Tuesday, February 21, 2023

F 2 Saket - Dombivli (5)

आमच्या डोंबिवलीच्या फ्लॅट मध्ये आम्ही  जून १९९० ते मे १९९९ पर्यंत राहिलो. कंपनीने दिलेल्या अंधेरीमधल्या जागेत आमच्या आवडीचे सर्व फर्निचर घेतले. पडदे केले. सुरवातीला खूप छान वाटत होते. विनु घरी जेवायला येत होता. काचेच्या डायनिंग टेबलवर बसून दुपारचे जेवत होतो. रात्रीचे जेवण  टिव्ही बघत जेवायचो. त्यावेळी आभाळमाया ही मालिका पहायचो. दुपारी मी महाश्वेता मालिका बघायचे. उशिराने का होईना पण घर सजले होते. एखादा आवडीचा पंजाबी सूट किंवा एखादी आवडलेली साडी घेत होते. बेडशीट पण नव्या आवडीच्या आणल्या. सोफा सेट, टी पॉय, मोठा बेड, एक छोटे-मोठे कप्पे असलेले कपाट, ओव्हल आकाराचे काचेचे डायनिंग टेबल असे सर्व काही होते. सुमीतचा मिक्सर आणून इडली-डोसे करत होते. हा आनंद काही दिवसच टिकला.

विनुला कंपनीच्या तळोजा फॅक्टरीत पाठवण्यात आले. दिवसपाळी आणि रात्रपाळी सूरू झाली. कंपनीची कार आणि ड्राइव्हर असला तरी रोज जा-ये करण्यात विनुचे २-३ तास जाऊ लागले. आणि नंतर एकापाठोपाठ एक जे काही घडत गेले ते महाभयंकर होते.   हे महाभयंकर घडण्या आधी मी पण एका अग्निदिव्यातून गेले होते. सर्व सकंटातून बाहेर येतो न येतो तोच  आमचे अमेरिकेला जायचे निश्चित झाले. कामाचा मोठाच्या मोठा डोंगर उभा राहिला. आम्ही दोघे मानसिक आणि शारिरीक खूपच कोलमडून गेलो होतो. आमच्याकडे शुभांगी नावाची कामवाली होती. तिच्या मदतीने मी एकेक करत कामे हातावेगळी करत होते. आमच्या जागेत पूर्वी पेइंग-गेस्ट म्हणून  वाजपेयी आमच्या संपर्कात होते. त्यांनी फोन करून विचारले की काही मदत लागली तर सांगा. त्यांना सांगितले की सामान हालवण्यासाठी ट्र्क बोलवा. त्यांचा डोंबिवली एम.आय.डी.सी मध्ये खूप मोठा फ्लॅट होता. आमच्या जागेत नवीन घेतलेले फर्निचर आणि बाकीची स्वयंपाकाची भांडी ठेवली असती तर खूपच गिचमिड झाली असती. शिवाय फर्निचर न वापरता धूळ बसून खराबही झाले असते.

वाजपेयी म्हणाले की तुमचे सर्व सामान मी माझ्या घरी ठेवतो. त्या सामानाची मी नीट काळजी घेईन. अजून एक त्यांनी विचारले ते म्हणजे आमच्याकडे सोनी नावाची विद्दार्थिनी येत होती. तिने प्रेमविवाह केला होता आणि तिला रहायला जागा हवी होती. ती जागा तुम्ही तिला भाड्याने द्याल का? विचार करून त्यांना हो सांगितले. वाजपेयी यांना आम्ही आमचा अकाउंट नंबर दिला आणि येणारे सर्व भाड्याचे पैसे आमच्या खात्यात जमा करा हे सांगून  आमच्या लेटर बॉक्सची किल्ली दिली. येणारी सर्व कागदपत्रे एकेठिकाणी जमा करा आणि तुमच्याकडे ठेवलेल्या  सर्व सामानाचे काय करायचे ते आम्ही तुम्हाला फोन करून सांगू असेही सांगितले. त्यांच्याकडे सर्व फर्निचर, वॉशिंग मशीन, ओनिडा टिव्ही,  गाद्या गिरद्या, पांघरूणे, स्वयंपाकाची सर्व भांडीकुंडी ठेवली होती. एप्रिल १९९९ ते मे २००१ हा दोन वर्षाचा काळ खूपच वाईट गेला. आमचा संसार ४ बॅगांमध्ये भरला गेला आणि आम्ही अमेरिकेत आलो. २००४ साली पहिली भारतभेट झाली. वाजपेयींना कळवले होते की आम्ही येणार आहोत. त्यांना पुण्यातले आमचे घरही माहिती होते. कारण आम्ही त्यांना आमचे सर्वच्या सर्व सामान आमच्या सासरी नेवून द्या असे सांगितले होते. 

पुण्यामध्ये सासरचे सर्व  भाड्याच्या घरात रहात होती. ती जागा सोडून ते सिंहगड रोडवरच्या त्यांनी पूर्वी घेतलेल्या जागेत रहायला आले होते.  त्या आधी ती जागा सासऱ्यांनी एकांना त्यांच्या कंपनीतला माल ठेवण्यासाठी भाड्याने दिली होती. २ खोल्यांच्या ४ खोल्या झाल्या होत्या. वाढीव जागा बांधायला आम्ही पैसे दिले होते. ऐसपैसे मोठी जागा आणि पुढे अंगण होते. सासूबाई खुश झाल्या होत्या. जागा मोठी झाल्याने आमचे सर्व फर्निचर, वॉशिंग मशिन, टिव्ही, आणि स्वयंपाकाची सर्व भांडीकुंडी असे सर्व काही त्या जागेत छान बसून गेले. बाळकृष्ण (विनायकचा भाऊ) यांची आम्हाला मेलही आली होती की आम्हाला तुम्ही दिलेल्या  फर्निचरचा खूप चांगला उपयोग होत आहे. मेल वाचून खूप बरे वाटले होते.  वाजपेयींना फोन करून सुद्धा त्यांच्याकडून कोणताच रिस्पॉन्स आला नाही. मला ते चांगलेच खटकले. त्यांना सांगितले की आम्हाला डोंबिवलीला यायचे आहे तेव्हा आमच्यासाठी गाडी पाठवा. ४ वर्षे झाली आणि पैसे जमा केले की नाही काही कळायला मार्ग नव्हता.   दरम्यान त्यांनी दुसरा भाडेकरू ठेवला होता. तसे त्यांनी आम्हाला सांगितले होते आम्ही जेव्हा अमेरिकेतून फोन केला होता तेव्हा. अमुक डिपॉझिट घेतले, अमुक भाडे आहे. अमेरिकेत परत जायच्या आधी  आम्हाला रहायला जागाच नाही. आम्ही सर्व दिवस पुण्यातच राहिलो होतो. फक्त ४ दिवस आधी डोंबिवलीत आलो होतो. आम्ही नेर्लेकर यांच्याकडे राहिलो आणि तिथून परत अमेरिकेत आलो. नंतरची भारतभेट २००८ साली झाली. 

 

परत इथे आल्यावर आम्ही दोघे बेचैन झालो. वाजपेयी आम्हाला टाळत होते ते लक्षात आलेच होते.  वाजपेयी आम्हाला फोनवरून असेही म्हणाले होते की तुमची जागा भाड्याने दिली असली तरी तुम्ही इथे आल्यावर तुमची रहायची व्यवस्था मी करीन. फोनला उत्तर नाही. भाड्याचे पैसे खात्यात जमा केले आहेत त्याच्या स्लिपा दाखवल्या नाहीत. मी ठरवले की काहीही झाले तरी २००८ च्या भारतभेटीच्या आधी आपली जागा आपल्या ताब्यात घ्यायचीच घ्यायची.  वाजपेयीना फोन करून करून मी भंडावून सोडले होते. आम्हाला आमची जागा खाली करून द्या काहीही झाले तरी. म्हणाले की जे भाडेकरू आहेत त्यांना दुसरीकडे जागा मिळेपर्यंत राहू देत. डिपॉझिट परत करा असे म्हणत आहेत. मी विचारले फोनवर किती डिपॉझिट आहे? सांगितले की ३५००० ( वर्षाच्या भाड्याचे पैसे कुठे गेले? आणि ३५००० डिपॉझिट आहे ते आम्हाला कसे कळवले नाही) हे सर्व मनातल्या मनात. शेवटी विचार केला ३५,००० देवून जर आपली जागा परत मिळत असेल तर देऊ. त्यांना सांगितले की आम्हाला आमची जागा ताब्यात पाहिजे. आम्ही जेव्हा जेव्हा भारतात येऊ तेव्हा आम्ही आमच्या जागेत रहाणार आहोत. चेक आम्ही नेर्लेकर यांच्या पत्यावर पाठवला आणि वाजपेयींना सांगितले की  डिपॉझिटची रक्कम पाठवली आहे. जागा खाली करून किल्ली नेर्लेकर यांच्याकडे ठेवा. नेर्लेकरांनाही सांगितले की वाजपेयी तुमच्याकडे आमच्या जागेची किल्ली ठेवतील. 

२००८ च्या भारतभेटीच्या आधी आमच्या जागेतले भाडेकरू गेले होते. ८ वर्षात जमलेली कागदपत्रे द्यायला वाजपेयी आमच्या जागेत आले होते. मी चढ्या आवाजात त्यांना बोलले. तुम्ही एकही पैसा आमच्या खात्यात भरला नाही.  भाड्याचे पैसे तुम्ही वापरले असतील तर ते सांगा स्पष्टपणे. किंवा आम्हाला विचारले असते तर आम्ही तुम्हाला त्यातले काही पैसे दिले असते. तुम्ही आम्हाला फसवले आहे. तुमच्यावर विश्वास होता. म्हणाले माझे म्हणणे ऐकून घ्या. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी सर्वांना तुमच्याबद्द्ल सांगत असतो. तुम्ही माझी परिस्थिती समजून घेतली होती. मला नोकरी नसताना तुम्ही मला तुमच्या घरात राहू दिले होते.  मी म्हणाले मला आता काहीही ऐकून  घ्यायचे नाहीये. नंतरच्या भारतभेटीत आम्हाला काही जण विचारत होते की तुम्हाला तुमची जागा विकायची आहे का? भाड्याने द्यायची आहे का?   त्यांना स्पष्ट शब्दात "नाही" सांगितले. जागेचा रया गेली होती. भिंतीवरचा रंग विटला होता. हॉलच्या भिंतीवर ओल जमा झाली होती. घरात रहायला स्वच्छ वाटत नव्हते.

नंतरच्या भारतभेटीत पूर्ण जागा रिनोवेट केली. आधीचे पंखे, लाकडी कॉट इंदुबाईला दिली. बाथरूम मध्ये गिझर लावला. ग्रील लावली. ओट्याच्या खाली डबे ठेवायला कप्पे होतेच. त्याला दारे करून घेतली. किचनमधल्या माळ्याला पण दारे करून घेतली. चांगल्यापैकी रंग लावून घेतला. आम्ही जेव्हा रहात होतो तेव्हा यातले काहीही केले नव्हते. रंग पण साधा चुन्यात मिसळून लावला होता. पुढच्या भारतभेटीत रिनोवेट केलेली जागा इतकी आवडून गेली की मला खूप उत्साह आला आणि मी डोंबिवलीची जागा सेट करायचे ठरवले. जरूरीची सर्व भांडी कुंडी परत विकत घेतली आणि सर्वांना चहाला बोलावले. मामींकडून आमचा दुसरा सिलिंडर आणला. शैलाताईंनी त्यांच्याकडे एक जास्तीची गॅस शेगडी होती ती दिली. रात्रीच्या जेवणाला स्वयंपाकाच्या भांड्यांचे उद्घाटन केले. नेर्लेकर म्हणाले की जास्त घोळ घालू नका. फक्त थालिपीठे करा. मग त्यांच्याकडचीच थालिपीठाची भाजणी आणून थालिपीठे केली व आम्ही सगळे म्हणजे सुषमा, नेर्लेकर व आजोबा, पारखी वहिनी, आम्ही दोघे असे जेवायला बसलो. इंदुबाईना पण जेवायला बसवले. इंदुबाईने सर्व भांडी घासून पुसून आमच्या गोदरेजच्या कपाटात ठेवली. आमचा दुसरा सिलिंडर रेग्युलेटर मामींकडे होता त्यामुळे फक्त गॅसची शेगडी विकत घ्यायचे ठरवले आणि एकेक करत सर्व करायचे. म्हणजे तिकडे गेले की आमच्या जागेत राहून सर्व काही करता येईल. 

माझे व सुषमाचे बोलणे चालले होते. नेर्लेकर म्हणाले अहो, हे तुमचे काय चालले आहे. जागा वगैरे सेट करू नका. आधी तुम्ही खूप कमी दिवस येता. येता तेव्हा तुम्ही किती दिवस रहाता?  तुम्ही तर दुसऱ्या दिवशी पुण्याला पळता आणि गोरे मोजुन ४ दिवस राहून पुण्याला   जातात. गाद्या, कॉट आणि इतर सुद्धा कोणतेच सामान घेऊ नका.  तुम्ही याल तेव्हा आम्ही गाद्या-उशा-पांघरूणे देवू. वर्ष-दीड वर्ष तुमची जागा जरी बंद असली तरी  इथे भरपूर धूळ आहे. आणि तुम्ही इथे रहात नसताना उगाचच जागा साफ करून ठेवण्यात काहीही अर्थ नाही. जागेची साफसफाई करण्यास इंदुबाईला सांगणार. तिला तिच्या कामातून वेळ मिळत नाही. नेर्लेकर यांनी सांगितलेले आम्हाला पटले. मोजून ४-८ दिवस आम्ही डोंबिवलीत रहातो आणि पुण्याला जातो कारण पुण्यातच दोघांचेही आई वडील, बहिण-भाऊ आणि इतर नातेवाईक असतात. एक गोदरेजचे कपाट सोडले तर आमचा फ्लॅट रिकामा होता. आम्ही यायच्या आधी इंदुबाई आमचा फ्लॅट स्वच्छ करून ठेवायची. तिलाही ते सोपे जायचे. आणि  आम्ही निघायच्या आधीही स्वच्छ करायची. नंतर आमचा फ्लॅट आम्ही फक्त सोसायटीमधल्या कुणाच्या घरी लग्न कार्य/ किंवा काही इतर कार्य असेल तरच फक्त ४-८ दिवसांकरता देत होतो. नेर्लेकर यांच्याकडे दरवर्षी दत्तजयंती होत असे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही आमची जागा वापरा. दत्तजयंतीला त्यांच्याकडे प्रसादाला बरेच जण येत असत. त्यामुळे आमच्या घरात सर्वांना प्रसाद वाटप होत असे. मला खूपच चांगले वाटायचे की आपल्या घरात देवाचे काही ना काही होत आहे.

 

नंतरच्या काही भारतभेटीत  आम्ही डोंबिवलीत आधी यायचो. आमच्या घरात बाकीचे सर्व आवरून नेर्लेकर यांच्याकडे आमचे चहा पासून जेवणापर्यंत सगळे व्हायचे. पुण्याहून परत येताना २ दिवस आधी  येऊन तिथूनच विमानतळावर जायचो. आम्हाला खाली सोडायला सर्वजण येत आणि आम्ही टॅक्सीत बसल्यावर सर्वांना टाटा करून आमची टॅक्सी सूरू व्हायची. नेर्लेकर आजोबा आम्हाला खिडकीत उभे राहून टाटा करायचे. खाडीलकर काका आम्हाला उबर बूक करून द्यायचे. शिवाय ते आम्हाला जेवायलाही बोलवायचे. जेवणात मोदक, बटाटेवडे, बटाट्याचे पराठे, टोमॅटो सूप असायचे. शिवाय शैलाताई मला काही ना काही खूप छान असे  काही द्यायच्या. ते सर्वच्या सर्व मी अजूनही जपून ठेवले आहे आणि यापुढेही ठेवणार आहे.  जेव्हा विमानतळावरून घरी यायचो तेव्हा मध्यरात्री  सुषमा व नेर्लेकर उठायचे व आम्हाला  आलं टाकून चहा करून द्यायचे. एक कप चहा झाल्यावर परत १ कप चहा द्यायचे. तो प्यायल्यावर ताजेतवाने वाटायचे. खाली तुमच्या जागेत गाद्या, पांघरूणे घालून ठेवलेली आहेत. तेव्हा आता निवांतपणे झोपा आणि आरामात उठा असे सांगायचे. उठल्यावर सुषमा पोहे/उपमा असे काहीतरी खायला करायची. काही वेळा नेर्लेकर बाहेरून इडली सांबार घेऊन यायचे. मजेने म्हणायचे अहो तुम्हाला तिथे काही मिळत नसेल. इथली इडली खाऊन बघा तुम्ही. किती लुसलुशीत असते बघा ! आणि खरच होते ते. नॉर्थ कॅरोलायनात इंडियन उपाहारगृहे व स्टोअर खूपच लांब होते. पारखीवहिनी, नेर्लेकर कुटुंब व आम्ही दोघे सगळे एकत्र जेवायचो व मागच्या आठवणी काढून गप्पाही मारायचो.  आमच्या सोसायटीत रहाणाऱ्या निगुडकर मामी त्यावेळेस पोळी भाजीचे डबे करायच्या. तेव्हा एकदा आम्हां सर्वांच्या जेवणाचा मेनु मी त्यांना करायला सांगितला होता.  मामी, नेर्लेकर दोघे, पारखी वहिनी,आम्ही दोघे, आजोबा असे सर्व एकत्र जेवायला बसलो होतो. एकदा विनु  बॅंकेच्या कामासाठी ८ दिवस रहाणार होता. तेव्हा पण पोळी भाजी करून द्या असे सांगितले होते. तेव्हा नेर्लेकर म्हणाले अहो, असे काय करता तुम्ही? आम्हाला पण तुम्ही आलात की आनंद होतो. इंदुबाईलाही सांगितले की तू  आमच्या सर्वांच्या पोळी/भाकरी करत जा. जे काही पैसे असतील ते मी तुला देईन. सुषमा नेहमीच वेगवेगळे पदार्थ करत असते. चटण्या, लोणची, मुरंबे. त्यामुळे आमच्या जेवणात सर्व काही साग्रसंगीत असायचे. सर्वच मिळून जेवायचो. मी स्वयंपाकात सुषमाला मदत करायचे. ती तेव्हा नोकरी करत होती. जाताना मला सर्व डबे दाखवून द्यायची कशात काय ठेवले आहे सांगायची. 

आमच्या जागेतले सर्व पंखे, गिझर आणि गोदरेजचे कपाट आम्ही इंदुबाईला दिले आहे. आता काही दिवसात जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभी राहील. २००१ ते २०२२ पर्यंत काळाच्या ओघात सर्व काही बदलले आहे. पारखी काका-काकू आता या जगात नाहीत. श्री व सौ नेर्लेकर, श्री व सौ खाडीलकर आता पुणेकर झाले आहेत. नव्या इमारतीत आता आमचे सख्खे शेजारी नाहीत हे आम्हाला चांगलेच जाणवणार आहे.

आम्ही रहात असताना आमच्या डोंबिवलीच्या घरात आई-बाबा, रंजना-सई-सुरेश, सासूसासरे सर्व येऊन राहून गेले आहेत. नुसते डोंबिवलीत नाही तर आयायटी मधल्या २ जागेत, अंधेरीतल्या जागेतही राहून गेले आहेत.  काही नातेवाईक/काही मित्रमंडळी या जागेत आली होती.

 

नवीन होणाऱ्या जागेत आम्ही एक रूम जास्तीची घेतली आहे. नवीन जागा तयार व्हायला वेळ नक्कीच लागणार आहे पण आता ती जागा कशी सजवायची याचे मनसुबे मी रचत आहे. ते काय रचत आहे ते पुढील भागात !  

 

   क्रमश : ....

 


No comments: