1 Jan 2019
संध्याकाळच्या सुमारास साडेसात वाजता मी भाजी फोडणीला टाकली आणि ध्यानीमनी नसताना वीज गेली. चोहीकडे दाट अंधार पसरला. स्वयंपाकाघरातल्या एका कपाटात मी नेहमीच एक मेणबत्ती आणि काडेपेटी ठेवते.
अंधारातही न चाचपडता ती मेणबत्ती आणि काडेपेटी काढली. आणि लावली.
लगच्यालगेच निर्णय घेऊन बाहेर जेवायला गेलो. कारण की इथे इलेक्ट्रिक
शेगड्यांवर स्वयंपाक असतो. आता कधी वीज येईल आणि बाकीचा स्वयंपाक होईल याचा
विचार करत बसलो असतो तर उपाशीपोटी झोपायला लागले असते. बाहेर जेवायला
जाण्याअगोदर आठवणीने मेणबत्या विझवल्या. भाजी फोडणीला टाकली होती ती शेगडी
बंद केली आणि बाहेर पडलो.
बाहेर पडून चौकात गेलो तर तिथे खूप मोठा राडा झालेला होता. ऍक्सीडेंट झाला होता. पोलीसच्या गाड्या उभ्या होत्या. कोणी जखमी झाले असेल तर त्यांना हॉस्पीटल मध्ये पोहोचवण्यासाठीच्या गाड्याही उभ्या होत्या. सिग्नल्स चालू नव्हते. चौक बंद करून ठेवला होता. त्यामुळे दुसऱ्या लेन मध्ये जाऊन उजवीकडे वळून परत मुख्य रस्त्याला लागलो. नंतरच्या रस्त्यावर लाईटी होत्या. ठार अंधार आणि नंतर लगेच लाईटी दिसल्या तर अगदी झगमगाट झाल्यासारखाच भास झाला. एक तर वीज गेलेली आणि त्यात हा झालेला अपघात. अर्थात नंतर कळाले की या अपघातामुळेच काही ठीकाणची वीज गेली होती. एका खांबाला एक कार आदळ्याने असे झाले होते.
जेवण करून घरी आल्यावर परत मेणबत्या लावल्या आणि झोपलो. पण झोप कुठची यायला. नशीबाने थंडी नव्हती. थंडी असती तर खूपच कुडकुडायला झाले असते. वीज खात्यात फोन केला तर रात्री ११ वाजता वीज येईल असे सांगितले. गादीवर पडून राहणे याशिवाय दुसरे काहीही करता येत नव्हते. ना इंटरनेट, ना टिव्ही, ना फेबुवर जाता येत होते. वीज केव्हा येईल याची वाट पाहता पाहता केव्हातरी थोडा डोळा लागल्यासारखे झाले आणि नंतर सर्व घरामध्ये लक्ष लक्ष दीप उजळले आणि जाग आली. इतके काही हायसे वाटले. जीव
आल्यासारखा वाटला. डुलकीतून जाग आली तेव्हा २०१८ संपत आले होते आणि २०१९ ची सुरवात झाली होती. घड्याळ पाहिले तर ३१ डिसेंबरचे १२ वाजून काही मिनिटे झाली होती. फोडणीला घातलेली भाजी केली आणि नंतर कॉफी करून प्यायली. झोप उडाल्याने आणि मला काहीतरी खरडावेसे वाटले. नेट चालू झाल्याने आजच्या सारख्या अजून २ आठवणीही लिहिण्याचे ठरवले. आणि नवीन वर्षाच्या सुरवातीला टंकण्याचे काम करून मी झोपेन.
२००१ सालची गोष्ट. टेक्साज मध्ये आमच्या ४ कुटुंबांचा एक ग्रुप झाला होता. ३१ डिसेंबर २००१ चे सेलीब्रेशन काही वेगळेच होते. ३ तेलगू कुटुंबीय आणि आणि आम्ही गोरे मराठमोळे. मी नेहमीप्रमाणेच बटाटेवडे केले होते. ८० बटाटेवडे तळले आणि राहत्या अपार्टमेंटचा स्मोक डिटेक्टर वाजायला लागला. थंडी तर मरणाची होती. मायनस ५ अंश सेल्सियस मध्ये तापमान आणि हिमवृष्टीही चालू होती. दार काही मिनिंटाकरता उघडे ठेवले तेव्हा तो स्मोक डिटेक्टर वाजायचा थांबला. आम्ही दोघे प्रविणा आणि नागाच्या कारमध्ये बटाटेवड्यांचा डबा घेऊन बसलो. एकीने गुलाबजाम, एकीने पुलीहरा, एकीने लेमन राईस, तर स्वीट डिश म्हणून गुलाबजाम केले होते. शिवाय केकही होता. दिवसभर आम्ही सगळ्याजणी ठरवलेले पदार्थ करत होतो. शिवाय दुपारचे जेवण, त्यानंतरची भांडी घासली. परत ठरवलेले पदार्थ करून तीही भांडी घासली. सगळे करून खूपच दमायला झाले होते. एकीच्या घरी जमलो. आणि गप्पा टप्पा केल्या. त्यात अंताक्षरी खेळलो.
अंताक्षरी मध्ये हिंदी, मराठी, आणि तेलगू गाणी होती. मग थोडे जेवलो. जेवण कुणालाच नीट गेले नाही. १२ वाजता सर्वांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि घरी परतलो. दुसऱ्या दिवशी डॅलसला मंदीरात जाणार होतो. पण दुसऱ्या दिवशी हिमवृष्टी बरीच वाढली असल्याने बेत रद्द केला. आदल्या दिवशीचे बनवलेले जेवण सगळ्यांनीच वाटून घेतले होते त्यामुळे नवीन वर्षाचा दुपारच्या जेवण करायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या अन्नाची चव खूपच छान लागली. अश्या रितीने नवीन वर्षाची सुरवात आगळीवेगळी
झाली. त्याचप्रमाणे २०१९ ची सुरवातही झाली. अशीच एक आगळी वेगळी सुरवात नव्या वर्षाची म्हणजेच १९८४ सालची. १ जानेवारी १९८४ साली माझ्या सासूबाईंनी आमच्या दोघांचा कांदेपोहे कार्यक्रम अचानक ठरवला. सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला. कांदेपोच्यांचा कार्यक्रमानंतर मी कामावर गेले. विनू त्याच्या आईवर खूपच चिडला होता. त्याने नोकरी सोडून पिएचडी करण्याचा निर्णय घेतला होता. माझा चेहराही चांगलाच वाकडा झाला होता. कारण मला काहीही केल्या पुणे सोडायचे नव्हते. सासूबाईंनी माझ्या हातात कांदेपोच्यांची डिश आणून दिली. चहाही दिला. आम्ही दोघे एकमेकांकडे अधून मधून कटाक्ष टाकत होतो. आम्ही दोघे काहीच बोललो नाही.
विनुने मला फक्त एक प्रश्न विचारला "तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करता? " तर मी उत्तर दिले "पर्चेस" आमच्या दोघांचे आईवडील खूप गप्पा मारत होते. आई आणि सासऱ्यांचा पनवेली गप्पा तर बाबा आणि सासूबाईंच्या पुणेरी गप्पा. मध्ये ४ वर्षे गेली. बरेच काही घडले.
आणि सरतेशेवटी १९८८ साली आम्ही दोघे विवाहबद्ध झालो. आणि आयायटी पवई
वसतीगृहात रु.१२०० शिष्यवृत्तीमध्ये आमच्या दोघांचा संसार सुरू झाला. Wishing you All A very Happy New Year 2019
rohini gore :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment