Monday, January 11, 2021

माडीवाले कॉलनी - पुणे (२)

 आईबाबांचे लग्न १९५७ साली झाले. त्यानंतर त्यांचा संसार पुण्यातील आगाशे वाड्यात सुरू झाला. आगाश्यांच्या वाड्यात लग्ना आधी बाबा, काका आणि मामा (म्हणजे माझे आजोबा) रहायचे.  बाबा, काका आणि मामा १९५१ साली आगाशे वाड्यात राहायला आले. तिथे ते वाड्यातल्या माडीवर राहायचे. आगाशे काका भुताच्या गोष्टी सांगत असत. १९५१ ते १९५७ सालापर्यंत बाबांनी इंग्रजी आणि गणित मुलांना फुकट शिकवले. जेव्हा बाबांचे लग्न झाले तेव्हा त्या घरात पहिल्यांदाच बाईमाणूस आले.


बाबांची आई त्यांचा लहानपणीच देवाघरी गेली. आणि बाबांची बहिण वयाच्या १५ व्या वर्षी देवाघरी गेली. तिला टायफॉइड झाला होता आणि नंतर तो उलटला आणि त्यातच ती गेली. जेव्हा आईचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा (आजोबा) म्हणाले की निळू हीच मुलगी तुझी बायको होईल. मामांना आईमध्ये त्यांची मुलगी दिसली. माझ्या आत्याचे टोपण नाव "बेबी" होते. आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त २० वर्षाची होती. आगाशे यांच्या आईला माझ्या आईचे खूप कौतुक होते. १९६१ साली पूर आला आणि आगाशे वाड्यात पाणीच पाणी झाले होते. आई बाबा
वेगवेगळ्या दिशेला होते. काका आणि आजोबा वलसाडला होते. 

माडीवाले कॉलनी मध्ये साने माई यांचा दुमजली बंगला होता. या सानेमाई आईला ओळखत. ही ओळख म्हणजे अशी की आईची पनवेलची एक मैत्रीण मालू ही लग्न होऊन माडीवाले कॉलनीत राहायला आली होती. आणि आई पण लग्न होऊन पुण्याला आली आणि परत या दोघी मैत्रीणींची भेट झाली. मालूमावशी आईपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला आईचे खूप कौतुक होते असे आई सांगते.


सानेमाई आईला म्हणाल्या की बाबी तु काही काळजी करू नकोस. मी तुला आमच्या गच्चीला लागून जी खोली आहे ती देते. आणि माईंनी आईकरता आंबेमोहोर तांदुळही घेऊन ठेवले होते. आईचे लग्नातले दागिने बाबांनी माईच्या कडे ठेवायला दिले होते. माडीवाले कॉलनीमध्ये माई साने यांच्या बंगल्यात वर गच्चीला लागून जी खोली होती ती बऱ्यापैकी मोठी होती. गच्चीमध्ये त्यांनी एक छोटी बाथरून बांधून दिली होती. या घरात आईबाबा, मामा (आजोबा) आईची आई ( आजी)  असे राहत होते. मामा वलसाडहून जेव्हा आले तेव्हा त्यांनी बाबांना सांगितले की मी आता इथेच कायमचा तुझ्याकडे राहणार आहे. माईंनी आईला एक मोठे पिंप पाणी भरून ठेवण्याकरता दिले. शिवाय पिण्याचे पाणी पिण्याकरता एक मोठा हंडा दिला. बाबा व आई दोघे मिळून वरच्या मजल्यावरून खाली एक हौद होता तिथून पाणी भरायचे. हौदाच्या शेजारीच पाण्याचा नळ होता. आईकडे जी बाई धुणे भांड्याला यायची ती याच नळावर धुणे भांडी करायची. त्याकाळी ती ५ रूपये घ्यायची या कामाचे ! आणि आईबाबा ज्या खोलीत राहायचे त्या खोलीचे भाडे होते रूपये १८ !  १९६१ ते १९६५ पर्यंत आईबाबा व आजोबा इथे राहिले.

आईबाबा पहाटे ४ ला उठायचे ते आधी पाणी भरायचे व नंतर तळ्यातल्या गणपतीला जायचे. तिथून पर्वतीला जायचे. तिकडून आले की आई सर्वॉचा चहा  करायची  व नंतर बाबा सायकलने विश्रामबाग वाड्यात कामाला जायचे. जेवायला घरी येऊन थोडी विश्रांती घेऊन परत कामावर जायचे. ज्या खोलीत हे सर्वजण राहत होते. तिथेच छोटे स्वयंपाकघर केले होते. म्हणजे आडोशाला पडदा लावला होता. आई व आजी स्वयंपाकघरात झोपायच्या. आणि बाकीच्या खोलीत दोन पलंग होते त्यावर मामा व बाबा झोपायचे. अंघोळी गच्चीत बांधलेल्या बाथरूम मध्ये होत असत. उन्हाळ्यात आई आणि आजी गच्चीमध्ये भरपूर वाळवणे करायच्या. स्वयंपाकघरात दोन प्रकारचे स्टोव्ह होते, एक वाजणारा आणि दुसरा वातीचा (न वाजणारा) स्वयंपाकघरात लाकडाच्या दोन छोट्या मांडण्या होत्या पातेली कढई ठेवण्याकरता. स्वयंपाक खाली बसूनच केला जाई. गच्चीचा उपयोग छान होत होता.
 
 
 सानेमाईंच्या इथे राहत असतानाच आईने शिवणाचा क्लास केला व शिवाय एसटीसी पण केले. आई म्हणाली आजी (आईची आई) होती म्हणून मला घरचे काही बघायला लागत नव्हते. आजी सर्व करायची.  माझे आजोबा, आम्ही त्यांना मामा म्हणायचो. दुपारचे जेवण झाल्यावर ते ग्रंथालयात जाऊन वाचत बसायचे ते संध्याकाळी घरी यायचे. 
या खोलीतच आईबाबा शिकवण्या घेत.  काही घरी जाऊन घेत. प्रभात रोड व भांडारकर रोडवर दोन घरी आईबाबा
मुलांना शिकवायला जात असत.
 
 
 जेव्हा आईला दिवस गेले तेव्हा साने माईना खूप आनंद झाला. आईला त्यांनी वर्षभराचे लोणचे घालून दिले.
माईंनी आणि आजीने आईचे सर्व डोहाळे पुरवले. आई सांगते आईला खूप कडक डोहाळे लागले होते. आईची सर्व प्रकारची डोहाळेजेवणे झाली. फक्त एक चांदण्यातले डोहाळेजेवण राहिले होते. मालू मावशी म्हणाली की गच्चीत चांदण्यातले  डोहाळेजेवण करू. आईला सांगितले की तू फक्त तळण कर बाकी इतर स्वयंपाक सर्व आम्ही करू. मग मालूमावशी (आईची मैत्रीण) तिचे यजमान व दोन मुली, सानेकाका आणि माई, आजी आजोबा, आईबाबा असे सर्व चांदण्यातल्या डोहाळेजेवणाला हजर होते. 
 
माझा  जन्म इथलाच सानेमाईंच्या बंगल्यातला. लक्ष्मीरोडवरच्या ताराबाई लिमये यांच्या दवाखान्यात माझा जन्म झाला. साने माईंना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी डॉक्टर होती. आणि त्यांचा मुलगा आणि सून फलणटला राहत असत. माईंंनी माझ्या आईवर मुलीप्रमाणे प्रेम केले. मी आईला ६ वर्षांनी झाले. साने माईंना खूप आनंद झाला. त्यांनि माझे बारसे खूप थाटामाटात साजरे केले. जिलबी करायला आचारी बोलावला होता. स्वयंपाकाला बाई बोलावली होती. पण ती बाई यायच्या आतच त्यांनीच बरासचा स्वयंपाक केला होता. 
 
साने माई आईला म्हणाल्या की तुझ्या नातेवाईकांना बोलाव.  शिवाय तुझ्या शिवणाच्या क्लासच्या मैत्रिणींनाही निमंत्रण दे. आई सांगते की  माईंचे आणि माझे मागच्या जन्मीचे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असणार, नाहीतर इतके कोणीही कोणासाठी करत नाही.
 
 
 माझे आजोबा मला दुपट्यात घेऊन गच्चीत सतरंजी टाकून खेळवत बसायचे. जेव्हा मी बसायला लागले तेव्हा आईकडे मुले शिकायला यायची त्यांच्यातच मी बसायचे. स्वयंपाकघराला जो पडदा होता तो मी माझ्याभोवती गुंडाळून घ्यायचे व पेन्सिली खायचे.


आम्ही पूरग्रस्त म्हणून मामांनी एक फॉर्म आणून भरला होता. ती जागा केव्हा मिळेल या चौकशीसाठी त्यांनि अनेक फेऱ्या मारल्या. शेवटी गोखलेनगरला भाड्याची जागा मिळाली. आईने जेव्हा माडीवाले कॉलनी सोडली तेव्हा आई रंजनाच्या वेळेस (म्हणजेच माझ्या बहिणीच्या वेळेस) गरोदर होती. निघण्याच्या वेळी मालूमावशीने (आईच्या मैत्रिणीने) माझे आवरले. मी पावणे दोन वर्षाची होते. मालूमावशीने माझ्या छोट्या केसाची एक शेंडी बांधली. माझे तोंड धुतले. किंचित पावडर लावून ओल्या गंधाचा एक ठिपका कपाळावर लावला. मला फ्रॉक घातला. दूध प्यायला दिले.
 
 
 आम्ही जेव्हा गोखले नगरला राहयला गेलो तेव्हा तिथे अजिबात वस्ती नव्हती.गोखले नगरला आम्ही स्थिरस्थावर झालो तेव्हा सानेमाई आईबाबांकडे येवून गेल्या आणि खूप रडल्या. आईला म्हणाल्या इतकी काय घाई होती जाण्याची ? इथे खूप विरळ वस्ती आहे. आमच्या इथेच राहिली असतीस तर काय बिघडले असते? गरोदर होतीस तर दुसरे बाळंतपणआमच्या घरीच करून जायचेस. तर माझे आजोबा म्हणाले अहो तुम्ही आम्हाला त्यावेळेला जागा दिलीत तेव्हा आम्हाला किती हायसे वाटले ते शब्दात सांगता येणार नाही. आम्ही पूरग्रस्त त्यामुळे लगेचच हालचाल करायला हवीच होती. नंबर लावून खोल्या तयार होत्या आणि चाळीतल्या दोन खोल्या मिळाल्या त्या लगेच घ्यायला हव्या होत्या म्हणून आम्ही तातडीने इथे आलो.


गोखलेनगरच्या जागेत जेव्हा आईबाबा रहायला आले तेव्हा आईला ७ वा महिना चालू होता. फेब्रुवारी महिन्यात माझी बहिण जन्माला आली. तिच्या जन्माच्या वेळेसच बाबांनी जाईचा वेल लावला. जाई आणि माझी बहीण एकाच वयाच्या ! 

No comments: