यावर्षीची भारतभेट लांबली. काही कारणांमुळे आधीचे तिकिट रद्द करावे लागले आणि मग नंतर जायचे ते गणपतीच्या दिवसात जाऊ असे ठरवले आणि गेलो. पुण्यातले गणपती बघून कितीतरी वर्षे लोटली होती. पण गणपती बघणे झाले नाही. आईने ठरवले होते की तिची एक मैत्रिण आणि आम्ही दोघी एक रिक्षा करायची व गणपती बघायचे. ही भारतभेट खूपच वेगळी होती. आईच्या घरी जी बाई आहे ती आईकडे सर्वच्या सर्व कामे करते. अगदी स्वयंपाकापासून ते लादी पुसणे, कपड्याच्या घड्या घालणे इथपर्यंत. पण या मावशी त्यांच्या गावी गेल्या होत्या. त्यांना पण काही कारणा निमित्ताने जावेच लागले. त्यामुळे मला सर्वच्या सर्व कामे धुणे भांड्यांपासून करावी लागली. एक समाधान होते की मला माझ्या हातचे आईबाबांना जेवण मिळाले. सकाळचा चहा आलं घातलेला आईबाबांना आवडत होता. बाबांना माझ्या हातचे आमटी भात, पिठले खूपच आवडून गेले त्यामुळे मलाही खूप आनंद झाला. आईला मी साबुदाणे वडे गरम गरम करून घातले. पोहे उपमेही करून घातले. शिवाय मी भाजी आणायला जायचे तिथे एक दुकान होते तिथला वडा पाव तर खूपच चविष्ट होता. हा वडा पाव मी २ ते ३ वेळा आणला.
नंतर ८ दिवसांनी मावशी आल्या पण झाले काय की तोपर्यंत गणपती करता लोकं फिरायला बाहेर पडतात आणि खूपच गर्दी होते त्यामुळे आमचे गणपती बघायचे राहून गेले. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो. मावशी आल्यावर त्यांनी सीताफळ बासुंदी बाहेरून आणली व पुऱ्या गरम करून मला वाढल्या. माझी एक वहिनी होती तिच्याकडे मी व आई सवाषण म्हणून गेलो हा दिवस तर खूपच छान गेला. मी व आईने पैठणी साड्या नेसल्या. रिक्शाने गेलो वहिनीकडे. तिने व तिच्या सुनेने आमचे स्वागत केले आणि वहिनी म्हणाल्या मी आता चहा ठेवत नाही, तुम्ही लगेचच जेवायला बसा. आम्ही दोघी आयते जेवायला बसलो. तिने व तिच्या सुनेने खूप आग्रहाने वाढले. वहिनीने आम्हाला गरम पुरणाच्या पोळ्या वाढल्या व त्यावर भरपूर साजूक तूपही वाढले. एकीकडे तिच्या सुनेने आम्हाला घोसावळ्याची भजीही गरम गरम वाढली. बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. काकडीची कोशिंबीर असा खूप साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. मला तर असे आयते आणि चविष्ट जेवायला खूपच छान वाटत होते.
नंतर तिने आमच्या दोघींची ओटी भरली. पाकिटातून पैसे दिले. आणि आम्ही सगळेच थोडे आडवे झालो. उठल्यावर चहा घेतला. तिचे घर बघितले. दुमजजली घर खूपच छान सजवले होते. ते बघून खूप बरे वाटले .
नंतर तिच्या मुलाने आमच्याकरता उबर टक्सी बोलावली, आम्ही पूर्वी राहत होतो ते शेजारचे भालेराव काका त्यांच्या घरी पण जाऊन आलो. वहिनीच्या आणि त्यांच्या
घरातल्या गणपतीचे छान दर्शन झाले.
आईच्या घरी ढेकूण झाले होते म्हणून आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो होतो २ दिवस राहयला त्यामुळे तिच्या गणपतीचे पण छान दर्शन झाले. आम्ही तिघींनी मिळून गणपतीचा नैवेद्द केला. मी माझी बहिण व भाची मिळून तुळशीबागेत खरेदी करायला गेलो. तिथे मी माझ्या करता गाउन घेतले. आणि मी जिथे काम करते त्या मैत्रिणींकरता पर्सेस घेतल्या. शिवाय एक खोटे मंगळसूत्र घेतले. शनिपाराशी रस प्यायलो. यावेळेला पुण्यावरून थेट विमानतळावर गेलो. तिथे गेल्यावर कळाले की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. मग आम्ही पूर्ण रात्र विमानतळावर
काढली.
झोपेच चांगलच खोबरं झालं त्यात आधीचा प्रवास पुणे ते विमानतळ त्यामुळेही पाठ खूप दुखायला लागली. यावेळेला
भारतावरून
परत अमेरिकेत येताना खूपच त्रास सहन करावा लागला. गणपती बघायला मिळतील ते पण बघणे झाले नाही.
माझ्या मामे वहिनीने आम्हाला दोघांना जेवायला बोलावले. तिने पाव भाजी, फ्रुट कस्टर्ड, आणि सफरचंदाचे मिल्क
शेक केले होते. खूपच चविष्ट बेत होता. रात्रभर विमानतळावर काढायला लागल्यामुळे अधून मधून मी व विनायक इकडे तिकडे चकरा मारत होतो. तिथले फूड स्टॉल छांनच होते. काहीतरी खावेसे वाटत होते. पण खाल्ले नाही. कारण आम्ही ५ वाजता पुण्यावरून निघालो आणि रात्री ९ ला
विमानतळावर पोहोचल्यावर पोळी भाजी खाल्ली होती त्यामुळे भूक नव्हती आणि विमानात बसल्यावर पण लगेच खायला देतात त्यामुळे पण खाल्ले नाही. पहाटेचा चहा विमानतळावर घेतला. विमानतळावर गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही चक्क खाली झोपलो होतो. वरच्या बॅगेतले टॉवेल खाली अंथरले आणि त्यावर आडवे झालो. झोप कुठची लागायला? पण निदान पाठ तरी जमिमीवर टेकली जात होती. कँसल झालेली फ्लाईट शेवटी पहाटे ६ ला लागली.
रात्रभर मुंबईच्या विमानतळावर काढली त्यामुळे सुरक्षित वाटत होते.
२०१९ च्या भारतभेटी मध्ये जे ठरवले होते ते झाले नाही. पण जे झाले ते चांगले झाले यात समाधान नक्कीच आहे.
No comments:
Post a Comment