Sunday, April 07, 2024

सुंदर माझं घर ..... (४)

कंपनीच्या मागेच क्वार्टर्स होत्या. साधारण १२०० स्क्वेअर फुटाच्या. दोन बेडरूम, किचन, हॉल, servant's room हॉलला लागून मोठी बाल्कनी. डोंबिवलीतल्या एका माणसाच्या ओळखीने आमचे शिफ्टिंग झाले. त्याचा ट्रक होता. आमचे सामान जास्ती नव्हतेच. भांडीकुंडी एका पोत्यात भरली. एकात कपडे, आणि बाकीचे सुटे सुटे सामान एकेक करत ट्रक मध्ये भरले. हे सर्व करायला माणसे होतीच. त्या ट्रक मध्ये आम्ही तिघेही बसलो. आम्ही दोघे व सुषमा. अग्रेसर ४ मध्ये प्रवेश केल्या केल्या किती छान ! असेच उद्गार निघाले. सुषमा म्हणाली की जेवणात काहीतरी गोड करू. नेमका रवा सापडत नव्हता. त्यामुळे सुषमाने कणकेचा शिरा केला.


आम्ही तिघे जेवलो आणि दुपारचा चहा घेऊन ती डोंबिवलीस परतली. डोंबिवलीच्या घरात लाकडी सामान घेतले नव्हते ते या जागेत घेतले. सोफासेट, वेगवेगळे कप्पे असलेले मोठे कपाट घेतले. ते हॉल मध्ये ठेवले. टीपॉय, फोन ठेवायला कॉर्नरचे टेबल, मोठा बेड, दुसऱ्या बेडरूम मध्ये आमची डोंबिवलीची कॉट ठेवून जमिनीवरचे कार्पेट अंथरले. ओव्हल आकाराचे ६ जणांचे काचेचे डायनिंग टेबल असे सर्व काही घेतले. असे सर्व मनाजोगते फर्निचर १ लाखाचे होते. हे सर्व कंपनीकडूनच (white goods ) लेमन व गुलाबी रंगाची रंगसंगती असलेले पडदेही शिवले. विनु रोज दुपारी घरी जेवायला यायचा. डायनिंग टेबलवर वर बसून जेवायला छान वाटायचे. रात्रीचे जेवण आम्ही खाली बसून जेवायचो आणि एकीकडे आभाळमाया मालिका पहायचो. रोज रात्री जेवण झाल्यावर कंपनीच्या आवारात ३-४ फेऱ्या मारायचो. पॉटलक हा प्रकार मला इथे आल्यावरच कळाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मी ७०-८० पुऱ्या केल्या होत्या. दुसऱ्या वेळी ७०-८० बटाटेवडे केले होते. टिव्ही वर मी दुपारी महाश्वेता पहात होते. दर रविवारी सकाळी पार्ल्यात भाजी आणायला जायचे. हा बाजारहाट मला खूपच आनंद देवून जायचा.


Advanced Diploma of Computer Programming हा कोर्स मी डोंबिवलीत करत होते. त्या कोर्सचे शेवटचे उरलेले काही दिवस मी अंधेरी-डोंबिवली ये-जा करून पूर्ण केले. मी अंधेरी ते घाटकोपर बसने जायचे. नंतर घाटकोपर ते डोंबिवली ट्रेनने प्रवास करायचे. परत घरी जाताना डोंबिवली-घाटकोपर-अंधेरी. एक चांगले होते की ट्रेन मध्ये मला ऑफीसची गर्दी लागायची नाही. सकाळी दुधात कॉर्नफ्लेक्स घालून ते खाऊन निघायचे. बरोबर काहीतरी छोट्या डब्यात खायला घ्यायचे. कारण यायला मला दुपारचे २ वाजायचे. ९ ला निघायचे. जाताना बसला गर्दी असायची. प्रोजेक्ट करायला मात्र मी सुषमा नेर्लेकर कडे ४ दिवस राहिले होते. नंतर लेखी परिक्षेसाठी मी अंधेरीवरून दादरला आले होते. परिक्षा झाल्यावर घरी आले तेव्हा खूप हायसे वाटले. हा कोर्स पूर्ण झाला याचे समाधान वाटले. नंतर विचार केला होता की एक कंप्युटर घेऊन जे शिकलोय त्याचा सराव करायचा. मला सी लॅंगवेज मध्ये गोडी वाटु लागली होती. दीपाली मला म्हणाली होती की मी तुम्हाला कोणती पुस्तके घ्यायाची त्याची यादी देईन व तुम्ही सराव करा. काही अडले तर मी सांगेन तुम्हाला. नंतर मला एका मैत्रिणीकडून कळाले की घरबसल्या Data entry चे काम मिळते. घरबसल्या काम मिळाले तर ते चांगलेच होईल असा मनाशी विचार केला होता.


आणि एक दिवस दुपारी श्री नेर्लेकर यांचा आम्हाला फोन आला की आपले पारखी काका गेले. मी जोरात ओरडलेच काय ? विनु व्यायाम करत होता. आम्हाला दोघांनाही हा मोठा शॉक होता. २ जानेवारी २००० सकाळी पारखी काकांचे निधन झाले होते. पारखी काका काकू आमच्या शेजारीच रहात होते. विनुने व्यायाम पूर्ण केला आणि आम्ही डोंबिवलीला गेलो. डोंबिवलीवरून परत घरी अंधेरीला यायला रात्रीचे १२ वाजून गेले होते. सकाळी उठलो तर विनुचा डावा हात खूपच सुजला होता. चांगला टरटरून फुगला होता. लगेचच आम्ही डॉक्टरांकडे गेलो. एक्स-रे काढले तर त्यात असा रिपोर्ट आला की शिरेमध्ये रक्ताची बारीक गुठळी झाली आहे. विनुला Thrombosis झाला होता. लगेचच त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. ८ दिवस मी एकटीनेच सर्व मॅनेज केले.


विनुला सलाईन मधून गुठळी विरघळण्याचे औषध दिले. ही रक्ताची गुठळी हळूहळूच विरघळायला हवी होती. माझ्याकडे शुभांगी नावाची कामवाली बाई होती. तिच्या मदतीने मी एकटीन सर्व केले. रात्रीचे जेवण करून मी विनुकरता डबा घेऊन दवाखान्यात जायचे. सकाळी दवाखान्यात चहा देत होते. चहा, नाश्ता फक्त पेशंटला होता. सकाळी दवाखान्यातून मी घरी रिक्शाने यायचे. शुभांगीला सांगून ठेवायचे की तू सकाळी माझ्याकडे कामाला आधी ये ८ वाजता. तशी ती बरोबर ८ ला हजर असायची. घरी आल्यावर मी ब्रश, चहा, अंघोळ करून पोळी भाजी भात आमटी करायचे. माझे आवरून होईतोवर शुभांगी झाडू-पोछा, धुणे-भांडी करायची. शिवाय कणिक भिजवून व भाजी चिरून ठेवायची. नंतर मी माझे जेवण करून व थोडी विश्रांती घेऊन ११-१२ च्या सुमारास परत डबा घेऊन दवाखान्यात जायचे. संध्याकाळी परत येऊन रात्रीचा डबा घेऊन दवाखान्यात झोपायला जायचे. तेव्हा विनुला भेटायला श्री नेर्लेकर आले होते. विनुला पथ्य नव्हते. हळूहळू करत ती रक्ताची गुठळी विरघळून गेली. विनुला बिपीचा त्रास ३०व्या वर्षापासूनच आहे. नंतर रक्त पातळ ठेवायच्या गोळ्या सुरू झाल्या.


लग्नानंतर दहा वर्षांनी का होईना सर्व काही छान झाले होते. प्रमोशन, नंतर कंपनीची मोठी जागा, फोन, मनाजोगते लाकडी सामान, कंपनीत जाण्यायेण्याचा त्रास नाही. दुपारचे गरम गरम जेवायला विनु घरी येत होता. हा आनंद अगदी थोडे दिवसच टिकला. कंपनीने विनुला तळोजा फॅक्टरीत जायला सांगितले. तो रोजच्या रोज तळोजाला कंपनीच्या कारमधून जायला लागला. विनुबरोबर मनिशही जात होता. कार चालवण्यासाठी कंपनीचा ड्राइव्हर होता. त्यातही त्याची रात्रपाळी सुरू झाली. कंपनीची कार असली तरी जाण्यायेण्यात २-३ तास मोडत होते. येताजाता ट्रॅफीकचा मुरांबाही होताच. एक दिवस रात्रपाळी संपवून विनायक आणि मनिश कारमधून घरी आले. कार तशीच ठेवली. मनिशलाही तू थांब असे सांगितले. ड्राईव्हरला पण थांबायला सांगितले. विनुच्या पोटात खूपच दुखत होते. घरी आल्यावर कॉटवर तो थोडा आडवा पडला. त्याला ताप भरत होता. त्यातच त्याला खूप मोठी उलटी झाली. उलटीमध्ये थोडे रक्तही गेलेले दिसले. ती उलटी मी लगेच साफ केली आणि मनिशला इंटरकॉमवर फोन केला. नंतर आम्ही दोघे व मनिश डॉक्टरांकडे कंपनीच्या कार मधूनच गेलो. त्यांनी तपासले. एक्सरे काढले. त्यात अपेंडिक्सचे ऑपरेशन लगेचच करायला सांगितले नाहीतर ते आतल्या आत बर्स्ट होण्याची शक्यता आहे.


हॉस्पिटलमध्ये लगेचच ऍडमिट केले. सर्व चाचण्या केल्या. ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत मनिश माझ्यासोबतच होता. मी मनातून घाबरले होते याचे कारण रक्त पातळ होण्याच्या गोळ्या विनु घेत आहे आणि त्यात ऑपरेशन ! मन अस्वस्थ होते. मनिश म्हणाला तू टेंशन घेऊ नकोस. डॉक्टर सर्व व्यवस्थित करतील. विनुने डॉक्टरांना सांगितले होते की तो रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत आहे. हे सांगून सुद्धा डॉक्टरांनी नीट काळजी घेतली नाही. ऑपरेशन यशस्वी झाले पण जखम बरी न होता त्यातून रक्त वहायला लागले. नंतर लगेचच मी सासरी माहेरी फोन करून कळवले. श्री नेर्लेकर, राहूल जोशीला पण फोन केला आणि सांगितले. डोंबिवली वरून राहूल, वैशाली, जोशीकाका आणि नेर्लेकर लगेचच धावत आले. सलाईन मधून रक्त द्यायला सुरवात केली होती. पण हे असे किती वेळ चालू रहाणार म्हणून मी श्री नेर्लेकर यांना सांगितले की तुम्ही प्लीज डॉक्टरांना विचारता का? की ब्लड का थांबत नाहीये. त्यावर काही उपाय नाहीये का? तसे लगेचच त्यांनी विचारले. तिथले डॉक्टर पण चिंतेत पडले होते. नेर्लेकरांनी मला येवून सांगितले की आता नानावटीला हालवायचे आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि मध्यरात्री तातडीने अंब्युलन्स मधून आम्ही सर्व नानावटी हॉस्पीटल मध्ये गेलो.


तिथे डॉक्टर दिक्षीत म्हणाले की पोटातून रक्त कुठून येत आहे ते पहायला हवे त्याकरता मला एक मोठी सर्जरी करावी लागेल. पोट फाडून बघायला हवे. डॉक्टरांनी सांगितले की सर्जरी कमीतकमी ४-५ तास चालेल. मी तुम्हाला आता काहीही सांगू शकत नाही. डॉक्टरांनी असे सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली. रात्रभर ऑपरेशन चालू होते ते पहाटे संपले. ऑपरेशन यशस्वी झाले. नंतर विनुला शुद्ध आली आणि मला खूपच हायसे वाटले. विनुला सलाईन आणि ब्लडही देत होते. नाकातोंडात नळ्या होत्या. ते बघून मला खूप वाईट वाटत होते.


ऑपरेशन चालू असताना रात्रभर मी गजानन महाराजांचा जप करत होते. तरी सुद्धा अधुन मधून मला हुंदका येत होता. ती रात्र मी कशी काढली ते माझे मलाच माहीत. अर्थात माझ्याबरोबर मला धीर द्यायला डोंबिवलीकर होते. नंतर कंपनीतल्या सर्वांनी मला मदत केली. सकाळी सुषमा आणि पारखी वहिनी आल्या. मौमिताने मला जेवण पाठवले होते. सुषमा म्हणाली की तू आधी शांतपणे जेवून घे आणि थोडी आडवी हो. आम्ही आहोत सोबत. आडवी झाल्यावर मला थोडी डुलकी लागली आणि बरे वाटले. पहाटे आईबाबा- सासूसासरे आले. नंतर थोड्यावेळाने सुषमा, नेर्लेकर, राहूल वैशाली, जोशी काका डोंबिवलीला गेले. मला दोन्ही वेळेला मौमिता जेवणाचा डबा पाठवत होती. हॉस्पिटल मध्ये आधी मी रात्रीची झोपायला जायचे. पण तिथे कूलर असल्याने माझे डोके भणभणायला लागायचे म्हणून मग रात्री सासरे झोपायचे व दिवसा पूर्ण दिवस मी असायचे. शुभांगीला पोळ्याही करत जा असे सांगितले. शिवाय बाहेरून भाजी आणून ती चिरूनही दे. कणिकही भिजवून दे असे सांगितल्यावर ती म्हणाली तुम्ही काहीही काळजी करू नका. धुणे-भांडी-केर-पोछा या कामाशिवाय मी जास्तीचे काम तिला दिले होते. तिला तसे जास्तीचे पैसेही दिले.आई आमटी भात भाजी करायची. नंतर सुरेश-रंजना सई आले. हळूहळू विनायकच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली.


एकाशी एक बसून काय करणार ना? म्हणून मग आईबाबा-रंजन सुरेश पुण्याला गेले आणि सांगताना सांगून गेले की काहीही लागले तरी लगेच फोन कर. नंतर काशी आत्या आल्या. नंतर हळुहळू विनुची तब्येत सुधारत गेली. होळीच्या दिवशी विनू पुर्ण बरा होऊन घरी आला. त्याचे वजनही बरेच कमी झालेले होते. नंतर लगेचच सासूसासरे व काशी आत्या त्यांच्या घरी जायला निघाले. सासरची माहेरची मंडळी, राहूल, वैशाली, जोशी काका, सुषमा आणि नेर्लेकर, काशी आत्या आणि कंपनीतल्या सर्वांनी मला मदत केली. आधार दिला.


ऑपरेशन होण्या आधी हिंदुस्तान लिव्हरचे अंधेरी मधले सेंटर बंद करायच्या मार्गावर आहेत आणि काही जणांना बंगलोरच्या ऑफीस मध्ये पाठवणार आहेत अशी बातमी कळाली. जेव्हा एखादे युनिट बंद होते आणि दुसरीकडे हालवतात त्यात नोकरी जाण्याची दाट शक्यता असते. विनायकने दुसरी नोकरी शोधायला सुरवात केली. दरम्यान विनुचा एक मित्र तांडेल अमेरिकेवरून भारतभेटीसाठी आला होता आणि तो विनायकला भेटण्यासाठी आमच्या घरी आला. तो विनायकला म्हणाला की तू अजूनही अमेरिकेत post-doctorate करण्यासाठी जाऊ शकतोस. त्याने त्याच्या गाईडचा पत्ता दिला. त्यावेळेला नुकतेच इंटरनेट सुरू झाले होते म्हणून विनुने अमेरिकेत post-doctorate साठी अर्ज केला. हे शिक्षण नाही. त्यामुळे पदवी नाही. विद्यापिठात संशोधन करायचे. संशोधन केलेल्या कामाचे पेपर्स Scientific Journals मध्ये प्रकाशित होतात. दोघांचे भागेल इतपत शिष्यवृत्ती असते. गाईडचे लगेचच उत्तर आले. श्री गाडगीळ यांनी रेको दिली आणि विनुने वयाच्या ४० व्या वर्षी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला जावेच लागले. अन्नासाठी दाही दिशा म्हणतात ना ! कंपनीचा राजीनामा दिला आणि २००१ साली आम्ही अमेरिकेत आलो.हॉस्पिटलमध्ये असतानाच अमेरिकेचे बोलावणे आले. नंतरच्या भागात लिहीनच अमेरिकेतल्या घरांचे वर्णन व आठवणी. तोपर्यंत वाचत रहा. Copy Right Rohini Gore

क्रमश : ...


No comments: