Wednesday, February 08, 2023

भारतभेट २०२२

 १० डिसेंबर रोजी उबर बुक करून नेवार्क विमानतळावर पोहोचलो. यावेळी मास्क लावायचे बंधन नव्हते. २०२१ साली घरातून निघण्यापासून आईच्या घरी जास्तपर्यंत मास्क लावले होते. युनायटेड-स्वीस एअरलाईनने आम्ही झुरिच तर्फे मुंबईला पोहोचलो. जातानचा प्रवास छान झाला. ८-८ तासांची २ उड्डाणे होती. झुरिचला सेक्युरिटी नव्हती ते एक चांगले झाले. एका गेटवर उतरलो ते काही अंतरावरच्या दुसऱ्या गेट वर मुंबईला जाणाऱ्या गेटवर उभे राहिलो. मुंबई विमानतळावर पहाटे पोहोचलो. गर्दी खूप होती. भली मोठी रांग आणि तिथले कामकाज थंड गतीने चालू होते. खूपच वैतागायला झाले होते. बऱ्याच खिडक्यांपैकी खूपच थोड्या खिडक्या उघडल्या होत्या पासपोर्ट तपासून त्यावर शिक्के मारण्यासाठी. त्यात अजून एक खिडकी उघडली त्यामुळे माझ्याबरोबर इतरही काही प्रवासी तिथे जाऊन उभे राहिले. तिथे देखरेखीसाठी कुणीच नव्हते. सगळे मधे घुसत होते. त्यात इतर देशातली माणसे पण मधे घुसत होती. कंप्युटर स्लो होते का ते माहीत नाही. कारभार खूपच संथ गतीने चालला होता. सर्व सोपस्कार झाल्यावर बाहेर आलो आणि केके ट्रॅव्हलची माणसे दिसली. अजून दोघे येणार होती त्यांच्याकरता थांबावे लागले.

भूक, झोप आणि वेळेचे गणित बिघडलेले असतेच आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतो असे होऊन जाते. बाहेर पडल्यावर आम्ही फक्त चहा घेतला. खरे तर खायला हवे होते म्हणजे अशक्तपणा जाणवला नसता. २०२१ चे चित्र उलट होते. मुंबई विमानतळावर फक्त आमचेच विमान उतरले होते. विमानतळ पूर्ण रिकामा होता. सगळीकडे शुकशुकाट होता. फक्त बाहेर पडताना अडचण आली. केके ट्रॅव्हलच्या कारचा नंबर आणि ड्राईव्हरचा फोन नंबर आमच्याकडे नव्हता आणि आमचे फोन तिकडे चालत नाहीत. तिथल्या माणसांनी त्यांचे फोन दिले आणि आम्ही चुलत नंणदेला फोन करून सर्व विचारले आणि नंतर आम्ही बाहेर पडलो. तोपर्यंत सर्व प्रवासी बाहेर निघून गेले होते. पुण्याला जाताना मधल्या थांब्यावर इडली सांबार आणि चहा घेतला होता त्यामुळे ताकद आली होती. मऊशार इडली खाऊन मन कसे तृप्त झाले होते. कोरोना मुळे शेअरिंग नसल्याने आमच्या दोघांचीच टक्सी बुक केली होती.
 
यावेळी ६ किलो चॉकलेट (सर्व प्रकारची मिळून) नेली होती. सॅम्स क्लब मधून खरेदी केली आणि त्याची ५० पाकिटे घरी तयार करून नेली. शिवाय गिफ्टा आणण्यासाठीही मी इकडे तिकडे फिरत होते. भारतावरून आल्यावर कोणत्या गोष्टी घरात पाहिजेत हे तर नेहमीच बघितले जाते. डाळ-तांदूळ, चहा कॉफी आहे का? इतरही काही गोष्टी आणायच्या आहेत का ते पाहून आणले जाते म्हणजे तिकडून आल्या आल्या खरेदीसाठी बाहेर पडायला नको. आल्या आल्या घर स्वच्छ असले तर बाकीच्या गोष्टी करायलाही मदत होते. त्यामुळे घराची साफसफाई, पसारे आवरणे
असे सर्व करावेच लागते.
 
 
रंजना खूप सुंदर गाते म्हणून यावेळी तिला टी शर्ट गिफ्ट केला. त्यावर गायक-गायिका माईक धरून गात आहेत असे चित्र आहे. शिवाय इथे ख्रिसमस साठी वेगवेगळ्या रंगाचे आणि त्यावर ख्रिसमस ट्री आणि असेच काही लिहिलेले टी शर्ट असतात. त्यापैकी पण एक गिफ्ट केला. तसे तर पुण्यात थंडी असते त्यामुळे दर वर्षी मी आई, रंजना व सईला स्वेटर, जाकीट, टोप्या, असेच काही ना काही देते. हे मी सर्व माझ्या आनंदासाठी करते. मी रंजनाला पूर्वी एक डिझाईनर साडी दिली होती. प्रत्यक्षात तिने नेसलेली पाहून खूप बरे वाटले. कराओकेच्या कार्यक्रमाच्या दिवशी ही साडी नेसून  रेकॉर्डिंग दाखवायला आईकडे आली होती. 
 
 
यावर्षी मी प्रकाशित केलेली २ पुस्तके वाटपाचे काम होते. प्रत्येकी ७५ पुस्तके आईकडे येऊन पडली होती. त्याचे वाटप आईने सुरू केले होते. उरलेले मी आल्यावर ग्रुपने केले. बाकीची प्रत्येकी २५ मी येताना घेऊन आले. ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या सर्व झाल्या. काही मैत्रिणी पुण्यात शिफ्ट झाल्या होत्या व काही लहानपणच्या मैत्रिणींना भेटण्याचा योग आला. गोखले नगर व सविताचे कॅफे तिथेच असल्याने आईला घेऊन गेले होते. आमच्या जुन्या घरी पण गेलो. जाईचा वेल नव्हता. आमच्या घराचे चित्र पारच बदलून गेलेले  पाहून थोडा त्रास झाला पण तरीही माझी आणि आईची गोखले नगरला जायची इच्छा पूर्ण झाली. बाकी काही मित्र/मैत्रिणींना भेटलो. वास्तू/केल्याने देशाटन पुस्तकाबद्दल काही जणांनी/जणींनी भरभरून प्रतिसाद दिला.
 
 
आईच्या काही मैत्रिणींनी मला व आईला पुरणाच्या पोळ्या, इडली सांबार आणि चकोल्या दिल्या. मला आईच्या घराच्या जवळची दुकाने माहिती झाली आहेत. तिथून मी रोज काही ना काही आणत होते. आईचे घर आवरले. अर्थात मी काही खूप मोठा तीर मारलेला नाही. करायलाच हवे. टेबलावर प्रचंड धूळ होती. ती साफ केली. बाबांच्या फोटो फ्रेमवर धूळ होती. फोटो फ्रेम खाली असलेल्या विणलेल्या कापडावर धूळ होती. निरानिपटी पलंगा खालून, डायनिंग खालून केर काढला आणि मावशींनाही सांगितले सर्व बाजूने नीट केर काढत जा. व्हिम बार आणला आणि सांगितले की याला फेस चांगला येतो याने भांडी घासा म्हणजे स्वच्छ निघतील. गाळणे आणले, काळीकुट्ट झालेली फडकी सगळी फेकून दिली आणि माझा जुना गाऊन फाडून ही फडकी वापरा असे मावशींना सांगितले. बाथरूम बाहेर जाड पायपुसणे ठेवण्यापेक्षा मी एका बेडशीटचे ४ तुकडे केले आणि त्यांना सांगितले की हे ठेवत जा. लगच्यालगेच धूता येतील. टेबला लगतचे ड्रॉवर आणि त्याखालचे कप्पे आवरले. खूप फेकाफेकी केली. फेकाफेकी म्हणजे आपल्याही घरात उगाच काही ना काही साठत जाते तेच आवरले. टेबलावरच्या आईच्या गोळ्या, औषधाच्या बाटल्या, की ज्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली आहे तेही सर्व फेकले. मला धुळीची अलर्जी असल्याने मास्क लावूनच सर्व करत होते.
 
कपाटातली सर्व पुस्तके नीट लावून ठेवली. दुसऱ्या टेबलावर असलेले वर्तमानपत्र बदलले. घरात ज्या ज्या ठिकाणी धूळ दिसेल ती ती ओल्या फडक्याने साफ केली. माझ्या लग्नातल्या अल्बम मधले फोटो मी आधीच नेले होते. ते सर्व रिकामे अल्बम फेकून दिले. मी इथून जे फोटो पाठवले होते पूर्वी की जे साध्या कॅमेराने काढून त्याची दुसरी प्रत आईकडे पाठवली होती. ते फोटोसकट अल्बम पण फेकून देणार होते पण दिले नाहीत. अजून एक टेबल व त्याखालचे कप्पे, ड्रॉवर  आवरायचे होते. त्यातल्या बऱ्याच गोष्टी फेकायच्या होत्या. पण आई म्हणाली की मी ते नंतर आवरीन. आता बास झाले तुझे आवरणे.
 
मावशी करतात म्हणून त्यांच्यावर सगळा भार टाकला नाही. कपडे वाळत घालणे, त्या उशिराने येतात त्यामुळे कधी कधी मी सगळा स्वयंपाक करायचे.  भाजी/ काकडी, टोमॅटो, गाजर हे कोशिंबीरीसाठी चिरून द्यायचे. दुपारचे काहि उरले  असेल तर रात्री वेगळे काही करू नका हे पण सांगायचे. त्या काही पदार्थ चांगले करतात. टोमॅटोचे सूप, पिठलं भाकरी, पुऱ्या छान करतात. चकोल्या केल्या होत्या. आईने त्यांना बरेच पदार्थ शिकवले म्हणजे आमच्या पद्धतीने कसे करायचे तसे. त्या म्हणतात की  आजीने मला बरेच पदार्थ शिकवले. बरेच वेळा रात्रीचे जास्तीचे काही करायचे नसायचे.  सकाळी त्या आईकडे येऊन चहा करतात. कण्हेरी करतात. त्यामुळे मला सकाळचा आराम मिळाला. मी आईकडे मऊ भात खायला हवा होता. कण्हेरीने माझे पोट भरत नव्हते. विनायकला कण्हेरी आवडली. विनु जेव्हा डोंबिवलीला व त्याच्या मित्राकडे रहायला गेला होता तेव्हा मी आईला मनसोक्त साबुदाणे वडे खायला करून घातले. चकोल्या पण केल्या मावशींनी. आईला सकाळी गरम गरम पोहे, उपमे करून घातले. चांगल्या प्रतीचा वडा पाव खायला आणला बाहेरून दोन-तीन वेळेला आणि असे बरेच काही.  विनुने पण एक दोन वेळा दुकानातून खायचे पदार्थ आणले. अंजीर, चिकु, पेरू आणल्याने तेही खाता आले. अमेरिकेत ही फळे मिळत नाहीत. इंडियन स्टोअर मध्ये फ्रोजन मिळतात पण ताजी मिळत नाहीत. एकदा विनुने कुल्फी आणली होती. आई जाम खूश झाली. आईबरोबर आम्ही दोघे पण दुपारचे संह्याद्री चॅनल बघायचो. त्यात जुनी हिंदी मराठी गाणी असतात. बातम्या असतात. आणि अजून एक कार्यक्रम असतो. रात्री आम्ही तिघे मिळून स्टार प्रवाह वरच्या आम्ही रोज बघत असतो त्या मालिका बघायचो.  आई तिच्या नेहमीच्या मालिका बघायची. त्यामुळे आमच्या तिघांचा रात्रीचा कार्यक्रम मालिका बघणे असायचा.
 
 

मला असे उगाचच वाटले होते की १८ डिसेंबर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आवडीची छोट्यातली छोटी गोष्ट घडेल. आई म्हणत होती की तुझ्या आवडीचे बासुंदी किंवा दुधी हलवा असे आण काहीतरी. तिला म्हणले नको. मी काही आता लहान राहिलेली नाही. तू आम्हा दोघींना भरभरून खूप काही दिले आहेस. बरेच वर्षानंतर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आईसोबत होते हेच माझ्यासाठी खूप होते. जेव्हा रात्री झोपायचे तेव्हा मागच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. भारतभेटी मध्ये मी, आई बाबा एक चक्कर मारायचो ते म्हणजे शनिपाराच्या समोर रस प्यायचो. ग्रीन बेकरी-चितळे, थोडीफार भाजी घेऊन परत यायचो. आईबरोबर तुळशीबागेतली चक्कर वेगळी असायची. बाबांबरोबर मी भाजी आणायला जायचे तर कधी बॅंकेतून पैसे आणायला. बाबा मला कविता म्हणून दाखवायचे. त्यांना बऱ्याच कविता तोंडपाठ होत्या. त्यांनी लिहिलेले वाचून दाखवायचे.  आई बाबांच्या रूटीन मध्ये मी असायचे. झाडांना पाणी घालणे. आलं घालून चहा तिघे मिळून प्यायचो. डायनिंगवर तिघे मिळून जेवायला बसायचो.
आई जे जे काही करायची त्याचे फोटो काढायचे. फुलझाडांवर उमललेल्या कळ्या, फुले यांचे फोटोज तर असायचेच.
 
 
 आई बाबांचे रूटीन तर इतके काही छान बसले होते. बाबा शाखेत जायचे. त्यांचे मित्र मिळून एकमेकांचे वाढदिवस साजरे करायचे. आई व तिच्या मैत्रिणी रोज सोसायटीच्या आवारात मोठी चक्कर मारायच्या. बाकड्यावर बसून गप्पा मारायच्या. ( आईला आता खाली एकटीला जाता येत नाही) पण काही वेळा कोणाच्या मदतीने जाते. नवरात्रात ९ रंगाच्या साड्या नेसून खिरापती वाटायच्या. आई गजानन महाराजांचे पारायण करायची व त्याचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटायची. बरेच वाचनही सर्वजणी मिळून.करायच्या.  सरिता वैभव मधले वातावरण खरच खूप छान आहे. एकमेकांची विचारपूस करणे, एकमेकांकडे जाणे -येणे, गप्पा मारणे, हवं नको ते विचारणे.
 
 
आईबाबांचे घर पहिल्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट पण आहे. शिवाय बाल्कनीत उभे राहिले की जाणारी-येणारी माणसे दिसतात. रंजना आईच्या घराच्या जवळच्याच सोसायटीत रहाते म्हणून तिलाही त्यांच्याकडे लक्ष ठेवायला सोपे जाते. अर्थात म्हणूनच आईबाबांनी गोखले नगरची जागा विकून रंजनाच्या जवळच्या सोसायटीत घर घेतले. बाबा ९० वर्षांचे होऊन गेले. परिपूर्ण आयुष्य जगले पण तरीही बाबा आता घरात दिसत नाहीत हे इतके काही जाणवत होते की ते शब्दात सांगता येणार नाही. आईने तिचे दैनंदिन रूटीन आखून घेतले आहे. मावशी सर्व काही करतात. आईकरता रंजना कडून २ वेळेचा डबा घेऊन येतात. सकाळी चहा व नाश्ता करायला. त्यामुळे मावशी ३ वेळा येतात. भिसे बाई आईला अंघोळ घालायला आणि हात पाय चेपायला गेली ८ वर्षे येतात. आईची हाडे खूप दुखतात त्यामुळे मालिश हेच औषध आहे. रात्री झोपायला आईची मैत्रिण येते. 
 
सरकारी नोकरी असल्याने बाबांना पेंशन होतेच ते आता आईला फॅमिली पेंशन मिळते. शिवाय आईने त्यांच्या म्हातारपणाकरता पण पैशाची सोय करून ठेवली आहे. कोणालाही आपल्या मुलांवर अवलंबून रहायला आवडत नाही. हे समाधान खूप असते.  खूप मोठी संकटे आली आईबाबांच्या आयुष्यात आयुष्यात पण त्यावर मात करून आमच्या दोघींची शिक्षणं केली आणि थाटामाटात लग्नं लावून दिली. आमच्या घरी आमचीच नाही तर सर्व  भाचवंडांची ( बाबांची/आजोबांची/आईची) आल्यागेल्याची, मित्रमंडळींची, शेजाऱ्यापाजाऱ्यांची खाण्यापिण्याची रेलचेल होती. माझी आई अन्नपूर्णा आहे. माझे बाबा  गोष्टी सांगत असत त्यामुळे लहान मुले व मोठी माणसेही खुश असत. 
 
रंजना-सुरेशने बाबांचे खूप प्रेमाने सर्वकाही केले. जेव्हा वय होते तेव्हा कोणालाही होत नाही. आधाराची गरज असते. सर्व कागदपत्रे, मौल्यवान वस्तू सांभाळाव्या लागतात. शिवाय घरात काय हवे काय नको हे पण पहायला लागते. तब्येतीच्या तक्रारी आणि बरेच काही ! रंजना-सुरेशचा भक्कम आधार आईबाबांना आहे. (आता आईला आहे) नशिबाने आईबाबांना बिपी, डायबेटीस, कोलेस्टोरोल नाही आणि अनुवंशिकतेमुळे आम्हा दोघी बहिणींनाही अजूनपर्यंत काही नाही. याबाबतीत आम्ही सर्व नशिबवान आहोत. Rohini Gore 
 


No comments: