Tuesday, January 14, 2020

एका कथेचा जन्म

आज सकाळी उठल्यावर मानसी एकदम खुशीत  असते. आदल्या दिवशी रात्री जरी ती झोपलेली असते  तरी तिचा मेंदू तिला काय काय सुचवत होता ते ती आठवत रहाते.

तिला झोपेतून जागे होऊन लगेच वहीत लिहायचे असते पण तसे होत नाही. निद्रादेवी तिच्यावर इतकी प्रसन्न असते की तिला जागचे हालूही द्यायचे नाही असे तिने ठरवूनच टाकलेले असते. सकाळी उठल्यावर मानसी आलं घालून  बनवलेला चहा घेते.. पटापट आवरून ती पंजाबी सूट घालते आणि आई निघते गं मी असे म्हणून ती बाहेरही पडते. कॉलेज मधली तिची मैत्रीण तीची वाटच बघत असते. कॉलेजचे तास संपवून मानसी घरी परतणार नसते. कॉलेजच्या ग्रंधालयात बसून तिला बरेच काही लिहायचे असते. ग्रंथालयाचा एक शांत वाटणारा कोपराती बसण्यासाठी निवडते. बाकावर बसून ती वहीत  लिहायला सुरवात करते.  काल झोपेत तिला बरीच छान छान वाक्ये सुचलेली असतात. ती वाक्य पहिल्याप्रथम ती  वहीत लिहीते.

या वाक्यांना अनुसरून कोणती कथा लिहावी या विचारात असतानाच तिचा मित्र तिच्यासमोर येऊन बसतो.. तो टिचकी वाजवून अगं लक्ष कुठे आहे तुझे? असे विचारतो तशी ती तिच्या तंद्रीतून बाहेर येते,  म्हणते काही नाही रे असच. मग इकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि तो मित्र निघून जातो. मग ती परत कथेविषयी विचार करायला सुरवात करते. कथेची सुरवात आणि शेवट तिला सुचत जातो. काल झोपेत असताना तिला कितीतरी सुचलेले असते. कथा तर अथपासून इतीपर्यंत डोळ्यासमोरून तरळूनही गेलेली असते. ती  कथा लिहायला घेते.



.कथा लिहीत असताना तिला वेळेचे भान उरत नाही. घड्याळात बघते तर  संध्याकाळचे ५ वाजत आलेले.
 ती पटकन वह्या पुस्तके शबनम मध्ये भरते आणि धावतच  घरी येते. घरी आई येरझाऱ्या घालत असते. आई म्हणते अगं किती उशीर? कुठे होतीस. मी तुला फोन केला तर तू फोन बंद करून ठेवला होतास. ती आईला सॉरी म्हणते आणि पचेल अशी थापही ठोकते.

कथा लिहिण्याच्या नादात तिची भूकही मरून गेलेली असते.  आईच्या आग्रहाखातर डायनिंग टेबलवर बसून ती पोळी भाजी खाते आणि आईला सांगते की मी जरा पडते आणि पलंगावर आडवी होते. तिचे मन तिला अस्वस्थ करत असते. कथा मनासारखी का होत नाहीये याचा विचार करत राहाते.

तिच्या आईला माहीत असते की आपली मुलगी काही ना काही लिहीत असते. जेव्हा ती एकदम अबोल होऊन जाते तेव्हा तिला अजिबात त्रास देत नाही. रात्री जेवण केल्यावर ती आईला म्हणते आई आज मी जरा लवकरच झोपते गं असे म्हणून ती पलंगावर आडवी होते. रात्रभर विचार करत राहते कथेबद्दल. कथा तर तिने वहीत लिहिलेली असते पण तिच्या मनासारखी म्हणजे आदल्या दिवशीच्या झोपेत तिला काय काय सुचत
होते त्यातले काहीच कथेत उतरत नसते. तिला पहाटे पहाटे झोप लागते आणि सकाळी उठल्यावर ती कॉलेजला जाते. कॉलेजवरून आल्यावर नेहमीप्रमाणेच जेवण आणि झोप.   नेहमीच्या रूटीन मधले दोन दिवस असेच जातात. आज मात्र सकाळी मानसी उठते तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलून आलेला असतो.


डायनिंग टेबलवर तिच्या आईने तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून ठेवलेला असतो. मानसी उठते. अंघोळ करून हलकासा मेक अप करते आणि ड्रेस घालून स्वयंपाक घरात येते तर काय? मानसीची आश्चर्यचकीत मुद्रा होते आणि ती आईला विचारते आज एकदम माझ्या आवडीचा पदार्थ कसा काय? आई म्हणते अगं मी तुझी आई आहे तुला आनंद झाला आहे हे मी तुझ्या खोलीत तू झोपलेली असतानाच कळाले. वहीत तू लिहिलेली कथा छान आहे बरं का एकदम? हो गं आई मनासारखी झाली आहे माझ्या. मला पहाटे आपोआप जाग आली आणि कथा लिहिली आणि परत झोपले. इतके छान मला कसे काय सूचत गेले गं आई? ही कथा मला दोन तीन दिवस छळत होती. आज पहाटे मात्र मनासारखी झाली. आई म्हणते हो गं मानसी,
अगं प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. आता बाबा दौऱ्यावरून परत आले की त्यांना तुझ्या कथे ची छान मेजवानी मिळेल.
अगं आई मी त्यांना लगेच मेल करून पाठवली ! आहेस कुठे? फक्त मला आता ती कोणत्या
अंकात पाठवून द्यायची हेच सूचत नाहीये.

चल चल उशीर होतोय ना तुला कॉलेजला जायला. मानसी परत एकदा आरशात आपले रूप पाहते. वह्या पुस्तके  शबनब मध्ये घालून ती आईला टाटा करते. गॅलरीत उभी राहून आई आपल्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे समाधानाने बघत रहाते. Rohini Gore

No comments: