आजचा दिवस वेगळाच होता. नव्या वर्षातले हे माझे पहिलेच रोजनिशीतले पान ! आजकाल रोजनिशी लिहिली जात नाही. विल्मिंग्टनला असताना काही ना काही वेगळे घडायचे आणि ते लिहिले जायचे. तर आजचा दिवस आनंद देणारा होता. व्हॉटस ऍप वर एक युट्युबची लिंक मला माझ्या मैत्रिणीने फॉरवर्ड केली ती होती दोन बहिणींची वय वर्षे ८८ आणि ८६ मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला वड्या कश्या
बनवायच्या ते शिकविले. वड्या होत्या सफरचंदाच्या आणि त्यामध्ये घातला होता ओला नारळ.
या वड्या मी त्यांच्या पद्धतीनुसार करून पाहिल्या. चव छान लागते. सफरचंदाचा स्वाद छान लागतो. आज कराओकी ट्रॅकवर कही दूर जब दिन ढल जाए हे गाणे रेकॉर्ड केले. तेही मनासारखे झाले. हे गाणे मला खूपच आवडते. यात फिलोसॉफी सांगितली आहे आणि कवीची कल्पना तर खूपच छान आहे.
आज बरेच दिवसांनी साबुदाणे वडे केले. काल मी माझ्या आईबाबांची एक आठवण लिहिली ब्लॉगवर. त्या आठवणीमध्ये मी आजही आहे. आईला फोन करते तेव्हा गप्पांच्या ओघात काही वेळेला तिच्या तरूणपणातल्या आठवणी सांगते. मग मी पटपट वहीत लिहून घेते आणि ब्लॉगवर टंकते.
No comments:
Post a Comment