Tuesday, February 14, 2023

F 2 Saket - Dombivli (1)

आमच्या डोंबिवलीच्या "साकेत" इमारतीची पुर्नबांधणी होणार आणि लवकरच ती जुनी इमारत पाडली जाणार हे जेव्हा कळाले तेव्हा आम्ही रहात असलेल्या फ्लॅट मधल्या आठवणी माझ्या मनात उचंबळून आल्या ! आम्ही त्या जागेत १९९० ते १९९९ पर्यंत राहिलो. तशी तर ही जागा १९८३ साली घेतली होती आणि विनायकने त्याचे हफ्ते त्याच्या वडिलांना फेडायलाही सुरवात केली होती. मुलुंड मध्ये हेक्स्ट कंपनीमध्ये विनुला नोकरी लागली आणि जा-ये करायला डोंबिवलीतून सोपे पडेल म्हणून साकेत मध्ये फ़्लॅट घेतला. दीड वर्षाने विनुने नोकरी सोडली आणि आयाटीमध्ये पिएचडी ला ऍडमिशन घेतली. वडिलांना सांगितले की घाबरू नका मी तुमचे हफ्ते फेडीन.
 
 
त्यावेळी डोंबिवलीत मातीचे रस्ते होते. पावसाळ्यात तर मातीचा चिखल व्हायचा. पेइंग गेस्ट शोधण्यासाठी विनु डोंबिवलीत इकडे तिकडे फिरला आणि त्याला ३ -४ पेइंग गेस्ट मिळाले. त्यांच्याकडून आलेले भाडे आणि शिष्यवृत्तीतले काही पैसे मिळून त्याने हफ्ते भरायला सुरवात केली. आमचे लग्न १९८८ मध्ये झाले आणि आयायटीमध्ये वसतिगृहात आमचा संसार सुरू झाला. त्यावेळेला शिष्यवृत्ती १२०० होती. सुरवातीला ६००, मग ९०० आणि नंतर १२०० व २१०० पर्यंत होत गेली. आमच्या लग्नानंतर ६ महिन्यांनी २१०० शिष्यवृत्ती झाल्यावर त्यातूनच सासऱ्यांना ९०० रूपये हफ्ता द्यायला सुरवात केली. कारण दोघे-तिघे आमची जागा सोडून गेले. वाजपेयी फक्त राहिले होते आणि त्यांनी आमचे भाडे तुंबविले होते. त्यांनी आम्हाला सांगितले की माझीही सध्या परिस्थिती नाहीये. मी नंतर तुम्हाला तुमचे सर्व भाडे देईन आणि त्याप्रमाणे त्यांनी दिले. दादा महाराष्ट्र बॅंकेत असल्याने त्यांना ४ टक्के व्याजाने कर्ज मिळाले होते. दादांचा हफ्ता बॅंकेत जायचा आणी त्याच वेळेला विनायकचा हफ्ता दादांना जायचा.
 
 
१९९० साली विनायकचे पिएचडी चे काम संपले होते. फक्त थिसिस लिहायचा राहिला होता. शिष्यवृत्ती संपल्याने आम्हाला आयायटी सोडायला लागली आणि आम्ही डोंबिवलीच्या जागेत रहायला आलो. आमच्या जागेत रहाणाऱ्या लोकांनी जागा अजिबातच चांगली ठेवली नव्हती. आम्ही येण्याच्या आधी एका शनिवार -रविवार येऊन आम्ही आमची जागा दोघांनी मिळून स्वच्छ केली. खूप कचरा बाहेर फेकला. फरशी धुतली. आमचे सामान खूप कमी होते. भांड्याकुंड्यांचे एक पोते, माझी व विनायकची सूटकेस. एक ट्रान्झिस्टर आणि दोन गाद्या-पांघऱूणे व उशा. २१०० शिष्यवृत्ती झाल्यावर मी २ गाद्या करून घेतल्या होत्या. त्या आधी एकच गादी होती. विनु म्हणाला की मला सतरंजीवर झोपायची सवय आहे. तू गादीवर झोपत जा. २-३ पांघरूणे एकावर एक टाकून साधारण गादीच्या लेव्हलला यायचे व त्यावर बेडशीट टाकून विनु झोपायचा. 
 
 
डोंबिवलीचे घर पूर्णपणे रिकामे होते. एका लाकडी कॉटच्या व्यतिरिक्त आमच्या फ्लॅट मध्ये काहीही नव्हते. लाकडी कॉट एकट्याला झोपायलाच पुरेशी होती म्हणून आम्ही खाली गाद्या घालूनच झोपायचो. अत्यंत जरूरीची एक ६ फूटी मांडणी विकत घेतली. त्यात सर्व काही छान बसत होते. चहा साखरेचे डबे, मोठे, छोटे डबे व पातेली एका कप्यात बसली. त्या मांडणीतच एक छोटे ताटाळे आणि कपबश्याळे पण होते. ही मांडणी मला खूपच आवडली होती. गॅस सिलिंडर व शेगड्या होत्याच आमच्याकडे आयाटी मध्ये घेतलेल्या. जून १९९० साली आम्ही आमच्या घरात रहायला सुरवात केली. मी विनुला म्हणाले की मी तुझा प्रिसिनॉपसिस टाईप करून देते. त्याकरता पाध्ये टाईपराईंटींग संस्थेत आम्ही टाईपराईटर भाड्याने घेतला. त्यावर ८-१० पानी प्रिसिनॉपसिस टाईप केला. पाध्ये यांना सांगून ठेवले की मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या माहितीत कुठे व्हेकन्सी असली तर मला नक्की सांगा. आमच्या घराचा पत्ता लिहून दिला. त्यावेळी आमच्याकडे लॅंडलाईन फोन नव्हता. मोबाईलचा प्रश्नच येत नाही.
 
 
विनायक त्याच्या गाईड कडे एका प्रोजेक्टवर काम करत होता त्यामुळे थोडेफार पैसे मिळत होते. त्याकरता तो आठवड्यातून २-३ वेळेला आयायटी मध्ये जात होता. आमच्या घरात विनायकने सतरंजीवर बसून त्याचा थिसीस लिहायला सुरवात केली. मी रोज देवपूजा करताना "देवा देवा मला नोकरी लागू दे" असा जप करत होते. देवाने माझे म्हणणे ऐकले. एके दिवशी दळण गिरणीत टाकले आणि एका दुकानात काहीतरी घेण्याकरता रत्यावरून जात होते. रस्त्यातच श्री पाध्ये मला भेटले आणि मला म्हणाले की बरे झाले तुम्ही भेटलात, मी तुमच्या घरीच यायला निघालो होतो. त्यांनी मला एव्हरी इंडिया लिमिटेडचे श्री देवधर ब्रांच मॅनेजरचे कार्ड दिले आणि सांगितले की डोंबिवली एम आय डी सी मध्ये ही कंपनी आहे तिथे एक व्हेकन्सी आहे. मला आनंद झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी माझा एक बायोडाटा तयार केला. टाईप केला आणि कंपनीत गेले. श्री देवधरांनी माझा बायोडाटा वाचला आणि लगेचच म्हणाले की या उद्यापासून. तुम्हाला ४ वर्षाचा अनुभव आहे. पदवीधर आहात. आणि तुम्हाला बाकीची स्किल्स पण आहेत म्हणजे टायपिंग शॉर्ट हॅंड, पंचिग. शिवाय तुम्ही आधीच्या कंपनीत काय काम केलेत हे पण सर्व लिहिले आहेत. आता अजून मी काय विचारणार? त्यांनी माझ्यासाठी चहा बिस्किटे मागवली. घरी कोण कोण असते विचारले. नवरा काय करतो? विचारल्यावर मी सांगितले की पिएचडी पूर्ण झाली आहे फक्त थिसीस लिहायचा बाकी आहे. त्यांनी लगेच भिवया उंचावल्या आणि म्हणाले व्हेरि गुड !
 
 
त्यांनी मला कंपानीची थोडीफार माहिती सांगितली आणि हे पण सांगितले की ही नोकरी कायमस्वरूपी नाही. रोज ५० रूपयेप्रमाणे तुम्हाला पगार मिळेल. आमच्या बाकीच्या ब्रांच मध्ये पण अशा टेंपररी पोझिशन्स आहेत. मी म्हणाले मला मंजूर आहे. मी कामावर रूजू होते. एव्हरी मध्ये नोकरी मिळाल्यावर आम्हाला दोघांना खूप दिलासा मिळाला. मी विनुला म्हणाले की तू आता कोणतीच काळजी करू नकोस. शांत चित्ताने थिसीस लिही. माझी नोकरी ऑक्टोबर १९९० पासून सुरू झाली. माझा पगार खूप तुटपुंजा होता. वाण्याचे सामान, कामवाली बाई आणि अर्धा लिटर दूध यामध्ये भाजी आणण्याकरता इतके कमी पैसे उरायचे की मी बाजारात न जाता कोपऱ्यावर मिळणाऱ्या भाजीवाल्याकडे जायचे आणि फक्त ५ रूपयाची पावशेर भाजी विकत घ्यायचे. अर्ध्या लिटर दुधामध्ये फक्त २ वेळा चहा आणि सकाळी आम्हाला पिण्यापुरतेच असायचे. दूध पण खूप पातळ असायचे. रात्री मुगडाळीची खिचडी किंवा वरण भात असायचा. सोबत कोशिंबीर, पापड काहीही नसायचे. एखाद वेळेस मी कोशिंबीर करायचे. आम्ही रोजच्या रोज पैसे मोजायचो आणि महिना संपायला अजून किती दिवस बाकी आहेत तेही पहायचो. त्यावेळेला सर्वांनाच कॅश पगार दिले जात होते.
 
 
या नोकरीमध्ये अधुन मधुन ब्रेक मिळेल असेही सांगितले होते. त्याप्रमाणे ३१ डिसेंबर ला मला ब्रेक मिळाला. आम्ही परत चिंतेत पडलो. पण २ दिवसातच बोलावणे आले. नंतर काही महिन्यांनी श्री देवधर यांनी पूर्ण १५०० मिळतील असे सांगितले. म्हणजे बरे वाटत नसताना मी कामावर गेले नाही तरी मला ५० रूपये त्या दिवसाचे मिळणार होते. श्री देवधर यांनी माझ्यासाठी "हिची कायमस्वरूपी नोकरी व्हावी" अशी शिफारस मुंबई मधल्या जनरल मॅनेजर कडे केली होती. त्यादिवशी मी ऑफीसममध्ये कुरियरची वाट पहात होते कारण माझे Appointment letter (कायमस्वरूपी) नोकरीचे येणार होते. मला पगार पण चांगला मिळाला असता. शिवाय सर्व बॅंक होलीडेज होते. शनिवारी हाफ डे असायचा. चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी आणि ती सुद्धा गावातल्या गावात ! पण माझे नशिब इतके काही छान नव्हते. पत्र आले नाही. त्यामुळे मी खूप नाराज झाले. श्री देवधर म्हणाले मी काही करू शकत नाही. तुझी शिफारस करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. १५०० रूपयांची गावातल्या गावात असलेली नोकरी सोडवत नव्हती. पण नंतर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी 1993 साली नोकरीला बायबाय केले. १९९१ डिसेंबर मध्ये विनायकला नोकरी लागली आणि आम्ही दोघेही कामावर जाऊ लागलो. विनायक कामावर जाताना डबा नेत नव्हता. मी माझ्यापुरती पोळी भाजी डब्यात घेऊन जायचे. आदल्या रात्री ड्रेस/साडी जी नेसायची असेल ती मी आधीच काढून इस्त्री करून ठेवायचे म्हणजे सकाळी घाई होत नसे. तसेच विनायकच्या शर्ट पॅंटला पण आदल्या दिवशीच इस्त्री करून ठेवायचे. जेव्हा मी एकटीच कामाला जायचे तेव्हा कामावरून आल्यावर विनु मला चहा करून द्यायचा. थिसीस लिहिताना अधुन मधुन ब्रेक घ्यायचा तेव्हा केरवारे करायचा. पूजा करायचा. भांडी घासायला कामवाली बाई होती.
थिसीस लिहून पूर्ण झाल्यावर विनायकने तो एकाकडून टाईप करुन घेतला. त्यावेळेला लेझर प्रिंटिंग नवीनच होते. इलेक्ट्रोनिक टाईपराईटर वर थिसीस टाईप केला. करून घेतला. शिवाय केमिस्ट्रीच्या आकृत्या पण एकाकडून काढून घेतल्या. अर्थात पैसे देवूनच. एके दिवशी तर पूर्ण रात्र विनु व त्याचा मित्र देसाई जागे होते. मी डोंबिवलीच्या जागेत एकटीच झोपले होते. एकटी झोपण्याची माझी पहिलीच वेळ होती. मला भिती वाटत नव्हती पण मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी चहा करायच्या वेळेस दूध तापवत ठेवले तेही विसरून गेले. स्वयंपाकघरातून धूर बाहेर जायला लागला तेव्हा खालच्या जोशी काकुंनी मला आवाज दिला आणि सांगितले अगं तुझ्या घरातून धूर येतो आहे. काही ठेवले आहे का गॅसवर. तेव्हा मी पटकन बघितले आणि गॅस बंद केला. दूध आटून पातेले काळे ठीक्कर पडले होते आणि धूर यायला लागला होता. खूपच धडधडायला लागले. आदल्या दिवशी गेलेला विनायक दुसऱ्या दिवशी जेवायच्या वेळेला घरी आला. मी खूपच रडकुंडीला आले होते. येताना त्याने थिसीस आणला होता. ३३२ पानांचा जाडजूड थिसीस म्हणजे एक पुस्तकच ! मी उत्सुकतेने पाने उलटली पण मला ओ की ठो कळाले नाही. ऑरगेनिक केमिस्ट्रीची भाषा आणि आकृत्या! थिसीस सुपूर्त केला. मी आयायटी मध्ये विनायकच्या पिएचडीच्या डिफेन्सला गेले होते. सर्वात मागे बसले होते. यामध्ये दुसऱ्या शहरामधले २ जण येतात आणि पिएचडी कामाबद्दल प्रश्न विचारतात. थोडक्यात तोंडी परिक्षा. यात पास झाले की पिएचडी पदवी मिळते. पदवीदान समारंभाला विनायकला हजर रहाता आले नाही कारण नोकरी लागली होती. 
 
 
हिंदुस्तान लिव्हर मध्ये interview ला गेल्यावर तिथल्या डॉक्टर नंबुदिरी यांनी विनायकला विचारले की आयायटी मधली सर्वजण अमेरिकेत जातात पोस्ट - डॉक्टरेट करण्यासाठी. तुझा जर अमेरिकेत जायचा विचार असेल तर जॉइन होऊ नकोस. ते भलतेच खुश झाले होते विनायक वर !हिंदुस्तान लिव्हर मध्ये विनायकला चांगला पगार होताच पण इतर सुविधाही खूप छान होत्या. फक्त एकच होते येण्याजाण्याचा त्रास खूप होता. सकाळी १२ डब्याची लोकल त्याला ७.१२ ला पकडायला लागायची. डोंबिवली वरून घाटकोपरला उतरून अंधेरीत तिघे मिळून शेअर रिक्शाने जायचे. येताना मित्राबरोबर अंधेरी मुलुंड बसने व नंतर मुलुंड डोंबिवली ट्रेन ने. किंवा अंधेरी-दादर आणि दादर सेंट्रलला येऊन ट्रेनने डोंबिवली. येताना खूपच गर्दी असायची. जेमतेम उभे रहायला मिळायचे. कामावरून येण्याची वेळ अनिश्चित होती त्यामुळे घरी यायला त्याला आठ ते साडे आठ होत असत. आल्या आल्या लगेच अंघोळ व चहा नाश्ता करायचा व थोड्यावेळाने जेवण. १९९६ साली आमच्या घरी ओनिडा रंगीत टेलिविजन आला व घरच्याघरी थोडी करमणूक व्हायला लागली. शनिवारी अर्धा दिवस असल्याने ४ तासांकरता त्याचा पुर्ण दिवस वाया जायचा. आम्ही १० वर्षे डोंबिवली सोडून कुठेही बाहेर फिरायला पडलो नाही. त्यालाही जेमतेम एकच दिवस मिळायचा विश्रांतीसाठी म्हणून मी पण कधीही कटकट केली नाही. आमची करमणूक म्हणजे डोंबिवलीतल्या थिएटर वर सिनेमे पहाणे हिच होती. विनायकला नोकरी लागल्यावर पहिली खरेदी म्हणजे कपडे ठेवायला गोदरेजचे कपाट घेतले आणि व्होल्टाजचा फ्रीज घेतला. हॉलमध्ये कार्पेट घेतले आणि कोणी आले तर बसायला ४ खुर्च्या घेतल्या. नोकरी लागल्यावर परत आमचा घराचा हफ्ता दादांना पाठवायला सुरवात झाली. १९९६ साली शेवटचा ५०,००० एकरकमी हफ्ता देऊन घराचे कर्ज व्याजासकट फेडले. १९९६ साली आमच्या घरी ओनिडा रंगीत टेलिविजन आला व घरच्याघरी थोडी करमणूक व्हायला लागली. Rohini Gore
क्रमश : ...

No comments: