Tuesday, July 24, 2018

आज इथं तर उद्या तिथं ... (१२)

विल्मिंग्टन मध्ये राहत्या घराचा पसारा आवरायला घेतला. पहिल्यांदा काय काय टाकायचे ते ठरवले. निर्जीव गोष्टींमध्ये आता जास्त अडकून बसायचे नाही. आणि पहिली आठवण, असुदे, राहुदे, नंतर टाकू हे आता बास झाले. उचला आणि गोष्टी फेका. किती पसारा ठेवणार आहात तुम्ही? मनाला बजावले. अडगळीच्या खोल्या होत्या हे सर्व सामान ठेवायला. पण आता १० वर्षांनी जागा सोडून दुसरीकडे जात आहोत त्यामुळे त्या न वापरात असलेल्या गोष्टी दुसरीकडे वाहून नेण्यात काहीच अर्थ नाही. फेकून देववत नाहीत कारण त्या गोष्टींमागे काही आठवणी असतात हे ठीक आहे पण आता नको हं !




क्लेम्सनला राहत असताना पहिलावहिला आणलेला डेस्कटॉप आणि त्याला जोडून असलेला सीपीयु, त्याबरोबर त्याच्या अनेक वायरी होत्या. डेस्कटॉप मध्ये व्हायरस शिरल्याने तो बंद झाला होता. तो फेकून दिला. एकेक करत बऱ्याच गोष्टी फेकून दिल्या. नंतर घेतलेला गेटवेचा लॅपटॉपही बंद झाल्याने तो होता, तोही टाकला. वेबकॅमचे किती कौतुक होते सुरवातीला. तो काही दिवस वापरला. ऑनलाईन झालेल्या मित्रमैत्रिणींना या वेबकॅम मधूनच बघितले होते. तो फेकून दिला. अगदी सुरवातीला अमेरिकेत आलो तेव्हा कळाले की डॅलसवरून २४ तास हिंदी गाणी प्रसारित होतात. त्यामुळे वाल मार्ट मधून घेतलेला पहिलावहिला टु-इन-वन तो बिघडला होता. तो टाकला. त्याचबरोबर पहिलावहिला घेतलेला टील्लू टिव्ही पण फेकला. भारतावरून आणलेल्या हिंदी सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट सुरवातीला या टु-इन-वन वर ऐकत होतो. शिवाय रेडिओवर प्रसारित होणारी हिंदी गाणी पण मी खूपच एनजॉय केलेली होती. तो टु-इन-वन फेकून दिला पण हिंदी गाण्यांच्या कॅसेट मात्र अजूनही आहेत. त्या फेकवत नाहीत. नंतर डिव्हिडी प्लेअर, सीडी प्लेअर फेकले. डिव्हीडी प्लेअर वर पूर्वी १ डॉलर ला एक सिनेमाची कॅसेट मिळायची. किती कौतुक होते त्यावेळेला. नंतर सीडी प्लेअर आणला होता त्यावर सीडी आणून हिंदी सिनेमा बघत असू. काही विकत घेतल्या होत्या. एका मित्राने त्याच्याकडे असलेल्या काही डिव्हिडी कॅसेट दिल्या होत्या. त्या खूपच जुन्या होत्या. त्या फेकल्या. डिव्हीडीवर एका विद्यार्थ्याने आम्हाला ४ त ५ सिनेमे रेकॉर्ड करून दिले होते. त्यातल्या फक्त २ आठवण म्हणून ठेवल्या आहेत. एक चुपके चुपके आणि छोटीसी बात.




एका मित्राने त्याच्याकडे असलेला एक सिंगल बेड आम्हाला दिला होता. मास्टर बेड आम्ही विकत घेतलाच होता. पण तो म्हणाला हा सिंगल बेड मी बॅचलर होतो तेव्हा घेतलेला आहे आणि तो तसाच पडून आहे. चांगला आहे. तो घेऊन जा. तुझ्याकडे कुणी आले तर उपयोगी पडेल आणि तसा त्याचा उपयोग झाला पण. क्लेम्सन मधल्या २ विद्यार्थिनी आमच्याकडे रहायला आल्या होत्या. त्यांना झोपण्यासाठी उपयोग झाला. वरदा आली होती. तिलाही झोपण्यासाठी उपयोग झाला. नंतर तो बेड माझाच होऊन गेला. कारण की दुसऱ्या बेडरूम मध्ये हा बेड होता आणि मी त्यावर बसून काही ना काही लिहीत असे. दुपारची वामकुक्षी इथेच होत असे. १० वर्षे वापरला
आणि खराब झाल्याने तो टाकून दिला. जिन्यावरून आम्ही दोघांनी खूप जड असलेली गादी आणि त्याखालचा बेस धरून हळू हळू करत थोडा रस्त्यावरून हळूहळू करत कचऱ्यापेटीच्या इथे ठेवून दिला. नंतर खांदे मान हात खूपच दुखायला लागले. इथे कुठले आलेत हमाल. इथे आपणच ऑल इन वन असतो.




फूड प्रोसेसर आणला होता. त्यात कणीक भिजवायचे. तोही एकदा मोडला. लगेच अडगळीच्या खोलीत टाकला. आणि नंतर शेवटी कचरापेटीत टाकून दिला. क्लेम्सन मधल्या एका विद्यार्थीनीने तिच्याकडचा छोटा मायक्रोवेव्ह दिला होता. तोही मोडला आणि नंतर दुसरा नवीन विकत घेतला. तोही असाच अडगळीच्या खोली पडून होता तोही टाकला. लगच्यालगेच टाकणे होत नाही. टाकवत नाही. हल्ली जगभरच वस्तू मोडल्या की फेकून देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. इथे तर नसतोच. इथे रिपेअर ही भानगड नाहीच. अगदी पूर्वी आपण चपला तुटल्या तरी त्या चांभाराकडून दुरूस्त करून वापरायचो. आता वापरा आणि फेका. तसेच अन्नाचेही आहे.
फ्रोजन फूड आणा. खा आणि फेका. जमाना बदल गया है. काही वेळेला वाटते हे सर्व मी उगाचच फेकून दिले. कालांतराने याच गोष्टी म्हणजे डेस्क टॉप - लॅप टॉप, डिव्हीडी कॅसेट, ऑडिओ कॅसेट आणि बरच काही जतन करून ठेवायला पाहिजे. म्हणजे पुढील येणाऱ्या पिढ्यांना हे दाखवता येईल. ते विचारतील हे काय आहे ? तेव्हा आपण सांगू की या ऐतिहासिक गोष्टी आहेत. :D आता तर स्मार्ट फोनमुळे सर्व जग हातात आले आहे.




युट्युबमुळे फुकटची गाणी सर्व भाषांमधलीअनेक वेळा बघता येतात. अनेक वेबसाईटवरून गाणी ऐकता येतात त्यामुळे काही इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आता काळाच्या आड गेल्या आहेत. खरे तर मला टिव्ही पण टाकून द्यावासा वाटत होता कारण की इंटरनेट मुळे कॅंपुटर वर आम्ही जास्त वेळ घालवत होतो. म्हणजे लेखन वाचन, गाणी ऐकणे. वगैरे. आपली मराठीवर मालिका बघणे. शिवाय युट्युबवर सिनेमे बघणे इ. इ. विल्मिंग्टन मध्ये आल्यावर जेव्हा मोठा टिव्ही घेतला तेव्हा डिश घेतली होती व त्यावर इंडियन ३ चॅनल घेतले होते. इंग्रजी फूड चॅनल, वेदर चॅनल, हिस्ट्री आणि इएसपीएन या चॅनलवर बरेच काही बघत होतो. इंग्रजी सिनेमे केबल वर पाहिले होते. केबल मुळे काही महिने चांगले वाटते. पण नंतर तेचतेच चालू राहते. त्यामुळे काही वर्षांनी आम्ही फक्त बेसिक चॅनलच ठेवले होते. उगाच केबलचे पैसे भरत बसायचे. पण विनू म्हणाला की बेसिक चॅनल पुरता टिव्ही असू दे. मुख्य म्हणजे वेदर कळते त्यामुळे असू दे. ट्रेड मिल घेतली होती ती पण मला नको होती. ट्रेड मिल घेण्याच्या मी विरूद्ध होते पण विनू म्हणाला की हिवाळ्यात बाहेर फिरता येत नाही तर निदान यावर तरी चालू. सुरवातीला तो चालत होता. पळतही होता. पण काही महिनेच केले गेले. नंतर त्याची पाठ दुखायला लागली. मी पण त्यावर थोडी चालले. पण माझी तर लगेचच पाठ दुखायला लागली. मी त्यावर नंतर कधीच चालले नाही. पळणे तर अशक्य आहे. मला मशीनवर व्यायाम करायला आवडत नाही.









मी विनुला म्हणाले की आपण व्यायाम तर करतोच ना आणि चालतोही. हिवाळ्यात फक्त चालायचे नाही.
इथे आल्यापासून जे १, जे २, विसा आणि एच १, एच ४ विसा चे कागदपत्र ते अगदी ग्रीन कार्डासाठी जमवलेली कागदपत्रे आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज असे अनेकाअनेक कागद मी फाडून फेकून दिले. फक्त युएससीआयएस कडून आलेली कागदपत्रे फाडली नाहीत. तीही फाडली असती तर काहीच बिघडणार नव्हते. पण एक आठवण म्हणून ती ठेवली आहेत. अजून काही गोष्टी मात्र मी कधीच फेकू शकणार नाही. त्या मी मरेपर्यंत ठेवणार आहे. पहिलावहिला कॅमेरा, नंतर दुसरा, नंतरचा पहिलावहिला डिजिटल कॅमेरा, दुसरा डिजिटल कॅमेरा. शिवाय अगदी पहिल्यांदा फोटोग्राफीला सुरवात केली की ज्या छायाचित्रांच्या प्रिंट काढायला लागायच्या त्या निगेटिव्ह प्रिंट त्या फेकणार नाहीत. बरेच फोटोही फाडून फेकून दिले जे चांगले आले नव्हते. मोजकेच फोटोज ठेवले. २ विकत घेतलेले फोटो अल्बम ठेवले आणि १० ते १५ , १०० पानी वह्या आहेत की ज्यामध्ये मी लिहिलेले आहे माझ्या हस्ताक्षरात ते कधीही टाकणार नाही. पॅरालीगल डिप्लोमा करता २ सेमेस्टर मी कॉलेज मध्ये गेले होते तिथे झालेल्या असाईनमेंटच्या प्रिंटचे कागद आणि परीक्षेचे पेपर्स ज्यावर मार्क दिलेले आहेत ते कधीही फेकणार नाही. नवीन शहरामधल्या कॉलेजमध्ये हा डिप्लोमा नाही त्यामुळे हा कोर्स अर्धवट राहिला पण एक कायमची आठवण राहिली ती माझ्यापुरती पुरेशी आहे. सोफ्याबरोबर एक आरामदायी खुर्ची घेतली होती ती टाकून दिली. खरे ती टाकाविशी वाटत नव्हती. पण खूपच खराब झाल्याने टाकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ती खुर्ची मात्र आम्ही मूव्हर्स वाल्यांना सांगितले की तुम्ही या खुर्चीचे जे पाहिजे ते करा. आम्हाला नको आहे. या खूर्चीवर मॅट ठेवून मी सर्व रेसिपीजचे फोटो काढलेले आहेत. आणि फोन करताना या खुर्चीवर बसूनच बोलायचो आम्ही. डायनिंग टेबल असूनही मी याच खूर्चीवर बसून जेवायचे. अर्थात खुर्ची गेली तरी तिचा फोटो आहे. कचरा टाकून टाकून दमलो आम्ही दोघेही. :( बाकीचा स्वयंपाकघरातला कचरा तर वेगळाच !




शेवटी शेवटी तर फ्रीज रिकामा करावा लागतो. फ्रीजमधले उरलेसुरले दूध, ज्युस, भाज्या, दही तेही टाकून द्यायला लागते. फ्रीज मधले सर्व काढून तो स्वच्छ करून द्यावा लागतो. शिवाय स्वयंपाक घरातली कपाटे, स्टोव्ह, ओटा, बाथरूम, संडास, सर्वच्या सर्व साफ करून द्यावे लागते. व्यक्युमिंग तर अनेक वेळा करावे लागते. असे करता करता आम्ही सर्व खोक्यात सामान भरून त्यावर चिकटपट्या चिकटवून, त्यावर मार्कर पेनाने बेडरूम. कीचन, हॉल असे लिहिले. प्रत्येक बॉक्सला आकडेही घातले. आमच्या बरोबर न्यायच्या बॅगाही तयार झाल्या. सकाळी ठरल्याप्रमाणे मूव्हर्स आणि पॅकर्सची २ माणसे आणि मोठा ट्रक आला आणि त्यांनी एकेक सामान ट्रकमध्ये भरले. आमचे सर्व फर्निचर त्यांनी प्लॅस्टीकने रॅप केले होते. प्लॅस्टिक रॅपची मोठाली वेटोळी त्यांच्याकडे होती. शिवाय चिकटपट्यांचेही मोठाले वेटोळे होते. प्रत्येक फर्निचला ते प्रदक्षिणा घालून रॅप करायचे. मास्टर बेड सुटा सुटा केला. गाद्यांना एका कपड्यात बांधले. असे करत करत सर्व सामान ट्रक मध्ये जाऊन बसले. आणि आमचे राहते घर रिकामे झाले. त्या रिकाम्या घरात खूपच सुनेसुने वाटायला लागले.





प्रचंड प्रमाणात दमायला झाले होते. १५ दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. ब्रेव्हार्ड - हँडरसनविल ते परत विल्मिंग्टनला येण्याचा प्रवास १६०० मैल झाला होता. अपार्टमेंटचा त्रासदायक अनुभव आल्यामुळे मानसिकही दमायला झाले होते. ऐनवेळी मिळालेले अपार्टमेंट चांगले होते पण ते खूप मागे आणि आमची जागा मागच्या बाजूला होती की जिथून माणूस दर्शन नाही. कार येता-जाताना दिसत नाही. शिवाय तिसऱ्या मजल्यावर होते. विनू कामावर जाऊन येऊन १२ तास बाहेर असणार त्यामुळे मी एकटीच असणार आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर माझे कसे होईल ही चिंताही मला होतीच. पण अपार्टमेंट मिळाले हेही सुखदायक होतेच की ! पुढचे पुढे पाहू असे मनाला समजावत होते. कामे करून करून आम्हाला दोघांनाही प्रचंड दमायला झाले होते. निघण्याच्या आधी जेव्हा खाली मांडी घालून बसले तेव्हा डोळ्यासमोरून १० वर्षातल्या सर्व घटना तरळून गेल्या. ट्रक निघाला तसे आम्ही पण दोघे निघालो. मेक्सिकन उपहारगृहात जेवलो आणि नवीन शहरात जाण्यासाठी आमची कार वेगाने धावू लागली. रात्री मोटेल मध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी अपार्टमेंटचा ताबा घेतला. काही दिवसांनी रुटीन लागले. विनायकचा ऑफीसला जाण्यासाठीचा रोजचा कारने जाऊन येऊन ५० मैलांचा प्रवासही सुरू झाला. नंतर ३ महिन्यांनी मलाही नोकरी लागली. घरी एकटीने बसून बोअर होण्याची चिंताही मिटली. नोकरीमुळे खूप चपळ झाले. वजनही घटले. त्रासदायक विचारही कमी झाले.




पुढील स्थलांतर साधारण दीड वर्षांनी झाले त्याचे वर्णन लेखाच्या पुढील भागात. :)
क्रमशः ....

No comments: