Thursday, April 11, 2024

सुंदर माझं घर ..... (५)

२२ मे २००१ रोजी संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटच्या शेजाररच्या अपार्टमेंटमध्ये एक तामिळ भारतीय कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात म्हणजे अपार्टमेंट नंबर 6 मध्ये आम्ही 8 दिवसा नंतर जाणार होतो, कारण ते जागा सोडून दुसऱ्या शहरात जाणार होते. त्यांच्या जागेचे lease agreement आम्ही take over करणार होतो त्यामुळे त्यांचे त्या जागेचे डिपॉझिट त्यांना मिळणार होते. २०५ नंबर मध्ये आम्ही फक्त ८ दिवस रहाणार होतो. त्या जागेत रहाणारी सत्या मला म्हणाली आज रात्री तुम्ही आमच्याकडेच जेवा, दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या घरात तुमचे नवीन रुटीन सुरू करा. त्यादिवशी रात्री आयते जेवण मिळाले ते एका दृष्टीने बरेच झाले. नवीन घरात रात्री काही करायला उत्साह नसतोच. त्या कुटुंबात एक शाळेत जाणारी मुलगी होती. त्यांच्याकडे जेवायला गेलो तर सत्याची मुलगी माझ्या मांडीवरच येऊन बसली. मला खूप छान वाटले. तिने जेवणही छान बनवले होते. पोळी भाजी बरोबर तिने डोसाही बनवला होता. तसे अमेरिकेत आल्यावर ८ दिवस आम्ही प्रोफेसरांच्या बंगल्याच्या शेजारच्या छोट्या बंगल्यात राहत होतो पण तिथे भारतीय जेवण नव्हते. त्यामुळे या मैत्रिणीच्या घरी घरचे छान जेवण जेवल्यावर बरे वाटले. जेवण करून घरी आलो. पिवळ्या बल्बमधले मिणमिणते दिवे नकोसे वाटत होते. झोपायचे होते पण गादी नव्हती. या घरात रहायला येण्या आधी प्रोफेसर ऍलन मर्चंड यांनी आम्हाला सॅम्स क्लबमध्ये नेले होते. सॅम्स क्लब हे अमेरिकेतले अवाढव्य दुकान आहे. इथे घाऊक माल विकत घ्यावा लागतो व वर्षाचे पैसे एकदम भरून त्या दुकानाचे सदस्यत्व घ्यावे लागते. इथे आम्ही काही गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात 25 किलो तांदुळाचे पोते व 10 किलो मैदा घेतला. हवा भरून तयार करता येईल अशी एक गादी घेतली. खरे तर मला इतका मैदा घ्यायचा नव्हता पण कणिक कधी कोठे मिळते हे माहीत नसल्याने मैद्याच्या पोळ्या करून खाता येतील म्हणून घेतला. त्या गादीत हवा भरून ती फुगवली व त्यावर भारतातून आणलेल्या दोन चादरी घालून झोपलो. उशाला काही नव्हते. झोप येता येत नव्हती. आपण इथे फक्त दोघेच्या दोघेच आहोत याचा एकाकीपणा खूप जाणवत होता. त्या घरात त्यादिवशी आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर आणलेल्या भारतातल्या ४ बॅगाच होत्या. भारताची प्रखरतेने आठवण येत होती.२०६ अपार्टमेंट मध्ये आम्ही जाणार होतो कारण या घरापासून विद्यापीठ, वाण सामानाचे दुकान, धुणे धुवायचे दुकान हे सर्व चालत जाण्याच्या अंतरावर होते. शिवाय या घरात जरूरीपुरते सर्व लाकडी सामान होते. अर्थात ते त्यांचे नव्हते. या आधी रहाणाऱ्या माणसांनी ते असेच सोडून दिले होते. झोपायला बेड होता. बसायला फिरती खुर्ची आणि टी पॉय होता. लाकडी सामान जुने असले तरी ते होते हे महत्वाचे. सत्याने मला तिच्याकडच्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बरण्या व प्लॅस्टीकचे डबे साफ करून दिले. म्हणाली तुला वाण सामान ठेवायला उपयोगी पडतील. Sack & Save अमेरिकन दुकानात रोजच्या वापरातल्या सर्व जरूरीच्या वस्तू म्हणजे टुथब्रश, टुथपेस्ट,अंगाला लावायचा साबण, टिश्यु पेपर, पेपर टॉवेल, साखर, तेल, भाज्या, इत्यादी आणून दिवसाची सुरवात झाली. आठ दिवसानंतर २०६ मधले तमिळ कुटुंब दुसऱ्या शहरी गेले आणि आम्ही २०६ मध्ये शिफ्ट झालो. त्यांना टाटा केला. सत्याने मला जाता जाता फोडणीचे साहित्य पण दिले मोहरी,हिंग हळद. इलेक्ट्रीकच्या शेगड्या, अरूंद स्वयंपाकघर, मिणमिणते दिवे, अंघोळीकरता अरूंद टब सर्व काही नवीनच होते. अंघोळ करताना तर सुरवातीला छोटी बादली व त्यात एक ग्लास टाकून भारतात अंघोळ करतो तशी केली. शॉवरचे पाण्याने केस ओले न होता अंघोळ करायला एक दोन दिवसातच जमवले. फक्त मला इथले एक आवडले ते म्हणजे गरम व गार पाणी दोन्ही होते. त्यामुळे मनसोक्त अंघोळ करता येत होती. इलेक्ट्रीकच्या शेगडीवर चहाला लागणारा वेळ, कूकरला लागणारा वेळ हे काही पचनी पडत नव्हते. इथे घरपोच सेवा नाही. त्यामुळे मुंबईतल्या दिवसांची खूपच आठवण येत होती. घरपोच वाणसामान,घराच्या दाराशी टाकलेले वर्तमानपत्र, गोकुळ दुधाची पिशवी, दारात ठेवलेला केराचा डबा की जो केरवाली घेऊन जाते. धुणे-भांडी करायला येणारी बाई, तिच्याशी होणाऱ्या गप्पा. गप्पांसोबत तिने व मी खाल्लेला फोडणीचा भात व नंतर चहा. या सर्व गोष्टींची तीव्रतेने आठवण येत होती. संध्याकाळी मराठी बातम्या टीव्हीवर पाहण्याची खूप सवय होती तेही खूप जाणवत होते.


अपार्टमेंट मध्ये मोठा फ्रीज, ४ इलेक्ट्रिक शेगड्या, त्याखाली ओवन, मायक्रोवेव्ह, डिशवॉशर, centralized heating/cooling ओट्याच्या वर व खाली डबे ठेवायला कपाटे होती. इथल्या प्रत्येक अपार्टमेंट मध्ये या सर्व गोष्टी असतात. इथे घराच्या बाजूलाच रस्ते क्रॉस केल्यावर धुणे धुवायचे दुकान होते. त्यामुळे सर्व धुणे घेऊन तिथे जायला लागायचे. ८ दिवसाचे कपडे साठवून ते मशीन मधून धू ऊन आणायचे हे मला अजिबात आवडले नव्हते. मुंब ईत रहात दर २/३ दिवसांनी मी वॉशिंग मशीन मधून कपडे धूत होते. विनायक ८ वाजता लॅब मध्ये जायचा. त्यानंतर मी एकटीच घरी असायचे. माझे मी आवरून स्वैपाक करायचे. दुपारी १ ला विनु घरी जेवायला यायचा. नंतरचा वेळ मी बाहेर गॅलरीत उभे राहून परत घरात यायचे. घरात आले आणि एखाद्या कार येण्याचा आवाज आला की लगेच परत बाहेर यायचे. असे वाटायचे की आपल्याकडेच कुणीतरी आले आहे. गॅलरीत उभे राहून बाहेर पाहिले की इथे कोणीही राहत नाही असे वाटायचे कारण की सर्वांची दारे बंद. रस्त्यावर कोणी दिसायचे नाही. सगळे रस्ते सुनसान. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे रहायला आलो होतो त्यामुळे कुठेही कसलीही रहदारी किंवा माणसे दिसत नव्हती. बरेच विद्यार्थी भारत दौऱ्यावर गेले होते आणि अमेरिकन्स त्यांच्या घरी गेले होते. भारतातल्या सवयीप्रमाणे कॅन मधले दूध मी पातेल्यात ओतून गरम केले, सायीचा पत्ताच नव्हता, साय नाही तर सायीचे ताक लोणी तूप कसे करायचे असे मोठाले प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. एकदा अशीच गॅलरीत उभी होते तर मला एक भारतीय माणूस खालच्या घरातून बाहेर येताना दिसला. त्याची बायको प्रविणा बाहेर आली आणि मला गॅलरीत पाहून ती वर आली आणि माझी विचारपूस केली. ती म्हणाली की तू नवीन आहेस तर तुला जे हवे ते माग माझ्याकडे मी खालीच रहाते. ती तेलुगू होती. संभाषण इंग्रजी मधूनच केले. प्रविणाने मला दही बनवण्यासाठी विरजण दिले, ती म्हणाली मी घरीच दही बनवते, आम्हाला खूप लागते दही. भारतावरून मी ताक घुसळायला रवी आणली होती. त्यानंतर २-४ दिवसात प्रविणा व श्रीनिवास यांनी आम्हाला त्यांच्या कारमधून भारतीय दुकानात नेले. ते खूप दुरवर होते. भारतीय सामान म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी, पिठे, पोहे, रवा, साबुदाणा, घेतले. शिवाय भारतीय भाज्याही घेतल्या. (तोंडली, गवार, छोटी वांगी, भेंडी) भाजी चिरायला अंजलीचा चॉपर आमच्या बरोबरच आणला होता. आमचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स सी आकाराचे होते आणि त्याला लागूनच वाहता रस्ता होता. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे एक भली मोठी चक्कर मारायला जायचो. Texas मध्ये प्रचंड उन्हाळा असतो. रात्री दहाला पण गरम हवेच्या हाळा लागायच्या. बाहेरून घरात आलो की घरात कुलर असल्याने थंडगार वाटायचे. काही दिवसांनी आम्हाला रस्त्यावरून चालत असताना माधवी रवी ची जोडी दिसली. आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. एकमेकांचे फोन नंबर घेतले. माधवी खूपच बोलकी होती. ती हिंदीतून बोलायची. नंतर कविता-पवनकुमार आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये रहायला आले. प्रविणा-कविता आणि मी एकमेकींना वाडग्यातून घरी काही चमचमीत केले असेल तर द्यायचो. अशी देवाणघेवाण छान वाटत होती. बऱ्याच वेळा मी व प्रविणा जिन्यात बसून चहा प्यायचो. या अपार्टमेंटला बाहेरून जिने होते. जेव्हा हिमवृष्टी झाली ती मी पहिल्यांदाच आयुष्यात अनुभवली. गॅलरीत जमा झालेल्या बर्फात मी स्वस्तिक व फूल कोरले आणि त्यावर हळदीकुंकू वाहिले. कविता, प्रविणा, माधवी ही तीन तेलुगु कुटुंबे आणि आम्ही दोघे मराठी असा आमचा छान ग्रुप तयार झाला. नंतर काही दिवसांनी मला कळाले की डॅलस वरून रेडिओवर २४ तास हिंदी गाणी प्रसारित होतात. त्यामुळे आम्ही वाल मार्ट मधून रेडिओ कम टेपरेकॉर्डर विकत आणला. रेडिओ वर जुनी नवी हिंदी गाणी लागत होती आणि मधून एक बाई निवेदन करायची. त्यामुळे थोडेसे का होईना बरे वाटत होते. विनायकच्या लॅब मध्ये एक चिनी काम करत होता. तो विनायकला म्हणाला की तू लगेच टिव्ही घे. नाहीतर तुझी बायको घरी बसून वेडी होईल. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारमधून वॉल मार्ट्ला घेऊन आला आणि आम्ही १३ इंची टिल्लू टिव्ही विकत घेतला. या टीव्ही वरूनच ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर इराकी हल्ला झाल्याचे कळाले होते. दिवसभर हीच बातमी प्रसारित होत होती.


सौमित्र गोडबोले नावाचा एक विद्यार्थी ओळखीचा झाला. त्याचे वडील मराठी आणि आई बंगाली होती. त्याला मराठीत बोलता यायचे नाही. हिंदीतून बोलायचा. तो खूप खावस होता. त्याला मी अधुन मधून जेवायला बोलवायचे. तो ग्रीक योगर्टचे श्रीखंड बनवून आणायचा. मी बाकीचा सर्व मराठमोळा स्वौपाक करायचे. नंतर आम्ही व्हीसीआर लावून हिंदी सिनेमे बघायचो. मी आणि माधवीने मिळून बऱ्याच गोष्टी केल्या. मी आई बाबा, सासूसासरे, माझी बहीण यांना पत्र पाठवते हे माधवीला सांगितल्यावर ती पण तिच्या घरी पत्रे पाठवू लागली. ती तिच्या घरातून व मी माझ्या घरातून विद्यापिठातल्या पोस्ट ऑफीस मध्ये यायचो. इथल्या ग्रंथालयात अनेक डेस्क टॉप होते. त्यावरून मी ईसकाळ वाचायचे. रोज दुपारी मी ग्रंथालयात जायचे व तिथून विनुच्या लॅब मध्ये जाऊन आम्ही दोघे घरी परतायचो.
माधवी माझ्या घरी व मी तिच्या घरी चालत जायचो. एकमेकींकडे जाऊन चहा पाणी व्हायचे. सोबत बटाटा वेफर्स असायचे. आम्ही ४ कुटुंबाने ३१ डिसेंबर २००१ साजरा केला. त्यात मी सर्वांना ७०-८० बटाटेवडे केले होते. प्रत्येकीने एकेक पदार्थ वाटून घेतला होता. सर्व जणी खूपच दमलो होतो. त्यामुळे जास्त जेवण गेले नाही. उरलेले सर्व जेवण आम्ही वाटून घेतले आणि १ जानेवारी २००२ ला गरम करून खाल्ले. दोन्ही दिवशी खूप बर्फ पडत होता. आम्ही सर्वांनी मिळून गाण्याच्या भेंड्या खेळल्या. त्यात तेलगू, मराठी हिंदी अशी सर्व गाणी होती. आम्ही आलो ते १ वर्षाचा ( J 1 ) विसा घेऊन. नंतर विनुने दुसरीकडे post doctorate करण्यासाठी विद्यापिठात अर्ज करायला सुरवात केली. त्याला ४ विद्यापिठातून बोलावणे आले होते. त्यापैकी त्याने क्लेम्सन शहर निवडले. क्लेम्सन हे साऊथ कॅरोलायना राज्यात आहे. आमच्या सर्व बायकांचा Dependent visa (J2) होता. मी व माधवीने १०० डॉलर्स भरून वर्क पर्मिट काढले. अर्थात ते मला क्लेम्सन शहरात गेल्यावर उपयोगी पडले. या घरात आम्हाला अमेरिकेतले स्थलांतर कसे करायचे हे शिकायला मिळाले आणि ते नंतर उपयोगी पडले.


डेंटनवरून क्लेम्सनला विमानानेच जावे लागणार होते इतके ते लांब होते. प्रविणा व तिचा नवरा श्रीनिवास यांनी आम्हाला कशा प्रकारे स्थलांतर करायचे हे सांगितले. श्रीनिवास म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला पॅकिंग कसे करायचे ते सांगतो. तुम्ही फक्त एक करा मला ५ ते ६ खोकी आणून द्या. त्यादिवशी संध्याकाळी ते दोघे आमच्या घरी आले. गप्पा मारत होते. अधुनमधून मी चहा करत होते. केव्हा जाणार, कोणत्या विमानाने जाणार, असे विचारले आणि त्यांनी हे पण सांगितले की तुम्हाला तुमचे रहाते घर खूप स्वच्छ करून द्यावे लागेल तरच तुम्हाला तुमच्या जागेकरता भरलेले डिपॉझिटचे पैसे परत मिळतील. आम्ही खोकी आणली आणि एकेक करत आमचे सामान पॅक होऊ लागले. खोकी भरायला श्रीनिवासने आम्हाला मदत केली. सर्व पुस्तके आणि काही सामान पॅक केले. आमचा पहिलावहिला खरेदी केलेला टिल्लू टिव्ही खोक्यात गेला. टेप रेकॉर्डर कम रेडिओ पण एका खोक्यात गेला. टोस्टर आणि इतर बरेच सटर फटर सामान खोक्यात जात होते. ही सर्व खोकी आम्ही पोस्टाने (USPS) पाठवणार होतो. खोक्यांना चिकटपट्या चिकटवल्या. त्यावर पत्ताही लिहीला. हा पत्ता आम्ही पवनकुमारच्या मित्राचा दिला. ईमेलने त्याला विचारले आम्ही आमचे काही सामान पोस्टाने तुझ्या पत्यावर पाठवत आहोत, चालेल ना? की जो क्लेम्सन मध्ये रहात होता. क्लेम्सन मध्ये आम्हाला घर मिळाले नव्हते. तिथे गेल्यावर आम्ही पाहणार होतो.


भारतावरून आणलेल्या आमच्या चार बॅगा परत एकदा नव्याने पद्धतशीरपणे लावल्या. एका वर्षात आमचे सामान थोडे वाढले होते. श्रीनिवासने असे सुचवले की त्या शहरात तुम्ही नवीन आहात तर माझा असा सल्ला आहे की तुम्ही थोडेफार भारतीय किराणामालाची पण खोकी तयार करा. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारने भारतीय किराणामालाच्या दुकानात घेऊन गेला. काही मसाले, डाळी आणि थोडी कणिक असे परत पॅकीग झाले. इथल्या आणि भारतातल्या स्थलांतरामध्ये बराच फरक आहे. प्रत्येक स्थलांतराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जसे की अंतर जर लांब असेल तर विनानाने जावे लागते. काहीजण २० तासाचा प्रवास कारनेच करतात. काही जण U-Haul ट्रक कारच्या मागे जोडून प्रवास करतात. या ट्रकमध्ये सर्व सामान बसवता येते. हा ट्रक भाड्याने मिळतो. खूप फर्निचर असेल की जे आपल्याला उचलणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे अशामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्स बोलावतात.


आम्ही जे स्थलांतर करणार होतो ते विमानने जाऊन करणार होतो आणि बाकी सर्व गोष्टी पोस्टाने पोहोचवल्या जाणार होत्या. सर्वात मुख्य म्हणजे इथल्या स्थलांतरामध्ये आपल्यालाच सर्व काही करावे लागते. राहते घरही स्वच्छ करून द्यावे लागते. कामांची नुसती रीघ लागलेली असते. भारतातून येताना ज्या बॅगा आणलेल्या असतात त्याही परत नव्याने लावायच्या म्हणजे डोकेदुखी असते. थोडेफार कपडेही वाढलेले असतात. थंडी असल्याने कोट, टोप्या, चपला बुटे हे पण वाढलेले असते. उन्हाळ्याच्या कपड्यांची पण थोडी भर पडलेली असते. शिवाय जे सामान पोस्टाने अथवा फेडेक्सने पाठवायचे असेल त्या खोक्यांची पण रांग लागलेली असते. त्यावर चिकटपट्या चिकटवून टाईप केलेले पत्ते यांच्या प्रिंटस चिकटवणे व सर्व खोकी एकेक करत उचलून, घर वरच्या मजल्यावर असेल तर खाली आणून परत ती कोणाच्या मदतीने ज्याच्याकडे कार असेल त्याच्या सोयीनुसार त्यात टाकून ती पोस्टात नेण्यासाठी न्यावी लागतात. अशा एक ना अनेक भानगडी असतात.


आम्ही दोघांनी सर्व खोकी भरून तयार केली. एकेक करत वरच्या मजल्यावरून एकेक खोकी उचलून विनायकने श्रीनिवासच्या कार मध्ये ठेवली व ते दोघे पोस्टात गेले. इलेक्ट्रीसिटी कंपनीला फोन करून ती अमूक दिवशी तोडून टाका. आता आम्ही इथे राहत नाही हे कळवावे लागते. टेलिफोन कंपनीलाही तसे कळवावे लागते. हे कळवले नाही तर आपल्या नावाची बिले त्या पत्यावर येत राहतात आणि फुकटचा भुर्दंड बसतो. निघण्याच्या आधी चार पाच दिवस तर हे करू की ते करू असे नुसते होऊन जाते. सामानाच्या आवरा आवरीत बराच कचरा साठलेला असतो तो टाकायला बऱ्याच चकरा होतात. शिवाय सामान जास्तीचे आणून चालत नाही. याउलट एकेक करून घरातले सामानच संपवण्याच्या मार्गावर न्यायचे असते. पूर्ण फ्रीज रिकामा करून जरुरीपुरत्याच भाज्या आणायला लागतात. फ्रीज रिकामा करून तो साफ करायला लागतो. बाथरूम, कमोड, सिंक हे साफ करायला लागते. व्हॅक्युमिंग तर अनेक वेळा करावे लागते. पासपोर्ट, जरूरीचे कागदपत्र आठवणीने एका बॅगेत भरावी लागतात. सगळीकडे पसाराच पसारा असतो. कपडे पण कपडे धुण्याच्या दुकानातून बरेच वेळा बरेच वेळा धुवून आणायला लागतात. कारण की आता लॉंड्री बॅगेत कपडे धुण्यासाठी साठवायचे नसतात. एक दिवस आधिचे कपडे तर तसेच पारोसे घ्यावे लागतात नाहीतर हातानेच धुवून, पिळून ते हँगरवर लटकावून वाळवावे लागतात. आपली अवस्था हमालाच्याही वरताण होऊन जाते. कामे करता करता पिंजरारलेले केस, स्वच्छता करता करता अंगावरच्या कपड्याला पुसलेले हात, त्या अवतारातच मैत्रिणींचे येणार फोन कॉल्स, असे सतत चालूच राहाते. पोटात कावळे कोकलत असतात पण तरीही त्याकडे जास्त लक्ष न देता पटापट कामे हातावेगळी करावी लागतात. स्वयंपाकघर तर स्वच्छ करून खूपच दमायला होते. तिथली सगळी कपाटे आवरून, त्यातले काही जे अगदी थोडे थोडे उरले असेल तर याचे काय करायचे? रागाने ते ही कचऱ्यात फेकून दिले जाते. इलेक्ट्रीक शेगड्या साफ करणे, कुठेही कोणताही कचरा, धूळ, घाण दिसत नाही ना हे बघावे लागते. हे सर्व करण्याचे कारण की आपण ज्या जागेकरता डिपॉझिट भरलेले असते ते जास्तीत जास्त परत मिळावे म्हणून. तरी सुद्धा थोडेफार पैसे कापूनच अपार्टमेंटवाले आपले पैसे आपल्याला परत करतात.


घराची होता होईल तितकी साफसफाई मी केली. विनायक लॅबमध्ये रात्रीपर्यंत काम करत होता. पॅकींग व साफसफाई करून जीव नुसता मेटाकुटीला आला होता. त्याहीपेक्षा सर्व मित्रमंडळींना सोडून जाणार याचे खूप दुःख होत होते. श्रीनिवास व रवी आम्हाला विमानतळावर त्यांच्या कारने सोडायला येणार होते. दोन बॅगा घेऊन मी श्रिनिवासच्या कारमध्ये बसणार होते तर विनायक दोन बॅगा घेऊन रवीच्या कारमध्ये बसणार होता. सकाळी उठून आवरले. त्या जागेतला शेवटचा चहा केला आणि उरलेले दूध प्रविणाला दिले. अजूनही काही नुकत्याच आणलेल्या भाज्याही दिल्या. प्रविणाने केलेली पोळी भाजी एका प्लस्टीकच्या डब्यात बांधून घेतली. पूर्ण सामानाची बांधाबांध झाली होती. एकेक करत सर्व बॅगा खाली उतरत होत्या. सर्वजण आम्हाला भेटायला खाली जमा झाले होते. मला आतून खूप गदगदत होते. घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन मी पूर्ण घराला डोळे भरून पाहत होते. प्रत्येक खोलीत जाऊन नमस्कार करून म्हणत होते "या घरातील आमचे वास्तव्य छान झाले. आता या घरात परत येणे नाही" काही राहिले तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि कुलूप लावून मी खाली आले. सर्वांना आम्ही टाटा करत होतो. कारमध्ये बसताना घराला शेवटचे पाहून घेतले. टाटा करताना काही वेळाने सर्व दिसेनासे झाले आणि आमच्या मित्रांच्या दोन कारने हायवे वरून धावायला सुरवात केली. डॅलस विमानतळावर रवी व श्रीनिवासने आम्हाला सोडले. त्यांनाही टाटा करून काही वेळाने विमानात बसलो.


खरे तर आम्ही डॅलस-ग्रीनविल असे विमानाचे थेट बुकींग केले होते. मी व श्रीनिवास चुकीच्या गेटवर उभे राहिलो होतो त्यामुळे आमचे विमान चुकले. त्यावेळी कोणाकडेही मोबाईल फोन नव्हते. नाहीतर एकमेकांना फोन करून कळवता आले असते. तिथल्या बाईने आम्हाला दुसऱ्या मार्गाने आयत्यावेळी दुसऱ्या विमानाचे बुकींग करून दिले म्हणून बरे झाले. सव्यापसव्य करत आम्हाला क्लेम्सनला पोहोचायला रात्रीचे १२ वाजले. सकाळी ८ ला निघालेलो आम्ही थकून भागून उशिराने दुसऱ्या शहरी पोहोचलो होतो. Copy Right - Rohini Gore
क्रमश : ...

4 comments:

Anonymous said...

किती ग सुंदर लिहितेस.. वाचताना थांबावंसंच वाटत नाही.

rohinivinayak said...

Thank you so much for your lovely comment !! :)

Anonymous said...

किती detailed मध्ये लिहिले आहे... वाचताना वाटतं की एक संपूर्ण चलचित्रपट डोळयासमोरून जातोय... तुम्हाला एखाद पुस्तक लिहायला हरकत नाही.. फारच छान

rohinivinayak said...

कमेंट खूपच आवडली ! हो माझ्या मनात २ पुस्तके स्वप्रकाशित करायची आहेत. एक सुंदर माझं घर आणि दुसरे सातासमुद्रापलीकडे. तुमच्या कमेंट मुळे लिहायचा उत्साह वाढला आहे ! अनेक धन्यवाद !!