Thursday, April 04, 2024

सुंदर माझं घर ..... (३)

डोंबिवलीच्या आमच्याच घरात नाखुशीनेच पाय ठेवला. पेइंग गेस्ट लोकांनी आमची जागा अजिबातच चांगली ठेवली नव्हती. खूप कचरा फेकला आणि फरशी व ओटा खसाखसा घासून जागा स्वच्छ केली. जागेत फक्त एकच कॉट होती पूर्वी एखाद वर्ष विनू या जागेत राहिला होता तेंव्हाची. ही कॉट दोघांना झोपायला पुरेशी नव्हती. त्यामुळे खाली गाद्या घालूनच झोपत होतो. स्वैपाकाची सर्व भांडीकुंडी, डबे, ताटे, कपबशा बसेल अशी एक मांडणी आम्ही बाजारातून आणली. ही मांडणी ६ फूटी होती. मला खूपच आवडली होती. या मांडणीत कपबशाळे, ताटाळे होते. शिवाय झारे कालथे, चमचे अडकवून ठेवता येत होते. पातेल्या, सर्व डबे, अगदी छान बसले या मांडणीत. ओट्यावर गॅस ठेवला आणि आमची दैनंदिनी सुरू झाली. नंतर लगेचच मला काविळ झाली. कडक पथ्य सुरू झाले. उकडून भाज्या आणि हलका आहार सुरू झाला. प्रचंड प्रमाणात अशक्तपणा आला होता. पाणी उकळून व नंतर गार करून पीत होतो. नंतर काही दिवसांनी विनुला मलेरिया झाला. त्यालाही खूपच अशक्तपणा आला होता. डोंबिवली ही डासांकरता खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळी आठवणीने सर्व दारे खिडक्या बंद करून घ्यायला लागायची. डासांकरता गुडनाईटच्या वड्या वापरायला सुरवात केली.


मी विनुला म्हणाले की मी तुझा प्रिसिनॉपसिस टाईप करून देते. त्याकरता पाध्ये टाईपराईंटींग संस्थेत आम्ही टाईपराईटर भाड्याने घेतला. त्यावर ८-१० पानी प्रिसिनॉपसिस टाईप केला. पाध्ये यांना सांगून ठेवले की मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या माहितीत कुठे व्हेकन्सी असली तर मला नक्की सांगा. आमच्या घराचा पत्ता लिहून दिला. त्यावेळी आमच्याकडे लॅंडलाईन फोन नव्हता. मोबाईलचा प्रश्नच येत नाही. विनायक त्याच्या गाईड कडे एका प्रोजेक्टवर काम करत होता त्यामुळे थोडेफार पैसे मिळत होते. त्याकरता तो आठवड्यातून २-३ वेळेला आयायटी मध्ये जात होता. आमच्या घरात विनायकने सतरंजीवर बसून त्याचा थिसीस लिहायला सुरवात केली. मी रोज देवपूजा करताना "देवा देवा मला नोकरी लागू दे" असा जप करत होते. देवाने माझे म्हणणे ऐकले. एके दिवशी दळण गिरणीत टाकले आणि एका दुकानात काहीतरी घेण्याकरता रत्यावरून जात होते. रस्त्यातच श्री पाध्ये मला भेटले आणि मला म्हणाले की बरे झाले तुम्ही भेटलात, मी तुमच्या घरीच यायला निघालो होतो. त्यांनी मला एव्हरी इंडिया लिमिटेडचे श्री देवधर ब्रांच मॅनेजरचे कार्ड दिले आणि सांगितले की डोंबिवली एम आय डी सी मध्ये ही कंपनी आहे तिथे एक व्हेकन्सी आहे. मला आनंद झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी माझा एक बायोडाटा तयार करून टाईप केला आणि कंपनीत गेले. श्री देवधरांनी माझा बायोडाटा वाचला आणि लगेचच म्हणाले की या उद्यापासून. तुम्हाला ४ वर्षाचा अनुभव आहे. पदवीधर आहात. आणि तुम्हाला बाकीची स्किल्स पण आहेत म्हणजे टायपिंग शॉर्ट हॅंड, पंचिग. शिवाय तुम्ही आधीच्या कंपनीत काय काम केलेत हे पण सर्व लिहिले आहेत. आता अजून मी काय विचारणार? त्यांनी माझ्यासाठी चहा बिस्किटे मागवली. घरी कोण कोण असते विचारले. नवरा काय करतो? विचारल्यावर मी सांगितले की पिएचडी पूर्ण झाली आहे फक्त थिसीस लिहायचा बाकी आहे. त्यांनी लगेच भिवया उंचावल्या आणि म्हणाले व्हेरि गुड !


त्यांनी मला कंपनीची थोडीफार माहिती सांगितली आणि हे पण सांगितले की ही नोकरी कायमस्वरूपी नाही. रोज ५० रूपयेप्रमाणे तुम्हाला पगार मिळेल. आमच्या बाकीच्या ब्रांच मध्ये पण अशा टेंपररी पोझिशन्स आहेत. मी म्हणाले मला मंजूर आहे. मी कामावर रूजू होते. Avery India Limited मध्ये नोकरी मिळाल्यावर आम्हाला दोघांना खूप दिलासा मिळाला. मी विनुला म्हणाले की तू आता कोणतीच काळजी करू नकोस. शांत चित्ताने थिसीस लिही. माझी नोकरी ऑक्टोबर १९९० पासून सुरू झाली. माझा पगार खूप तुटपुंजा होता. वाण्याचे सामान, कामवाली बाई आणि अर्धा लिटर दूध, कामावर जाण्यासाठी जाताना रिक्शाचा खर्च यामध्ये भाजी आणण्याकरता इतके कमी पैसे उरायचे की मी बाजारात न जाता कोपऱ्यावर मिळणाऱ्या भाजीवाल्याकडे जायचे आणि फक्त ५ रूपयाची पावशेर भाजी विकत घ्यायचे. अर्ध्या लिटर दुधामध्ये फक्त २ वेळा चहा आणि सकाळी आम्हाला पिण्यापुरतेच असायचे. दूध पण खूप पातळ असायचे. रात्री मुगडाळीची खिचडी किंवा वरण भात असायचा. सोबत कोशिंबीर, पापड काहीही नसायचे. एखाद वेळेस मी कोशिंबीर करायचे. आम्ही रोजच्या रोज पैसे मोजायचो आणि महिना संपायला अजून किती दिवस बाकी आहेत तेही पहायचो. त्यावेळेला सर्वांनाच कॅश पगार दिले जात होते. मी कामावर जाताना रिक्षेने जायचे कारण आमच्या जवळच्या बस थांब्यावर बस कधीच थांबायची नाही. खूप भरून यायची. सुरवातीला मी मुख्य बस थांब्यावर जाण्यासाठी मी चालत जायचे पण गर्दी असायचीच.
या नोकरीमध्ये अधुन मधुन ब्रेक मिळेल असेही सांगितले होते. त्याप्रमाणे ३१ डिसेंबर ला मला ब्रेक मिळाला. आम्ही परत चिंतेत पडलो. पण २ दिवसातच बोलावणे आले. नंतर काही महिन्यांनी श्री देवधर यांनी पूर्ण १५०० मिळतील असे सांगितले. म्हणजे बरे वाटत नसताना मी कामावर गेले नाही तरी मला ५० रूपये त्या दिवसाचे मिळणार होते. श्री देवधर यांनी माझ्यासाठी "हिची कायमस्वरूपी नोकरी व्हावी" अशी शिफारस मुंबई मधल्या जनरल मॅनेजर कडे केली होती. त्यादिवशी मी ऑफीसममध्ये कुरियरची वाट पहात होते कारण माझे Appointment letter (कायमस्वरूपी) नोकरीचे येणार होते. मला पगार पण चांगला मिळाला असता. शिवाय सर्व बॅंक होलीडेज होते. शनिवारी हाफ डे असायचा. चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी आणि ती सुद्धा गावातल्या गावात ! पण माझे नशिब इतके काही छान नव्हते. पत्र आले नाही. त्यामुळे मी खूप नाराज झाले. श्री देवधर म्हणाले मी काही करू शकत नाही. तुझी शिफारस करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. १५०० रूपयांची गावातल्या गावात असलेली नोकरी सोडवत नव्हती. पण नंतर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी 1993 साली नोकरीला बायबाय केले.
१९९१ डिसेंबर मध्ये विनायकला हिंदुस्तान लिव्हर - अंधेरी मध्ये (R & D ) सेक्शनला नोकरी लागली आणि आम्ही दोघेही कामावर जाऊ लागलो. विनायक कामावर जाताना डबा नेत नव्हता. मी माझ्यापुरती पोळी भाजी डब्यात घेऊन जायचे. आदल्या रात्री ड्रेस/साडी जी नेसायची असेल ती मी आधीच काढून इस्त्री करून ठेवायचे म्हणजे सकाळी घाई होत नसे. तसेच विनायकच्या शर्ट पॅंटला पण आदल्या दिवशीच इस्त्री करून ठेवायचे. जेव्हा मी एकटीच कामाला जायचे तेव्हा कामावरून आल्यावर विनु मला चहा करून द्यायचा. थिसीस लिहिताना अधुन मधुन ब्रेक घ्यायचा तेव्हा केरवारे करायचा. पूजा करायचा. धुणे-भांडी करायला इंदुबाई यायची. थिसीस लिहून पूर्ण झाल्यावर विनायकने तो एकाकडून इलेक्ट्रोनिक टाईपराईवर टाईप करुन घेतला. अर्थात पैसे देवूनच. त्यावेळेला लेझर प्रिंटिंग नवीनच होते. थिसीसमध्ये केमिस्ट्रीच्या आकृत्याही होत्या. ३३२ पानांचा जाडजूड थिसीस म्हणजे एक पुस्तकच ! मी उत्सुकतेने पाने उलटली पण मला ओ की ठो कळाले नाही. ऑरगेनिक केमिस्ट्रीची भाषा आणि आकृत्या! विनायकने थिसीस सुपूर्त केला. मी आयायटी मध्ये विनायकच्या पिएचडीच्या डिफेन्सला गेले होते. सर्वात मागे बसले होते. विनुचा थिसीस दोन ठिकाणी पाठवला होता. एक भारतामध्ये आणि एक अमेरिकेत. डिफेन्सला भारतातल्या आणि अमेरिकेतल्या परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची विनुने छान उत्तरे दिली. थोडक्यात तोंडी परिक्षा. डिफेन्स खूपच छान झाला पदवीदान समारंभाला विनायकला हजर रहाता आले नाही कारण नोकरी लागली होती.


पिएचडी झाल्यावर आम्ही आमच्या सोसायटीतल्या लोकांना पेढे दिले. एव्हरी इंडिया लिमिटेडचे ब्रांच मॅनेजर श्री देवधर यांना ठाण्यात त्यांच्या रहात्या घरी जाऊन पेढे दिले. आईनेही पेढे वाटले. आईबाबांनी विनुला टायटनचे घड्याळ व मला लाल रंगाची बडोदा सिल्कची साडी घेतली. हिंदुस्तान लिव्हर मध्ये interview ला गेल्यावर तिथल्या डॉक्टर नंबुदिरी यांनी विनायकला विचारले की आयायटी मधली सर्वजण अमेरिकेत जातात पोस्ट-डॉक्टरेट ( Post Doctorate ) करण्यासाठी. तुझा जर अमेरिकेत जायचा विचार असेल तर जॉइन होऊ नकोस. ते भलतेच खुश झाले होते विनायक वर !हिंदुस्तान लिव्हर मध्ये विनायकला चांगला पगार होताच पण इतर सुविधाही खूप छान होत्या. फक्त एकच होते येण्याजाण्याचा त्रास खूप होता. सकाळी १२ डब्याची लोकल त्याला ७.१२ ला पकडायला लागायची. डोंबिवली वरून घाटकोपरला उतरून अंधेरीत तिघे मिळून शेअर रिक्शाने जायचे. येताना मित्राबरोबर अंधेरी मुलुंड बसने व नंतर मुलुंड डोंबिवली ट्रेन ने. किंवा अंधेरी-दादर आणि दादर सेंट्रलला येऊन ट्रेनने डोंबिवली. येताना-जाताना खूपच गर्दी असायची. जेमतेम उभे रहायला मिळायचे. कामावरून येण्याची वेळ अनिश्चित होती त्यामुळे घरी यायला त्याला आठ ते साडे आठ होत असत. आल्या आल्या लगेच अंघोळ व चहा नाश्ता करायचा व थोड्यावेळाने जेवण.


शनिवारी अर्धा दिवस असल्याने ४ तासांकरता त्याचा पुर्ण दिवस वाया जायचा. आम्ही १० वर्षे डोंबिवली सोडून कुठेही बाहेर फिरायला पडलो नाही. विनुला जेमतेम एकच दिवस मिळायचा विश्रांतीसाठी. आमची करमणूक म्हणजे डोंबिवलीतल्या थिएटर वर सिनेमे पहाणे हिच होती. विनायकला नोकरी लागल्यावर पहिली खरेदी म्हणजे कपडे ठेवायला गोदरेजचे कपाट घेतले आणि व्होल्टाजचा फ्रीज घेतला. फ्रीज व गोदरेज कपाट कंपनीनेच दिले होते. (White goods) हॉलमध्ये कार्पेट घेतले आणि कोणी आले तर बसायला ४ खुर्च्या घेतल्या. दुधही वारणा/गोकुळ घेऊ लागले. घरीच दही, ताक, लोणी, तूप करू लागले. भाजी मार्केट मध्ये जाऊन भरपूर भाज्याही आणायचे. इंदुबाईला सर्व काम दिले होते म्हणजे धुणे-भांडी-केर-पोछा. नंतर काही दिवसांनी वॉशिंग मशीन घेतले. ते गुलाबी रंगाचे होते. १९९२ साली आम्ही दोघे गोव्याला ४ दिवसांच्या ट्रीपला गेलो. ही ट्रीप खूपच छान झाली.



एके वर्षी आम्ही कुलू मनालीला जायचे ठरवले. तिथे हिंदुस्तान लिव्हरचे guest house होते. महालक्ष्मी स्टेशनवरून दिल्लीला ट्रेन होती. मी जाण्यास इतकी उत्सुक नव्हते. माझे मन अस्वस्थ होते. काहीतरी वाईट घडणार असे सारखे वाटत होते. जे वाटत होते ते मी विनुला सांगितले नाही. शेजारच्या पारखी वहिनी मला म्हणाल्या अगं तू कुठे बाहेर फिरायला गेली नाहीस ना कधी म्हणून तुला असे वाटत असेल. बाहेर पडल्यावर तुला उत्साह येईल. मधे वाटेत खाण्यासाठी मी गोडाचा शिरा आणि तिखटामीठाच्या पुऱ्या करत होते. पारखीवहिनी मला मदत करत होत्या आणि सांगत होत्या की जा रोहिणी तू फिरायला मस्त एन्जॉय कर. दिल्लीला जाणारी ट्रेन रात्री १० ची होती. आम्ही आमच्या सामानासकट डोंबिवलीवरून महालक्ष्मी स्टेशनवर पोहचलो. आम्ही दोघांनी नुकतेच काही नवीन ड्रेस घेतले होते. एका आठवड्याची ट्रीप म्हणल्यावर ते सर्व नवीन ड्रेस बॅगेत भरले. एका पिशवीत खाण्यापिण्याचे सामान होते. वरच्या पर्स मध्ये १००० रूपये दिल्लीवरून पुढच्या प्रवासा साठी आणि खर्चाला ठेवले होते. ४००० रूपये बॅगेत ठेवले होते. महालक्ष्मीला दिल्लीला जाणारी ट्रेन लागली. गर्दी नव्हती. जरा विचित्रच वाटत होते. रेल्वेत आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. आम्हाला समोरासमोर खिडकीजवळच्या जागा मिळाल्या होत्या. आम्ही आमच्या दोन्ही बॅगा आमच्या वर असलेल्या फळीवर ठेवल्या. प्रवासी येत होते पण जास्ती नव्हते. हमाल येवून प्रवासांच्या जड जड बॅगा वर ठेवत होते. रेल्वे रूळावरून हळूहळू जाऊ लागली. काही मिनिटांनी आता थोडे खाऊन घेऊ म्हणून वर पाहिले तर आमची बॅग नाही. पोटात धस्सच झाले. रिझर्वेशन केलेल्या त्या डब्यात आम्ही दोघेही आमची बॅग कुठे कुणी चुकून उचलून दुसरीकडे ठेवली आहे का ते पाहू लागलो. एका प्रवाशाला पुढचे स्टेशन कोणते ते विचारले तर त्याने सांगितले बोरिवली. मनात विचार आला की ट्रेनची चेन ओढायची का? पण नको. आता काय करायचे? एकच पर्याय होता तो म्हणजे बोरिवली स्टेशन वर उतरणे. खाण्याची पिशवी घेतली. पर्स माझ्याजवळच होती. बोरिवली स्टेशनला उतरून स्लो लोकलने आम्ही व्हाया दादर डोंबिवलीस मधरात्री आमच्या घरी आलो. प्रचंड भूक लागली होती. प्रवासात खायला घेतलेले घरीच खाल्ले. खूप रडायला आले मला. सकाळी आमचे घर उघडे कसे? म्हणून वर रहाणारे सुषमा आणि नेर्लेकर आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला खूप धीर दिला. प्रत्येक बाईला सिक्थ सेन्स असतो. तो माझा खूपच तीव्र आहे. विनायक म्हणाला तुला अस्वस्थ वाटत होते तर मला का नाही सांगितलेस? परत असे कधी वाटले तर मला सांगत जा. त्या घटनेपासून असे काही वाटत असेल तर मी त्याला लगेचच सांगते.


नोकरी लागल्यावर परत आमचा घराचा हफ्ता दादांना पाठवायला सुरवात झाली. १९९५ साली शेवटचा ५०,००० एकरकमी हफ्ता देऊन घराचे एक लाख वीस हजार कर्ज व्याजासकट फेडले. आम्हाला खूप समाधान वाटत होते. ही रक्कम आता खूप थोडी वाटेल पण त्यावेळेला खूप होती. १९९६ साली आमच्या घरी ओनिडा रंगीत टेलिविजन आला व घरच्याघरी थोडी करमणूक व्हायला लागली. एक दिवस चुन्यामध्ये थोडा रंग घालून सर्व फ्लॅटला रंग लावून घेतला. जेव्हा विनू थिसीस लिहीत होता तेव्हा आमच्याकडे अर्चना शिकायला यायची. श्री वाजपेयी जे आमच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून रहात होते ते आमच्या संपर्कात होते. त्यांच्या मित्राच्या मुलीला ९ वी मध्ये थोडे कमी मार्क मिळाले म्हणून वाजपेयींनी विनुला विचारले होते की अर्चनाचा अभ्यास घ्याल का? त्याप्रमाणे ती यायला लागली. तिच्या ओळखीने अजून ५-६ जणी येवू लागल्या. रविवारी सर्व जणी सकाळच्या यायच्या. मी सर्वांना खायला पोहे-उपमे करायचे. चहाही देत होते. विनुने अर्चनाला १० वी ते बीएससी पर्यंत सर्व विषय शिकविले. ती आमच्या घरी रोज अभ्यासाला यायची. विनु कामावरून आला की नंतर अर्चनाचा अभ्यास घेत होता. शनिवार रविवारही यायची. मी रोज संध्याकाळी तिची वाट बघायचे. ती पण आल्यावर विचारायची आज काय केले काकू खायला? रविवारी मी तिला आमच्याबरोबरच जेवायला बस असे सांगायचे. आम्ही दोघे पण तिच्या घरी शनिवार-रविवार कडे रात्री जेवायला जायचो. काकू नक्की या हं जेवायला असे बजावून सांगायची. अर्चना आमच्या घरातलीच एक होऊन गेली. अर्चनाची बहिण अदिती पण शिकायला यायची. अर्थात नंतर ती कॉमर्सला गेली. ती फक्त ९वी १०वी मध्ये होती तेव्हा यायची. त्या दोघींना आम्ही १० वी १२ वी झाल्यावर ड्रेसला कापड गिफ्ट म्हणुन दिले होते. गणपतीत आम्ही दोघे त्यांच्याच घरी जेवायचो. गणपतीचे आग्रहाचे निमंत्रण असायचे. शिवाय मला अर्चनाची आई नवरात्रात सवाष्ण म्हणून बोलवायच्या. अर्चना व इतर मुलींना विनुने फुकट शिकविले. तो म्हणाला विद्या नेहमी दान करावी. मलाही तेच वाटत होते.
नोकरी सोडल्यावर मी जेव्हा घरी होते तेव्हा अधुन मधून आमच्या शेजारच्या पारखी वहिनींबरोबर मी सकाळी बाजारात भाजी घ्यायला जायचे. दोघी घरी आलो की चहाबरोबर खारी खायचो. त्यादिवशी आम्ही दोघी एकत्रच जेवायचो. जेवण आमच्या घरीच व्हायचे. त्यांना माझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी खूप आवडायची. मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर भाजलेला पोह्याचा पापड, खिचडीवर साजूक तूप आणि चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव. शिवाय एका ताटलीत भरपूर गोल पातळ कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर व मुळ्याचे कापही करून ठेवायचे. नंतर सायीचे दही व ताजे ताक. असा आमच्या दोघीचा बाजारहाट खूप मजा देऊन जायचा. लिंबू सरबत, लोणची, मुरांबे गुळांबे करायला मला उत्साह आला होता.दळणांमध्ये गव्हाच्या पीठाबरोबर, डाळीचे, तांदुळाचे पीठ, अंबोळीचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी आनंदाने करू लागले होते.


मी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केला पण माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे तो पूर्णत्वास नेला गेला नाही. नंतर मी सी-डॅकचा Advanced Diploma of Computer Programming चा कोर्स केला. १९९९ साली विनुला प्रमोशन मिळाले आणि आम्ही अंधेरी मधल्या कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये रहायला गेलो. Copy Right - (Rohini Gore)

No comments: