Wednesday, April 08, 2020

कॅसेट

पूर्वी रेडिओवर जी हिंदी मराठी गाणी लागायची तेव्हाच फक्त ती आपल्याला ऐकायला मिळायची. रेडिओ मध्ये तर खूप प्रकारची विविधता होती आणि अजूनही आहे. अजूनही विविधभारती आपल्याला ऑनलाईन म्हणजेच लॅपटॉप वर ऐकता येते. आपल्याला जर एखादे आवडते गाणे परत परत आणि आपल्या सोयीच्या पाहिजे त्यावेळी ऐकायचे असेल तर पूवी कॅसेट वर गाणी ऐकायचो. तर या गाण्याच्या कॅसेट आपल्याला टेप रेकॉर्डर किंवा रेडिओ कम कॅसेट रेकॉर्डर ऐकता यायच्या. आमच्या कडे म्हणजे आईबाबांकडे बाबांनी एक टेप रेकॉर्डर खरेदी करून आणला होता. जपानची कंपनी होती. बाबांच्या मित्राचा व्यवसाय होता. मित्र म्हणाला निळू तू घे टेप रेकॉर्डर. पैसे हप्त्याने दे. हा पीस एकदम चांगला आहे. बाबांनी अशी अचानक खरेदी दिवाळीच्या दिवशी केली आणि आमच्या आनंदात भर पडली. आम्हा दोघींना खूप आनंद झाला होता. तो रेकॉर्डर एखाद्या आयताकृती पर्स सारखा होता. पियानो सारखी बटणे होती. प्ले , स्टॉप , रेकार्डचे बटण, शिवाय त्यामध्ये कॅसेट मधले गाणे पुढे मागे करून ऐकता यायचे अशी ही बटने होती. माईक होता. आवाज कमी जास्त करायचे एक सरकत बटण होते.



सुरवातीला आम्ही सर्व आत्यमामे भावडांनी मिळून खूपच धमाल केली होती या कॅसेट रेकॉर्डरवर ! आमची गाणी तर आम्ही टेप करायचोच, पण आमच्या कडे कोणी बाळाला घेऊन आले की त्याचे रडणे, नाहीतर तावातावानी झालेली मामा मामीची भांडणे पण आम्ही टेप केली होती आणि नंतर त्यांना ऐकवली होती. बाबांनी त्यांच्या आवाजात लहान मुलांच्या गोष्टीही टेप केल्या होत्या. गाणे म्हणताना पातेल्यावर चमच्याने म्युझिक पण वाजवले होते. पूर्वी सोनी कंपनीच्या कॅसेट मिळायच्या. साध्या टेप रेकॉर्डर नंतर टु इन वन यायला लागले. त्यामध्ये रेडिओ पण ऐकता यायचा आणि कॅसेट घालून गाणीही ऐकता यायची. मुख्य म्हणजे आतल्या आत रेकॉर्डिंगची सोय यात होती. लग्न झाल्यावर आम्हाला दोघांनाही गाण्याची आवड असल्याने टु - इन वनची खरेदी केली होती. लग्न झाल्यावर ही खरेदी आम्ही ६ महिन्यानंतर केली स्कॉलरशिप वाढल्यावर ! त्या आधी विनायकच्या बॅचलर जीवनातला ट्रान्स्झीस्टर होता तो आम्हाला पुरेसा होता. मला आठवतयं आम्ही दोघे घाटकोपरला टु-इन-वन खरेदी करण्यासाठी गेलो होतो. आयायटी ते घाटकोपर अशी एक बससेवा सुरू झाली होती. खरेदीमध्ये एक कॅसेट आम्हाला फ्री मिळाली. ती आम्ही आँधी - मोसमची घेतली. कॅसेटला दोन बाजू होत्या. ए आणि बी. एका साईडला एका चित्रपटाची आणि दुसऱ्या साईडला एका चित्रपटाची गाणी रेकॉर्ड केलेली होती. या कॅसेट मधली गाणी आम्ही अगणित वेळा ऐकली. नंतर मी अनेक गाणी आतल्या आत रेकॉर्ड केली. रिकामी कॅसेट टेप रेकॉर्डमध्ये घालून सेट करून ठेवायचे. नंतर रेडिओ वर आवडीचे गाणे लागले रे लागले की लगेच प्ले आणि रेकॉर्ड बटन एकाच वेळी दाबायचे आणि रेकॉर्डिंग सुरू व्हायचे. आतल्या आत रेकॉर्डिंग असल्यामुळे बोललेले चालायचे. गाणे संपले की स्टॉप बटन दाबायचे. नंतर ते गाणे व्यवस्थित रेकॉर्ड झाले की नाही तेही बघायचे. अश्या रितीने मी २ ते ३ कॅसेट मध्ये गाण्यांचे रेकॉर्डिंग केले होते. काही वेळेला रेकॉर्डिंग नीट व्हायचे नाही किंवा व्हायचेच नाही. मग ती जागा किती मिनिटांची आहे ते पहायचे आणि तितक्या मिनिटांचे गाणे परत त्या जागेवर टेप करायचे.



रेडिओ तर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ पर्यंत वाजतच असायचा. पण काही वेळा आपल्या आवडीची गाणी परत परत ऐकाविशी वाटायची तेव्हा या कॅसेट म्हणजे जीव की प्राण होत्या. डेकवाला मोठाच्या मोठा टेप रेकॉर्डर घेतला तेव्हा गाण्यातली सर्व वाद्यवृंदे अगदी स्पष्ट ऐकायला यायची. खूपच मजा यायची. डोंबिवलीमध्ये एक दुकान होते तिथे गाणी कॅसेट वर रेकॉर्ड करून मिळायची. शिवाय तिथे रेकॉर्ड केलेल्या गाण्याच्या कॅसेटही खूप होत्या. त्यातल्या काही कॅसेट आम्ही विकत घेतल्या होत्या. त्यातल्या त्यात दोन्ही साईडला आमच्या आवडत्या चित्रपटाची आहेत का ते बघायचो. कॅसेट मध्ये. काही कॅसेट अशा होत्या की नुसत्या चित्रपटाची गाणी नसून एखाद्या संगीतकाराची किंवा एखाद्या गायकाची फेमस झालेली गाणी असायची. तर अशाही काही कॅसेट आम्ही खरेदी केल्या होत्या. त्या दुकानामध्ये अजून एक सोय होती की आपण आपल्या आवडत्या गाण्यांची यादी करून त्या दुकानदाराला द्यायची. शिवाय एक रिकामी कॅसेटही द्यायची. मग तो आपल्याला तशी सर्व गाणी त्या कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून द्यायचा. अमेरिकेला येताना आम्ही सर्व कॅसेट घेऊन आलो. आम्ही जेव्हा टेक्साज राज्यातल्या डेंटन या छोट्या शहरात राहिला आलो तेव्हा आम्हाला कळले की डॅलस वरून २४ तास हिंदी गाण्यांचे प्रसारण होते म्हणून आम्ही लगेचच वाल मार्ट मधून टु इन वन विकत आणला आणि अमेरिकेतही आम्ही रेडिओवर डॅलस वरून प्रसारित होणारी हिंदी गाणी ऐकायला लागलो. मला तर खूपच आनंद झाला होता. डेंटनला आम्हाला एक संगीत प्रेमी भेटला. त्याला हिंदी गाणी आवडायची. त्याच्याकडून जुनी हिंदी गाणी आम्ही रेकॉर्ड करून घेतली. त्याकरता इथल्या एका स्टोअर मध्ये आम्हाला कॅसेटही मिळून गेल्या.



डेंटन वरून दुसऱ्या राज्यातल्या दुसऱ्या शहरी आलो. तिथे आम्ही डेस्क टॉप विकत घेतला आणि आम्हाला एक वेबसाईट कळाली ती होती म्युझिक इंडिया ऑनलाईन. अगदी पाहिजे ती हिंदी मराठी गाणी ऐका. नंतर सीडी, व्हिसीडीज आल्या आणि हळूहळू कॅसेट मागे पडल्या. का कोणजाणे पण मला आज कॅसेटची प्रखरतेने आठवण झाली आणि अडगळीत ठेवलेल्या कॅसेट बाहेर काढून आठवणीत रमून गेले. शेवटी काय गेले ते दिन गेले !! परतून येणे नाही ! मी रोहिणी गोरे एक कॅसेटप्रेमी <3 br="">
<3 br="">






tape recorder photo credit - google download,, we had this type of tape recorder at our home.

No comments: