कृष्ण धवलचे टिव्ही क्राऊन आणि टेलिव्हिस्टा कंपनीचेच फक्त मला माहिती
आहेत. आमच्याकडे म्हणजे आईबाबांकडचा जो टिव्ही होता तो होता टेलिव्हिस्टाचा
आणि त्याला मुंग्या क्वचितच येत. मुंग्या आल्या की पत्र्यावर कोणाला तरी
जायला लागायचे आणि अँटीनाला दोन तीन थपडा दिल्या की टिव्हीतल्या मुंग्या
पळायच्या. पत्र्यावर जायचे काम रंजनाचे होते. हे काम ती खूप आवडीने करायची.
रविवारी सकाळी जेव्हा रंगोली लागायची तेव्हा आई उठवायची आम्हाला उठा गं
तुमची आवडती गाणी लागली आहेत रंगोली मध्ये. आम्ही दोघी बहिणी उठायचो म्हणजे
काय तर झोपण्याच्या मूळपदावरून अंग वळवून आमचे मुखडे टिव्हीच्या समोर
येतील असे करायचो. डोक्या खाली २ उश्या घेऊन रंगोलीचा आनंद घ्यायचो. रंगोली
संपली की मग दात घासून चाय चाय गरम चाय !
साप्ताहिकी कधीही
चुकवायचो नाही कारण की पुढील आठवड्याची रूपरेषा असायची. मुख्य म्हणजे
रविवारचा पिक्चर कोणता आहे त्यानुसार मग रविवारी संध्याकाळी घरीच थांबायचे
की डोंगरावर फिरायला जायचे हे ठरवता यायचे. चांगला पिक्चर असेल तर मग अगदी
जय्यत तयारी. केरवारे काढून दडपे पोहे करायचो. दारे लावून आणि खिडक्यांचे
पडदे मिटवून घ्यायचो.. पाठीला टेकता येतील अशा दोन खुर्च्या आमच्या घरी
होत्या त्यावर आम्ही दोघी बसायचो. आईबाबांची जागा ठरलेली होती. ती दोघे
कॉटवर बसायची. चांगल्या सिनेमाची आम्ही टायटल पण कधी चुकवली नाही. चारूशिला
पटवर्धन जेव्हा बातम्या सांगायची तेव्हा तिच्याकडे टक लावून बातम्या
पहायचो इतकी ती आम्हाला आवडायची. तिचे डोळे म्हणजे एखाद्या गोटीसारखे
चकाकणारे होते. बातम्या संपल्या की ती म्हणायची याबरोबरच हे बातमी पत्र
संपले, नमस्कार आणि इतकी गोड हासायची. ते हासणे पण आम्ही दोघी बहिणींनी कधी
चुकवले नाही. काही मालिका आवडायच्या त्या म्हणजे करमचंद, सर्कस,
श्वेतांबरा.
माझे लग्न जेव्हा झाले तेव्हा आम्ही दोघे आयायटी पवई
मध्ये वसतिगृहात राहिलो. तेव्हा एका हॉलमध्ये टिव्ही होता. तिथे रामायण
बघायला गर्दी व्हायची. तिथे रात्रीचे काही सिनेमे आम्ही दोघांनी मिळून
पाहिले आहेत. जुने कृष्ण धवल सिनेमे. मिर्झा गालीब आठवत आहे. नंतर आम्ही
आयायटीच्या आवारातच तुलसी ब्लॉक्स मध्ये गेलो. हे ब्लॉक्स लग्न झालेल्या
जोडप्यांसाठी बांधले होते. तिथे गेल्यावर काही जणांनी टिव्ही घेतले. त्या
ब्लॉक्स मध्ये राहताना माझी मैत्रिण आशा आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये
रहायची. महाभारत सुरू झाले की ती मला हाक मारायची रोहिणी ये गं महाभारत
सुरू झाले. मग आम्ही दोघे सकाळचा चहा घेऊन तिच्याकडे जायचो. आणि महाभारत
संपल्यावर तिच्या हातचे गरमागरम पोहे खाऊनच घरी यायचो.
जेव्हा
डोंबिवलीला रहायला गेलो तेव्हा काही वर्षानंतर म्हणजे १९९६ साली. आमच्या
घरी टिव्ही आला. टिव्ही घ्यायचा तो ओनिडाच असे ठरवले होते मनाशी.
काहिजणांकडे ओनिडा रंगीत टिव्हीची क्वालिटी पाहिली होती तेव्हाच ठरवले होते
ओनिडाच ! आमच्या घरी जेव्हा टिव्ही आला तेव्हा शोकेस नव्हतीच. एका खूप
छोट्या आयताकृती स्टुलावर टिव्ही ठेवला होता. त्यावेळी मी सकाळच्या
क्लासवरून आले की एक मालिका बघायचे ती म्हणजे सैलाब. त्यावेळेला सोनू
निगमचे सारेगप पण खूपच आवडायचे. तो निवेदन छानच करायचा. आमच्याकडे टिव्ही
आल्यावर मी धडाधड सिनेमे पहायला सुरवात केली.
सोनी टिव्ही वर तेव्हा
खूप छान जुने रंगीत सिनेमे दाखवायचे. मला मालिका बघण्याचे वेड त्यावेळेला
अजिबातच नव्हते. सोनी चॅनल माझा आवडता चॅनल होता. अंधेरीत गेल्यावर
रात्रीच्या जेवणाच्या वेळी आभाळमाया पहायचो. ते सुद्धा आम्हाला त्याचे
शीर्षक गीत जास्त आवडायचे. महाश्वेता मालिका आवडायची. २००१ ला जेव्हा
अमेरिकेत आलो तेव्हा एक १३ इंची टिल्लू टिव्ही घेतला. पण त्यावर सर्व
इंग्रजी मालिका होत्या.मालिका
बघण्यात आम्हला दोघांनाही इंटरेस्ट
नाही. त्यामुळे सिनेमेच खूप बघितले. काही कूकींग शोज बघायचो. एक इंग्रजी
मालिका गोल्डन गर्ल्स बघायचो. ही मालिका खूपच छान होती.
विल्मिंग्टनला आल्यावर मोठा टिव्ही घेतला तेव्हा डिश घेतली आणि त्यामध्ये ३
हिंदी चॅनल घेतले. सहारा वन, झी सिनेमा आणि सोनी. झी सिनेमावर आमच्या
दोघांचे परत धडाधड सिनेमे पाहणे सुरू झाले. अर्थात नंतर ते रिपीट होत गेले.
सहारा वन आणि सोनीवर काही मालिका मात्र खूप आवडून गेल्या. नंतर मालिका
संपल्या आणि डिश काढून टाकली. केबल चॅनलही काढून टाकले. फक्त काही बेसिक
चॅनल ठेवले. २००८ साली आम्हाला एक मराठी वेबसाईट कळाली ती म्हणजे आपलीमराठी
डॉट कॉम. इथे झी मराठीच्या मालिका होत्या. ही साईट फ्री आहे.सोनी आणि सहारा वन वर कोणत्या हिंदी मालिका बघितल्या आणि मराठी मालिका
बघण्याकडे आम्ही दोघे कसे वळलो ते सर्व पुढील भागात. Rohini Gore
क्रमश : ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
I had forgotten about "Saptahiki"... thanks for reminding me about that.And one of the most disappointing thing was sometimes they would tell about one movie and show another movie. And I think the first TV in my home was Telemate or Televista. And it was in a big box with a shutter that would close shut AND a key to lock it... now it all seems hilarious but we loved it so much. And I also remember the 15 minute Spiderman that used to be there on sunday mornings and also He Man and the Masters of the Universe. Thank you once again. I had a group dedicated to old TV memories on orkut but now orkut itself is a nostalgia lol.
Thank you for the comment Anonymous ! :) yes we had televista tv too and the door shutter :) nostalgic
Post a Comment