Friday, April 23, 2021

अमेरिकेतील फर्निचरच्या कहाण्या... (२)

 

क्लेम्सनला आलो २००२ सालामध्ये. सुरवातीला बरीच नाचानाची झाली. विमानाने आलो मध्यरात्री. थेट उड्डाण चुकले म्हणुन उशीर झाला. नशिबाने लगेच दुसरी फ्लाइट मिळाली पण ती अर्थातच थेट नव्हती. प्रोफेसर डीटर यांनी आमच्या एका रात्रिचे मोटेल मध्ये बुकींग केले होते. त्यांना आंसरिंग मशीनवर निरोप ठेवला होता पण कामाच्या व्यापात त्यांनी ऐकला नाही त्यामुळे त्यांनाही दुसऱ्यांना हेलपाटा पडला. ते आम्हाला न्यायला आले होते. आमच्या दोघांचे फोटो स्कॅन करुन पाठवले होते आम्हाला ओळखण्यासाठी. एक रात्र मोटेल मध्ये राहिल्यावर आम्ही मित्राच्या मित्राकडे ८ दिवस राहिलो. आम्हाला अपार्टमेंट मिळता मिळत नव्हते. सर्व अपार्टमेंट बुक झाली होती. आधी फोन करुन विचारले होते पण काही उपयोग झाला नाही. 
 
 
 
कशीबशी तीन महिन्यांकरता एक जागा मिळाली. ३ बेडरुमची जागा ३ विदार्थी शेअर करत होते. त्यातला एक शिक्षण पुर्ण झाल्याने सोडुन गेला होता. आणि आम्हाला त्याची एक बेडरुम मिळाली ३ महिन्यांसाठी. ही जागा खुप छान होती. या अपार्टमेंट कऍ मध्ये एकही भारतीय विदार्थी रहात नव्हता. सर्वच्या सर्व अमेरिकन विदार्थी रहात होते. हे अपार्टमेंट दुमजली होते आणि फर्निचर सहित होते. एका बेडरुम मध्ये एक बेड होता आणि बाकी सगळे common, hall, आणि स्वयंपाक घर. शिवाय त्यात धुण्याचे मशीनही होते. आमच्याकडे सामान म्हणजे भारतातुन आणलेल्या ४ बॅगाच होत्या. स्वयंपाकाची भांडी मी भांडी धुण्याच्या मशीनमध्ये ठेवली व फ्रिज मध्ये भाज्या ठेवण्याकरता जागा करुन घेतली. ३ महिन्यांनी सुद्धा जागेच वांदेच होते. कारण एक तर सर्व अपार्टमेंट्स ३ किंवा ४ बेडरुमची आणि सर्व विदार्थि शेअर करुन राहात होते. १ बेडरुमच्या जागा १ ते २ च होत्या आणि त्या सुद्धा अंधारलेल्या. शेवटी एक स्टुडिओ अपार्टमेंट मिळाले. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एकच खोली. त्यातच सर्व. कपडे धुण्याकरता लाअ मध्ये जावे लागत होते. इथली फर्निचरची कहाणी जरा वेगळी आहे.
 
 
 
स्टुडिओ अपार्टमध्ये नाखुशीनेच आलो. तिथे एक आरामदायी खुर्ची होती व त्यात बसुन थोडाफार झोका घेता येत होता. ही खुर्ची चांगली होती. अशीच कुणीतरी सोडुन गेले होते. आम्ही आधी ज्या मित्राच्या मित्राकडे रहात होतो त्यांच्याशी आमची चांगली दोस्ती झाली होती. तो post doctorate करत होता. स्टुडिओ बद्दल आम्हाला एका पिएचडि करणाऱ्या लग्न झालेल्या विदार्थ्याकडुन कळाले. तो म्हणाला आमचेही जागेचे वांदे झाले होते पण हा एका खोलिचा पर्याय चांगला आहे. आम्ही आधी ज्या मित्राकडे ८ दिवस राहिलो त्यांच्याकडे एक खुप छान गादी होती, ती त्यांची नव्हती. ही नवी कोरी गादी ते म्हणाले आम्ही वापरत नाही तुम्ही घेउन जा. त्यांच्याकडे एक खुप छान सोफा होता. तो सोफा त्यांना एका देशाच्या जोडप्याने दिला होता. ती म्हणाली आमच्याकडे २ सोफे झालेत. ते आम्हाला दुसऱ्यांनी जागा सोडताना दिले आहेत् त्यातला एक सोफा तुम्ही घेउन जा. पण तो इतका जड सोफा न्यायला कुणाकडे तरी विनंती करायला पाहिजे की तो उचलुन टेंपो मध्ये घालुन आमच्या घरी आणाल का?
 
 
 
हे सर्व कटकटीचे असते. म्हणुन मग आम्ही फक्त गादी आणली. सोफा आणला असता पण एका खोलीत खुप गर्दी झाली असती. ती नवि कोरी गादी अजुनही लक्षात राहिली आहे इतकी छान होती. सोफ्याचा रंग भगवा होता, तो पण खुप छान होता. अजिबात खराब झालेला नव्हता. त्यांच्या कडे एक छोटा बसका लाकडी स्टॅंड होता तोही त्यांनी आम्हाला दिला. त्यावर आम्ही आमचा छोटा टिल्लु टिव्ही ठेवला आणी खाली डिव्हिडि प्लेअर ठेवला आणि त्याबाजुला थोडी जागा होती ती ग्रंथालयातुन आणलेल्या पुस्तकांसाठी केली. बसायला खुर्ची झाली. झोपायला गादी झाली. जेवणासाठी कार्पेटवर वर्तमानपत्रे घालुन त्यावर ताटे ठेवुन जेवायला लागलो. 
 
 
 
एका खोलीमध्ये काय काय ठेवणार ना ? पण नंतर काही दिवसांनी त्याच एका खोलीत डायनिंगही आले. टेबलही आले. आमच्या शेजारी एक अमेरिकन विदार्थी राहत होता. तो सोडुन चालला होता. तो म्हणाला रोहिणी तुला बघ यातले काय फर्निचर हवे ते ! मी सोडुन चाललो आहे. हे फर्निचर माझे नाहिये. मला खरे तर एका खोलीत इतकी गर्दी करायची नव्हती. पण त्याचे घर बघितले तर त्याच्याकडे सर्व काही होते एका खोलीत ! मनात म्हणले हा इतका उत्साही आहे तर मग आपण का नाही ? मलाही त्याचे घर पाहुनघर सजवण्याचा उत्साह आला. मी त्याच्याकडचे एक ड्रावर असलेले टेबल घेतले. त्यावर डेस्क Top ठेवला. आणि एके दिवशी मला चक्क एक गोलाकार डायनिंग दिसले. एका अपार्टमेंटच्या बाहेर ठेवले होते. कोणी तरी तासुन तासुन त्याला गोलाकार आकार दिला होता. पेंट केले असते तर ते अगदी नवेकोरे छान दिसले असते.बरेच दिवस पहात होते बाहेर ठेवलेले. एके दिवशी अंधाऱ्या रात्री आम्ही दोघांनी मिळुन ते घरी आणले आणि त्याचे डायनिंग करुन टाकले. २००५ च्या सुरवाती पर्यंत आम्ही क्लेम्सनला होतो. काही विदार्थी मित्र झाले होते. काही post doctorate मित्र झाले होते. निघताना आम्ही पण एक एक करत सर्व फर्निचर मित्रमैत्रिणींना उदार मनाने देवु केले. 😃 post doc पर्व संपले. आणि परत नव्या शहरी नोकरी करण्यासाठी एक्झिट घेतली. 
 
 
नव्या शहरी नविन जागी नवे कोरे चांगल्यापैकी फर्निचर दुकानात जावुन विकत घेतले ते आजतागत आहे. दणकण आणि चांगले फर्निचर २ ते ३ ठिकाणी नोकरी निमित्ताने स्थलांतर करताना मुव्हर्स तर्फे हालवले गेले पण तरीही ते चांगल्या स्थीतित आहे. या फर्निचर मध्ये माझे मन जराही गुंतलेले नाही. पण आम्ही भारतात घेतलेले फर्निचर अजुनही आठवते. म्हणतात ना पहिले प्रेम कधीही विसरु शकत नाही. 🙂 एक समाधान मात्र आहे की ते सर्व फर्निचर आम्ही माझ्या सासरी दिले आणि सर्वांनी ते आनंदाने वापरले. 🙂 Rohini Gore
 

अमेरिकेतील फर्निचरच्या कहाण्या... (1)

 

२००१ सालातली गोष्ट आहे ही ! आम्ही दोघे टेक्साज राज्यातल्या डेंटन शहरात आलो. अपार्टमेंट फिक्स झाले. रहायला लागलो. त्या अपार्टमेंट मध्ये जरुरीपुरतेसर्व फर्निचर होते. १ मोठा बेड होता. एक गोल गोल फिरणारी खुर्चि होती आणि एक डुगडुगणारे coffee टेबलही होते. हे अपार्टमेंट फिक्स करण्याचे कारणतिथे रहाणारा आणि विनायकच्या लॅब मध्ये काम करणारा post-doctorate अचानक सोडुन दुसऱ्या गावि जाणार होता आणि त्याचे लिज ब्रेक होणार होते. त्यामुळे त्याचे पैशाचे नुकसान होणार होते आणि आमचा तिथला राहण्याचा काळही एकच वर्षाचा होता.
 
 
नॅन्सिने मला काही अपार्टमेंट दाखवलि होती म्हणजे असे की आम्ही प्रोफेसर ऍलन मर्चंड कडे काही दिवस राहिलो होतो. आणि त्याचि बायको नॅन्सि मला घेउन अपार्टमेंटच्या शोधात घेउन जात होती. मला एकही अपार्टमेंट आवडले नव्हते. एक तर लांबच्या लांब आणि निराशा वाटत होती. काही बिना फर्निचर तर काही फर्निचर सहित होती. आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये जाणार होतो त्याचे लिज आम्हीटेकओव्हर करणार होतो आणि फर्निचर कसेहि का असेना, होते हे महत्वाचे !
 
 
या अपार्टमेंट पासुन युनिव्हरसिटी, ग्रोसरी स्टोअर व धुणे धुवायचे दुकान सर्व चालत जाण्याच्या अंतरावर होते. ते काही फर्निचर सहित अपार्टमेंट नव्हते. अगोदर रहाणारे असेच एक एक फर्निचर तिथेच सोडुन गेले होते. तिथे बार मध्ये असणाऱ्या उंच उंच दोन खुर्च्याही होत्या. त्यातल्या एका खुर्चिचे पाय मोडले होते आणी एक खुर्चि अशीच डुगडुगत होती. ते सर्व फर्निचर बघुन मला हसावे की रडावे हेच कळत नव्हते. अंधेरीच्या जागेत आम्ही १९९९ साली, लग्नाच्या १० वर्षानंतर आमच्या आवडीचे १ लाखाचे फर्निचर घेतले होते. त्याची आठवण येउन मला रडु फुटत होते. त्याचबरोबर अपार्टमेंट मधले फर्निचर सर्वच्या सर्व भिरकावुन द्यावेसे वाटत होते. फर्निचर जुनाट जरी असले तरी ते होते ना ! एके दिवशि मी त्या उंच डुगडुगणाऱ्या खुर्चिवर बसले आणि मनाशिच म्हणाले महारानी रोहिणि पधार रहि है औस सिंहासन पर बैठी है हो !! आणि जोरजोरात हासले. 😃 😃 मळक्या गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीवर गोल गोल फेऱ्या मारल्या आणि मनाशिच म्हणाले चला आता हापिस सुटले, निघायला हवे. 🙂 विनायक दुपारी जेवायला यायचा तेव्हा या खुर्चिवर बसायचा आणि डुगडुगणाऱ्या टेबलावर जेवणाचे ताट ठेवुन जेवायचा.
 
 
 
आमच्या अपार्टमेंटच्या खाली रहाणाऱ्या प्रविणाशि माझि मैत्री झाली. आणि मला कळाले की तिने पण फर्निचर असेच कोणा कडुन आणले होते. विकत घेतले नव्हते. हळुहळु मला कळाले कि युनिव्हरसिटीमधले विद्दार्थी एक तर फर्निचर सहित अपार्टमेंट मध्ये रहातात किंवा बिना फर्निचर अपार्टमेंट मध्ये रहाणारे एकडुन तिकडुन मिळालेले फर्निचर वापरतात आणी शिक्षण संपले कि असेच कुणाकुणाला देतात. काही जण मुव्हिंग सेल मधुन खुप कमि किंमतीला विकत घेतात. मि एके दिवशी प्रविणाकडे गेले आणि तिच्या सोफ्यावर बसले आणि उठायला लागले तर मला उठताच येइना पटकन ! 😃 तर ती हासायला लागली, म्हणाली ऐसाही होता है रोहिणि, ये सोफा बहुतही पुराना है. मग तिने तिच्या आधीच्या फर्निचरची कहाणि मला ऐकवली. म्हणालि मि नविन लग्न होउन आले तर आमचा बेड खुप खतरनाक होता त्यावर झोपले की एकदम खालीच जायचा. 😃 माधविचि मैत्रि झालि तेव्हा ती पण नवीन लग्न होउन आली होती पण तिच्या नवऱ्याने नवा कोरा बेड घेतला होता.
 
 
सोफाही नविन होता. तर तिचे म्हणणे क्यु इतना खर्चा करने का ? सेल करने में दिक्कत आती है ! एके दिवशी माधवी म्हणालि आप तैयार रहे , मै आपको लेने के लिए आती हु. आणि आम्ही तिच्या कार मधुन बरेच हिंडलो आणि कचऱ्याच्या डब्याजवळ सोडुन दिलेले फर्निचर आम्ही पाहिले. म्हणाली ये लोग ऐसेही इधर क्यु छोडते है ये फर्निचर ? देखो कितना अच्छा है ना? मि "हा रे" आणि एके दिवशी ती असाच एक रॅक घरी घेउन आली. बघितले तर खरच तो रॅक चांगला होता. व्हाइट पेंटही लावला होता त्याला. तिने त्यात तिची पुस्तके ठेवली आणि अजुन काय काय ठेवले. तिच्या नवऱ्याला खरे तर हे आवडले नव्हते, खरे तर मलाही आवडले नव्हते. पण इथे कोण बघतयं ? इथे कोणाची कोणाला पडलेली नसते. युनिव्हरसिटी मध्ये सर्वच शिक्षण घेत असतात तसे आमची ३-४ जणांची post-doctorate ची छोटी कम्युनिटी होती. अर्थात हे शिक्षण नव्हे ! 
 
 
फर्निचर सहित अपार्टमेंट मिळते असे तिकडे इंडियात ऐकले होते आणि अचंभित झाले होते पण इथे बघितले तर हे फर्निचर वर्षानुवर्ष वापरलेले असते. ते काही अपार्टमेंट वाले बदलत नाही. इतर सर्व सोयी तर असतातच जसे की अपार्टमेंट मध्ये मायक्रोवेव्ह्, इलेक्ट्रिक शेगड्या, फ्रिज, त्यामुळे बाकीचे फर्निचर कुणि दिलेले, तर असेच उचलुन आणलेले , तर गराज सेल मधुन कमी किंमतीत विकत घेतलेले असते.एके दिवशी प्रविणा मला म्हणाली कि तिच्या शेजारचा केरळि सोडुन जात आहे तर मी त्याला त्याच्या कडच्या फर्निचर बद्दल विचारले देशील का मला, तर तो हो म्हणाला. तर तो डायनिंग टेबल आणि खुर्च्या आणि एक सोफा देणार आहे. तुझ्या घरात काहीच नाही ना बसायला कोणी आले तर ! तर मग सोफा आणि डायनिंग तुझ्याकडे ठेव आणि तु इथुन गेलीस की मी घेउन जाइन पण मि विचारले ते वर आणणार कसे काय ? तर म्हणाली की विनायक और श्रिनिवास लेके आयेंगे उपर !
 
 
मी मनात "एवढे काय नडलय का?" पण ओके ठिक आहे.मग एके दिवशी तो जड सोफा दोघांनी मिळुन वर आणला. मग मी गरमागरम दोघांसाठी चहा केला. त्यानंतर आम्ही सोफ्यावर बसायला लागलो आणि जेवायला डायनिंग वर ! दुसऱ्या एका मैत्रिणीला (प्रविणाच्या शेजारी रहाणारि कविता) तिला फोन करुन सांगितले कि वर ये आमच्या घरी. आम्ही फर्निचर घेतले आहे ! तीने माझे अभिनंदन केले आणि मी मनातल्या मनात खुदुखुदु हासले. वर आली आणि आम्ही तिघीही हासायला लागलो. तिला विचारले अच्छा है ना फर्निचर ? बहुत ही बढिया है , ती म्हणाली आणि मग मी सगळ्यांना उपमा चहा केला. आणि नंतर घरी जेवायला बोलावले. आम्ही एक वर्ष संपता संपता दुसऱ्या शहरी गेलो. 
 
 
 
दुसऱ्या शहरी प्रविणाचा मला फोन आला आणि खुप हासुन हासुन बोलत होती. का? तर तिचा मुलगा मोठमोठ्याने रडत होता. अँटि का फर्निचर क्यु फेक रहे है? तिने तिच्या मुलाला खुप समजावले कि अरे ते तिचे फर्निचर नाहीये तेव्हा कुठे तो शांत झाला. इथे अपार्टमेंट सोडुन जाताना सर्व काही साफ करुन द्यायचे असते आणि सामानही सर्व रिकामे करुन द्यायचे असते. एवढे सर्व सामान फेकायला वेडबिड लागलय का? की जे आमचेही नव्हते आणि ते जड जड सामान कचरापेटीच्या बाजुला ठेवायला हमालासारखी शक्ति पाहिजे ! 😃 Rohini Gore 
 
क्रमश : ....

Monday, March 22, 2021

२०२० डायरी

 

२०२० सालामध्ये आपण सर्वांनीच घरी बसल्या बसल्या करमणुकि साठी वेबसिरिज सिनेमे बघितले.
आम्ही नेटफ्लीक्सवर बघितलेले सिनेमे आणि वेबसिरिजची यादी इथे देत आहे.
या यादीतील काही सिनेमे आणि वेबसिरिज २०२० च्या आधी बघितले आहेत्.
web series - WS,, Movies (M) - Spanish - S ,, English - E , Hindi - H, Marathi - M

1. Zindagi Gulzar hai (WS) H (pakistani)
2. Digest Writer (WS) H (pakistani)
3. High Seas (WS) S
4. Grand Hotel (WS) S
5. 1000 Rupee Note (M) M
6. 15 August (M) M
7. Padman (M) H
8. Stree (M) H
9. Virgin River (WS) E
10. Little things (WS) H
11. Umrika (M) H
12. Savita Damodar Paranjpe (M) M
13. Talaash (M) H
14. Malaal (M) H
15. Motichoor Chaknachoor (M) H
16. Badla (M) H
17. Tribhang (M) H
18. Article 15 (M) H
19. She (WS) H
20. Soni (M) H
21. Bonfire Destiny (WS) S
22. Morocco - Love in Times of War (WS) S
23, Music Teacher (M) H
24. Love of Shukla (M) H
25. Toilet (M) H
26. Khoobsurat (M) H
27. Taare Jameen par (M) H
28 Sir (M) H
29. Katyar Kaljaat ghusli (M) M
30. Aani Dr Kashinath Ghanekar (M) M
31. B.A. Pass (M) H
32. Swades (M) H
33. Special 26 (M) H
34. Kahani (M) H
35. The Zoya factor (M) H
36. Lift boy (M) H
37. Lunch Box (M) H
38. Deadline - Sirf 24 ghante (M) H
39. Lust Stories (M) E
40. Blackbeach (M) E
41. You can not hide (M) E
42. Firebrand (M) E
43. Dhobi ghat (M) H
44. Lakshya (M) H
45. Prince (M) H
46. White tiger (M) H
47. Professor (M) H
48. The Trial (M) E
49. The Spy (WS) S
50. Dark Desire (M) E





Friday, February 26, 2021

२६ फेब्रुवारी २०२१

 आजचा दिवस तुम्ही मनापासून दिलेल्या शुभेच्छांमुळे खूपच छान गेला ! अनेक धन्यवाद ! आजचा दिवस लक्षात कायमच असतो पण काहीवेळा वेगळे असे काही घडले तर मी ते रोजनिशीमध्ये लिहिते. तर आज सकाळी उठल्यावर तुमच्या शुभेच्छा पाहिल्या. फोनवर आणि ईमेलमधूनही शुभेच्छा आल्या. आज मी विशेष असे काहीच केले नाही पण तरी वेगळे काहीतरी केले. दुपारच्या जेवणाच्या वेळी २ पोळ्या लाटल्याआणि आदल्या दिवशीची उसळ त्याबरोबर खाल्ली. मला नोकरी लागल्यापासून म्हणजे २०१५ सालापासून मी रात्रीचे जेवण आणिदुसऱ्या दिवशीचे जेवण एकत्रच बनवते. आता घरीच आहे गेले वर्षभर पण तरीही तेच कायम ठेवले आहे. इथे राहणारे सगळेच असे करतात.

म्हणजे भांडी घासून ओटा स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी आपापले आवरून कामावर जाता येते. तर ते असो. आज आता रात्री जेवायलाबरेच काही ठरवले होते. म्हणजे बटाटेवडे, शेवयाची खीर आणि असेच काही काही. पण काहीही केले नाही. मनाला आवर घातला.मला स्वयंपाक करायचा कंटाळा अजिबातच नाही पण भांडी घासणे आमच्या दोघांनाही आता होत नाही. आम्ही दोघे मिळून भांडी घासतो.डिश वॉशर लावतोच. पण भांडी घासायला लागतातच. भांड्यांच्या भीतीमुळे आजच्या विशेष दिनानिमित्त ठरवलेल्या जेवणाच्या मेनुलाकाट मारली.

तापमान जरा थोडे वर गेले म्हणून बाहेर चालण्याची १ मैलाची चक्कर मारली. अजूनही बर्फ पुर्णपणे वितळलेला नाहीच. गारठा चांगलाचजाणवत होता पण तरीही चालायचे ठरवले. चालून आल्यावर गरम चहा करून घेतला. रात्रीच्या जेवण थोडक्यातच उरकले. फोटो पाहतहोते पूर्वीचे अल्बम मधले. फोटो कसेही लावले गेले होते म्हणून मी ठरवले की आपण आतापर्यंत जिथे जिथे राहिलो त्या क्रमानुसार फोटोजअल्बम मध्ये लावायचे. आणि दिवस सत्कारणी लावायचा. मी लिहिलेल्या लेखांमध्ये त्या वर्णनानुसार फोटोचे स्कॅनिंग करायचे आहेच. पण आज फोटोंची वर्गवारी केल्यामुळे त्याप्रमाणे फोटो अल्बम मध्ये लावले. उद्या शनिवार असल्यामुळे आजचे जेवणाचे सेलिब्रेशन उद्या बाहेर उपहारगृहात जाऊन करायचे असे ठरवले आहे. कोरोनाच्या काळात अजूनही गुहेतून बाहेर शिकारीकरताच (ग्रोसरी आणण्याकरता ) पडायचे असेच आहे अजून. त्यात उपहारगृहात जाऊन जेवणाचा थोडा विरंगुळा इतकाच काय तो फरक. 
 




 

Friday, February 19, 2021

वास्तू (९)

 

माडीवाले कॉलनीतून आईबाबा,आजोबा व मी (वय वर्ष दीड) गोखले नगर पूरग्रस्त कॉलनीमध्ये रहायला गेलो ते वर्ष होते १९६५. माझी बहीण नंतर काहीमहिन्यातच इथे जन्मली. आमचे घर कडेला होते त्यामुळे बाजूची मोकळी जागा पण आम्हाला मिळाली. तिथे आईबाबांनी फुलाफळांच्या बागा फुलवल्या. बाबांनी जाईचा वेल लावला. तो वेल अजूनही त्याच जागी उभा आहे गेली ५५ वर्षे. जाईने आम्हाला भरभरून प्रेम दिले. मागे आणि पुढे आंगण होते की जे आधी मातीचे होते. नंतर फरशी टाकली त्यामुळे ती जागा पण वापरण्यासाठी उपयोगी पडली.
 
 
 
आमच्या दोघींच्या लग्नकार्यात ही जागा खूपच उपयोगी पडली. इथे होमहावन झाले. जेवणाच्या पंगती उठल्या. भोंडला व्हायचा. अर्थात मातीच्या अंगणात पण आम्ही भोंडले साजरे केले आहेत. फरशी टाकल्यावर उन्हाळ्यात बाहेरच्या अंगणात काही वेळा झोपायचो देखील. इथे झोपले आणि वर पाहिले की भव्य आकाश दिसायचे आणि त्यावर चमचमणाऱ्या चांदण्याही दिसायच्या. इथे बसून बाबा भूताच्या गोष्टी सांगायचे.मला आईने हेलवाडे बाईंच्या शाळेत घातले. माझी माँटेसरी सुरू झाली. नंतर महाजन मावशीची शाळा सुरू झाली. महाजन मावशी आईची खास मैत्रीण होती. ती आमच्या चाळीला लागून जी चाळ होती तिथे राहत होती. नंतर मी बाल शिक्षण मंदीर या शाळेत पहिलीत गेले. तेव्हा बाबा मला सायकवर बसवायचे आणि शाळेत सोडायचे. आई मला न्यायला यायची. त्याकरता तिला डोंगर चढून यावे लागे. आईच्या मैत्रिणी सोबत असायच्या. येताना मी आणि आई आरेभुषण इथल्या बस स्टॉपवर यायचो आणि तिथून बसने घरी यायचो. माझ्या बहिणीलाही शाळेत जायचे असायचे. मग आई तिला आजीच्या शाळेत सोडायची. आमच्या शेजारी भालेराव कुटुंब राहयचे. आई रंजनाला एक दप्तर द्यायची. त्यात पाटी पेन्सिल व खाऊचा डबा द्यायची आणि आजीच्या शाळेत सोडायची. ती पाटीवर रेघोट्या मारायची व अनेक गोल गोल काढायची. घरी आल्यावर तिला तिने केलेल्या अभ्यासावर बरोबर किंवा चुक अशी खुण केली की तिचे समाधान व्हायचे. माझे मराठी पुस्तक तिला तोंडपाठ होते. 
 
 
 
नंतर ती महाजन मावशीच्या शाळेत जायला लागली. नंतर आम्हाला केसकरांची रिक्शा लावली शाळेत सोडायला आणि आणायला. रिक्शात मी रंजना आणि भाग्यश्री अशा तिघी जायला लागलो. रिक्शामध्ये बसल्यावर कडेला कोण बसणार यावरून आमच्या तिघींचे रुसवे फुगवे होत असत. केसकर काका म्हणायचे भांडू नका. मी सांगीन कडेला कोण कधी बसणार ते ! सकाळची शाळा असली की आम्ही मेतकुट तूप भात खाऊन जायचो. ५ वीत गेल्यावर सकाळच्या सुधा नरवणे च्या मराठी बातम्या सुरू झाल्या की आम्ही बसने जायला बाहेर पडायचो.दुपारची शाळा असली की ११ वाजता लागणारी मराठी गाणी संपता संपता बाहेर पडायचो. बसने जेव्हा जायचो तेव्हा मधल्या स्टॉपवर बस काही वेळा थांबायची नाही. मग आम्ही शेवटच्या बस स्टॉपवर जायला लागलो. बसने जाता येता आमचे घर दिसायचे. 
 
 
 
बसला गर्दी खूप असायची. शाळा सुटली की डेक्कन जिमखान्यावर बसने जाण्यासाठी यायचो. ही मोठीच्या मोठी रांग असायची. खूप वेळ बस लागलेली नसायची आणि नंतर २ ते ३ बसेस सोडायचे. मग एकच गलका व्हायचा. रांगा तोडून बसमध्ये शिरायला गर्दी व्हायची. त्यावेळेला बहुतेक १० पैसे तिकीट होते. गोखले नगरला ३ बसेस होत्या. एक शनिपार, दुसरी डेक्कन जिमखाना आणि तिसरी पुणे स्टेशन. ९०,५८ आणि १४६ असे बसचे नंबर आठवतात. शेजारचे भालेराव व आमचा खूप एकोपा होता. भालेरावांच्या शेजारी आधी फुले राहयचे. नंतर तिथे शहा कुटुंब रहायला आले. त्यांना तीन मुले अमित, डिंपल आणि सिंपल. आमच्या दोघींच्या साखरपुड्याच्या वेळी आणि लग्नाच्या वेळी उठण्या बसण्याकरता आम्ही त्यांच्या जागा वापरल्या. शेजारच्या आजीला बरे नसले की आई पोळी भाजी द्यायची आणि आईला बरे नसले कि आजी द्यायची. काकाचे लग्न झाले तेव्हा त्याच्या बायकोला आम्ही मामी म्हणायचो. नंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मंदार. हा मंदार आमच्याकडे लोणी खायला यायचा. काकाच्या लग्नात आमची जागा त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना उठाबसायची केली होती.सिंपल डिंपल आमच्या घरच्याच होऊन गेल्या होत्या. भाग्यश्री कडे जेव्हा टेलिविजन आला तेव्हा आम्ही दोघी बहिणी तिच्याकडे रविवारचा संध्याकाळचा सिनेमा पहायला जायचो. 
 
 
 
महाजनमावशीकडे उभ्याच्या गौरी असायच्या. त्यांना घेतलेल्या माळा नंतर ती आम्हाला द्यायची. आमच्याकडे आईबाबा शिकवण्या घ्यायचे तेव्हा त्या मुलांचे आई वार्षिक स्नेहसंमेलन करायची. त्याकरता आई तिखटमिठाच्या पुऱ्या, बटाटेवडे, गुलाबजाम, गोडाचा शिरा असे काय काय करायची. तेव्हा महाजन मावशी व पंडीत मावशी आईच्या मदतीला यायच्या. सविता ही पण आमची बालमैत्रिण. तिचे घर आमच्या घरापासून लांब होते. जोशी काकू, पंडित काकू, आई आणि सरपोतदार काकू या चार जणांची कुटुंब मैत्री होती. महाजन मावशीच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी आई अगदी मुलगी पाहण्या पासून भाग घ्यायची. तिची सून भारतीवहिनी आणि आईची अगदी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत आहे. भारती आणि आई भारी उत्साही. त्या दोघी मिळून ७ किलोच्या दोघींच्या मिळून कुरडया घालायच्या. सामोसेही करायच्या. सामोसे जेव्हा करायच्या तेव्हा आम्ही दिवसभर येताजाता सामोसे खायचो. 
 
 
 
संध्या ठाकूर ही पण आमची कुटुंब मैत्रिण झाली. तिचे वर्कशॉप आमच्या घराच्या समोर होते. ती आमच्याकडे पाणी प्यायला यायची आणि नंतर घट्ट मैत्री झाली ती आजतागायत आहे. पूर्वी चाळ व वाडे संस्कृतीत अशी माणसे जोडली जायची. एकमेकांना हवे नको विचारले जायचे. संकटकाळी एकमेकांना मैत्रीचा हात देत असत. आणि ही मैत्रीची कुटुंबे इतकी वर्षे झाली तरीही एकमेकांना घट्ट धरून आहेत हे विशेष. आता आई ज्या सोसायटीत राहते तिथेही छान वातावरण आहे मैत्रिचे. गोखलेनगर सोडूनही आता बरीच वर्षे झाली. साधारण २००२-२००३ मध्ये आईबाबा रंजनाच्या सोसायटीच्या बाजूच्याच सोसायटीत राहायला आले. गोखले नगरच्या अजूनही काही आठवणी आहेत त्या पुढील भागात लिहीन. वास्तू या शीर्षकाचे ८ भाग लिहून झालेत ते  पुढील दिलेल्या लिंकवर वाचता येतील.
 
 
क्रमश : ....
 





 








Monday, January 25, 2021

भारतभेट २०१९

 यावर्षीची भारतभेट लांबली. काही कारणांमुळे आधीचे तिकिट रद्द करावे लागले आणि मग नंतर जायचे ते गणपतीच्या दिवसात जाऊ असे ठरवले आणि गेलो. पुण्यातले गणपती बघून कितीतरी वर्षे लोटली होती. पण गणपती बघणे झाले नाही. आईने ठरवले होते की तिची एक मैत्रिण आणि आम्ही दोघी एक रिक्षा करायची व गणपती बघायचे. ही भारतभेट खूपच वेगळी होती. आईच्या घरी जी बाई आहे ती आईकडे सर्वच्या सर्व कामे करते. अगदी स्वयंपाकापासून ते लादी पुसणे, कपड्याच्या घड्या घालणे इथपर्यंत. पण या मावशी त्यांच्या गावी गेल्या होत्या. त्यांना पण काही कारणा निमित्ताने जावेच लागले. त्यामुळे मला सर्वच्या सर्व कामे धुणे भांड्यांपासून करावी लागली. एक समाधान होते की मला माझ्या हातचे आईबाबांना जेवण मिळाले. सकाळचा चहा आलं घातलेला आईबाबांना आवडत होता. बाबांना माझ्या हातचे आमटी भात, पिठले खूपच आवडून गेले त्यामुळे मलाही खूप आनंद झाला. आईला मी साबुदाणे वडे गरम गरम करून घातले. पोहे उपमेही करून घातले. शिवाय मी भाजी आणायला जायचे तिथे एक दुकान होते तिथला वडा पाव तर खूपच चविष्ट होता. हा वडा पाव मी २ ते ३ वेळा आणला. 

 

नंतर ८ दिवसांनी मावशी आल्या पण झाले काय की तोपर्यंत गणपती करता लोकं फिरायला बाहेर पडतात आणि खूपच गर्दी होते त्यामुळे आमचे गणपती बघायचे राहून गेले. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो. मावशी आल्यावर त्यांनी सीताफळ बासुंदी बाहेरून आणली व पुऱ्या  गरम करून मला वाढल्या. माझी एक वहिनी होती तिच्याकडे मी व आई सवाषण म्हणून गेलो हा दिवस तर खूपच छान गेला. मी व आईने पैठणी साड्या नेसल्या. रिक्शाने गेलो वहिनीकडे. तिने व तिच्या सुनेने आमचे स्वागत केले आणि वहिनी म्हणाल्या मी आता चहा ठेवत नाही, तुम्ही लगेचच जेवायला बसा. आम्ही दोघी आयते जेवायला बसलो. तिने व तिच्या सुनेने खूप आग्रहाने वाढले. वहिनीने आम्हाला गरम पुरणाच्या पोळ्या वाढल्या व त्यावर भरपूर साजूक तूपही वाढले. एकीकडे तिच्या सुनेने आम्हाला घोसावळ्याची भजीही गरम गरम वाढली. बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. काकडीची कोशिंबीर असा खूप साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. मला तर असे  आयते आणि चविष्ट जेवायला खूपच छान वाटत होते.

 

नंतर तिने आमच्या दोघींची ओटी भरली. पाकिटातून पैसे दिले. आणि आम्ही सगळेच थोडे आडवे झालो. उठल्यावर चहा घेतला. तिचे घर बघितले. दुमजजली घर खूपच छान सजवले होते. ते बघून खूप बरे वाटले .
नंतर तिच्या मुलाने आमच्याकरता उबर टक्सी बोलावली, आम्ही पूर्वी राहत होतो ते शेजारचे भालेराव काका त्यांच्या घरी पण जाऊन आलो. वहिनीच्या आणि त्यांच्या
 घरातल्या गणपतीचे छान दर्शन झाले. 

 

आईच्या घरी ढेकूण झाले होते म्हणून आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो होतो २ दिवस राहयला त्यामुळे तिच्या गणपतीचे पण छान दर्शन झाले. आम्ही तिघींनी मिळून गणपतीचा नैवेद्द केला. मी माझी बहिण व भाची मिळून तुळशीबागेत खरेदी करायला गेलो. तिथे मी माझ्या करता गाउन घेतले. आणि मी जिथे काम करते त्या मैत्रिणींकरता पर्सेस घेतल्या. शिवाय एक खोटे मंगळसूत्र घेतले. शनिपाराशी रस प्यायलो. यावेळेला पुण्यावरून थेट विमानतळावर गेलो. तिथे गेल्यावर कळाले की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. मग आम्ही पूर्ण रात्र विमानतळावर
काढली. 

झोपेच चांगलच खोबरं झालं त्यात आधीचा प्रवास पुणे ते विमानतळ त्यामुळेही पाठ खूप दुखायला लागली. यावेळेला
 भारतावरून
परत अमेरिकेत येताना खूपच त्रास सहन करावा लागला. गणपती बघायला मिळतील ते पण बघणे झाले नाही.

 

माझ्या मामे वहिनीने आम्हाला दोघांना जेवायला बोलावले. तिने पाव भाजी, फ्रुट कस्टर्ड, आणि सफरचंदाचे मिल्क
 शेक केले होते. खूपच चविष्ट बेत होता. रात्रभर विमानतळावर काढायला लागल्यामुळे अधून मधून मी व विनायक इकडे तिकडे चकरा मारत होतो. तिथले फूड स्टॉल छांनच होते. काहीतरी खावेसे वाटत होते. पण खाल्ले नाही. कारण आम्ही ५ वाजता पुण्यावरून निघालो आणि रात्री ९ ला
विमानतळावर पोहोचल्यावर पोळी भाजी खाल्ली होती त्यामुळे भूक नव्हती आणि विमानात बसल्यावर पण लगेच खायला देतात त्यामुळे पण खाल्ले नाही. पहाटेचा चहा विमानतळावर घेतला. विमानतळावर गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही चक्क खाली झोपलो होतो. वरच्या बॅगेतले टॉवेल खाली अंथरले आणि त्यावर आडवे झालो. झोप कुठची लागायला? पण निदान पाठ तरी जमिमीवर टेकली जात होती. कँसल झालेली फ्लाईट शेवटी पहाटे ६ ला लागली. 


रात्रभर मुंबईच्या विमानतळावर काढली त्यामुळे सुरक्षित वाटत होते.

 

 २०१९ च्या भारतभेटी मध्ये जे ठरवले होते ते झाले नाही. पण जे झाले ते चांगले झाले यात समाधान नक्कीच आहे. 

 
 

 

Tuesday, January 12, 2021

१२ जानेवारी २०२१

 आजचा दिवस वेगळाच होता. नव्या वर्षातले हे माझे पहिलेच रोजनिशीतले पान ! आजकाल रोजनिशी लिहिली जात नाही. विल्मिंग्टनला असताना काही ना काही वेगळे घडायचे आणि ते लिहिले जायचे. तर आजचा दिवस आनंद देणारा होता.  व्हॉटस ऍप वर एक युट्युबची लिंक मला माझ्या मैत्रिणीने  फॉरवर्ड केली ती होती दोन बहिणींची वय वर्षे ८८ आणि ८६ मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला वड्या कश्या
बनवायच्या ते शिकविले. वड्या होत्या सफरचंदाच्या आणि त्यामध्ये घातला होता ओला नारळ.
या वड्या मी त्यांच्या पद्धतीनुसार करून पाहिल्या. चव छान लागते. सफरचंदाचा स्वाद छान लागतो. आज कराओकी ट्रॅकवर कही दूर जब दिन ढल जाए हे गाणे रेकॉर्ड केले. तेही मनासारखे झाले. हे गाणे मला खूपच आवडते. यात फिलोसॉफी सांगितली आहे आणि कवीची कल्पना तर खूपच छान आहे.


आज बरेच दिवसांनी साबुदाणे वडे केले. काल मी माझ्या आईबाबांची एक आठवण लिहिली ब्लॉगवर. त्या आठवणीमध्ये मी आजही आहे. आईला फोन करते तेव्हा गप्पांच्या ओघात काही वेळेला तिच्या तरूणपणातल्या आठवणी सांगते. मग मी पटपट वहीत लिहून घेते आणि ब्लॉगवर टंकते.

 

 
 

 

Monday, January 11, 2021

माडीवाले कॉलनी - पुणे (२)

 आईबाबांचे लग्न १९५७ साली झाले. त्यानंतर त्यांचा संसार पुण्यातील आगाशे वाड्यात सुरू झाला. आगाश्यांच्या वाड्यात लग्ना आधी बाबा, काका आणि मामा (म्हणजे माझे आजोबा) रहायचे.  बाबा, काका आणि मामा १९५१ साली आगाशे वाड्यात राहायला आले. तिथे ते वाड्यातल्या माडीवर राहायचे. आगाशे काका भुताच्या गोष्टी सांगत असत. १९५१ ते १९५७ सालापर्यंत बाबांनी इंग्रजी आणि गणित मुलांना फुकट शिकवले. जेव्हा बाबांचे लग्न झाले तेव्हा त्या घरात पहिल्यांदाच बाईमाणूस आले.


बाबांची आई त्यांचा लहानपणीच देवाघरी गेली. आणि बाबांची बहिण वयाच्या १५ व्या वर्षी देवाघरी गेली. तिला टायफॉइड झाला होता आणि नंतर तो उलटला आणि त्यातच ती गेली. जेव्हा आईचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा (आजोबा) म्हणाले की निळू हीच मुलगी तुझी बायको होईल. मामांना आईमध्ये त्यांची मुलगी दिसली. माझ्या आत्याचे टोपण नाव "बेबी" होते. आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त २० वर्षाची होती. आगाशे यांच्या आईला माझ्या आईचे खूप कौतुक होते. १९६१ साली पूर आला आणि आगाशे वाड्यात पाणीच पाणी झाले होते. आई बाबा
वेगवेगळ्या दिशेला होते. काका आणि आजोबा वलसाडला होते. 

माडीवाले कॉलनी मध्ये साने माई यांचा दुमजली बंगला होता. या सानेमाई आईला ओळखत. ही ओळख म्हणजे अशी की आईची पनवेलची एक मैत्रीण मालू ही लग्न होऊन माडीवाले कॉलनीत राहायला आली होती. आणि आई पण लग्न होऊन पुण्याला आली आणि परत या दोघी मैत्रीणींची भेट झाली. मालूमावशी आईपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला आईचे खूप कौतुक होते असे आई सांगते.


सानेमाई आईला म्हणाल्या की बाबी तु काही काळजी करू नकोस. मी तुला आमच्या गच्चीला लागून जी खोली आहे ती देते. आणि माईंनी आईकरता आंबेमोहोर तांदुळही घेऊन ठेवले होते. आईचे लग्नातले दागिने बाबांनी माईच्या कडे ठेवायला दिले होते. माडीवाले कॉलनीमध्ये माई साने यांच्या बंगल्यात वर गच्चीला लागून जी खोली होती ती बऱ्यापैकी मोठी होती. गच्चीमध्ये त्यांनी एक छोटी बाथरून बांधून दिली होती. या घरात आईबाबा, मामा (आजोबा) आईची आई ( आजी)  असे राहत होते. मामा वलसाडहून जेव्हा आले तेव्हा त्यांनी बाबांना सांगितले की मी आता इथेच कायमचा तुझ्याकडे राहणार आहे. माईंनी आईला एक मोठे पिंप पाणी भरून ठेवण्याकरता दिले. शिवाय पिण्याचे पाणी पिण्याकरता एक मोठा हंडा दिला. बाबा व आई दोघे मिळून वरच्या मजल्यावरून खाली एक हौद होता तिथून पाणी भरायचे. हौदाच्या शेजारीच पाण्याचा नळ होता. आईकडे जी बाई धुणे भांड्याला यायची ती याच नळावर धुणे भांडी करायची. त्याकाळी ती ५ रूपये घ्यायची या कामाचे ! आणि आईबाबा ज्या खोलीत राहायचे त्या खोलीचे भाडे होते रूपये १८ !  १९६१ ते १९६५ पर्यंत आईबाबा व आजोबा इथे राहिले.

आईबाबा पहाटे ४ ला उठायचे ते आधी पाणी भरायचे व नंतर तळ्यातल्या गणपतीला जायचे. तिथून पर्वतीला जायचे. तिकडून आले की आई सर्वॉचा चहा  करायची  व नंतर बाबा सायकलने विश्रामबाग वाड्यात कामाला जायचे. जेवायला घरी येऊन थोडी विश्रांती घेऊन परत कामावर जायचे. ज्या खोलीत हे सर्वजण राहत होते. तिथेच छोटे स्वयंपाकघर केले होते. म्हणजे आडोशाला पडदा लावला होता. आई व आजी स्वयंपाकघरात झोपायच्या. आणि बाकीच्या खोलीत दोन पलंग होते त्यावर मामा व बाबा झोपायचे. अंघोळी गच्चीत बांधलेल्या बाथरूम मध्ये होत असत. उन्हाळ्यात आई आणि आजी गच्चीमध्ये भरपूर वाळवणे करायच्या. स्वयंपाकघरात दोन प्रकारचे स्टोव्ह होते, एक वाजणारा आणि दुसरा वातीचा (न वाजणारा) स्वयंपाकघरात लाकडाच्या दोन छोट्या मांडण्या होत्या पातेली कढई ठेवण्याकरता. स्वयंपाक खाली बसूनच केला जाई. गच्चीचा उपयोग छान होत होता.
 
 
 सानेमाईंच्या इथे राहत असतानाच आईने शिवणाचा क्लास केला व शिवाय एसटीसी पण केले. आई म्हणाली आजी (आईची आई) होती म्हणून मला घरचे काही बघायला लागत नव्हते. आजी सर्व करायची.  माझे आजोबा, आम्ही त्यांना मामा म्हणायचो. दुपारचे जेवण झाल्यावर ते ग्रंथालयात जाऊन वाचत बसायचे ते संध्याकाळी घरी यायचे. 
या खोलीतच आईबाबा शिकवण्या घेत.  काही घरी जाऊन घेत. प्रभात रोड व भांडारकर रोडवर दोन घरी आईबाबा
मुलांना शिकवायला जात असत.
 
 
 जेव्हा आईला दिवस गेले तेव्हा साने माईना खूप आनंद झाला. आईला त्यांनी वर्षभराचे लोणचे घालून दिले.
माईंनी आणि आजीने आईचे सर्व डोहाळे पुरवले. आई सांगते आईला खूप कडक डोहाळे लागले होते. आईची सर्व प्रकारची डोहाळेजेवणे झाली. फक्त एक चांदण्यातले डोहाळेजेवण राहिले होते. मालू मावशी म्हणाली की गच्चीत चांदण्यातले  डोहाळेजेवण करू. आईला सांगितले की तू फक्त तळण कर बाकी इतर स्वयंपाक सर्व आम्ही करू. मग मालूमावशी (आईची मैत्रीण) तिचे यजमान व दोन मुली, सानेकाका आणि माई, आजी आजोबा, आईबाबा असे सर्व चांदण्यातल्या डोहाळेजेवणाला हजर होते. 
 
माझा  जन्म इथलाच सानेमाईंच्या बंगल्यातला. लक्ष्मीरोडवरच्या ताराबाई लिमये यांच्या दवाखान्यात माझा जन्म झाला. साने माईंना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी डॉक्टर होती. आणि त्यांचा मुलगा आणि सून फलणटला राहत असत. माईंंनी माझ्या आईवर मुलीप्रमाणे प्रेम केले. मी आईला ६ वर्षांनी झाले. साने माईंना खूप आनंद झाला. त्यांनि माझे बारसे खूप थाटामाटात साजरे केले. जिलबी करायला आचारी बोलावला होता. स्वयंपाकाला बाई बोलावली होती. पण ती बाई यायच्या आतच त्यांनीच बरासचा स्वयंपाक केला होता. 
 
साने माई आईला म्हणाल्या की तुझ्या नातेवाईकांना बोलाव.  शिवाय तुझ्या शिवणाच्या क्लासच्या मैत्रिणींनाही निमंत्रण दे. आई सांगते की  माईंचे आणि माझे मागच्या जन्मीचे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असणार, नाहीतर इतके कोणीही कोणासाठी करत नाही.
 
 
 माझे आजोबा मला दुपट्यात घेऊन गच्चीत सतरंजी टाकून खेळवत बसायचे. जेव्हा मी बसायला लागले तेव्हा आईकडे मुले शिकायला यायची त्यांच्यातच मी बसायचे. स्वयंपाकघराला जो पडदा होता तो मी माझ्याभोवती गुंडाळून घ्यायचे व पेन्सिली खायचे.


आम्ही पूरग्रस्त म्हणून मामांनी एक फॉर्म आणून भरला होता. ती जागा केव्हा मिळेल या चौकशीसाठी त्यांनि अनेक फेऱ्या मारल्या. शेवटी गोखलेनगरला भाड्याची जागा मिळाली. आईने जेव्हा माडीवाले कॉलनी सोडली तेव्हा आई रंजनाच्या वेळेस (म्हणजेच माझ्या बहिणीच्या वेळेस) गरोदर होती. निघण्याच्या वेळी मालूमावशीने (आईच्या मैत्रिणीने) माझे आवरले. मी पावणे दोन वर्षाची होते. मालूमावशीने माझ्या छोट्या केसाची एक शेंडी बांधली. माझे तोंड धुतले. किंचित पावडर लावून ओल्या गंधाचा एक ठिपका कपाळावर लावला. मला फ्रॉक घातला. दूध प्यायला दिले.
 
 
 आम्ही जेव्हा गोखले नगरला राहयला गेलो तेव्हा तिथे अजिबात वस्ती नव्हती.गोखले नगरला आम्ही स्थिरस्थावर झालो तेव्हा सानेमाई आईबाबांकडे येवून गेल्या आणि खूप रडल्या. आईला म्हणाल्या इतकी काय घाई होती जाण्याची ? इथे खूप विरळ वस्ती आहे. आमच्या इथेच राहिली असतीस तर काय बिघडले असते? गरोदर होतीस तर दुसरे बाळंतपणआमच्या घरीच करून जायचेस. तर माझे आजोबा म्हणाले अहो तुम्ही आम्हाला त्यावेळेला जागा दिलीत तेव्हा आम्हाला किती हायसे वाटले ते शब्दात सांगता येणार नाही. आम्ही पूरग्रस्त त्यामुळे लगेचच हालचाल करायला हवीच होती. नंबर लावून खोल्या तयार होत्या आणि चाळीतल्या दोन खोल्या मिळाल्या त्या लगेच घ्यायला हव्या होत्या म्हणून आम्ही तातडीने इथे आलो.


गोखलेनगरच्या जागेत जेव्हा आईबाबा रहायला आले तेव्हा आईला ७ वा महिना चालू होता. फेब्रुवारी महिन्यात माझी बहिण जन्माला आली. तिच्या जन्माच्या वेळेसच बाबांनी जाईचा वेल लावला. जाई आणि माझी बहीण एकाच वयाच्या ! 

Sunday, January 03, 2021

गाता रहे मेरा दिल !!

गाणं आवडत नाही, गायला किंवा ऐकायला आवडत नाही, असा विरळाच ! मला मात्र गाणं ऐकायला खूप आवडतं, नुस्त आवडत नाही तर गायला देखील आवडतं. माझ्या जोडीदारालाही आवडते गाणे आणि मुख्य म्हणजे आमच्या जोडीची एकत्रित आवड म्हणजे सिनेसंगीत. आता फरक इतकाच आहे की त्याला जुनी आणि संथ गतीची गाणी आवडतात आणि मला धडाकेबाज गाणी, म्हणजे असे की गाणं ऐकताना माझ्यात उत्साहाचा झरा वाहायला लागतो. गाणं धडकत फडकत कोणतेही असो, मला ते आवडतं. गाण्याच्या ओळीत किती सुंदर अर्थ दडलेले आहेत याच्याकडे माझे लक्ष जात नाही. याच्या उलट वि चे लक्ष गाण्याच्या बोलांमध्ये जास्त असते. आणि याचा परिणाम असा झाला की सुंदर सुंदर अर्थपूर्ण बोल असलेली गाणीच आता मला पटकन आठवतात. आठवणारच ना ! तीच तीच गाणीवि ने लावली की कान जातातच गाण्याकडे. पण तरीही मला माझी गाणी अत्यंत प्रिय आहेत. काही वेळा तर माझी गाणी मी एकटी असतानालावली तर मला त्यावर गिरक्या घेऊन घेऊन नाचावेसेही वाटते. तर अशी ही गाणी बजावणी प्रत्येकाच्या आयुष्यात थोडीफार का होईना डोकावतातच!
 
 
फ्लॅश बॅक मध्ये जाते आता. जावेच लागेल. दारावरची बेल वाजली आणि हा पहिला प्रश्न विचारला गेला विनायक गोरे आहेत का? . दारात २ मुले होती.हो आहेत ना ! मी म्हणाले. आम्ही जेवायला बसलो होतो दुपारचे. जेवण झाल्यावर लगेच या, अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला यावे लागेल असे त्या मुलांनी सांगितले. ईमर्जन्सी आली होती. आयाटीमध्ये अंताक्षरी चालू होती आणि त्यांना गाणी माहित असलेला चांगला जेयुडीजीई हवा होता. विनायकला पकडूनच नेले त्यांनी. विनायक घरी आल्यावर त्याला विचारले कशी झाली अंताक्षरी ! तो म्हणाला एवढी खास नव्हती, म्हणजे आमच्या वेळेला जी मजा आली होती, तो जो काही अटीतटीचा सामना झाला होता त्याची मजा औरच होती. विनायकने गाजलेली आठवण मला सांगितली. रेगे आणि गोरे विरूद्ध दोन मुली अंताक्षरी मध्ये गात होत्या. रेगे आणि गोरे खूप जुनी म्हणजे १९४०-१९५० सालातली फेमस गाणी न गाता वेगळीच गाणी गात होते. तिथे जमलेले सर्व "हे गाणे कोणते बुवा? " अशा आश्चर्यचकित मुद्रेने एकमेकांकडे पाहत होते. काही जण म्हणाले तुम्ही खोटी गाणी गात आहात. रेगे म्हणाला माझ्याकडे कॅसेटच्या थप्प्या आहेत. चला रूमवरऐकवतो गाणी ! प्रेक्षकातून आवाज आला. नको रे ! इथे ऐकतो तीच पुरे आहेत. " एक करेला तो दूसरा नीम" असेही अभिप्राय येत होते. वि च्या मित्राने त्याला नंतर सांगितले. म्हणजे असे की या दोघांना आवाज नाहीत ! गाणी मात्र शेकड्याने माहीती. आणि यांच्या विरूद्ध ज्या मुली होत्या त्या १९७०-८० सालातली फेमस गाणी गात होत्या. पुराने आणि नये नगमे असा अटीतटीचा सामना झाला होता. रेगे आणि गोरे यांनी नेमकेएक गाणे नवीन गायले आणि तिथेच एका मार्कासाठी त्यांचा पहिला नंबर चुकला.
 
 
फेमस गाणी न गायल्याने हे दोघे मित्र गाणं मध्येच सोडून द्यायचे आणि वेगळे अक्षर येईल असे बघायचे. म्हणजे विरूद्ध पार्टीची दिशाभूल करायचे म्हणजे असे की गाणं कोणत्या अक्षराने संपणार हे साधारण कळते ना, आणि त्या अक्षराचे गाणे आठवून ठेवतो गाणारा. मग त्याही मुली असेच मध्येच गाणे सोडून विरूद्ध पार्टीअवर जरा अवघड अक्षर येईल असे पाहायच्या. प्रत्येकाचीच गाण्याच्या आवडीची सुरवात होते ती रेडिओवरून ऐकलेल्या गाण्यांमधूनच. नंतर ती आवड वाढते ती दूरदर्शन मधल्या चित्रहार, रंगोली या कार्यक्रमातून, आणि गाण्यांच्या अनेकानेक स्पर्धेमधून, मग ती स्पर्धा मराठीतून असो अथवा हिंदीमधून. गाण्यांच्या आवडीच्या
कॅसेट ऐकणे किंवा सीड्या ऐकणे यापेक्षाही युट्युबवर हवी ती आणि हवी तितकी गाणी ऐकली, पाहिली. गाणी ऐकता ऐकता आणि पाहता पाहता आम्ही दोघं गाण्यांच्या महासागरात डुंबून गेलो. फेसबुकावर दोन गाण्यांचे ग्रूप्स आहेत त्यामध्ये आम्ही रोजच्या रोज युट्युबाच्या लिंका त्या ग्रुप्सच्या थीमनुसार टाकू लागलो. हा सिलसिला जवळजवळ ७ ते ८ वर्षे चालू होता. 
 
गीतसंगीत या ग्रूपवर तर आम्ही काही ठराविक लोकं थीमआली रे आली की पटापट त्यानुसार गाणी टाकायला लागलो. अर्थात आपण टाकलेले गाणे हे थीमनुसार अगदी चपखल बसले पाहिले आणि इतरांपेक्षा खूप वेगळेही झाले पाहिजे हा अट्टाहास सुरू झाला.रोजच्या रोज थीमा असायच्या या दोन ग्रुप्सवर ! एक ग्रुप आहे "संगीत के सितारे" आणि दुसरा "गीतसंगीत" काही वेळा थीम टाकल्या टाकल्याडोळ्यासमोर लगेचच गाणे तरळून जायचे आणि लिंक पोस्ट केली की नेमके आपण निवडलेले गाणे कुणी दुसरेच टाकून गेलेले असायचे म्हणजे परत दुसरे गाणे शोधणे आलेच. काही वेळेलानिवडलेल्या गाण्यापेक्षाही खूप चांगले गाणे निवडण्याची खटपट चालू व्हायची. काही वेळेला थीम मध्ये बसणारी ३ ते ४ गाणी डोक्यात असायची आणि कोणते टाकावे बरे? असे म्हणून उगाचच वेळ वाया जायचा आणि ती ठरवलेली गाणी पण काही वेळा इतरांनी टाकलेली असायची. नंतर ठरवले की चांगले गाणे सुचले की लगेच टाकून मोकळे व्हायचे. पण जेव्हा आपण ठरवलेल्या इतर गाण्यांपैकी एखादे गाणे कोणी टाकले तर खूपच हिट ! होऊन जायचे, म्हणजे बरेच लाईक मिळायचे.
 
 
किती विविध प्रकारच्या थीमा ! कधी गाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे शब्द हवेत, तर कधी गाण्यात हिरो- हिरोईनचे प्रतिबिंब पाण्यात किंवा आरश्यात दिसले पाहिजे, तरकधी कृष्ण धवल तर कधी गाण्यात नाच पाहिजेत. एक थीम लक्षात राहिलेली ती म्हणजे एका गाण्यात हिरोईनने कमीतकमी ३ ते ४ वेळेला तरी साडी किंवा ड्रेस बदललेले पाहिजेत. मी आधी संगीत के सितारे या ग्रुपमध्ये नव्हते. मला आठवतयं मी केव्हा जॉईन झाले ते ! एक थीम
होती चोरी चोरी चुपके चुपके आणि अजून एक शब्द होता जोडीचा यापैकी २ तरी शब्द आले पाहिजेत. मी गाणे टाकले होते चोरी चोरी चुपके चुपके पलकोंके पीछेसे चुपके कह कयी सारी बतियाँ, अखियाँ हो अखियाँ....हे आपकी कसम मधले गाणे. गीताकार, संगीतकार, गायक, गायिका, द्वंद्व गीते, विरहगीते, लोरीगीते, बिदाई गीते, एक ना अनेक थीमा. आणि म्हणूनच सतत युट्युबवर गाणी बघितली जायची. जशी गाणी बघितली तशी मी गायली देखील अनेक गाणी. गुगल वर गाण्याचे बोल शोधायचे आणि गाणी म्हणायचीती रेकॉर्ड करायची असा उद्योग सूरू केला होता मी. ऑर्कुटच्या जमान्यात याहूवरची अंताक्षरी लक्षात राहिलेली. अर्थात त्यात थीमा नव्हत्या.
एका ग्रूपवर एकीने याहू मेसेंजरवर अमेरिकेतल्या प्रत्येकाच्या झोननुसार एक वेळ ठरवली होती आणि वारही ठरवला होता. त्यात गाणी गायली गेली. आणि आता मोहिनी अंताक्षरीवर गात आहे. गात आहे म्हणण्यापेक्षा गुणगुणणे हे म्हणणे जास्त योग्य होईल. मी गाणे अजिबात शिकलेली नाहीये पण पूर्वी बरीच गाणी पाठ होती. चालीतही म्हणता यायची. अजूनही चालीत गाणी म्हणता येतात पण गाणी पाठ नाहीत.
 
 
बरेच वेळा असे ठरवते की गाणी पाठ करून ती वरचेवर घरात गात राहायची. ओरिजिनल गाणे ऐकून तसेच्या तसे होत आहे का तेही बघायचे पण असे नुसते ठरवलेच जाते. २ कडव्यांची गाणी पाठ व्हायला हारकत नाही. मनावर घेतले पाहिजे. मी माझ्या आनंदाकरता गाते आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते गाता रहे मेरा दिल !!!
बरेच दिवसात गाण्यावर अजून एखादा लेख लिहावा असे मनात होते पण ते एका गोष्टीमुळे शक्य झाले. व्हॉटस ऍप ग्रुपवर मी एक स्पर्धा दुसऱ्या क्रमांकावर जिंकलेआणि या छोट्या आनंदात मला हा लेख लिहावासा वाटला. मोहिनी अंताक्षरी हा एक ग्रुप आहे. तिथे मोहिनी रोजच्या रोज वेगळ्या थिम्स देते,, मी पण काही थीमा तिला सुचवते. आपल्या वेळेनुसार आठवड्यातून किमान २ दिवस काही मिनिटे द्यावीत अशी तिच्य इच्छा आहे.आणि ती मला वाटते रास्त आहे. मोहिनी भारतीय वेळेनुसार सकाळी थीमजाहीर करते आणि भारतीय वेळेनुसार रात्री ११ ला अंताक्षरी बंद होते. जो तो आपापल्या वेळेनुसार या मोहिनी अंताक्षरीच्या कट्यावर येतो
थोडे विसावतो आणि गातो.
 
मी दुसऱ्या क्रमांकावर जिंकलेली थीम अशी होती की त्यात लाजणं मुरडणं सौंदर्याचे वर्णन, ज्या गाण्यात येईल ती गाणी किंवा नटी पडद्यावर साजश्रुंगार करताना दिसते अशी गाणी, अथवा गाण्यात एखाद्या अलंकाराचे नाव येईल अशी गाणी गायची होती.गाण्याचा २/४ ओळीचा मुखडाच गायचा होता. १ मिनिटापेक्षा कमी वेळात होणारा. भारतीय वेळेनुसार मोहिनीने सकाळी ७ ते १२ अशी स्पर्धेची वेळ ठेवली होती आणि ही स्पर्धा सरप्राईज होती. तशी तिने थोडी कल्पना दिली होती ३१ डिसेंअरला की उद्या मी एक सरप्राईज घेऊन येणार आहे आणि त्याकरता आम्ही सर्व उत्कुक होतो. जेव्हा स्पर्धा घोषित केली तेव्हा अमेरिकेत ९.३० वाजले होते. मला स्पर्धेची थीम खूपच आवडली
आणि मी एकेक करत ऑडिओ टाकत राहिले. १२ वाजता झोपून गेले. मला अजून स्पर्धेच्या वेळेनुसार अडीच तास शिल्लक होता पणझोपेच खोबरे होईल म्हणून झोपले आणि १ जानेवारी २०२१ ला सकाळी मला एक सुखद धक्का बसला.
 

 

Tuesday, December 29, 2020

२०२० डायरी

 दोन हजार एकोणीस संपता संपता न्यू जर्सी मध्ये आलो. एखाद दोन महिने स्थिरस्थावर होण्यात गेले आणि लगेचच कोरोनाचे वारे वाहूलागले. न्यूज वाचली होती कोरोनाची पण तो एवढा विस्तारेल अशी कल्पना आली नाही. चिनीज आपल्या मायदेशी गेले आणि बरोबरकोरोनाला घेऊन आले आणि हा हा म्हणता सगळ्या जगभरात कोरोनाची लागण झाली. नेमके याच वेळी विनायकला न्यूयॉर्कला जावे लागले. जाणे अत्यंत जरूरीचे होते. विनायक एका वकीलाकडे जाऊन महत्त्वाची साक्ष देणार होता. ही साक्ष एका छोट्या कंपनीतर्फे देणार होता आणि ही साक्ष होती एका मोठ्या नावाजलेल्या कंपनी विरूद्ध. छोटी कंपनी विनायकला जाण्या येण्याचा, जेवणाचा, होटेल मध्ये राहण्याचा खर्च आणि २ दिवस कंपनीत रजा घ्यावी लागणार, त्याच्या भरपाईचा खर्च असे सर्व काही देणार होती . त्यात असेही नमूद केले होते की तुम्ही उबर टक्सीने जरी आलात तरी तोही खर्च आम्ही देऊ. आमच्या घरापासून एडिसन रेल्वे स्टेशन चालण्याच्या अंतरावर आहे. मला रेल्वेने प्रवास खूप आवडतो त्यामुळे आम्ही दोघे ठरवत होतो की एकदा रेल्वेने न्यूयॉर्कला जाऊन यायचे. मी विनायकला म्हणाले आपण फिरायला जाणे वेगळे आणि तुला कामासाठी जायचे आहे, त्यात कोरोना चालू झाला आहे तर रेल्वेने जाऊ नकोस, उबरने जा. विनायक २ दिवसासाठी न्युयॉर्कला जाऊन आला पण माझ्या मनात थोडी भीती होतीच. सूचनांचा भडिमार बायको नेहमीच करते त्याप्रमाणे मीही विनायकला सूचना देत राहिले. शेकहँड करू नकोस, कोणाच्याही जवळ बसू नकोस, हॉटेलमध्ये असणाऱ्या उपहारगृहातच जेव वगैरे वगैरे. तसा तर मी त्याच्या साठी काही कोरडे पदार्थ दिलेच होते.

 

विनायक न्युयॉर्कला जाऊन आला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी अमेरिकेत लॉक डाऊन सुरू झाले. ग्रोसरी स्टोअर्स सोडल्यास सर्वच्या सर्व बंद झाले. मुख्य म्हणजे ज्या ज्या स्टोअर्स मध्ये जाऊ तिथे तिथे रिकामे रॅक दिसू लागले. सॅनिटाईझर गायब, टिश्यू पेपर गायब,इतकेच नाही तर आम्हाला पिण्याचे पाणी आणि दूधही मिळेनासे झाले. आम्ही दर शनिवारी सकाळचा चहा झाल्या झाल्या स्टोअर्स मध्येजाऊन जे काही पाहिजे आहे ते ते सर्व आणायला लागलो. त्याकरता आम्हाला २ ते ३ स्टोअर्स हिंडावी लागत होती. हेच पाहिजे, असेचपाहिजे, अश्या तक्रारी न करता समोर दिसत आहे ना? उचला पटापट, नंतर नाही मिळाले तर? असेच सर्वजण करत होते. सगळे जणवेड्यासारखा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या गोष्टींचा साठा करून ठेवत होते. स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या माणसांची धांदल उडत होती.सर्वांना सर्व काही मिळेल या हिशोनाबे शेवटी स्टोअर्स मध्ये " एका फॅमिली करता एकच उचला" अश्या पाट्या दिसायला लागल्या. सुरवातीला तर मी ५ किलो कांदे बटाटे पण आणून ठेवले. काही फ्रोजन बीन्स आणून ठेवले.विनायक संशोधक असल्याने त्याला वर्क फ्रॉम होम नाही त्यामुळे आमच्या रूटीन मध्ये काहीही बदल झाला नाही. चार भिंतींमध्ये आम्हीदोघे एकमेकांची तोंडे सततची न पाहिल्याने आमच्यात भांडणे झाली नाहीत. विनायकच्या ऑफीस मध्ये अंतरा अंतरावर बसण्यासाठीजागा करून दिल्या होत्या. अजूनही तसेच आहे. रोजच्या रोज ऑफीस मध्ये प्रत्येकाने शरीराचे तापमान आपले आपण घ्यायचे आणि ते लगेच मेलने कळवायचे असे रूटीन होते. आणि काम करताना मास्कही लावायचा हे सक्तीचे केले त्यामुळे काळजी नव्हती. तसेही लॅब मध्ये काम करताना ग्लोव्ज आणि पांढरा ओव्हरकोट घालावा लागतोच त्यात मास्कची भर पडली होती.
 
 
नंतर कोरोना इतका काही वाढला की स्टोअर्स मध्ये गेल्यावर रांगेत उभे राहावे लागत होते. एका वेळी १० जणांना स्टोअर्सच्या आतमध्ये घेत होते. स्टोअर्सच्या समोर थंडीच्या दिवसात माणसे रांगा लावत होती. आणि अर्थाताच सॅनिटाईझर आणि मास्क सक्तीचे होतेच. कामासठी रांगा लावणे हा प्रकारच विसरायला झाला होता. रांगांमुळे गर्दी कमी होत गेली. बहुतेक सर्वजण ऑनलाईन ऑर्डर करायला लागले. आम्ही मात्र दोघच्या दोघं असल्याने दर शनिवारी ग्रोसरी करत होतो. मला स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या लोकांची खूप काळजी वाटत होती. मास्क लावून काम करायचे हे किती अवघड आहे याची कल्पनाही करवत नव्हती. तिथल्या लोकांना कामाचा बोजा किती पडत असेल याचा विचार करत होते.कोरोना इतका काही वाढला की अमेरिकेचे राज्यानुसार कोष्टक बघून घाबरायला होत होते. आधी युरोप मधले वाढलेले आकडे पाहत होतोनंतर अमेरिकेचे वाढलेले आकडे पाहायला लागलो. रोजच्या रोज ८०० ते १००० मृत संख्या वाचताना पोटात धस्स होत होते. न्युयॉर्क मध्ये तरमृत्युचा जणू काही सापळाच रचलेला होता !साधारण ६ महिन्या नंतर न्यूयॉर्क न्युजर्सी मध्ये कोरोना केसेस खूप कमी झाल्या आणि डेथ रेट पण कमी झाला . पण आताअमेरिकेतल्या इतर राज्यातून कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. खूपच वाढत आहे. न्युजर्सी राज्यात क्वारंटाईनचे निर्बंध असे आहेतकी तुम्ही दुसऱ्या राज्यात जरी गेलात तरी परत आल्यावर स्वतःला १४ दिवस क्वारंटाईन करायचे.सर्व लाँग वीकेंड वाया गेले.
 
 
प्रत्येक देशाच्या लॉक डाऊनला सर्वांनाच सामोरे जावे लागले. आता प्रत्येकाला कळून चुकले आहे की आता आपल्याला कोरोना बरोबरच राहायचे आहे. काळजी मात्र घ्यायलाच हवी.कोरोनाच्या काळात घरीच बसायचे. अन्न पाणी आणण्याकरताच फक्त बाहेर जायचे. मग करायचे काय घरी बसून ! हा प्रश्न भेडसावाय्ला लागला. नेटफ्लिक्स कामाला आले. बऱ्याच स्पनिश मालिका बघितल्या. सिनेमे बघितले. होटेल्स बंद म्हणून बाहेर काही खाणे झाले नाही. ऑर्डर देवून आणता येत होते. पण कंटाळा यायचा. जायचे, यायचे आणि ऑर्डर केलेले पदार्थ परत गरम करून घ्यायचे. म्हणजेभांडी घासले आलेच परत.चमचमीत काहीतरी करावे आणि खावे असे ठरवले आणि केले पण ! जास्तीचे काही केले की भांडी घासून घासून प्रचंड दमणूकव्हायला लागली. तसे तर इथे भांडी घासायला लागतातच, २ माणसे असली तरीही भरपूर भांडी पडतात. पदार्थ करून रेसिपी लिहायचेते दिवस आठवले. डिपेंडंट विसावर हेच तर करत होते मी, तेव्हाही क्वारंटाईन होतेच की ! अमेरिकेतल्या थंडीत कुठे बाहेर फिरायला जातो?
व्यायाम होईनासा झाला. मग चालणे करायचे मास्क बांधून आणि आठवड्यातून एकदा तरी व्यायाम हा झालाच पाहिजे असे ठरवले व केले.चालणे आणि व्यायाम झाला नाही तर प्रतिकार शक्ती कोठून येणार?स्मृती ब्लॉग मध्ये अजून काही लिहायचे होते ते लिहिले. म्हणजे काही लेखाचे काही भाग लिहून झाले होते आणि आता या पुढचा लेख पुढीलभागात असे लिहिले होते ते सर्व पुढील भाग जितके जमतील तितके लिहिले. काही जुने फोटोज स्कॅन केले. हे सर्व करूनही पुढे काय?हे प्रश्नचिन्ह उभे राहतेच. तसेही कोरोना नसता आला तरीही पुढे काय हा प्रश्न उरतोच माझ्या आयुष्यात. 
 
 न्युजर्सी मध्ये आल्यावर नोकरीचा प्रयत्न केला होता. दोन ठिकाणाहून मुलाखतीसाठी बोलावणे पण आले पण त्यावेळी नेमकी माझी तब्येत बिघडली होती. आता असे वाटते की होते तेचांगल्यासाठीच. इंगल्स हँडरसनविल मध्ये काम करताना इतके काही दमायला व्हायचे की नोकरी सोडाविशी वाटायची आणि सोडली तर काय करायचे या विचारात कॉलेज मध्ये जाऊन स्पॅनिश शिकावेसे वाटत होते. ही स्पॅनिश शिकण्याची इच्छा कोरोनाच्या काळात पूर्ण झाली.कोर्सेरा वर स्पेशलाईझेशन इन स्पॅनिश व्होकॅब्युलरीची ५ कोर्सेसची सिरीज पूर्णत्वास नेली. वेगळी भाषा प्राथमिक लेव्हलला शिकायला मिळाली. यामुळे वेळ चांगला गेलाच आणि मन बिझी होऊन गेले. घरातले काम आणि अभ्यास यामध्ये इतकी व्यग्र होऊन गेले की डोक्यात इतर फालतू विचारांना थारा मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीदायक काळात मे ते डिसेंबर महिने कधी गेले ते कळले नाही.सणवार तर आपण करतोच. काळ कोणताही असो. सणावारा निमित्त आपण जे करतो त्याने थोडातरी उत्साह येतोच. मी ब्लॉगवर जे नवीन लेखन केले ते लेख तुम्हाला २०२० या लेबल मध्ये दिसतील. त्या लेखाची शीर्षके आहेत अनुक्रमे, पीठाची गिरणी, टेलिव्हिजनचे दिवस, वेणीफणी, कॅसेट, आहार, व्यायाम, वजनातील घट आणि वाढ एक स्वानुभव, एका कथेचा जन्म, आणि संभ्रम या दोन अतिलघूकथा ब्लॉगवर लिहिल्या. महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला माझ्या आईवरचा लेख, ऍपल पिकींग, कोर्सेस, बर्थडे गर्ल - आई, रोजनिशीची काही पाने, रस्ते,आईच्या आठवणी, बैठे खेळ, मला सुचलेली एक प्रेमकविता आणि एक फिलोसॉफिकल कविता ब्लॉग वर लिहिली. बाबांवर केलेली कविता, क्लेमसनच्या आठवणींचे काही लेख, नेटफ्लिक्सवर स्पॅनिश सिरीज पाहिल्या त्याचे थोडक्यात रसग्रहण, त्यात एका सिरीजचे रसग्रहण केले आहे. त्याचे पुढील भाग लिहायचे बाकी आहेत. अजून काही सिरीजचे रसग्रहण लिहायचे मनात होते पण लिहिले गेले नाही.
 
 
साडी चॅलेज मध्ये साडी नेसली गेली. फेसबुकवर काही खेळ टाकले होते. गाळलेल्या जागा भरा. यामध्ये इंग्रजी शब्द होते. काही अक्षरे लिहियची आणि काही अक्षरे गाळलेली जागा. अजून एक म्हणजे जुन्या-नव्या चित्रपटांची नावांची अक्षरे उलटीसुलटी करून द्यायची आणि ती ओळखायला सांगायची. जो ओळखेल त्याने पुढील चित्रपटाचे नाव द्यायचे. एक खेळ असा टाकलाहोता की दोन पैकी एक पर्याय निवडा. व परत दोन पर्याय द्या. यामध्ये काही जणींनी भाग घेतला होता. कोरोना काळातला हा एक टाईमपासकेला. जे काही ठरवले होते ते करता आले नाही. एडिसन रेल्वे स्टेशनवर बसून न्युयॉर्कला जाणार होतो. इथे काही पाहणार होतो. टेकटूरच्या २ ते ३ दिवसाच्या छोट्या ट्रीप करणार होतो. खूप चांगल्या ट्रीप्स होत्या. लाँग वीकेंडला या ट्रीप झाल्या असत्या. ७ ते ८ महिन्यांनी जेव्हा उपहारगृहामध्ये डाईन इन सुरू झाले तेव्हा १५ दिवसातून एकदा बाहेर जेवायला लागलो. घरी माझ्या स्वतःच्या हाताच्या चवीने खाऊन खाउन तोंडाची चवच निघून गेली होती. काहीतरी चमचमीत करत होते उत्साह वाढवण्यासाठी पण भांडी बरीच पडत होती. मग शेवटी वेगवेगळेपदार्थ करणे थांबवले. रगडा पॅटीस, मसाला डोसा, चकोल्या, दुधी हलवा, गाजर हलवा, असे काही ना काही पदार्थ केले होते. जेव्हा लॉकडाऊन उठले तेव्हा बाहेर काय परिस्थीती आहे ते पाहण्यासाठी एका मॉल मध्ये गेलो. तिथे शुकशुकाटच होता. परिस्थितीगंभीर वाटत होती. काही उत्साही बायका खरेदी करत होत्या. मला तर तिथल्या कपड्यांना हात पण लावावासा पण वाटत नव्हता. फिटींगरूम अजूनही बंदच आहेत.
 
 
२०२० किती वेगळे गेले ना ! ग्रोसरी शिवाय बाहेर जाणे नाही, खरेदी नाही. लाँग वीकेंडला वेगळेपणा नाही.
आधी जी मनात भीती साठून राहिली होती ती कमी कमी होत गेली. कोव्हिड केसेस किती वाढल्या, कितीजण मृत्युमुखी पडले हीकोष्टके बघणेही संपले. हळूहळू न्युयाॅर्क व न्यू जर्सी मधल्या केसेस खूप कमी झाल्या. थोडे हायसे वाटले खरे पण हे सर्व कधी संपणारही टांगती तलवार अजूनही आहेच आणि लस येईपर्यंत राहीलही. माणसांना कोरोनाची सवय होऊन गेली.२०२० संपता संपता लस तर आली पण तरीही टांगती तलवार गेलेली नाही. २०२० पेक्षा २०२१ बरे असे म्हणावेसे वाटते. कदाचित २०२२ची पहाट चांगली असेल अशी आशा करायला हारकत नाही.
प्रत्येक देशाचे लॉकडाऊन वेगळे त्यामुळे प्रत्येकालाच त्या त्या देशाच्या अंतर्गत कोव्डिडचा सामना करावा लागला आहे. तसे तर २०२० वर्षाने शिकवले पण खूप ! असे वाटते निसर्गाने सूत्र हातात घेतली आहेत का? कोरोना निमित्तमात्र आहे. कोरोनाने ज्यांचे बळी घेतले त्यांच्या घरात किती दुःखाचे सावट पसरलेले असेल याची कल्पनाही करवत नाही. Wishing you All a Very Happy and healthy New year 2021 !