Tuesday, April 23, 2024

२३ एप्रिल २०२४

 

गोष्ट एका अळूवडीची 🙂

अळू म्हणले की मला तरी लग्नातल्या पंगतीतली अळूची भाजी आठवते. वरण भात, त्यावर साजूक तूप, बटाट्याची भाजी, भजी, आणि अळूची भाजी. हे जे काही मिश्रण आहे ना ते खूपच भावतं बाई मला. 🙂 त्याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत रहाते. अळूवडी भारतात कधीही केली नाही मी. मला पालेभाज्या खूपच आवडतात. त्यात मुळा, पालक,आणि शेपू तर आहाहा ! असे मी रोजच्या जेवणात करायचे. पण अळूची भाजी अगदीच एखाद वेळेस केली असेल. अळूची वडी ! ना बाबा ना ! खूपच लांबलचक कृती आहे. मला अशा पाककृती नाही आवडत. तर झाले काय की शनि-रवि च्या ग्रोसरी डे मध्ये आम्हाला कधी नव्हे ते अळू दिसले इंडियन स्टोअर मध्ये. तसे तर ते काही वर्षांपूर्वीही दिसले होते आणि आणून खास मनोगत दिवाळी अंकाकरता अळूवडी केली लिहीली आणि सुपूर्तही केली होती. फोटोबिटो पण काढला.


एका गठ्यात १०-१२ पाने आली यावेळेस. शेपूच्याही २ जुड्या घेतल्या. आता इतकी अळूची पाने घेतल्यावर लगेच्यालगेच करणे आलेच ! 🙁 नाहीतर फ्रीजमध्येच वाळून गेली तर ना होईल अळूची वडी ना होईल भाजी. मला एक प्रश्न पडतो अळूची भाजी आणि फदफदं एकच ना ! 😃 की काही वेगळी कृती आहे? काही म्हणा पण अळूचं फदफदं हे नाव मला आवडले. फळभाजी म्हणजे कशी शिजवून, वाफून, परतून केलेली. फदफदं म्हणजे गिरगिट्ट असे काहीतरी ! तर मंडळी काल रात्रीच मी अळूची वडी करणार होते. त्याकरता चिंचही भिजत घातली. काय करू काय करू म्हणत २/४ वेळा अळूची पाने फ्रीजच्या बाहेर काढली आणि उद्या करायची का म्हणून परत फ्रीज मध्ये ढकलली. झोपताना पाण्यात भिजलेली चिंच ही फ्रीज मध्ये गेली. आज सकाळी उठल्या उठल्या सर्व आवरून झाल्यावर तयारीला लागले. पाने पाण्यात हलकेच घालून पेपर टॉवेलने त्यावरचे पाणी टिपून घेतले. चिंच गुळाचे पाणीही तयार केले. त्याची चव घेतली. आंबटगोड चव छान वाटली. ही पाने पण भली मोठी होती. अळूवडी करायला माझ्याच ब्लॉगवरची मीच लिहिलेली पाकृ वाचली. हरबरा डाळीच्या पिठात लाल तिखट, धनेजिरे पूड, थोडे तीळ, मीठ व चिंच गुळाचे पाणी घालून पीठ भिजवले. पानाला भिजवलेले पीठ फासण्या आधी चव बघा बर का ! नाहीतर ओम फस होइल. 😃 चव म्हणजे कशी तिखट, आंबट, गोड, आणि आळणी नको. नाहीतर त्या वड्यांना काही अर्थ नाही उरणार.


हे पीठ कसे हवे माहीत आहे? आपण हाताला मेंदी कशी फासून लावतो इतपत पाहिजे. घट्ट नको की सैलही नको. पानाला सर्व बाजूने लावता आली पाहिजे. एकावर एक पाने आणि प्रत्येकाला पीठ फासले. बरं इतकेच करून चालत नाही बर का ! ते दोन्ही बाजूने गुंडाळून परत पीठ फासावे लागले. नंतर चहू बाजूने गुंडाळी करून प्रत्येक गुंडाळीला पीठ हवेच हवे. एक मोठी गुंडाळी करून सुद्धा वर पीठ हवे. किती ते काम ! 😃 नंतर गुंडाळीचे दोन भाग करून ते कूकरच्या भांड्यात उकडत ठेवले. पोळी भाजी खाऊन जरा थोडी आडवी झाले. पण करमते का? लक्ष सगळे त्या अळूवडीत. कशी झाली असेल? बिघडते की काय ही उगीचच शंका. उठल्यावर कूकरचे झाकण काढून ती गुंडाळी गार करत ठेवली. पूर्ण गार होण्याची वाट पहात बसले रेडिओ वरची गाणी ऐकत. गार झाल्यावर लगेच त्याच्या वड्या पाडून तळल्या ! आज एकेकाचे फोटोही काढले. आंबटगोड वड्या मस्त झाल्या आहेत. अळूवडीत पूर्ण दिवस गेला. उरलेल्या चिंचगुळाच्या पाण्यात संध्याकाळी खायला भेळ केली. नंतर सोप्पा मेनु रात्रीच्या जेवणाचा केला आहे.


मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ आणि भात. आज रात्री आणि उद्या दुपारच्या जेवणाला हाच बेत. अळूवड्या, उसळ, भात दही. एकूणात आत्तापर्यंत मी दोन वेळाच अळुवड्या केल्या आहेत. आता फदफदंही होईलच. त्याची पाकृ लिहायची बाकी आहेच. तर मंडळींनो तुम्हाला चहासोबत किंवा जेवणा आधी असे काय खायला आवडते ज्याने भूक चाळवेल व मुख्य जेवणाचा जास्त चांगला आस्वाद घेता येईल? अळूवडी, कोथिंबीर वडी, ढोकळा, सुरळीची वडी, भजी की अजून काही? मत नोंदवायला विसरू नका हं. copy right - rohini gore
गोष्ट संपली. 😃

आजच्या दिवसाची रोजनिशीही झाली.
२३ एप्रिल २०२४






No comments: