Monday, July 06, 2026

मी अनुभवलेली अमेरिका ... (२)

मी व माधवीने जे २ विसावर वर्क पर्मिट काढले व नोकरी शोधण्यास सुरवात केली. तिला डे केअर मध्ये नोकरी मिळाली. नंतर तिने शाळेत substitute शिक्षिकेची नोकरी केली. नंतर तिने पाकिस्तान मधल्या लैला नावाच्या मुलीची शिकवणी घ्यायला सुरवात केली. ती तिच्या घरी यायची. माधवी ही तेलुगू असून हैद्राबाद मध्ये रहाणारी होती व तिथे ती कॉलेज मध्ये प्रोफेसर होती. ती M.SC (Maths) गणित या विषयात Gold Medalist होती/आहे. मला डे केअर मध्ये नोकरी मिळत होती पण माझे वर्क पर्मिट आलेले नव्हते. एक वर्षाच्या आत आम्ही क्लेम्सनला गेल्यावर वर्क पर्मिट रिन्यु केले त्याचा मला पुरेपूर फायदा झाला. मला Day-care मध्ये नोकरी मिळाली व वेगवेगळे अनुभवही आले. क्लेम्सन मध्ये पिएचडी (PhD) करणारी काही मंडळी होती. एकटे असाल तर शिष्यवृत्ती पुरते पण लग्न झाले असेल तर पुरत नाही त्यामुळे बेकायदेशीर नोकऱ्या कराव्या लागतात. पि एच डीचा विसा फ़ १ (F 1)असतो तर त्याच्या बायकोचा (F 2) फ़२ असतो आणि फ़२ वर पर्मिट काढता येत नाही.


बेकायदेशीर नोकऱ्या इथे बरेच जण करतात. यामध्ये कॅश स्वरूपात पैसे दिले जातात ज्याची नोंद कुठेही होत नाही. नोकरी देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही जरूर असते त्यामुळे मुद्दाम कोणी तक्रार करत नाही. पण जर का कुणी केली तर त्याला/तिला अमेरिकेतून हाकलून दिले जाते आणि परत इथे कधीही येता येत नाही.
माझी एक मैत्रिण रेणुका हिला पैशाची गरज होती कारण तिचा नवरा केमिस्ट्री मध्ये पिएचडी करत होता. त्याच वेळेस एका अमेरिकन बाईला तिच्या जुळ्या मुलींना सांभाळण्यासाठी कुणीतरी हवे होते. तिच्या एका मुलीत थोडा प्रोब्लेम होता त्यामुळे ती तिला डे केअर मध्ये ठेवत नव्हती. रेणूका या कामाला इतकी बांधली गेली होती की तिला कुठेही बाहेर नवऱ्याबरोबर ४/५ दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जाता येत नव्हते. तेव्हा तिने मला विचारले होते की तु माझ्यासाठी ४ दिवसाची ही नोकरी करशील का? तेव्हा मी ती केली होती. त्या अमेरिकन बाईकडे ही नोकरी घरी ७ ते ५ या वेळात तिच्या घरी जाऊन करायची होती. मी त्या २ जुळ्या मुलींना ४ दिवस सांभाळले पण मला असे वाटले की कुणीतरी मला डांबून ठेवले आहे. कारण की इथे हीटींग/कुलींग करता घराची दारे/खिडक्या बंद कराव्या लागतात. इतक्या लहान मुलींना (या मुली रांगतही नव्हया इतक्या त्या लहान होत्या) लहान बाळांची जबाबदारी खूपच असते. मला रेणुका किती कष्ट करत आहे याची कल्पना आली आणि तिचे खूप कौतुकही वाटले. नवऱ्याला ती आर्थिक मदत करून संसाराला हातभार लावत होती.


ती अमेरिकन बाई मला पण ओळखत होती कारण की मी ज्या डे-केअर मध्ये काम करायचे तिथे तिचा मोठा मुलगा येत होता. त्या बाईने मला रेणुकाला जितके पैसे ती देत होती त्यापेक्षा जास्त पैसे मला दिले. बदली कामगाराला नेहमीच जास्त पैसे दिले जातात (जसे की भारतात कामवाली बाईच्या बदल्यात जी बाई येईल तिला) रेणुका मला म्हणाली की ती तिथे २/३ वर्षे तरी काम करत आहे आणि अजूनही तिला काम करावे लागणार आहे पण तरी सुद्धा त्या बाईने तिचा पगार वाढवला नव्हता. मनात म्हणाले अमेरिकन पण चिंगुस असतात तर ! असेच एक जोडपे होते उत्तर भारतीय संगिता व तिचा नवरा. मनिष पिएचडी करत होता. या जोडप्याची ओळख आम्हाला येमुल-सुनिताच्या घरी झाली. संगितानेच मला इथल्या बटरचे साजूक तूप कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक तिच्या घरी दाखवले होते. ती पण काटकसरीने संसार करत होती. इथे डॉलर जनरल (Dollar General ) या अमेरिकन दुकानात १ डॉलरला प्लॅस्टीकच्या बऱण्या मिळतात पण ती विकत नाही आणायची. इथे प्लॅस्टीकच्या बादल्यातून आईस्क्रीम मिळते. (आता तसे मिळत नसावे) त्या बादल्या रिकाम्या झाल्या की त्या घासून पुसून लक्ख करायची व त्यात धान्य भरायची. दह्याचे प्लॅस्टीकचे डबे धुवून पुसून त्यात चहा साखर ठेवायची. स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये (एकच खोली, त्यातच वॉश रूम) ती दोघे रहायचे. आम्ही पण क्लेम्सनला जागा मिळत नव्हती म्हणून शेवटी स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये रहाण्याचा निर्णय घेऊन अडीच वर्षे राहिलो होतो. 
 
 
आम्ही ज्या मोटेल मध्ये उतरलो होतो त्या मोटेल मध्ये ही दोघे नवरा बायको काम करायची. अर्थात साफसफाईचे नाही, काउंटर वर बसण्याचे काम. त्यांच्याकडे टिव्ही वर सर्व भारतीय चॅनल दिसायचे. डिश असल्याने हे सर्व चॅनल , विशेष करून झी आणि सोनी (हिंदी). मोटेलचे मालक गुजराथी होते. मोटेलचे काम पण असेच बांधील असते त्यांना कुठेही बाहेर फिरायला किंवा मित्रमंडळींकडे जाता येत नाही. म्हणून जेव्हा गुजराथी कुटुंबाला कुठे बाहेर जायचे असेल तर ते या दोघांना मोटेल मधे राहून त्या दिवसांचे काम द्यायचे. तिथे संगिता व तिचा नवरा रहायलाच जायचे ५/६ दिवसांचे कपडे घेऊन जसे आपण ट्रीप ला जातो तसे. तिथेच जेवण, अंघोळी पांघोळी सर्व. शिवाय टिव्ही पण बघता यायचा. त्यांच्या घरचे डाळ-तांदुळ व भाज्या वापरून स्वयंपाक करायचा. 
 
 
ही जी मोटेल्स असतात ही सर्वात खालच्या दर्जाची असतात. तिथे साधारण रस्त्यावर इलेक्ट्रीकची कामे खांबावर चढून जी करतात ती रहायला यायची. counter म्हणजे तिकिट विंडो सारखा. आत यायला मुभा नाही. गिऱ्याईका कडून पैसे घ्यायचे व किल्ली द्यायची. क्लेम्सनच्या आजुबाजूला कमी लोकसंख्या असलेली २ छोटी शहरे होती ती म्हणजे Anderson व Seneca तिथेही गुजराथी लोकांची मोटेल्स होती. तिथेही हे जोडपे जात होते. एक वेळ अशी आली की तिनही ठिकाणी माणसांची गरज होती. तेव्हा संगिताने येमुल व येमुलने आमचे नाव सुचवले होते. आम्हाला पैशाची अजिबात गरज नव्हती पण तरीही आम्ही गेलो. एक अनुभव मिळाला. तिथेही आम्हाला दोघांना खूपच कोंडल्यासारखे झाले होते. मोटेल वाल्यांच्या घरी असलेल्याच डाळ तांदुळ व भाज्या वापरून मला आमच्या दोघांचा स्वयंपाक करायचा होता. शिवाय बघायला टीव्ही होताच. त्यावेळेला आमच्याकडे कार नव्हती म्हणून मोटेल वाले आम्हाला घरी घ्यायला व सोडायलाही आले होते. नंतर एकदा आम्ही ज्या मोटेल मध्ये उतरलो होतो त्यांनी आम्हाला विचारले की ४/५ तासांकरता एखाद्या शनिवार/रविवार यायला तुम्हाला जमेल का? तर आम्ही हो सांगितले. नंतर आम्ही २/३ वेळेला आमच्या कार मधून मोटेल सांभाळण्यासाठी गेलो होतो. त्या गुजराथी मोटेल सांभाळणाऱ्या नवरा बायकोला खूप हायसे वाटले होते. इथे कार सर्व जण घेतात विद्यार्थी सोडून. काही वेळा एक विद्यार्थी कार घेतो व त्यात बाकीचे बसून सर्व किराणामाल भाजीपाला आणतात. second hand car इथे खूप स्वस्तात मिळू शकते. १५००/२००० डॉलर्स ते ५ ते १०,००० डॉलर्स पर्यंत मिळते. आम्ही २००४ साली ५००० डॉलर्सचि घेतली होती. मायलेज पण कमी होते. 
 
 
कोरी करकरीत कार २०,०० डॉलर्स ते ५०,००० हूनही जास्तीची मिळते. आधी सर्वच सेकंड हॅंड कार घेतात कारण की कार चालवायची सवय व्हायला हवी आणि कारला अपघात झालाच तर नवीन कारला पोचे यायला नकोत. इथे कार घेतली की तिची हार घालून हळदी कुंकू वाहून पूजा करत नाहीत जसे की भारतात करतात. इथे कार Luxury लझकी नाही तर Necessity आहे. पब्लिक ट्रास्न्स्पोर्ट ची बोंबाबोंब आहे. काही मोठ्या शहरात रेल्वेच जाळे आहे. जसे पुण्यात कामावर जाताना टु व्हिलर घेऊन जातात तसेच इथे कार घेऊन जातात इतकाच फरक आहे. कामावर जायला व वाण सामान, भाज्या वाहून आणण्याकरिता येथ कार घ्यायलाच लागते. भारतात संध्याकाळचे फिरायला गेले आणि येताना भाजी आणली तसे इथे होत नाही. इथे रस्त्यावर विक्री होत नाही. दुकाने दूरवर असतात. Rohini gore

Friday, July 03, 2026

३ जुलै २०२६





 आज आम्हाला दोघांना खूप आनंद झाला आणि समाधानही झाले. शकुंतला व तिची २ मुले दीपराज आणि सूर्या आमच्या घरी आले होते. दीपराजने MIT मधून phD केली होती बोस्टनला आणि आता तो न्यु यॉर्क मध्ये (Columbia University) कोलंबिया विद्यापीठात (post-Doctorate) पोस्ट डॉक्टरेट करत आहे. मी आणि शकुंतला एकमेकींच्या संपर्कात असतोच त्यामुळेच मी शकुंतलाला सांगितले होते की न्युयॉर्कला आलीस की माझ्याकडे यायचेच आहे. तुम्हाला सर्वांना ट्रेन ने येता येईल. आमच्या घराजवळच ट्रेनचे स्टेशन आहे. सकाळी ८ ला विनायक त्यांना स्टेशनवर आणायला गेला. तोपर्यंत मी पोहे बनवले होते.

घरी आल्यावर गिफ्टांची देवाण घेवाण झाली. पोहे-चहा व मनसोक्त गप्पा झाल्यावर आम्ही त्यांना (A2B) ए२बी उपाहारगृहात जेवणासाठी घेऊन गेलो. सर्व डोसे प्रेमी असल्याने वेगवेगळ्ञा प्रकारचे डोसे मागवले. नंतर खोबऱ्याची पुरणपोळी मागवली. त्याबरोबर खीर होती. नंतर कॉफी. त्यानंतर Kohl's मध्ये गेलो व शकुंतलला मी २ टी शर्ट घेतले तिच्या आवडीचे. तिच्या मुलांनी त्यांच्याकरता उशा घेतल्या. शिवाय मी शकुंतलेसाठी आधीच पर्स घेऊन ठेवली होती. आल्यावर चहा पाणी झाले. गप्पा झाल्या आणि आम्ही त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो.


२००१ साली आम्हाला विमानतळावर सोडायला रामचंद्र भट, शकुंतला व त्यांचा छोटा मुलगा दीपराज असे तिघे आले होते. त्यानंतर २००४ साली त्यांच्या अंधेरीच्या घरी आम्ही धावती भेट दिली व तिथूनच विमानतळावर पोहोचलो. रामचंद्र भट व विनायक आयायटी (IIT - Powai ) पवई मध्ये phD पि एच डी करत होते. त्यानंतर ते दोघेही हिंदुस्तान लिव्हर मध्ये नोकरीला लागले. आम्ही दोघे त्यांच्या मुलुंडच्या घरी गेलो होतो. तसेच ते दोघेही आमच्या डोंबिवलीच्या घरी आले होते. त्यानंतर १९९९ साली आम्ही सर्व हिंदुस्तान लिव्हरच्या क्वार्टर्स मध्ये रहायला गेलो अंधेरीला. या क्वार्टर्स कंपनीच्या मागच्या बाजूलाच होत्या. त्यानंतर आम्ही २००१ ला अमेरिकेला आलो व कालांतराने भट कुटुंबिय बंगलोरला गेले.


आम्ही जेव्हा क्वार्टर्स सोडली तेव्हा भट कुटुंबियांकडेच आमच्या फायनल बॅगा भरल्या. मे महिना होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. आम्ही दोघांनीही गार पाण्याच्या अंघोळी केल्या. शकुंतलाने गरम गरम स्वयंपाक केला होता आणि मला म्हणाली होती. रोहिणी पोटभर जेवून घे. तिथे गेल्यावर असे जेवण मिळणार नाही. २००४ साली आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा सूर्या होता दीपराजचा भा ऊ.
दोन्ही मुले खूपच लाघवी आहेत. कोणत्याही प्रकारचा गर्व नाहीये ! ती दोघेही आमच्या गप्पात मिसळली व आम्ही तिघांनी छान हिंदीतून गप्पा मारल्या !!
आम्हाला सर्वांनाच छान वाटले. मी म्हणाले की आज तापमान खूप आहे म्हणजे भारतातले अंश सेल्सिअस ३८ ! त्यामुळे ही भेट जास्तच लक्षात राहील. फोटो सेशन तर व्हायलाच हवे ! गॉगल घालून, चष्मा काढून, सेल्फि बिल्फी, प्रत्येकाच्या मोबाईल कमेरातून. फोटोंची देवाण घेवाण. जो चांगला फोटो असेल तोच अपलोड करायचा. शकुंतला बोली, इधर भी कितना धूप है रे ! मैने बोला, हां इधर भी बहूत धूप है, ऐसा मत सोच की इंडियामें ही है. न्यु यॉर्क, न्यु जर्सी में तो कम है, लेकीन टेक्सास और ऍरिझोनामें तो ४५-५० तक अंश सेल्सिअसमें रहेगी ! 🙂 See less
rohini gore 
 










 


Monday, June 29, 2026

मी अनुभवलेली अमेरिका.... (१)

 

अमेरिकेतले जीवन कसे आहे ते इथे येणाऱ्या मुलींकडून कळते म्हणजे त्या व्हिलॉग करतात. विडिओच्या माध्यमातून बोलून थेट ते सर्वांपर्यंत पोहोचते. पण खूप पूर्वी म्हणजे आम्ही आलो २००१ साली, त्याही आधी इथले जीवन कसे आहे ते सर्वांपर्यंत तर नाहीच नाही तर आईवडिलांना पण सांगता यायचे नाही. कॉलिंग कार्डवर खूप कमी मिनिटे मिळायची. त्यात एकमेकांच्या तब्येती बद्दलच बोलले जायचे. परदेशातच नाही तर भारतात स्वत:चे जन्मस्थान सोडून मुली लग्न होऊन/नोकरी-शिक्षणा निमित्ताने तर मुलं शिक्षण/नोकरी निमित्ताने त्याच राज्यातल्या दुसऱ्या शहरी किंवा दुसऱ्या राज्यातल्या शहरात गेले तर मिळतेजुळते घ्यावे लागते. मदत मिळते पण संघर्ष खूप करावा लागतो. नंतर रूळले जाते. पूर्वी पण घरोघरी फोन नव्हतेच. त्यामुळे सुट्टी/रजा मिळेल तेव्हा येणे होत असे. एरव्ही पत्रातून खुशाली कळवली जायची. दुसऱ्याच्या घरी रहाताना किंवा पेईंग गेस्ट असलेल्या ठिकाणी तिथल्या माणसांची मिळतेजुळते घ्यावे लागते. 
 
 
त्यातून प्रायव्हेट कंपनी असेल तर कामाचे तास जास्तीचे. रजा/सुट्या कमी असतात. ज्यांना जन्मस्थान सोडून कुठेही जावे लागत नाही आणि त्यात सरकारी नोकरी असेल तर भरपूर सुट्या, रजा, कामाचे तास कमी, युनियनचा पाठींबा, निवृत्ती नंतर पेंशन. त्यातही महागाई वाढली की महागाई भत्ता पण वाढतो. असे सर्व भाग्यवान ! त्यांना संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळेच जेव्हा पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या त्यांना नोकरी जाईल असा ताणतणाव नसायचा. तिथे ताणतणाव नाहीच असे काही माझे मत नाही पण तुलनेने दुसऱ्या शहरात इतरांशी मिळतेजुळते घेऊन प्रायव्हेट नोकरी टिकवायची हे जास्त कष्टदायक आहे. 
 
 
अमेरिकेत एच वन विसा मिळाल्यानंतरही टांगती तलवार असतेच. कोणत्याही कारणानिमित्त नोकरी गेली की ठराविक दिवसाच्या आत तुम्हाला देश सोडावा लागतो. नवऱ्याच जे वन विसा बायकोचा जे २ विसावर वर्क पर्मिट काढता येते. नवऱ्याच्या एच वन विसावर बायकोचा डिपेंडंट विसा होतो तो असतो एच ४ की ज्यावर वर्क पर्मिट काढता येत नव्हते. आता येते असे ऐकले आहे. अमेरिकेत आल्यावर कुणाला कधी पाहण्याची शक्यताच नाही असे सर्वजण एकमेकांना मदत करतात. जसे की आम्ही जेव्हा आलो तेव्हा संपतकुमार व त्याची बायको सत्या यांना दुसऱ्या शहरात संशोधनासाठी जावे लागले. त्यामुळे त्यांना लीज टेकओव्हर कुणी केले तर बरे होईल असे वाटत होते. त्या दरम्यान आम्ही तिथे होतो. तिथे आम्ही काही अपार्टमेंट पाहिली तर कोणतीच पसंत पडत नव्हती. निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता. ऍलन यांनी आम्हाला सुचविले की तुम्ही संपतकुमारचे लीज टेकओव्हर करा आणि तसे आम्ही केले कारण की विसा १ वर्षाचाच होता आणि जरूरीचे फर्निचर त्या जागेत होते की जे त्यांचेही नव्हते. असेच कुणी कुणी जाताना ते सोडून गेले होते. संपतकुमारने आमचे आभार मानले. त्यांचे बरेच पैसे वाचले आणि आम्हालाही इथल्या जागेत राहण्याची सुरवात करायची होती.
 
 
पवनकुमारची बायको गरोदर होती तेव्हा भारतावरून तिच्या बाळंतपणासाठी कोणी येणार नव्हते. तिला आई नव्हती. तिचे बाळंतपण शेजारी रहाणाऱ्या प्रविणाने केले. तिचे डोहाळेजेवण पण केले. इथे काही भारतासारखे नसते. डोहाळेजेवण एकदाच होते ते सुद्धा मैत्रिणी मिळून ठरवतात. प्रत्येक जण एकेक पदार्थ आणतात सर्वांना पुरेल असा. येताना त्या बाळाला लागणाऱ्या सर्व वस्तु/कपडे आणतात. तेही कोणी काय काय आणायचे ते ठरवतात. भारतात बाळ जन्माला आल्यानंतर कपडे दिले जातात. शिवाय ज्या मुलगी गरोदर आहेत तिचे सर्वजण कौतुक करतात. नातेवाईक मित्रमैत्रीणी असे सर्वजण तिचे वेगवेगळे डोहाळेजेवण करतात.
आम्ही दोघे कविताच्या डोहाळेजेवणाला हजर होतो. खरे तर दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या राज्यातल्या एका शहरात जाण्याकरता निघणार होतो. विनुला २ वर्षासाठी संशोधन करण्याचा विसा मिळाला होता. प्रविणा म्हणाली तिच्या नवर्याला की आपण रोहिणी गेली की कविताचे डोहाळेजेवण करू. पण श्रीनिवास म्हणाला की ती असतानाच कर. तिला पण एंजॉय करू देत. आमच्या सामानाची बांधाबांध सुरू होती म्हणून आम्हाला कागदी डिशा, पेले आणि २/३ प्रकारची थंड पेये घेऊन जायची होती. ५ जणींनी ओटी भरायची असते तर मला आधी भरायला सांगितली कारण मी त्या ५/६ बायकांमध्ये मोठी होते. डोहाळेजेवणाला फक्त ४-५ फॅमिलीच होत्या.
 
 
माझी व माधवीची छान मैत्री झाली होती. ती लग्न झाल्यावर लगेचच अमेरिकेत आली होती. दिवाळीच्या दिवशी आम्ही त्या दोघांना जेवायला बोलावले होते. ती म्हणाली की ते दोघे मंदीरात जाणार होते. त्यांच्याकडे कार होती. मला म्हणाली की तुम्ही दोघे पण या. मी म्हणाले नाही. तुम्ही दोघे जा. तुमचे नवीन लग्न झाले आहे म्हणूनच मी तुम्हाला दिवाळीचे बोलावले आहे. मंदीरात जाऊन लगेच आमच्याकडे जेवायला या. आमच्या घरी मल्लीकार्जुन नावाचा एक जण ४ दिवस राहिला होता. त्याला अपार्टमेंट मिळत नव्हते. म्हणजे त्याला अजून कोणीतरी अपार्टमेंट शेअर करण्यासाठी हवे होते. तसेच क्लेम्सनला प्राध्यपक डीटर यांनी आमच्यासाठी मोटेल मध्ये बुकींग केले होते. आमची थेट फ्लाईट चुकली होती त्यामुळे सव्यापसव्य करून १२ तासांनी आम्ही क्लेम्सनला पोहोचलो होतो. रात्रीचे १२ वाजले होते. खूपच दमायल झाले होते. सकाळी उठल्यावर एक सुखद धक्का बसला. मोटेलचे मालक गुजराथी होते. त्यांनी आम्हाला गरम गरम मसाला चहा आणून दिला. ते म्हणाले आम्ही असे कुणाला देत नाही. तुम्ही भारतीय आहात आणि खूपच दमलेले दिसत आहात म्हणून देत आहोत. चहा प्यायल्यावर आम्हाला दोघांनाही खूपच तरतरी आली. चहा पिऊन आम्ही लगेच मोटेल सोडले. 
 
 
क्लेम्सन मध्ये आम्हालाही अपार्टमेंट मिळत नव्हते. डेंटन (टेक्सास) सोडण्या आधी अपार्टमेंट फाईंडर पुस्तकातून मी फोन लावले होते पण कोणतेही मिळाले नाही. डॉक्टर डीटर यांनी येमुल-सुनिताला पटवले होते की एक कपल येत आहे त्यांना तुम्ही तुमच्याकडे ठेऊन घ्या त्यांना जागा मिळेपर्यंत आणि म्हणूनच आम्ही येमुल-सुनिताकडे ८-१० दिवस राहिलो होतो. येमुल सुनिता कडे गेल्यावर सुनिताला खूप बरे वाटले. ती म्हणाली बरे झाला तुम्ही आलात ते. इथे कोणीच माझ्याशी बोलायला नाही. मी तिच्याकडे रहात असताना पोळ्या करायचे. मी प्रथमेश (तिचा मुलगा) ला सांभाळायचे त्यामुळे तिची कामे व्हायची. येमुल पण संशोधन करत होता. त्यांच्याकडे जी कार होती ती चांगली नव्हती. मध्येच बंद पडायची. त्यामुळे तो फक्त ग्रोसरी आणण्याकरता कार वापरत असे. त्यांचे घर डोंगरावर होते. विनु रोज सकाळी डोंगर उतरून व येताना चढून लॅब मध्ये ये-जा करायचा. आम्हाला जेव्हा अपार्टमेंट मिळाले तेव्हा मी सुनिताला बोलावले. येमुल एका कॉन्फरस्न साठी जाणार होता. तिला म्हणाले सकाळपासूनच ये. सकाळी न्याहरी साठी तिखटामिठाचा शिरा बनवला. नंतर जेवण केले व तिला सांगितले की तू झोप थोडा वेळ. मी प्रथमेश कडे लक्ष देते. निवांत झोप. ती झोपेतून उठल्यावर तिला गरम चहा दिला. मला म्हणाली की मला इतकी शांत झोप लागली होती त्यामुळे खूप बरे वाटले.
येमुल सुनिताला काही कारणाने संशोधन सोडावे लागले व भारतात कायमचे जावे लागले. निघायच्या आधी ४ दिवस ती दोघे, प्रथमेश व आम्ही दोघे आमच्या एका खोलीत रहात होतो. मी तिला तिच्या ४ बॅगा व्यवस्थित लावून दिल्या. ती म्हणाली तुम्ही होतात म्हणून. नाहीतर मला काही सुधारलेच नसते. तिच्या मुलाला ती सांभाळायची व आमच्या चौघांचा स्वयंपाक मी करायचे. सुनिताला जेवताना मी म्हणले की भरपूर आईस्क्रीम खाऊन घे. भारतात गेल्यावर इतके खूप मिळणार नाही. आमच्या सगळ्यांच्याच घरी फ्रीझर मध्ये आईस्क्रीमचे डबे असायचे. एक आठवण म्हणून मी प्रथमेशला एक ड्रेस घेतला होता. सुनिता खूप खुश झाली होती. copy right rohini gore
क्रमश : ....
See less

Thursday, May 28, 2026

आहार - व्यायाम - वजनातील घट आणि वाढ (१)

मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाही आणि मला भातही आवडत नाही. शिवाय मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. कदाचित यामुळेच माझे वजन नेहमी आटोक्यात राहत असावे असे मला वाटते. लग्ना आधी माझे वजन ३८ किलो होते. माझी उंची ५ म्हणजे माझे वजन ४५ ते ५० पर्यंत असायला पाहिजे. आईकडे आहार चौरस होता तरीही वजन इतके कमी का होते याचे कारण मला सटरफटर अरबट चरबट खाण्यात जास्त स्वारस्य होते. कधीही पोळी भाजी आमटी भात आवडीने खाल्ला नाही. व्यायाम करत नव्हते. व्यायाम म्हणजे दोरीवरच्या उड्या मारायचे. खेळायचे म्हणजे लंगडी, शिवाशिवी इतकेच. लग्नानंतर आम्ही दोघे जेव्हा आयायटी वसतिगृहात रहायला आलो तेव्हा विनुने मला विचारले तू व्यायाम करत नाहीस का? मी म्हणाले नाही. तर तो म्हणाला की सूर्यनमस्कार घालत जा. बायकांकरता हा व्यायाम चांगला आहे. त्याने मला एक-दोन सूर्यनमस्कार घालून दाखवले. मी एका दमात १२ सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशी परत विचारले व्यायाम केलास का? मी म्हणाले की नाही. मला ताप आल्यासारखे वाटत आहे. तर म्हणाला असेच वाटते. तुला व्यायामाची सवय नाही. २-३ दिवस सलग सूर्यनमस्कार घातल्यावर मला छान वाटायला लागले. माझे वजन हळूहळू वाढायला लागले. विनु दंड बैठकांचा व्यायाम करायचा. शिवाय काही योगासने पण करायचा. विनुचे लग्नावेळी वजन होते ७२ किलो. त्याची उंची ५ फूट ११ इंच आहे. त्यासाठी वजन बरोबर होते. शिवाय केमिस्ट्री लॅब तिसऱ्या मजल्यावर असल्याने आणि आमचे वसतिगृहामधले घर पण तिसऱ्या मजल्यावर असल्याने जिने चढ-उतार होत होते. शिवाय आयायटी लॅब पर्यंत जा ये चालतच व्हायची. मी पण मैत्रीणीबरोबर भाजी आणायला किमान १ मैल असेल अंतर (जास्तीच असावे) आठवड्यातून २ वेळा चालत जायचे. धुणे भांडी घरीच करायचे. धुणे-भांडी करणे हा पण एक व्यायामच आहे. टबातून भांडी बाथरूम मध्ये ठेवून त्यात भरपूर पाणी घालून ठेवायचे. त्यावेळेला विम बार साबण होता. त्याने भांडी घासायचे. भांडी खाली बसून घासून झाल्यावर उभी राहून वाकून बादलीतल्या असलेल्या पाण्याने भांडी विसळायचे. धुणे धुवायचा व्यायाम तर जास्त चांगला आहे. यात हातापायांना जास्त व्यायाम होतो. कपडे आघळून पिळण्यासाठी दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्यातून खळखळावे लागतात. त्यासाठी पण वाकावे लागते. वाकल्यामुळे पोट सपाट रहाते. आणि कपडे वाळत घालण्यासाठी वर किती वेळा बघावे लागते? त्यामुळे मानेलाही व्यायाम. आजकाल वर कोणीही बघत नाही. सरळ लॅपटॅप समोर आणि खाली वाकून मोबाईल मध्ये ! विनुची शिष्यवृत्ती वाढल्यावर मी धुणे-भांडीला बाई लावली व शिवणाचा क्लास लावला. शिवणाच्या क्लासला मी आठवड्यातून २ वेळेला साधारण २-३ मैल जा ऊन येऊन चालत होते. माझे वजन ३८ वरून ४० ते ४२ पर्यंत गेले. मला खूप आनंद झाला. लग्ना आधी विनुचा आहार जेमतेमच होता. वसतिगृहाच्या कॅन्टीनमधले जेवण आणि रात्रीचा डबा. त्यात पोळ्या चांगल्या नसायच्या. भाजी म्हणजे रसाची पातळच असायची. 
 
 
लग्नानंतर आमचा आहार असा काहीसा होता. सकाळी न्याहरीला विब्स ब्रेडचे ३ ते ४ स्लाईस भाजून त्यावर अमुल बटर पसरवून खायचो. त्यावर दुधाची instant कॉफी. दूध खूपच पातळ असायचे. दुपारी जेवणाला पोळी,भाजी, कोशिंबीर, आमटी, भात, ताक , संध्याकाळच्या खाण्याला पोहे, उपमे, साबुदाणा खिचडी. हे पदार्थ खाण्यासाठी खोलगट चिनिमातीच्या डिशा होत्या. मी आईकडून आणल्या होत्या. त्या खोलगट डिशा आईने बोहारणीकडून घेतल्या होत्या. डीश भरून खायचो. एकदा नाही तर परत डिश भरून भरपूर खायचो. दुपारच्या जेवणाला माझ्यासाठी २ पोळ्या व विनुच्या ४ पोळ्या असायच्या. रात्रीच्या जेवणात आमटी भात, मुगाच्या डाळीची खिचडी असायची. विनु सकाळी नाश्ता करून ९ ला लॅब मध्ये जायचा. जेवायला घरी येऊन थोडावेळ विश्रांती घेऊन परत लॅब, नंतर परत संध्याकाळच्या खाण्याला येऊन परत लॅब, परत रात्री जेवायला येऊन परत लॅब. रात्रंदिवस लॅब. मी म्हणायचे पण त्याला की तू लॅबमध्येच का नाही रहात? 😃 लग्नानंतर विनायकचे वजन ७२ चे ८० किलो झाले आणि माझे ३८ चे ४५ किलो झाले. विनुचे व माझे आयाटीमध्ये खूपच चालणे व्हायचे. 
 
 
विनायकला मी सल्ला दिला की तू नुसते जोर बैठकांचा व्यायाम करू नकोस. जोडीला सूर्यनमस्कारही घाल.दंड बैठकाने शरीर कडक होते. सूर्यनमस्काराने लवचिक होते. तर तो म्हणाला की तू पण दंड बैठका घाल. त्याने स्नायुंना बळकटी येते. मी आधी नाही म्हणाले. सुरवातीला मी १२ नमस्कार घालत होते. ते नंतर २५ केले. पण त्याने खूपच दमायला व्हायचे. नंतर १२ नमस्कार, ८ दंड व ८ बैठका असा व्यायाम सुरू केला. पण त्याचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर मी माझा व्यायाम सेट केला. १२ सूर्यनमस्कार, ४ दंड, ४ बैठका व काही योगासने. विनुने पण सूर्यनमस्कार घालायला सुरवात केली. योगासनामध्ये विनुला शिरसासन खूप चांगले जमायचे व मला ते कधीच जमले नाही. मला सर्वांगासन खूप छान जमायचे. आम्हाला दोघांना कमान चांगली जमायची. पद्मासन घालायचो. अजून काही योगासने होती पण त्यांची नावे आता आठवत नाहीत. copy right - rohini gore 
 
 
लेखाचा दुसरा भाग लवकरच.....

Thursday, May 14, 2026

14 May 2026

 आज दिनांक १४, मे २००१ ला रात्री आम्ही दोघे मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर होतो. आम्हाला सोडायला विनायकचा मित्र राम भट, त्याची बायको शकुंतला व त्याचा लहान मुलगा असे आले होते. आम्ही आमच्या मोठाल्या बॅगा धावपट्टीवर सोडल्या व परत बाहेर येऊन त्यांच्याशी शेवटच्या प्रत्यक्षातल्या समोरासमोर उभे राहून गप्पा मारल्या. काहीवेळा नंतर चला, आता निघतो आम्ही, विमान सुटायची वेळ झाली असे सांगून कुटुंब मित्राला टाटा बाय बाय केले. मी मित्राच्या मुलाच्या हातात खाऊसाठी पैसे ठेवले. शकुंतला आम्हाला म्हणाली की तिथे पोहोचल्यावर आम्हाला ईमेल ने कळवा. विनायकची रेडिफ मेल होती. त्यावेळेचा आंतराष्ट्रीय विमानतळ मला अंधुक आठवत आहे. लुफ्तांझा एअरलाईनची फ्लाईट होती. 15 मे चा भारतातला सूर्योदय होण्या आधी आमचा प्रवास सुरू झाला. विमानात बसण्यापूर्वी २ वर्षे सलग आम्ही दोघे एका अग्निदिव्यातून गेलो होतो. मानसिक आणि शारिरीक खच्चीकरण झाले होते. आमचे विमान सुटले. खिडकीतून मी बाहेर पाहिले तर मुंबई नगरीचे असंख्य पिवळे दिवे, जणू काही दिव्यांच्या माळाच पसरलेल्या आहेत असे चित्र दिसले. काही सेकंदातच खिडकीतून काळाकुट्ट अंधार दिसायला लागला आणि डोळ्यात पाणी आले. आमच्या विमानात फक्त एकच भारतीय होता. Frankfurt विमानतळावर आमचा काही तासांचा अवधी होता. तो एक भारतीय व आम्ही दोघे पुढच्या प्रवासाकरता कोणत्या गेटवर विमान लागले आहे हे तिथे असलेल्या डिजिटल पटलावर शोधत होतो. जर्मनीच्या त्या विमानतळावर तिथे वावरत असलेल्यांचा तुटकपणा खूपच जाणवत होता. सगळ्यांचे चौकोनी चेहरे. कोणाच्याही चेहऱ्यावर हास्यमुद्रा दिसत नव्हती. डॅलस विमानतळावर येण्याकरता आमचे विमान जसससे खाली उतरत होते तेव्हा मी खिडकीतून खाली पाहिले तर हायवे वर प्रचंड वेगाने कार जाताना दिसल्या. बाकी कोणतेही वाहन दिसले नाही. आणि अशा रितीने १५ मे ला निघून आम्ही अमेरिकेतल्या डॅलस विमानतळावर १५ मे रोजीच पोहोचलो. rohinigore



Sunday, April 19, 2026

18 April 2026

 18 April 2026 - ही आहे कालच्या दिवसाची रोजनिशी. ती दिसेनाशी झाली. आज आता उठल्यावर दिसली म्हणून पोस्ट करत आहे.

आजचा दिवस छान गेला. एक तर थंडी पुर्णपणे गेली आहे. तशी अधुन मधून डोकावत रहाते पण थंडी, बोचरे वारे, बर्फ हे सर्व संपल्यामुळे छान वाटत आहे. नेहमीप्रमाणेच विकांताची कामे आटपून आम्ही चांद पॅलेसला जेवायला गेलो. पूर्वी फक्त एकदाच गेलो होतो. कोरोनानंतरच अर्थात ! सर्व उपाहारगृहांनी पैसे अवाच्या सवा वाढवले आहेत. बफे ला आता २५ डॉलर्स ! म्हणजे दोघांचे ५० आणि त्यावर टॅक्स आणि चांद पॅलेस ला तर अजून एक टॅक्स लावतात. म्हणजे दोघांचे मिळून ६० डॉलर्स ! इडली डोसे खाऊन कंटाळा आला होता म्हणून काहीतरी वेगळे खाण्याचा विचार केला आणि मनाचा हिय्या करून गेलो कारण तिथल्या पदार्थांची चव चांगली असते ते माहीत होते. मी पूर्वी बटाटेवडे, सामोसे आणि बरेच काही बरेच वेळा बनवायचे. आता बनवत नाही. भांडी खूप पडतात घासायला. त्यामुळे मनात असूनही केले जात नाही. आज चांद पॅलेस मध्ये ठराविक पदार्थ खाल्ले त्यामुळे खूप बरे वाटले ! अर्थात जे खाल्ले ते अगदीच मोजून मापून. खाणे पण खूप कमी झाले आहे. गोड पदार्थ तर तोंडात खूपच घोळत रहातात.

तर आज मी २ स्प्रिंग रोल, २ भजी, १ सामोसा, छोटे तळलेले पापड २, २ पुऱ्या, बटाट्याची रस्सा भाजी, खाल्ली. गोडामध्ये १ गुलाबजाम, थोडे आईस्क्रीम, थोडी रसमलाई असे खाल्ले. बफे मध्ये बरेच काही असते. भाज्या भात, पाणीपुरी, सलाड. शिवाय तुम्हाला विचारतात की नान व डोसा पाहिजे का? मी नाही सांगितले. विनुने डोसा घेतला व बाकीचे म्हणजे सांबार, छोले, सूप आणि दही वडे, भजी घेतले. जे घरी करतो ते मी कधीच घेत नाही म्हणजे भात-नान-पोळी. बाकीचे चव येणारे पदार्थ घेते की जे मी आता करत नाही. गोड तर करणे बंदच झाले आहे. वर्षातून एकदा पुरणपोळी बनवायचे ती पण आता बनवत नाही. एक तर दोघच असतो आणि त्यातून खाणेही खूप कमी झालयं, भांडी पण खूप पडतात. म्हणजे काही करायचे म्हणले तर व्याप आणि तापच जास्त असतो. साधी ओळी भेळ पण आता बनवत नाही. क्वचित काही वेळा बटाटेवडे आणि साबुदाणे वडे बनवते.


आज संगीत के सितारे मध्ये एक थीम होती ती म्हणजे कोणीही हिरो,हिरोईन, किंवा इतर आरशासमोर बसून/उभे राहून मेक अप करत आहे. मला जे गाणे हवे होते त्याचा विडिओच उपलब्ध नाहीये युट्युबवर, पूर्वी होता. ना जिया लागेना गाणे त्या थीम मध्ये टाकणार होते. २-३ गाणी आठवत होती त्यापैकी एक गाणे टाकले ते म्हणजे पिया का घर है ये रानी हु मै रानी हु घर की. या गाण्यात जया भादुरी आरशासमोर उभे राहून केस विंचरते. खरे तर माझ्या मनात अजून एक गाणे होते ते तर थीम मध्ये अगदी चपखल बसत होते पण ते आधी कुणीतरी टाकले होते. ते गाणे म्हणजे पिया ऐसो जियामें समाय गयो रे के मै तनमन की सुदबुद गवा बैठी.
अजून २ गाणी आठवली ती म्हणजे मित ना मिला रे मनका. या गाण्यात शेवटी एक बाई गाणे ऐकता ऐकता आरशात पाहून लिपस्टिक लावत असते. आणि पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले झुठा ही सही. या गाण्यात हेमामालिनी आरश्यासमोर उभी राहून केच विंचरते. गाण्यात आरशासमोर उभे राहून कोणीतरी मेक अप करत आहे मग ते काही सेकंदासाठी असले तरी चालेल अशी थीम होती. मला ही थीम खूपच आवडली. विनुचे आवडते गाणे की जे या थीम मध्ये अगदी चपखल बसते ते मी विनुसाठी ठेवले होते पण तेही कुणीतरी आधीच टाकले होते. ते गाणे म्हणजे देखती ही रहो आज दर्पण ना तूम, प्यार का ये महुरत निकल जाएगा. हे गाणे पण कोणीतरी आधीच टाकले होते. तर एकूण आजचा दिवस चांगला गेला. rohinigore

Sunday, April 12, 2026

१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई


१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई 

आज सकाळी उठले आणि बातमी वाचली ती आशा ताईंच्या निधनाची. खूप गदगदून आलं आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले. आपल्या घरातलेच कुणीतरी गेलयं असे वाटले. सुरांची एक खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली. जेव्हा लताताई हे जग सोडून गेल्या तेव्हा मला रडू नाही फुटले, का ते माहीत नाही. आशा-लता दोघींचे सूर प्रचंड ताकदीचे बनले आहेत. मूळातच आवाजात गोडवा. हा गोडवा दोघींचाही निराळा ! कुणीतरी आपल्यावर जादू करतयं असच वाटतं त्यांची गाणी ऐकताना. दोघींचेही स्वर आसमंतात निनादत राहतीलच आणि आपल्या मनातही ! लता - आशा म्हणजे एक सूर्य तर एक चंद्र. एक राम एक कृष्ण. आशाच्या आवाजाला एक प्रकारची धार आहे, फिरत आहे. गाण्यांमधले शब्द ती अश्याप्रकारे गाते की त्या शब्दांनी आपण आकर्षित होतो. लताचा आवाज ऐकताना डोळे मिटावे, मंत्रमुग्ध व्हावे. एक प्रकारची समाधीच लागते. या दोघींची काही गाणी परत परत ऐकाविशी वाटतात. मन भरतच नाही !



मला लताची हिंदी गाणी जास्त आवडतात तर आशाची मराठी गाणी. उदाहणार्थ लताचे धानी चुनर मोरी हाय रे जाने कहा उडी जाए रे तर आशाचे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा ! कितीही लिहिले तरी थोडेच आहे. दोघींची तुलना होउच शकत नाही. दोघींच्या नावाचा एकेरी उल्लेख आदरार्थी आहे. त्यांच्या गायनाने सर्वांनाच खूप जवळ केलयं अगदी आईसारखं ! गाण्यांचा राग, प्रकार कुठलाही असो, जन्मापासून मरेपर्यंतच्या प्रत्येक वळणावर घेऊन जातो. गाणं कळायला लागल्यापासून ते आजतागायत आपण सर्वच त्यांची गाणी ऐकत आहोत. आशा-लताचा आवाज आपल्या सर्वांच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात हे आपले खूप मोठे भाग्य आहे ! copyright rohinigore

Friday, March 27, 2026

२७ मार्च २०२६

 27 March 2026

आजचा दिवस खूप वेगळा होता. आज मी २ मैत्रिणींशी बोलले. एक मैत्रीण पुण्यातली आहे. ती खूपच बिझी असते तरीही ती माझ्याशी अधुन मधून ऑडिओ मेसेज मधून बोलते. ज्याला बोलायची इच्छा आहे तो काहीतरी मार्ग काढून बोलतोच बोलतो. बोलायचे नसेल तर हजार कारणे सांगितली जातात. हे तर सर्वांनाच माहीती आहे. आम्ही दोघींनी एकमेकींना ऑडिओ मेसेजेस पाठवले. ते ऐकून आम्हाला दोघींनाही छान वाटले. हल्ली टाईप करायचा खूपच कंटाळा येतो. मी तर सोडूनच दिले आहे. वहीत लिहीते. पण आज टंकण्याचा मूड लागला म्हणून आजची ही रोजनिशी ! दुसरी मैत्रीण तिच्या मुलीकडे लंडनला सध्या आहे. ती पण तिला जसा वेळ मिळेल तशी बोलते. तर आजचे आमचे डब्ल्युस्लॅशए 🙂 वर खूप बोलणे झाले. तब्बल २ तास बोलत होतो. तिचा ऑनलाईन गाण्याचा क्लास असतो. तिने परिक्षेला निवडलेली गाणी मला स्कॅन करून पाठवली होती. तीच आज तिने म्हणून दाखवली. आणि परिक्षेसाठी काय काय अपेक्षीत आहे ते पण सांगितले. तर ती म्हणाली मला गाणे ऐकून सांग कसे वाटले ते. गाणी निवडताना ती कोणी गायली आहेत, गाण्याचे गीत, संगीत, संगीतप्रकार, भावार्थ हे सर्व बघितले जाते. तर तिने निवडलेल्या प्रत्येक गाण्याचे पहिले कडवे ती गात होती. काही गाण्यांना मी दुरूस्ती सांगितली. म्हणजे गीत-संगीत- कोणाचे आहे ते सांगितले. आठवणीतली गाणी या साईटवर बघ, तिथे सर्व माहिती खरी असते असेही सांगितले. काही गाणी मी नव्यानेच ऐकत होते. काही गाणी तिने खूप जुन्या काळातली निवडली होती. काही गाण्यांचे गीतकार आम्हाला दोघींनाही नव्यानेच कळत होते. राग प्रकार पण नव्यानेच कळत होते. त्यामुळे एकंदरीत मजा येत होती. तिने एक लावणी निवडली होती ती होती तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंगमहाल. मला हे गाणे आवडते. मग मी पण तिला हे गाणे म्हणून दाखवले. अर्थात फक्त एकच कडवे. मला म्हणाली छान गातेस गं ! मी तिला म्हणाले की माझी गाणी पाठ नाहीत. मी गुगल वर शब्द शोधते आणि बघून म्हणते. तिने एक गाणे निवडले ते होते शरदाचे चांदणे मधुबनी. तिला म्हणले की हे बाबांचे आवडते गाणे होते. ती मला गाणे सांगायची आणि मी ते आठवणीतली गाणी या मध्ये शोधायचे आणि तिला सर्व माहिती सांगत होते आणि ती लिहून घेत होती म्हणजे गीत-संगीत-गायक. ती म्हणाली बरे झाले ग. परिक्षेची तयारीच झाली माझी. नाचनाचूनी अती मी दमले याचा भावार्थ तिने मला सांगितला. तिने खूप छान गाणी निवडली आहेत. आता पुढच्या आठवड्यात आम्ही विडिओ कॉलवर येणार आहोत आणि ती मला गाणी म्हणून दाखवणार आहे. ती म्हणाली की परिक्षेत गाण्याप्रमाणे चेहऱ्यावर हावभावही आणावे लागतात. त्यालाही मार्क असतात.

संगीत एक सितारे या ग्रुपवर गेली कित्येक वर्ष आम्हा दोघांची हजेरी नाही. पण गेल्या काही आठवड्यात काही थिमांनी आमचे लक्ष वेधून घेतले आणि त्याप्रमाणे आम्ही गाणी पोस्ट केली. आजची थीम छान होती. थीम अशी होती की नायक-नायिकांचे हाथ एकमेकांच्या हातात आहेत अशा ओळी गाण्याच्या गीतात कुठेतरी असल्या पाहिजेत. जसे की हाथोमें तेरे मेरा हाथ रहे जीवनमे पिया तेरा साथ रहे. आज मी त्या ग्रुपवर एक मराठी गाणी टाकले ते म्हणजे दिसते मजला सुखस्वप्न नवे मी संसार माझा रेखिते हे अष्ट्विनायक मधले गाणे. एका कडव्यात हात तुझा हाती असावा असे आहे आणि ते थीम मधे बसणारे गाणे आहे. मागच्या एका थीम मध्ये गाण्यात फुगे दिसायला हवेत असे होते तर विनायकने सपनोंका सौदागर आया हे गाणे पोस्ट केले. या गाण्यात भरपूर फुगे आहेत. मला सुचले होते दिल उसे दो जो जां दे दे पण मी ते पोस्ट केले नाही. आज एकंदरीत गाण्यांच्या मूड मध्ये होते त्यामुळे दिवस चांगला गेला. आज तिखटमिठाचा शिराही छान झाला होता. थोडी वेगळी चव आली होती. गाणी ऐकणे, गुणगुणणे हे एक टॉनिक आहे. शिवाय मनमोकळ्या गप्पा मारणे हे पण आपला मूड चांगला व्हायला मदत करते. - rohinigore


Wednesday, March 04, 2026

२५ फेब्रुवारी २०२६

 



२८ फेब्रुवारी २०२६

 

आज स्वच्छ हवा. वसंत ऋतूची सुरवात होण्याची चिन्हे आजच्या हवेत होती. मागच्या आठवड्यात पडलेला स्नो अजूनही वितळतोय. आज दुपारी एका उपाहारगृहात पण बरेच दिवसांनी गेलो. सा ऊथ इंडियन थाळी छान असते तिथली. अर्थात दोघात एक ! छान चवीचे जेवण व सोबत पंचमची गाणी ! अजून काय हवे? आज बरेच वर्षांनी संगीत के सितारे या ग्रुपवर गाणे पोस्ट केले. थीम मध्ये बऱ्याच गाण्यांचा चॉईस होता! थीम अशी होती की गाण्याच्या मुखडा व अंतरा कुठेही दिनांक, महिन्यांची नावे, किंवा आठवड्याची नावे, यापैकी एक आले पाहिजे. थीम वाचल्या वाचल्या पटकन एक गाणे डोळ्यासमोर आले ते म्हणजे सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन, ते कुणीतरी पोस्ट केले होते. नंतर एक गाणे आठवले ते म्हणजे सावन का महिना पवन करे सोर हे गाणे मला खूप आवडत नाही. नंतर एक आठवले ते पोस्ट केले. सावन के झूले पडे तुम चले आओ. संगीत अर्थातच आरडी बर्मन. जुर्मानातली गाणी मी पूर्वी म्हणायचे ते आठवले. त्यात अजून एक गाणे आहे तेही मला आवडते ते म्हणजे छोटीसी एक कली खिली थी एक दिन बागमें. हे गाणे मागच्या एका महिन्यात ऐकले होते आणि छान वाटले होते. तसेच आज झाले. एकाने चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी पोस्टे केले तर एकाने आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है, बागोमें बहार है हे ते गाणे ! एका पाठोपाठ बरीच गाणी आठवली व युट्युबवर पाहीली. विनुची आवडती गाणीही पाहिली. त्यात सावन के झुले पडे हे गाणे तलत आणि लताने गायले आहे. प्यार की प्यास या चित्रपटातले गाणे. शिवाय अजून एक त्यातलेच एक गाणे ऐकले.


नंतर मला आशा भोसलेचे दिवसामागुनी दिवस चालले ऋतु मागुनी ऋतू हे गाणे आठवले. या गाण्यातही मराठी महिने आहेत. तर आजचा दिवस आम्हाला दोघांना भूतकाळात घेऊन गेला. त्या दिवसात आम्ही दोघेही २ ग्रुपवर थीम आली रे आली की त्याप्रमाणे गाणी पोस्ट करायचो. खूप रमून जायचो आम्ही गाण्यात आणि एखादे चांगले गाणे पोस्ट करायचे निसटून गेले की हळहळ वाटायची. ते ग्रुप्स म्हणजे संगीत के सितार व गीतसंगीत.

Wednesday, February 11, 2026

11 February 2026 (fb memory)

 fb memory 5 years ago

जगात खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत की त्या पाहिल्या की आनंद होतो. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही खास गोष्टी असतातच की ज्या आठवल्या की तुमचे हृदय काही क्षणांकरता हेंदकाळते. हा अनुभव खरच खूप छान असतो. रोमांचकारी अनुभव. फळाफूलात असतो, गाण्यात असतो तर काही क्षण पूर्वाश्रमीचे असतात आणि अचानक आलेले असतात. ध्यानीमनी नसताना काही गोष्टी अश्या काही अचानकपणे घडून येतात की त्या आठवल्या की तुमच्या अंगावरून कोणीतर मोरपीस फिरवत आहे असे वाटते. प्रेमाला उपमा नसतेच कधी कारण कि ते देवाघरचे लेणे असते. असे लेणे की ते तुमच्या हृदयात कायमचे दडून बसते. रोज आठवत नाही तर मधूनच आठवते कधीकधी. त्याला वेळकाळ नसते. अखंड कामात बुडालेले असताना आठवते. निवांत क्षणी आठवते. गर्दीतून जात असताना आठवते . त्यात एखाद्या बाळाचा गोंडस चेहरा आठवतो तर एखाद्या फुलाचीही आठवण येते.


मला सर्व प्रकारची फुले आवडतात पण त्यात सुद्धा मला विशिष्ट रंगांची फुले जास्त आवडतात. ते रंग खूप मनमोहक असतात. तास न तास त्या फुलाकडे
बघत बसावेसे वाटते. त्याला लाभलेल्या रंगामुळे ती फुले खूप लोभस वाटतात. मन प्रसन्न करून टाकतात. गुलाबा मध्ये मला पिवळा गुलाब खूपच आवडतो. कण्हेरी मधला गुलाबी रंग काय वर्णावा, इतका छान असतो. अबोलीचा रंग काही न्याराच ना ! आणि किती तो नाजुकपणा ! सदाफुली तर तिच्या लव्हेंडर रंगामुळे शोभून तर दिसतेच पण तिच्या त्या पाकळ्या ! जास्वंदाला तर प्रत्येक रंग खुलून दिसतो.


शेवंतीचा पिवळा रंग हारापेक्षा माळलेल्या वेणीतच शोभून दिसतो. शेवंतीची जागा विणलेल्या वेणीतच हवी. जाई जुईचा रंग पांढरा पण जाईचे टपोरेपण मला जास्त आवडते. जाईच्या कळ्या तर बघत बसाव्यात इतक्या गोड ! सूर्योदय सूर्यास्त दोन्हीही छान पण मला सूर्योदय बघायला जास्त आवडतो. सूर्यास्ताच्या आधीचे रंग जास्त विलोभनीय वाटतात. पाणी सगळीकडेच वाहते पण पाण्याचे ओहोळ खडका खडकातून वाहताना किती छान दिसतात. पाण्याचे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्यात मजा तर असतेच पण डोंगरावरचे छोटे छोटे धबधबेही तितकेच आकर्षक असतात.


ढग आकाशात निर्माण होतो आणि बघता बघता नाहीसाही होतो. वेगवेगळ्या आकाराचे ढग म्हणजे अगदी बारीक बारी गोलापासून ते पर्वता सारख्या दिसणाऱ्या प्रतिमेसारखे, येत जात असतात. त्यात घुसणारे रंग तर अप्रतिम. या रंगांमुळेच ढगांना शोभा येते. हे रंग अगदी जादू करावी असे निर्माण होतात. पिवळा, केशरी, गुलाबी, निळा , राखाडी आणि या रंगांच्याही वेगवेगळ्या छटा. हे रंग नीट पाहिले तर अगदी सेकंद सेकंदाला बदलत राहतात. हे ढगांचे साम्राज्य कुठून येते आणि कसे परत गायब होऊन जाते याची खरच खूप कमाल वाटते. पाऊस मला खूप जोरात पडलेला आवडतो. त्याच्या सरी दिसल्या पाहिजेत.

झाडांमध्ये मला डेरेदार झाडे जास्त आवडतात. ज्या झाडाच्या फांद्या पूर्णपणे झुकल्या आहेत आणि त्या फांद्यांखाली सावली निर्माण झाली आहे अशी झाडे आवडतात, की त्या सावलीत बसावे, बसताना झाडाच्या खोडाचा पाठ टेकण्याकरता आधार घ्यावा. बसून वर बघावे. झाडांच्या फांद्यांचे निरिक्षण करावे. समुद्र, तळे, नदी , त्यातले वेगवेगळे पाणी, कधी संध तर कधी उधाण आल्यासारखे वाहणारे. संथ पाण्यातले तरंग बघायला मला खूप आवडते. समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि त्या परतीच्या लाटांपेक्षा मला ओली वाळू जास्त आवडते. जी वाळू त्या लाटेनेच ओली झालेली आहे अशी वाळू. ज्यावरून चालतानाची मजा काही वेगळीच. या वाळूवरून चालताना एकीकडे लाटाही पाहता येतात आणि एकीकडे कोरडी वाळूही पाहता येते. तास न तास चालावे अशा या वाळूतून. मागे बघूच नये असे वाटते.

Sunday, February 08, 2026

मला आवडलेली लता मंगेशकर यांची गाणी

 

❤ ❤ लता मंगेशकर - भावपूर्ण श्रद्धांजली - माझी आवडती गाणी
१) फैली हुई है सपनोंकी बाहे ..... (कल्पना कार्तिक)
२) कांटोसे खीच के ये आचल ..... (वहिदा रहेमान)
३) रिमझिम गिरे सावन ..... (मौसमी चटर्जी)
४) रूलाके गया सपना मेरा ...... (वैजयंतीमाला)
५) ए फसा ...... (बिंदू)
६) कुछ दिलने कहा .... (शर्मिला टागोर)
७) ओ घटा सावरी ..... (हेमामालिनी)
७) बंगले के पिछे तेरी बेरी के नीचे ..... (अशा पारेख)
८) नैनोमें बदरा छाए .... (साधना)
९) जरासी आहट होती है .... (प्रिया राजवंश)
१०) मोरा गोरा अंग लै ले ...... (नूतन)
११) पल भरमें ये क्या हो गया ..... (शबाना आझमी)
१२) अखियोंको रहेने दे ..... (डिंपल कपाडिया)
१३) माई री मै कासे कहू .... (रेहाना सुलतान)
१४) पानी पानी रे खारे पानी रे ( तब्बू)
१५) कारे बदरा तू न जा न जा ( नलिनी जयवंत)
१६) रहे ना रहे हम ....... (सुचित्रा सेन)
१७) दुश्मन ना करे दोस्त ने ..... (सिम्ता पाटील)
१८) राधा ने माला जपी ...... (मुमताज)
१९) बेईमान तोरे नैनवा निंदिया न आए..... (मधुबाला)
२०) किसीने अपना बनाके मुझ्को ...... (उषा किरण)
२१) कही तो मिलेगी बहारोंकी मंझिल ..... (मीनाकुमारी)
२२) जाने कैसे सपनोमें खो गयी अखिया ........ (लीला नायडू)
२३) सावन के झुले पडे ...... (राखी)
२४) जिंदगी प्यार का गीत है .... (पद्मिनी कोल्हापुरे)
२५) ओ बसंती पवन पागल .... (पद्मिनी)
२६) दिलबर दिल से प्यारे ..... (अरूणा इराणी)
२७) आजकल पाव जमी पर ..... (रेखा)
२८) मेरे हाथोमें नौ नौ चुडिया है ..... (श्रीदेवी)
२९) माये नि माये .... (माधुरी दिक्षित)
३०) तेरे मेरे बीचमें ......... (रती अग्निहोत्री)
३१) ना जिया लागेना .... (सुमित्रा संन्याल)
३२) जाने काहे जिया मोरा डोले ...... (शुभा खोटे)
३३) हवामें उडता जाए ..... (वीणा कुमारी)
३४) मुझे किसीसे प्यार हो गया ....... (नर्गिस)
३५) मस्त पवन है चंचल धारा ...... (कामिनी कौशल)
३६) मोरे नैना सावन भादो ........ (सिमी गरेवाल)
३७) जिया बेकरार है .... (निम्मी)
३८) किस लिए मैने प्यार किया ..... (नंदा)
३९) जोगियासे प्रीत किए दुख होय ...... (निरूपा राय)
४०) जा रे उड जा रे पंछी ..... (माला सिन्हा)
४१) धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार ..... (सुरेखा पंडित) ??
४२) बेचारा दिल क्या करे ...... (फरिदा जलाल)
४३) न जाने क्यु होता है ये जिंदगी के साथ ..... (विद्या सिन्हा)
४४) सुबह और श्याम काम ही काम ....... (सुलक्षणा पंडीत)
४५) मेहेलोंका राजा मिला के रानी बेटी राज करेगी ......... (जाहिदा)
४६) नदिया किनारे हेर आए आयी कंगना ..... (जया भादुरी)
४७) भोर भये पनघटपे ..... (झीनत अमान)
४८) आप मुझे अच्छे लगने लगे ..... (तनुजा)
४९) कब आओगे बालमा ........ (?? ?)
५०) पंख होते तो उड आती रे ...... (संध्या)
५१) ये दिल और उनकी निगाहोंके साये ..... (?? ?)
५२) हमने देखी है उन आखोंकी महकती ..... (?? ?)
५३) धानी चुनर मोरी हाय रे ..... (? ??)
Rohini Gore

Thursday, November 27, 2025

२७ नोव्हेंबर २०२५

आजचा दिवस खूप वेगळा होता.प्रचंड थंडी आहे. लाँग विकेंडचा आजचा पहिला दिवस. नेहमीच मी काहीतरी वेगळे करते. आज मेथिची पीठ पेरून भाजी करायची मनात होती पण झाली नाही. उकडून बटाट्याची भाजीही करणार होते. तीही झाली नाही. भाजी झाली ती मेथी+ बटाटा. पण अजिबातच चांगली झाली नाही. उडदाची धिर्डी केली.  आज संध्याकाळी कारने भटकण्यासाठी बाहेर पडलो. बंद दुकाने, रिकामे रस्ते व रिकामे पार्कींग लॉट पहाताना छान वाटले. ग्रोसरी न घेता ज्या ज्या दुकानात जातो तिथे फक्त फेरफटका मारला. एक वेगळाच नजारा पहायला मिळाला त्यामुळे उत्साह आला. आज नेट्फ्लिक्स वर एक इंग्रजी सिनेमा पाहिला. त्याचे नाव एव्ह्रीबडी इज फाईन. हलका फुलका सिनेमा पाहिल्यावर छान वाटले. होस्टेज ही मालिका नेटफ्लिक्स वर पाहत होतो. अजून एक भाग शिल्लक आहे तो उद्या. ही सिरिज पण मस्त आहे. बाकी आज काही विशेष घडले नाही. थॅन्क्स गिव्हिंग ची सुट्टी असल्यानेच वेगळेपणा आला आज.

Friday, September 19, 2025

fb memory (september 19,2015)

 शनिवारी जेव्हा वि म्हणतो मला आज ऑफीसला जायचे आहे तेव्हा मला खूप आनंद होतो ! कारण की मी पण त्याच्याबरोबर ऑफीसला जाते. आज नेहमीप्रमाणे सकाळी साफसफाईची कामे उरकल्यावर निघालो. मेक्सिकन उपहारगृहात जेवण केले आणि थेट ऑफीस गाठले. जायचा यायचा रस्ता खूपच निसर्गरम्य आहे. वि ची कंपनी डोंगराच्या पायथ्याशी आहे तर सध्या आमचे घर डोंगराच्या वर आहे. ३ ते ४ छोटी गावं ओलांडून जावे लागते. जाताना उंच उंच डोंगर व डोंगरावरच्या माथ्यावरची घनदाट झाडे दिसतात की जी आभाळाला भिडलेली आहेत. परत येताना चढ लागतो आणि डोंगर खाली खाली जात आहे असे दिसते. आज आफीसमध्ये मी थोडी युट्युबवर गाणी ऐकली. नंतर मिटींग रूम मध्ये जाऊन थोडे अभ्यासाचे वाचले. नंतर चहा केला. व्हाईट बोर्डवर काहीतरी जसे येईल तसे स्केच पेनने उमटवले. वि चा फोटो काढला. नंतर थोडा वेळ ऑफीसच्या समोर असलेल्या सफरचंदाच्या झाडाखाली सावलीत बसले. वि चे काम साधारण ३ ते ४ तास होते. ते झाल्यावर निघताना चॉकलटे खाल्ली. घरी आल्यावर परत एकदा चहा घेतला. रात्रीच्या जेवणासाठी भाजणीची थालिपीठे खाल्ली. एकूण आजचा दिवस छान गेला ! 






Wednesday, September 10, 2025

ऑर्कुट मैत्रीण

 आज ऑर्कुटच्या आठवणीत. माझी ऑर्कुट मैत्रीण उमा आणि मी याहू मेसेंजर वर बोलायचो. मी तिला एकदा विचारले होते की एम पी ३ गाणी सीडी वर कशी अपलोड करायची? तर तिने सांगितले होते की आधी ती कंप्युटर वर डाऊन लोड करायची व नंतर ती सीडी वर उपलोड करायची. कोणत्या वर्षी हे उद्योग केले ते आता आठवत नाही. २००६ ते २०१० दरम्यान असेल. रेकॉर्ड केलेली गाणी इतक्या वर्षानंतरही जशीच्या तशीच आहेत. सीडी खराब झालेली नाहीये. आम्ही दोघी ऑर्कुट वर एकमेकींच्या प्रोफाईल विझीटर्स होतो. टोपी घातलेला तिचा फोटो अजूनही मला आठवतो. तिची मैत्रिण विनंती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आली होती. नंतर एके दिवशी तिने मला खूपच छान इंग्रजीतून लिहिलेली टेस्टिमोनिअल पाठवली होती. ती मी जपून ठेवली आहे. ऑर्कुट वर मजा मजा होती. गेले ते दिन गेले.

rohini gore 10 september 2025




Monday, September 01, 2025

सीधे रस्ते की एक टेढीही चाल है.

 

सीधे रस्ते की एक टेढी ही चाल है... गोलमाल है भाई सब गोलमाल है... गोलमाल गोलमाल....


रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा हा एक सी.ए. झालेला तरूण. त्याच्या मामाच्या मित्राच्या कंपनीत तो नोकरीला लागतो. मामाने मित्राजवळ आपल्या हुशार भाच्याची शिफारस आधीच करून ठेवलेली असते. ही नोकरी मिळवण्याकरता काही खास अटी आहेत रामप्रसाद ! त्या तुला मान्य कराव्या लागतील. तरच ही नोकरी तुला मिळेल. थांब हं जरा सांगतो. रत्ना बेटी जरा पानी ले आ ! रत्ना पाणी आणते. देखो राम, पहिली अट म्हणजे मुलाखतीला जाताना तुला डोक्याला तेल चोपडून जावे लागेल. कुडता पायजमाही हवा. और एक बात. उसे मुछे बहूत पसंद है ! मामा या कोणत्या जगावेगळ्या अटी ! ये मुझसे नही होगा. तुझे करना ही पडेगा, नही तो ये नोकरी हातसे गयी समझो. और उनकी एक बहूत सुंदर बेटी भी है. उसका मन भी तुझे जीतना होगा!


रामप्रसाद सर्व अटी मान्य करून मुलाखतीला जातो. रामप्रसादकडे कुडता पायजमा कुठून असणार ना ? त्याकरता तो देवेन वर्मा ची मदत घेतो. त्याला सांगतो यार एक दिन का सवाल है, मै बादमें लौटा दुंगा. देवेन वर्मा शुटींगमध्ये गुंतलेला असतो. तो म्हणतो थांब तू ये माझ्याबबरोबर आपण काहीतरी करू. देवेन आणि रामप्रसाद त्याच्या मेक अप रूम मध्ये जातात. देवेनच्या सांगण्यानुसार एक जण बरेच कुडते पायजमे घेऊन येतो. त्यात त्याला एक थोडा आखूद होणारा कुडता पायजमा सूट होतो. सर्व जामानिमा करून म्हणजे डोक्याला तेल चोपडून, आखूड कुडता पायजमा घालून व गळ्यात एक शबनम (पिशवी) अडकवून सच्ची मूछे असलेल्या रामप्रसाद वर उर्मिला डेटर्सचा मालक भवानीशंकर बेहद्द खूश होतो. अभ्यासा व्यतिरिक्त त्याला कशाचेही ज्ञान नाही असे रामप्रसाद दाखवतो. मुद्दाम चुकवलेली बॅलन्स शीट त्याला दाखवतो तेव्हा रामप्रसाद म्हणतो किस गधे ने ये बनाई है आणि चुका दाखवून देतो. मुलाखत संपल्यावर चेहऱ्यावर बावळटपणाचे आणि प्रामाणिक पणाचे भाव तसेच ठेवून घरी येतो. आणि एके दिवशी खेळाच्या पटांगणात रामप्रसादच्या बॉसला म्हणजेच भवानीशंकरला रामप्रसादचे खरे रूप कळते.
केस विस्कटलेले, डोळ्यांवर गॉगल, रंगीत शर्ट व मुछमुंडा रामप्रसाद त्याच्या नजरेस पडतो. येथून सुरवात होते गोलमालला ! एक खोटे लपवण्याकरता दुसरे खोटे व ते लपवण्यासाठी तिसरे ! एके दिवशी देवेन वर्माकडून रामप्रसाद नकली मुंछ बनवून घेतो. नंतर नुसती धमाल. पटांगणावर बघितला तो माझा जुळा भाऊ लक्ष्मणप्रसाद. तो काहीच काम करत नाही. मलाच सगळे घर सांभाळावे लागते, असे रामप्रसाद भवानीशंकरला सांगतो. जिधर मै हु उधर वो आता नही है और जिधर वो है उधर मै नही जाता. जुडवे है ना ! सगळे फसतात. मी काय करू? तू काही करू नकोस. त्याला पाठवून दे माझ्या घरी माझ्या मुलीला गाणे शिकायचे आहे. हा जुडवा भाईचा रोल सांभाळता सांभाळता रामप्रसादची त्रेधातिरपीट उडते. सज्जन, दुसऱ्याचा मान राखणारा निष्पाप रामप्रसाद ऑफीसमध्ये व संध्याकाळी तोच रामप्रसाद लक्षुमणप्रसाद म्हणजेच लकी बनून भवानीशंकरच्या मुलीला लुच्चा लफंगा बनूनगाणे शिकवायला येतो. गाण्यातले तत्वज्ञान भवानीशंकरला समजावून सांगतो. लक्ष्मणप्रसाद येतोच मुळी एका बोटात बाईकच्या किल्ल्या फिरवत आणि त्याला माळी म्हणून हाक मारतो. तो येतो तेव्हा भवानीशंकर बागेत काम करत असतो. त्याला म्हणतो जरा बुढ्ढे को बुलाओ. बुढ्ढा मै ! मै हुं उर्मिलाका बाप भवानीशंकर जिसे गाना सिखना है बागेत काम करणारा माळी म्हणजेच भवानीशंकर आहे हे कळल्यावर लक्ष्मण सॉरी म्हणतो तेव्हा भवानी म्हणतो बुढ्ढा तो मै हुं. हा आप बुढ्ढे तो है ही . मगर जैसे अंधे को अंधा नही कहना चाहिए, लंगडे को लंगडा नही कहना चाहिए वैसे बुढ्ढे को बुढ्ढा नही कहना उसे उसको मनको ठेंच पहुंचती है, चाहिए ऍम आय राईट?


एकदा रामप्रसादला बॉसला खोटेच सांगावे लागते की त्याच्या आईला बरे नाहीये कारण त्याला त्याच्या मित्रांबरोबर सहलीला जायचे असते. आता खोटी आई कुठून आणणार? परत मदतीसाठी देवेन वर्माकडे रामप्रसाद जातो. तो म्हणतो तेरी स्टोरी तो बहुत कॉम्प्लिकेटेड होती जा रही है. पहले कुडता, बादमें मुंछ, और अब तुझे नकली मां चाहिए ! ते दोघे कमला श्रीवास्तव कडे जातात आणि तिला नकली आई बनवण्यासाठी राजी करतात. तिने लिपस्टीक लावलेली असते. दागिने घातलेले असतात. महागड्या साड्या व उंच टाचेच्या चपला घालून ती मोठमोठ्या पार्ट्यांना जात असते. तिला पांढरी साडी, कुंकू नाही अशी मां तयार करतात. रामप्रसादची बहीण तिला सर्व समजावून सांगते. रत्ना कमला श्रीवास्तव यांना सांगते आंटी आपको सब मालूम है ना? हां हां मुझे सब मालूम है, घरमें एक मै हुं, एक तू है और एक रामप्रसाद. तीन नही आंटी चार लोग. वो लक्ष्मणप्रसाद जो नही है. मिसेस श्रीवास्तव रत्नाला म्हणते मै सब संभाल लुंगी, तू फिकर मत कर. आईची तब्येत बरी नाही कळल्यावर भवानीशंकर रामप्रसादच्या घरी तब्येतीची चौकशी करायला येतो. तब्येतीबद्दल प्रश्न विचारून भवानीशंकर हैराण करून सोडतो पण रामप्रसाद आणि रत्ना सर्व काही सांभाळून घेतात. या सर्व गोलमालमध्ये भवानीशंकर रामप्रसादला जावई करून घेण्याकरता उतावीळ झालेला असतो. तो लुच्चा लफंगा मवाली लक्ष्मणप्रसादचे तोंडही पहायला तयार नाही आणि बॉस भवानीशंकरची मुलगी उर्मिला बावळट रामप्रसादचे नावही घ्यायला तयार नाही. आता आली का पंचाईत ! जुडवे भाई आणि जुडवी मां यांचा नुसता गोंधळच गोंधळ दाखवून या चित्रपटाचा शेवट केला आहे. एके दिवशी नकली मां ला पार्टीला जायचे असते. तिथे ती नटून थटून जातेही. नेमका तिथे भवानीशंकरही आलेला असतो. कमला श्रीवास्तवला नटलेल्या रूपात पाहून तो बावचळतो. ती मैत्रीणींशी बोलत असते. तिथे तो येतो. तिला लगेचच कळते. त्याचे तोंड चुकवून ती दुसरीकडे जाते. परत तिथे भवानीशंकर हजर ! असे करता करता ती झोपाळ्यावर बसते.


हा सीन खूप छान आहे. झोपाळा हळूहळू हलत आहे आणि भवानीशंकर झोपाळ्यावर बसण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेवटी झोपाळ्याच्या दुसऱ्या बाजूला बसून तो कमला श्रीवास्तवची चौकशी करायला लागतो. म्हणतो मैने आपको कही देखा है. आता नकली मां चांगलाच अभिनय करते. हां हां वो ! जो खारमें रहती है, उसकी बात कर रहे है आप? वो तो मेरी जुडवा बहन है, वो कमला और मै विमला. भवानी म्हणतो आपके खानदानमें कोई जुडवा होने की परंपरा है क्या? हां भाई देखो ना, मेरी नानी थी, उसकी भी एक बहन थी गंगा रानी, जमुना रानी, और ये राम और लक्ष्म ण. अशी सर्व बनवाबनवीची उत्तरे देऊन ती तिथून निसटते आणि घरी येते. तिकडे कार घेऊन भवानीशंकरही रामप्रसादच्या घरी हजर होतो खरे खोटे करण्यासाठी. कमला खिडकीतून कशीबशी घरात येते. इकडे लक्ष्मण प्रसाद व रत्ना चिंतेत असतात. कसातरी वेळ काढत असतात. एकमेकांना आता काय करायचे? असे खुणावत असतात. अश्यातच लक्ष्मण कौन है रे? असे ऐकल्यावर दोघांच्या जिवात जीव येतो. नंतर लक्ष्मण बाहेर जा ऊन पायजमा कुडता घालून रामप्रसाद येतो. भवानीशंकरला आता खात्रीच पटते की हे सर्व खरेच जुडवे आहेत. त्यानंतर भवानीशंकरच्या घरी रामप्रसाद जेवायला येतो तेव्हा डायनिंग टेबलवर जेवताना त्याची मिशी थोडी हलते आणि तिथून सगळी पळापळ होते. रामप्रसाद निसटतो आणि रामप्रसाद उर्फ लक्ष्मणप्रसादचे लग्न उर्मिलशी होते. लग्नमंडपात भवानीशंकर येतो आणि त्याला सर्व प्रकार कळून चुकतो. फोटो काढताना सर्व मुछमुंडे असतात.

Wednesday, August 27, 2025

मनोगती मैत्रीण

 मी काही महिन्यांपूर्वी रेडिओ कम सीडी व कॅसेट प्लेअर घेतला होता, त्यातला रेडिओ मी रोज दुपारी 2 तास लावते, तिथे रेडिओ जिंदगी वर जुनी हिंदी गाणी लागतात, आज मनात आले की सीडी ऐकू, बऱ्याच सीड्या आहेत, त्यातली एक सीडी आनंद देऊन गेली, बघू तरी कोणती गाणी आहेत म्हणून लावली तर पहिलेच गाणे गणपतीचे, आणि आज गणेश चतुर्थी ! काय हा योगायोग ! ही गाणी आम्हाला मनोगती वरदा ने रेकॉर्ड करून दिली आहेत, 2006-2007 च्या दरम्यान वरदा आमच्या wilmington च्या घरी आली होती, मनोगत वर तिची व्यक्तीगत निरोपावर आमची ओळख झाली आणि तिने आम्हाला विचारले तुमच्या घरी 2 दिवस रहायला आले तर चालेल का? आम्हाला दोघांना खूपच आनंद झाला, 2001 नन्तर आम्हाला पहिल्यांदाच इतकी मनमोकळी बोलणारी मराठी मुलगी भेटायला आमच्या घरी येणार होती, आम्ही दोघे तिला विमानतळावर घ्यायला गेलो होतो, मला तर काय करू नी काय नको असे झाले होते, तिच्याकडे असलेली गाण्याची यादी तिने मला पाठवली व यातली कोणती गाणी तुम्हाला हवी आहेत ते सांगा म्हणजे ती मी रेकॉर्ड करून देईन, तेव्हा मी मला अमूक गाणी हवी आहेत ते सांगितले होते. ती आमच्या घरी आल्यावर अर्थातच मनोगतावर चर्चा झाली, खूप गप्पा मारल्या व तिला आम्ही आमच्या कार मधून आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर नेले, नदीवर पण गेलो आणि तिला जायच्या दिवशी परत विमानतळावर सोडले, नंतर काही वर्षांनी आम्ही दोघे पण तिच्या दोन वेगवेगळ्या घरी गेलो होतो, जेवणात तिने मुळ्याची भाजी केली होती आणि आम्हाला गरम गरम पोळ्या वाढल्या, आम्ही तिला व तिच्या मुलांना घेऊन थाई उपाहारगृहात गेलो, तिची मुले खूप लहान होती, आमच्याशी खूप खेळत होती, मजा आली होती,, आजच्या दिवशी आठवणी जागृत झाल्या आणि छान वाटले rohinigore 27 August 2025