Tuesday, June 03, 2014

Hanging Rock State Park - North Carolina











हॅगिग रॉकला गेलो तेव्हा यावेळेस खूपच मजा आली. एक तर हवा छान होती आणि सगळीकडे हिरवेगार झाले होते. धबधब्याचे पाणी बर्फासारखे थंड होते. दरीतली हिरवळ तर खूपच सुंदर दिसत होती. पूर्वी गेलो तेव्हा सगळीकडे पालापाचोळा आणि झाडांवर काटक्या होत्या. तरी सुद्धा छान वाटतच होते  पण यावेळेस डोळ्याना सर्वत्र हिरवेरंगच  दिसत होते. हिरव्या रंगांच्या कितीतरी छटा पहायला मिळाल्या.


Wednesday, May 14, 2014

हिमवर्षाव २०१४













यावर्षीचा हिमवर्षाव २ ते ३ वेळा झाला पण तरीही खूप नाहीच. एके दिवशी बराच पडला. त्यादिवशी बदके थोडीच फिरत होती. आणि झाडांवरच्या पर्णहीन फांद्यांवर बर्फ चिकटून राहिला होता. दुसऱ्या दिवशी स्वच्छ उन पडले आणि आधी रस्त्यावरचा बर्फ वितळला. हिरवळीवरचा बराच वेळ तसाच राहिला होता. सूर्यप्रकाशात बर्फ उजळलेला छान दिसत होता. आमची नवीन गाडी पण बर्फाने भिजली तेव्हा पावन झाल्यासारखी वाटली.

हिमवर्षाव २०१४






















Monday, May 12, 2014

१२ मे २०१४

आजचा दिवस आठवणींचा होता. एक तर कालच्या आठवणीतून बाहेर पडले नव्हते आणि त्यात अजून काहींची भर पडली. आज आईशी फोनवर बोलता बोलता जेवणाचा विषय निघाला. आईबाबांना उद्या माझ्या मामे वहिनीने जेवायला बोलावले आहे आणि ती आमरस करणार आहे. तिने आईला विचारले की आमरसाशी पोळ्या करू की पुऱ्या? तर आईने पुऱ्या कर असे सांगितले. बोलताना मी पण आईला सांगितले की मलाही आजकाल पुऱ्या आवडायला लागल्या आहेत. पूर्वी माझ्या पुऱ्या बिघडायच्या पण आता नाही. त्यामुळे मग मी मुद्दामहून सणावारी पुऱ्याच  करते. आमरस , बासुंदी, खीर आणि श्रीखंड आणि याबरोबर पुऱ्याच पाहिजेत आणि त्या कश्या तर टम्म्म फुगलेल्या ! गरम गरम पुरी किंवा पोळी खायला किती छान लागते. त्याबरोबर खरे तर काहीही नसले तरी नुसती पुरी किंवा पोळी छान लागते. यावरून मी व आई पूर्वीच्या आठवणींमध्ये शिरलो. शाळा कॉलोजात असताना आम्ही आमच्या आजोबांबरोबर जेवायला बसायचो व त्यानंतर शाळेत जायचो. आई आम्हाला तिघांना गरम पोळ्या वाढायची. एका पोळीचे ३ भाग करायची. एकाला अर्धी पोळी तर दुसऱ्या दोघांना चतकोर पोळी, म्हणजे प्रत्येकावर अर्धी पोळी खायची एकेक टर्न यायची. किती छान दिवस होते ते !






दुपारी ऑफीसमधून विनायक घरी जेवायला येतो.  जेवून परत ऑफीसमध्ये जाताना मी पण थोडावेळ गॅलरीत उभी राहते आणि आकाशातले ढग न्याहाळत राहते. आज आकाशात ढग होते पण जास्तीचे काळे ढग नव्हते तरीही पाऊस पडायला सुरवात झाली. पाऊस पडताना गारा पडतात की काय असा भास झाला. इतका मोठा त्या थेंबांचा आवाज होता. एकेक मोठाले थेंब जमिनीवर पडताना पाहत होते आणि पावसाचा जोर थोडा वाढला. का कोण जाणे पण आज पावसात भिजावेसे वाटले.  अमेरिकेत आल्यापासून पहिल्यांदाच पावसात भिजले. भिजल्यावर इतके काही छान वाटले की परत माझे मन आठवणीत गुंतले. भारतात असताना वळबाचा पावसात भिजल्यावर खूप आनंद व्हायचा. शिवाय जूनच्या पहिल्या सरी अंगावर घेतल्या नाहीत असे कधी झालेच नाही.





आज संध्याकाळी नेहमीची चक्कर मारायला गेले. तळ्यावर बसले आणि शिवाय तळ्याभोवतीने पण एक चक्कर मारली. तळ्यावर एक बाई येते. तिला मी काही वेळेला बघितले आहे. कार थांबवून ती बदकाना खायला देते. थोडावेळ उभी राहते आणि नंतर जाते. आज मी फोटो काढत असताना मला म्हणाली तु फोटोग्राफर आहेस का? तर म्हणाले हो. मला फोटो काढायला आवडतात. मग ती बाई माझ्याशी गप्पा मारायला लागली. त्यात तिने सांगितले की माज्या वडिलांची इथे काही मालमत्ता आहे तर ती सांभाळण्यासाठी मी रोज इथे येते. या रोडवरून डाव्या हाताला आणि नंतर उजव्या हाताला वळले की तिथे एक मोठे तळे आहे असे ती सांगत होती. तळ्याभोवती खूप मोठे कुंपण घातले आहे म्हणाली. शिवाय तिथे तिने बरीच झाडेही लावली आहेत. तिने मला अजून काही माहिती पुरवली की तुमच्या अपार्टमेंट समोर जे तळे आहे तिथली सर्व बदके आमच्या इथल्या तळ्यात हलवली आहेत. तुला जर का बदकांचे फोटो काढायचे असतील तर आमच्या तळ्यावर ये. मला मजाच वाटली. त्यात तिने हेही सांगितले की ती पक्की शाकाहारी आहे. हे ऐकून तर मला नवलच वाटले. मग तिने मला विचारले तू कुठली, इथे किती वर्षे आहेस, तुला अमेरिका आवडते का? मी तिला सांगितले की मी इथे येऊन १३ वर्षे झाली. मी भारतात मुंबई शहरात राहत होते. तर म्हणाली हो मुंबई मला माहीत आले पण मी भारतात कधी गेले नाही. ती पूर्णपणे शाकाहारी आहे हे ऐकून तर मला खूपच छान वाटले आणि तिला म्हणाले की आम्ही दोघे नवरा बायको दोघेही पक्के शाकाहारी आहोत. माझा शाकाहारी रेसिपींचा ब्लॉगही आहे. तर तिने माझ्या ब्लॉगचा पत्ताही घेतला आणि म्हणाली की परत भेटूच आणि ती कारने निघून गेली. आजचा दिवस काही वेगळाच होता ! आणि म्हणूनच रोजनिशीत लिहिला ,कालचा सूर्यास्ताचा फोटो ली रिंगरला पाठवला. बघू आता तो केव्हा दाखवतो ते !

Sunday, May 11, 2014

११ मे २०१४


आज सकाळी जाग आली आणि बाहेर बाल्कनीत जाऊन उभी राहिले तर आकाशात काही ढग जमा झाले होते आणि थोडे रंगही होते पण सूर्योदय मात्र होऊन बराच वेळ झालेला दिसत होता.  थोडी आधी जाग आली असती तर छान सूर्योदय बघायला मिळाला असता. चहा घेतला आणि दिनक्रमाला सुरवात केली. काल ठरवलेली साफसफाईची कामे झाली नाहीत म्हणून आज करावी असे मनात घोळत होते. पण करावी का, किंवा करूच नयेत? परत झोपावे? असे मनातल्या मनात ठरवत होते आणि कामे सुरू केली. कामाला सुरू करायलाच वेळ लागतो. आपण आपल्याला "चला आता कामाला लागा"  अश्या सूचना द्याव्या लागतात तरच काहीतरी होते. तर ते असो. गेले तीन चार दिवस तापमान चांगलेच चढे होते त्यामानाने आज कमी होते म्हणून आम्हाला दोघांनाही आवडणाऱ्या समुद्रकिनारी जायचे ठरवले.






बाहेर जेवून थेट समुद्रकिनारा गाठला. आज हवा थोडी ढगाळ होती आणि विशेष म्हणजे हवेत आद्रता नव्हती त्यामुळे समुद्रावर गेल्यावर छान वाटले. आज गर्दी होती. आज समुद्रावर नेहमीपेक्षा जास्त भरती होती. लाटा खटाखट खडकांवर आदळत होत्या. मुले मजा करत होती. नेहमीप्रमाणे चालायला सुरवात केली. आज समुद्रावर रंगांच्या छटा छानच उमटल्या होत्या. निळा, हिरवा, मातकट, असे रंगांचे थर खूपच छान दिसत होते. वरती आकाशात निळा रंग आणि त्यावर थोडे पांढरे, निळे व काही काळे ढगही चान दिसत होते. मस्त वारा सुटला होता. हवेत आद्रता नसल्याने बरे वाटत होते. नेहमीची चाल पूर्ण केली आणि समुद्राच्या दुसऱ्या टोकाला जाऊन वाळून बसायचे ठरवले. वाळूत बसलोही. पण आज भरती अशी काही जोराची होती की पाण्यात जावेसे वाटत होते. अर्थात आम्ही दोघे पाण्यात कधीच जात नाही. एक तर मला समुद्राच्या पाण्याची आणि लाटांची खूप भीती वाटते. आणि खारट पाण्याने पाय चिकट होतात म्हणूनही जात नाही. पण आज पहिल्याप्रथम इतक्या वर्षानंतर पाण्यात उभे राहिलो. मला तर भीतीच वाटत होती. लाटा जोराच्या येत होत्या. पण थंडगार पाणी पायावर आल्यावर इतके काही छान वाटले की तिथेच पाण्यात बराच वेळ उभे राहिलो. तिथून हलावेसेच वाटत नव्हते. नंतर पाण्याबाहेर आलो आणि तिथल्या एका खडकावर बसून लाटांकडे खूप वेळ बघत बसलो. असे वाटत होते की उठूच नये. थोडे ढगाळ वातावरण वाढले आणि दोन चार पावसाचे थेंबही पडले. पाऊस आला असता तर पावसातही भिजायला नक्कीच आवडले असते पण पाऊस पडला नाही. समुद्रावर असताना मुसळधार पावसाला बघायची माझी खूपच इच्छा आहे.






आज अंजलीला फोन केला होता तर तिने सांगितले की फिरायला जाताना पंजाबी सूट घाल म्हणून घातला. तसे तर मी ठरवलेच आहे की उन्हाळ्यात बाहेर जाताना पंजाबी सूट घालायचे नाहीतर बॅगेत पडून राहतात. पण तरीही मैत्रिणीने सांगितले म्हणून माझ्या ठरवण्याला अजूनच उत्साह आला आणि ड्रेस घातला. तशी तर मी पण तिला सांगते. की बाग केलीस तर फुलांचे फोटो काढ. झोपाळ्यावर बसून फोटो काढ. तर तसे तिनेही केले.  मैत्रिणींचे असे एकमेकींना सांगणे किती छान असते ना ! घरी आलो तर डोके ठणठण करत होते. चहा घेतला. कशीबशी मुगाच्या डाळीची खिचडी टाकली. पापड तळले. टोमॅटो काकडीचे काप केले आणि याबरोबर दही आणि खिचडी असा जेवणाचा बेत केला. जेवलो तेव्हा जरा थोडे डोके उतरल्यासारखे वाटत आहे. आज सूर्यास्तही खूप छान होता. आज एक खूप सुंदर फुल पहायला मिळाले. आजचा एकूण दिवस खूप छान गेला. लक्षात राहील असा गेला. अजूनही समुद्राचे पाणी, लाटांचा खळखळाट, समुद्राचा थंडगार पाण्याचा पायाला झालेला थंडावा, मनात साठून राहिले आहे.  आहाहा एकूणच सर्व काही छान छान !!

Sunday, April 20, 2014

२० एप्रिल २०१४

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला तीन दिवसाची भर घालायला लागेल. गेले तीन ते चार दिवस झाले इथे पाऊस एके पाऊस, पाऊस दुणे पाऊस आणि पाऊस त्रिक पाऊसच पडत आहे. हाहा. सूर्याने ढगांचा घुंघट ओढून घेतला आहे. तो म्हणतोय नाही दाखवणार मुखडा जा! काय करायचे ते करा. काळेनिळे ढग आकाशात अजूनही खूप भरून राहिले आहेत. भरपूर प्रचंड आणि बोचरा वारा आहे त्यामुळे घरी बसून भजन करणे हाच एक उद्योग लाँग विकेंडचा होऊन बसला आहे. अर्थात असे वातावरणही पथ्यावर पडले आहे घरीच बसून विश्रांती घ्यायला कारण की या हवेमुळेच ठणठण डोके दुखत आहे. सर्दी खोकला आणि सोबत अंगदुखीही आहे. त्यात विनायकला पोलनचाही त्रास होतोय. पण या हवेत सुद्धा त्यातल्या त्यात वेगळेपणा करायचा असे ठरवले त्यामुळे दिवस तसे बरे गेले म्हणायला हरकत नाही. शुक्रवारची सुट्टी असली तरी विनायकला कामावर जायचे होते म्हणजे ठराविक वेळेत नाही. आपल्या सोयीनुसार जाऊन यायचे. आम्ही अजूनपर्यंत चायनीज उपहारगृहाला भेट दिली नाहीये. तर ठरवले जाऊ. गुगलिंग केले आणि मेनू मध्ये बघितले तर काही शाकाहारी डिशेस होत्या. पण आमचा पोपट झाला. गेलो तर तिथे फक्त एकच डिश होती आणि वेबसाईटवर तर चार ते पाच शाकाहारी डिशेस दिसत होत्या. त्यामुळे उठलो आणि बाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे मेक्सिकन उपहाराकडे धाव घेतली आणि रात्री वन डिश डिनर म्हणजे भाजणीचे थालिपीठ केले.



तब्येत जास्त ठीक नसल्याने शनिवारचा बेत होता ईडली आणि सांबार. घरी बसून बसून खूपच कंटाळा आला होता. पाऊस पडत असल्याने बाहेर चालणे तर शक्यच नव्हते म्हणून मग ठरवले की दुपारचा चहा प्यायल्यावर निदान मॉलमध्ये तरी फेरफटका मारू. मला काही खरेदी करायचे होते तेही नव्यानेच म्हणजे लाँग स्कर्ट आणि टॉप खरेदी करण्यासाठी मॉल मध्ये हिंडायचे ठरवले. आधी बघू आणि नंतर कसे ते ठरवू. कारण की इथे कपडे शोधणे हाच एक मोठा कार्यक्रम असतो कारण की इथे राहणाऱ्या बायका लांबी, रुंदी आणि उंचीनेही चांगल्या भरभक्कम असतात. विनायक म्हणाला की तु मॉलमध्ये फिर तोवर मी लॅबमध्ये काम करून तुला घ्यायला येतो. मग मी दोन तास एक दोन दुकाने हिंडले आणि सीअर्स मध्ये माझ्यामनासारखे स्कर्ट पाहिले आणि ते आवडले. अर्थात घेतले नाहीत. मग चालून मला दमायलही झाले आणि थोडी भूक लागली तर मग मी स्मुदी प्यायली.  पाऊस वारा अगदी थोड्या वेळेकरता विश्रांती म्हणून थांबत होता.   परत जोर लावून पडायला सुरवात याची !  घरी येऊन मग परत वन डिश डिनर उसळ केली . डिनर झाले. म्हणजे २ दिवस भांडी कमी पडली. आज जरा दोघांच्याही तब्येती बऱ्या आहेत. आज सकाळी घराची साफसफाई आणि हेअर कलर केला आणि डोक्यावरून अंघोळ केली. आजकाल ना अंघोळीचे पण एक काम वाटते. अंजलीचे आणि माझे याबाबतीत अगदी एकमत आहे.


आजचे लंच परत मेक्सिकन उपहारगृहात. हे नवीन उघडले आहे. तिथे निराशा होता होता वाचली. कारण की तिथे शाकाहारी डिश एकही नव्हती. तिथले लोक म्हणाले आम्ही तुम्हाला पाहिजे तशी शाकाहारी डिश बनवून देतो. आणि ती एकदम छान बनवली होती. नेहमीपेक्षा जरा वेगळ्या भाज्याही घातल्या होत्या. त्यामुळे छान वाटले. एका चायनीज दुकानात गेलो. तिथे काही काही इंडियन ग्रोसरी ठेवली असते. काही घ्यायचे होते पण तिथे ते नव्हते. काल पाहिलेले स्कर्ट  व टॉप परत मॉलला गेलो तर आज मॉल ईस्टर संडे मुळे बंद.  लक्षातच आले नाही. खूप दुकाने आणि उपहागृहे पण बंद होती. 


आज आता संध्याकाळी मी चुरमुऱ्यांचे भडंग करून खात आहे. सोबत चहाही आहे आणि एकीकडे रोजनिशी लिहीत आहे.    आणि कालच्या उरलेल्या ईडली पीठाचे उत्तपे करून झोपणार. एकूणच यावेळचा लाँग विकेंड खूपच वेगळा गेला. पाऊस , वारे, आणि सूर्यप्रकाश नाही यामुळे चांगलाच वैताग आलेला आहेॅ. आणि तब्येतही तशी बेताचीच आहे.  आता उद्यापासून सूर्यप्रकाश आहे त्यामुळे थोडातरी उत्साह येईल असे वाटते.

Saturday, April 12, 2014

१२ एप्रिल २०१४





आजचा दिवस खूप छान आणि आनंद देणारा होता. कारण की आज आम्ही सर्कस पाहिली. सर्कस आमच्या गावात आली आहे ही न्यूज आम्ही आमच्या वेदर चॅनलवर पाहिली आणि त्याचे वेळेला ठरवले की सर्कस बघायची. नेहमीची साफसफाईची कामे उरकली आणि बाहेर जेवायला निघालो. सर्कस पाहून किती वर्षे झाली म्हणण्यापेक्षा लहानपणी  कधीतरी एकदा की दोनदा, तेही आता आठवत नाही, पाहिली होती. त्यातले अंधुकसे असे काहीतरी आठवत आहे.




जेवल्यानंतर थेट विमानतळ  गाठले कारण की विमातळावरच्या आजुबाजूच्या मोकळ्या आवारात सर्कशीचे तंबू उभारले होते. तिकिटविक्री चालूच होती. तिथे पोहोचलो तर साडेतीन वाजत आले होते आणि शो होता साडेचारचा म्हणजे एक तासाचा अवधी होता. पण हा १ तास कधी निघून गेला ते कळलेच नाही. सर्कशीला भरपूर लहान मुले आली होती. त्यांचे पालकही होते. त्यामध्ये त्यांचे आईवडील, आजी आजोबा पण होते. सर्कशीतले २ हत्ती तंबूच्या आवाराबाहेर उभे केले होते आणि ते अधुनमधून गवत खात होते. गवत खाऊन झाले की ते हत्ती तिथल्याच एका छोट्या जागेत गोल गोल चक्क्र मारायचे आणि ही चक्कर वाया जात नव्हती. त्यातून सर्कशीला पैसे मिळत होते. लहान मुलांकरता त्यांचे पालक तिकिट काढून त्यांना हत्तीवर बसवत होते. विक्रिकरता कॉटन कँडी, पॉपकॉर्न, कोक, आईस्क्रीम होतेच. शिवाय तिथे फुगे पण विकायला होते. बर्फाचे गोळे होते. जोकरासारखी चेहरा रंगवून घेण्यासाठीही लाईन होती. यातले मला सर्व काही करावेसे वाटत होते पण अर्थातच केले नाही. मी काय आता लहान आहे का? हेहेहे. आपण कितीही मोठे झालो तरी मुले ज्या गोष्टी करतात त्या खरे तर आपल्यालाही कराव्याश्या वाटतात निदान मला तरी तसे वाटते. खोटे कशाला बोलु. माझ्यासोबत एखादी मैत्रीण असती ना तर या सर्व गोष्टी मी केल्या असत्या !



 हळूहळू करत आत जाण्यासाठी एक लाईन लागली आणि आम्हाला सर्कशीतल्या तंबूत सोडले गेले. तिथे गेल्यावर मुलांचा गोंगाटच गोंगाट होता. मुले आणि त्यांचे पालक चरत होते. कोणी आईस्क्रीम खातयं तर कोणी कोक पितयं . हे सर्व जरी बाहेर मिळत होते तरीही डोक्यावर ट्रे घेऊन या सर्व वस्तू विकल्या जात होत्या. अशी अनेक माणसे आम्ही बसलेल्या गर्दीतून फिरत होती ते सर्व विकण्याकरता. निरनिराळे फुगे. चकाकत्या कांड्या, बर्फाचे गोळे, पाणी पॉपकॉर्न हे सर्व काही विकण्याकरता अनेक माणसे फिरत होती. आणि बाहेरच्या पेक्षा आतला रेट १ डॉलरने जास्त होता. आत जोरजोरात म्युझिक तर सुरूच होते. सर्कस सुरू झाली. एकेक करत वाघ, हत्ती, घोडे इ. इ. यांच्या कवायती झाल्या. सॅल्युट करून झाले. नंतर बारीक बांध्याच्या उंच पोरी आल्या. त्यांनी निरनिराळ्या हरकती करून दाखवल्या. खाली डोके वर पाय, एका हातावर भार देऊन सर्व शरीर हवेत उचलून धरणे. इ. इ. नंतर खूप उंचावर काही माणसे उभी राहिली. त्यात पोरीही होत्या. मग त्यांनि झोपाळ्यावरच्या कसरती करून दाखवल्या. मग आले हत्ती. त्यांनी पण नाचून दाखवले. झोपून दाखवले. एकमेकांच्या अंगावरून उड्या मारून दाखवल्या. नंतर मोठ्या जाळीमध्ये ३ फटफट्या आल्या आणि त्या फिरल्या. नंतर एक भलीमोठी तोफ आली. त्यातून एकाला उडवले. त्याचा तर इतका काही मोठा आवाज झाला. आणि तोफ उडाल्यावर तो खूप जोरात बाहेर फेकला गेला. त्याला झेलण्यासाठी मोठी कापडी जाळी होतीच. एक ना दोन एकेक हरकती आणि कसरती करत करत शेवटी एकदाची सर्कस संपली. ज्या लहान मुलांकरता पालक आले होते त्यांनीच जास्त सर्कस बघितली. लहान मुले फुग्यात आणि रंगीबेरंगी चकमकत्या कांड्यामध्ये रममाण झाली होती.




 घरी आलो तेव्हा डोके ठणठण करत होते. चहा घेतला तरीही डोके थांबेना. भूकही लागली होती. अश्यावेळी पटकन होणारा पदार्थ म्हणजे थालिपीठ. ते केले. आणि खाल्ले तरीही डोके अजूनही दुखत आहे. याचे कारण म्हणजे ३ तास गोंगाट आणि तंबूत लावलेले कसरती करतानाचे कांठल्या बसणारे म्युझिक. आता हे सर्व लिहित आहे तेव्हा १० वाजलेत रात्रीचे. पिसी बंद करून झोपणार आता. पण आजचा दिवस मात्र कायम लक्षात राहील असा गेला. एक मात्र चुटपुट लागून राहिली आहे आणि ती म्हणजे मी कॅमेरा नेला नव्हता. नाहीतर सर्कशी बाहेरचा माहोल कसा होता ते तुम्हाला दाखवता आले असते.

तर आजच्या दिवसाचा सारांश काय? तर सर्कस ! अजूनही माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र तरळत आहे. स्वप्नात पण सर्कस दिसणार बहुतेक आज !

Monday, March 10, 2014