Monday, September 25, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (4)

 भारतात तुमच्या घराच्या दरवाज्या जवळ फुलपुडी येते, वर्तमानपत्र आणि दुधाची पिशवी येते. हे सर्व आत घेउन आपण दाट दूध आणि आलं घालून चहा करतो आणि गरम चहाचा एकेक घोट घेत वर्तमानपत्र वाचतो. थोड्यावेळाने कामवाली बाई येते. ती सर्वच्या सर्व कामे उरकून दुसऱ्या घरातल्या कामासाठी बाहेर पडते. ती केर काढते, ओल्या फडक्याने फरशी पुसते. बादलीत भिजवलेले कपडे हाताने धुवून वाळत घालते. भांडी घासते, धुण्याचे यंत्र चालू करते, नंतर त्यातले कपडेही वाळत घालते. दळणाचे डबे गिरणीत नेते. कपड्याच्या घड्या घालणे, भाजी चिरून देणे, कणीक भिजवून देणे, केराचा डबा घराच्या बाहेर ठेवणे इत्यादी सर्व कामे करते. काही घरात पोळ्या करण्यासाठी बाई येते किंवा सर्व स्वयंपाक करणारी सुद्धा ! घरातल्या बाईला मग ती गृहिणी असो नाहीतर नोकरी करणारी असो इतरही बरीच कामे असतात. किराणामालाची यादी फोनवरून सांगणे, दाणे भाजून कूट करणे, नारळ खवणे, भाजी आणणे, दूध तापवून थंड झाल्यावर दह्यासाठी दुधाला विरजण लावणे, ४ दिवसाची जाड साय एकत्र करून परत त्याचे वेगळे विरजण लावणे, नंतर त्याचे ताक करून लोणी काढणे, तूप कढवणे, इत्यादी इत्यादी सर्व कामे असतात. भाजी आणून ती निवडून फ्रीज मध्ये ठेवणे, कोथिंबीर व इतर पालेभाज्या निवडणे. पूजाअर्चा, सणांची तयारीही असतेच.


भारतात असताना ही सर्व कामे मीही करायचे. इथे अमेरिकेत आल्यावर या कामाव्यतिरिक्त कामवाली बाईची पण कामे इथे करावी लागतात. वाण सामान, भाजी आणावी लागते. फर्निचरही पुसावे लागते. ओला व सुका कचरा अपार्टमेंटच्या आवरातल्या भल्या मोठ्या कचाकुंडीत टाकून द्यावा लागतो. भारतावरुन येताना मी पुजेचे साहित्यही आणले होते म्हणजे सहाण आणि खोड, स्टीलचा देव्हाराही आणला होता. सुरवातीला वाती कश्या करायच्या हा प्रश्णच होता. डॉलर जनरल या अमेरिकेन दुकानात मला कापूस व काडेपेटीही मिळून गेली. मला आठवतय ही काडेपेटी खूपच छोटी होती. त्यातल्या काड्याही खूप छोट्या आणि त्या पटकन पेटायच्याही नाहीत. भारतावरून येताना मी अंजली चॉपर आणला होता. त्याचा बॉक्सही होता त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. छोटुसा कूकरही घेतला म्हणजे त्यात वरण भाताबरोबर रस भाजी पण होईल. सवयीमुळे पहिल्यांदा मी कॅनमधले दूध पातेल्यात ओतून गरम केले होते. त्यावर खूपच पातळ साय धरली होती. ती चमच्याने काढली तर जेमतेम चमचा भरेल इतकीच साय आली. दुधाच्या एका कॅन मध्ये साधारण ३ ते ४ लिटर दूध असते. इथे दुधातले सर्व फॅट काढून घेतात. त्यामुळे १%, २%, 0% फॅट असलेले दूध खूपच पातळ असते. त्यातल्या त्यात whole milk (D vitamin) बऱ्यापैकी दाट म्हणायला हरकत नाही. मुंबईत असताना महानंदा, वारणा गोकूळ असे दाटसर दूध वापरायची सवय होती. इथल्या दुधाचा चहा प्यायला अजिबातच मजा यायची नाही. सुरवातीला सुटा चहा पण आम्हाला कधी मिळाला नाही कारण भारतीय दुकान जवळ नव्हते. इथला डीप डीप चहा पातेल्यात पाणी घालून उकळवायचे. लिप्टन आणि टेटली चहाच्या Tea bags आणायचो. पहिले ४ वर्ष मी घरीच विरजण लावायचे. दूधाला विरजण लावायला दही मी खाली रहात असलेल्या प्रविणाकडून आणले होते. इथे मिळणाऱ्या मीठविरहीत लोण्याचे मी घरी तूप बनवत होते. आम्ही जिथे जिथे राहिलो तिथे भारतीय वाणसामान दुकाने खूपच लांब होती. त्यामुळे टिपिकल भारतीय भाज्या आम्ही बरेच वर्षे खात नव्हतो. त्यामुळे एका भाजीच्या वेगवेगळ्या चवीच्या भाज्या मी बनवायचे. मला पाककृती लिहायलाही वाव मिळत होता. उदाहरण सिमला मिरचीचे मी अनेक प्रकार केले. सिमलामसाला, पीठ पेरून सिमला, कच्चा बटाटा घालून परतलेली सिमला याप्रमाणे. महिन्यातून एकदा भारतीय दुकानात जायचो तेव्हा तोंडली, कारली, दुधी भोपळा, गवार अशा भाज्या आणायचो. जिथे बरीच वर्षे राहिलो तिथे तर इंडियन स्टोअर मध्ये जायला आम्हाला कारने अडीच तास लागायचे. तिथून बाकीचे सामान आणायचो पण भाज्या जास्त आणल्या जायच्या नाहीत. मुंबईत रहात असताना बाजारात जायला मला खूपच आवडायचे. भाजी घेताना ठराविक बायकांकडून मी हमखास भाजी घ्यायचे. त्या बायकांशी बोलणे व्हायचे. जाताना ४-५ एकात एक अशा पिशव्या घेऊन जायचे. जाताना एके ठिकाणी ५०० रूपयाची नोट मोडून मी इतर भाज्या व फळे घ्यायचे. जाता-येता रिक्शेने जायचे. भाजी घ्यायच्या आधी वडापाव, भेळ, पाणीपुरी, उसाचा रस, मिल्क शेक असे काहीतरी खायचे.


इथल्या अमेरिकेन किंवा इतर काही म्हणजे थायी स्टोअर मध्ये मला काही भारतीय भाज्या मिळून जायच्या. हॅरिस्टीटर दुकानात मला भोपळ्यांचे काप व शेपू मिळायचा. एका थायी दुकानात मला छोटी कारली मिळाली होती. नारळही आणले होते पण चांगले निघाले नाहीत म्हणून मग ते आणणे सोडून दिले. नारळ घरात फोडता यायचा नाही. इथे अपार्टमेंट कॉप्लेक्स मध्ये भाड्याने रहायचे म्हणजे बरीच बंधने पाळावी लागतात. वरच्या मजल्यावर घर असेल तर नारळ आपटून तो घरात कसा फोडणार? कारण खालच्या घरात आवाज जातात आणि ते इथल्या लोकांना सहन होत नाही. म्हणून मग मी प्लॅस्टीकच्या पिशवीत नारळ घालून तो बाहेर येऊन फुटपाथवर फोडला होता. त्यातले पाणी काढायला बरोबर पेला नेला होता. गुळाच्या ढेपेचीही तीच गत होती. काही वर्षानंतर मी खवलेला नारळ व गुळाची पावडर भारतीय दुकानातून आणायला लागले. दाणे भाजून मी कूट करायचे. भाजलेल्या दाण्याची साले काढून एका ताटलीतच ते पाखडून त्याचे कुट करायचे. नंतर मला वाल मार्ट मध्ये भाजलेले खारे दाणे दिसले. मग तेच आणून मी त्याचे कूट करू लागले. खारे किंवा साधे असे दोन प्रकारचे दाणे इथे मिळतात. आम्हाला सकाळी नाश्त्याची सवय नाहीये. आम्ही दोघेही दूध पितो. मुंबईत असताना दुधातून इंस्टंट कॉफी नाहीतर बोर्नव्हिटा/सुकामेव्याची पूड घालून प्यायचो. नंतर कॉर्नफ्लेक्स दुधात घालून ते खायचो. इथे cerealचे बरेच प्रकार मिळतात. इथे आल्यावर आम्ही दुधातून प्रोटीन पावडर घेऊ लागलो. सुरवातीला "स्लिम फास्ट" नावाची पावडर मिळायची. आता मिळत नाही. नंतर आम्ही plant based protein पावडरी आणायला लागलो. अमेरिकेत काही (wholesale) घाऊक माल असलेली दुकाने आहेत. आम्ही सॅम्स क्लब नावाच्या दुकानाचे सदस्य झालो. ही सदस्य फी वर्षाला ५० डॉलर्स असते. तिथून आम्ही नेहमी लागणारा माल आणतो. टुथपेस्ट, धुणे व भांडी धुवायचे /घासायचे लिक्विड, तांदूळ, पेपर टावेल, टिश्यु पेपर, साबण, स्वयंपाक घरातली फरशी पुसण्यासाठी ओली फडकी, फर्निचर पुसण्यासाठीचीही ओली फडकी, कचरा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या, दाणे, सुकामेवा, प्रोटीन पावडर,साखर, तेल, मीठ पाणी पिण्याच्या बाटल्या. याशिवाय काही वेळेला काकड्या, टोमॅटो, सिमला मिरची, फ्लॉवर, निवडलेला पालक (यात मी ३ वेळा पालक भाजी करायचे) पीठ पेरून, दही पालक, डाळ पालक केळी, सफरचंदे, संत्री, कांदे, ब्ल्युबेरी, अननसाच्या फोडी, कलिंगड (इथले कलिंगड भारतात मिळणाऱ्या कलिंगडापेक्षा ४ पटीने मोठे असते) वगैरे. पुण्यात आई व तिच्या काही मैत्रिणी गुलटेकडीवरून घा ऊक माल आणायच्या आणि आणलेले सामान वाटून घ्यायच्या. तांदुळ, गहू, डाळी, चहा, साखर, सुकामेवा, दाणे असे बरेच काही ! एका टेंपोतून हे सामान यायचे. असे केल्याने सहा महिने सामान भरायला लागत नाही आणि पैसेही वाचतात.


इथल्या अमेरिकन दुकानात सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात, जसे की सिमला मिरची, कोबी, वांगे, श्रावणघेवडा ,फ्लॉवर, कोबी, कांदे, बटाटे, आलं, लसूण, मिरची कोथिंबीर. भारतीय भाज्या मात्र मिळत नाहीत जसे की तोंडली, गवार, कारली, छोटी वांगी. त्याकरता भारतीय दुकानात (Indian store) जावे लागते. तसेच वाणसामान इथल्या अमेरिकन दुकानात मिळते जसे की साखर, मीठ, तेल, मैदा, पण भारतीय पिठे,इतरही बरीच पिठे, डाळी, पापड, साबण, भारतीय मसाले फक्त भारतीय दुकानातच मिळतात.गव्हाच्या पीठात सर्वात जास्त चांगले पीठ आशिर्वाद ब्रॅंडचे आहे. हे पीठ मला भारतात मिळणाऱ्या (गिरणीतून दळून आणलेले पीठ) पिठाच्या खूप जवळचे वाटते आणि त्याच्या पोळ्याही छान होतात. त्यामुळे इथल्या भारतीयांना दोन्ही दुकानातून फिरावे लागते. औषधे पण अमेरिकन दुकानात मिळतात पण भारतीय औषधे भारतीय दुकानातच मिळतात जसे की अमृतांजन, व्हिक्स, क्रोसीन. स्लॅम्स क्लब सारखी इतरही दुकाने आहेत. कॉस्टको दुकानात बरेच भारतीय जातात. इथली अमेरिकन दुकाने खूप मोठीच्या मोठी असतात. दुकानात वाणसामान, भाजी, फळे, ब्रेड, केक, कूकीज, ज्युसेस, दूध, पिण्याचे पाणी आणि इतरही म्हणजे औषधे, फुलांचे गुच्छ, वाढदिवस शुभेच्छापत्र आणि इतरही बरेच काही असते. दुकानातच काही खाण्यापिण्याची उपाहारगृहे असतात जसे की डोमिनोज पिझ्झा, स्टारबक्स कॉफी, सबवे सॅंडविच इद्यादी. काही जण दुकानातच सर्व खरेदी करून तिथेच खाऊनही घेतात.

आम्ही वाणसामान, भाजी आणण्यासाठी २/३ दुकानात जातो. वाल मार्ट, सॅम्स क्लब, भारतीय दुकान. इथल्या कॅशिअरचे काम सोपे असते. प्रत्येकावर इथे बारकोड असतात. ते स्कॅन करून तुमचे बिल तत्परतेने तयार होते. बारकोड स्कॅन झाला की कॅशिअरच्या समोरच असलेल्या स्क्रीन वर सर्व स्कॅन केलेले दिसते. गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी मशीनच करते. आपणही आपले सामान स्कॅन करून घेऊ शकतो. सुट्या भाज्या आणि फळांसाठी बार कोड नसतात म्हणून स्क्रीनवर बोटानेच स्पर्श करून शोधता येते. ए ते झेड पर्यंत भाज्या व फळे यांची अनुक्रमणिका तिथे असते. त्यांचे फोटोही प्रकारानुसार असतात. त्यावर बोटानेच स्पर्श करून ते ते उमटते. स्कॅन बार जिथे स्कॅन होतो तिथे तो सुटा माल ठेवला की त्याचे वजनही होते आणि हिशेब करून किती पैसे झाले तेही उमटते. बिल प्रिंट होऊन येते. समजा काही अडलेच तर तिथे जास्तीचे कामगार उभे असतात त्यांना विचारता येते. ते मदत करतात. इथे औंस आणि पौंडात मोजले जाते जसे की भारतात किलो आणि किलोग्रॅमवर मोजले जाते. इथल्या दुकानात वजन-काटे पण असतात. भाजी पण आपली आपण निवडून घ्यायची असते. इथे सामान आणायला घरून पिशव्या घेऊन जावे लागत नाही. सर्व दुकानात कॅरी बॅग मिळतात. सध्या न्युजर्सी मध्ये कॅरी बॅगेवर बॅन आहे म्हणून आम्ही घरून पिशव्या घेऊन जातो. काही दुकानात त्यांच्या दुकानाचे नाव असलेल्या पिशव्या विकत ठेवल्या आहेत. त्यातूनच काही पिशव्या आम्ही खरेदी केल्या. इथे नोटा व नाणी घेऊन जावे लागत नाही. सर्व व्यवहार डेबिट/क्रेडिट कार्डावर चालतात. अगदी मोजकेच लोक रोख पैसे देताना पाहिले आहेत. इथे प्रत्येक गोष्टींचे बरेच प्रकार एकाच दुकानात दिसतात. कांद्यात पांढरे, लाल, पिवळ्या सालाचे कांदे, बटाट्यात पण व्हाईट, गोल्डन, रसेट तर मिरच्यांचेही अनेक प्रकार. कांदे बटाटे तर इतके गलेलठ्ठ असता की एका बटाट्यात ४ जणांची भाजी होईल आणि एका कांद्यात ४ जणांची भजी ! तसेच फळांमध्येही बरेच प्रकार दिसतात. इथली दुकानेच इतकी मोठी असतात की चालून चालून पाय दुखायला लागतात. आणि हो दुकानातच वॉश रूमचीही सोय असते. मुख्य म्हणजे स्वच्छ असतात हे खूप महत्वाचे आहे.


प्रत्येक अपार्टमेंट मध्ये जरी डीश वॉशर असले तरी भांडी ही हातानेच घासावी लागतात. भारतीय स्वयंपाक हा फोडणी शिवाय होत नाही. त्यामुळे प्रत्येक भांडे- ताट -वाट्या- कढई घासावीच लागते. आमच्याकडे मी घरी असल्याने मी भांडी घासायचे. नंतर मला होईनाशी झाली म्हणून मग विनायक काही वेळा भांडी घासून द्यायचा. भांडी थोडी असली तर विनु घासून देतो मी विसळते. खूप असली तर मी पटापट पाण्याखालून एकेक भांडे विसळल्यासारखे करते आणि डिश वॉशरला लावते. डीश वॉशर मध्ये लावल्याने भांडी अधिक स्वच्छ होतात आणि ड्रायर असल्याने वाळूनही येतात. इथे धुण्याचे मशीन जरी असले तरी त्याचे पण वेगळे प्रकार आहेत. काही अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या बाजूलाच वॉशर आणि ड्रायर असतात. तर काही ठिकाणी धुणे धुवायची मोठी दुकाने असतात. त्यात २० ते २५ निरनिराळ्या आकाराची वॉशर आणि ड्रायर असतात. खूप मोठी व्यावसायिक असल्याने त्यात खूप कपडे धूउन येतात. वॉशरला आणि ड्रायरला पैसे भरावे लागतात. वॉशर म्हणजे एका मोठ्या मशीन मध्ये कपडे टाकायचे, धुण्याची पावडर टाकायची, ठराविक नाणी टाकायची आणि मशीन सुरू करायचे. या मशीन मध्ये कपडे धुवून व पिळून निघतात. नंतर हे सर्व कपडे ड्रायर म्हणजेच कपडे वाळवण्याच्या मशीनमध्ये टाकायची. ठराविक नाणी टाकायची व मशीन सुरू करायचे. या मशीनमध्ये सर्व कपडे वाळून निघतात. ते इतके वाळून निघतात की जराही पाण्याचा अंश राहत नाही. कपडे खूप गरम होऊन येतात. थेट घड्या घालून कपाटात ठेवायचे.



१० क्वार्टर डॉलर्स वॉशिंगला आणि ४ त ५ क्वार्टर डॉलर्स ड्रायर साठी. १ क्वार्टर डॉलर म्हणजेच २५ सेंटचे एक नाणे जसे की २५ पैसे. भारतात वेगळा ड्रायर नसतो त्यामुळे वॉशिंग मशीन मधून धुतलेले कपडे वेगळे तारेवर वाळत घालायला लागतात. काही अपार्टमेंटमध्ये वॉशर-ड्रायरचे कनेक्शन असते. आपण आपली वॉशर आणि ड्रायर ची दोन मशीने विकत घ्यायची. इथल्या एका घरात आम्ही घेतली होती. साधारण ८०० डॉलर्स पडले. इथे कचरा रोजच्या रोज आपणच कचरापेटीत नेऊन टाकायला लागतो. कामावर जाताना सकाळी एका हातात ओल्या कचऱ्याची पिशवी घ्यायची. ती कचऱ्याच्या डब्यात टाकायची व कार सुरू करून कामाला जायचे. कोरडा कचरा एका मोठ्या पिशवीत भरून तोही टाकायला लागतो. कचरा भरून ठेवायच्या पिशव्या इथे मिळतात. त्या आम्ही घाऊक विकत घेतो कारण त्या सतत लागत असतात. कोरड्या कचऱ्यामध्ये दुधाचे व फळांच्या रसाचे रिकामे कॅन्स असतात. तेलाच्या बरणीतले तेल संपले की ते असते. शिवाय इथे आम्ही पिण्याचे व स्वयंपाका करता पाणी विकत घेतो त्याचे कॅन्स, किंवा बाटल्या जमा होतात. कोरडा कचऱ्याची मोठी पिशवी भरली की टाकतो. Rohini Gore

क्रमश : ....

 




 

No comments: