Monday, October 02, 2017

इंगल्स मार्केट ... (५)

एके दिवशी मी फ्लोअर चेक करत होते त्यादिवशी विकी मला कॅफे मध्ये बसलेली दिसली आणि ती रडत होती. मी मनात म्हणले नक्कीच काहीतरी झालेले आहे. ती आल्यावर मी तिला विचारले काय झाले? तर ती म्हणाली की जेमी डेली मॅनेजरने तिला झापले. मी म्हणाले का? तर म्हणाली जेमिचे असे म्हणणे की "मी (विकी) हॉट बार आणि सब बार ला मदत करत नाही." मी म्हणाले करतेस की तू मदत. आपण सगळ्याजणीच करतो.
डेली सेक्शनला असे आहे की हॉट बार आणि सब बार ला कुणी कस्टमर आले तर Customer Service First तिथे नेमलेल्या बायका असतात पण खूप गर्दी झाली तर आम्ही उत्पादन विभागातल्या, सुशी विभागातल्या बायका त्यांच्या मदतीला जातो. मी विकीला सांगितले रडू नकोस. ती बोलली ते मनावर घेऊ नकोस. बी हॅपी आणि मी तिला हग केले. तसे तिच्या चेहऱ्यावर थोडे हासू उमटले. नंतर २ दिवसांनी माझ्याबरोबर काम करणारी कार्मेन हिने मला सांगितले की विकी जेमिला म्हणाली की रोहिणी तिला मदत करत नाही. तेव्हा जेमी विकिला म्हणाली की रोहिणीला मध्ये आणू नकोस. तेव्हा मी कार्मेन ला सांगितले असे काहीच नाहीये. मी पण हॉट बारला मदत करते. नंतर जेमीने डेली मॅनेजरची जागा सोडली आणि Customer service या पोस्टवर गेली. ती म्हणाली की डेली सेक्शनला खूप कामाचे प्रेशर आहे.नंतर त्या जागी दुसरा डेली मॅनेजर आला. त्याने जेमिकडून ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली आणि १५ दिवसानंतर कामाचे खूप प्रेशर आहे हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून गेला. नंतर आला ऍडम. हा ऍडम मीट केसमध्ये काम करत होता आमच्याच स्टोअरला त्याने हे काम स्वीकारले. त्याने ३ महिने काम केले. काम चांगल्या रितीने सांभाळत होता. आणि नंतर तोही कामाचे प्रेशर खुप आहे. लोक माझे ऐकत नाहीत. मला मॅनेज करणे कठीण जात आहे म्हणून तोही सोडून गेला. आता मॅनेजरची पोस्ट Assistant Manager तेरेसाने घेतली आहे. ती रेसिस्ट आहे.


आम्ही जेव्हा कामावर येतो तेव्हा संगणकावर आल्याची नोंद करतो. शिवाय काम संपवून जातो तेव्हा आणि जेवणाच्या वेळेला जाताना आणि येताना अश्या प्रकारे सर्व प्रकारच्या नोंदी कराव्या लागतात. तिथेच एका चार्टवर कामावर असताना तुमचे वर्तन कश्या प्रकारे असू नये हे लिहिलेले आहे. शिवीगाळ करणे, अश्लील बोलणे-वागणे इ. इ. करू नये. जर का कुणी अश्या प्रकारे वर्तन केले आणि जर का कुणी कुणाची तक्रार केली की लगेचच त्याला/तिला कामावरून काढून टाकले जाते. आमच्या डेली विभागात दोन बायका आहेत त्या सगळ्यांना ऑर्डरी सोडत असतात जणू काही त्याच मॅनेजर आहेत ! हो, असे वाटते काहींना.




हॉट बार - सब बार ला एक आफ्रीकन अमेरिकनची नेमणूक झाली होती. तिच्यावर वर म्हणल्याप्रमाणे मॅनेजर समजून ऑर्डर सोडणारी एक बाई खेकसली. तिला ते सहन झाली नाही आणि तिने डेली मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर कडे तक्रार न करता थेट एचआरडी कडे तक्रार केली. हे तिने उत्तम काम केले. एचआरडी कडून डेली मॅनेजर करवी त्या दोघींना चांगलाच "हग्या दम " मिळाला की "जर पुन्हा असे वर्तन केले तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल" दुसरी जी बाई आहे खेकसणारी तिने एका अमेरिकन बाईला ढकलले आणि हे प्रत्यक्ष डोळ्याने कार्मेन आणि रोझने पाहिले. ती बाई म्हणाली की मी नोकरी सोडते. तर कार्मेन म्हणाली तू कशाला नोकरी सोडतेस. तू तक्रार नोंदव. तुला न्याय मिळेल. अश्या रितीने दोन बायकांनी दोन बायकांविरूद्ध तक्रारी केल्या आणि त्यांना दम भरला की परत जर का असे केलेत तर तुहाला "टाटा बाय बाय" करावे लागेल.


डेली मॅनेजरचा त्या दोघी खेकसणाऱ्या बायका तिच्या मर्जीतल्या आहेत. एके दिवशी असे झाले की मीट केसमध्ये एक अमेरिकन बाई आहे ती आफ्रीकन अमेरिकन बाईला म्हणाली की मी तुला मीट कापून देते. तू तेव्हढे ते रॅप करून घे. माझ्याकडे आज खूप कस्टमर आहेत त्यामुळे मला वेळ नाहीये. तर ती आफ्रीकन अमेरिकन बाई वैतागली जिने तक्रार नोंदवली होती ती ही बाई. तिने मीट केसमधल्या त्या अमेरिकन बाईला तिच्या तोंडावर शिवी दिली. लगेच तिने डेली मॅनेजरला सांगितले आणि डेली मॅनेजरने तिला लगेचच कामावरून काढले.आता हिने तरी शिवीगाळ करावी का? बरे केली तरी शिव्या देण्यापेक्षा एखाद्याला ढकलणे हा जास्त मोठा गुन्हा आहे. डेली मॅनेजरने तिलाही दम भरला असता की एक वेळ सोडून देते. दुसऱ्या वेळी कामावरून काढण्यात येईल. तिला एक चान्स द्यायला हवा होता. बहुतेक डेली मॅनेजरला आफ्रीकन अमेरिकनने एच आरडी कडे तक्रार केल्याबद्दल राग आलेला असावा आणि सहनही झाले नसावे.

No comments: