Friday, September 22, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (2)

 

मी भारतात लग्नाआधी पुण्यात व लग्नानंतर आयायटी, डोंबिवली व अंधेरी या ठिकाणी राहिले. विनु आयायटीत पिएचडी करत होता. लग्नानंतर वसतिगृहात जोडप्यासाठी प्रत्येकी २ खोल्या दिल्या होत्या. त्यामुळे मलाही तिथे रहाता आले. या सर्व ठिकाणी आम्हाला पाणी व वीजेची कमतरता कधीच भासली नाही. पुण्यात आईकडे रहात असताना म्युनिसिपाल्टीकडून दिवसातून दोन वेळा धो धो पाणी यायचे. पाणी आले की प्यायचे पाणी, अंघोळीकरता व स्वयंपाकाकरता पाणी भरून ठेवायचो. त्यामुळे तसे बघायला गेले तर २४ तास पाणी असायचे. पाणी आले की अंगणात आम्ही मनसोक्त पाण्याचा सडा घालायचो. झाडांना नळीने पाणी घालायचो. 
 
 
डोंबिवलीमध्ये आमच्या सोसायटीत जमिनी खालच्या टाकीत २ वेळा भरपूर पाणी यायचे. हे पाणी आम्ही वरच्या टाकीत पंपाद्वारे सोडायचो. सोसायटीत मोजून १०-१५ फ्लॅट होते. त्यामुळे आम्ही फक्त पिण्याचे पाणी भरून ठेवायचो. वापरायचे पाणी कधीच भरून ठेवले नाही. आयायटीत आणि अंधेरीत सुद्धा फक्त पिण्याचे पाणी भरून ठेवायला लागायचे. वीज व पाणी मुबलक होते. अंधेरीत २ वर्षे राहिलो तेव्हा कधीही वीज गेली नाही की पाणी गेले नाही. डोंबिवलीत दर शुक्रवारी वीज घालवायचे. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत. तसा सूचनेचा फलकही लावला जायचा. त्यामुळे तयारीत असायचो. पाण्याच्या टाकीतही पाणी पूर्ण भरून ती वाहिली की चिंता नसायची. इथे अमेरिकेत आल्यावर २४ तास वीज पाणी असतेच. शिवाय पिण्याचे पाणीही भरून ठेवायची आवश्यकता नसते. नळाचे पाणी थेट प्यायले तरी चालायचे. जेव्हा नॉर्थ कॅरोलायना राज्यात विल्मिंग्टन शहरात आलो तेव्हा नळाचे पाणी प्यायला लागलो पण आमची पोटे बिघडायला लागली. नळाला फिल्टर लावूनही फायदा झाला नाही. तेव्हापासून आजतागयत आम्ही पिण्याचे पाणि विकत आणतो. गेली तीन वर्षे मी स्वयंपाकालाही पिण्याचेच पाणी वापरते.
डोंबिवलीत जेव्हा आलो तेव्हा नळाचे पाणी प्यायल्याने मला कावीळ झाली होती म्हणून पाणी ऊकळून प्यायला लागलो. पिण्याचे पाणी ऊकळून ठेवायचे एक काम वाढून गेले. नंतर चांगल्या क्वालिटीचा फिल्टर आणला आणि एकूणच तब्येत बिघडण्याच्या तक्रारी संपून गेल्या. 
 
 
इथे अमेरिकेत नळाला पाणी नाही असे कधीच झाले नाही. नळाला गरम आणि गार असे पाणी असते. गरम पाण्याचा उपयोग थंडीत भांडी विसळण्यासाठी होतो. अंघोळीलाही शॉवरला गरम/गार पाणी असते. भारतात गॅस/स्टोव्ह वर पाणी तापवून ते पाणी बादलीत ओतून ठराविक पाण्यात अंघोळ करायचे दिवसही आता संपले. काही ठिकाणी असे अजूनही करत असतील तर माहीत नाही. घराघरातून आता गीझर असतात. जसे भारतात पावसामुळे झाडांच्या पडझडीमुळे, लक्खन वीज चमकल्यामुळे वीज जाते तशी इथेही जाते. फरक इतकाच आहे की भारतात वीज गेली तरी गॅसच्या शेगडीवर मेणबत्तीच्या प्रकाशात चहा करता येतो, इतकेच नाही तर भजीही तळता येतात. इथे तसे नाही. वीज गेली की सगळे काही ठप्प होते. इथे स्वयंपाकघरात एलेक्ट्रिक शेगड्या असल्याने काहीही शिजवता येत नाही. मायक्रोवेव्ह बंद होतो. इतकेच नाही तर हीटर/कूलर बंद होतो. शॉवरला गरम पाणीही येत नाही. हे सर्व आम्ही अनुभवले आहे. साऊथ कॅरोलायना राज्यात क्लेम्सन शहरात अशीच एकदा पटकन वीज गेली. विनु लॅबमधून घरी आला होता. मी संध्याकाळी खायला म्हणून पोहे केले. ते खाल्यावर चहा प्यायला आणि वीज गेली ती दुसऱ्या दिवशी पहाटे ६ ला म्हणजे १२ तासांनी आली. मला पोळी भाजी करता आली नाही. सर्वत्र रस्त्यावरही गुडुप अंधार झाला. नशीबाने आमच्याकडे टॉर्च होता. रात्रभर भुकेने तळमळत होतो. झोपही लागली नाही. नशिबाने थंडी नव्हती. उन्हाळा असल्याने कुलर जरी चालू झाला नाही तरी दार किलकिले करून उघडे ठेवले आणि खिडकी थोडी उघडी ठेवली. फ्रीजर मध्ये आईस्क्रीम होते. ते वितळलेले आईस्क्रीम खाल्ले तेव्हा थोडी डुलकी लागली. एक झाड विजेच्या खांबावर जोराच्या वाऱ्याने आदळले होते म्हणून वीज गेली होती. असाच अनुभव नॉर्थ कॅरोलायना राज्याच्या हेंडरसनविल शहरात आला. त्या दिवसाचे वीज गेल्याचे वेगळेपण होते म्हणून तशी रोजनिशी पण लिहिली.
 
 
२८ जून २०१८ रोजी वीज गेली. सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा विनू म्हणाला "वीज नाहीये" मोबाईल data वरून गुगलमध्ये शोधले असता वीज रात्री ८ वाजता येईल असे कळाले. मध्यरात्री २ वाजताच वीज गेली होती म्हणून विनुची झोप उडाली होती. मी २ वाजेपर्यंत जागी असल्याने मला २ नंतर झोप लागली होती.
आम्ही दोघे कामावर जातो त्यामुळे मी आदल्यादिवशीच विनुचा डबा करून ठेवला होता. मला कामावर ऑफ डे होता त्यामुळे मी घरीच होते. . विनुने थंडगार दूधातच प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायले. तसे इथले लोक थंडगार दूधच पितात पण आम्हाला दूध गरम करून पिण्याची सवय आहे. शॉवरला थोडेफार कोमट पाणी असल्याने विनुने अंघोळ केली आणि तो कामावर निघून गेला. मला म्हणाला चहा ऑफीसमध्येच घेईन. मी पण कोमट पाणी तर कोमट पाणी, थंड नाही ना ! म्हणून लगेचच अंघोळ करून घेतली. थंडगार दूधात इंन्स्टंट कॉफी आणि साखर घालून कोल्ड कॉफी प्यायली. ती खूपच छान लागली. विचार केला की आपण कधीच उपवास करत नाही, या निमित्ताने करू आणि जशी भूक लागेल तसे खाऊ. म्हणजे आज जेवणासाठी तेल तिखट मीठ पोहे खाऊ असा विचार केला पण तो फक्त विचारच राहिला. भाजी होती पण कणीक भिजवलेली नव्हती. अर्थात कणीक भिजवलेली असली तरी पोळ्या कश्या करणार होते मी? ज्यांना सकाळी उठल्यावर गरम चहा प्यायची सवय असते त्यांची अवस्था चहा न मिळाल्याने खूप वाईट होते, तशीच माझी झाली. अंघोळ करूनही चहा न प्यायल्याने पारोसे असल्यासारखेच वाटत होते. सकाळचे १० वाजले आणि पोटात कावळे "काव काव" करायला लागले. ड्रेस घातला आणि इंगल्स मध्ये गेले. तिथे सँडविच खाल्ला. कोक प्यायला. संध्याकाळच्या खाण्याला कूकीज आणि पोटॅटो चिप्स घेतले आणि थोडावेळ कॅफेत बसून निघताना कॉफी घेतली आणि १ वाजेपर्यंत घरी आले. कूलर नसल्याने खूप गरम होत होते. सगळेच ठप्प असल्याने आडवी पडून राहिले. झोप लागली नाहीच पण खूप पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले. तसे तर इथे स्मशान शांतताच असते. वीज गेल्याने त्यात जरा जास्तीच भर पडते. वीज असल्याने युट्युब वरचा गाण्यांचा आवाज, आपलीमराठीवर या वेबसाईटवर पहात असलेल्या मराठी मालिकांचा आवाज येत असतो त्यामुळे घर भरल्यासारखे वाटते आणि आवाजांच्या सान्निध्यात राहिल्याने आपण एकटे नाही याचा खोटा का होईना दिलासा मिळतो. आजच्या दिवसाचे वीज नसल्याचे कारण कळाले नाही. बहुतेक ट्रान्सफॉर्मर जळाल्याने फक्त शहराच्या काही भागातच वीज पुरवठा नव्हता असे मला इंगल्स नावाच्या ग्रोसरी स्टोअर मध्ये कळाले. 
 
 
रात्री ८ वाजता येणारी वीज ४ वाजताच आल्याने बरे वाटले. लगेचच पहिला चहा करून प्यायला आणि गरम गरम तिखट तिखट पोहे खायला केले. दुखणारे डोके बऱ्यापैकी शांत झाले.नॉर्थ कॅरोलायना राज्यात विल्मिंग्टन शहरात वादळवारे होते म्हणून वीज गेली होती. आदल्या दिवशी दोन दिवसांचा स्वयंपाक करून ठेवला होता म्हणून काही अडले नाही. इथे जोरदार हिमवृष्टी होणार असेल तर वारंवार हवामान सांगणाऱ्या चॅनल वर सूचनांचा भडिमार करत असतात. वीज जाण्याची शक्यता आहे तेव्हा जास्तीत जास्त खाण्यापिण्याचे पदार्थ घरात आणून ठेवा. तेव्हा तर इथले लोक घाबरून जणू काही उद्या प्रलय होणार आहे या थाटात भरभरून सामान घेतात. मी इंगल्स या ग्रोसरी दुकानात डेली विभागात काम करत होते म्हणून मला जास्त कळाले होते. सर्वच्या सर्व नेतात. पाण्याचे/दुधाचे कॅन्स, ब्रेड ठेवायच्या रॅक मध्ये अनेक प्रकारचे ब्रेड असतात ते सर्वच्या सर्व संपतात. 
 
 
तसेच डोंबिवली पाणी येणार नाही किंवा पाईप लाईन तुटल्याने पाण्याचा पुरवठा खंडीत होईल असे जेव्हा लोकांना कळते तेव्हा घरी जे दिसेल त्यात पाणी भरून ठेवतात. पिण्याचे पाणी म्हणजे पिंप, कळशी लोट्या, भांडी, इतकेच नव्हे तर पातेल्यात आणि वाट्यातूनही पाणी भरले जाते. पाणी आले नाही तर? अन्न मिळाले नाही तर? मनुष्य स्वभाव सगळ्या जगात सारखाच, नाही का? भारतात तर घरोघरी सिंटेक्स टाक्या बसवलेल्या आहेत. सोसायटीत पाण्याच्या टाक्याही अगदी काठोकाठ भरतात. पण जेव्हा पाणी नसते ना तेव्हाच ते जास्ती लागते. Rohini Gore
क्रमश : ..

No comments: