मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाही आणि मला भातही आवडत नाही. शिवाय मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. कदाचित यामुळेच माझे वजन नेहमी आटोक्यात राहत असावे असे मला वाटते. लग्ना आधी माझे वजन ३८ किलो होते. माझी उंची ५ म्हणजे माझे वजन ४५ ते ५० पर्यंत असायला पाहिजे. आईकडे आहार चौरस होता तरीही वजन इतके कमी का होते याचे कारण मला सटरफटर अरबट चरबट खाण्यात जास्त स्वारस्य होते. कधीही पोळी भाजी आमटी भात आवडीने खाल्ला नाही. व्यायाम करत नव्हते. व्यायाम म्हणजे दोरीवरच्या उड्या मारायचे. खेळायचे म्हणजे लंगडी, शिवाशिवी इतकेच. लग्नानंतर आम्ही दोघे जेव्हा आयायटी वसतिगृहात रहायला आलो तेव्हा विनुने मला विचारले तू व्यायाम करत नाहीस का? मी म्हणाले नाही. तर तो म्हणाला की सूर्यनमस्कार घालत जा. बायकांकरता हा व्यायाम चांगला आहे. त्याने मला एक-दोन सूर्यनमस्कार घालून दाखवले. मी एका दमात १२ सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशी परत विचारले व्यायाम केलास का? मी म्हणाले की नाही. मला ताप आल्यासारखे वाटत आहे. तर म्हणाला असेच वाटते. तुला व्यायामाची सवय नाही. २-३ दिवस सलग सूर्यनमस्कार घातल्यावर मला छान वाटायला लागले. माझे वजन हळूहळू वाढायला लागले. विनु दंड बैठकांचा व्यायाम करायचा. शिवाय काही योगासने पण करायचा. विनुचे लग्नावेळी वजन होते ७२ किलो. त्याची उंची ५ फूट ११ इंच आहे. त्यासाठी वजन बरोबर होते. शिवाय केमिस्ट्री लॅब तिसऱ्या मजल्यावर असल्याने आणि आमचे वसतिगृहामधले घर पण तिसऱ्या मजल्यावर असल्याने जिने चढ-उतार होत होते. शिवाय आयायटी लॅब पर्यंत जा ये चालतच व्हायची. मी पण मैत्रीणीबरोबर भाजी आणायला किमान १ मैल असेल अंतर (जास्तीच असावे) आठवड्यातून २ वेळा चालत जायचे. धुणे भांडी घरीच करायचे. धुणे-भांडी करणे हा पण एक व्यायामच आहे. टबातून भांडी बाथरूम मध्ये ठेवून त्यात भरपूर पाणी घालून ठेवायचे. त्यावेळेला विम बार साबण होता. त्याने भांडी घासायचे. भांडी खाली बसून घासून झाल्यावर उभी राहून वाकून बादलीतल्या असलेल्या पाण्याने भांडी विसळायचे. धुणे धुवायचा व्यायाम तर जास्त चांगला आहे. यात हातापायांना जास्त व्यायाम होतो. कपडे आघळून पिळण्यासाठी दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्यातून खळखळावे लागतात. त्यासाठी पण वाकावे लागते. वाकल्यामुळे पोट सपाट रहाते. आणि कपडे वाळत घालण्यासाठी वर किती वेळा बघावे लागते? त्यामुळे मानेलाही व्यायाम. आजकाल वर कोणीही बघत नाही. सरळ लॅपटॅप समोर आणि खाली वाकून मोबाईल मध्ये ! विनुची शिष्यवृत्ती वाढल्यावर मी धुणे-भांडीला बाई लावली व शिवणाचा क्लास लावला. शिवणाच्या क्लासला मी आठवड्यातून २ वेळेला साधारण २-३ मैल जा ऊन येऊन चालत होते. माझे वजन ३८ वरून ४० ते ४२ पर्यंत गेले. मला खूप आनंद झाला. लग्ना आधी विनुचा आहार जेमतेमच होता. वसतिगृहाच्या कॅन्टीनमधले जेवण आणि रात्रीचा डबा. त्यात पोळ्या चांगल्या नसायच्या. भाजी म्हणजे रसाची पातळच असायची.
लग्नानंतर आमचा आहार असा काहीसा होता. सकाळी न्याहरीला विब्स ब्रेडचे ३ ते ४ स्लाईस भाजून त्यावर अमुल बटर पसरवून खायचो. त्यावर दुधाची instant कॉफी. दूध खूपच पातळ असायचे. दुपारी जेवणाला पोळी,भाजी, कोशिंबीर, आमटी, भात, ताक , संध्याकाळच्या खाण्याला पोहे, उपमे, साबुदाणा खिचडी. हे पदार्थ खाण्यासाठी खोलगट चिनिमातीच्या डिशा होत्या. मी आईकडून आणल्या होत्या. त्या खोलगट डिशा आईने बोहारणीकडून घेतल्या होत्या. डीश भरून खायचो. एकदा नाही तर परत डिश भरून भरपूर खायचो. दुपारच्या जेवणाला माझ्यासाठी २ पोळ्या व विनुच्या ४ पोळ्या असायच्या. रात्रीच्या जेवणात आमटी भात, मुगाच्या डाळीची खिचडी असायची. विनु सकाळी नाश्ता करून ९ ला लॅब मध्ये जायचा. जेवायला घरी येऊन थोडावेळ विश्रांती घेऊन परत लॅब, नंतर परत संध्याकाळच्या खाण्याला येऊन परत लॅब, परत रात्री जेवायला येऊन परत लॅब. रात्रंदिवस लॅब. मी म्हणायचे पण त्याला की तू लॅबमध्येच का नाही रहात?
लग्नानंतर विनायकचे वजन ७२ चे ८० किलो झाले आणि माझे ३८ चे ४५ किलो झाले. विनुचे व माझे आयाटीमध्ये खूपच चालणे व्हायचे.
विनायकला मी सल्ला दिला की तू नुसते जोर बैठकांचा व्यायाम करू नकोस. जोडीला सूर्यनमस्कारही घाल.दंड बैठकाने शरीर कडक होते. सूर्यनमस्काराने लवचिक होते. तर तो म्हणाला की तू पण दंड बैठका घाल. त्याने स्नायुंना बळकटी येते. मी आधी नाही म्हणाले. सुरवातीला मी १२ नमस्कार घालत होते. ते नंतर २५ केले. पण त्याने खूपच दमायला व्हायचे. नंतर १२ नमस्कार, ८ दंड व ८ बैठका असा व्यायाम सुरू केला. पण त्याचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर मी माझा व्यायाम सेट केला. १२ सूर्यनमस्कार, ४ दंड, ४ बैठका व काही योगासने. विनुने पण सूर्यनमस्कार घालायला सुरवात केली. योगासनामध्ये विनुला शिरसासन खूप चांगले जमायचे व मला ते कधीच जमले नाही. मला सर्वांगासन खूप छान जमायचे. आम्हाला दोघांना कमान चांगली जमायची. पद्मासन घालायचो. अजून काही योगासने होती पण त्यांची नावे आता आठवत नाहीत. copy right - rohini gore
लेखाचा दुसरा भाग लवकरच.....
No comments:
Post a Comment