आज बगळ्याचे मनसोक्त फोटो काढले. तळ्यावर बराच वेळ बगळा होता. तळ्याच्या दोन्ही काठावर इकडून तिकडे करत होता. शिवाय तळ्याजवळील एका लाकडी चौथऱ्यावर पण बराच वेळ बसला होता. बगळा अगदी क्वचितच दिसतो. त्याला पाहिला आणि फोटो काढायला गेले तर लगेच उडून जातो. पण आजचा दिवस जणू काही त्या बगळ्याचा फोटो काढण्याचाच होता. त्याची लांब चोच आणि डोळे तर खूपच सुरेख दिसतात.
Friday, March 16, 2012
बगळा (१)
आज बगळ्याचे मनसोक्त फोटो काढले. तळ्यावर बराच वेळ बगळा होता. तळ्याच्या दोन्ही काठावर इकडून तिकडे करत होता. शिवाय तळ्याजवळील एका लाकडी चौथऱ्यावर पण बराच वेळ बसला होता. बगळा अगदी क्वचितच दिसतो. त्याला पाहिला आणि फोटो काढायला गेले तर लगेच उडून जातो. पण आजचा दिवस जणू काही त्या बगळ्याचा फोटो काढण्याचाच होता. त्याची लांब चोच आणि डोळे तर खूपच सुरेख दिसतात.
Monday, March 12, 2012
Thursday, March 08, 2012
वास्तू (४)
पूर्वी दात घासायचो तेव्हा सुरवातीला दात घासायचे ब्रश कुठे होते, आम्ही राखुंडीने दात घासायचो. काळी दंत मंजन व चंचला अशा दोन राखुंड्या होत्या. साबणही हिरवा हमाम असायचा. धुण्याचा साबण ५०१ बार मोठा चौकोनी जाडजूड होता. तो बरेच दिवस टिकायचा. भांडी घासली जायची तीही राखेने. पितळ्याची सर्व भांडी चिंचेने घासली जायची. भांडी घासण्याकरताही वेगळ्या घासण्या नव्हत्या. नारळाच्या शेंड्या आई जमा करून ठेवायची.
बाथरूममध्ये जो नळ होता तो पितळी होता. नळाला पाणी यायचे तेही दिवसातून दोनदा यायचे. पहाटे ५ ला यायचे ते सकाळी ८ वाजेपर्यंत असायचे व दुपारी ५ ला यायचे ते रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत असायचे. रात्री झोपताना आम्ही नळ उघडा करून त्याखाली बादली ठेवायचो. पहाटे पाचला नळातून फुर्र फुर्र आवाज करत धोधो पाणी यायचे. पाणी आले की पहिली आई उठून चहा ठेवायची व आम्हाला उठवायची. आम्हाला सर्वांनाच लवकर उठायला लागायचे. एक तर पाणी लवकर जायचे आणि शाळाही सकाळची असल्याने पटपट आवरून ६.४५ ची बस पकडायला लागायचि. दुपारची शाळा असली तरीही लवकर आवरायला लागायचे कारण की सर्वांच्या अंघोळी वगैरे उरकून सर्व बादल्या, बंब व पत्र्याचा ड्रम भरून ठेवायला लागायचा. दुपारचे पाणी यायचे पण ते जर का ते काही कारणाने आले नाहीच तर भरलेले सर्व पाणी सकाळपर्यं पुरवायला लागायचे.
आईकडे मोलकरीण असल्याने आम्हा दोघी बहिणींना कधी घरी धुणे भांडी करायला लागली नाहीत. कदमबाईंना खूप कामे असल्याने त्यांची मुलगी आमच्याकडे यायची. शनिवार रविवार ती भांडी कशी घासते ते आम्ही बघायचो व तिला सांगायचो आम्ही पण घासतो ना दोन तीन भांडी. आमच्यावर ती ओरडायची व म्हणायची की नको तुमची आई मला ओरडेल. मग आम्ही तिला म्हणायचो नाही ओरडणार. आम्हाला दोन चार ताटल्या तरी देना घासायला. तशी द्यायची काही वेळेला. ती भांडी घासताना दोन बादल्या पाणी भरून घ्यायची. भांडी घासून झाली की ती घासून झालेली सर्व भांडी एका बादलीत टाकायची त्यामुळे ती बरीचशी बादलीतच स्वच्छ व्हायची व एकेक करून दुसऱ्या बादलीतल्या पाण्याने हाताने पाणी घालून ती सर्व भांडी विसळायची. ही पद्धत आम्हाला खूप आवडली होती.
आमच्या घराची झाडलोट पण किती छान व्हायची. पूर्वी झाडू होते. या झाडूने केर काढायचा की खूप खाली वाकावे लागे कारण की हे झाडू बुटके असायचे. नंतर लांबलचक कुंचे आले. कुंच्याने केर काढायला मजा वाटायची. बाजारात गेलो की जास्तीत जास्त उंच कुंचे निवडायचो. खाली न वाकता केर काढायला छान वाटायचे. कुंचे आल्यावर केर काढण्यासाठी आमची भांडणे! दर दोन महिन्यांनी जळमटे काढून फरशी धुवायचो. फरशी धुणे हा एक मोठा कार्यक्रम असायचा. उंच काठीला केरसुणी सुतळीने बांधून भिंतीवरची उंचावरची जळमटे काढायचो व निरानिपटी सर्व कानाकोपऱ्यातून केर काढले जायचे. सर्वात शेवटी फरशी धुण्याचा कार्यक्रम. याकरता आधी फरशीवर असलेले सामान कॉटांवर ठेवायचो.
आई बादलीभर उकळत्या पाण्यात धुणे धुवायची पावडर घालायची व त्याचा खूप फेस यायचा. बादलीच्या वर फेस येऊन नंतर तो बादली बाहेरही यायचा. आई हे उकळते पाणी तांब्याने फरशीवर टाकायची व खसाखसा फरशी धुतली जायची. सकाळी लवकर उठून ही कामे उरकायला लागायची. फरशी ब्रशने खसाखसा धुवून झाली की भरपूर बादल्या पाणी फरशीवर ओतायचो. हळुहळू करत सर्व फेस बाहेर ढकलायचो. दोन्ही खोल्यांना दार असल्याने पाणी भराभर अंगणात जायचे. खराट्यानेही पाणी बाहेर काढायला मदत व्हायची. सर्वात शेवटी तरटे घेऊन फरशी पुसायचो. तरटाला लागलेले पाणी एका बादलीत पिळायचो. ते पाणी काळे असायचे. तरटाने बरीचशी फरशी पुसून घेतली तरीही फरशी थोडी ओली असायची. नंतर स्टुलावर रॅलीचा पंखा ठेवून तो सुरू करायचो. मग त्या वाऱ्याने उरलेली ओली फरशी वाळायची. फरशी धुतल्यावर एखाद्या मळकट मुलीला अंघोळ घातल्यावर ती कशी स्वच्छ दिसते तशी फरशी स्वच्छ दिसायची! रॅली पंख्याची पाती लव्हेंडर रंगाची होती. पंखा सुरू केला की ही पाती गरागरा फिरून एक छान रंग निर्माण व्हायचा. हा लव्हेंडर रंग खूप छान दिसायचा. माझ्या मैत्रिणीकडे जो रॅलीचा पंखा होता त्याची पाती शेंदरी रंगाची होती. खूप सुंदर दिसायचे हे पंखे. या रॅली पंख्याला झाकण्याकरता आई एक कव्हर शिवायची. भरपूर पाण्यात फरशी धुण्याची मजा काही औरच होती.
क्रमश:
Wednesday, March 07, 2012
Art Photography
आज चंद्राचा खूप छान फोटो मिळाला. खूप गोड दिसत होता आज चंद्र आकाशामध्ये. तसेच रविवारी इंद्रधनूही पाहायला मिळाले. तेही खूप छान दिसत होते. शिवाय एक तळ्यातील पाण्याचा फोटोही छान मिळाला. त्यात पांढरे ढग दिसत होते आणि वाऱ्यामुळे पाण्यावर लहरी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे तो फोटोही असाच छान मिळाला. शिवाय प्रखर सूर्याचा फोटोही घेतला आहे अर्थात हा फोटो काढला आहे त्याला बरेच दिवस झाले.
Sunday, March 04, 2012
Thursday, March 01, 2012
वास्तू (३)
आईने घरी घालायचे मॅक्सीही खूप शिवलेले आहेत. मॅक्सी हा कपड्यांचा आटोपशीर प्रकार होता. त्यात अम्रेला कट असायचे. फ्रॉकमध्ये चुण्याचुण्याचे व प्लेटीचे फ्रॉक असायचे, कधी कधी बॉक्स प्लेटीचेही! गळ्याला व खाली फ्रॉकला झालर असायची. आईचे ब्लाऊजही आई घरीच शिवायची व त्याला काजेही घरीच करायची. आम्ही दोघी बहिणी ब्लाऊजला व ड्रेसला बटणे आणि हुकलूप लावायचो. घरी सिंगचे मशीन होते. या मशीनला एक ड्रॉवरही होता. त्यात रिळे, सुया , टेप व कात्री ठेवलेली असायची. मशीनचे काम जेव्हा नसेल तेव्हा ते मशीनलाच असणाऱ्या लाकडी चौथऱ्यावर उपडे करून ठेवायचो. हे मशीन बाहेरच्या खोलीत होते आणि ते स्वयंपाकघरात येणाऱ्या दाराच्या बाजूला आडवे ठेवलेले होते. त्याखाली एक लाकडी स्टुलही असायचे.
मशीच्या वरती भिंतीवर एक काचेचा आरसा लावला होता. त्या काचेवरच कोरलेली नक्षी होती आणि त्याला लागून काचेचीच आडवी पट्टी जोडली होती. त्यावर पाँड पावडरीचा मोठा डबा एका बाजूला. त्याशेजारी एक छोटा प्लॅस्टीकचा डबा. मोठ्या डब्यातील पावडर आम्ही त्या बाजूला असणाऱ्या प्लॅस्टीकच्या डबीत काढून ठेवायचो. हा डबा गोल आणि त्याचा रंग होता गुलाबी आणि झाकण होते लाल. त्यात एक निळा छोट्या आकाराचा स्पंज होता. त्याने पावडर लावायचो. जाईचे काजळ होते. अफगाण स्नो होता. ओले श्रुंगारचे लाल व काळे कुंकू होते. लाल आईकरता व काळे आमच्याकरता. शिवाय २ कंगवे व एक फणी होती. मोठा कंगवा आमच्या तिघींसाठी व एक लांब निमुळता कंगवा बाबांचा होता. मिसळीच्या आलेल्या उवा व लिखा काढण्यासाठी एक फणी होती. शाळेला वेणी घालून जायचे असेल तर त्याकरता काळ्या रिबिनी होत्या. रिबिन्या बांधून लांब पेडाच्या वेण्या आई घालायची. पेडाला शेवटी शेवटी रिबिनी बांधून थोडे उरलेले पेड घालून त्याला रिबिनीच एक गाठ बांधायचो आणि मग ती वर कानामागे पेंडांना घट्ट आवळून बांधायचो. या रिबीनीची वर एक गाठ बांधली की मग उरलेली रिबीन एखाद्या फुलाप्रमाणे आकार देवून बांधायचो. शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर जाताना लाल, गुलाबी, पिवळ्या व पांढऱ्या व निळ्या रिबीनी होत्या.
आई आमच्या वेण्या घालायची त्यातही बरेच प्रकार होते. दोन वेण्या, चार वेण्या, झोपाळे, बटवेणी, एक वेणी. गोंड्याप्रमाणे थोडे केस पेडीच्या खाली असेच सोडून द्यायचो त्या म्हणजे गोंड्याच्या वेण्या. रिबीनी जाऊन रबरे आली. वेगवेगळ्या प्रकारचे चाप आले, क्लिपा आल्या. माझी बहीण वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा कानामागील केसांना लावायची. तिला त्या छान दिसायच्या! मला मात्र क्लिपा हा प्रकार आवडला नाही आणि माझे केस पातळ व मऊ असल्याने त्या बसायच्याही नाहीत. दर रविवारी आई आम्हा दोघी बहिणींना नहायला घालायची. त्याकरता शिकेकाई उकळली जायची. कधीकधी रिठे. अंघोळीकरता पाणी आधी स्टोव्हवर तापायचे. त्या आधी बंब अंगणात होता. त्यात लाकडे जाळून बंब पेटवायचो व त्यातले पाणी अंघोळीकरता घ्यायचो. गॅस आला व त्यानंतर सर्व काही गॅसवरच. नंतर बंबाला कॉईल लावून घेतली. त्यानंतर तर अंघोळ म्हणजे खूप आनंद होता. भरपूर पाणी घ्या. आंम्ही तर चांगल्याच डुंबायचो भरपूर पाणी घेऊन. त्यामुळे नहाणे तर खूपच छान होत होते. केस धुतल्यावर आई केस पंचाने गुंडाळून त्याचा मोठा अंबाडा घालून द्यायची. हा अंबाडा बराच वेळ राहू द्या म्हणजे केस कोरडे होतील असे आई म्हणायची. बऱ्याच वेळानंतर पंचाने बांधलेला अंबाडा सोडला की केस पंचानेच खसाखसा घासायचे व नंतर पंचानेस केस उलटे करून झटकायचे. त्या दिवशी नंतर आई आमच्या केसातल्या जटा काढून सैलसर एक वेणी घालत असे.
क्रमश:
Subscribe to:
Posts (Atom)


