Wednesday, October 28, 2009

पिल्लू

बाहेर धुआंधार वादळ चालले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता, त्याचा घों घों असा आवाज ऐकू येत होता. मुसळधार पाऊसही पडत होता. बाहेर जवळ जवळ ८५ कि. मी. वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे खिडक्या दारे उघडणे अशक्य होऊन बसले होते.

मानसीला पाऊस खूप आवडतो. त्यामुळे ती खूपच आनंदात होती. स्वयंपाकघरातील व बेडरूमच्या संपूर्ण काच असलेल्या खिडकीतून ती पाऊस बघत होती. तिला खरे तर दार उघडण्याचा पण मोह होत होता. दाराला लागूनच स्वयंपाकघर आहे. एकदा तिने थोडेसे दार उघडून फटीतून पावसाला बघितले. वाऱ्याचा दाब इतका जबरदस्त होता की त्या दाराला जोराने रेटूनच तिने दार बंद केले. असे तिने बरेच वेळा केले. दिवसभर कंटाळवाणे झाले होते. अधूनमधून लाईट जात होते त्यामुळे दूरदर्शन व नेटमध्ये पण अडथळे येते होते. बाहेर खूपच अंधारून आले होते. कंटाळा जाण्याकरता मानसीने आलं टाकून गरमागरम चहा केला.

आता पाऊस व वारा यांचा धिंगाणा कितपत चाललाय ते पाहण्याकरता तिने दार उघडले मात्र............ टुणकन उडी मारून एक खूप छोटे बेडकाचे पिल्लू घरात शिरले. तसेच दार उघडे ठेवून कुंच्याने झाडून बेडकाला बाहेर काढावे, असे म्हणून तिने कुंचा हातात घेतला पण तितक्यात त्याने दुसरी उडी घेतली व तो मायक्रोवेव्हच्या मागे गेला. तिने मग मायक्रोवेव्हच्या मागच्या बाजूला पाहिले आणि त्या बेडकावर पाणी शिंपडले पण तो बाहेर गेलाच नाही, तो आता बेसिनपासी आला.


आता मात्र मानसीने आरडाओरडा करायला सुरवात केली. तिचा नवरा अमित शांतपणे दूरदर्शन वर मालिका बघत होता, त्याला माहित होते आपली बायको घाबरट आहे आणि कोणताही छोटा प्राणी घरात आला की असाच आरडाओरडा करते.


"ए अमित, बघ ना तो आता बेसिनवर आलाय. त्याला घालवून टाक ना. "

"अगं तो आपोआप जाईल"

"अरे मला खूप भीती वाटते हे माहीत आहे तुला आणि आता तर तो काय स्वयंपाकघरामध्येच फिरेल इकडे तिकडे, आणि मला डाळ तांदुळ धुवायचेत. "

" अगं तुझ्या मोठमोठ्या आवाजाने तोच तुला घाबरत असेल. "


भांड्यांचा खडखडाट झाल्यावर त्या पिल्लाने परत टुणकन उडी मारली आणि तो ओट्याच्या कोपऱ्यात जाऊन बसला तशी इकडे मानसी घाबरली व पाण्यात तांदुळ असलेले भांडे भीतीने खाली पडले. पूर्ण जमिनीवर तांदुळ व पाणी. " हा बेडूक असा आहे ना, त्याला काय गरज होती का आमच्या घरात यायची. एकतर आधीच काही सूचत नाहीये. त्यातून कामात काम वाढले याच्यामुळे. "


जेवण झाल्यावर चोरपावलांनी दबकत दबकत येऊन तिने स्वयंपाकघरात बघितले तर तिला तो कुठे दिसला नाही. अरेच्या गेला का हा?!! बरे झाले! असे म्हणून निघणार तर तिला ओट्याच्या एकदम दुसऱ्या टोकाला एक डबा होता त्यावर बसलेला दिसला. हळूच जाऊन तिने त्याला अगदी जवळून पाहिले तर त्याने अर्धवट डोळे मिटले होते व त्याचे तोंड हलत होते. "नामस्मरण की काय?!! " आत्तापर्यंत बेडकाची भीती व किळस वाटणाऱ्या मानसीला त्याची दया आली. त्याच्याकडे बघून म्हणाली, " बेट्या, रात्रभर हवे तेवढे नामस्मरण कर. पण उद्या मात्र छकडा हाकलायचा बरकां आमच्या घरातून!!


दुसऱ्या दिवशी उठून पाहते तर परत मायक्रोवेव्हच्या मागे. मानसी म्हणाली आज त्याच्या जाण्याचा दिवस दिसतोय. दुसऱ्या दिवशी पाउस पण ओसरला होता. वारा पण एकदम शांत पडला होता. संपूर्ण दिवस मायक्रोवेव्हच्या मागे त्याने विश्रांती घेतली. मानसीने दार उघडेच ठेवले होते. जसे काही त्या पिल्लाला माहीतीच होते की आता दारातून बाहेर जायचे, आणि काही वेळातच तो एकदम दिसेनासा झाला. बाहेरच्या गॅलरीत जाऊन मानसीने इकडे तिकडे पाहिले. दाराच्या आजूबाजूला पाहिले. स्वयंपाकघरात जाऊन पाहिले.


हुश्श्य!! गेला बाई एकदचा!!


वरील घटना आमच्या घरात घडलेली आहे.

Friday, October 23, 2009

.......आणि माझे मन भूतकाळात गेले......

ऑर्कुटवरच्या माझ्या मित्रमंडळींच्या यादीत एक काका आहेत. मी त्यांना अजिबात ओळखत नाही. त्यांची friend request जेव्हा मला आली तेव्हा common friends बरेच होते म्हणून मी ती स्वीकारली. त्या दिवशी त्यांच्या ऑर्कुट अल्बममध्ये काही छायाचित्रे पाहिली, आणि मी पाहतच राहिले. अय्या! ही तर दिप्ती, आणि ही तिची मुलगी मधुरा! किती गोड दिसत्ये मधुरा! छायाचित्रे मंगळागौरीची होती. लगेच काकांना स्क्रॅप लिहिला की दिप्ती व मधुरा तुमच्या ओन लागतात. त्यांनी त्वरित उत्तर पाठवले की दिप्ती ही त्यांची धाकटी भावजय व मधुरा ही त्यांची पुतणी असे नाते आहे. त्यांच्याकडून लगेच दिप्तीचा दूरध्वनीक्रमांक घेतला.

ट्रिंग ट्रिंग!! लागत का नाहीये फोन! परत एक दोन वेळा प्रयत्न करूनही लागला नाही. घरात कामे बरीच पडली होती, ती थोडी आवरली, बघू आता तरी लागतो का फोन म्हणून नंबर फिरवला आणि तिकडून आवाज आला हॅलो! कोण बोलतयं. तोच टोन! अगं दिप्ती मी रोहिणी गोरे बोलत्ये! ओळखलेस का मला? "अगं रोहिणी तू! आणि हसायला सुरवात. अगं दिप्ती what a pleasant surprise! मग घडाघडा बोललो. तु कशी आहेस, मी कशी आहे. तिने विचारले कशी दिसतेस तू गं! बारीक झालीक की जाड? तिने पण तिच्या मुलीची व नवऱ्याची कुशाली दिली. बोलता बोलता ऑफिस आठवतयं का? हो गं! समोसे आठवतात का? आणि BM? (branch manager) हो. गं आणि खूप खूप हासलो. आजकाल दिलखुलास हासणे पण दुर्मिळ झाले आहे. आणि लक्ष्मी (आपली प्रेमळ सासू) आठवते का? .... बोलता बोलता माझे मन भूतकाळात निघून गेले.......

दिप्ती व मी एकाच ऑफिसमध्ये होतो. नंतर काही वर्षाने मी नोकरी सोडली. नंतर तिने तिची राहती जागा बदलली. काही दिवसांनी मी पण दुसऱ्या शहरात गेले. नंतर तिथून अमेरिकेत आले. अशा या सांसारिक व्यापामुळे संपर्क साधता येत नव्हता. किती वर्षे झाली! त्या दिवशी जवळ जवळ १२ ते १५ वर्षाने दिसली दिप्ती मला. संपर्कात नसलो तरी आठवणी तर कायम असतातच ना!

मी व दिप्ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काही वर्षे काम करत होतो. ऑफिस गावातच होते. त्या कंपनीची ती एक शाखा होती. आमच्या बरोबर अजून एक मैत्रिण होती लक्ष्मी नावाची. दिप्ती माझ्याहून ५ वर्षाने मोठी ताईसारखी! लक्ष्मी व माझ्यात २० वर्षाचे अंतर होते. मी त्या कंपनीत नव्यानेच लागले होते.

आमची ऑफिसची वेळ होती ९ ते ५. आम्ही तिघी एकाच गावात होतो व आफीस त्याच गावाच्या एका औद्योगिक वसाहतीत होते. आम्ही तिघी वेगवेगळ्या रिक्षेने यायचो ऑफिसला कारण की बसला नेहमीच तोबा गर्दी असायची. नवाच्या ठोक्याला हजर रहायचे असे असले तरी पण कधी कधी ९.०५, किंवा ९.१० व्हायचेच. कारण की सकाळच्या वेळेत वाहतुक मुरंबा हा ठरलेलाच असतो सगळीकडे. आमच्या बरोबरच बी. एम. पण ऑफीसमध्ये प्रवेश करायचे. एकमेकांना hi, hello, good morning चे सोपस्कार पार पाडून बी. एम. सगळ्यांना कामे द्यायचे व चहा घेऊन कंपनी व्हिजिटकरता बाहेर पडायचे. सकाळ दुपारचा चहा, अगदी मध्ये जरी कोणी जादाचा चहा घेतल्ल तरी तो कंपनीतर्फे होता. चहाचा मसाला घातलेला व आलं घातलेला गरम गरम चहा घेत एकीकडे फायली हाताळणे, दिलेल्या कामांवरून एक नजर, कुणाची साडी नवीन असेल तर "मस्त आहे गं साडी, केव्हा घेतलीस? असे करत करत बी. एम पण घाईगडबडीत, ब्रीफकेस घेऊन, घड्याकाकडे एक नजर टाकत बाहेर पडायचे. कंपनीच्या काळ्या कारमध्ये बी. एम बसले आणि कार सुरू झाली रे झाली की आमच्या तिघिंचा पहिला प्रश्न म्हणजे डब्यात काय आणले आहे! कुणाच्या डब्यात जर चमचमीत काही असेल तर आम्हाला लगेच भूक लागायची. तशी आम्हाला ११ वाजता भूक लागायचीच. तेव्हा गरम गरम सामोसे मागावले जायचे व त्यानंतर चहा हवाच!

एकदा आम्ही असे ठरवले की महिन्यातून एकदा एकीने तिघींचाही डबा आणायचा. त्यादिवशी इतर दोघींनी डबा आणायचा नाही. त्यात मी एकदा बटाटेवडे, एकदा साबुदाणा खिचडी, दिप्तीने ओली भेळ आणली होती. लक्ष्मीने एकदा अडाई व एकदा इडली सांबार चटणी असे आणले होते. खूप मजा आली होती. दुपारच्या जेवणानंतर आम्ही आमचे जेवणाचे डबे ऑफिसमध्येच घासून विसळून उपडे कर्रून ठेवायचो. निघेपर्यंत डबे वाळायचे व फ्रेश रिकामे डबे घरी न्यायचो. बाकी लोणची, कोरड्या चटण्या यांच्या बरण्या पण ऑफीसमध्येच आणून ठेवल्या होत्या. ऑफीस सुटल्यावर आम्ही तिघी एकत्रच निघायचो. बसने जायचो. शेवटचा बसस्टॉप ऑफिसजवळ त्यामुळे बसायला जागा मिळायची. ५.१० ची बस ठरलेली असायची. ऑफिसमधून वरच्या बसस्टॉपला बस गेलेली दिसायची. ४.३० हळू हळू काम आवरते घेऊन टेबल आवरून निघायचो. निघताना पण फ्रेश होऊन निघायचो. साबणाने स्वच्छ हात व चेहरा धुऊन पावडर कुंकू करून निघायचो. काम बरेच असल्याने दमणूक खूप व्हायची.



दुपारच्या जेवणाच्या वेळी जेवणानंतर फलाहार घ्यायचो. आमचे ऑफीस औद्योगिक वसाहतीत असल्याने तिथे फळवाले बरेच यायचे. आम्ही मग द्राक्षे, संत्री, मुसंबी घेऊन खायचो. शिवाय उन्हाळ्यात काकड्या, बर्फाचे रंगीत गोळे, कुल्फी खायचो. काम करता करता काही वेळा अधून मधून गप्पा चालायच्या. मी साडीपेक्षा जास्त पंजाबी ड्रेस घायालचे तेव्हा लक्ष्मी मला नेहमी म्हणायची, रोहिणी अभी भी कॉलेज गर्ल जैसी दिखती है रे. और बिंदियाँ भी कितनी छोटी लगाती है. ती कुंकू नेहमी ठसठशीत लावायची. मला एका जागी बसून खूप बोअर व्हायचे तेव्हा मी काही कामा निमित्ताने उठबस करायचे. फाईल ठेवायला काढायला किंवा पाणी प्यायला उठायचे. दिप्ती व लक्ष्मी काही हवे असेल तर ऑफिस बॉयला सांगायच्या. आमच्या ऑफिसमध्ये २ जुळी मुले ऑफीस बॉय म्हणून होती. राजा व राजू.

आमचे बी. एम. पण मस्त होते. त्यांच्याकडे कोणी कस्टमर आला भेटायला ऑफिसमध्ये की त्याला चहा व बिस्कीटांची ऑर्डर असायची. आम्हाला तिघींनाही बाहेर चहा बिस्कीटे यायची. काही वेळा cold drink त्यात दिप्ती व लक्ष्मी नेहमी मँगोला घेत असत. माझे thumps up ठरलेले. thumps up नसेल तर gold spot. दिप्ती बरेच वेळा आमच्या दोघींकरता गजरे आणायची. मी त्या दोघींचे मजेने गालगुच्चे घ्यायची. दिप्ती मला म्हणायची रोहिणी तू गालगुच्चे घेऊ नकोस हं . बारीक दिसलीस तरी तुझ्यात ताकद खूप आहे हं! लक्ष्मी नेहमी हसतमुख असायची. आमच्या तिघींचा अजून एक कार्यक्रम ठरलेला असायचा दर महिन्यात. तो म्हणजे पाणीपुरी खाणे. दर महिन्यात एकीने तिच्यातर्फे सर्व काही खायला घालायचे. आधी पाणीपुरी, मग शेवबटाटापुरी, नंतर रगडा पॅटीस व सर्वात शेवटी एकेक मसाला पुरी.

माझी एक लाल रंगाची सिल्कची साडी होती. त्या लाल रंगाची शेड थोडी काळपट रंगाकडे झुकली होती. दिप्तीची एक लिंबू कलरची साडी होती. या एकमेकींच्या साड्या आम्हाला खूपच आवडायच्या. एकदा ठरवून आम्ही एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आवडती साडी दुसरीच्या अंगावर पाहून खूप छान वाटत होते. त्या दिवशी सगळ्यांचे चेहरे गोंधळ्यासारखे वाट होते! लक्ष्मी (तमीळ मैत्रिण) म्हणाली देख अब ऐसाही होगा, सब तुम दोनोंकी तरफ ही देखेंगे. कामानिमित्ताने कोणी बोलायला आले आमच्याशी की त्यांचे गोंधळलेले चेहरे पाहून आम्ही दोघी एककेकींकडे पाहून गालातल्या गालात खूप हास्त होतो.

आमच्या ऑफीसमधले सेल्समन पण खूप छान होते. ते नेहमी आम्हाला तिघींना उपहारगृहात पार्टी द्यायचे. त्यांचा पगार , पगार प्लस कमीशन असा होता. कोणाला जास्त कमीशन मिळाले की लगेच आम्हाला पार्टी. त्यात नॉर्थ इंडीयन नान, कुर्मा, टोमॅटो किंवा व्हेजिटेबल सूप, आयस्कीम, कोल्ड ड्रिंक असायचे. खूप मजा यायची. हे सर्व आठवले की असे वाटते किती छान दिवस होते ते. अशा एक ना अनेक आठवणी!! दिवसभर रेंगाळत होत्या माझ्या मनात त्यादिवशी!! तो दिवस असाच छान गेला आठवणींमध्ये.

Saturday, October 17, 2009

Art Photography







आज दिवाळीचा पहिला दिवस खूप छान गेला. समुद्रकिनारी गेलो होतो फिरायला. या किनाऱ्यावर भरपूर ओबडधोबड खडक आहेत, त्यामुळे मी याला खडकवासला बीच असे नाव ठेवले आहे. आज लाटा नुसत्या उसळत होत्या. स्वच्छ सूर्यप्रकाश होता त्यामुळे बाहेर फिरायला खूप छान वाटत होते. उन्हात लाटा खूप चमचमत होत्या. उसळणाऱ्या आणि चमकत्या लाटांकडे नुसते पाहत बसावेसे वाटते होते. खूप छान वाटले आज ताजेतवाने!



आज या लाटांकडे पाहून मला शेषाए दिल इतना ना उछालो, ये कही टुट जाएगा ये कही फूट जाएगा या गाण्याची आठवण झाली. या चित्रपटामधले हे गाणे मला खूप आवडते.

Wednesday, October 14, 2009

माझ्या आठवणीतली दिवाळी





दिवाळी जवळ आली की आमच्यात एक प्रकारचा उत्साह संचारायचा. आमच्या घरादाराचे रंगरूप उजळायचे. सर्वात प्रथम म्हणजे घराला रंग. घरामध्ये एक भली मोठी लाकडी मांडणी व दुभत्याचे कपाट होते, लाकडी पाट होते, तेही रंगवले जायचे. मग घरातल्या प्रत्येक वस्तूची साफसफाई. त्यावेळी पितळेचे डबे असायचे ते चिंचेने घासून लखलखीत व्हायचे. फरशी पण धो धो पाण्याने धुतली जायची. ही सर्व घराची प्राथमिक साफसफाई झाली की मग वाण्याची लांबलचक यादी, कारण आई मोठ्या उत्साहाने व आनंदाने लाडू चिवड्यापासून ते अगदी अनारसे कडबोळीपर्यंत सर्व पदार्थ करायची आणि ते सुद्धा मुबलक प्रमाणात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पदार्थ करत बसायचो, मग त्याचा सुटणारा घमघमाट व प्रत्येक पदार्थाची चव पाहणे.


नंतर बाकी सर्व खरेदी. पणत्या, रांगोळी, भरपूर रंग, पणत्या भिजत घालणे, त्याकरता लागणाऱ्या वाती करून ठेवणे. पणत्याही भरपूर लागायच्या. पुढील व मागील दारी तीन पायऱ्यांवर प्रत्येकी चार. डावीकडे व उजवीकडे दोन याप्रमाणे. फाटकावर चार. कोयनेलच्या कुंपणात एक, जाईच्या वेलीशेजारी एक, मातीच्या किल्ल्यात एक, पेरूच्या, पपईच्या, केळीच्या झाडांजवळ एकेक. आई पूर्ण अंगण शेणाने सारवून देई. अंगण साफ करण्यासाठी झाडू खराट्याची पण नव्याने खरेदी व्हायची. आकाशकंदील तर चांदणीचाच आवडायचा आम्हा दोघींना. भरपूर फटाक्यांची खरेदी झाल्यावर त्याची आमच्या दोघींच्यात समान वाटणी. दिवाळीच्या काही दिवस आधी आमचे भाऊ आमच्या अंगणात एक सुरेखसा मातीचा किल्ला बनवून द्यायचे. सर्व तयारीनिशी दिवाळीचे स्वागत करायला सज्ज राहायचो.



दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे कुडकुडत उठून एकीकडे रेडिओवर पुणे केंद्रावर प्रसारित होणारी नरकासुराची गोष्ट ऐकत तांब्याच्या बंबातील कडकडीत पाण्याने साग्रसंगीत अंघोळ व नट्टा पट्टा करून अंगणात ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत बसायचो. आमच्याकडे खरी मजा असायची ती भाऊबीजेची. खूप दणक्यात व्हायची भाऊबीज. आमचे आठ मामा व त्यांचे कुटुंब मिळून ३५ ते ४० जण असायचे. स्वयंपाक पण अगदी साग्रसंगीत. ओल्या नारळाची पाटावरवंट्यावर वाटलेली चटणी, बागेतल्या अळूची भाजी, बटाट्याची भाजी, तळण, पुऱ्या, वरणभात व घरच्या चक्क्याचे बनवलेले श्रीखंड. आमच्याकडे पाट भरपूर होते त्यामुळे पाटावर बसून पुढे मोठे ताट, वाटी, फुलपात्र, तांब्या अशा थाटात पंगती होत असत. पिण्यासाठी थंडगार पाणी मोठ्या रांजणातले. जेवणानंतर विडे खाणे. आमच्याकडे एक स्टीलचे बदक होते. त्याच्या पोटात विड्याची पाने व पाठीत लवंग, सुपारी, चुना असे ठेवलेले असायचे. बदकाचे पंख उघडताना त्याची मान आधी वळवावी लागत असे. विडा करून घ्यायला प्रत्येकाकडे ते बदक फिरत असे.



जेवणानंतर मुख्य कार्यक्रम ओवाळण्याचा. हा कार्यक्रम २-३ तास चाले. आधी आई (सर्वात धाकटी) तिच्या आठ भावांना ओवाळायची मग आमच्या भावंडांचा ओवाळण्याचा कार्यक्रम. त्यात आमच्या बरोबरीचे भाऊ मजा करायचे. एक भाऊ ओवाळताना ताम्हणाकडे पाहून त्याप्रमाणे त्याचे तोंड गोल गोल फिरवायचा. मग आम्ही बहिणीपण मुद्दामून उलट्या दिशेने ताम्हण फिरवायचो. एक भाऊ १०/१० सुटे पैसे करत २-३ रुपये ओवाळणीत घालायचा. एक भाऊ ओवाळताना ओवाळणीची उगाचच शोधाशोध करायचा. पॅंटच्या खिशात बघ, शर्टच्या खिशात बघ. त्याने भाऊबीजेसाठी तयार केलेली सर्व पाकिटे पाटाखाली लपवलेली असायची. मग आमची सगळ्यात मोठी मामी ओरडायची. उरका लवकर तुमचे ओवाळण्याचे कार्यक्रम. फटाके उडवायचेत ना! मग सर्वांचे मिळून उरलेले सर्व फटाके उडवायचो. एक दोन तास धडाडधूम!


दुसऱ्या दिवशी जरा उशीराने उठून चिवडा खाणे कार्यक्रम. मोठाल्या परातीत चिवडा, त्यावर बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर व खवलेला ओला नारळ. नंतर आम्हा सर्व बहिणींची खरेदीसाठी तुळशीबागेत फेरी खास भाउबीजेच्या जमलेल्या पैशातून. अशा रितीने दिवाळीचा मनमुराद आनंद लुटायचो.

Sunday, October 04, 2009

अमेरिकेतील पाळणाघर (१)

मला एका डे केअर मध्ये substitute babysitter चा अनुभव मिळाला, त्यातिल काही मुलांच्या आठवणी थोडक्यात सांगते.


डे-केअरमध्ये एकुण चार वर्ग असतात. इंंफंट, क्रीपर, टोडलर आणि ४ वर्षाच्या आतिल मुले. टोडलरमधिल दिड ते अडीच वयोगटातील व एक नंबरची खट्याळ असतात. एकमेकांना ढकलणे, चिमटे काढणे, चावणे, त्यातिल काही जण एकमेकांचे जिगरी दोस्तपण असतात. मी टोडलरमध्ये काम केले. तिथे एकूण १० मुले होती, त्यातिल २ स्पॅनिश आणि ८ अमेरीकन होती. अमेरीकन कायद्याप्रमाणे ९ मुलांना ३ babysitters असणे आवश्यक आहे. तेथे आफ्रीकन जीसेल, पाकिस्तानी फरहाना, टर्कीमधील खरीमा, ईजिप्तमधिल मोना, अमेरीकन जुली, बॉबी, एलिझाबेथ अशा सर्व प्रकारच्या babysitters होत्या.


टोडलरमधील मुले मला "हिनी" हाक मारत. त्यांना रो चा उच्चार येत नसे. वर्गावर गेल्यावर "हाय हिनी" आणि निघताना "बाय हिनी" असे म्हणत. या डे-केअरमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुले राहतात. या वेळामध्ये त्या मुलांचे रुटीन आखलेले असते. त्यात न्याहरी, जेवण, झोप, मैदानावर जाउन खेळणे, त्यांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवणे, कविता म्हणून दाखवणे, रंग ओळखायला सांगणे, खडूने रंगवायला सांगणे इ. इ. असे कार्यक्रम असतात.


दुपारी साधारण २ तास मुलांनी झोपावे असे अपेक्षित असते. त्यांच्या छोट्या गाद्यांवर प्रत्येकाची नावे लिहिलेली असतात. त्या गाद्या आणि छोटी पांघरुणे वर्गामध्ये घालायची, व एकेकाला झोपवायचे. काहींना झोपताना कापडी वाघ बरोबर लागतो, कोणाला कासव, तर कोणाला बदक तर कोणाला बाहूली. मुलांना झोपवताना त्या खोलीमध्ये अंधार करायचा, व बालगीतांची सीडी कमी आवाजात लावायची.


स्पॅनिश मॅनव्हेल हा माझा सर्वात आवडता मुलगा. गोरा पान, चिक्कूच्या आतिल बियांसारखे काळेभोर डोळे, नकटे नाक, तपकिरी केस, लालचुटूक ओठ व टम्म पुरीसारखे गाल. खूपच गोड होता. तो मला "फोइनी" म्हणायचा. जेवणानंतर झोपायच्या वेळेस लवकर झोपायचाच नाही, सगळी बालगीते संपायची, सर्व मुले झोपायची, तरी हा आपला "टक्क" डोळे ठेवून जागाच. त्याच्याकडून मी रोज काही मराठी वाक्ये वदवून घ्यायचे, ती वाक्ये अशी " मी मुलगा आहे", "माझे नाव मॅनव्हेल आहे", "मला रोहिणी आवडते", मराठी उच्चार स्पष्टपणे करायचा. त्याचे मराठी स्पष्ट उच्चार ऐकून मी खूप हसायचे, मग तोही हसायचा, आम्ही दोघे मिळून खूप जोरजोरात हसायचो.

ऍनाला माझे नेकलेस सारखे दिसणारे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र खूप आवडायचे. मला म्हणायची, " तुझा नेकलेस छान आहे, मला दे. " एकदा तर हटूनच बसली, म्हणाली "मला तुझा नेकलेस घाल", आता तिला कसे सांगणार की हा नेकलेस लग्न झाल्यावरच घालायचा असतो. मग तिला सांगितले "माझ्या गळ्यातून हा नेकलेस निघतच नाहिये, खूप घट्ट बसलाय. "


वील एकदा झोपेतून उठून म्हणाला "my juice" मला त्याचा उच्चार माचिस असा ऐकू आला, मी म्हणले याला कशाला माचिस पाहिजे, तेव्हा त्याने फ्रीजकडे बोट दाखवले, तेव्हा मला कळाले त्याला त्याचे जुस पाहिजे आहे. इसाबेला हिला झोपताना नेहमी बाहूली जवळ लागायची. त्या बाहूलीचा फ्रॉक, तिचे वेगळे बूट, रंगीबेरंगी दुपटे असा सगळा जामानिमा करून ती तिला जवळ घेउन झोपायची. ती बाहुलीशी खेळताना मला म्हणायची की "तू माझी मुलगी, बाहूली तिची दुसरी मुलगी" "मी बाहूलीला डॉक्टरांकडे घेउन जाणार आहे" "मी येतेच तोपर्यंत तु येथे थांब", मग मी पण तिला म्हणायचे "आई तु लवकर ये. तू आली नाहीस तर मी रडेन"



एकदा इंंफंट वर्गामध्ये काम करण्याचा योग आला. तेथे सलील नावाची मुलगी बसून खेळण्याशी खेळत होती. मी तिला माझी सोन्याची बांगडी दिली. तिने ती तोंडात धरली व चावली. खूप चावत होती त्या बांगडीला, बहुधा तिला दात येत असावेत. ती बांगडी काढून घेतल्यावर लगेच रडायला लागली. तिला वाटले असेल की ते एक खेळणेच आहे. तेथील सर्व मुलांना तिच बांगडी खेळायला हवी होती.


तिथे दोन जुळ्या मुली होत्या. एक कॅथेलीन उर्फ केट व दुसरी मार्गारेट उर्फ मॅगी. त्या दोघींना एकदम भूक लागायची. येथे छोटी आरामखुर्ची असते, त्यात घालून त्यांच्याभोवती पट्टा बांधायचा व भरवायचे. त्या दोघींना मी वेगवेगळ्या आरामखुर्चीत बसवले व त्यांना त्यांचे बेबीफूड भरवत होते. केटला घास भरवला की मॅगी रडायची व मॅगीला भरवले की केट रडायची. चिमण्या कशा चिवचिवाट करतात तशाच त्या दोघी चिवचिव करत होत्या त्यावेळेस.

.... आता थोडेसे डेकेअर बद्दल सांगते.


टोडलरमधील मुले जेवतात ती त्यांच्या हातानेच, येथे भरवण्याची पधदत नाही. काही मुले त्यांच्या डब्यातील जेवण संपवतात, तर काही खूपच रेंगाळत खातात तर काहीजणांचे जेवण बरेचसे खाली सांडते. मी तेथील मुलांना जास्तीतजास्त जेवण भरवायचे, आणि भरवल्यावर ती चांगली जेवायची. प्रत्येकाला जेवण गरम करून देतात. जेवायच्या आधी जीझसचे आभार मानतात, आपल्यासारखेच हात जोडून व डोळे मिटून. काहींना इतकी झोप आलेली असते की ते जेवताजेवताच झोपतात. काहीजण एकमेकांना घास भरवतात, तर काही जण स्वतःचे जेवण संपवून दुसऱ्यांच्या डब्यात डोकावतात. सहा महिन्याच्या वरील मुले त्यांच्या हातानेच दुधाची बाटली धरून दूध पितात, त्यांना दूध नको असेल तर पाळण्यात उभे राहून दुधाची बाटली बाहेर फेकून देतात.


येथील अमेरीकन babysitters ५० ते ६५ वयोगटातील जास्त प्रमाणात असतात. तरुण अमेरीकन मुली ही नोकरी करतात ते फक्त त्यांच्या शिकणासाठी पैसे उभारण्यासाठी किंवा काहीजणी दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत ही नोकरी करतात. त्यामुळे येथील डेकेअरमध्ये सतत babysitters चा तुटवडा असतो. प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक बनते, त्या वेळापत्रकात वर्गाचे नाव, babysitter चे नाव व प्रत्येकीचे वेगवेगळे टायमिंग.



येथे प्रत्येक मुलाची accident file बनवलेली असते, म्हणजे समजा कुणी कुणाला चावले, पडले, खरचटले, ताप आला तर त्या प्रत्येक घटनेची नोंद ठेवून त्यावर काय उपाय केले गेले हे पण लिहिले जाते, त्यानुसार मुलाच्या पालकांना सर्व सांगितले जाते. प्रत्येक मुलाचे रोजच्या रोज एक असे कागदी कार्ड बनवले जाते, त्यामध्ये तो जेवला का नाही, किती जेवला, किती वेळ झोपला, खेळताना मूड कसा होता हे सर्व लिहिले जाते.


येथे मुलांची दर महिन्याला भरपूर छायाचित्र काढली जातात, प्रत्येक स्थितीमधले झोपताना, जेवताना, खेळताना वगैरे, ते फलकावर लावतात. प्रत्येक मुलाचे त्याच्या आईवडिलांसमवेत असलेले छायाचित्र त्या मुलांच्या उंचीच्या त्यांना सहज दिसतील अशा कपाटावर चिकवटतात. दिवसभरात त्यांना आईवडिलांची आठवण आली की ते त्यांचे छायाचित्र बघतात. आईवडील न्यायला आले त्यांच्या मुलांना की लगेच धावत जाउन त्यांना मिठी मारतात. घरी जायला निघताना मुले त्यांच्या मित्रांना व babystitters ना मिठी मारून व त्यांचे पापे घेउन म्हणतात see you tomorrow.

अमेरिकेतील पाळणाघरे छान सजवलेली असतात. भरपूर सर्व प्रकारची खेळणी असतात. येथील स्वच्छता व मुलांची निगा चांगली राखली जाते. येथील babysitters ना खूप कामे असतात. दर तीन तासांनी डायपर बदलणे, जेवायची टेबल-खुर्ची ओल्या फडक्याने पुसून घेणे, व्हॅक्युम करणे. दर आठवड्याला मुलांच्या झोपायच्या गादीचे व उशीचे कव्हर धुणे. सर्व पाळणे ओल्या फडक्यांनी पुसून काढणे, शिवाय प्रत्येक खेळणे ओल्या फडक्याने पुसून काढणे, कचरा टाकणे इत्यादी. जेवणाच्या वेळी अन्न गरम करून देणे.


सर्व प्रकारची औषधे येथे उपचारासाठी ठेवलेली असतात. येथे वरचेवर मुलांचे पालक, babysitters व पाळणाघर चालिका यांची मीटिंग भरवली जाते. पाळणाघर चालवणारी बाई स्वतः दिवसातून तीन-चार वेळेला प्रत्येक वर्गात निरीक्षणासाठी जाते. रोजच्या रोज पालक मुलांना आणण्यासाठी जेंव्हा पाळणाघरात येतात तेंव्हा मूल ताब्यात घेतल्याची सही करायला लागते.


सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही मुले पाळणाघरात असतात. प्रत्येक वर्गात ८-१० मुले असतात. अमेरिकन कायद्याप्रमाणे ३ मुलामध्ये १ babysitter असणे जरूरीचे आहे. प्रत्येक वर्गात एक कायम व तिच्या मदतीसाठी १-२ अशा आळीपाळीने babysitter नेमाव्या लागतात. पाळणाघर चालिकेला हे खूप अवघड काम असते. प्रत्येक आठवड्यात प्रत्येक वर्गाचे वेगळे वेळापत्रक बनवावे लागते. येथे babysitters व पाळणाघर चालिका यांना substitute babysitters, substitute directors नेमलेल्या असतात.


अमेरिकन व्यतिरिक्त babyasitters ना (इंडीयन, मेक्सीकन, चीनी वगैरे) work permit असल्याशिवाय पाळणाघरात काम करण्याची परवानगी दिली जात नाही. अपवाद green card holder.

Monday, September 28, 2009

दसरा शुभेच्छा!

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!



दसरा आला की मला आठवण होते ती पाटीपूजनाची. माझे बाबा पूर्वी क्लास घेत असत. त्यात ते सर्वांना पाटी वापरण्याचा आग्रह करीत. आधी पाटीवर गणिते सोडवा, मग वहीत. क्लासला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक नियम असायचा की येताना पाटी घेऊन येणे. पाटी आणली नाही, विसरली, अशी कारणे सांगून भागत नसे. जो कोणी पाटी आणायचा नाही त्याला आमच्याकडून पाटी पुरवली जायची, कारण आमच्याकडे १०-१५ पाट्या होत्या. लहानपणी दरवर्षी आणलेल्या पाट्या जपून ठेवल्या होत्या. त्या सर्व पाट्यांची दसऱ्याला पूजा होत असे. पाटीवर लिहायला रूळ असायचे. भुसा घालून भरलेले १०० रूळ एका खोक्यात असायचे. मग एक रूळ तुटला की दुसरा घे, दुसरा तुटला की तिसरा घे असे करता करता रुळाचे असंख्य तुकडे जमा व्हायचे.



आईच्या घरापासून चतुः श्रृंगी चालण्याच्या टप्यात होती आणि नवरात्रात खूप गर्दी, त्यामुळे देवीचे दर्शन आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर घ्यायचो. आईच्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मुली म्हणजे आमच्या मैत्रिणी अशा आम्ही सर्व पहाटे ४ ला सर्व आवरून घराच्या बाहेर पडायचो आणि चालत चतुः श्रृंगीला जायचो. त्यावेळेला पुण्यातली हवा स्वच्छ शुद्ध असायची. त्यमुळे खूप प्रसन्न वाटायचे. तिथून रिक्षा करून कसबा पेठेतल्या देवीचे दर्शन. मंडईत त्यावेळेला नुकतेच उजाडलेले असायचे. मग बांगड्या भरायचा कार्यक्रम. नंतर बसने घरी परत. त्या वयात साडी नेसण्याचे खूप आकर्षण होते, त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी आईच्या साड्या नेसून आईचेच ब्लाऊज टाचून घालायचो. साडी नेसण्याचा उत्साह पाहून नंतर आईने आम्हाला एक काळा व एक पांढरा असे दोन ब्लाऊज शिवून दिले होते.



पुढे नोकरी लागल्यावर ऑफीसमध्ये दसऱ्याच्या दिवशी जेवणाच्या सुट्टीनंतर "पूजा मूड" असायचा. त्या ऑफीसमध्ये purchase, sales, accounts अशी departments होती. मग प्रत्येक department ला पूजेनिमित्त भेट व वेगवेगळी खादाडी. त्या कंपनीचे मालक मराठी असल्याने सगळीकडे मराठमोळे वातावरण होते.



इथे अमेरिकेत आल्यावर दसऱ्याची एक मजेशीर आठवण आहे. आम्हाला पहिल्यांदाच एक मराठी मुलगा भेटला. त्याची ओळख झाल्यावर त्याला आम्ही दसऱ्याला जेवायला बोलावले. त्या शहरात एक थायी दुकान होते. तिथे क्वचित भारतीय भाजी दिसायची. तेव्हा कधी नव्हे ते छोटी हिरवीगार कारली दिसली. मग दसऱ्याच्या मुहूर्तावर भरली कारली व शेवायाची खीर केली. कारल्याच्या नादात मात्र शेवयाची खीर बिघडली. कारल्याची भाजी बघितल्यावर तोही खुष झाला.

तुमच्या सर्वांच्या अशाच काही खास दसरा आठवणी असतीलच, त्या वाचायला आवडतील.

 

वरील व फोटो मला व्हॉटस ऍप फॉरवर्ड वरून आलेले आहेत विनायकचा मित्र हरीश कडून.
 

Wednesday, September 23, 2009

अविस्मरणीय नायगारा!!! (७)







डीजिटल कॅमेराने घेतलेले नायगारा धबधब्याचे चलचित्र

Tuesday, September 22, 2009

बगळा









आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे. इथे बरीच प्रकारची बदके आहेत. पांढराशुभ्र बगळा खूपच क्वचित दिसतो. आज दिसला आणि फोटो काढले.

अविस्मरणीय नायगारा!!! (६)

अमेरिकेत पाऊल पडल्या पडल्या प्रत्येकजण धाव घेतो ती नायगाराकडे! ऑर्कुटवर नायगारा धबधब्याचे फोटो पाहून पाहून असे वाटत होते की आता गेले नाही तरी चालेल! आमचा योग थोडा उशीराने आला पण आला तोच मुळी जबरदस्त योग आला, कारण की अमेरिका व कॅनडा अशा दोन्ही बाजूने नायगाराला पाहता आले. बरेच जणांकडून ऐकले होते की अमेरिकेपेक्षाही कॅनडातून धबधब्याचे दर्शन जास्त चांगले होते!



गुगल मॅपवर १४ तासांचा कारचा प्रवास पाहिला व विचार केला की विमानानेच जावे म्हणजे नायगारामध्ये जास्त वेळ मिळेल. विनायकला कॅनडामधील मित्रालाही भेटायचो होते. कॉलेजमध्ये ते एकत्र शिकत होते. विमानाने बफेलो विमानतळावर उतरलो. भाड्याची कार ताब्यात घेतली व नायगराच्या एका भारतीय उपहारगृहात येऊन पोहचलो. तिथे बटाट्याचे परोठे खाल्ले व एक चहा घेतला. रस्त्यावरून बहुतेक सर्व देशी माणसेच फिरत होती. कॅनडातील मित्राच्या घराचा परत एकदा गुगल मॅप बघितला व कारमध्ये बसून प्रवास सुरू केला. तिथून दोन तासाचा प्रवास होता. बोलता बोलता एक एक्झीट चुकली. थोड्यावेळाने परत मुख्य रस्त्याला लागलो. दुसरी एक्झीट होती ती खूपच गोलमाल होती. सात नंबरच्या एका एक्झीटवरून बरीच ठिकाणे दाखवत होते. नेमके कुठे जायचे काहीच कळेना! इथे एका हॅमिल्टन शहरात घुसलो गेलो व भुलभुलैय्यात अडकलो! कार रेंटलचा पहिलाच अनुभव, त्यानून नवीन देशात प्रवास आणि त्यात भर म्हणजे एक्झीटा चुकलो. तसे आम्ही चुकलो नाही, गुगल मॅप काही वेळा नीट दिशा दाखवत नाहीत. जाम वैतागलो होतो.



शेवटी एकदाचे ओंटारिओ मध्ये राहत असलेल्या मित्राच्या घरी पोहोचलो! गेल्यावर निवांतपणे गप्पा टप्पा झाल्या. गरमागरम चहा झाला. संजीवनीने जेवण अगदी माझ्या आवडीचे केले होते. दोन भाज्या, कोशिंबीर, लोणचे, आमटी, पोळी व गरम भात. पुणेरी जेवण जेवल्याने खूप समाधान झाले! जेवल्यावर मित्र म्हणाला कॅरम खेळायचा का? मी लगेचच हो म्हणाले. कॅरम!!! किती वर्षे झाली कॅरम खेळून! चौघेजण गेम खेळायला बसलो. कितीतरी वर्षांनी कॅरम पाहिला! शाळा कॉलेजमधले दिवस आठवले. आमच्या घरी अर्थातच आईबाबांच्या घरी सुट्टीमध्ये आम्हा भावंडांचा अड्डा असायचा. कुणी पत्ते खेळतयं , कुणी बुद्धीबळाचे डाव तर कुणी कॅरम. मला कॅरममध्ये खूप स्वारस्य होते. अवघड जागी असलेल्या सोंगट्या स्ट्रायकरने कट मारून घेण्यात मी खूप तर्बेज होते. मी, माझी बहीण, बाबा, मामेबहीणी, एकापाठोपाठ एक कॅरमसाठी नंबर लागायचे. काही वेळा पैसे पैसे खेळायचो. पांढऱ्या सोंगटीला २०, काळीला १० व राणी सोंगटीला ५० पैसे. ठराविक अंतरावर सोंगट्या ठेवून दुसऱ्या सोंगटीला धक्का न लागता सगळ्या सोंगट्या घ्यायच्या असाही एक खेळ होता. हे सर्व आठवले व खूप खूप आनंद झाला!!!!



खूप वर्षात कॅरमची सवय कुणालाच नसल्याने आमच्या चौघांचा लिंबुटिंबुचा खेळ चालू होता. अधुनमधून चेष्टामस्करी व हसणे खिदळणे चालू होते. नंतर मित्राच्या मुलाने खूप छान चहा बनवला व साधारण १ च्या सुमारास झोपलो. दुसऱ्या दिवशी उशीराने उठलो. मित्राच्या बायकोने संजीवनीने अत्यंत चविष्ट उपमा केला होता. त्यावर चहा घेतला व निघालो ते थेट डेज इन हॉटेलमध्ये येऊन थडकलो. हॉटेलच्या खोलीचा ताबा घेतला. स्वच्छ हातपाय तोंड धुतले. हॉटेलमधून खाली उतर्लो तर एक पंजाबी हट दिसली. त्यात शिरलो आणि एक सुखद धक्का बसला! जेवण अतिसुंदर होते. तिखटजाळ व तेलाचे तवंग न आलेल्या भाज्या होत्या. उसळ, आमटी, कोशिंबीर, गरम गरम पोळ्या!! अजून काय हवे!! चविष्ट जेवण जेवल्यावर खूप ताजेतवाने वाटले. हटच्या बाहेर चक्क काही चिमण्या दिसल्या. छोट्या व गोड चिमण्या. टुणटुण उड्या मारायच्या. परत उडायच्या. उड्या मारण्यासाठी परत खाली यायच्या. त्यांचा फोटो घेण्याचा विचार होता पण घेतला नाही याची खूप चुटपुट लागून राहिली आहे.



आता आम्ही धबधब्याच्या दिशेने चालायला सुरवात केली. जाऊन येऊन ५ मैल चालणे झाले. धबधब्याच्या कडेकडेने जाताना मजा येत होती. नायगारा नदीवरून एक पूल ओलांडून दुसरे दोन छोटे धबधबे लागतात व तेथून पुढे गेल्यावर कॅनडा बाजूने असणारा हॉर्सशू धबधबा अर्धा पहायला मिळतो. हा सर्व परिसर खूपच रमणीय आहे. झाडाझुडपांच्या मधून वाट काढली आहे. खूप लांबलचक वाट! मध्ये बसायला बाकडी आहेत आणि चालता चालता धबधब्याचा आवाज सारखा ऐकू येत असतो. मधले जे दोन छोटे धबधबे आहेत त्याच्या कठड्यावरून खाली पाहिले की नुसते पाहत बसावेसे वाटते. कड्यावरून प्रत्यक्ष खाली पडताना पांढरा शुभ्र धबधबा खाली असलेल्या छोट्या मोठ्या काळ्याभोर खडकांवर आदळत असतो. कोसळताना अनेकविध तुषारांचा एक प्रचंड धुळीसारखा दिसणारा लोळ निर्माण होतो. यापुढे अजुनही बरेच चालत पुढे जावे लागते. चालत चालत जाताना लांबवर एक लालसर छटा असलेला, साधारण गुलालासारखा रंग असलेल्या लोळ दिसला. तो होता हॉर्सशू फॉल. एव्हाना थोडी संध्याकाळ झाली होती. निसर्गनिर्मित गुलालासारखा दिसणारा रंग तिथे पोहोचता क्षणी फिकट जांभळा झाला!



पांढरा शुभ्र धबधबा नुसता कोसळत होता. त्याचे तुषार अंगावर उडत होते. पाणी एकदम स्वच्छ व नितळ!! फोटो व विडिओ काढले. कठड्यावरून धबधब्याला पाहताना डोळे तृप्त होत होते. किती पाहू न किती नाही असे झाले होते. चालून चालून परत खूप भूक लागली. मग एक छान व्हनिला आयस्क्रीम खाल्ले. थोड्यावेळाने जेवून परत हॉटेलवर हजर. त्यादिवशी अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटल्यावर सारखा धबधबा दिसत होता! त्याचा एका लयीत वाजणारा आवाज ऐकू येत होता! पहाटे पहाटे मग थोडा डोळा लागला.



नायगारामध्ये सकाळी ११ शिवाय कोणतेच उपहारगृह उघडत नाही. हॉटेलमध्ये कॉफी घेतली. तयार होऊन निघालो ते परत पंजाबी हटमध्ये. खरी तर खूप भूक लागली होती पण जेवले की संपले! म्हणून मग दोन सामोसे व चहा घेतला व निघालो धबधब्याची मुख्य आकर्षणे पहायला. maid of the mist , cave of the winds . maid of the mist ही एक बोट राईड आहे. ही बोट सगळ्यांना कॅनडाच्या हॉर्सशू धबधब्यासमोर नेते. तिथे गेले की अगदी पावसात भिजल्यासारखे होते म्हणून निळ्या रंगाचे रेनकोट देतात. रेनकोट घातल्यावर परत सगळ्यांचे फोटो काढणे सुरू! एक बोट नुकतीच निघाली होती. अर्ध्या तासाचा अवधी होता. तिथून बऱ्याच वरपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या व बाजुने धरायला लोखंदी बार होते. पायऱ्या पूर्ण ओल्या झाल्या होत्या. थोडे पाणी पण साचले होते. या पायऱ्यांवर सगळ्यात वरती चढून जो बाजूने धबधबा दिसत होता ना तो तर अति अति क्लासिक दिसत होता. मी व एक साऊथ इंडीयन मुलगी आम्ही दोघी भराभर वर गेलो! कारण की संधी सोडायची नाही. जाताना धबधब्याचे अगणित तुषार अंगावर उडत होते. तिथे एकेमेकींचे फोटो काढले. काही वेळाने वाऱ्याने दिशा बदलली व धबधब्याचे पाणी चक्क आमाच्या अंगावर कोसळले. पूर्ण भिजायलाच झाले. थोडीशी भीतीही वाटली. हळूहळू करत खाली उतरलो व बोटीमध्ये बसलो. बोट राईड छानच झाली!



धबधब्याची खरी मजा येते ती cave of the winds या आकर्षणामध्ये! धबधब्याच्या समोरच एक लाकडी जिना केला आहे तिथे चढून धबधब्याच्या अगदी खालीच जाता तुम्ही. इथे तर पूर्ण अंघोळच होते. धबधब्याचा प्रवाह व आवाज इतका काही जबरदस्त असतो ना! पांढरा शुभ्र खळाळता धबधबा ओसंडून वाहत असतो. काळ्याभोर खडकांच्या आजुबाजुने वाट काढत वाहत असतो. इथून तर अजिबात जावेसे वाटत नाही. इथे सर्वांना पिवळे रेनकोट देतात. शिवाय वेगळ्या चपला पण देतात. हाच धबधबा आम्ही काल वरून खाली कोसळताना पाहिला होता. आज दुपारी उन्हात छान चमचमत होता. इथेउन वर पाहिले असता कड्यावरची माणसे ठिपक्यांसारखी खूप छोटी दिसतो होती. खूप खूप उंच! काळा पहाडी कडा व कड्याच्या दोन्ही बाजुने धबधबणारा धबधबा! एक प्रकारचे विश्वरूप दर्शनच! इथे आम्हाला दोन इंद्रधनुष्य दिसली! खूप जवळून, पायाला स्पर्श करणारी! इंद्रधनुचे रंग जवळून खूपच ठळक दिसत होते. परत चालत चालत दुपारच्या जेवणाला पंजाबी हट. मग हॉटेलमध्ये जाऊन फोटोज व विडिओज पीसीमध्ये भरले. मेल, ऑर्कुटवर चकरा मारल्या व थोडा आराम केला. रात्रीच्या जेवणासाठी कोहिनुर उपहारगृहात गेलो. तिथे छोले भटुरे व आंबा लस्सी घेतली.



दुसऱ्या दिवशी परत ११ वाजता गरम सामोसे व चहा घेऊन निघालो ते रेनबो पूलावरून चालत चालत कॅनडात गेलो. इथून तर अमेरिकन धबधबा खूपच छान दिसत होता. मुख्य म्हणजे समोरून दिसत होता! फूटपाथवरून चालताना खूपच मजा येत होती. म्हातारी माणसे, छोटी मुले, तरुण तरूणी सगळे रमतगरमत चालत होते. मध्येच बाकड्यावर बसावे, मध्येच थांबून नायगाराला पाहावे, फोटो काढावे. इथे शेवटी एक आकर्षण आहे ते हॉर्सशू फॉलचे. हा धबधबा फारच छान आहे! इथे behind the falls हे एक सुंदर आकर्षण आहे. इथे बोगद्यातून जावे लागते पिवळे रेनकोट घालून. धबधब्याच्या पाठामागच्या खडकाला एक भलेमोठे भगदाड पाडले आहे. इथे बोगद्यातून बाहेर पडताना कसा लख्ख प्रकाश दिसतो तसाच प्रकाश इथेही दिसतो. या भल्यामोठ्या भगदाडातून धबधब्याचे मागून दर्शन होते. इथे तर धबधब्याचा आवाज प्रचंड मोठा असतो. इथे एक विडिओ घ्यायला हवा होता. थोडेसे खाली जाऊन एक छोटा गोलाकार भाग केला आहे. इथून साईडने धबधबा कोसळताना दिसतो. अगदी जवळून पाहता येते. वर पाहिले तर कितीतरी उंचच उंच!



आता परत परतीच्या मार्गावर सुरवात झाली. जाताजाता मधेमध्ये थांबून धबधबा पाहणे, फोटो काढणे, थोडावेळ बाकावर बसणे, असे करत करत परत रेनबो पूलावरून अमेरिकेतल्या पंजाबी हटला परतलो. रेनबो पूल हा अमेरिका व कॅनडाला जोडणारा पूल आहे. जेवून परत हॉटेल मध्ये प्रवेश! थोडा आराम केला. ऑर्कुट, संकेतस्थळावर चकरा मारल्या व परत निघालो ते रात्रीचा रंगीबेरंगी धबधबा पहायला. ही चक्कर मात्र थोडी असह्य झाली कारण की सकाळीच ३-४ मैल चालणे झाले होते. आता हे शेवटचे दर्शन म्हणून परत निघालो होतो. जाऊन येऊन हा परिसर साधारण ५ मैलाचा आहे. फिकट जांभळा, पिवळा, लाल, हिरवा असे धबधब्याचे रात्रीचे रंग बघितल्यावर येताना मात्र चालणे अशक्य झाले होते. इतकी काही वाईट अवस्था झाली होती की विचारायची सोय नाही. पायात गोळे यायला लागले होते, प्रचंड भूक लागली होती! कधी एकदा पंजाबी हट दिसत्ये असे झाले होते. हटमध्ये गेल्यावर जेवणावर तुटून पडलो. एकमेकांशी अजिबात बोललो नाही. तांदुळाची खीर २-३ वाट्या प्यायली. लोणच्याची चव तर इतकी छान लागली ना! जेवल्यावर पाय दुखायचे थांबले. उत्साह आला. अडीच दिवसात आम्ही साधारण २० मैल चाललो.



रात्री हॉटेलवर झोपता झोपता विचार केला की निसर्गाच्या सान्नीध्यात आपण काहीही करू शकतो. त्या दिवशी रात्री इतके काही समाधान वाटत होते ना! खूपच! धबधब्याला डावीकडून, उजवीकडून, मधून, खालून, वरून, कोपऱ्यातून, पाठीमागून पाहिले होते!! पांढऱ्या शुभ्र कोसळणाऱ्या धबधब्याला पाहून मन कसे अगदी तृप्त तृप्त झाले होते!!!!

Monday, September 21, 2009

अविस्मरणीय नायगारा!!! (५)










View from Canada रेनबो पूल ओलांडून कॅनडामध्ये चालत गेलो. इथून अमेरिकन फॉल्सचे समोरून जास्त चांगले दर्शन होते.

अविस्मरणीय नायगारा!!! (४)









Horseshoe Falls Canada

अविस्मरणीय नायगारा!!! (३)







cave of the winds इथे धबधब्याच्या खाली खूप मजा येते. पूर्ण अंघोळ होते. इथेच आम्हाला दोन इंद्रधनुष्ये दिसली, खूप जवळून पायाला स्पर्श करणारी!!

अविस्मरणीय नायगारा!!! (२)





Maid of the Mist Boat ride

बोटीतून जाताना घेतलेले धबधब्याचे फोटो

अविस्मरणीय नायगारा!!! (१)









बोट राईड साठी थोडा वेळ होता म्हणून इथे जाऊन आलो. कडेकडेने पायऱ्या आहेत व बाजुला धरायला लोखंडी बार आहेत. इथे धबधबा जवळून पण बाजूने बघता आला. थोड्यावेळाने वाऱ्याने दिशा बदलली तर एकदम अंगावरच कोसळला थोडासाच पण पूर्ण भिजायला झाले. खूप छान वाटले इथे!

Monday, August 31, 2009

Art Photography (2)







Tuesday, August 25, 2009

मंगळागौर - एक आठवण

पूर्वी मामेबहिणींच्या मंगळागौरीला केलेले जागरण आठवले. भरपूर खेळता यावे म्हणून कार्यालय घेतले होते. त्यामध्ये रात्रभर जागरण. फेर धरून विविध गाणी व अनेक खेळ. गाठोडी व सुपारी, झिम्मा, फुगड्या, उखाणे घेणे. त्यामध्ये एक गाणे असे होते. २ गट पाडायचे. एका गटानी संथ व दुसऱ्या गटाने जलद, परत पहिल्या गटाने अतिजलद असे ते एकच गाणे म्हणायचे टाळ्या वाजवत. ते गाणे असे. यमुनेच्या काठी किती बुलबुल असतील, बुलबुल असतील १ तरि २ तरि ३ तरि असतील, ४ तरि, ५ तरि ६ तरि असतील, ७ तरि ८ तरि ९ तरि असतील, १० बुलबुल हो हो हो.

बहुतेक अन्नपूर्णा देवीची पूजा करतात व पूजेनंतर विविध रंगांच्या फुलांची आरास करतात. हळदीकुंकवाला ज्या बायका बोलावतात त्यांना मटकीची उसळ, वाटली डाळ व कॉफी देतात. मंगळागौरीच्या पूजेसाठी नुकतीच लग्न झालेली किंवा ज्या मुलीच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली नाहीत अशा सर्वांना बोलावतात. ह्या मुलींना वशेळ्या असे म्हणतात. शब्दाची व्युत्पत्ती माहीत नाही. अशा मुली मंगळागौरीची पूजा करतात व त्यांना आधी जेवायला वाढतात. जेवताना मुलींनी मौन व्रत पाळायचे असते. जेवणात पुरणपोळी असते.

माझी मंगळागौरीची खास आठवण म्हणजे एकापाठोपाठ आम्हां बहिणींची लग्न झाल्याने आईने आमची एकत्रच मंगळागौर केली होती आणि योगायोगाने आमच्या दोघींच्या शालुचा रंग एकच होता. हिरव्या मेंदीचा रंग होता. हिरव्या काचेच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, अंगठी, पाटल्या, बांगड्या, कानात झुमके त्याला लागुन वेल, नाकात चमकी, हातापायाला मेंदी, गजरे असे सर्व काही होते. पूर्वीचे दिवस आठवले व छान वाटले.

यमुनेच्या काठी किती बुलबुल असतील, बुलबुल असतील १ तरि २ तरि ३ तरि असतील, ४ तरि, ५ तरि ६ तरि असतील, ७ तरि ८ तरि ९ तरि असतील, १० बुलबुल हो हो हो.

हेच परत उलट्या क्रमाने म्हणायचे १० तरि ९ तरि ८ तरि असतील, ७ तरि, ६ तरि, ५ तरि असतील, ४ तरि, ३ तरि २ तरि असतील १ बुलबुल हो हो हो

असे संथ, जलद, अतिसंथ, अतिजलद व वेगवेगळ्या रिदम मधे गायचे.

बायकांनी फेर धरल्यावर जिची मंगळागौर असेल तिला फेऱ्यामध्ये अडकवायचे व खुर्ची का मिरची खेळायला सांगायचे आणि तिने पण बायकांची नजर चुकवून त्या फेऱ्यामधून बाहेर पडायचे. ती म्हणणार "खुर्ची का मिरची" बाकीच्या बायकांनी म्हणायचे "जाशील कशी" सासूबाई बोलावतात, बाकीच्या "बरं करितात". नंतर काही बायका सूप घेउन नाचतात. मग बाकीच्या बायका "नाच गं घुमा, नाचणारी बाई "कशी मी नाचु" " या गावचा त्या गावचा xx नाही आला xx नाही मला नाचु मी कशी "

मंगळागौरीचे उद्यापन पण असते. या उद्यापनात मुलीच्या आईवडिलांना मुलीने अहेर द्यायचा असतो. अहेरामध्ये आईला मणी मंगळसूत्र, जोडवी देतात व ऐपतीप्रमाणे सोन्याचा किंवा चांदीचा नाग देतात.

खेळ

गाठोडी घालणे - खाली बसून मांडी घालायची व पाउले दोन्ही हातात धरून तश्याच अवस्थेत एक गुडघा जमीवर टेकून एक वळसा देवून परत दुसरा गुडघा जमिनीवर टेकून परत दुसऱ्या बाजूने वळसा देणे.

होडी खेळणे - एकमेकींच्या पाउलावर बसून एकमेकीच्या गुडघ्याला हाताचा विळखा घालून त्याच अवस्थेत एकीने जमिनीवर पाठ टेकणे या अवस्थेत दुसरी वर तरंगेल. हाच क्रम परत दुसरी करेल. असे भरभर करणे. म्हणजे होडी जशी हलते ना त्याप्रमाणे दिसेल. फक्त एकमेकींना त्यांचे वजन पेलता आले पाहिजे.

सुपारी - एकमेकींचे हात वर धरून हात न सोडता गोल गोल व भरभर वळणे.

साखळी - यात २५-३० बायका ओळीने समोरासमोर एकमेकींचा हात वर धरून उभ्या राहतात. समोरासमोर हात धरलेल्या बायकांची एक जोडी ज्या दुसऱ्या समोरासमोर बायका हात वर धरून उभ्या आहेत त्या ओळीमधून जातात आणि परत तशाच उभ्या राहतात, मग दुसरी जोडी, मग तिसरी. आणि हे सर्व भरभर करायचे. या खेळामधे पण खूप मजा येते. या खेळाचे नाव माहित नाही. यामध्ये बायका टिचक्या वाजवून एकेक पाय वर करुन गोल गोल नाचून गाणे म्हणतात साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड फू बाई पगड फू

बायका पिंगा घालतात आणि गाणे म्हणतात "पिंगा ग पोरी पिंगा" यामध्ये जावई व सून यांच्या तक्रारी सांगतात. यात खेळीमेळीचे वातावरण असते.

अजुन एक खेळ आहे या खेळाचे नाव माहित नाही. दोन बायका पाठीला पाठ लावून व एकमेकींच्या कमरेत हाताचा विळखा घालून एकदा एकीने खाली वाकायचे की दुसरी बाई तिच्या पाठीवर तरंगते मग दुसरी बाई खाली वाकते यात पहिली बाई दुसरीच्या पाठीवर तरंगते.

मंगळागौरीचे उद्यापन लग्नाची ५ वर्षे पूर्ण झाली की करतात. हे उद्यापन मंगळागौरीच्या दिवशीच करतात. दुसऱ्या कोणाच्या मंगळागौरीमधे हे उद्यापन करायचे असते. म्हणजे बहिण किंवा इतर नातेवाईक यांच्या मंगळागौरीमध्येच उद्यापन करायचे. नोकरीनिमित्ताने वेळ होत नाही म्हणून पहिल्या वर्षी केले तरी चालते. जी मुलगी उद्यापन करते तिच्या नवऱ्याने पण पूजेला बसायचे असते.

Monday, August 24, 2009

आठवण गौरीगणपतीची








गणपतीचे दिवस जवळ आले की पुण्यातले खाऊवाले पाटणकर यांचे माझ्या बाबांना एक पत्र यायचे की "पेणवरून गणपतींच्या सुंदर व सुबक मूर्ती आल्या आहेत."

गणपतीच्या दिवशी सकाळी आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर गणपती आणायला जायचो. बाबांच्या हातामध्ये ताम्हण व त्यात आमच्या गणपतीची सुरेख मूर्ती असायची. त्या गणपतीचे डोळे रेखीव व बोलके असायचे. त्याच्याकडे पाहिले की तो आपल्याकडे बघून हसतो आहे की काय असा भास व्हायचा. शेंदरी रंगाचे पितांबर आणि आकाशी रंगाचे उपरणे. सोंडेवरचे नक्षीकाम जणुकाही चांदी सोन्याचे आहे की काय असे वाटे. गणपतीच्या खांद्यावरती आमच्या घरचे एक अबोली रंगाचे पारदर्शक उपरणे असायचे.

गणपतीचे आगमन होताना आई आमच्या तिघांचे औक्षण करायची. आमच्या तिघांच्या पायांवर आधी थोडे गरम पाणी, मग थोडे दूध व परत थोडे गरम पाणी ओतून तिघांच्या पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढून औक्षण करायची. "गणपती बाप्पा मोरया" असे म्हणत गणपतीचे आगमन व्हायचे.

गणपतीच्या गळ्यात आम्ही सोन्याची साखळी घालायचो व त्याच्या बोटात बदामाच्या आकाराची व त्यावर छोटे घुंगरु अशी अंगठी. माझे बाबा गणपतीच्या हातावर थोडे सुंगधी अत्तरही लावायचे. गणपतीला चंदनाचे गंध लावून त्यावर अक्षदा व गुलाबाची पाकळी. आमच्या घरी जाईच्या फुलांचा मोठा वेल आहे. गडद लाल रंगाचे जास्वंदीच्या फुलांचे झाड आहे व अंगणात अगणित दूर्वा. जाईची थोडी फुले, त्यानंतर हिरव्या गर्द दूर्वांची जुडी व त्यानंतर एक गडद लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अशा क्रमाने भरगच्च हार गणपतीला खूप शोभून दिसायचा. छोटा सुबक लाकडी देव्हारा, त्यात गणपतीची मूर्ती, भरगच्च हार व सप्तरंगी दिव्यांची झगमगती माळ. अशा गणपतीचे रूप डोळ्यात साठवून आम्ही सर्व त्याला मनोभावे नमस्कार करायचो.

आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असल्याने दुसऱ्या दिवशी त्याची निघण्याची तयारी. निघताना गणपतीला माझी आई केळीच्या पानामध्ये दही पोह्याचा खाऊ द्यायची आणि म्हणायची, " पुढच्या वर्षी लवकर येरे बाबा." त्याला निरोप देताना आमच्या डोळ्यात पाणी यायचे.

आमच्याकडे गौरी खड्याच्या. बागेतून खड्याच्या गौरी आणायला आम्हा बहिणींना खूप मजा वाटायची. आई आम्हाला बागेतून गौरी आणायला सांगायची. पूजेचे सर्व साहित्य घेऊन जायचो. त्यात गंध, अक्षदा, कापसाचे हळदीकुंकू लावून बनवलेले वस्त्र, उदबत्ती, निरांजन अशी सगळी तयारी घेऊन खास गौरी गणपतीला शिवलेले फ्रॉक घालून जायचो बागेत.


मातीचे अंगण असल्यामुळे त्यात बरेच खडे पण असायचे. मग त्यातल्या त्यात चांगले पाच खडे घेवून त्याची पूजा करून चांदीच्या कमळामध्ये त्या खड्यांची गौरी म्हणून स्थापना व्हायची. सुवासिक फुलांबरोवर गुलबक्षीच्या फुलांची हाताने विणलेली वेणी पण असायची. बागेतच मग हातातली घंटा वाजवून आरती म्हणायचो. नंतर तोंडात पाणी घेऊन गौरींना घरी घेऊन यायचो. तोंडात पाणी अशाकरता की गौरी घेऊन जाताना बोलायचे नसते.

आई आमच्या दोघींचे व गौरींचे औक्षण करायची. रांगोळीच्या छोट्या पाउलांवरून चालत येऊन गौरी देव्हाऱ्यात स्थानापन्न व्हायच्या. गौरींचा खास नैवेद्य म्हणजे घावन घाटले. घावन म्हणजे तांदुळाच्या पिठीचे धिरडे. घाटले म्हणजे नारळाच्या दूधात गूळ व वेलची घालणे. त्यादिवशी आमच्या घरी एक मामेबहीण माहेरवाशीण म्हणून जेवायला असायची.
अशी ही गौरी गणपतीची आठवण मनात कायमची कोरली गेली आहे.

तू सुखकर्ता तू दुखहर्ता... तूच कर्ता आणि करविता.... मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया... मोरया मोरया अष्टविनायक मोरया...


गणेश मूर्ती - ती. श्री. आनंद जोशी यांच्याकडून मला आलेली भेट. अगदी अशीच मूर्ती व सजावट माझ्या माहेरी असायची. ही मूर्ती मला माझ्या माहेरची आठवण करून देते. श्री जोशी यांचे अनेक आभार.