Sunday, July 02, 2023

प्रवाहातील साळुंका

 सकाळी रोजच्याप्रमाणे फिरण्यास निघालो. गावाबाहेर पाऊलवाटेने जात असता एका झाडाखाली एक गृहस्थ खोडाला टेकून बसले होते. गेले कित्येक दिवस मी त्यांना त्या झाडाखाली पहात होतो. आज जरा धीर करून त्यांच्या जवळील एका मोठ्या दगडावर बसलो. त्या गृहस्थांचे माझ्याकडे लक्ष नव्हते. मी त्यांना विचारले "बाबा तुम्ही नेहमी सकाळी इथे बसलेले असता. ध्यानासाठी इथे बसता का?आपले घर इथे जवळपासच आहे का? त्यावर स्मित हास्य करून ते उद्गारले, "जरा स्वास्थ्य मिळावं म्हणून इथे बसतो. गर्दी नको वाटते. प्रत्येक माणसाची आपल्याजवळ एकेक अपेक्षा असते. जास्त माणसे म्हणजे जास्त अपेक्षा, तितक्या उपाधी, तेव्हढा मनस्ताप. संपर्क कमी करण्यासाठी इथे येतो. दुसऱ्याने कसे वागावे हे तुम्ही सांगायला गेलात की...... आपण रोज देवदर्शनास देवळात जाता ना? हो, जातो ना. देवाच्या मूर्तीला नमस्कार करून येतो. मात्र मी माझ्यातच देव पाहतो. दोन माणसे एकमेकांशी बोलतात. ती दोघेही देवस्वरूपच असतात. मागणारे देवळात जातात. आपल्या खिशातील चिल्लर पहातात. त्यातील दहा पैसे मोठ्या कष्टाने  देवासमोर ठेवतात आणि देवाकडून धनाची अपेक्षा करतात. आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करतात. जे अपेक्षा करीत नाहीत ते लांबून सूर्यकिरणांनी चकाकणारा कळस पहातात. त्याचे अगाध ऐश्वर्य मनाच्या गाभ्यात साठवून तृप्त होतात. त्यांच्या जीवनातील मागण्या संपलेल्या असतात. तेच खऱ्या अर्थाने सम्राट.

जे  श्रीमंत पैशाची हाव धरून मागतच रहातात ते सर्व खरेच भिकारी असतात. या उलट त्यागाने आपल्या जवळील सर्व काही दुसऱ्याला देतात असा समाधानी जगाचा खरा स्वामी असतो. त्याला परमेश्वराच्या प्रेमाची कृपेची खात्री असते. परमेश्वरावरील श्रद्धेने तो ओतप्रोत भरलेला असतो. खरे आनंदी जीवन जगत असतो. गर्दी नको वाटते मग मुलांचा दंगा कसा सहन करता? अरे, मुले खेळताना पाहतो. मनही लहान बालक होते. त्याच्या बरोबर हिरवळीत लोळू लागते. त्यांच्याबरोबर धावताना घाम फुटतो. शिणलेल्या अवयवांचा विसर पडतो आणि अजूनही पुष्कळ आयुष्य उरलं आहे असं वाटत मी इथे बसतो. मनाप्रमाणे शरीरही तरूण होऊन धावते. असे उत्साही जीवन मी रोज अनुभवतो. त्यामुळे मनात काळजी, चिंता मुळी उत्पन्नच होत नाहीत. सायंकाळी घरी आल्यावर एखादे फळ खातो. एक ग्लास भरून दूध पितो. अंगणात थोडावेळ खुर्चीत बसतो. घरातील सर्वजण जेवणात, गप्पात दंग असतात. थोड्यावेळाने बिछान्यावर अंग टाकतो. झोप कधी लागते ते कळतही नाही. पहाटे औंदुबरावर कोकिळेने पंचम लावलेला असतो. तो ऐकूनच जाग येते. 

उठून पहातो तर नातीनं गरम चहा आणलेला असतो. चहा घेऊन झाल्यावर सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेत बसतो. जीवनत मी दगड गोटे जमवीत बसलो नाही. माणसांची आनंदी मने जवळ करीत राहिलो. माझ्या मालकीचे घर नाही. मात्र आजुबाजूची बालमने, टेकडीवरून खाली कोसळणारे पाण्याचे ओहोळ पाहतो. मजवर तूफान प्रेम करणारी माणसे हीच माझी संपत्ती. तुम्ही सुखी आहात? " हो नक्कीच" मजवर संकटे आली पण माझ्याजवळील समाधानांच्या गोधडीखाली ती गुदमरली व मला न सांगताच मला सोडून गेलेली मी जाताना पाहिली. पण केव्हा कोण मन:स्ताप देईल हे सांगता येत नाही. एखादा अनोळखी माणूस रस्त्यात भेटतो आणि त्याच्याशी विनाकारण आपला तंटा होतो, तर काही वेळा एखादी अनोळखी व्यक्ती सहज भेटते व आपल्याला मदत करते. आनंद देवून जाते. या दोन्ही वेळा आपण अलिप्ततेने त्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे. अश्या वेळी मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे स्थितप्रज्ञाची ओळख होते. मन शांत रहाते. संपूर्ण समाधान मिळते आणि हो ! न मागे तयाची रमा होय दासी याचा प्रत्यय येतो.  

लेखक : निळकंठ बाळकृष्ण घाटे (माझे बाबा) 

 

 

No comments: