Wednesday, August 27, 2025

मनोगती मैत्रीण

 मी काही महिन्यांपूर्वी रेडिओ कम सीडी व कॅसेट प्लेअर घेतला होता, त्यातला रेडिओ मी रोज दुपारी 2 तास लावते, तिथे रेडिओ जिंदगी वर जुनी हिंदी गाणी लागतात, आज मनात आले की सीडी ऐकू, बऱ्याच सीड्या आहेत, त्यातली एक सीडी आनंद देऊन गेली, बघू तरी कोणती गाणी आहेत म्हणून लावली तर पहिलेच गाणे गणपतीचे, आणि आज गणेश चतुर्थी ! काय हा योगायोग ! ही गाणी आम्हाला मनोगती वरदा ने रेकॉर्ड करून दिली आहेत, 2006-2007 च्या दरम्यान वरदा आमच्या wilmington च्या घरी आली होती, मनोगत वर तिची व्यक्तीगत निरोपावर आमची ओळख झाली आणि तिने आम्हाला विचारले तुमच्या घरी 2 दिवस रहायला आले तर चालेल का? आम्हाला दोघांना खूपच आनंद झाला, 2001 नन्तर आम्हाला पहिल्यांदाच इतकी मनमोकळी बोलणारी मराठी मुलगी भेटायला आमच्या घरी येणार होती, आम्ही दोघे तिला विमानतळावर घ्यायला गेलो होतो, मला तर काय करू नी काय नको असे झाले होते, तिच्याकडे असलेली गाण्याची यादी तिने मला पाठवली व यातली कोणती गाणी तुम्हाला हवी आहेत ते सांगा म्हणजे ती मी रेकॉर्ड करून देईन, तेव्हा मी मला अमूक गाणी हवी आहेत ते सांगितले होते. ती आमच्या घरी आल्यावर अर्थातच मनोगतावर चर्चा झाली, खूप गप्पा मारल्या व तिला आम्ही आमच्या कार मधून आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर नेले, नदीवर पण गेलो आणि तिला जायच्या दिवशी परत विमानतळावर सोडले, नंतर काही वर्षांनी आम्ही दोघे पण तिच्या दोन वेगवेगळ्या घरी गेलो होतो, जेवणात तिने मुळ्याची भाजी केली होती आणि आम्हाला गरम गरम पोळ्या वाढल्या, आम्ही तिला व तिच्या मुलांना घेऊन थाई उपाहारगृहात गेलो, तिची मुले खूप लहान होती, आमच्याशी खूप खेळत होती, मजा आली होती,, आजच्या दिवशी आठवणी जागृत झाल्या आणि छान वाटले rohinigore 27 August 2025





Thursday, August 21, 2025

मनोगत - एक मराठी संकेतस्थळ जिथे मराठीतून लिहिता वाचता येते.

 एके दिवशी विनु विद्यापीठातून घरी आल्यावर त्याने मला सांगितले की तुझ्याकरता एक मराठी वेबसाईट आहे. मी अति आनंदाने ओरडले काय? मराठी वेबसाईट? तुला कशी कळाली? ही गोष्ट आहे २००४ सालामधली. वि म्हणाला अगं आमच्या गाण्यांच्या ग्रूपवर कळाली. लगेच आमचा डेस्क टॉप ऑन. मनोगतावर गेलो आणि विनायक त्या साईटचा सदस्य झाला. त्याने त्याची माहिती प्रोफाईलवर लिहिली. एके दिवशी मनोगतावर मी आलेली दिसले वि ला. हे काय तू पण झालीस सदस्य? मी म्हणाले म्हणजे काय, इथे मराठीत लिहिता वाचता येते. मग मला काही लिहावेसे वाटले तर सदस्य असलेले केव्हाही चांगलेच ना ! मनोगतावर येण्याची नोंद केली की तिथे अजूनही कोणं कोणं आलयं हे दिसायचे. सदस्य आले की त्यांची नावे आम्ही दोघेही वाचत होतो. सुरवातीला सुभाषचंद्र आपटे, नरेंद्र गोळे, अमित चितळे, द्वारकानाथ कलंत्री. प्रशासक या नावाने खुद्द प्रशासक आलेलेही कळायचे. आणि एक दिवस एक टोपण नाव दिसले. ते म्हणजे प्रवासी. या नावाचे आम्हाला दोघांनाही खूप कौतूक वाटले. मला आठवतयं मनोगतावर सुर्वे नावाच्या सदस्याने म्हणी लिहा ही चर्चा टाकली. मला तर खूप मजा आली. सुरवातीला मराठी टंकलेखन थोडे अवघड गेले पण नंतर सराव झाला. म्हणींमध्ये रोज आठवून आठवून २/४ म्हणी मी लिहायला लागले. पत्यांमधल्या चॅलेंज खेळासारखे रोज कुणी ना कुणी म्हणी लिहायचे. आणि त्यामुळे और एक, और दो, असे करत करत बऱ्याच म्हणी जमा झाल्या. त्यावेळी मनोगताकडे इतके लक्ष गेले नव्हते कारण की मी नोकरी करत होते. विनुच्या नोकरी निमित्ताने आम्ही दुसऱ्या गावात स्थलांतरीत झालो आणि माझे विसा स्टेटस बदलले. एच ४ वर वर्क पर्मिट मिळत नसल्याने नोकरी करता येत नाही. त्यामुळे मी घरकोंबडी झाले. सोबतीला मनोगत होते ते खरच खूप छान झाले.

मनोगतावर मला घरबसल्या छान छान कविता, कथा वाचायला मिळायच्या. चर्चा सदरात इतर सदस्यांनी व्यक्त केलेली मते पण कळायची. काही वेळा चर्चा खूपच रंगायच्या ! एकदा एका चर्चेत बटाटेवड्याचा विषय निघाला. त्या चर्चेत अजूनही काही सदस्यांनी अमुक एक पाककृतीची विचारणा केली. त्या चर्चेचा आढावा घेऊन प्रशासकांनी पाककृती हा विभाग सुरू केला. सुरवातीला खूप कमी कविवर्य होते ते म्हणजे सुभाषचंद्र आपटे, मिलिंद फणसे, प्रवासी, मानसी, अदिती, सोनाली आणि लेखकही खूप कमी होते ते म्हणजे प्रभाकर पेठकर, अनु, मृदुला, इद्यादी. जसजशी पाककृतीची विचारणा होत गेली तसतशी मी मनोगतावर पाकृ लिहायला लागले. नंतर अनुक्रमे अमेरिकेतले अनुभव, भारतातल्या आठवणी असे लिहीत गेले. इथे मराठी माणसं खूप ओळखीची झाली. याहू मेसेंजर वर ७०-८० जण जमा केले मी ! सकाळी डेस्क टॉप वर लॉग इन केले की पहिले मनोगतावर जायची सवय लागली. याहू मेसेंजर वर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत कुणी ना कुणी असायचे. सर्व जगातल्या कानाकोपऱ्यातली मराठी माणसं स्क्रीनवर ! जेवण झाले का? मनोगतावर काय नवीन आले? याहूवरच्या प्रत्येक जणांच्या खिडक्या उघडायच्या. खिडकीतून विचारणा व्हायची काय चालू आहे सध्या? आम्ही एकटे आहोत असे आम्हाला कधीच वाटले नाही. अनेक चर्चा कविता लेख याची चंगळ होती. २००५ ते २००८ या तीन वर्षात मनोगत खूप बहरले. एके दिवशी मनोगत कोलमडले, विखुरले गेले. प्रशासकांनी ते सर्व निस्तरण्याचा प्रयत्न करून परत मनोगताची उभारणी केली. सर्व सदस्यांना सांगितले की आपापले लेखन जतन करून ठेवा आणि यातूनच ब्लॉगचे वारे वहायला सुरवात झाली. बरेच जणांनी आपापले लेखन ब्लॉग वर जतन करायला सुरवात केली. माझ्या दोन ब्लॉगचा जन्म याच काळातला. 
 
 
मनोगतावरची खरी करमणूक टोपण नाव घेणाऱ्या सदस्यांची. कोणं कोणं आलयं या सदरात ती नावे समजायची आणि आम्ही खूप हासायचो. ती नावे आहेत अनुक्रमे खादाड बोका, उपाशी बोका, काय जोडी आहे नै ! कोकणस्थ आले की देशस्थ लगेच दोन पावले कोकणस्थांच्या पुढेच ! टग्या आल्यावर टुण्याला पण यावेसे वाटले. ययाती आल्यावर देवयानी ने का म्हणून मागे रहावे? माफीचा साक्षीदार यांनी कविता लिहिली की नम्रपणाने शेवटी माफी मागणार. एवढा नम्रपणा बरा नव्हे ! टोपण नावाचा उच्चांक गाठला तो "लुब्रा मेला" या सदस्याने. वा ! नाव घेणाऱ्याचे कौतुक करावे तितके कमीच, नाही का? परी आणि बदक छान वाटले. नुसते मनोगतावर डोकावून जाणार. मनोगतावर खऱ्या नावाने लिहिणारे कमीच होते. टोपण नावे जास्तीची. सर्वसाक्षी, (खरे नाव कळाले तरी आम्ही त्यांना याच नावाने संबोधतो.😃 ) तो, प्रवासी, चौकस, हर्षल खगोल, कुशाग्र, भाष, शुद्ध मराठी, मी मराठी, संग्राहक, वळू, खारूताई, हरणटोळ. तसे अजून बरेच आहेत. rohinigore 21 august, 2025

Friday, August 08, 2025

८ ऑगस्ट २०१८

 आज संध्याकाळी एकमेकांना बोलावल्यासारखे पावसाळी ढग जमा झाले. खूपच गर्दी केली होती ढगांनी. नंतर थोड्यावेळाने अर्थातच पाऊस कोसळून थांबला. आज सूर्यास्त दिसण्याची चिन्हं दिसत नव्हती. खूप नाही तरी आज सूर्यास्ताने थोडे रंग दाखवले. निळ्यावर गुलाबी उठून दिसत होते. sunset - August 8th 2018 Hendersonvile, NC

 







 

Monday, July 28, 2025

2025

 मुंबई विमानतळावर उतरलो आणि रपारप पावसाला सुरवात झाली. पावसाने आमचे खूप छान स्वागत केले. केके च्या कारमध्ये स्थानापन्न झालो. वाहनचालक छोटा पोरगा होता. कार छान चालवत होता. कारच्या पुढच्या काचेवर पाऊस अधुन मधून थैमान घालत होता. घाटातही पाण्याचे मोठाले ओहोळ रस्त्यावरून वाहत होते. कार धावत असताना लगतच्या कड्यावरून छोटे छोटे धबधबे पहाताना खूप मजा येत होती. चहापाणी घेण्याकरता कार थांबली. पटकन खाली उतरून भिजतच फूड मॉलमध्ये गेलो. पोरट्याला म्हणालो तूही आमच्या बरोबर चहा घे. मी गरम गरम वडा पाव खाल्ला. सोबत तिखट चटणी होतीच. त्यावर आलं व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायल्यावर बरे वाटले. कार चालवताना वाहनचालकाने गाणी लावली होती. अर्थात ती नवीनच होती. मनाला भिडत नव्हती. मी म्हणाले जरा जुनी गाणी लाव ना! तर त्याने त्याचा फोन माझ्या हातात दिला आणि म्हणाला तुम्हीच लावा. मग मी किशोर कुमारची गाणी लावली. त्यामुळे प्रवासात आणखी मजा आली. ओ मेरे दिल के चैन,, हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले,, नंतर काही लता मंगेशकरची लावली. आम्ही आईच्या घरी पोहोचलो तेव्हा झुंजुमुंजू झालं होतं. पाऊस पडतच होता. आभाळ ढगाने भरलेले होते. आईच्या दाराची बेल वाजवली. आईला उठायला व चालत यायला वेळ लागतो हे माहीत होते. दार उघडल्यावर आई म्हणाली मी वाटच बघत होते. मला रात्रभर झोप नाही. आईकडे मावशी चहा करायला येतात. त्या यायच्या होत्या. गेल्या गेल्या मी चहाचे आधण गॅसवर ठेवले व आम्ही तिघांनी मिळून सकाळचा पहिला चहा घेतला. आई म्हणाली लगेच अंघोळी उरकून घ्या आणि मी गीझर ऑन केला. घरातून निघाल्यापासून प्रवासाला २४ तासाहून अधिक तास उलटून गेले होते. गरम गरम पाण्याने अंघोळ केल्याने तात्पुरते का होईना ताजेतवाने वाटले. - rohinigore

उत्साही व आनंदी आईला नव्वदावं लागलं जुलै मधे

आमच्या डोंबिवलीतल्या घराचा ताबा घेण्यासाठी आम्हाला पुण्यावरून दोन वेळा जा-ये करायला लागली. पावसाळा असल्याने छान वाटत होते. डोंबिवलीत आम्ही अर्चनाच्या घरी राहिलो होतो. काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी फोटो काढण्याकरता फडके रोडवरच्या स्टुडिओ वर गेलो तर ते बंद होते. इथेच आम्ही १९९९ साली पासपोर्ट काढण्यासाठी फोटो काढले होते ते आठवले. दुसरा स्टुडिओ शोधायचा होता पण त्या आधी छत्री विकत घेतली. विचारत होतो फोटोसाठी काही दुकानात. एकाने सांगितले की अमूक ठिकाणी जा. तिथे चालत जायला लांब होते म्हणून मग विचार केला की आधी बॅंकेत जाऊ. तिथे जात असताना यु टर्न घ्यायचा होता म्हणून रिक्शा पुढे गेली तर मला एक डाव्या बाजूला स्टुडिओ दिसला. तिथेच रिक्शा थांबवली. फोटो काढले व इतर काही कामे करून आमचा फ्लॅट बघायला गेलो. सर्व काही चालण्याच्या अंतरात होते. पाऊस झिमझिमत होता. काही कामे उरकून पुण्यास परतलो. नंतर परत एकदा डोंबिवली. यावेळेला विनु अलिबाग वरून आला व मी पुण्याहून आले. मी ७ सीटर्सच्या गाडीतून उतरले आणि अर्चनाकडे जाण्यासाठी मला टिळक पुतळ्याजवळ लगेचच रिक्शा मिळाली. विनू दुपारीच अर्चनाकडे पोहोचला होता. तो बाहेर गेला होता व अर्चना व तिची फॅमिली पण बाहेर गेली होती. तिने तसे फोनवर मला सांगितले होते. तिच्या घराची किल्ली शेजारी सुप्रिया घैसास यांच्याकडे होती. अर्चनाच्या घरी पोहोचले व किल्ली घेतली. सुप्रिया ताईनी मला लगेच तिच्या घराचे दार उघडून दिले व गरमागरम चहा दिला व सांगितले अर्चनाने पोळी भाजी केली आहे तुम्हाला ताट वाढून देऊ का? तर मी म्हणाले नको, मधेवाटेत मी वडा पाव व चहा घेतला आहे त्यामुळे मला भूक नाहीये. विनू बाहेरून आला की आम्ही जेवू. अर्चना, तिचा नवरा व मुलगा एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. त्यांना उशीर होणार होता.


अर्चना व तिच्या शेजारचे खूप छान आहेत. खेळीमेळीचे वातावरण आहे. पटकन उठून कुणीही कुणाकडे जाते. एकमेकांना वाडग्यातून पदार्थ देतात. चहाला बोलावतात. आषाढी एकादशी निमित्ताने अर्चनाने बरेच काही केले होते. न्याहरीला साबुदाण्याची खिचडी, दुपारच्या जेवणाला भगर, दाण्याची आमटी, रताळ्याचा शिरा. सुप्रिया घैसास यांच्याकडे आम्हाला चौघांना बोलावले. त्यांनी त्यांच्या कुलदेवताची पूजा केली होती. त्यानिमित्ताने आम्हाला चौघांना प्रसाद, दक्षिणा व एकेक फळ असे दिले. हळदी कुंकू लावले. नमस्कार केला. असे काही अमेरिकेत होत नाही त्यामुळे छानच वाटले. सुप्रिया माझ्याच वयाची आहे. ती पण आम्हाला काका काकूच म्हणते. ४ दिवसात अर्चनाकडे बरीच खादाडी केली. न्याहरीला एकदा फोडणीचे पोहे, तर एकदा दडपे पोहे तर एकदा मिक्स डाळींचा डोसा. दडपे पोह्यांची रेसिपी वेगळी आहे. तसे एकदा करून पहाणार आहे. सुप्रियाने पण एकदा दडपे पोहे दिले. अर्चना कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी घेते व त्याला जीपे करते. एकदा रिक्शावाल्याला पण तिने जीपे केले. भाजी एकदम स्वच्छ आणि ताजी होती. अर्चनाला म्हणाले मी तुला भाजी निवडून देते. विळीवर बसून मी कित्येक वर्षांनी नारळाच्या वाट्या खरवडून दिल्या. इतके काही छान वाटले ना ! अर्चना म्हणाली मला अशी कोणी तयारी करून दिली तर मी बऱ्याच जणांचा स्वयंपाक करेन ! तिने एकदा तव्यावर ब्रेडचे स्लाईज भाजून आत बटाट्याची भाजी घालून खरपूस सॅंडविच केले होते. छान लागली चव ! तिच्याकडे गोठ्यातले दूध येते घरपोच ! तिची एक मैत्रीणि साड्या व पंजाबी सूटचा सेट असे विकते. तिला पाठवत असते नवीन स्टॉक आला की. तिच्या फोनवरचे सूट पाहिले आणि मला आवडले म्हणून मला एक व तिला एक असा सेट विकत घेतला. तिचा टेलर आहे त्याने मला एका दिवसात पंजाबी ड्रेस शिवून दिला. घरी येवून. मी अर्चनाचा एक ड्रेस घातला तो मला फिटींगला एकदम छान झाला. तोच ड्रेस मापाला दिला. तिचा चिंतामणी रंगाचा ड्रेस तर मला खूपच आवडला.


पाऊस धो धो पडत होता. मधूनच विश्रांतीही घेत होता. अर्चना पहाटे ५ ला उठून पोळीभाजीचा डबा करते. तिचा नवरा व मुलगा ७ ते साडेसात पर्यंत बाहेर कामावर जायला बाहेर पडतात. नंतर अर्चना एका शाळेत कामला जाते. ती गेल्यावर आम्ही आमच्य अंघोळी पांघोळी उरकायचो. कपडे वॉशिंग मशिनला लावून नंतर मी जसे जमेल तसे कपडे वाळत घालायचे. आम्ही एका रात्री सर्वांना घेऊन उपाहारगृहात जेवणासाठी घेऊन गेलो. निवांत बसून जेवायला खूप छान वाटत होते. २ घास जास्तीचे गेले. बरोबर कुणी असले की जेवायलाही हुरूप येतो. शेवटी एकदाचे आमच्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन व अग्रीमेंट झाले आणि हुश्श केले. घराची किल्ली बिल्डरने आम्हाला सुपूर्त केली. नंतर आम्ही डोंबिवलीतल्या गणपती मंदीरात गेलो. सर्व देवतांना नमस्कार केला. निगुडकर मामींना भेटलो. त्यांना पेढे दिले. व अजून काहींना पेढे दिले. पुराणिक काकुंकडे कामानिमित्ताने २/४ वेळेला जाणे झाले. ते दोघे नवरा-बायको खूप थकलेले दिसतात. कुंदा आत्या व जहागिरदार वहिनींकडे भेटायला गेलो. कामानिमित्त रस्त्याने फिरताना सर्व मागच्या आठवणी जाग्या होत होत्या. डोंबिवलीच्या फ्लॅटमध्ये आम्ही पूर्वी १० वर्षे राहिलो होतो. या जागेतच अर्चना आमच्याकडे शिकायला येत होती आणि आमच्या घरातलीच होऊन गेली. ती आमच्या डोंबिवलीच्या घराचे सर्व काही बघते. लाईट बिलही भरते. प्रत्येक भारतभेटी मध्ये तिने मला माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले आहेत.


विनु अलिबागला त्याच्या आत्येभावाकडे आणि त्याच्या मैत्रिणीकडे ४ दिवस गेला होता. सुषमा, श्री व सौ रेखा परचुरे यांनी विनुचे छान आदरातिथ्य केले. सुषमाने अलिबागमधली सर्व देवळे व अजून बरेच काही दाखवले. सुषमाने मला फोन वरून सांगितले की ती दोघे रेवदंड्याला कशी अडकली होती. बेसूमार पाऊस, लाईटही गेलेले. चिखल, आणि मी फोन करत्ये करत्ये अजून कोणी उचलत का नाहीये. सर्व ठीक आहे ना? या काळजीत होते. दोघेही फोन घरीच ठेऊन गेले तर कोण उचलेल फोन? हाहाहा. सुषमा तू मला आग्रह करत होतीस पण आता पुढच्या वेळी मी व विनु तुझ्या घरी रहायला येऊ. मला पण आता अलिबाग पहावेसे वाटत आहे आणि अर्थात तुलाही भेटावेसे नक्किच वाटत आहे !


बुकींग, फोनाफोनी, मेसेजेस याकरता whatsApp चा उपयोग झाला. रंजनाने आईकडे वायफाय लावले आहे त्यामुळे आम्हाला घरात असताना उपयोग झाला. बाहेर पडल्यावर साधाच छोटु मोबाईल (पूर्वीचा) असतो तसा वापरत होतो बोलण्याकरता. २०२१ सालीच असा साधा फोन घेतला आहे. भारतात आलो की चार्जिंग करतो व अर्चना आमच्या मोबुवर पैसे भरते आणि फोन चालू होतो. एक कागदपत्र मिळवण्याकरता मी फोनवर सर्व माहिती भरली पण एका गोष्टीसाठी अडत होते म्हणून आम्ही दोघे नयनाकडे गेलो. तिथेही जी गोष्ट अडत होती ती भरण्याकरता खूप वेळ लागला. नयना, अवधूत व वर्षा गोरे यांच्य मदतीने अडकलेली गोष्ट सुटली आणि खूप हायसे वाटले. देवच पावला म्हणायचा. या गोष्टीसाठी आम्हाला ४ तास लागले. rohinigore



Thursday, July 24, 2025

2025 (2) photos

 






















Tuesday, July 22, 2025

2025 (1) photos