्याकरता काळ्या रिबिनी होत्या. रिबिन्या बांधून लांब पेडाच्या वेण्या आई घालायची. पेडाला शेवटी शेवटी रिबिनी बांधून थोडे उरलेले पेड घालून त्याला रिबिनीच एक गाठ बांधायचो आणि मग ती वर कानामागे पेंडांना घट्ट आवळून बांधायचो. या रिबीनीची वर एक गाठ बांधली की मग उरलेली रिबीन एखाद्या फुलाप्रमाणे आकार देवून बांधायचो. शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर जाताना लाल, गुलाबी, पिवळ्या व पांढऱ्या व निळ्या रिबीनी होत्या. आई आमच्या वेण्या घालायची त्यातही बरेच प्रकार होते. दोन वेण्या, चार वेण्या, झोपाळे, बटवेणी, एक वेणी. गोंड्याप्रमाणे थोडे केस पेडीच्या खाली असेच सोडून द्यायचो त्या म्हणजे गोंड्याच्या वेण्या. रिबीनी जाऊन रबरे आली. वेगवेगळ्या प्रकारचे चाप आले, क्लिपा आल्या. माझी बहीण वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा कानामागील केसांना लावायची. तिला त्या छान दिसायच्या! मला मात्र क्लिपा हा प्रकार आवडला नाही आणि माझे केस पातळ व मऊ असल्याने त्या बसायच्याही नाहीत. दर रविवारी आई आम्हा दोघी बहिणींना नहायला घालायची. त्याकरता शिकेकाई उकळली जायची. कधीकधी रिठे. अंघोळीकरता पाणी आधी स्टोव्हवर तापायचे. त्या आधी बंब अंगणात होता. त्यात लाकडे जाळून बंब पेटवायचो व त्यातले पाणी अंघोळीकरता घ्यायचो. गॅस आला व त्यानंतर सर्व काही गॅसवरच. नंतर बंबाला कॉईल लावून घेतली. त्यानंतर तर अंघोळ म्हणजे खूप आनंद होता. भरपूर पाणी घ्या. आंम्ही तर चांगल्याच डुंबायचो भरपूर पाणी घेऊन. त्यामुळे नहाणे तर खूपच छान होत होते. केस धुतल्यावर आई केस पंचाने गुंडाळून त्याचा मोठा अंबाडा घालून द्यायची. हा अंबाडा बराच वेळ राहू द्या म्हणजे केस कोरडे होतील असे आई म्हणायची. बऱ्याच वेळानंतर पंचाने बांधलेला अंबाडा सोडला की केस पंचानेच खसाखसा घासायचे व नंतर पंचानेस केस उलटे करून झटकायचे. त्या दिवशी नंतर आई आमच्या केसातल्या जटा काढून सैलसर एक वेणी घालत असे. क्रमश:

Thursday, February 16, 2012

वास्तू (२)

माझ्या आठवणीतला पहिला पलंग तीन रुंद जाड फळ्यांचा होता. काही अंतरावर दोन बाजूंना लोखंडी दोन स्टँड होते त्यावर या तीन मोठ्या रंद आणि जड फळकुट्या टाकायच्या की झाला पलंग! त्यावर तीन गाद्या. या पलंगावर आजोबा झोपत असत. आमच्या ४ गाद्या फरशीवरच एकावर एक गुंडाळून ठेवल्या जात व त्यावर बेडशीटा पांघरल्या जात. हे सर्व भिंतीच्या एका कडेला लावत असू. त्याच्या बाजूला एक सतरंजीवर एकावर एक उशा ठेवून त्यावर पण एक बेडशीट घालत असू. बेडशीत पूर्वी पलंगपोस असेही एक नाव होते. त्यानंतर आमच्या घरी दोन सनमायका लावलेले दिवाण आले. हे दिवाणही दुकानात जाऊन विकत घेतले नव्हते. आईबाबा दोघेही शिकवण्या घेत असत. त्यातल्या काही शिकवण्या घरी जाऊन शिकवत. त्यात एक बाई होत्या त्यांच्या दोन मुलांना बाबा घरी जाऊन शिकवायचे. त्यांच्याकडे एक ६ फूट मोठा दिवाण होता व एक सिटी होती. तीही अशी सनमाईका लावलेली छान होती. त्यांच्या नातू ६ फुटापेक्षाही उंच होता त्यामुळे तो दिवाण त्यांना विकायचा होता. ती सिटी पण त्यांना काढून तिथे सोफा आणायचा होता. तर बाबांना त्यांनी विचारले तुम्ही विकत घ्याल का? मग बाबांनी विचार करून त्यांना सांगितले की आम्ही घेऊ, पैसे किती द्यायचे. तर म्हणाल्या तुम्ही द्याल ते. ५०० रुपयामध्ये हे दोन्ही दिवाण आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला काय आनंद झाला होता. हे दिवाण अजूनही आमच्याकडे आहेत. खूप सोयीचे असे हे दिवाण होते. त्यांना आतून ठेवण्याकरता जागाही होती. मग मोठा दिवाण आजोबांसाठी आणि छोटी सिटी म्हणजेच दिवाणच तो! तो आईकरता दुपारी तिला थोड्यावेळासाठी पडायला. या दिवाणावर आम्ही काही वेळा दुपारी तिघी मिळून झोपायचो. अर्थात तेव्हा तो आम्हाला तिघींनाही पुरत होता. दोन दिवाण आले तरीही आम्ही चौघे खालीच गाद्या घालून झोपायचो. आम्ही जशा मोठ्या झालो, शाळेत जायला लागलो, तशी आईने आम्हाला कामे वाटून दिली होती. एकीने गाद्या घालायच्या तर एकीने त्या सकाळी आवरून ठेवायच्या. एकीने चहा करायचा तर दुसरीने चहा झाल्यावर कपबशा विसळायच्या. एकीने जेवणाची पाने घ्यायची तर दुसरीने उष्टी खरकटी काढायची. यात आमच्या दोघींच्यात चुरस चालायची ती म्हणजे कंटाळवाणे काम दुसरीवर कसे ढकलता येईल बरे! यात काही वेळेला सकाळी उठल्यावर जर माझी बहीण आधी उठलेली असेल आणि दात घासत असेल तर मी हळूच गुपचूप सर्व पांघरूणाच्या घड्या घालून गाद्या लावून मोकळी झालेली असायचे. आईला वाटायचे ही अजून झोपलीच आहे. माझी बहीण दात घासून व चहा पिऊन बाहेर येत्ये तर गाद्या काढलेल्या तिला दिसायच्या. मग रात्री गाद्या घालण्याचे कंटाळवाणे काम तिच्यावर येऊन पडायचे. मग तीही सुट्टीच्या दिवशी दुपारचा चहा असाच गुपचूप येऊन करायची. भांड्यांचा आवाज न करता चहाचे आधण ठेवायची. एकीकडे दूध तापत ठेवायची. मी स्वयंपाकघरात गेले की ती चहा कपबशी मध्ये गाळताना दिसायची म्हणजे कपबशा विसळण्याचे कंटाळवाणे काम माझ्यावर येऊन पडायचे. यात मग आमच्या दोघींमध्ये भांडणे व्हायची. नंतर आईने कामाचा नियम बदलला. जे काम घ्याल ते पूर्ण करायचे. मग हा नियम जरा कठीण जायला लागला. आईला नियम बदलायला लावला आणि मग आमच्यात भांडणे न होता समजुतदापणाने कामाची वाटणी होऊ लागली. एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व आत्येमामे भावंड एकत्र असायचो. आमच्या घरी सर्वांचाच अड्डा असायचा. कोणी कॅरम खेळतयं तर कुणी बुद्धीबळ तर कोणी पत्ते. यात एक वेगळा खेळ खेळायचो तो म्हणजे जगप्रवास. हा जगप्रवास आम्ही पुढच्या खोलीला ज्या पायऱ्या होत्या त्यावर बसून खेळायचो. त्या तीन पायऱ्या म्हणजे आमची जीप. सगळ्यात खालची पायरी म्हणजे पहिली सीट व त्यावरच्या दोन पायऱ्या म्हणजे मागच्या दोन सीटा! त्यात एक मामेभाऊ जीप चालवायची ऍक्शन करायचा. वळण आले की ओरडायचा वळण आले बरं का! मग आम्ही सर्व वळण आले की कसे एका बाजूला कलले जातो त्याप्रमाणे ऍक्शन करायचो. वळण संपले की परत पहिल्या स्थितीमध्ये बसायचो. प्रवास करता करता रात्र झाली की भाऊ म्हणायचा तुम्ही सर्वांनी झोपा आता. मी एकटा जीप चालवतो. या प्रवासामध्ये आम्ही मध्ये खाण्याकरता कोको व बोर्नव्हीटा आईच्या नकळत घ्यायचो. आईला कळायचे नाही बोर्नव्हीटा आणि कोको इतका लवकर का संपतो ते! बुद्धीबळामध्ये सुद्धा खेळताना आधीच ठरवायचो मारामारी की सिरियस खेळायचे ते! मारामारी असली डाव ५ मिनिटात संपायचा. एकाने एक प्यादे मारले की दुसऱ्याने लगेच उंट मारायचा. एकाने हत्ती मारला की एकाने घोडा उडवायचा. शेवटी फक्त राजा शिल्लक राहायचा. खटाखट मारामारी. खूप हासायचो. मागे शह असल्याशिवाय मारायचे नाही या नियमाने खेळलो सिरिअसली तरी धीर संपून शेवटी मारामारी ठरलेली! कॅरममध्ये सुद्धा धमाल यायची. यात बाकीच्या खेळापेक्षा गेम हा खेळ जास्त चालायचा. एक हारला की त्यावर लगेच दुसरा बसायचा. काहीवेळा तर अगदी १/१ या मार्कांप्रमाणे टफ गेम चालायची. नीट खेळता आले नाही तर म्हणायचो हात अजून तापला नाहीये. तो तापला की मग अगदी खूप अवघड सोंगटी पण कट मारून सहज छान जायची. आई आमचे सर्व ड्रेस घरीच शिवायची. वेगवेगळ्या फॅशनचे फ्रॉक, स्कर्ट, शाळेचा गणवेश, पंजाबी सूट. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या शिवायची. फुग्याचा बाह्या, उडत्या बाह्या, मॅगी व स्लिवलेस आणि गळे पण गोल, चौकोनी, पंचकोनी, व्ही, बंद गळा असे बरेच प्रकार आईने छान छान शिवलेले आहेत. हे सर्व ड्रेस बेतून झाल्यावर जे कापड उरायचे ते सर्व आई गुंडाळ्या करून ठेवायची. त्याकरता एक मण्यांची बास्केट सारखी दिसणारी पर्स होती त्यात या सर्व गुंडाळ्या ठेवायची. त्यामुळे नातेवाईकात व मित्रपरिवारात कुणाकडे बारसे असेल तर आमच्याकडून घरी शिवलेला बाळंतविडा असायचा. आईने अनेक प्रकारचे छान छान बाळंतविडे शिवलेले आहेत. पूर्वी फोटोचे एवढे अप्रुप नव्हते नाहीतर कितीतरी फोटो झाले असते बाळंतविड्याचे. नंतर बघताना किती छान वाटले असते ना! बाळंतविड्याचा फोटो व त्याखाली बाळाचे नाव लिहिले असते, त्याची जन्मतारीख लिहिली असती व त्याचाही एक फोटो बाजुला लावला असता. हा एक छंद म्हणून किती छान झाला असता ना! क्रमश:

Thursday, February 09, 2012

वास्तू (१)





आई नेहमी म्हणते या वास्तुने आपल्याला तारले आहे. अगदी खरे आहे ते! नुसते तारले नाही तर भरभरून दिले आहे. त्या वास्तुत राहिल्या आल्यानंतर २-४ महिन्यांनी माझ्या बहिणीचा जन्म झाला. मी दीड ते पावणे दोन वर्षाची होते. मी जेव्हा माँटेसरीत जायला लागले तेव्हा माझी बहीण पण हटून बसायची माझ्याबरोबर बालवर्गात यायला. मला अगदी अंधुक आठवत आहे की मी वर्गात सतरंजीवर सर्व मुलांच्यात बसले आहे आणि माझी पाटी मुळाक्षरांनी व पाढ्यांनी भरली आहे. आजोबा व आम्ही चौघे म्हणजे आईबाबा व आम्ही दोघी बहिणी खूप आनंदार राहिलो या वास्तुमध्ये. या वास्तूच्या म्हणजेच या घराच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल मी लिहिलेले आहेच. घरासमोरचे आंगण, घराच्या आजुबाजूला जी जागा होती त्यात विविध झाडांनी बहरलेली बाग याबद्दलही लिहिले आहे. जाईचे कोडकौतुक केले आहे. ते वाचल्यावर तर तुम्हाला वाटेल की ही जाई आपल्या अंगणात असती तर!









या लेखामध्ये मी घरामध्ये असणाऱ्या वस्तुंचे, आठवणींचे, गमतीजमतीचे वर्णन करणार आहे. पहिल्याप्रथम या घराला दोन्ही बाजूने तीन तीन पायऱ्या होत्या. बाहेरच्या खोलीला लागून तीन पायऱ्या होत्या. बाहेरच्या खोलीला लागून मध्ये एक भिंत होती त्यामागची खोली म्हणजे स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघराला लागून तीन पायऱ्या होत्या. पायऱ्यांना लागूनच सिमेंटचे उंबरठे होते. त्यावर लक्ष्मीची पाऊले रोज रांगोळीने काढली जायची. सणवार असतील तर पायऱ्यांवर दोन्ही बाजूला कडेने फुले, स्वस्तिके काढत असू. दोन मोठाल्या खोल्या व त्यामध्ये मोठाल्या फरशा होत्या. दारे खिडक्या लाकडाच्या होत्या. खिडक्यांना मध्ये आडवे लोखंडी गज होते. खिडकी आतून बंद करताना खिट्या होत्या. या खिडकीचे दार खिडकीच्या बाहेर उघडले जाई. खिडकीच्या डाव्या कोपऱ्यात आतल्या बाजुने एक क्लिपेसारखा आडवा हुक होता तो खिडकीच्या सर्वात खालच्या पट्टीवर असलेल्या हुकामध्ये अडकवला की खिडकीचे लाकडी दार स्थिर राहायचे. खिडकीतून अंगणात लावलेल्या जाईच्या फोफावलेल्या फांद्या आत येत असत. खिडकीतून समोर पाहिले की पेरूचे झाड दिसायचे.









दारांना एका बाजूने लोखंडी साखळीच्या आकाराच्या कड्या होत्या व त्या दुसऱ्या दारावरच्या लोखंडी हुकामध्ये अडकवून दारे लावले जायची. या दारांना आतूनही वरच्या बाजूला खिट्या होत्या. ही दार म्हणजे दोन आयताकृती रुंद फळ्या होत्या. ही सर्व दार व खिडक्या आकाशी रंगाच्या ऑईलपेंटने रंगवल्या जात. दुपारचे जेवण झाल्यावर थोड्यावेळासाठी आडवे झालो तर हे दार अर्धवट बंद करायचो. त्याकरता साखळीसारख्या दिसणाऱ्या कडीला एक रिबीन वेटोळा आकार देवून जोडली होती व रिबीनीचे दुसरे टोक दाराच्या दुसऱ्या फळीवर अडकवून दार अर्धवट बंद करायचो. असे केल्याने बाहेर कोणी आले का तेही कळायचे व थोडे वारेही यायचे. कोणी ओळखीचे आले तर तो दारावरची रिबीन काढून आत येई व परत दारावरची रिबीन अडकवे. हे असे माहीत झाले होते. त्यामुळे आम्हाला दार उघडण्याकरता उठावे लागत नसे.










आई सर्व प्रकारचे शिवण घरीच शिवायची, त्यामुळे दारे खिडक्यांना पडदे घरी शिवलेले असायचे. दोन खोल्यांमध्ये भिंत होती व त्यात कडेचा थोडा भाग तसाच उघडा ठेवला होता. तिथेही एक पडदा होता. बाहेर वारे वाहत असले की खिडकीच्या पदद्यामध्ये बाहेरची हवा शिरायची व पडदा खिडकीच्या आत पूर्ण फुगायचा. वारे पडले की फुग्यामधली हवा काढल्यावर फुग्याची जशी स्थिती होते तशी त्या पडद्याची व्हायची. खिडकीच्या मध्ये असलेल्या लोखंडी गजाना हा पडदा चिकटत असे. हे सर्व पडदे स्प्रिंगच्या तारेतून घातले जायचे. ह्या तारेला दोन्हीकडून हूक होते. ते खिडकीच्या वर व खाली दोन्ही बाजूना खिळे ठोकून अडकवले जायचे. दारावरच्या पडद्याला खालून झालर असायची. मुख्य दारावरचा पडदा व दोन खोल्यांमधून येण्याजाण्याकरता जी जागा होती तिथला पडदा, हे दोन्ही पडदे आई थोडे आखूड शिवायची व दोनी पडद्यांना झालर असायची. स्वयंपाकघरात छोटी बाथरूम होती. तिलाही दार नव्हते. पददाच होता. आमच्याकडे जेव्हा लोखंडी कपाट आले तेव्हा हा पडदा नेहमी पारदर्शक असायचा. तो अशासाठी की येताजाता सहज आरशामध्ये बघता यावे. आमच्या या घरी तक्ये व उशा होत्या, त्यांना पण आई अभ्रे घरीच शिवायची. महिन्यातून एकदा हे सर्व पडदे, अभ्रे धुतले जायचे. उशांना व तक्यांना शुभ्र धुतलेले अभ्रे घालताना छान वाटायचे. अभ्रे धुतल्यावर ते आटायचे त्यामुळे उशीवर अभ्रे चढवताना ती त्यामध्ये कोंबून बसवावी लागे. त्यादिवशी सर्व उशा लठ्ठ दिसायच्या!










आम्ही लहान होतो तेव्हा गॅसची शेगडी व गॅस सिलेंडर फरशीवर ठेवलेला असायचा व आई खाली बसूनच चहा व सर्व स्वयंपाक करत असे. या घरी खूप पाट होते. ते लाल ऑईल पेंटने रंगवले जायचे. आईचा एक छोटा जाड पाट ठरलेला असायचा. पाने घेताना पाट, त्यापुढे ताट, ताटात वाटी व बाजूला फुलपात्रे व दोन जाड तांबे घेत असू. त्यात एक छोटा गडुवाला तांब्या होता. या गडुवाल्या तांब्यातून आजोबा पाणी प्यायचे. जसा छोटा पाट आईचा ठरलेला होता तसाच हा गडुवाला तांब्या आजोबांचा ठरलेला होता. जेव्हा आईकडे तिची सर्व भाचवंडे जमायची त्यावेळेला जेवायला सतरंज्या घातल्या जायच्या. त्या घातताना त्याची चौपदरी गुंडाली करून घालत असु.








कपडे वाळत घालायला उंचावर लाकडी दांड्या होत्या. त्यावर कपडे वाळत घालायचो. त्याकरता दोन चार उंच काठ्या होत्या. त्यातल्याच एका काठीवर पाडव्याला गुढी उभारली जायची. काही दिवसांनी हिंडालियमचा एक चौकोनी ओटा आला. त्याला लागूनच ताटाळे असायचे व खाली डबे ठेवायला कप्पे होते. त्यानंतर कडप्पाचा ओटा आला. मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा पहिल्या कमाईचे मी सनमायकाचे डायनिग टेबल घेतले होते. त्यावर चहा प्यायला व जेवायला खूप छान वाटत होते. मोठ्या ताटांप्रमाणेच काही गोल स्टीलचे थाळेही होते. स्वयंपाकघरात दुभत्याचे कपाट होते व एक खूप मोठी लाकडी मांडणी होती. यात सर्व काही छान बसायचे. मोठे व छोटे डबे, मोठ्या व छोट्या पातेल्या, तांबे, भांडी, एक कप्पा भाजीकरता होता. खूप छान होती ही मांडणी. मांडणी व दुभत्याचे कपाट आजोबांनी एका सुताराकडून करवून घेतली होती. त्याचे डिझाईन आजोबांनी सांगितले होते.



क्रमशः...

Monday, December 14, 2009

मी जरा फ्रेश होऊन येते !

तीन चार महिने झाले की माझी चुळबुळ सुरू व्हायची. चार महिने म्हणजे खूप झाले. विनुला सांगायचे मी जाऊन येते रे पुण्याला. खरे तर मुंबईवरून पुण्याला जाणे म्हणजे काही खूप लांब जाणे नाही, अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याइतपत जवळ आहे. ही चार पाच दिवसांची ट्रीप म्हणजे जाताना जितका उत्साह तितकाच किंवा त्याहूनही अधिक उत्साह मला येताना असायचा. खूप फ्रेश होऊन यायचे मी. बॅग पण छोटी सुटसुटीत असायची. ही छोटी बॅग भरताना पण मला भारी उत्साह असायचा. जाता येताना डेक्कन एक्सप्रेस ठरलेली असायची. रेल्वेमध्ये ही एक छान सोय असते. बायकांचा एक वेगळा डबा असतो. आपण एकटे जरी असलो तरी इतर बायकांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात. ऐकून करमणूक होते आणि प्रवासही छान होतो.



पंजाबी ड्रेस घालून, गळ्यात एक पर्स लटकवून व बॅग घेऊन मी डेक्कनमध्ये प्रवेश करायचे. गाडी सुटताक्षणी कानातले गळ्यातले सेट घेऊन विक्रेते यायचे. हा एक छान टाईमपास असतो. तीन चार चौकोनी बॉक्स असायचे ते सर्व बायकांमध्ये फिरायचे इकडून तिकडे. हे बघण्यात पण छान वेळ जातो. खिडकीत जागाही कदाचित मिळायची थोड्यावेळाने. कर्जत आले की बटाटेवडे खाणे हे ठरलेले. खिडकीतल्या बायकांना विनंती करून बाकीच्या "ए माझ्यासाठी घे गं पटकन" अशा सांगायच्या. मग खिडकीतून हळूच बटाटेवडे घेऊन ते बायकांकडे द्यायचे व पैसे बटाटेवडेवाल्याकडे. सगळ्यांचे मग बटाटेवडे व त्यावर कॉफी चहा वगैरे सुरू व्हायचे.



सर्व बायका थोड्या स्थिरस्थावर होऊन मग "तुम्ही कुठे निघालात? " "कोणत्या स्टेशनवर उतरणार? शिवाजी नगर की स्टेशन? " "मुंबईत कुठे राहता? " अशा थोड्या गप्पा टप्पा सूरू व्हायच्या. नंतर घाटातले सृष्टीसौंदर्य पाहण्यात खूप मजा यायची. घाट पाहता पाहता मनातच "हं आता तासाभरात येईलच शिवाजी नगर" कधी एकदा पुणं येतयं आणि मी आईकडे जाते असे होऊन जायचे मला. शिवाजी नगरला उतरायचे मी. स्टेशन येताक्षणी अगदी लगेचच उतरायचे. भराभर जिना चढून पूल ओलांडून पलिकडच्या पायऱ्या पण अगदी पटापट उतरायचे. मला अजिबात धीर नावाचा प्रकार नाही. असे भराभर चालून गेले की मग शिवाजी नगरला पटकन रिक्षा मिळते नाहीतर नंतर थोडे कठीण होऊन बसते.



रिक्षात बसल्यावर पण किती ही रहदारी! केव्हा येणार घर! असे मनातल्या मनात पुटपुटायचे. आईच्या घरासमोर रिक्षा थांबली रे थांबली की हातातले पैसे देऊन धावतच बॅग टाकून आईला आवाज द्यायचे आले गं मी! आई पण लगेच म्हणायची आलीस का! आम्ही वाटच बघतोय! चल लगेच हात पाय तोंड धूऊन घे. जेवायलाच बसू या. मी आमटी गरम करत ठेवते. का आधी चहा ठेऊ? " नको चहा नको. माझे खाणेपिणे झाले आहे मधेवाटेत" इति मी. जेवायलाच बसूया लगेच. मला खूप भूक लागली आहे. जेवत जेवता "आई तुझ्या हातचं जेवायला किती चांगलं वाटतं गं!! एकीकडे गप्पा सूरू व्हायच्या लगेच आमच्या. जेवल्यावर रंजनाला फोन. ती पण लगेच ऑफीस सुटल्यावर घरी यायची आणि सई पण माझी भाची! मग आमच्या तिघींची जी टकळी चालू व्हायची ती अगदी मी निघेपर्यंत! बडबड करून डोके दुखायला लागायचे. रात्री झोपताना पण "आता झोपू या हं १२ वाजून गेलेत, सकाळी उठवत नाही मग" आई म्हणायची. ५ ते १० मिनिटेच शांत जात असतील. परत कुणाला तरी काहीतरी आठवायचे की परत वटवट सूरू.



आईकडे गेल्यावर एक दिवस चतुर्श्रुंगी व कमलानेहरू पार्क हे कार्यक्रम ठरलेले. चतुर्श्रुंगीला देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे एक गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. या दोन ठिकाणी जाऊन आले की मन प्रसन्न व्हायचे. कमला नेहरू पार्कला तर खूपच मजा यायची. सई जायची घसरगुंडी खेळायला. बाबा पार्कला एक चक्कर मारून यायचे व येताना सईला परत घेऊन यायचे. तोपर्यंत आम्ही तिघी म्हणजे आई, मी व रंजन माझी बहीण हिरवळीवर बसून निवांत गप्पा मारत बसायचो. तिथे आमच्या ओळखीचा एक भेळपुरीवाला व पाणीपुरीवाला होता. तिथे मनसोक्त खादाडी करायचो. भेळपुरी, पाणीपुरी, दहीबटाटापुरी व रगडा पॅटीस. जाताना व येताना आईबाबा व सईला रिक्षेत बसवून द्यायचो. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींच्या वेगळ्या गप्पा व्हायच्या. रिक्षेत बसल्यावर आई बजावायची. लवकर या बरं का! आम्ही दोघी "हो गं आई. " आम्ही दोघी मुद्दामुनच रमत गमत यायचो कारण की तोच वेळ आमच्या दोघींच्या गप्पांसाठी असायचा! या दोन कार्यक्रमांच्या आधी १-२ दिवस मी सासरी जाऊन यायचे. तिथे माझी जाऊ वसुधा व पुतणी सायली माझी वाटच पाहात असायच्या कारण की आमच्या तिघींचाही कार्यक्रम ठरलेला असायचा तो म्हणजे तुळशीबाग व पुष्करिणी भेळ!!



मुंबईला परत निघायच्या दिवशी मी थोडे लवकर जेवायचे. नंतर एक छोटी डुलकी काढून साबणाने स्वच्छ तोंड धूउन पावडर कुंकू लावायचे. तोपर्यंत आईचा चहा व्हायचा. चहा घेऊन आजीआजोबांच्या फोटोला व आईबाबांना नमस्कार करून निघायचे. निघताना आई हळदी कुंकू लावायची. सोबत डिंकाचे लाडू, साजूक तूप, थालिपीठाची भाजणी काही ना काही द्यायचीच!! मुंबईला निघताना मी एकदम फ्रेश असायचे. बहीण भाची किंवा कधी कधी आईबाबा मला सोडायला यायचे पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनला बसायला जागा मिळायची. गाडी सुटल्यावर रंजना सई किंवा आईबाबा जे कोणी सोडायला येणार असेल त्यांना हात हालवून टाटा करत रहायचे मी खिडकीतून ते दिसेनासे होईपर्यंत!


गाडी सुरू होऊन प्लॅटफॉर्म सोडायची. आता मात्र थोडे अश्रू वाहायचे डोळ्यातून. थोड्यावेळाने चहा यायचा. चाय चाय ! गरम चाय! कितने को दिया?..... गाडीनेही भरपूर वेग घेतलेला असायचा.

Wednesday, October 14, 2009

माझ्या आठवणीतली दिवाळी





दिवाळी जवळ आली की आमच्यात एक प्रकारचा उत्साह संचारायचा. आमच्या घरादाराचे रंगरूप उजळायचे. सर्वात प्रथम म्हणजे घराला रंग. घरामध्ये एक भली मोठी लाकडी मांडणी व दुभत्याचे कपाट होते, लाकडी पाट होते, तेही रंगवले जायचे. मग घरातल्या प्रत्येक वस्तूची साफसफाई. त्यावेळी पितळेचे डबे असायचे ते चिंचेने घासून लखलखीत व्हायचे. फरशी पण धो धो पाण्याने धुतली जायची. ही सर्व घराची प्राथमिक साफसफाई झाली की मग वाण्याची लांबलचक यादी, कारण आई मोठ्या उत्साहाने व आनंदाने लाडू चिवड्यापासून ते अगदी अनारसे कडबोळीपर्यंत सर्व पदार्थ करायची आणि ते सुद्धा मुबलक प्रमाणात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पदार्थ करत बसायचो, मग त्याचा सुटणारा घमघमाट व प्रत्येक पदार्थाची चव पाहणे.


नंतर बाकी सर्व खरेदी. पणत्या, रांगोळी, भरपूर रंग, पणत्या भिजत घालणे, त्याकरता लागणाऱ्या वाती करून ठेवणे. पणत्याही भरपूर लागायच्या. पुढील व मागील दारी तीन पायऱ्यांवर प्रत्येकी चार. डावीकडे व उजवीकडे दोन याप्रमाणे. फाटकावर चार. कोयनेलच्या कुंपणात एक, जाईच्या वेलीशेजारी एक, मातीच्या किल्ल्यात एक, पेरूच्या, पपईच्या, केळीच्या झाडांजवळ एकेक. आई पूर्ण अंगण शेणाने सारवून देई. अंगण साफ करण्यासाठी झाडू खराट्याची पण नव्याने खरेदी व्हायची. आकाशकंदील तर चांदणीचाच आवडायचा आम्हा दोघींना. भरपूर फटाक्यांची खरेदी झाल्यावर त्याची आमच्या दोघींच्यात समान वाटणी. दिवाळीच्या काही दिवस आधी आमचे भाऊ आमच्या अंगणात एक सुरेखसा मातीचा किल्ला बनवून द्यायचे. सर्व तयारीनिशी दिवाळीचे स्वागत करायला सज्ज राहायचो.



दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे कुडकुडत उठून एकीकडे रेडिओवर पुणे केंद्रावर प्रसारित होणारी नरकासुराची गोष्ट ऐकत तांब्याच्या बंबातील कडकडीत पाण्याने साग्रसंगीत अंघोळ व नट्टा पट्टा करून अंगणात ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत बसायचो. आमच्याकडे खरी मजा असायची ती भाऊबीजेची. खूप दणक्यात व्हायची भाऊबीज. आमचे आठ मामा व त्यांचे कुटुंब मिळून ३५ ते ४० जण असायचे. स्वयंपाक पण अगदी साग्रसंगीत. ओल्या नारळाची पाटावरवंट्यावर वाटलेली चटणी, बागेतल्या अळूची भाजी, बटाट्याची भाजी, तळण, पुऱ्या, वरणभात व घरच्या चक्क्याचे बनवलेले श्रीखंड. आमच्याकडे पाट भरपूर होते त्यामुळे पाटावर बसून पुढे मोठे ताट, वाटी, फुलपात्र, तांब्या अशा थाटात पंगती होत असत. पिण्यासाठी थंडगार पाणी मोठ्या रांजणातले. जेवणानंतर विडे खाणे. आमच्याकडे एक स्टीलचे बदक होते. त्याच्या पोटात विड्याची पाने व पाठीत लवंग, सुपारी, चुना असे ठेवलेले असायचे. बदकाचे पंख उघडताना त्याची मान आधी वळवावी लागत असे. विडा करून घ्यायला प्रत्येकाकडे ते बदक फिरत असे.



जेवणानंतर मुख्य कार्यक्रम ओवाळण्याचा. हा कार्यक्रम २-३ तास चाले. आधी आई (सर्वात धाकटी) तिच्या आठ भावांना ओवाळायची मग आमच्या भावंडांचा ओवाळण्याचा कार्यक्रम. त्यात आमच्या बरोबरीचे भाऊ मजा करायचे. एक भाऊ ओवाळताना ताम्हणाकडे पाहून त्याप्रमाणे त्याचे तोंड गोल गोल फिरवायचा. मग आम्ही बहिणीपण मुद्दामून उलट्या दिशेने ताम्हण फिरवायचो. एक भाऊ १०/१० सुटे पैसे करत २-३ रुपये ओवाळणीत घालायचा. एक भाऊ ओवाळताना ओवाळणीची उगाचच शोधाशोध करायचा. पॅंटच्या खिशात बघ, शर्टच्या खिशात बघ. त्याने भाऊबीजेसाठी तयार केलेली सर्व पाकिटे पाटाखाली लपवलेली असायची. मग आमची सगळ्यात मोठी मामी ओरडायची. उरका लवकर तुमचे ओवाळण्याचे कार्यक्रम. फटाके उडवायचेत ना! मग सर्वांचे मिळून उरलेले सर्व फटाके उडवायचो. एक दोन तास धडाडधूम!


दुसऱ्या दिवशी जरा उशीराने उठून चिवडा खाणे कार्यक्रम. मोठाल्या परातीत चिवडा, त्यावर बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर व खवलेला ओला नारळ. नंतर आम्हा सर्व बहिणींची खरेदीसाठी तुळशीबागेत फेरी खास भाउबीजेच्या जमलेल्या पैशातून. अशा रितीने दिवाळीचा मनमुराद आनंद लुटायचो.

Monday, August 24, 2009

आठवण गौरीगणपतीची








गणपतीचे दिवस जवळ आले की पुण्यातले खाऊवाले पाटणकर यांचे माझ्या बाबांना एक पत्र यायचे की "पेणवरून गणपतींच्या सुंदर व सुबक मूर्ती आल्या आहेत."

गणपतीच्या दिवशी सकाळी आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर गणपती आणायला जायचो. बाबांच्या हातामध्ये ताम्हण व त्यात आमच्या गणपतीची सुरेख मूर्ती असायची. त्या गणपतीचे डोळे रेखीव व बोलके असायचे. त्याच्याकडे पाहिले की तो आपल्याकडे बघून हसतो आहे की काय असा भास व्हायचा. शेंदरी रंगाचे पितांबर आणि आकाशी रंगाचे उपरणे. सोंडेवरचे नक्षीकाम जणुकाही चांदी सोन्याचे आहे की काय असे वाटे. गणपतीच्या खांद्यावरती आमच्या घरचे एक अबोली रंगाचे पारदर्शक उपरणे असायचे.

गणपतीचे आगमन होताना आई आमच्या तिघांचे औक्षण करायची. आमच्या तिघांच्या पायांवर आधी थोडे गरम पाणी, मग थोडे दूध व परत थोडे गरम पाणी ओतून तिघांच्या पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढून औक्षण करायची. "गणपती बाप्पा मोरया" असे म्हणत गणपतीचे आगमन व्हायचे.

गणपतीच्या गळ्यात आम्ही सोन्याची साखळी घालायचो व त्याच्या बोटात बदामाच्या आकाराची व त्यावर छोटे घुंगरु अशी अंगठी. माझे बाबा गणपतीच्या हातावर थोडे सुंगधी अत्तरही लावायचे. गणपतीला चंदनाचे गंध लावून त्यावर अक्षदा व गुलाबाची पाकळी. आमच्या घरी जाईच्या फुलांचा मोठा वेल आहे. गडद लाल रंगाचे जास्वंदीच्या फुलांचे झाड आहे व अंगणात अगणित दूर्वा. जाईची थोडी फुले, त्यानंतर हिरव्या गर्द दूर्वांची जुडी व त्यानंतर एक गडद लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अशा क्रमाने भरगच्च हार गणपतीला खूप शोभून दिसायचा. छोटा सुबक लाकडी देव्हारा, त्यात गणपतीची मूर्ती, भरगच्च हार व सप्तरंगी दिव्यांची झगमगती माळ. अशा गणपतीचे रूप डोळ्यात साठवून आम्ही सर्व त्याला मनोभावे नमस्कार करायचो.

आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असल्याने दुसऱ्या दिवशी त्याची निघण्याची तयारी. निघताना गणपतीला माझी आई केळीच्या पानामध्ये दही पोह्याचा खाऊ द्यायची आणि म्हणायची, " पुढच्या वर्षी लवकर येरे बाबा." त्याला निरोप देताना आमच्या डोळ्यात पाणी यायचे.

आमच्याकडे गौरी खड्याच्या. बागेतून खड्याच्या गौरी आणायला आम्हा बहिणींना खूप मजा वाटायची. आई आम्हाला बागेतून गौरी आणायला सांगायची. पूजेचे सर्व साहित्य घेऊन जायचो. त्यात गंध, अक्षदा, कापसाचे हळदीकुंकू लावून बनवलेले वस्त्र, उदबत्ती, निरांजन अशी सगळी तयारी घेऊन खास गौरी गणपतीला शिवलेले फ्रॉक घालून जायचो बागेत.


मातीचे अंगण असल्यामुळे त्यात बरेच खडे पण असायचे. मग त्यातल्या त्यात चांगले पाच खडे घेवून त्याची पूजा करून चांदीच्या कमळामध्ये त्या खड्यांची गौरी म्हणून स्थापना व्हायची. सुवासिक फुलांबरोवर गुलबक्षीच्या फुलांची हाताने विणलेली वेणी पण असायची. बागेतच मग हातातली घंटा वाजवून आरती म्हणायचो. नंतर तोंडात पाणी घेऊन गौरींना घरी घेऊन यायचो. तोंडात पाणी अशाकरता की गौरी घेऊन जाताना बोलायचे नसते.

आई आमच्या दोघींचे व गौरींचे औक्षण करायची. रांगोळीच्या छोट्या पाउलांवरून चालत येऊन गौरी देव्हाऱ्यात स्थानापन्न व्हायच्या. गौरींचा खास नैवेद्य म्हणजे घावन घाटले. घावन म्हणजे तांदुळाच्या पिठीचे धिरडे. घाटले म्हणजे नारळाच्या दूधात गूळ व वेलची घालणे. त्यादिवशी आमच्या घरी एक मामेबहीण माहेरवाशीण म्हणून जेवायला असायची.
अशी ही गौरी गणपतीची आठवण मनात कायमची कोरली गेली आहे.

तू सुखकर्ता तू दुखहर्ता... तूच कर्ता आणि करविता.... मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया... मोरया मोरया अष्टविनायक मोरया...


गणेश मूर्ती - ती. श्री. आनंद जोशी यांच्याकडून मला आलेली भेट. अगदी अशीच मूर्ती व सजावट माझ्या माहेरी असायची. ही मूर्ती मला माझ्या माहेरची आठवण करून देते. श्री जोशी यांचे अनेक आभार.

Tuesday, January 06, 2009

बाग











आमची बाग म्हणजे आमच्या सर्वांची बाग. आईबाबांची व आम्हां दोघी बहिणींची. भरपूर फुलझाडे आहेत आमच्या बागेत. नुसती फुलझाडे नाहीत तर फळांची झाडे पण आहेत. काही तर आपोआप उगवली आहेत. प्रथमदर्शनी जाईचा वेल आहे, तो प्रत्येक आल्यागेल्याचे स्वागत करतो. कोणीही आमच्याकडे आले की फाटकातून येतानाच "अरे वा! जाईचा वेल किती फुलला आहे तुमचा! मस्त वास येतोय फुलांचा! " असे म्हणून लगेच अंगणातील पडलेली फुले वेचून घरात प्रवेश करतो.

आमच्या बागेत विविध रंगांची व गंधांची फुले आहेत. प्रत्येकाची शान वेगळी! बागेबद्दल सांगायचे झाले तर मला थोडे भूतकाळातच जायला लागेल. बागेला कुंपण होते ते कोयनेलचे. त्याला पांढऱ्या रंगाची थोडीशी लांब आणि नाजुक अशी फुले असायची. ती फुले तोडून त्याच्या टोकाला एक छोटे देठ असायचे हिरवे, ते काढून आम्ही त्यातला अगदी थोडासाच असलेला गोड रस चाखायचो. त्या फुलाची दांडी होती ती एखाद्या बारीक नळकांडीसारखी. लहानपणी आपण काहीही करतो ना! कोयनेल अवाढव्य वाढले की आई म्हणायची "एकदा रामूला निरोप द्यायला पाहिजे, येऊन आमचे कुंपण नीट करून दे म्हणून" हा रामू येऊन आमचे कुंपण साफ करून द्यायचा. येताना भली मोठी कात्री घेऊन यायचा कुंपण कापण्यासाठी. आम्ही दोघी मग सांगायचो त्याला "कुंपणाला असा आकार द्या, तसा आकार द्या. " कापलेल्या कुंपणाचा पसारा तो एका भल्या मोठ्या पिशवीत घालून घेऊन जायचा. त्या दिवशी आमच्या बागेची इतर साफसफाई पण व्हायची. काही आपोआप उगवलेली झाडे दृष्टीस पडायची. मग हे कुठले बरे झाड असेल याची चर्चा व्हायची.

माझ्या मावसबहिणीने काही रोपटी दिली होती. त्यात अबोली होती, मोगरा होता. गुलाबाचे तर बरेच रंग होते आमच्या बागेत, लालचुटुक, गुलाबी, शेंदरी. बाबांच्या काही मित्रांनी गुलाबाची रोपटी भेट म्हणून दिली होती. प्राथमिक शाळेत असताना बाबा मला सायकलवरून बाल शिक्षण मंदीरमध्ये सोडायचे . सायकलवर बसताना माझ्या डाव्या हातात गुलाबाचे फूल, वर्गावर गेल्यागेल्या बाईंना देण्यासाठी! ते फूल मी खूप अलगद धरायचे, त्याला जराही धक्का लागू नये ह्याकडे माझे लक्ष असायचे! कोऱ्हांटीची फिकट पिवळी नाजूक फुले व अबोली रंगाची अबोलीची नाजूक फुले अलगद हाताने काढावी लागायची. शेंदरी व अबोली रंगाकडे बघून असे वाटायचे की फुले अशीच झाडावर राहू दिली पाहिजेत. झाडावरून काढल्यावर मोकळ्या झाडाकडे बघायला चांगले वाटायचे नाही. माझ्या बाबांची रोज सकाळी बागेमध्ये चक्कर असे. पूजेसाठी परडीत फुले काढत असत. त्यात जाईची तर असायचीच. शिवाय इतरही सुवासिक फुले, दुर्वा व उमललेले असेल तर जास्वंदीचे लालचुटूक तुरेवाले फूल! बदामी रंगाची जाळी असलेली प्लॅस्टीकची परडी होती. ज्या दिवशी जास्वंदीचे फूल असायचे तेव्हा आमचा देव्हाऱ्यातले सगळे देव त्या फुलाने झाकून जायचे.


बाकी सदाफुली होती, गुलबक्षी होती आणि कण्हेरी पण होती! सदाफुलीचा रंग व्हॉयलेट होता. फुलाच्या बाजुने व्हॉयलेट तर फुलाच्या मध्यावर गडद जांभळा रंग आणि मला अशाच रंगसंगतीच्या फुलाची सदाफुली आवडते! गुलबक्षीचा रंग तर असा काही सुंदर दिसायचा ना! म्हणजे त्या गुलबक्षीच्या झाडाला जी फुले येतात त्याचा रंग "गुलबक्षी रंग" म्हणूनच ओळखला जातो. ही फुले उमलायच्या आधी ज्या बिया झाडाला लागलेल्या असायच्या त्या काढून आम्ही एका डबीमध्ये जमा करून ठेवायचो. या झाडाच्या बियांचा रंग काळाकुळकुळीत असायचा. त्या काळ्या बियांभोवती हिरवे आच्छादन असायचे. मग आम्ही प्रत्येक बी त्यावरचे आच्छादन थोडे बाजूला करून बघायचो. काळी बी असेल तर काढायचो, जर का ती पांढरी झाली असेल तर नाही, कारण आता त्या पांढऱ्या बीचे कळीत रूपांतर होणार आहे! या काळा बिया आम्ही मैत्रीणींकरत साठवायचो कारण की त्यांना पण गुलबक्षी हवी असायची त्यांच्या बागेत! त्या गुलबक्षीचे विशेष महत्त्व गौरीगणपतीच्या दिवसात असायचे. या गुलबक्षीच्या वेण्या गौरींना असायच्या. आई हाताने या वेण्या बनवायची त्यांची देठे एकमेकात गुंफून!

कण्हेरीची गुलाबी रंगाची फुले परडीत काढल्यावर खूपच सुंदर दिसायची. कण्हेरीची पाने लांबलचक असतात. त्याची पाने
तोडून आम्ही "टिक टिक" वाजवायचो. कण्हेरीची दोन पाने म्हणजे लांबुळकी पाने समांतर रेषेत ठेवून त्याची टोके दोन्ही हातांच्या चिमटीमध्ये आणि मग ती एकमेकांच्या जवळ आणून परत लांब न्यायची. असे करताना "टिक, टिक, टिक, टिक" असा आवाज यायचा आणि मग असे करताना पाने तुटायची, मग परत दुसरी घ्यायची.

चिनी गुलाब ज्याचा रंग साधारण गुलबक्षी सारखाच असतो तो आमच्या बागेत असाच उगवला होता. चिनी गुलाब सपाट जमिनीवरच वाढतो. सपाट जमिनीवर त्याचा वेल असतो. वेलाची पाने साधारण दुर्वांसारखी लांब असतात आणि त्या वेलातून अधुनमधून फुले असतात. अजून एक "हजारी मोगरा" नावाचा मोगरा होता. त्याची तीन चार बुटकी झाडे होती. त्याची फुले साध्या मोगऱ्यासारखीच दिसायची, पण पांढरी शुभ्र नाहीत. त्या झाडांना अतोनात मुंगळे यायचे. शेवटी मुंगळ्यांना कंटाळून झाडे मुळासकट कापली. का कोण जाणे पण हा हजारी मोगरा त्याच्या वेगळेपणामुळे माझ्या लक्षात राहिला आहे.

सगळ्यात आधी आमचे आंगण पूर्ण मातीचे होते. ते अधुनमधून आई शेणाने सारवायची. अंगणात अगणित दुर्वा पण होत्या. जाईचा वेल दाराला लागुनच होता. जाईसमोर पेरूचे झाड होते. सुट्टीत आमच्या घरी सर्व भावंडे जमायची तेव्हा झाडावरचे पेरू तोडून खायचो. पेरूचे झाड काटकुळे व उंच होते. स्टुलावर चढून काठीने फांदी हलवावी लागायची मग पेरू खाली पडायचा. आम्ही भावंडे माना वेळावून बारीक नजरेने पाहायचो कुठे पिकलेला पेरू दिसत आहे का ते. पेरू पानाच्या आड लपलेले असायचे. थंडीमध्ये बरीच पाने गळून पडायची. आमच्या घरी एक मोठा खराटा होता त्याने सगळी पाने एकत्रित करून आमच्या अंगणात मस्तपैकी शेकोटी करायचो. पुण्यामध्ये त्यावेळेला भरपूर थंडी असायची. कुडकुडायला व्हायचे. दर रविवारी शेकोटीचा कार्यक्रम. सकाळी उठल्यावर आई सगळ्यांना आल्याचा गरम गरम चहा करून द्यायची. चहा घेऊन मग शेकोटीजवळच जाऊन बसायचो. शेकोटीची धग इतकी काही छान वाटायची ना! शेकोटीत पालापाचोळा, छोट्या मोठ्या काटक्या असायच्या. शेकोटी विझायला लागली की नुसताच धूर यायचा. मग आम्ही पुठ्ठ्याने वारा घालायचो. धूर निघून जायचा व परत शेकोटीची धग जाणवायला लागायची. तिथून अजिबात उठावेसे वाटायचे नाही. उन्हे वर आली की मग एकेक जण अंघोळीला उठायचा एक मोठा आळस देवून!

आमच्या बागेत पेरूव्यतिरिक्त छोटी केळी होती, सीडलेस पपई होती, सीताफळे होती. घरची फळे खाताना किंवा घरची फुले माळताना जो काही आनंद होतो, जे काही समाधान मिळते त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही. काही फळभाज्या पण होत्या. हिरवे टोमॅटो, छोटी वांगी, कार्ली. बागेतल्या झाडांना आम्ही दोन प्रकारे पाणी घालायचो. एक भली मोठी प्लॅस्टीकची नळी नळाला जोडायचो आणि नळीने बागेला पाणी घालायचो. आमची जाई तर भरपूर पाणी प्यायची. नळाला पाणी आले नाही तर हौदातले पाणी बादलीत भरून घ्यायचो व तांब्याने घालायचो. बाबांनी आम्हाला सांगितले असायचे की जोपर्यंत झाड पाणी शोषून घेत आहे तोपर्यंत पाणी घालायचे. झाडांना भरपूर पाणी मिळाले पाहिजे. बागेला पाणी घालण्याच्या निमित्ताने आम्ही पण पाण्यात डुंबून घ्यायचो!

आमच्या अंगणाला रोजच्या रोज पाण्याचा सडा असायचा. सडा घालण्यासाठी प्रत्येकाची टर्न असायची. सडा घालायच्या आधी खराट्याने अंगण स्वच्छ झाडून घ्यायचे आणि मग सडा घालायचा. सडा घालताना फाटकातून कोणी आले तर काही वेळेला चुकून त्याच्या अंगावरच सडा पडायचा. माझी सडा घालण्याची टर्न असायची तेव्हा मला किती घालू न किती नाही असे व्हायचे. समाधान व्हायचेच नाही. एक बादली भरून घ्यायची, ती संपली की दुसरी, ती संपली की तिसरी. आमच्याकडे सडा घालण्यासाठी एक स्टीलचा व एक प्लॅस्टीकचा चंबू होता. मला प्लस्टीकचा गुलाबी रंगाचा चंबू खूप आवडायचा, कारण तो जास्त निमुळता होता त्यामुळे सडा जास्त छान पडायचा. मनसोक्त सडा घातले की खूप छान वाटायचे. सडा घालताना काही वेळेस चंबू हातातून निसटायचा. आमच्या घराला लागूनच ३-४ पायऱ्या होत्या. सुट्टीमध्ये आम्ही बहिणी जमलो की पायरीवर गिचमिड करून बसायचो. कुणी उठली की पटकन ती जागा दुसरी घ्यायची.

आमच्या अंगणाला जे फाटक होते त्याची पण एक मजा आहे. सुरवातीला मातीचे अंगण होते तेव्हा लाकडी फाटक होते. ते एका बाजूने बंद व एका बाजूने उघडे होते. जाता येता जो कोणी ते फाटक उघडून येईल तेव्हा ते लोटल्यावर तसेच सोडून द्यायचे तेव्हा ते दाणकन आपटायचे. लहान मुले तर सारखी ये जा करायची आणि सारखे आपटले जायचे. आई ओरडायची म्हणून मग लहान मुले मुद्दामुनच सारखी येजा करायची. नंतर जेव्हा सर्व अंगणात फरशी घातली तेव्हा दार बदलले आणि लोखंडी केले. त्याला बाहेरून व आतून दोन कड्या केल्या. बाहेरून आलेला सहज हाताने आतली कडी काढून दार उघडे आणि मग परत लावून घेत. या फाटकाची एक मजा म्हणजे वाऱ्याने याच्या कड्या हालायच्या. तेव्हा आमची चांगलीच फसगत व्हायची. कारण दार वाजले की आम्हाला समजायचे कोणीतरी आलेले आहे. आणि असेच वाऱ्याने जेव्हा आवाज येईल तेव्हा येऊन बघावे तर कोणीच नाही. मग ठरवले दार वाजले की लगेच बघायला जायचे नाही कोणी येणारे असेल तेव्हा तो आत येईलच की! अशा या गमतीजमती!


काही वर्षांनी मातीच्या अंगणात पूर्णपणे फरशा बसवून घेतल्या. त्यानंतर आणखीनच मजा यायची. सुट्टीत आम्ही सर्व भावंडे मिळून खूप मजा करायचो. अंगणातच सतरंज्या घालून जेवायचो. अंब्याचा भरपूर रस आणि पोळ्या. जेवणे झाली की गप्पा गोष्टी. मग भूताचा विषय. भूताच्या गोष्टी रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. फरश्यांचे अंगण झाल्यापासून चिमण्यांचा वावर खूप वाढला. पाऊस पडला की अंगणात पाणी साठायचे ते पिण्याकरता यायच्या. आणि हो आमच्या बागेत गोड गुंजेचा पाला होता. काही रानटी फुले होती, त्यांना आम्ही टणटणी म्हणायचो. विविध रंगांची अगदी बारीक फुले एकत्रित असे एक फूल असायचे. ही फुले पण त्यांच्या वेगळेपणाने लक्षात राहिली आहेत.

बागेची सर्व प्रकारची मजा आम्ही दोघी बहिणींनी अनुभवली आहे! अशी होती आमची बाग अशी आहे आमची बाग! आवडली का तुम्हांला? अभिप्राय जरूर कळवा!

******** ******* ******** *******

या लेखातील फुलांचे फोटो आहेत ते माझ्या मैत्रिणीने मला दिले आहेत. तिचे नाव लिना बगावडे. ही माझी ऑर्कुटवरील मैत्रिण. माझ्या माहेरच्या बागेबद्दल मी जे काही लिहिले आहे त्यामध्ये वरील सर्व फुलांची झाडे होती. लिनाकडील फुलांचे फोटो मी पाहत असे तेव्हा मला माझ्या बागेची खूप आठवण यायची म्हणून मी तिला ती फुले मला देशील का? असे विचारले व लगेचच तिने मला तिची फुले दिली!! मी लिना बगावडे हिची मनापासून खूप खूप आभारी आहे!!

लेखातील जाईचा वेल व केळीचे झाड आईबाबांच्या बागेतील आहेत. तेव्हा फोटो घेऊन ठेवले त्यामुळे बरे झाले. आज ते माझ्या आठवणीत व तुम्हाला चित्ररुपात दिसत आहेत. आईबाबा त्या घरात आता राहत नाहीत. ते घर त्यांनी विकले. पण आमच्या फॅमिली डॉक्टरांनीच ते विकत घेतल्याने बागेचा बराच भाग अजुनही तिथे आहे!

जाईची फुले मला माझ्या मैत्रिणीकडून मिळाली आहेत. तिचे नाव भाग्यश्री. धन्यवाद भाग्यश्री.

Thursday, November 06, 2008

जाई




जाई! जाई व जुई मधली एक! जुईला तसे मी खूप वेळा पाहिलेले नाही. क्वचित एक दोनदा पाहिले असेल आणि ती खूप नाजुक आहे इतकेच माझ्या लक्षात राहिले आहे. जाई मात्र डोळ्यात, मनात, आठवणीत अगदी तुडुंबपणे भरून राहिली आहे.



जाईचा वेल माझ्या बाबांनी अंगणात मोठ्या उत्साहाने लावला असेल त्यावेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी. माझ्या बहिणीचा जन्म व जाई अगदी बरोबरीच्या म्हणले तरी चालेल. जाईने आमच्या कुटुंबाला अगदी भरभरून दिले आहे. आम्ही दोघी बहिणी लहान होतो तेव्हापासून आठवत आहे आई आम्हाला जाईचे गजरे करून द्यायची. लहानपणी बॉबकट असल्याने आई आमच्या डोक्यावर हा जाईचा गजरा एखाद्या चक्राप्रमाणे बांधायची.



जाईचा विस्तार खूप मोठा होता. आमच्या घराचे छप्पर पत्र्याचे होते त्यामुळे अर्धा वेल पत्र्यावरच पसरलेला होता आणि अर्धा वेल अंगणातील मंडपावर होता. पावसाळ्यात जाईला खूप बहर यायचा, इतका की अंगणात पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा! शेजारच्या पाजारच्या बायका व मुली आमच्या अंगणात सडा वेचायला यायच्या. सर्व फुले वेचून झाली तरी काही वेळाने बघावे तर थोडीफार फुले पडलेलीच असायची. कधी जोराच्या वाऱ्याने पडायची तर कधी आपोआप गळून पडायची. सकाळी अभ्यास करताना एखादी नजर बाहेरच्या अंगणात गेली की अगदी त्याच वेळेला डोळ्यादेखत एखादे फूल पडलेले पाहिलेले आहे. आम्हा दोघी बहिणींना जाईच्या फांद्या हालवण्याचा नाद लागला होता, कारण फांद्या हालल्या की फुले पडायची आणि ती वेचायला खूपच मजा यायची.



शाळाकॉलेजात जाताना रोज जाईच्या टपोऱ्या फुलांचा गजरा! लांब केस असल्याने आई आमच्या दोघींची घट्ट पेडीच्या दोन वेण्या घालायची. एका वेणीवर खूप मोठा गजरा. त्याचे एक टोक वेणीच्या वरच्या पेडाला बांधायचे व एक टोक सर्वात खालच्या पेडाला. कधी उजव्या वेणीवर तर कधी डाव्या! त्यावेळेला डाव्या वेणीवर गजरा बांधायची फॅशन होती. काही वेळेला गजरा वेटोळा करून त्यात क्लिप अडकवून कानाच्या बाजूला ती क्लिप लावायचो तर कधी गजऱ्याचे दोन एकसारखे भाग करून मध्ये क्लिप लावून! शाळेला खूप उशीर होत असेल तर सेफ्टी पीनेमध्ये फुले ओवायची व ती वेणीच्या पेडात बांधायची.



दुपारचे शाळाकॉलेज असेल तर सकाळचा अभ्यास झाल्यावर स्टुलावर चढून फुले काढायचो. जी फुले काढेल तिने दुसरीला विचारायचे की तू घालणार आहेस का गजरा म्हणजे तुझी पण फुले काढते. शाळाकॉलेजातून संध्याकाळी घरी येईपर्यंत गजऱ्यातील काही फुले सुकून ती चॉकलेटी रंगाची दिसू लागायची. शनिवारचे सकाळी शाळाकॉलेज असायचे तेव्हा मात्र शुक्रवारी संध्याकाळीच कळ्यांचा गजरा करून तो ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवायचा, म्हणजे मग सकाळी उठल्यावर उमललेल्या फुलांचा गजरा तयार! आम्ही जसे आमच्यासाठी गजरे करायचो त्यात अजून एक गजरा प्लॅस्टीकच्या पिशवीत घेऊन जायचो, कधी आमच्या मैत्रिणींकरता तर कधी शाळेतल्या बाईंकरता.



रविवारी सुट्टीच्या दिवशी किंवा सणावारांच्या दिवशी जाईचे गजरे करण्याचा आम्हा दोघी बहिणींचा खूप मोठा कार्यक्रम असायचा. दुपारी जेवणे उरकली की आम्ही जाईच्या कळ्या काढायचो. टपोऱ्या गुलाबी रंगाच्या कळ्या मला अजूनही जशाच्या तश्या आठवत आहेत. आधी पत्र्यावर जाऊन कळ्या काढायचो. त्यात आमच्या मैत्रिणीपण असायच्या. आमच्याकडे काही ऍल्युमिनियमच्या व काही स्टीलच्या चाळण्या होत्या, काही टोपल्या पण होत्या. त्यामध्ये सर्व कळ्या व फुले काढायचो. खूप खूप कळ्या!! टोपल्यांमध्ये साठलेल्या भरगच्य गुलाबी रंगांच्या कळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे! कळ्या काढताना आई नेहमी ओरडयची, कळ्या काढा पण मुक्या कळ्यांना हात लावू नका. मुक्या कळ्या म्हणजे खूप बारीक कळ्या की ज्यांना उमलायला अजून बराच काळ आहे.



पत्र्यावरच्या कळ्या काढून झाल्या की मंडपावर पसरलेल्या वेलीवरच्या काढायच्या. जाईच्या अवाढव्य व अगणित फांद्या सगळीकडे फोफावल्या होत्या. बऱ्याच फांद्या अंगणाकडे झुकल्या होत्या. सहज हाताने पण त्यावरील कळ्या काढता यायच्या. मंडपावरील वेलावरच्या कळ्या आम्ही स्टुलावर उभे राहून काढायचो. स्टुलावर उभे राहून सुद्धा आम्हाला आमची पावले उंच करायला लागायची, इतका उंच वेल होता! मातीचे अंगण खडबडीत असल्याने स्टुलावर उभे राहिले की ते डुगडुगायचे! स्टुलावर उभे राहून डुगडुगणारे स्टूल एका जागी स्थिर झाले की मग वेलाकडे बघून नजरेत येतील इतक्या कळ्या एका हाताने तोडून त्या मग चाळणीत टाकायच्या. एकीने कळ्या काढायच्या व त्याच वेळी दुसरीने चाळणी घेऊन स्टुलाच्या बाजूला उभे रहायचे, असे आलटून पालटून. त्यातही आमची भांडणे " ए काय गं, किती काढतेस ग कळ्या! मला काढू देत ना थोड्यातरी! "अगं होना काढं की मग! ह्या बाजूच्या मी काढते तू दुसऱ्या बाजूच्या काढ." मग स्टूल एक्या जागेवरून दुसरीकडे न्यायचो. आमच्या शेजारच्या काही छोट्या मुली पण यायच्या, त्याना पण स्टुलावर उभे राहून फुले काढायची इच्छा असायची. पण आम्ही त्यांना ओरडायचो, तुम्ही अजून लहान आहात ना, स्टुलावर उभे राहून पडलात म्हणजे! त्यापेक्षा तुम्ही खाली पडलेली फुले वेचा.



सर्व कळ्या व फुले काढून झाल्यावर मग आई प्रत्येकाचे वाटे करायची. आमच्या मैत्रिणी पण खूप खुश व्हायच्या! कळ्या फुले काढून झाल्यावर नंतरचा कार्यक्रम म्हणजे देवांच्या तसवीरींना हार, आजीआजोबांच्या फोटोला हार, व आम्हाला गजरे. हार व गजरे करता करताच कळ्या हळूहळू उमलायला लागायच्या. अर्धवट उमललेल्या कळ्यांचे हार व गजरे तर इतके काही सुंदर दिसायचे ना!! गणपतीच्या दिवसात आमच्या घरच्या गणपतीला जाईच्या फुलांचा भरगच्च हार असायचा, त्यात अधूनमधून जास्वंदीचे लालचुटूक फूलही असायचे. आमच्या घरामध्ये जाईच्या सुगंधाचा नुसता घमघमाट असायचा!! रात्रीच्या जेवणानंतर अंगणात गप्पा मारायला बसायचो तेव्हा जाईच्या वेलीवरती अगणित फुले, जणू काही पांढऱ्या शुभ्र चांदण्याच!



अजूनही जाई आमच्या अंगणात आहे. पुढच्या भारतभेटीमध्ये डीजीकॅमने खूप खूप फोटो काढणार आहे मी जाईचे!!! त्या क्षणाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे!!!!!


जाईची फुले मला माझ्या मैत्रिणीकडून मिळाली आहेत. तिचे नाव भाग्यश्री. धन्यवाद भाग्यश्री.  जाईच्या गुलाबी कळ्या चिंतामणी पळसुले यांच्या बागेतल्या आहेत. धन्यवाद!