आमच्या वेळी म्हणजे शाळा कॉलेजात असताना फोनपर्व नव्हते. अगदी मोजूनच
काहीजणांकडे फोन होते. ज्यांच्याकडे फोन असायचा त्यांचा टेलिफोन नंबर
त्यांना विनंती करून घ्यायला लागायचा आणि अगदी महत्वाचा निरोप असेत तरच
तुमच्याकडे आमच्याकरता फोन येईल हे सांगावे लागायचे आणि तेही आनंदाने
द्यायचे. काही जण फोन करण्यासाठी किंवा निरोप देण्ञासाठी पैसे घेत असत. १
रूपया किंवा 50 पैसे असत. आम्हां दोघी बहिणींच्या लग्नानंतर आमच्या घरी फोन
आला. मी डोंबिवलीवरून पुण्याला आईकडे जायचे तेव्हा गेल्या गेल्या रंजनाला
तिच्या ऑफीसमध्ये तिला फोन करायचे. डोंबिवलीच्या आमच्या घरी आम्ही फोन
घेतलाच नव्हता. तिथेही आमच्या सोसायटीत वर मामी राहतात त्यांच्याकडे काही
निरोप असल्यास फोन येत असे.
लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहायचो
तेव्हा पण वसतिगृहाच्या खाली एक सार्वजनिक फोन होता. तिथे मला आईबाबांचा
फोन यायचा. खुशाल आहात ना? असे फोनवरून ऐकल्यावर खूपच छान वाटायचे.
वसतिगृहाच्या खाली बसलेला वॉचमन फोन आला की आमच्या खोल्यांचे नंबर
पुकारायचा. आणि मग मी तिसऱ्या मजल्यावरून खाली जिन्याने भराभर उतरून
यायचे. पूर्वी सर्वजण आपापली खुशाली पत्राद्वारे कळवत असत. फोन फक्त
गरजेपुरताच होता.
जेव्हा टेलिफोन बूथ निघाले तेव्हा मग जरा काही
जास्तीचे बोलायचे असेल तर फोन करत असे. डोंबिवलीत राहत असताना आमच्या
सोसाटीच्या इमारतीच्या समोरच्या इमारतीत एक बूथ झाला होता. तिथे जाऊन मी
आईला आणि रंजनालाही फोन करत असे. आम्ही जेव्हा अंधेरीत कंपनीच्या जागेत
रहायला गेलो तेव्हा आमच्याकडे फोन आला. तोपर्यंत आम्ही फोन घेतला नव्हता.
एक तर मी दर २ ते ३ महिन्यांनी पुण्याला सासरीमाहेरी जायचे. त्यामुळे नुसती
खुशालीच नाही तर भरपूर गप्पाही व्हायच्या आणि प्रत्यक्ष भेटल्याचा
आनंदही व्हायचा. अंधेरीच्या जागेत रहायला गेल्यावर आमच्याकडे फोन आला.
आणि मग आम्ही फोन करायचो पण खूप नाहीच. आईचा फोन यायचा, फक्त ती कुठे
बाहेरगावी जाणार असेल तर तसे सांगायला मला फोन करायची.
नंतर
घरोघरी फोन झाले. आणि अमाप गप्पाही सुरू झाल्या. एवढेच नाही तर फोनवर
रेसिप्याही सांगितल्या जायच्या. फोनची बिले जेव्हा अवाच्या सवा यायची
तेव्हा घराघरात ओरडे खायला लागायचे. नंतर फोनही स्वस्त झाले. ऑफिसमध्ये
जेव्हा कामाला होतो तेव्हा मला आठवतय ऑफीसमध्ये वेगळी टेलिफोन ऑपरेटरची
पोस्ट असायची. ती बसायची त्यापुढे एक भले मोठे कपाटासारखे काहीतरी असायचे
आणि त्यात अनेक वायरी असायच्या. टेलिफोन आला की ज्या कुणाला फोन आला असेल
त्याच्याशी वायरी जोडून तो फोन त्या व्यक्तिसाठी उपलध करून द्यायची. पहिली
नोकरी सोडून जेव्हा दुसरी नोकरी सुरू झाली तिथे पण एक टेलिफोन ऑपरेटर होती.
पण ऑफीस छोटे असल्याने ती व्यक्ती फोनपाशी येऊन बोलतअसे. नंतर त्या
ऑफीसमध्ये इंटरकॉम सिस्टीम आली.
महाराष्ट्राच्याबाहेर जर फोन लावायचा असेल तर ऑपरेटर कॉल बुक करायची. आमच्या ऑफीसमधली टेलीफोन ऑपरेटर टेलीफोन खात्यातील टेलीफोन
ऑपरेटरला फोन करायची. मग तिथली ऑपरेटर ज्या माणसाला फोन लावायचा आहे
त्याचा नंबर घ्यायची. आमच्या कंपनीचा फोन नंबर घ्यायची आणि वेळ सांगायची.
सांगितलेल्या वेळेला कॉल यायचा आणि म्हणायची की पार्टीशी बोला. एकदा
सिंगापूरला कॉल बुक केला होता आणि तोही १० मिनिटांकरिता.
क्रमश : ....
Wednesday, February 20, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment