Friday, February 19, 2021

वास्तू (९)

 

माडीवाले कॉलनीतून आईबाबा,आजोबा व मी (वय वर्ष दीड) गोखले नगर पूरग्रस्त कॉलनीमध्ये रहायला गेलो ते वर्ष होते १९६५. माझी बहीण नंतर काहीमहिन्यातच इथे जन्मली. आमचे घर कडेला होते त्यामुळे बाजूची मोकळी जागा पण आम्हाला मिळाली. तिथे आईबाबांनी फुलाफळांच्या बागा फुलवल्या. बाबांनी जाईचा वेल लावला. तो वेल अजूनही त्याच जागी उभा आहे गेली ५५ वर्षे. जाईने आम्हाला भरभरून प्रेम दिले. मागे आणि पुढे आंगण होते की जे आधी मातीचे होते. नंतर फरशी टाकली त्यामुळे ती जागा पण वापरण्यासाठी उपयोगी पडली.
 
 
 
आमच्या दोघींच्या लग्नकार्यात ही जागा खूपच उपयोगी पडली. इथे होमहावन झाले. जेवणाच्या पंगती उठल्या. भोंडला व्हायचा. अर्थात मातीच्या अंगणात पण आम्ही भोंडले साजरे केले आहेत. फरशी टाकल्यावर उन्हाळ्यात बाहेरच्या अंगणात काही वेळा झोपायचो देखील. इथे झोपले आणि वर पाहिले की भव्य आकाश दिसायचे आणि त्यावर चमचमणाऱ्या चांदण्याही दिसायच्या. इथे बसून बाबा भूताच्या गोष्टी सांगायचे.मला आईने हेलवाडे बाईंच्या शाळेत घातले. माझी माँटेसरी सुरू झाली. नंतर महाजन मावशीची शाळा सुरू झाली. महाजन मावशी आईची खास मैत्रीण होती. ती आमच्या चाळीला लागून जी चाळ होती तिथे राहत होती. नंतर मी बाल शिक्षण मंदीर या शाळेत पहिलीत गेले. तेव्हा बाबा मला सायकवर बसवायचे आणि शाळेत सोडायचे. आई मला न्यायला यायची. त्याकरता तिला डोंगर चढून यावे लागे. आईच्या मैत्रिणी सोबत असायच्या. येताना मी आणि आई आरेभुषण इथल्या बस स्टॉपवर यायचो आणि तिथून बसने घरी यायचो. माझ्या बहिणीलाही शाळेत जायचे असायचे. मग आई तिला आजीच्या शाळेत सोडायची. आमच्या शेजारी भालेराव कुटुंब राहयचे. आई रंजनाला एक दप्तर द्यायची. त्यात पाटी पेन्सिल व खाऊचा डबा द्यायची आणि आजीच्या शाळेत सोडायची. ती पाटीवर रेघोट्या मारायची व अनेक गोल गोल काढायची. घरी आल्यावर तिला तिने केलेल्या अभ्यासावर बरोबर किंवा चुक अशी खुण केली की तिचे समाधान व्हायचे. माझे मराठी पुस्तक तिला तोंडपाठ होते. 
 
 
 
नंतर ती महाजन मावशीच्या शाळेत जायला लागली. नंतर आम्हाला केसकरांची रिक्शा लावली शाळेत सोडायला आणि आणायला. रिक्शात मी रंजना आणि भाग्यश्री अशा तिघी जायला लागलो. रिक्शामध्ये बसल्यावर कडेला कोण बसणार यावरून आमच्या तिघींचे रुसवे फुगवे होत असत. केसकर काका म्हणायचे भांडू नका. मी सांगीन कडेला कोण कधी बसणार ते ! सकाळची शाळा असली की आम्ही मेतकुट तूप भात खाऊन जायचो. ५ वीत गेल्यावर सकाळच्या सुधा नरवणे च्या मराठी बातम्या सुरू झाल्या की आम्ही बसने जायला बाहेर पडायचो.दुपारची शाळा असली की ११ वाजता लागणारी मराठी गाणी संपता संपता बाहेर पडायचो. बसने जेव्हा जायचो तेव्हा मधल्या स्टॉपवर बस काही वेळा थांबायची नाही. मग आम्ही शेवटच्या बस स्टॉपवर जायला लागलो. बसने जाता येता आमचे घर दिसायचे. 
 
 
 
बसला गर्दी खूप असायची. शाळा सुटली की डेक्कन जिमखान्यावर बसने जाण्यासाठी यायचो. ही मोठीच्या मोठी रांग असायची. खूप वेळ बस लागलेली नसायची आणि नंतर २ ते ३ बसेस सोडायचे. मग एकच गलका व्हायचा. रांगा तोडून बसमध्ये शिरायला गर्दी व्हायची. त्यावेळेला बहुतेक १० पैसे तिकीट होते. गोखले नगरला ३ बसेस होत्या. एक शनिपार, दुसरी डेक्कन जिमखाना आणि तिसरी पुणे स्टेशन. ९०,५८ आणि १४६ असे बसचे नंबर आठवतात. शेजारचे भालेराव व आमचा खूप एकोपा होता. भालेरावांच्या शेजारी आधी फुले राहयचे. नंतर तिथे शहा कुटुंब रहायला आले. त्यांना तीन मुले अमित, डिंपल आणि सिंपल. आमच्या दोघींच्या साखरपुड्याच्या वेळी आणि लग्नाच्या वेळी उठण्या बसण्याकरता आम्ही त्यांच्या जागा वापरल्या. शेजारच्या आजीला बरे नसले की आई पोळी भाजी द्यायची आणि आईला बरे नसले कि आजी द्यायची. काकाचे लग्न झाले तेव्हा त्याच्या बायकोला आम्ही मामी म्हणायचो. नंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मंदार. हा मंदार आमच्याकडे लोणी खायला यायचा. काकाच्या लग्नात आमची जागा त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना उठाबसायची केली होती.सिंपल डिंपल आमच्या घरच्याच होऊन गेल्या होत्या. भाग्यश्री कडे जेव्हा टेलिविजन आला तेव्हा आम्ही दोघी बहिणी तिच्याकडे रविवारचा संध्याकाळचा सिनेमा पहायला जायचो. 
 
 
 
महाजनमावशीकडे उभ्याच्या गौरी असायच्या. त्यांना घेतलेल्या माळा नंतर ती आम्हाला द्यायची. आमच्याकडे आईबाबा शिकवण्या घ्यायचे तेव्हा त्या मुलांचे आई वार्षिक स्नेहसंमेलन करायची. त्याकरता आई तिखटमिठाच्या पुऱ्या, बटाटेवडे, गुलाबजाम, गोडाचा शिरा असे काय काय करायची. तेव्हा महाजन मावशी व पंडीत मावशी आईच्या मदतीला यायच्या. सविता ही पण आमची बालमैत्रिण. तिचे घर आमच्या घरापासून लांब होते. जोशी काकू, पंडित काकू, आई आणि सरपोतदार काकू या चार जणांची कुटुंब मैत्री होती. महाजन मावशीच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी आई अगदी मुलगी पाहण्या पासून भाग घ्यायची. तिची सून भारतीवहिनी आणि आईची अगदी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत आहे. भारती आणि आई भारी उत्साही. त्या दोघी मिळून ७ किलोच्या दोघींच्या मिळून कुरडया घालायच्या. सामोसेही करायच्या. सामोसे जेव्हा करायच्या तेव्हा आम्ही दिवसभर येताजाता सामोसे खायचो. 
 
 
 
संध्या ठाकूर ही पण आमची कुटुंब मैत्रिण झाली. तिचे वर्कशॉप आमच्या घराच्या समोर होते. ती आमच्याकडे पाणी प्यायला यायची आणि नंतर घट्ट मैत्री झाली ती आजतागायत आहे. पूर्वी चाळ व वाडे संस्कृतीत अशी माणसे जोडली जायची. एकमेकांना हवे नको विचारले जायचे. संकटकाळी एकमेकांना मैत्रीचा हात देत असत. आणि ही मैत्रीची कुटुंबे इतकी वर्षे झाली तरीही एकमेकांना घट्ट धरून आहेत हे विशेष. आता आई ज्या सोसायटीत राहते तिथेही छान वातावरण आहे मैत्रिचे. गोखलेनगर सोडूनही आता बरीच वर्षे झाली. साधारण २००२-२००३ मध्ये आईबाबा रंजनाच्या सोसायटीच्या बाजूच्याच सोसायटीत राहायला आले. गोखले नगरच्या अजूनही काही आठवणी आहेत त्या पुढील भागात लिहीन. वास्तू या शीर्षकाचे ८ भाग लिहून झालेत ते  पुढील दिलेल्या लिंकवर वाचता येतील.
 
 
क्रमश : ....

No comments: