Monday, October 02, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (5)

 

लग्नानंतर ८ वर्षाने आमच्या घरी टेलिव्हिजन आला. ओनिडा रंगीत वर चित्र खूपच छान दिसायचे. त्यावेळेला मी झी सिनेमा आणि सोनी चॅनल वर आधी पाहिलेले आणि न पाहिलेले सर्व सिनेमे बघितले. मालिका बघितल्या नाहीत. मालिकेंचे पेव इतके फुटले नव्हते. स्वाभिमान सैलाब या हिंदी मालिका मी पहात होते. हा काळ होता १९९६ मधला. सोनु निगमचे हिंदी सारेगम आणि पल्लवी जोशीचे मराठी सारेगम खूपच गाजले होते. नंतर आभाळमाया व महाश्वेता या मालिका बघत होतो. तसेच तिकडे थिएटर मध्ये जाऊन बरेच चित्रपट बघितले. आम्हाला दोघांनाही हिंदी सिनेमा बघण्याची खूप आवड आहे. आम्ही काही मैत्रिणींनी बाँबे, हम आपके है कौन, मैने प्यार किया, अकेले हम अकेले तुम पाहिले. शाळा कॉलेजात असताना पुण्यात मॉर्निंग आणि मॅटिनीज चित्रपट बरेच पाहिले. त्यात आधी बुकींग करून अथवा आयत्यावेळेस ठरवून असेही पाहिले. हाऊसफुल्ल शो असेल तर काळी तिकिटे जास्तीचे पैसे भरूनही सिनेमे पाहिलेत. अनेकाअनेक चित्रपट आपण सर्वांनीच थिएटर मध्ये जाऊन पाहिलेले आहेत. ती मजा काही औरच होती. रद्दी विकून आलेल्या पैशातही सिनेमा बघताना वेगळीच मौज होती.
 
 
आम्ही इथे आल्यावर भारतात अवतिंका ही मराठी मालिका खूप गाजत होती. २००१ मध्ये जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा हिंदी मराठी चित्रपट अगदी क्वचितच पाहिले. अर्थात इथल्या थिएटर मध्ये नाही. मोठ्या शहरात हिंदी मराठी चित्रपट येतात काही काळाकरता. मला आठवतय (2003) देवदास चित्रपट ऍटलांटा शहरात लागला होता. त्यावेळेला आमच्याकडे कार नव्हती. नंतर देवदासची सिडी निघाली आणि तो सिनेमा आम्ही डेस्कटॉपवर पाहिला. जसे इथे कार अत्यावश्यक आहे तसेच घरात संगणक करमणूकीकरता घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा हिंदी मराठी गाणी व सिनेमे पहाता येत नाहीत. जेव्हा डेस्क टॉप घेतला तेव्हा म्युझिक इंडिया ऑनलाईन या नावाची वेबसाईट कळाली आणि त्यावर हिंदी मराठी अशी अनेक गाणी ऐकू लागलो. 2001 डेंटन - टेक्सास मध्ये रहात असताना विद्यापिठात मोठ्या पडद्यावर इंडियन असोसिएशन तर्फे ३ चित्रपट दाखवण्यात आले होते. ते अनुक्रमे लगान, चुपके चुपके आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असे होते. मी व माधवीने मिळून पाहिले मोठ्या पडद्यावर. विद्यापिठामधल्या एका हॉलमध्ये दाखवले होते. दिलवाले लांबच्या लांब सिनेमा बघताना मला कंटाळा आला होता, तर चुपके चुपकेला पहाताना माधवी कंटाळली होती. 
 
 
घरबसल्या करमणूक जशी भारतात टेलिव्हिजन वर असते तशी अमेरिकेत पण असते. रेडिओ, टेलिव्हिजन, थिएटर ही करमणूकीची माध्यमे सर्व देशात आहेत. आम्ही रहात असलेल्या अपार्टमेंटच्या शेजारी एक श्रीलंकन कुटुंब रहात होते. ती काही दिवस बाहेरगावी जाणार होती. तिने मला तिच्याकडचा रेडिओ आणून दिला आणि सांगितले की आम्ही बाहेर जात आहोत तर तू ठेव थोडे दिवस तुझ्याकडे. डॅलस(Dallas) शहरातून हिंदी गाणी प्रसारित होतात २४ तास एका स्टेशनवर. मला खूप आनंद झाला. काही दिवसांनी आम्ही वालमार्ट दुकानातून रेडिओ-कम टेपरेकॉर्डर आणला आणि त्यावर मी रेडिओ वरून प्रसारित होणारी हिंदी गाणी ऐकू लागले. भारतातल्या रेडिओ वर जशी वेगवेगळी स्टेशने लागतात तशी इथल्या रेडिओ वर पण लागतात. मी त्या स्टेशनांवर कधी गेले नाही. हिंदी गाणी मात्र २४ तास ऐकत होते. टेक्साज राज्यातल्या डॅलस शहरात बरेच भारतीय असल्याने रेडिओ वर असे एक स्टेशन होते तिथे हिंदी गाण्याच्या मधे एक बाई निवेदन करायची जसे की विविध भारतीच्या बऱ्याच हिंदी आणि मराठी गाण्यांमध्ये असते. अमुक एका चित्रपटाचे गीत कोणाकोणाला ऐकायचे आहे त्यांची नावे निवेदनात असतात. 2005 साली विल्मिंग्टन शहरात जेव्हा राहायला आलो तेव्हा आम्ही डिश घेतली होती व त्यावर ३ भारतीय हिंदी चॅनल घेतले होते. त्यात झी सिनेमा, सहारा वन आणि सोनी असे चॅनल घेतले होते. सहारा –वन चॅनलवर मी “वो रहनेवाली महलोंकी” आणि “हरे काच की चुडिया” "वैदेही" या मालिका पाहिल्या आणि मला त्या खूपच आवडल्या होत्या. झी सिनेमावर चित्रपटांचे गृऱ्हाळ चालते त्यात पण बरेच हिंदी चित्रपट पाहिले. सोनी चॅनलवर “एक लडकी अन्जानीसी” ही मालिका पाहिली. आणि डान्स डान्स हा नाचगाण्यांचा कार्यक्रम पण मला खूप आवडून गेला. नंतर डिश काढून टाकली. काही काळ आम्ही YUP TV मराठी चॅनलचे पॅकेज घेतले होते. अर्थात हे मराठी चॅनल आम्ही डेस्कटॉप वर बघत होतो. नंतर लॅपटॉप वर पहायला लागलो. यात मेघ दाटले आणि अवघाचि हा संसार, या सुखांनो या मालिका पाहिल्या. नंतर हे चॅनल पण काढून टाकले. आपलीमराठी डॉट कॉम या साईट वर सर्व चॅनल्सच्या मराठी मालीका पहायचो आणि मराठी चित्रपट. ४० प्लस मराठी स्पर्धकांचे सारेगम पाहिले. यात संगिता चितळे आणि अनुजा वर्तक होत्या. फायनल राऊंडसाठी प्रेक्षकांकडून मते द्यायची होती. ही फायनल आम्ही अविनाश जोशींकडे त्यांच्या लॅपटॉप वर पाहिली. खूपच सुंदर सारेगम कार्यक्रम होता ! 
 
 
लॅपटॉपवर युट्युब चॅनल वर गाणी पहाणे सुरू झाले. सोशल मिडिया वर २ ग्रुप मध्ये भरती झालो. तिथे वेगवेगळ्या थिमा देत असत. त्या थीमप्रमाणे आपण You tube वरच्या गाण्यांची लिंक टाकायची असते. या दोन्ही ग्रुप मध्ये आम्ही दोघे खूपच रमून गेलो. हा काळ साधारण २००७ ते २०१२ चा होता. युट्युबवर इतक्या वेळा गाणी पाहिली की त्यात हिरो हिरोईनने कोणकोणते ड्रेस घातले आहेत ते अगदी तोंडपाठ झाले होते. ते ग्रुप होते अनुक्रमे संगीत के सितारे आणि गीतसंगीत. आम्ही दोघांनी झपाटल्यासारखी युट्युब वरची हिंदी गाणी पाहिली. गाण्याच्या दोन्ही ग्रुपवर थिम आली रे आली की लगेच डोक्यात कोणते गाणे टाकायचे ते घोळायला लागायचे. सर्वांपेक्षा आपले गाणे खूप निराळे असले पाहिजे याकरता सर्व सज्ज असायचे. एका सदस्यासाठी १ गाणे असे होते. तुम्ही टाकलेले गाणे कुणी दुसऱ्याने आधीच टाकले असेल तर ते बाद व्हायचे. याकरता गाण्याची लिंक टाकून यादीमध्ये तुम्ही कोणते गाणे टाकले ते ते लिहावे लागायचे. गाणे टाकण्या आधी यादीत कोणकोणती गाणी आली आहेत ती पाहून लगेच आपण निवडलेले गाणे टाकायचो. याकरता सर्वांचीच धावपळ उडायची. गीतसंगीत या ग्रुपमध्ये तर अमेरिकेतल्या १२ वाजता थिम टाकली जायची. थिम आली रे आली की माझ्यासकट काही जण लगच्यालगेच गाणे टाकायचे. संगीत के सितारे मध्ये जरा हटके थिमा असायच्या. आपण गाणे टाकले आणि जर का कुणी आपल्याच आवडीचे दुसरे गाणे त्याचवेळी टाकले ही हळहळ वाटायची. अरे हे गाणे किती छान होते आपल्याला का नाही सुचले, असे वाटून जायचे. गाण्याला जास्तीत जास्त किती लाईक्स मिळतील याकडे सर्वांचे लक्ष असायचे. या दोन्ही ग्रुप मध्ये सदस्यांकडूनही थिमा सुचवा अशी मागणी असायची. त्या थिमांची एक यादी तयार होत असे. तिथे मी पण काही थिमा सुचवल्या होत्या. थीम नसेल तर ओपन डे असायचा. त्याकरता मी एकदा बॅनर बनवून दिला होता. बॅनरचा फोटो मी एका दिवाळीत पहाटे काढला होता, तो वापरला.
 
 
अमेरिकेतले चॅनल असलेले केबलही घेतले होते. या केबल चॅनलवरचे बरेच कुकींग शोज आम्ही पाहिले. त्यात emeril Live, Rachel Ray , Chopped, Hell's Kitchen, आम्हाला आवडून गेले. emeril Live मध्ये पदार्थ करताना सर्व काचेचे सामान वापरायचे. रेसिपी सांगायची पद्धतही छान होती. शेवटची सजावट करून बरोबर म्युझिकही असायचे. Rachel Ray या कुकींग शो मध्ये ती भाज्या खूप वापरायची आणि अगदी घरगुती पद्धत. किचन पण साधेच. Chopped या शो मध्ये स्पर्धा असायची. त्यात काही भारतीय बायका आलेल्या बघितल्या आहेत. या स्पर्धेमध्ये परिक्षक ३ जिन्नस देतात. हे ३ जिन्नस घेऊन ठराविक वेळात एक पदार्थ बनवायचा असतो. पदार्थ बनवण्यासाठी इतर जिन्नस हवे असतील तर तेही काही ठराविक वेळात शो मध्ये असलेल्या दुकानातून आणावे लागतात. Hell's Kitchen या शो मध्ये ज्यांची उपाहारगृहे नीट चालायची नाहीत त्यासाठी काय करावे याबद्दल एका तज्ञाला ते बोलावत. तो सर्व प्रकारच्या सुधारणा सांगायचा. त्याप्रमाणे सर्व काही बदलून त्यांचे खूप फायद्यात चालायचे. सर्व प्रकारच्या सुधारणेत पदार्थ कसे पाहिजेत, स्वच्छता कशी पाहिजे, टेबल खुर्च्यांची मांडणी, भिंतीला कोणते रंग आणि चित्रे पाहिजेत हे सर्व असायचे. तसेच बाकीचेही कार्यक्रम पहात होतो. त्यात Wheel of fortune, Golden Girls, Baywatch, Friends, Jeopardy, Cartoon Network वर मी Tom and Jerry, I dream of Jannie (NBC channel) पहात होते. Lifetime Channel वर लागोपाठ २ चित्रपट पहायचो. त्यात काही सत्यघटनेवर आधारीत सिनेमेही असायचे. या चित्रपटात खून, मारामारी आणि सेक्स असे मिश्रण असायचे. बेवॉच या मालिकेत समुद्रावर असणारे लाईफ गार्ड समुद्रात पोहायला जाताना जर काही अपघात झाला तर ते कसे वाचवतात याबद्दलच्या गोष्टी दाखवत असत. त्यात प्रेमप्रकरणे पण असत. Jeopardy, Wheel of fortune हे दोन क्विझ गेम आहेत.
भारतात रहात असताना मी दोनच एंग्रजी चित्रपट पाहिले होते. राहूल टॉकीजवर The Towering Inferno आणि डोंबिवलीत रहात असताना Titanic क्लेम्सन मध्ये एक थिएटर होते. तिथे आम्ही लॉर्ड ऑफ द रिंग पाहिला. मला अजिबात आवडला नाही. त्यावेळेला तिकिट होते १ डॉलर म्हणजे खूपच स्वस्त होते.
१४ न्युज चॅनल आम्ही अगदी रोजच्या रोज बघायचो. त्यात संध्याकाळच्या बातम्या बघायचो. शिवाय वेदरही सांगायचे. बातम्यांच्या आधी एक शेफ २ मिनिटात एक रेसिपी सांगायचा. त्याचे नाव Dan Eaten ही रेसिपी आम्ही कधीच चुकवलेली नाही. २ मिनिटात तो सर्व रेसिपी वर्णन करून सांगायचा आणि दाखवायचा पण ! हेच त्याचे कौशल्य होते. या चॅनल वर हवामानतज्ञ ली रिंगर आणि Gary Stephenson दर तासातासाला बदलणारे हवामान सांगायचे. ली रिंगरची आम्ही एकदा प्रत्यक्षात भेट घेतली होती.
 
 
ESPN Channel वर टेनिस मॅचेस पाहिल्या. यात एक सकाळी कार्यक्रम असायचा तो म्हणजे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. यात राजकारण, खेळ, आरोग्य यावरची प्रश्नोत्तरे असायची. हा कार्यक्रम विनायक ला खूप आवडतो. तसेच हिस्ट्री चॅनलही. विनोदी मालिकांमध्ये आम्हाला गोल्डन गर्ल्स नावाची मालिका खूपच आवडायची. या मालिकेमध्ये ४ म्हाताऱ्या एकत्र रहात असतात. एक असते ती खवट म्हातारी, (Sophia)एक असते ती नटणारी आणि सतत तिच्या डोक्यात सेक्स असणारी,(Blanch) एक असते ती सतत मूर्खासारखी बडबडणारी. (Rose) आणि एक असते ती खवट म्हातारीची मुलगी (Dorothy) तिला बोलायचा सेन्स असतो. ती डोक्याने हुशार असते. या चौघींचे दैनंदिन कार्यक्रम काय असतात हे दाखवले आहे. संभाषणातून होणारे विनोद, काहीवेळा गंभीर प्रसंग, त्यातून दाखवले जाणारे एकमेकींवरचे प्रेम असे सर्व या विनोदी मालिकेत आहे. मला या मालिकेच शीर्षक गीत खूप आवडले. Rohini Gore
क्रमश : ..

No comments: