Saturday, September 23, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (3)

 माझे लग्न झाले आणि मी मुंबईत रहायला आले. माझ्या माहेरी आणि सासरी मी तीन-चार महिन्यातून एकदा जायचे. सासर माहेरची मंडळी पण आमच्या घरी यायची. प्रत्यक्षात भेटून गप्पा झाल्या तरी सुद्धा मी आई बाबा, सासू सासरे यांना पत्र पाठवायचे. तसेच त्यांच्याकडूनही मला पत्रे आली आहेत. आईबाबांचे पत्र आले की एकदा वाचून भागत नसे. परत परत पारायण केल्यासारखे वाचायचे. पत्रातून आम्ही एकमेकांना भेटायचो. आम्ही लग्न झाल्यावर आयायटीच्या वसतिगृहात रहायचो तेव्हा मला आई-बाबांचे फोन यायचे. तिथे एक सार्वजनिक फोन होता. फोन आला की वसतिगृहाचा रखवालदार आमच्या खोल्यांचे नंबर जोरजोरात ओरडून सांगायचा. मग मी तिसऱ्या जिन्यावरून भरभर खाली उतरून फोन घ्यायचे. काहीवेळा उशीर झाला की फोन कट होत असे. त्यावेळेला आई बाबा मला टेलिफोन बूथवरून फोन करायचे. 

 
 
आई बाबांकडे जेव्हा फोन आला तेव्हा आमच्याकडे फोन नव्हता. आम्ही डोंबिवलीत रहायला आलो होतो. मी टेलिफोन बूथ वर जाऊन आई-बाबा व रंजनाला फोन करून माझी खुशाली कळवायचे व त्यांची खुशालीही मला कळायची. फोन करण्यासाठी पैसे बाजूला थोडे काढून ठेवलेले असायचे. त्यातूनच खर्च करायचे. पत्रातून जरी माझी खुशाली त्यांना कळत होती तरी फोनवर त्यांचा आवाज ऐकून पण बरे वाटायचे. जेव्हा माणूस आपले जन्मस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतरीत होतो तेव्हा त्याला कुटुंबापासून दूर गेल्याची जाणीव खूपच तीव्र होते आणि मग तो त्यांच्याशी संपर्कात रहाण्यासाठी धडपड करतो.
अमेरिकेत रहायला आल्यावर सुरवातीला मी आई-बाबा, सासु-सासरे, रंजना, डोंबिवलीतले काही नातेवाईक व मित्रमंडळींना पत्रं लिहिलेली आहेत. शिवाय सई (भाची) आणि सायलीला (पुतणी) मी इथून वाढदिवसाची शुभेच्छापत्रे पोस्टाने पाठवली आहेत. इथल्या दुकानामध्ये सुंदर सुंदर शुभेच्छापत्रे असतात. त्यात जास्तीत जास्त सुंदर असणारी शुभेच्छा पत्रे मी निवडायचे. मला खूप आनंद व्हायचा आणि मग मी त्यांना फोन करून विचारायचे की कशी वाटली शुभेच्छापत्रे? आवडली का? त्या दोघी खूप खुश व्हायच्या. 
 
 
अमेरिकेतून आई-बाबा, सासूसासरे, बहीण यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी सुरवातीला कॉलिंग कार्ड वापरायला लागायचे. भारतात फोन करण्यासाठी आम्हाला आधी अमेरिकेतला लँडलाईन फोन घ्यावा लागला. व्हराईजन या टेलीफोन कंपनीत आम्ही आमचे नाव नोंदवले व फोन सुरू झाला. फोन सुरू झाल्या झाल्या लगेचच मी रंजनाला फोन लावला होता. मी अगदीच मोजकी २-ते ३ वाक्ये बोलली असेन. म्हणजे 1 की २ मिनिटेच. पटकन फोन खाली ठेवला, बील येण्याच्या भीतीने. बील आले १० डॉलर्स ! (१० डॉलर्स गुणिले ८० रूपये)नंतर आमच्या मित्रपरिवारातून आम्हाला काही वेबसाईटी कळाल्या. त्यावरून आम्ही दर महिन्याला ४० डॉलर्सची (40 डॉलर्स गुणिले 80 रूपये) ऑनलाईन कार्डे विकत घ्यायचो. एक सासरी एक माहेरी एक बहिणीकरता. १० डॉलर्स मध्ये २० मिनिटे मिळायची. या २० मिनिटात बोलणे जास्त व्हायचेच नाही. एका आठवड्याला एक 10 डॉलरचे कार्ड वापरायचो. एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करण्यातच २० मिनिटे निघून जायची.फोन लावण्यासाठी आधी १० आकडी ऍक्सेस नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १० आकडी पीन नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १५ आकडी ( इंटरनॅशनल कोड, भारताचा कोड, शहराचा कोड, आणि मुख्य टेलीफो नंबर( ८ आकडी लँडलाईन फोन ) नंबर फिरवायला लागायचे. हे सर्व मिळून ३५ डिजिटचे फोन नंबर फिरवल्यानंतर फोन लागायचा. फोन करण्यासाठी आम्हाला खालीलप्रमाणे नंबर फिरवायला लागायचे.
 
Access No. : 1-888-321-4086
Pin No. : 713-213-5562
International code : (011) Country code (91) Pune City Code (20) landline no. 24250370
011-91-20-24250370 
 
 
फोन लागल्यावर आवाजही काही वेळा नीट ऐकू यायचा नाही. फोन मध्येच तुटायचा. फोन तुटला की परत सर्व नंबर परत फिरवायला लागायचे. त्यात मग काही मिनिटे बोललेली/वापरलेली कट करून उरलेली मिनिटे शिल्लक रहायची. आणि बोलत असताना आईला/रंजनाला/सासूबाईंना सांगायला लागायचे की आता मिनिटे संपत आली आहेत. फोन आपोआप कट होईल बर का, नंतर बाय बाय टाटा करत फोन धाडकन बंद व्हायचा. बोलणे अपूर्ण राहिले असेच वाटायचे. तुरूंगात नाही का कैद्याला भेटायला जातात तेव्हा ठराविक मिनिटे दिलेली असतात. तिथे कैदी आणि नातेवाईक एकमेकांना दिसतात तरी. इथे फक्त आवाज ऐकू यायचा. व्यक्ति दिसायची नाही. नंतर ही ऑन लाईन कार्डे थोडी स्वस्त झाली.यात रिलायन्सची कार्डे जास्त चांगली होती. नंतर नंतर ५ डॉलर्सला ३० मिनिटे, आणि नंतर ६० मिनिटे दिली जायची. या फोनकार्डाबरोबर आम्हाला कस्टमर सर्विसचा नंबरही दिला जायचा. २००१ सालापासून ते २००८ सालापर्यंत प्रत्येक महिन्याला ४० डॉलर्सची कार्डे खरेदी करायचो. नंतर व्होनेज कंपनीचा फोन घेतला. यामध्ये ४० डॉलर्स महिन्याचे आणि अजूनही आहेत. व्होनेज कंपनीच्या फोन वरून १५ डिजिटचा फोन नंबर अजूनही फिरवावा लागतो आणि लगेच फोन लागतो. फक्त यामध्ये ऍक्सेस नंबर आणि पिन नंबर फिरवावे लागत नाहीत. 
 
 
हा फोन सुरू झाल्यावर भारतातल्या सर्वांचे आवाज ऐकताना खूप समाधान व्हायचे आणि अजूनही होते. यामध्ये समोरच्या व्यक्तीचा आवाज इतका काही स्पष्ट येतो की ती व्यक्ति तुमच्या समोर बसली आहे असे वाटते. कितीही मिनिटे बोला आणि कितीही वेळा फोन करा. अमेरिकेत कुणाला फोन करायचे असेल तर आणि भारतात कुणाला फोन करायचे असेल तर अगणित फोन करता येतात आणि अगणित बोलताही येते. हा फोन आल्यापासून मी आई बाबांशी आणि रंजनाशी खूप वेळा आणि अगणित बोलली आहे. आईशी तर कमीत कमी १ तास बोलते. त्यात आमच्या ओघवत्या गप्पा खूपच होतात. आम्ही दोघी पूर्वीच्या घराच्या आठवणी अनेकदा काढतो. शिवाय मी पदार्थ्यांच्या रेसिपीज पण विचारल्या आहेत.इथे मी वेळ जाण्याकरता सर्व पारंपारिक पाककृती लिहिल्या. त्यात मी काही रेसिपीज फोन वर विचारून वहीत लिहून घेतल्या आहेत. त्या वह्या अजूनही आहेत आणि मी त्या कधीच फेकणार नाही. या वह्यात कितीतरी जणांचे फोन नंबर तर आहेतच. शिवाय वेबसाईट वरून घेतलेल्या कॉलिंग कार्डाचे नंबरही आहेत.विनु त्याच्या आईशी खूप वेळा आणि अगणित बोलला आहे. शिवाय मी भारतातल्या काही नातेवाईकांना आणि मित्रमंडळीना फोन केले आहेत. शिवाय इथे झालेल्या ओळखीतही खूप वेळा आणि अगणित काळासाठी बोललो. काही कुटुंब मित्र/मैत्रिणींशी मी अजूनही याच फोनवरून बोलते. जेव्हा हा फोन नव्हता तेव्हा कंप्युटर द्वारे याहू मेसेंजर आणि स्काईप मेसेंजर वरून अनेक मित्रमैत्रिणींशी बोललो आणि वेबकॅम लावून त्यांना बघितले देखील ! तेव्हा प्रत्यक्ष भेटल्यासारखे वाटले आणि एकाकीपणा बराच कमी झाला. 
 
 
१९९९ साली आम्हाला इंटरनेट माहीती झाले. जेव्हा विनु हिंदुस्तान लिव्हर कंपनीमध्ये होता तेव्हा त्याने रेडिफमेल वरून ईमेल खाते उघडले होते आणि ईमेलद्वारे त्याने विद्यापीठात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये संशोधन करण्यासाठी अर्ज केला होता. या ईमेलवरूनच त्याने बाळकृष्ण ला (विनुचा भा ऊ) ईमेल केली होती की आम्ही अमेरिकेत सुरक्षित पोहोचलो. त्याने त्याच्या ऑफीसमधून ईमेल वाचली.अमेरिकेत आल्यावर पहिली ३ वर्षे आमच्याकडे कार आणि संगणकही नव्हता. मी विद्यापिठाच्या ग्रंथालयात जाऊन ई-सकाळ वाचायचे. ग्रंथालयात बरेच डेस्क टॉप होते. २००३ साली मला प्राचीने याहू मेल वर माझे ईमेल खाते उघडून दिले. २००१ साली जेव्हा मला माधवी भेटली. ती तेलुगु होती. तिच्या घरी डेस्क टॉप होता आणि त्यावेळेला ती याहू मेसेंजर द्वारे तिच्या अमेरिकेत रहाण्याऱ्या बहिणींशी बोलायची. तिने मला एकदा याहू मेसेंजर वर ती कशी बोलते हे दाखवले होते. एक मात्र छान होते की इथे लोकल कॉल्स फुकट होते. त्यामुळे मी व माधवी फोनवर हिंदीतून खूप गप्पा मारायचो. शिवाय प्रत्यक्ष भेटीत खूप बोलायचो. Rohini gore 
 
क्रमश : ...


 

No comments: