Friday, March 03, 2023

रुखवत

 मध्यंतरी मी माझीच जीमेल पहात होते आणि मागच्या आलेल्या किंवा मी पाठवलेल्या मेल्स पहाताना मला असेच काहीतरी छान मिळून गेले होते आणि ते फेबुवर पोस्ट पण केले होते. तसेच काहीवेळा काही निमित्ताने मी अल्बम पहाते आणि फोटो पाहून भूतकाळात जाते. तोच एक भूतकाळ इथे लिहीत आहे. पूर्वी जेव्हा कृष्ण धवल फोटोचा जमाना होता त्यावेळेला लग्नामध्ये रुखवत ठेवणे आणि ते लग्नात आलेल्या पाहुण्यांनी पहाणे हे एक आकर्षण होते. अर्थात आम्हा दोघी बहिणींचे लग्नातले फोटो रंगीत आहेत. आणि या फोटोत एक फोटो विशेष असायचा तो म्हणजे नवरी मुलगी नवऱ्या मुलाला रुखवत दाखवत आहे. मी पण इथे अल्बम घेतलेले आहेत. जेव्हा साध्या कॅमेराने फोटो काढायला सुरवात केली तेव्हा अल्बम मध्ये फोटो लावण्याकरता मी ३ डॉलरचा एक अल्बम विकत घेतला होता. त्यानंतर आमच्या एका कुटुंब मित्राने एक अल्बम भेट म्हणून दिला जेव्हा आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणार होतो तेव्हा. त्यानंतर आत्ता पण मी एक अल्बम विकत घेतला आहे. आईबाबांकडचे कृष्ण धवल पूर्वीचे फोटोज मी त्यात लावले आहेत.

माझ्या लग्नाच्या रुखवतात काही स्टीलची भांडी होती. काही बदाम-काजूच्या वड्या होत्या. माझ्या भाच्याने पेंट केलेला एक गणपती होता आणि मुख्य म्हणजे नाडी वर्क पडदा होता. आमच्या मैत्रिणीने नुकताच एक पडदा केला होता आणि तो आम्हाला इतका आवडला की लगेचच आम्ही दोघी बहिणी तुळशीबागेत गेलो. पडद्याचे कापड घेतले आणि त्यावर वेलबुट्टीचा एक छाप छापून घेतला आणि दोघींनी मिळून हा नाडीवर्क पडदा केला.हा पडदा इतका छान दिसतो की त्यावरच्या पांढऱ्याशुभ्र पाकळ्या खऱ्याखुऱ्या वाटतात. लग्नानंतर आम्ही दोघे आयायटी वसतिगृहात रहायला लागलो. तिथे हा पडदा मी दाराला लावला होता. या पडद्याचे खूप कौतुक झाले. गणपतीची फ्रेम मी एका खोलीत लावली होती. रुखवतात ठेवलेल्या स्टीलच्या कळशी आणि बादली मध्ये मी पिण्याचे पाणी भरून ठेवायचे.

पूर्वी लग्नात नातेवाईक किंवा येणारे पाहुणे लग्न लागले की रुखवत बघायचे आणि रुखवतात ठेवलेल्या गोष्टींचे कौतुक करायचे. त्यातून एखादी बहीण पुढे यायची आणि रुखवतात कोणी काय काय केले ते पण सांगायची. सप्तपदीत काही जण खूप छान छान लिहायचे. मावश्या, आत्या, बहिणी यांनी काही ना काही केलेले असायचे रुखवतात. त्यानिमित्ताने त्यांच्या कलाकुसरीला वाव मिळत असे. अशी ही रुखवताची स्टोरी आहे.
 

No comments: