अमेरिकेतले जीवन कसे आहे ते इथे येणाऱ्या मुलींकडून कळते म्हणजे त्या व्हिलॉग करतात. विडिओच्या माध्यमातून बोलून थेट ते सर्वांपर्यंत पोहोचते. पण खूप पूर्वी म्हणजे आम्ही आलो २००१ साली, त्याही आधी इथले जीवन कसे आहे ते सर्वांपर्यंत तर नाहीच नाही तर आईवडिलांना पण सांगता यायचे नाही. कॉलिंग कार्डवर खूप कमी मिनिटे मिळायची. त्यात एकमेकांच्या तब्येती बद्दलच बोलले जायचे. परदेशातच नाही तर भारतात स्वत:चे जन्मस्थान सोडून मुली लग्न होऊन/नोकरी-शिक्षणा निमित्ताने तर मुलं शिक्षण/नोकरी निमित्ताने त्याच राज्यातल्या दुसऱ्या शहरी किंवा दुसऱ्या राज्यातल्या शहरात गेले तर मिळतेजुळते घ्यावे लागते. मदत मिळते पण संघर्ष खूप करावा लागतो. नंतर रूळले जाते. पूर्वी पण घरोघरी फोन नव्हतेच. त्यामुळे सुट्टी/रजा मिळेल तेव्हा येणे होत असे. एरव्ही पत्रातून खुशाली कळवली जायची. दुसऱ्याच्या घरी रहाताना किंवा पेईंग गेस्ट असलेल्या ठिकाणी तिथल्या माणसांची मिळतेजुळते घ्यावे लागते.
त्यातून प्रायव्हेट कंपनी असेल तर कामाचे तास जास्तीचे. रजा/सुट्या कमी असतात. ज्यांना जन्मस्थान सोडून कुठेही जावे लागत नाही आणि त्यात सरकारी नोकरी असेल तर भरपूर सुट्या, रजा, कामाचे तास कमी, युनियनचा पाठींबा, निवृत्ती नंतर पेंशन. त्यातही महागाई वाढली की महागाई भत्ता पण वाढतो. असे सर्व भाग्यवान ! त्यांना संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळेच जेव्हा पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या त्यांना नोकरी जाईल असा ताणतणाव नसायचा. तिथे ताणतणाव नाहीच असे काही माझे मत नाही पण तुलनेने दुसऱ्या शहरात इतरांशी मिळतेजुळते घेऊन प्रायव्हेट नोकरी टिकवायची हे जास्त कष्टदायक आहे.
अमेरिकेत एच वन विसा मिळाल्यानंतरही टांगती तलवार असतेच. कोणत्याही कारणानिमित्त नोकरी गेली की ठराविक दिवसाच्या आत तुम्हाला देश सोडावा लागतो. नवऱ्याच जे वन विसा बायकोचा जे २ विसावर वर्क पर्मिट काढता येते. नवऱ्याच्या एच वन विसावर बायकोचा डिपेंडंट विसा होतो तो असतो एच ४ की ज्यावर वर्क पर्मिट काढता येत नव्हते. आता येते असे ऐकले आहे. अमेरिकेत आल्यावर कुणाला कधी पाहण्याची शक्यताच नाही असे सर्वजण एकमेकांना मदत करतात. जसे की आम्ही जेव्हा आलो तेव्हा संपतकुमार व त्याची बायको सत्या यांना दुसऱ्या शहरात संशोधनासाठी जावे लागले. त्यामुळे त्यांना लीज टेकओव्हर कुणी केले तर बरे होईल असे वाटत होते. त्या दरम्यान आम्ही तिथे होतो. तिथे आम्ही काही अपार्टमेंट पाहिली तर कोणतीच पसंत पडत नव्हती. निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता. ऍलन यांनी आम्हाला सुचविले की तुम्ही संपतकुमारचे लीज टेकओव्हर करा आणि तसे आम्ही केले कारण की विसा १ वर्षाचाच होता आणि जरूरीचे फर्निचर त्या जागेत होते की जे त्यांचेही नव्हते. असेच कुणी कुणी जाताना ते सोडून गेले होते. संपतकुमारने आमचे आभार मानले. त्यांचे बरेच पैसे वाचले आणि आम्हालाही इथल्या जागेत राहण्याची सुरवात करायची होती.
पवनकुमारची बायको गरोदर होती तेव्हा भारतावरून तिच्या बाळंतपणासाठी कोणी येणार नव्हते. तिला आई नव्हती. तिचे बाळंतपण शेजारी रहाणाऱ्या प्रविणाने केले. तिचे डोहाळेजेवण पण केले. इथे काही भारतासारखे नसते. डोहाळेजेवण एकदाच होते ते सुद्धा मैत्रिणी मिळून ठरवतात. प्रत्येक जण एकेक पदार्थ आणतात सर्वांना पुरेल असा. येताना त्या बाळाला लागणाऱ्या सर्व वस्तु/कपडे आणतात. तेही कोणी काय काय आणायचे ते ठरवतात. भारतात बाळ जन्माला आल्यानंतर कपडे दिले जातात. शिवाय ज्या मुलगी गरोदर आहेत तिचे सर्वजण कौतुक करतात. नातेवाईक मित्रमैत्रीणी असे सर्वजण तिचे वेगवेगळे डोहाळेजेवण करतात.
आम्ही दोघे कविताच्या डोहाळेजेवणाला हजर होतो. खरे तर दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या राज्यातल्या एका शहरात जाण्याकरता निघणार होतो. विनुला २ वर्षासाठी संशोधन करण्याचा विसा मिळाला होता. प्रविणा म्हणाली तिच्या नवर्याला की आपण रोहिणी गेली की कविताचे डोहाळेजेवण करू. पण श्रीनिवास म्हणाला की ती असतानाच कर. तिला पण एंजॉय करू देत. आमच्या सामानाची बांधाबांध सुरू होती म्हणून आम्हाला कागदी डिशा, पेले आणि २/३ प्रकारची थंड पेये घेऊन जायची होती. ५ जणींनी ओटी भरायची असते तर मला आधी भरायला सांगितली कारण मी त्या ५/६ बायकांमध्ये मोठी होते. डोहाळेजेवणाला फक्त ४-५ फॅमिलीच होत्या.
माझी व माधवीची छान मैत्री झाली होती. ती लग्न झाल्यावर लगेचच अमेरिकेत आली होती. दिवाळीच्या दिवशी आम्ही त्या दोघांना जेवायला बोलावले होते. ती म्हणाली की ते दोघे मंदीरात जाणार होते. त्यांच्याकडे कार होती. मला म्हणाली की तुम्ही दोघे पण या. मी म्हणाले नाही. तुम्ही दोघे जा. तुमचे नवीन लग्न झाले आहे म्हणूनच मी तुम्हाला दिवाळीचे बोलावले आहे. मंदीरात जाऊन लगेच आमच्याकडे जेवायला या. आमच्या घरी मल्लीकार्जुन नावाचा एक जण ४ दिवस राहिला होता. त्याला अपार्टमेंट मिळत नव्हते. म्हणजे त्याला अजून कोणीतरी अपार्टमेंट शेअर करण्यासाठी हवे होते. तसेच क्लेम्सनला प्राध्यपक डीटर यांनी आमच्यासाठी मोटेल मध्ये बुकींग केले होते. आमची थेट फ्लाईट चुकली होती त्यामुळे सव्यापसव्य करून १२ तासांनी आम्ही क्लेम्सनला पोहोचलो होतो. रात्रीचे १२ वाजले होते. खूपच दमायल झाले होते. सकाळी उठल्यावर एक सुखद धक्का बसला. मोटेलचे मालक गुजराथी होते. त्यांनी आम्हाला गरम गरम मसाला चहा आणून दिला. ते म्हणाले आम्ही असे कुणाला देत नाही. तुम्ही भारतीय आहात आणि खूपच दमलेले दिसत आहात म्हणून देत आहोत. चहा प्यायल्यावर आम्हाला दोघांनाही खूपच तरतरी आली. चहा पिऊन आम्ही लगेच मोटेल सोडले.
क्लेम्सन मध्ये आम्हालाही अपार्टमेंट मिळत नव्हते. डेंटन (टेक्सास) सोडण्या आधी अपार्टमेंट फाईंडर पुस्तकातून मी फोन लावले होते पण कोणतेही मिळाले नाही. डॉक्टर डीटर यांनी येमुल-सुनिताला पटवले होते की एक कपल येत आहे त्यांना तुम्ही तुमच्याकडे ठेऊन घ्या त्यांना जागा मिळेपर्यंत आणि म्हणूनच आम्ही येमुल-सुनिताकडे ८-१० दिवस राहिलो होतो. येमुल सुनिता कडे गेल्यावर सुनिताला खूप बरे वाटले. ती म्हणाली बरे झाला तुम्ही आलात ते. इथे कोणीच माझ्याशी बोलायला नाही. मी तिच्याकडे रहात असताना पोळ्या करायचे. मी प्रथमेश (तिचा मुलगा) ला सांभाळायचे त्यामुळे तिची कामे व्हायची. येमुल पण संशोधन करत होता. त्यांच्याकडे जी कार होती ती चांगली नव्हती. मध्येच बंद पडायची. त्यामुळे तो फक्त ग्रोसरी आणण्याकरता कार वापरत असे. त्यांचे घर डोंगरावर होते. विनु रोज सकाळी डोंगर उतरून व येताना चढून लॅब मध्ये ये-जा करायचा. आम्हाला जेव्हा अपार्टमेंट मिळाले तेव्हा मी सुनिताला बोलावले. येमुल एका कॉन्फरस्न साठी जाणार होता. तिला म्हणाले सकाळपासूनच ये. सकाळी न्याहरी साठी तिखटामिठाचा शिरा बनवला. नंतर जेवण केले व तिला सांगितले की तू झोप थोडा वेळ. मी प्रथमेश कडे लक्ष देते. निवांत झोप. ती झोपेतून उठल्यावर तिला गरम चहा दिला. मला म्हणाली की मला इतकी शांत झोप लागली होती त्यामुळे खूप बरे वाटले.
येमुल सुनिताला काही कारणाने संशोधन सोडावे लागले व भारतात कायमचे जावे लागले. निघायच्या आधी ४ दिवस ती दोघे, प्रथमेश व आम्ही दोघे आमच्या एका खोलीत रहात होतो. मी तिला तिच्या ४ बॅगा व्यवस्थित लावून दिल्या. ती म्हणाली तुम्ही होतात म्हणून. नाहीतर मला काही सुधारलेच नसते. तिच्या मुलाला ती सांभाळायची व आमच्या चौघांचा स्वयंपाक मी करायचे. सुनिताला जेवताना मी म्हणले की भरपूर आईस्क्रीम खाऊन घे. भारतात गेल्यावर इतके खूप मिळणार नाही. आमच्या सगळ्यांच्याच घरी फ्रीझर मध्ये आईस्क्रीमचे डबे असायचे. एक आठवण म्हणून मी प्रथमेशला एक ड्रेस घेतला होता. सुनिता खूप खुश झाली होती. copy right rohini gore
क्रमश : ....
See less
No comments:
Post a Comment