Thursday, September 07, 2023
Monday, July 24, 2023
२४ जुलै २०२३
मधुराणी तुला सांगू का, तुला पाहून चाफा पडेल फिका हे गाणे बऱ्याच वर्षांनी ऐकले आणि ते मी मोहिनी अंताक्षरीवर पाठवले. मोहिनीला पण हे गाणे आवडले आणि ती म्हणाली की तिने पण खूप दिवसांनी ऐकले. तिने लगेच २४ जुलैची थीम जुनी मराठी गाणी असे घोषित केले आणि माझे मन भूतकाळात निघून गेले. रेडिओवर हे गाणे लागायचे. हे गाणे आता माझ्या मनात ठिय्या देवून बसणार हे नक्की ! सुधीर फडके आणि आशा भोसले यांची जवळपास सर्वच द्वंद्व गीते सुंदर आहेत. गुगलमध्ये हे गाणे शोधले, युट्युबवरही पाहिले. ग. दि. माडगूळकरांनी शब्दांची सुरेख गुंफण केली आहे. अजून एक गाणे आहे तेही पूर्वी ऐकले नव्हते. ते गाणे आहे पैठणी बिलगून म्हणते मला जानकी वनवास ग संपला. पी सावळाराम यांनी हे गाणे लिहिले आहे. तर आजच्या मोहिनी अंताक्षरी मध्ये सदस्यांनी अशी अनेक जुनी गाणी म्हणली आणि त्यामुळेच आजचा दिवस छान गेला. संगीत हे टॉनिक आहे आणि ते आम्हां सर्वांना मोहिनी अंताक्षरी या ग्रुपमध्ये मिळते. गाणी आठवतात, बोल गुगल शोधात मिळतात. मग आठवतात ते पूर्वीचे दिवस. रेडिओवर प्रसारित होणारी गाणी. आपण सगळेच या रेडिओवर लागणारी गाणी ऐकत मोठे झालो.
मला ही जुनी गाणी आवडतात.
१. मधुराणि तुला सांगू का तुला पाहून चाफा पडेल फिका
२. पैठणी बिलगुन म्हणते मला जानकी वनवास ग संपला
३. असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खूपसून मरवा
४. माझ्या रे प्रिती फुला ठेऊ मी कोठे तुला
५. पाय नका वाजवू कुणीही पाय नका वाजवू
६. त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे
७. कशी करू स्वागता एकांताचा आरंभ कैसा असते कशी सांगता
८. तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
९. रात्र काळी घागर काळी
१०. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची
११. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
१२. आज चांदणे उन्हात हासले तुझ्यामुळे
१३. खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
१४. तुझी प्रीत आज कशी स्मरू
१५. नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
१६. झाला साखरपुडा ग बाई थाटाचा रुणुझुणु चुडा हाती गाईल ग
१७. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते
१८. परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?
१९. पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरण दर्यावरी
२०. अंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला
२१. धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
Wednesday, July 19, 2023
ये सर्कस है शो तीन घंटे का
ए भाई
Tuesday, July 04, 2023
4th July 2023
Sunday, July 02, 2023
प्रवाहातील साळुंका
सकाळी रोजच्याप्रमाणे फिरण्यास निघालो. गावाबाहेर पाऊलवाटेने जात असता एका झाडाखाली एक गृहस्थ खोडाला टेकून बसले होते. गेले कित्येक दिवस मी त्यांना त्या झाडाखाली पहात होतो. आज जरा धीर करून त्यांच्या जवळील एका मोठ्या दगडावर बसलो. त्या गृहस्थांचे माझ्याकडे लक्ष नव्हते. मी त्यांना विचारले "बाबा तुम्ही नेहमी सकाळी इथे बसलेले असता. ध्यानासाठी इथे बसता का?आपले घर इथे जवळपासच आहे का? त्यावर स्मित हास्य करून ते उद्गारले, "जरा स्वास्थ्य मिळावं म्हणून इथे बसतो. गर्दी नको वाटते. प्रत्येक माणसाची आपल्याजवळ एकेक अपेक्षा असते. जास्त माणसे म्हणजे जास्त अपेक्षा, तितक्या उपाधी, तेव्हढा मनस्ताप. संपर्क कमी करण्यासाठी इथे येतो. दुसऱ्याने कसे वागावे हे तुम्ही सांगायला गेलात की...... आपण रोज देवदर्शनास देवळात जाता ना? हो, जातो ना. देवाच्या मूर्तीला नमस्कार करून येतो. मात्र मी माझ्यातच देव पाहतो. दोन माणसे एकमेकांशी बोलतात. ती दोघेही देवस्वरूपच असतात. मागणारे देवळात जातात. आपल्या खिशातील चिल्लर पहातात. त्यातील दहा पैसे मोठ्या कष्टाने देवासमोर ठेवतात आणि देवाकडून धनाची अपेक्षा करतात. आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करतात. जे अपेक्षा करीत नाहीत ते लांबून सूर्यकिरणांनी चकाकणारा कळस पहातात. त्याचे अगाध ऐश्वर्य मनाच्या गाभ्यात साठवून तृप्त होतात. त्यांच्या जीवनातील मागण्या संपलेल्या असतात. तेच खऱ्या अर्थाने सम्राट.
जे श्रीमंत पैशाची हाव धरून मागतच रहातात ते सर्व खरेच भिकारी असतात. या उलट त्यागाने आपल्या जवळील सर्व काही दुसऱ्याला देतात असा समाधानी जगाचा खरा स्वामी असतो. त्याला परमेश्वराच्या प्रेमाची कृपेची खात्री असते. परमेश्वरावरील श्रद्धेने तो ओतप्रोत भरलेला असतो. खरे आनंदी जीवन जगत असतो. गर्दी नको वाटते मग मुलांचा दंगा कसा सहन करता? अरे, मुले खेळताना पाहतो. मनही लहान बालक होते. त्याच्या बरोबर हिरवळीत लोळू लागते. त्यांच्याबरोबर धावताना घाम फुटतो. शिणलेल्या अवयवांचा विसर पडतो आणि अजूनही पुष्कळ आयुष्य उरलं आहे असं वाटत मी इथे बसतो. मनाप्रमाणे शरीरही तरूण होऊन धावते. असे उत्साही जीवन मी रोज अनुभवतो. त्यामुळे मनात काळजी, चिंता मुळी उत्पन्नच होत नाहीत. सायंकाळी घरी आल्यावर एखादे फळ खातो. एक ग्लास भरून दूध पितो. अंगणात थोडावेळ खुर्चीत बसतो. घरातील सर्वजण जेवणात, गप्पात दंग असतात. थोड्यावेळाने बिछान्यावर अंग टाकतो. झोप कधी लागते ते कळतही नाही. पहाटे औंदुबरावर कोकिळेने पंचम लावलेला असतो. तो ऐकूनच जाग येते.
उठून पहातो तर नातीनं गरम चहा आणलेला असतो. चहा घेऊन झाल्यावर सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेत बसतो. जीवनत मी दगड गोटे जमवीत बसलो नाही. माणसांची आनंदी मने जवळ करीत राहिलो. माझ्या मालकीचे घर नाही. मात्र आजुबाजूची बालमने, टेकडीवरून खाली कोसळणारे पाण्याचे ओहोळ पाहतो. मजवर तूफान प्रेम करणारी माणसे हीच माझी संपत्ती. तुम्ही सुखी आहात? " हो नक्कीच" मजवर संकटे आली पण माझ्याजवळील समाधानांच्या गोधडीखाली ती गुदमरली व मला न सांगताच मला सोडून गेलेली मी जाताना पाहिली. पण केव्हा कोण मन:स्ताप देईल हे सांगता येत नाही. एखादा अनोळखी माणूस रस्त्यात भेटतो आणि त्याच्याशी विनाकारण आपला तंटा होतो, तर काही वेळा एखादी अनोळखी व्यक्ती सहज भेटते व आपल्याला मदत करते. आनंद देवून जाते. या दोन्ही वेळा आपण अलिप्ततेने त्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे. अश्या वेळी मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे स्थितप्रज्ञाची ओळख होते. मन शांत रहाते. संपूर्ण समाधान मिळते आणि हो ! न मागे तयाची रमा होय दासी याचा प्रत्यय येतो.
लेखक : निळकंठ बाळकृष्ण घाटे (माझे बाबा)
Sunday, June 18, 2023
Happy Father's Day - 18th June 2023
आज फादर्स डे च्या निमित्ताने बाबांनी लिहिलेले सर्व मी माझ्या ब्लॉगवर टंकणार आहे. बाबा लहान मुलांना व मोठ्या माणसांना गोष्टी सांगत. गोष्ट सांगण्याची कला बाबांना अवगत होती. गोष्टी सांगणे, गायन, कुंडली बघून भविष्य सांगणे, पेटी वाजवणे, चित्रकला, रांगोळ्या काढणे, फोटोग्राफी अशा एक ना अनेक कला बाबांच्याकडे होत्या. बाबांनी डबलरोल फोटो काढण्याचे पण प्रयत्न केले. खूप प्रेमळ होते बाबा. त्यांना अनेक कविता तोंडपाठ होत्या. वर्तमानपत्रात किंवा मासिकात जे जे काही चांगले असेल त्याची कात्रणे कापून ती त्यांनी वहीत चिकटवून ठेवली आहेत. बाबांनी त्यांच्या सुवाच्य अक्षरात आमच्या लहानपणी सांगितलेल्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. बाबा जेव्हा गोष्ट सांगत तेव्हा लहान मुले व मोठी माणसेही अगदी तल्लीन होउन जात. बाबा तुम्ही आज या जगात नाही, पण आमच्या आठवणीत क्षणोक्षणी आहात. तुमचे आशीर्वाद आणि संस्कार आमच्या उर्वरीत आयुष्यात आम्हाला साथ करतील हे नक्कीच ! Miss you baba
Monday, June 12, 2023
आम्ही दोघी मैत्रिणी
Friday, June 02, 2023
मी आणि माझी नोकरी... (2) Prav Electrospark Pvt. Ltd.
पुणे-सातारा रस्त्यावर प्राव्ह कंपनीचे एक दुसरे सेल्स ऑफीस होते. तिथे फायलिंग क्लार्कची एक जागा होती. माझी मैत्रिण ज्योत्सना माझ्याबरोबर कॉलेजमध्ये शिकत होती. तिला या व्हेकन्सी बद्दल सांगितले आणि तिने तिथे अर्ज केल्यावर तिलाही नोकरी लागली. ज्योत्सना आणि कल्पना सहस्त्रबुद्धे या दोघी नेहमी बरोबर असायच्या. कल्पनाचे घर आर्यभुषणला होते. तिच्याकडे मी आणि ज्योत्सना अधुन मधून जायचो माझी नोकरी सुरू होण्या आधी. माझे ६ महिन्याचे प्रोबेशन संपले पण मी त्या कंपनीत कायम झाले नाही. माझे प्रोबेशन परत ३ महिन्यांनी वाढल्याचे पत्र मला मिळाले. हे असे का झाले माहीत नाही.
आणि मला कुणाला विचारावे असे सुद्धा वाटले नाही. टेलिफोन ऑपरेटर रोहिणी साऊथ इंडियन होती, उंच आणि सावळी. ती नाकात चमकी घालायची. तिच्या जागी फडके नावाची मुलगी आली. फोन वरून तिच्या खूप ओळखी झाल्या होत्या. ती म्हणाली की तू राजीनामा दे. मी तुला एका ओळख झालेल्या माणसाकडे घेऊन जाते. तो लोकांना नोकऱ्या देतो. माझे मनच उडाले होते प्राव्ह कंपनीवरचे. तसे तर दमणूक पण खूप व्हायची. कामही खूप होते. कदाचित मी कॉलेज मध्ये काही वेळा जायचे ट्युटोरिअल असल्यामुळे. तसे तर मी सांगूनच जात होते. कधी मला बरे नसायचे म्हणून एखाद दिवस कामावर दांडी होत होती. प्रोबेशन वाढवण्याचे नक्की काय कारण होते ते कळाले नाही. मी थोडे दिवस गेले आणि नंतर गेलेच नाही.
फडके म्हणाली की माझ्याबरोबर चल. तिने तिच्या घराचा पत्ता दिला. ती शनवारात राहात होती एका वाड्यात. मी तिच्याकडे गेले. तिने चहा पोहे केले होते माझ्यासाठी. तिथून आम्ही भांडारकर रस्त्यावरच्या एका बंगल्यात गेलो. तिथे प्रदीप दळवी नावाचे गृहस्थ रहात होते. त्यांना पाहून मला धक्काच बसला. ते कॉटवर पालथे झोपले होते आणि त्यांना पाय नव्हते. त्यांचा भयानक रित्या अपघात झाला होता. गोरेपान आणि तब्येतीने पण चांगले होते. त्यांचा चेहरा हसतमुख होता. त्यांच्यासमोर गादीवरच एक फोन होता. पूर्वीचा काळा फोन. त्यावरून त्याने एक -दोन जणांना फोन केले. त्यांनी माझी माहिती विचारली. ते म्हणाले एक नाहीतर दुसरी नोकरी. काळजी करू नकोस. त्यांनी विचारले तू काय घेणार चहा की कॉफी? त्यांच्या आईला त्यांनी बोलावले आणि म्हणाले ही बघ रोहिणी. हिला मी एक चांगली नोकरी मिळवून देणार आहे. मला म्हणाले माझे दिवसभर हेच काम चालू असते. लोकांना नोकरी मिळवून देणे. नंतर मी व फड्के आम्ही दोघींनी चहा घेतला. त्यांच्या आईने सांगितले. बघ ना, हा माझा एकुलता एक मुलगा. चांगल्या कंपनीत नोकरी होती पण या अपघातानंतर सर्व संपले. तिथे एक मुलगी होती. त्यांच्या आईने आम्हाला तिची ओळख करून दिली. ती मुलगी त्या गृहस्थांशी लग्न करणार होती. नंतर ती निघाली. त्यांची आई म्हणाली की बघ ना हा इतका मोठा बंगला माझ्यानंतर कोण सांभाळणार? या मुलीला आम्ही सर्व परिस्थिती सांगितली आणि ती लग्नाला तयार झाली.
प्रदीप दळवी यांनी मला जोशी यांचा फोन दिला. Arya Consultants कंपनीत जा आणि भेट. ही त्यांचीच कंपनी आहे असे सांगितले. कर्वे रस्त्यावर आर्याचे एक ऑफीस होते आणि पर्वती पायथ्याशी त्यांचे दुसरे ऑफीस होते. मी कर्वे रस्त्यावरच्या ऑफीसमध्ये गेले. हे ऑफीस मला खूप आवडले. तिथे ज्योत्सनावझे बाई होत्या. घाऱ्या गोऱ्या ! जोशी यांनी मला एका इंग्रजी मासिकातला एक परिच्छेद टंकायला सांगितला. मी तो टंकला आणि दाखवला. ते म्हणाले तुमचे टायपिंग चांगले आहे. एकही चूक नाहीये. तुम्ही कामावर रूजू होऊ शकता. फक्त एकच आहे की माझा व्यवसाय नवीनच आहे त्यामुळे मला ६०० रूपये पगार तुम्हाला देता येणार नाही. मी ४०० रूपये देऊ शकतो. माझा प्राव्ह मधला पगार ६०० होता. त्यांनी सांगितले की कामात प्रगती दिसली की ४०० वरून तुमचा पगार वाढेल. मी म्हणाले की मी विचार करून कळवते. त्याप्रमाणे मी कळवले की मला पगार मंजूर आहे.
जेव्हा मला टायपिंग करायला सांगितले तेव्हा मी स्पिड मध्ये टाईप केले नाही. आम्हाला क्लास मध्ये शिकवले होते की टाईप करताना जर चुका झाल्या तर तुमच्या स्पीड ला काहीही अर्थ नाही. जेव्हा परिक्षा होते तेव्हा मिनिटे-स्पीड-चुका या सर्वाचा विचार केला जातो. मी फडके हिचे खूप आभार मानले. नंतर काही दिवसांनी कळाले की प्रदीप दळवी गेले. प्राव्ह नंतर माझी आर्या कंन्स्लटंट मध्ये नोकरी सुरू झाली पर्वती पायथाच्या ऑफीसमध्ये. नंतर एक दिवस मला प्राव्ह इलेक्ट्रोस्पार्क प्रा. ली. चा १००० रूपयांचा चेक मिळाला. मला खूप आनंद झाला. तो बोनस होता. मी कामावर नसले तरी त्या वर्षाचा बोनस मला मिळाला होता Rohinigore
क्रमश : ...
Tuesday, May 23, 2023
मी आणि माझी नोकरी... (1) Prav Electrospark Pvt. Ltd.
Thursday, March 23, 2023
२३ मार्च २०२३
आज मला रोजनिशीची आठवण झाली आणि म्हणूनच आजचा दिवस कसा गेला ते लिहीत आहे. काहीतरी वेगळे घडले की मी त्या दिवसाची आठवण म्हणून रोजनिशी लिहिते. आजचा दिवस असाच वेगळा आहे. खरे तर आज काहीच घडले नाही. आज माझ्या मनाची स्थिती स्थितप्रज्ञासारखी होती. सकाळी नेहमीप्रमाणे उठून रूटीन सुरू झाले.साधारण २०१५ सालापासून मी रात्रीचा स्वयंपाक आणि दुसऱ्या दिवशीचा विनायकचा डबा आणि माझे जेवण असाच करते. कालची भाजी न उरल्याने आज पिठले करायचे ठरवले व तसे केलेही. छान पळीवाढे पिठले झाले. त्यात लसूण, कांदा, मिरची, लाल तिखट व धनेजिरे पूड, कढिपत्ता असे नेहमीप्रमाणे घातले. चव तर छानच होती. पिठले झाल्यावर मी नेहमीच लगच्यालगेच पानात वाढून घेते आणि पोळीबरोबर खाते.
तिखट आणि गरम असे मिश्रण पोळीबरोबर खाल्ले की ताजेतवाने वाटते पण तसे आज झाले नाही. जेवल्यावर लॅपटॉपवर काही वाचत होते. वाचता वाचता खूप अंधारून आले. अंधारून आल्यावर मी काही ओळी लिहिल्या आणि त्या डिटीटही केल्या. एक लेख लिहायला सुरवातही केली. वाक्ये पण कशी छान जुळून आली होती मनात. अशी छान वाक्ये जुळून आल्याशिवाय मी कोणताही लेख लिहीत नाही. लिहायला सुरवात केली. थोडेफार लिहिले आणि परत तेही डिलीट केले.
आज जो लेख मी लिहिणार होते तो लेख मी पूर्वीच लिहिणार होते. पूर्वीच्या वहीत कदाचित थोडा लिहिला होता असे आठवतयं पण का कोण जाणे आज कशालाच मुहूर्त लागत नव्हता. मनाची स्थिती अशीच दिवसभर राहिली. दुपारी गुगल मध्ये जाऊन काही मराठी पिडिएफ फाईल्स वाचल्या. त्या छानच होत्या पण तरीही मन उत्साही झाले नाही. संध्याकाळी भूक पण लागली नाही. थोडेसे फरसाण खाल्ले. चहा बिस्किटे खाल्ली. दिवस संपतही आलाय. आता थोड्यावेळाने जेवण करू आम्ही दोघेजण.
थोडेसे उदास वाटतयं पण तरीही इतके नाही. काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीयेत. तसे म्हणायला गेले तर आजचा दिवस तसा वेगळाच म्हणायला हवा. ब्लॉगवर जेव्हा आजची रोजनिशी टंकायला गेले तर लेबल्स मध्ये पाहिले. २०११ सालापासून मी रोजनिशी लिहित आहे. प्रत्येक वर्षीच्या काही रोजनिश्या लिहिलेल्या दिसल्या. खंड मात्र एकाही वर्षाचा नाही. प्रत्येक वर्षी कधी २ दिवसांच्या रोजनिशा तर कधी ५ किंवा १० तर कधी एकच. यावर्षीचे आजचे पान पहिलेच रोजनिशीमधले.
Friday, March 03, 2023
रुखवत
मध्यंतरी मी माझीच जीमेल पहात होते आणि मागच्या आलेल्या किंवा मी पाठवलेल्या मेल्स पहाताना मला असेच काहीतरी छान मिळून गेले होते आणि ते फेबुवर पोस्ट पण केले होते. तसेच काहीवेळा काही निमित्ताने मी अल्बम पहाते आणि फोटो पाहून भूतकाळात जाते. तोच एक भूतकाळ इथे लिहीत आहे. पूर्वी जेव्हा कृष्ण धवल फोटोचा जमाना होता त्यावेळेला लग्नामध्ये रुखवत ठेवणे आणि ते लग्नात आलेल्या पाहुण्यांनी पहाणे हे एक आकर्षण होते. अर्थात आम्हा दोघी बहिणींचे लग्नातले फोटो रंगीत आहेत. आणि या फोटोत एक फोटो विशेष असायचा तो म्हणजे नवरी मुलगी नवऱ्या मुलाला रुखवत दाखवत आहे. मी पण इथे अल्बम घेतलेले आहेत. जेव्हा साध्या कॅमेराने फोटो काढायला सुरवात केली तेव्हा अल्बम मध्ये फोटो लावण्याकरता मी ३ डॉलरचा एक अल्बम विकत घेतला होता. त्यानंतर आमच्या एका कुटुंब मित्राने एक अल्बम भेट म्हणून दिला जेव्हा आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणार होतो तेव्हा. त्यानंतर आत्ता पण मी एक अल्बम विकत घेतला आहे. आईबाबांकडचे कृष्ण धवल पूर्वीचे फोटोज मी त्यात लावले आहेत.
माझ्या लग्नाच्या रुखवतात काही स्टीलची भांडी होती. काही बदाम-काजूच्या वड्या होत्या. माझ्या भाच्याने पेंट केलेला एक गणपती होता आणि मुख्य म्हणजे नाडी वर्क पडदा होता. आमच्या मैत्रिणीने नुकताच एक पडदा केला होता आणि तो आम्हाला इतका आवडला की लगेचच आम्ही दोघी बहिणी तुळशीबागेत गेलो. पडद्याचे कापड घेतले आणि त्यावर वेलबुट्टीचा एक छाप छापून घेतला आणि दोघींनी मिळून हा नाडीवर्क पडदा केला.हा पडदा इतका छान दिसतो की त्यावरच्या पांढऱ्याशुभ्र पाकळ्या खऱ्याखुऱ्या वाटतात. लग्नानंतर आम्ही दोघे आयायटी वसतिगृहात रहायला लागलो. तिथे हा पडदा मी दाराला लावला होता. या पडद्याचे खूप कौतुक झाले. गणपतीची फ्रेम मी एका खोलीत लावली होती. रुखवतात ठेवलेल्या स्टीलच्या कळशी आणि बादली मध्ये मी पिण्याचे पाणी भरून ठेवायचे.
पूर्वी लग्नात नातेवाईक किंवा येणारे पाहुणे लग्न लागले की रुखवत बघायचे आणि रुखवतात ठेवलेल्या गोष्टींचे कौतुक करायचे. त्यातून एखादी बहीण पुढे यायची आणि रुखवतात कोणी काय काय केले ते पण सांगायची. सप्तपदीत काही जण खूप छान छान लिहायचे. मावश्या, आत्या, बहिणी यांनी काही ना काही केलेले असायचे रुखवतात. त्यानिमित्ताने त्यांच्या कलाकुसरीला वाव मिळत असे. अशी ही रुखवताची स्टोरी आहे.

















































