Tuesday, July 04, 2023

4th July 2023

शेवटी मुहूर्त लागला ! आमच्या घरापासून १० मिनिटे चालले की एडिसन रेल्वे स्टेशन आहे. घोकत होतो जायचे जायचे ! ४ जुलै च्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिना निमित्त जायचा मुहूर्त लागला विनायकला ऑफीसला सुट्टी होती म्हणून. मला रेल्वेने प्रवास करायला प्रचंड आवडतो. विनु डोंबिवलीवरून अंधेरीला रेल्वे+ बसने जायचा त्यालाही आता बरीच वर्ष लोटली. रेल्वेच्या तिकिटाची आणि एकूणच सगळी माहिती वाचली. ऍप पण डा ऊन लोड केला आणि ऍप वरच तिकिटे काढून निघालो. एडिसन पासून न्युयॉर्क पेन स्टेशन कडे आणि विरूद्ध दिशेला ट्रेंटन (Trenton)कडे ही लोकल धावते. दर अर्ध्या तासाला ट्रेन असतात. हवा पण छान ढगाळ होती. ट्रेन मध्ये कंटक्टरने आमच्या फोनवरची तिकिटे बघितली आणि शिवाय त्याने एक तिकिट पंच करून आम्हाला दिले. शेवटच्या स्टेशनला उतरलो. एडिसन ते न्युयॉर्क ला इथली बरीच भारतीय मंडळी रेल्वेने ऑफीसला जातात म्हणजे तिकडले डोंबिवली ते व्हि.टी. 
 
 
इथले शेवटचे स्टेशन आले ते एका अंधाऱ्या प्लॅटफॉर्म वरून आम्ही उतरलो व सरकत्या जिन्याने वर आलो आणि स्टेशनच्या बाहेर पडलो. १० ला निघालो ते आधी चालत एडिसन स्टेशन व नंतर साधारण पाऊण तासाने न्युयॉर्कला पोहोचलो. चालायला सुरवात केली पण त्या आधी पिझ्झा खाल्ला. आम्ही हल्ली पिझ्झाचा एकच स्लाईस खातो. डाएट कोक घेतला. तो ही एक पुरतो. कोक पिऊन पोट तुडुंभ भरते. पिझ्झा इतका काही छान होता की त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. इतकी भरगच्च टॉपिंगही पहिल्यांदाच पाहिली. एक स्लाईस होता त्यात पालक आणि मशरूम होते. दुसऱ्या स्लाईस वर टोमॅटो, कांदा, ब्रोकोली, सिमला मिरची, ब्लॅक ऑलिव्ह्ज होते. पिझ्झा खाल्यावर रेंगाळत रेंगाळत चालायला लागतो ते तीन तास !
 
 
३१ साव्या रस्त्यापासून चालायला सुरवात केली ते वळलो ८ व्या ऍव्हेन्युला मग तिथुन परत उजवीकडे वळलो ते साधारण ५० साव्या रस्त्याला लागलो. तिथून परत उजवीकडे वळलो ते ७ व्या ऍव्हेन्युला वळलो आणि रेल्वे स्टेशन पर्यंत आलो. तिकिटे मात्र तिकडून येताना तिकिट विंडोवरून काढली. ८ नंबरच्या ट्रॅकवरून गाडी निघाली ट्रेंटन कडे जायला. इथेही आम्ही एका दरवाज्यातून आत गेलो व सरकत्या जिन्याने वर गेलो. गाडी लागलेलीच होती.
न्युयॉर्कला आम्ही अंदाजे 2 मैल चाललो असु. दरम्यान आईस्क्रीम खाल्ले म्हणून चालायला हुशारी आली. एकच कप दोघांत, तोही लहान. दुकानाच्या बाहेरच्या बाजूला एक बाकडे होते. तिथे बसून आईस्क्रीम खाल्ले. या ब्रॅंडचे आईस्क्रीम खायलाही आजच मुहूर्त लागला. Ben ad Jerry's (Cherry Garcia ) हा फ्लेवर खूपच मस्त आहे. आईस्क्रीम मध्ये चेरी आणि चॉकलेटच्या छोट्या चिप्स होत्या.
 
 
रस्त्यावरची विक्री, टॅक्सी स्टॅंड, सायकल स्टॅंड, चालणारी माणसे, एकीकडे वाहने, असे मुंबई मधले किंवा पुण्यातले लक्ष्मी रोडवरचे चित्र इथेही पाहून मन प्रसन्न झाले. कोणत्याही दुकानात जा, खरेदी करा, बाहेर या, कोणत्याही उपाहारगृहात जा, तिथे खा, प्या, परत चालत सुटा. फक्त इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला टोलेजंग इमारती आहेत. या इमारतींकडे बघितले की वर बघताना तोल जातो ! इतक्या उंच आहेत की जणू आभाळाला टेकल्यात. चालताना अधून मधून ऊन होते आणि सावलीही होती. हवेत प्रचंड आर्द्रता होती. टोपी घातली तरी डोके खूपच सणकत आहे. चालून पायांचे तुकडे पडलेत. असा एक आगळावेगळा दिवस आज पार पडला ! वेगळेपणाने मनालाही हुरूप आला. ट्रेन मधून उतरल्यापासून ते ट्रेन मध्ये परत बसे पर्यंत आम्ही साधारण ३ तास चालत होतो. Rohini Gore

























No comments: