Friday, April 23, 2021

अमेरिकेतील फर्निचरच्या कहाण्या... (२)

 

क्लेम्सनला आलो २००२ सालामध्ये. सुरवातीला बरीच नाचानाची झाली. विमानाने आलो मध्यरात्री. थेट उड्डाण चुकले म्हणुन उशीर झाला. नशिबाने लगेच दुसरी फ्लाइट मिळाली पण ती अर्थातच थेट नव्हती. प्रोफेसर डीटर यांनी आमच्या एका रात्रिचे मोटेल मध्ये बुकींग केले होते. त्यांना आंसरिंग मशीनवर निरोप ठेवला होता पण कामाच्या व्यापात त्यांनी ऐकला नाही त्यामुळे त्यांनाही दुसऱ्यांना हेलपाटा पडला. ते आम्हाला न्यायला आले होते. आमच्या दोघांचे फोटो स्कॅन करुन पाठवले होते आम्हाला ओळखण्यासाठी. एक रात्र मोटेल मध्ये राहिल्यावर आम्ही मित्राच्या मित्राकडे ८ दिवस राहिलो. आम्हाला अपार्टमेंट मिळता मिळत नव्हते. सर्व अपार्टमेंट बुक झाली होती. आधी फोन करुन विचारले होते पण काही उपयोग झाला नाही. 
 
 
 
कशीबशी तीन महिन्यांकरता एक जागा मिळाली. ३ बेडरुमची जागा ३ विदार्थी शेअर करत होते. त्यातला एक शिक्षण पुर्ण झाल्याने सोडुन गेला होता. आणि आम्हाला त्याची एक बेडरुम मिळाली ३ महिन्यांसाठी. ही जागा खुप छान होती. या अपार्टमेंट कऍ मध्ये एकही भारतीय विदार्थी रहात नव्हता. सर्वच्या सर्व अमेरिकन विदार्थी रहात होते. हे अपार्टमेंट दुमजली होते आणि फर्निचर सहित होते. एका बेडरुम मध्ये एक बेड होता आणि बाकी सगळे common, hall, आणि स्वयंपाक घर. शिवाय त्यात धुण्याचे मशीनही होते. आमच्याकडे सामान म्हणजे भारतातुन आणलेल्या ४ बॅगाच होत्या. स्वयंपाकाची भांडी मी भांडी धुण्याच्या मशीनमध्ये ठेवली व फ्रिज मध्ये भाज्या ठेवण्याकरता जागा करुन घेतली. ३ महिन्यांनी सुद्धा जागेच वांदेच होते. कारण एक तर सर्व अपार्टमेंट्स ३ किंवा ४ बेडरुमची आणि सर्व विदार्थि शेअर करुन राहात होते. १ बेडरुमच्या जागा १ ते २ च होत्या आणि त्या सुद्धा अंधारलेल्या. शेवटी एक स्टुडिओ अपार्टमेंट मिळाले. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एकच खोली. त्यातच सर्व. कपडे धुण्याकरता लाअ मध्ये जावे लागत होते. इथली फर्निचरची कहाणी जरा वेगळी आहे.
 
 
 
स्टुडिओ अपार्टमध्ये नाखुशीनेच आलो. तिथे एक आरामदायी खुर्ची होती व त्यात बसुन थोडाफार झोका घेता येत होता. ही खुर्ची चांगली होती. अशीच कुणीतरी सोडुन गेले होते. आम्ही आधी ज्या मित्राच्या मित्राकडे रहात होतो त्यांच्याशी आमची चांगली दोस्ती झाली होती. तो post doctorate करत होता. स्टुडिओ बद्दल आम्हाला एका पिएचडि करणाऱ्या लग्न झालेल्या विदार्थ्याकडुन कळाले. तो म्हणाला आमचेही जागेचे वांदे झाले होते पण हा एका खोलिचा पर्याय चांगला आहे. आम्ही आधी ज्या मित्राकडे ८ दिवस राहिलो त्यांच्याकडे एक खुप छान गादी होती, ती त्यांची नव्हती. ही नवी कोरी गादी ते म्हणाले आम्ही वापरत नाही तुम्ही घेउन जा. त्यांच्याकडे एक खुप छान सोफा होता. तो सोफा त्यांना एका देशाच्या जोडप्याने दिला होता. ती म्हणाली आमच्याकडे २ सोफे झालेत. ते आम्हाला दुसऱ्यांनी जागा सोडताना दिले आहेत् त्यातला एक सोफा तुम्ही घेउन जा. पण तो इतका जड सोफा न्यायला कुणाकडे तरी विनंती करायला पाहिजे की तो उचलुन टेंपो मध्ये घालुन आमच्या घरी आणाल का?
 
 
 
हे सर्व कटकटीचे असते. म्हणुन मग आम्ही फक्त गादी आणली. सोफा आणला असता पण एका खोलीत खुप गर्दी झाली असती. ती नवि कोरी गादी अजुनही लक्षात राहिली आहे इतकी छान होती. सोफ्याचा रंग भगवा होता, तो पण खुप छान होता. अजिबात खराब झालेला नव्हता. त्यांच्या कडे एक छोटा बसका लाकडी स्टॅंड होता तोही त्यांनी आम्हाला दिला. त्यावर आम्ही आमचा छोटा टिल्लु टिव्ही ठेवला आणी खाली डिव्हिडि प्लेअर ठेवला आणि त्याबाजुला थोडी जागा होती ती ग्रंथालयातुन आणलेल्या पुस्तकांसाठी केली. बसायला खुर्ची झाली. झोपायला गादी झाली. जेवणासाठी कार्पेटवर वर्तमानपत्रे घालुन त्यावर ताटे ठेवुन जेवायला लागलो. 
 
 
 
एका खोलीमध्ये काय काय ठेवणार ना ? पण नंतर काही दिवसांनी त्याच एका खोलीत डायनिंगही आले. टेबलही आले. आमच्या शेजारी एक अमेरिकन विदार्थी राहत होता. तो सोडुन चालला होता. तो म्हणाला रोहिणी तुला बघ यातले काय फर्निचर हवे ते ! मी सोडुन चाललो आहे. हे फर्निचर माझे नाहिये. मला खरे तर एका खोलीत इतकी गर्दी करायची नव्हती. पण त्याचे घर बघितले तर त्याच्याकडे सर्व काही होते एका खोलीत ! मनात म्हणले हा इतका उत्साही आहे तर मग आपण का नाही ? मलाही त्याचे घर पाहुनघर सजवण्याचा उत्साह आला. मी त्याच्याकडचे एक ड्रावर असलेले टेबल घेतले. त्यावर डेस्क Top ठेवला. आणि एके दिवशी मला चक्क एक गोलाकार डायनिंग दिसले. एका अपार्टमेंटच्या बाहेर ठेवले होते. कोणी तरी तासुन तासुन त्याला गोलाकार आकार दिला होता. पेंट केले असते तर ते अगदी नवेकोरे छान दिसले असते.बरेच दिवस पहात होते बाहेर ठेवलेले. एके दिवशी अंधाऱ्या रात्री आम्ही दोघांनी मिळुन ते घरी आणले आणि त्याचे डायनिंग करुन टाकले. २००५ च्या सुरवाती पर्यंत आम्ही क्लेम्सनला होतो. काही विदार्थी मित्र झाले होते. काही post doctorate मित्र झाले होते. निघताना आम्ही पण एक एक करत सर्व फर्निचर मित्रमैत्रिणींना उदार मनाने देवु केले. 😃 post doc पर्व संपले. आणि परत नव्या शहरी नोकरी करण्यासाठी एक्झिट घेतली. 
 
 
नव्या शहरी नविन जागी नवे कोरे चांगल्यापैकी फर्निचर दुकानात जावुन विकत घेतले ते आजतागत आहे. दणकण आणि चांगले फर्निचर २ ते ३ ठिकाणी नोकरी निमित्ताने स्थलांतर करताना मुव्हर्स तर्फे हालवले गेले पण तरीही ते चांगल्या स्थीतित आहे. या फर्निचर मध्ये माझे मन जराही गुंतलेले नाही. पण आम्ही भारतात घेतलेले फर्निचर अजुनही आठवते. म्हणतात ना पहिले प्रेम कधीही विसरु शकत नाही. 🙂 एक समाधान मात्र आहे की ते सर्व फर्निचर आम्ही माझ्या सासरी दिले आणि सर्वांनी ते आनंदाने वापरले. 🙂 Rohini Gore
 

No comments: