Friday, March 26, 2010

पत्र

तुम्हाला पत्र लिहायला आवडते का? मला तर खूप आवडते! पत्र लिहिताना मला जास्तीत जास्त सुवाच्य अक्षर काढायला आवडते. अगदी सुरवातीला लहान असताना मी पत्र लिहिले ते पोस्टकार्डावर. मला आठवत आहे त्यावर आधी मी पट्टीने रेघा मारून घेतल्या होत्या व पत्र लिहिले होते. त्या छोट्या पत्रात मी एक वेगळा परिच्छेद पण केला होता. पोस्टकार्ड व इनलँड मध्ये मला पोस्टकार्ड जास्त आवडते. थोडक्यात काही सांगायचे असेल, खुशाली कळवायची असेल आणि वरचेवर पत्र पाठवायची असतील तर पोस्टकार्ड उत्तम!




आमच्या घरात सगळ्यांनाच पत्र लिहायची आवड आहे. पूर्वी आईबाबा त्यांच्या भावडांना व भाचवंडांना पत्रे लिहीत असत. आम्हा दोघी बहिणींना कळायला लागल्यापासून आम्हालाही पत्र लिहायची उत्सुकता वाटू लागली. आईला सांगायचो आम्हाला पण पत्र लिहायचे आहे. आई तशी सविस्तर पत्रे लिहायची त्यामुळे तिला नेहमी इनलँड पत्रे लागत. निळ्या रंगाची होती ही पत्रं. त्यात आई आम्हाला दोघींना चार ओळी लिहिण्यासाठी जागा सोडायची. मग आम्ही दोघी बहिणी आईला विचारायचो काय लिहू गं पत्रात? आई म्हणायची काहीही लिहा, तुम्हाला जे वाटेल ते, मनात येईल ते. मग आम्ही दोघी बहिणी मिळून ठरवायचो काय काय लिहायचे ते. आही आईचे पत्र वाचायचो तिने कसे लिहिले आहे ते बघायचो. आईची पत्राची सुरवात नेहमी पत्र लिहिण्यास कारण की ------- जे निमित्त असेल त्याने सुरवात करायची. आम्ही लिहायचो पत्र लिहिण्यास कारण की "असच" किंवा पत्र लिहिण्यास कारण की "उगीचच" आता खूप हसू येते. नंतर कळायला लागले की पत्राची सुरवात अगदी याच वाक्याने झाली पाहिजे असे नाही.




पत्राच्या शेवटी ताजाकलम पण क्वचित लिहावा लागतो. पत्र लिहून झाले आणि काही सांगायचे राहून गेले असेल तर पत्राच्या खाली ता. क. यामध्ये जे राहून गेले असेल ते लिहायचे. या ताज्या कलमाने आम्ही सगळ्या भावंडांनी खूप धमाल केली होती एका पत्रात. सर्वात मोठ्या मामेबहिणीचे लग्न ठरले तिला अभिनंदनाचे पत्र लिहिले आम्ही सर्वांनी मिळून. त्यात बरेच ताजाकलम लिहिले गेले. ते अनुक्रमे असे होते. ता. क. "एं कसा गं दिसतो तुझा 'न' (नवरा) , ता. क. "भुरकून पी" , ता. क. "दिल्या घरी तू सुखी रहा" (नवऱ्याचे नाव दिलीप) , ता.क. " हा ताजा कलम पत्रातच दडला आहे शोधून काढ" हे ताजेकलम इतके लिहिले ना आम्ही नुसती धमाल. शेवटी अगदी छोटी रिकामी जागा दिसली तरी गिचमिडीत नवीन सुचलेले ताजाकलम घुसवायचो.



लग्नानंतर मी दर महिन्यात आईबाबा व सासुसासरे यांना पोस्टकार्ड टाकत असे. एकदा माझा भाऊ म्हणाला "काय गं तू पत्र लिहितेस की रेसीपीज, प्रत्येक पत्रात जो पदार्थ करून पाहिला त्याची रेसीपी. जरा दुसरे पण लिही की काहीतरी" जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा विनायकचा मित्र म्हणाला की वसतीगृहाच्या खोल्या दिल्या गेल्या की लगेच पत्राने कळवतो तुला मग या तुम्ही इथे. लवकरच मिळाल्या. त्याचे पत्र आले आणि आम्ही लगेच निघण्याच्या तयारीला लागतो. आता मजा वाटते. आजच्या काळात टकाटका मोबाईल वाजले असते ना! पत्राची भानगडच नाही.



लग्नानंतर आयायटीत रहायला गेलो आणि आईबाबांना व सासुसासऱ्यांना मी पत्रातून आमच्या लग्नानंतरच्या दिवसांची पत्रे लिहू लागले. आईबाबांची पण सविस्तर पत्रे मला येत असत. आयायटी वसतिगृहात सर्वात खालच्या मजल्यावर एक बोर्ड होता नोटीसबोर्डसारखा. त्यामध्ये खोल्या क्रमांक लिहिले होते त्या कप्यात पोस्टमन पत्रे टाकून जात. माझ्या सारख्या चकरा खाली पत्र आले का ते पहायला. आता रोज कसे काय पत्र येईल ना! पण जेव्हा आमच्या खोल्या क्रमांकाच्या कप्यात पत्र दिसे तेव्हा मला खूप आनंद होई. आईबाबांच्या पत्राचे तर मी पारायण करायचे.




अमेरिकेत आल्यावर सुरवातीला वेळ जाता जात नव्हता. असाच एक दिवस खूप कंटाळा आला. मनात खूप साठले होते. कुणालातरी सांगावेसे वाटत होते. तो दिवस आठवत आहे मला अजूनही. त्यादिवशी आभाळ भरून आले होते. कंठ दाटून आला होता. थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरवात झाली आणि एकदम मूड आला. आईला पत्र लिहायला घेतले आणि मनातले सर्व उतरवले गेले कागदावर. त्या पत्राचेही असेच पारायण केले. खूप आनंद झाला होता मला. आईने माझे पत्र वाचले की तिलाही किती आनंद होईल या विचाराने खूप सुखावले. पत्राची सुरवात केली. आत्ता या ठीकाणी खूप मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाकडे बघतच तुला पत्र लिहीत आहे........




आयायटीतली माझी मैत्रिण जेव्हा अमेरिकेला गेली तेव्हा तिचे मला पत्र आले होते. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी पण तिला तिच्या पत्यावर सविस्तर पत्र लिहिले. पत्ता पण दोन तीन वेळा चेक केला बरोबर लिहाला आहे ना! तेव्हा किती वेगळेपणा वाटला होता या अमेरिकेच्या पत्राबाबत. अशी ४-५ पत्रे आम्ही एकेमेकींना पाठवली होती. आत्ताचा काळ असता तर ती अमेरिकेत पोहोचण्या आही मीच तिला ईपत्र पाठवले असते पोहोचली का व्यवस्थित?




पूर्वीचा पत्र लिहिण्याचा काळ खूप छान होता. पत्रामध्ये आपण बरेच काही लिहू शकतो. पत्र वाचले की तो किंवा ती एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात. आपलेपणा वाटतो. हे सर्व ज्यांनी पत्रलेखन केले असेल त्यांनाच कळेल. मी अगदी आत्ता आत्तापर्यंत पत्र पाठवत होते. अमेरिकेतल्या सुरवातीच्या काळात काही पत्रे मलाही आलेली आहेत. काळ इतका काही बदलला आहे की पत्राचा जमाना मागे पडला आहे म्हणण्यापेक्षा पूर्णपणे बंद झाला आहे. पत्राची जागा ईपत्राने घेतली आहे असे जरी म्हणले तरी कोण कुणाला ईपत्रातून सविस्तर लिहित असेल? कोणीच नाही. लिहिले तरी जरूरीपेक्षा जास्त शब्द नसतीलच.


परत पत्रलेखनाला सुरवात करावी काय? असा विचार चालू आहे. हाहाहा! किती हास्यास्पद विधान आहे ना!

 










 

Thursday, March 11, 2010

किसीके जाने के बाद करे फिर उसकी याद...

बसथांब्यावर येताच त्याचे हृदय जास्त वेगाने धडधडायला लागते, कारण "ती" येणार असते. स्वतःशी स्मितहास्य करत तो घड्याळाकडे बघतो, तेव्हढ्यात "ती" येते. उंच टाचेच्या चपला घालून व लांबसडक शेपटा हलवत. बसथांब्यावर त्याच्या शेजारीच उभी राहते. आपले घड्याळ बंद तर नाही ना! याची खात्री करून घेण्यासाठी घड्याळ कानाजवळ नेते व आश्चर्यचकीत मुद्रा करून त्याला विचारते "किती वाजले? "



हा प्रश्न विचारताच तो भांबावून जातो आणि आपल्याच तंद्रीत विचार करायला लागतो. बस येते. बसमध्ये चढताच तिला सांगतो ९.१५ आपल्या प्रश्नाचे इतक्या वेळाने उत्तर आलेले पाहून ती मनातल्या मनात हसते. दुसऱ्या दिवशी पण ती अशीच लगबगीने बसथांब्यावर येते. तिथे तो तिची वाट पाहत उभाच असतो. बस येताच दोघे चढतात बसमध्ये. अरे वा! आजचा दिवस तर खूपच छान आहे! असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. कारण की आज अगदी तिच्याजवळ उभे रहायची संधी मिळते. मनातल्या मनात सुखावतो. तितक्यात बसमध्ये दोन जागा रिकाम्या होतात. ती लगेच जाऊन खिडकीजवळील जागेवर बसते. त्याला पण तिच्या शेजारीच बसायचे असते, पण तेवढ्यात "ती" जागा दुसराच कुणीतरी घेतो. आता बसमध्ये इतकी गर्दी झालेली असते की त्या गर्दीतून त्याला फक्त तिच्या कानाजवळील केसाची बट व तिच्या हातातील पुस्तकच दिसत असते.



तिसऱ्या दिवशी त्याचा धीर चेपतो. तिला पाहिल्यावर आपणहून तिला "हाय! " करतो. ती पण लगेचच गोड हासून "हाय! " करते. हे असे रोजच चालू असते. एकदा त्याच्या मनात विचार येतो ही कोणत्या ऑफीसमध्ये काम करते हे तरी पाहू. तिचा बसथांबा येताच तोही उतरून तिच्या पाठोपाठ चालायला लागतो. तिला संशय येतो. ती मागे वळून पाहते. लगेच शिताफीने तो एकदम बूट पॉलीश करायला उभा राहतो. एके दिवशी तिचे घर पहायला म्हणून तिचा पाठलाग करतो. त्या दिवशी मात्र तो फसतो, कारण रस्त्यावर कोणीच नसते जेणेकरून पटकन दुसरीकडे मोर्चा वळवून मी त्या गावचाच नाही हे त्याला दाखवता येत नाही.



एके दिवशी ती त्याच्या ऑफीसमध्ये येते. त्याला वाटते की ही आता आपल्या बॉसकडे आपली तक्रार करणार. सारखे तिला विनवतो "मै ऐसावैसा आदमी नही हुँ । मै बहूत शरीफ आदमी हूँ । यकीन नही होता तो मेरा कॅरेक्टर सर्टीफिकेट एख लिजिए " एवढे बोलूनही ती त्याला न जुमानताच त्याच्या साहेबाच्या खोलीमध्ये शिरते. थोड्याच वेळात ऑफिसमधला शिपाई त्याला निरोप सांगतो "तुम्हाला साहेबांनी आत बोलावले आहे" चेहरा पाडून, नाकाला बोट लावून बावळट चेहऱ्याचा अमोल पालेकर उर्फ अरूण त्याच्या साहेबाच्या खोलीमध्ये शिरताच त्याला एक सुखद धक्का बसतो. त्याचा साहेब विद्या सिन्हा उर्फ प्रभा हिच्याशी ओळख करून देतो आणि सांगतो की कामाच्या काही कागदपत्रांबद्दल यांच्याशी बोला. अरूण अतिशय आत्मविश्वासाने तिच्याशी त्या संदर्भात बोलतो. इथे सुरवात होते "छोटीसी बात.. "



आपल्याला आवडलेल्या मुलीशी आपण व्यवस्थित बोलू शकतो व तिचे आपल्याविषयी कोणतेही वाईट मत नाही या गोष्टीने तो खूपच आनंदीत होतो व पुढची स्वप्नं पहायला लागतो. पण म्हणतात ना स्वप्ने पाहणे ठीक आहे पण ती प्रत्यक्षात उतरायला हवीत ना! जरा इकडे तिकडे पाहा बरे! तुमच्या आजूबाजूला अनेक स्पर्धक आहेत. त्यातील एक स्पर्धक म्हणजे असरानी उर्फ नागेश.



नागेश हा आत्मविश्वासमें "ज्यादा" असलेला तरूण प्रभाच्या ऑफीसमध्ये असतो. त्याला शतरंज व टेनिसमध्ये स्वारस्य असते. आत्मविश्वासमें "कम" असलेला अरून आपल्या प्रतिस्पर्धी नागेशवर कशी मात करतो ते या चित्रपटात दाखवले आहे. सुरवातीला अरूण प्रभाला उपहारगृहामध्ये भेटायला बोलावतो तर तिथे नेमका नागेश!! जरूरीपेक्षा जास्त "वटवट" करून बाजी मारून जातो. बसथांब्यावर बससाठी ताठकळत उभ्या असलेल्या प्रभाला नागेश स्कूटरवर आपल्या मागे बसवून ऑफीसमध्ये जातो. आपण पण प्रभाला आपल्या स्कूटरवर आपल्या मागे बसवून घेऊन जाऊ या कल्पनेने तो उत्साहात एक दुचाकी खरेदी करतो. खरे तर त्याला नागेश सारखीच स्कूटर खरेदी करायची असते पण गॅरेजमधले "चालू" लोग बिघडलेली मोटरसायकल अरूणच्या गळ्यात मारतात. स्वप्नाळू अरूण मोटरसायकल घेऊन येतो व प्रभाला म्हणतो बस मागे. पण हाय रे देवा!!! तिला घेऊन जाताना ती मध्येच बंद पडते. असे एक ना अनेक प्रयत्न!!! कोणत्याच प्रयत्नांना यश येत नाही जेणेकरून प्रभाचे मन अरूणवर जडेल. शेवटी वैतागून भविष्य, साधूमहाराज, मात्रिंकाकडून गंडा बांधून घेणे असे प्रयत्न सुरू होतात. शेवटी एकाला यश मिळते. डॉ नगेंद्रनाथ ज्युलिअस... उर्फ अशोक कुमार. खंडाळ्याला अरूणची "प्रेममें कामयाँब होने की शिक्षा शुरू होती है...




अरुणशी प्राथमिक ओळख व त्याची समस्या डॉ नगेंद्रनाथ ज्युलिअस समजावून घेतात. त्याची ओळख होताक्षणी दोन तीन धडे समजावतो. पहिला धडा " पहिले काम सारखा सारखा खाजवणे बंद कर. " धडा दुसरा " दुसऱ्याशी हातमिळवणी करताना जबरदस्त आत्मविश्वास दाखवून हातात हात घट्ट पकडून, नजरेला नजर मिळवून संवाद साध. और सबक तिसरा " सांगितलेली गोष्ट कळली नाही तर उगाच मान डोलावून कळली असे सांगू नकोस" इकडे अरूणचे प्रशिक्षण चालू असताना तिकडे मात्र प्रभाची अवस्था खूपच वाईट झालेली असते. " न जाने क्युँ होता है ये जिंदगीके साथ, अचानक ये मन किसीके जानेके बाद करे फिर उसकी याद..... अशी होते.



आणि एके दिवशी.....


केसांना शँपू केलेला, गॉगल लावलेला, कोट घातलेला अरूण जबरदस्त आत्मविश्वासाने प्रभाच्या समोर येऊन उभा राहतो. अगदी त्याच वेळेला नागेश स्कूटर घेऊन प्रभाला न्यायला येतो. हा सीन खूप छान आहे. तेवढ्यात बस येते. नागेशला नाईलाजाने पुढे जाऊन उभे रहायला लागते. अरूण प्रभाच्या गप्पा होतात. कुठे गेला होतास इतके दिवस? असाच गेलो होतो कुठेतरी. तू कशी आहेस? तिकडे नागेशची चुळबुळ सुरू होते. काय करत्ये ही प्रभा. लवकर का येत नाहीये. तेवढ्यात अरूण स्कूटरवर त्याच्या मागे येऊन बसतो. नागेशचा तीळपापड. अरूणच्या जीवनात एक जबरदस्त "घुमाव" आल्याने चित्रपटातले आधीचे "सीन" असे पूर्णपणे उलटतात पहा. जसे की...



नागेशशी टेबल टेनीस खेळताना अरूण खेळायला यायलाच उशीर करतो. आल्यावर खेळायला सुरवात करणार तोच.. "एक मिनिट हं असे म्हणून अरूण स्वतःच्या बुटांच्या नाड्या नीट बांधतो. दुसऱ्यांना... "एक मिनिट हं असे म्हणून टेबलवर नसलेली धूळ साफ करतो. तिसऱ्यांना सुरवात करणार तोच... "एक मिनिट हं असे म्हणून नागेशला हातात बॅट कशी धरायची हे समजाऊन सांगतो. असे करून नागेशचा धीर पूर्णपणे खचवून टाकतो.



बुद्धीबळ खेळताना सुरवातीच्या एक दोन चाली नंतर एका प्रसिद्ध बुद्धीबळ पटूच्या पूढील सर्व चाली सांगून "आता काय खेळण्यात मजाच नाही. तू जिंकलास, मी हारलो. असे सागून नागेशला चिडीला आणतो.



अरूण नागेश व प्रभाला दूरध्वनीवरून जेवणाचे आमंत्रण देऊन स्वतः मात्र प्रभाला साडी खरेदीला घेऊन जातो व उशीराने ठरलेल्या उपहारगृहात येतो. नागेश रागाने लालबुंद!!



आता अरूण त्याच्या शिक्षणातला शेवटचा गिरवलेला धड्याची ट्रायल घेणार असतो "ड्रॉईंग रूमसे लेके बेडरून तक " पण ती काही त्याला जमत नाही. खरे तर त्या धड्याची जरूरीच नसते, कारण प्रभाचे अरूणवर मनापासून प्रेम असते. ती त्याला म्हणते "एवढं सगळं करण्याची काय गरज होती, मला सांगितलं असतस तर"



पण खर सांगू का प्रभा "माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील का" हे विचारण्याची माझी हिंमतच झाली नाही. अशा प्रकारे अरूणप्रभाची प्रेमकथा सुफळ संपूर्ण!!


पात्र परिचय रसग्रहणामध्ये आला आहेच. गीतकार - योगेश, संगीतकार - सलील चोधरी

Friday, February 19, 2010

भारतभेट....2010


















यावर्षीच्या भारतभेटीत काय काय करायचे याची एक यादी बनवली होती. सगळ्या नाहीत तरी काही काही गोष्टी केल्या. बऱ्याच वर्षानंतर पुष्करिणी भेळ खाली. रुपये २० फक्त. द्रोणात देतात. पूर्वी बहुतेक स्टीलच्या ताटल्या होत्या. खाताना चित्त यांची आठवण झाली. त्यांनी एका भेळेच्या चर्चेत पुष्करिणीचे वर्णन केले होते. अचूक होते ते वर्णन. कुरकुरीत भेळ व चिंचगुळेचे पाणी जास्त घालत नसल्याने भेळेचा लगदा होत नाही. पुष्करिणी भेळेचे मालक अनंत मेहेंदळे अजूनही दुकानात बसून भेळ बनवतात व त्यांचा मदतनीसही तोच आहे. त्याचे काम लाल कांदा चिरण्याचे. अनंत मेहेंदळे हे माझ्या बाबांचे मित्र आहेत. भेळ खायला गेले की आवर्जून चौकशी करतात. या भेळेचे वैशिष्ट्य असे की याची चव खूप काळ जिभेवर रेंगाळत राहते.

मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा.... या गाण्याची व नटरंग या चित्रपटाची जाहिरात ऑनलाईन झी मराठीवर पाहिली होती आणि तेव्हाच ठरवले की पुण्यात टॉकीजवर जाऊन नटरंग पाहायचा. हे ठसकेबाज गाणे मला खूप आवडते. एकदा ऐकले की दिवसभर तेच डोक्यात राहते. चित्रपटाची सुरवात याच गाण्याने होते त्यामुळे मला सुरवात अजिबात चुकवायची नव्हती. पुण्यात कुठेही जायला रिक्षा हवीच. नेमका रस्ता काही कारणाने अडला होता. रिक्षावाल्याने मागे वळवून वेळेवर प्रभातवर पोहोचते केले. मला चित्रपट टॉकीजवर जाऊन पाहायला खूप आवडतो. बरेच वर्षानंतर टॉकीजवर चित्रपट पाहायची इच्छा पूर्ण झाली. पूर्वी अलका, विजय, श्रीनाथ, भानुविलास, मिनर्व्हा, नीलायम, अलंकार या टॉकीजमध्ये बरेच मॅटीनी शोज पाहिले आहेत. या भारतभेटीमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे डीजीकॅम मोडला. बरेच बरेच फोटोज जे मनात ठरवले होते ते काढायचे राहून गेले याचे खूपच वाईट वाटत आहे. तुळशीबाग, ग्रीनबेकरी, मंडई, चितळे स्वीटमार्ट, विश्रामबाग वाडा, लकडीपूल, हनुमान टेकडी असे अनेक फोटोज काढायचे राहून गेले.

तसे ग्रीन बेकरीतले छोटे कुरकुरीत समोसे, त्यासमोरील रसवंतिगृहात रस, तुळशीबाग व मंडईत मिळणारी फळे व भाज्या या सर्व गोष्टींसाठी दोन तीन वेळा फेरफटके झाले. एकदा तर पंजाबी सूट शिवायचा होता. स्वीट होम समोर एक चाँदनी नावाचा टेलर आहे तो चांगले कपडे शिवतो. तो म्हणाला तुम्ही दुसरीकडे खरेदी वगैरे करून या. तासाभरात ड्रेस शिवून तयार ठेवतो. मला तर खूपच मजा वाटली या गोष्टीची.

पहिल्याप्रथमच थेट उड्डाण प्रवास केला नेवार्क विमानतळ ते मुंबई विमानतळ. विमानात जब वी मेट पाहिला. तसा चित्रपट खूप जुना झालाय. माझ्या भाचीने सांगितले होते की मावशी हा चित्रपट तू जरूर पाहा तुला आवडेल म्हणून पाहिला. आमच्या विमानाने जमीन सोडून हवेमध्ये उड्डाण केले आणि अगदी त्याच वेळेस चित्रपटाची सुरवात झाली ती म्हणजे करीना भराभर एकापाठोपाठ एक वस्तू चालत्या आगगाडीमधल्या माणसाला देत आहे व नंतर ती धापा टाकत आगगाडीत प्रवेश करते. हे असे टायमिंग जुळलेले मला खूप आवडले. करीनाचा चित्रपट पहिल्यांदाच बघत होते. मला हा चित्रपट खूप वेगळा वाटला आणि आवडलाही.

मुंबई विमानतळावर जेव्हा विमान जमिनीवर टेकते तेव्हा मला नेहमीच खूप छान वाटते. पुण्याच्या घरी गेलो तेव्हा जावेने गरमगरम मटार पोहे केले. त्यात तिखट मिरच्या व कडिपत्ता होता. आले व गवती चहा घालून दोन तीन वेळा चहा प्यायला. पोह्याची मिरगुंडही तळली होती. थोडावेळ झोप काढून आईकडे हजर. आईकडे आरामच आराम. आईकडे पोळीभाजी करण्यासाठी बाई लावली आहे. तिचे नाव मनिषा. तिला आईने सर्व भाज्या शिकवल्या आहेत. अगदी त्याचप्रमाणे ती सर्व भाज्या करते. अतिशय टापटीप आहे ही मनिषा. चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांच्याकडे ही मनिषा काही दिवस पोळीभाजीचे काम करत होती. पोळीभाजीशिवाय घरी शिवणकामही करते.

आईकडे सकाळी आल्याचा चहा मीच करायचे कारण की गॅसवर चहा करणे मी इथे अमेरिकेत मिस करते. ७ ला चहा घेऊन बाबा रोज शाखेत जातात. मी व आई चहा घेऊन परत झोपायचो. झोपायचो म्हणजे परत एक छोटी डुलकी. मुख्य झोपेनंतरची ही छोटी डुलकी मला खूप आवडते. ४५ मिनिटांची ही झोप. यामध्ये आईचा मऊभात व्हायचा. आईकडे मऊभात करायची २-३ भांडी आहेत. दोघांसाठी, तिघांसाठी व ५-६ जणांसाठी अशी ठरलेली भांडी. बाबा शाखेतून आले की आम्ही तिघे मेतकूट तूप भात व सोबत लिंबू लोणचे जेली खायचो. सिंगगड रोडवर सरिता वैभव मध्ये आईबाबा राहतात. सरितावैभव शेजारी सरितानगरी आहे. तिथल्या एका झाडाखाली शाखा भरते. मी एकदा बाबांबरोबर शाखेत गेले होते. शाखा होईपर्यंत एक फेरफटका मारला. सरितानगरीच्या आवारात प्राजक्ताचा सडा होता. कण्हेरीचे झाड होते. फुलांचा रंग वेगळाच गडद लाल होता. शिवाय बोगनवेलीचा रंगही छान दिसत होता. अजून काही फुलझाडे होती. मागे नदीचे पात्र आहे. त्यावर अनेक पक्षी होते. या सर्वांचे फोटोज घ्यायचे असे मनात योजले होते. बरेच पक्षीही बागडत होते.

ही बाबांची शाखा मला खूप आवडली. सर्वजण खूप मौजमजा करतात. शाखा सुटली की काहीवेळा सगळेजण बाहेरच्या टपरीवर भजी खायला जातात. सर्वजण एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात. संध्याकाळी पण काहीजणांचा कट्टा भरतो. त्यात बाबा म्हणाले की सर्व प्रकारचे विषय चर्चिले जातात. आईचा पण एक ग्रुप आहे. संध्याकाळच्या सर्वजणी सरितावैभव आवारात फेरफटके मारतात. झी मराठीच्या मालिका सुरू व्हायच्या आत आपापल्या घरी परततात. फोनवरून आईबाबांचे दिनक्रम ऐकले होते. प्रत्यक्षात बघितल्यावर छान वाटले.

आईकडे जसा आराम केला तसाच आराम छायाताईंकडेही केला. दोन दिवस राहायलाच होतो त्यांच्याकडे. एका रविवारी पूर्ण दिवस सौ व श्री सर्वसाक्षी, श्री मिलिंद फणसे, छायाताई व आम्ही दोघे गप्पा टप्पा केल्या. या निवांतपणात बरेच विषय आले. त्यात ओघाने मनोगतींचा विषयही आला. छायाताईंनी पुरणाची पोळी, गुळाची पोळी, भाज्या, कोशिंबिरी, चटणी, फळफळावळ, मेवामिठाई सर्व काही खूप छान केले होते. मध्यंतरात आल्याचा चहाही झाला. छायाताईंच्या घरासमोरच समुद्र आहे. मी सारखे खिडकीतून समुद्राला पाहत होते. त्यांनी त्यांच्या कारमधून खूप फिरवले. वरळी सी फेस वर भरपूर चाललो व वरळी सी लिंकला पण एक चक्कर मारून आलो. डीजीकॅम असता तर एक छोटे शूटिंग केले असते. पुढच्या वेळी तर हे माझ्या यादीत पहिले असेल इतकी सी लिंक छान आहे.

पुण्यात न्यानल मंगल कार्यालयात एका बोरन्हाणाला गेले होते. पंगतीतले जेवणही असेच खूप वर्षानंतर जेवले. अतिशय सुग्रास जेवण होते. बिनगर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून प्रवास केला. त्यात उभे राहून वारे घेतले. जलद लोकलनेही प्रवास केला. जलद लोकलमध्ये रुळावरून लोकल जाताना एक रिदम तयार होतो तो ऐकतानाही छान वाटत होते. एके दिवशी उलट दिशेला डोंबिवली - ठाणे उलटा प्रवास बिनगर्दीचा केला. संध्याकाळी ठाण्याची गर्दी अचाट होती. लोकलमधून खाली उतरून वर पूल ओलांडायला जी काही गर्दी होती ना त्यात जरा थोडे कोणी ढकलले असते तर एकमेकांच्या अंगावर पडून चेंगराचेंगरीत जीवच गेला असता. जिन्यावरून चढताना श्वास रोखूनच हळूहळू चढत होतो. एकूणच गर्दी आता सहन होत नाही. बोरन्हाणाला पण १०० -१५० माणसे होती पण त्यांच्या बोलण्याचा आवाज काही सहन झाला नाही. मनात म्हणत होते काय हा कलकलाट! एकूणच परदेशात कसे सारे काही शांत शांत! हरिश्चंद्राची फॅक्टरी अलका टॉकीजला पाहिला. तिथे पंखे होते पण खूपच गरम होत होते. तिथेही जीव थोडासा घुसमटला. पुण्यातल्या तळ्यातील गणपतीचे दर्शनही ठरवले होते. बरेच वेळा ठरवले पण होऊ शकले नाही. शेवटी आज जायचेच काहीही झाले तरी आणि कितीही उशीर झाला तरीही असे ठरवल्यावर दर्शन झाले. मनापासून दर्शन घेतले. दर्शनासाठी या गणपतीसमोर उभे राहिले की हात जोडून व डोळे मिटून बराच वेळ उभे राहिले तरी दर्शन झाल्याचे समाधान होत नाही असा माझा अनुभव आहे. खूप शांत वाटते या देवळात.

डोंबिवलीत स्वामी समर्थ मंदिर व मयूरेश्वर मंदिर पाहण्याचा योग आला. मंदीरे खूपच छान आहेत. मयूरेश्वर मंदिरात गणपतीची आर्ट गॅलरी खूपच सुंदर आहे. जाताना चालत गेलो. आमचे मित्रवर्य श्री नेर्लेकर होते. ते म्हणाले की आपण अर्धा तास चालणार. जाताना थोडी खादाडी करु. त्यांनी वडापाव, लिंबू सरबत, पाणीपुरी खायला घातले. मला खरे तर बर्फाचा गोळा खायची पण इच्छा झाली होती. हे सर्व पोटाचा विचार न करता खाल्ले. डोंबिवलीत वीर सावरकर मार्गावर एक उद्यान झाले आहे तेही खूप छान आहे. डोंबिवलीत अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे रामचंद्र टॉकीज पाडून तिथे २० मजली इमारतीचे काम चालू आहे. डोंबिवलीतली ती म्हणे सर्वात उंच इमारत. पुण्यामध्ये आदितीला भेटलो. खरे तर वैशालीत बसणार होतो. वैशालीला तर अजिबातच ओळखले नाही. खरे तर मला वैशालीतच बसायचे होते पण तिथे मधल्या वारीही खूप गर्दी. रूपालीत पण जागा नाही. शेवटी वाडेश्वर मध्ये गेलो. तिथले अप्पे, पेसारट्टू, व चिक्कू मिल्क शेक आवडले. पण मला ते उपहारगृह खूप काही आवडले नाही.

काही गोष्टी केल्या काही राहिल्या. महिनाभरात सर्वच्या सर्व ठरवलेले काही होत नाहीच. परत थेट उड्डाणाने अमेरिकेत रवाना झालो. आल्यावर गोष्टी काही केल्या सुधरत नाहीत. वेळीअवेळी जेवणे व झोपणे, यामध्ये गाडी रुळावर यायला किमान एक आठवडा जातोच. "चला कामाला लागा आता..... बस झाला आराम" असे मनाला बजावत उठावेच लागते.


Tuesday, January 12, 2010

पक्षी










आमच्या शहरात पहिल्यांदाच जबरदस्त थंडी पडली आहे. आमच्या अपार्टमेंटच्या समोर जे तळे आहे ते पूर्णपणे गोठले होते. नंतर काही दिवसांनी आता थंडी अगदी थोडी ओसरू लागली म्हणून तळ्यावर गेले असताना बर्फ थोडे वितळू लागले होते पण काही ठिकाणी तसेच होते. पक्षी त्यावर आरामात उभे होते. ते दृश्य खूप मस्त वाटत होते. पक्षांना व बदकांना मी रोज ब्रेड घालते त्यात एक मला पक्षीपिल्लू दिसले त्याचे चित्रही दिले आहे. फोटोपेक्षा प्रत्यक्षातले हे पक्षीपिल्लू खूपच सुरेख होते. आता कधी दिसतयं ते पिल्लू काय माहित.

Saturday, January 09, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (३)

इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये कॅन्ड फूड आणि फ्रोजन फूड अगदी ठासून भरलेले असते. इथल्या बहुसंख्य लोकांचा मुख्य आहार मांसाहार, ब्रेड, सॅलड व आंबटढाण ज्युस असते. हे ज्युसेस मला कधीच आवडले नाहीत. बरेच जण आवडीने पितात. शाकाहारी लोंकाचे खाण्याचे हालच आहेत इथे, त्यातुनही आमच्यासारखे पोळी भाजी आमटी भात खाणाऱ्यांचे जास्तच. इथली फळे पण मोठी, कांदे बटाटे पण खूप मोठाले, पण चव म्हणाल तर अजिबात नाही. कलिंगड मात्र खूपच आवडले. भारतातल्या सर्व फळांना चव आहे. मी इथले फ्रोझन फूड अजिबात वापरत नाही. बीन्स वापरते ते उपयोगी पडतात. पटकन उसळी करायला. तशा भाज्या सर्व चिरलेल्या मिळतात. पण आम्हाला फ्रेश भाज्या खाण्याची सवय आहे. शिवाय मला बारीक चिरलेल्या पण लागतात. चिरण्यासाठी भारतातला अंजली चॉपर खूपच उपयुक्त ठरला आहे. आधी विळीने चिरायची सवय होती पण विळी पॅक कशी करणार त्यामुळे चॉपर आणला. मुंबई पुण्यामध्ये मला ज्यात त्यात ताजा ओला नारळाचा खव घालायची खूप सवय होती. नारळ आणला की तो खवून फ्रीजमध्ये ठेवायचा की आठवडाभर पुरतो, इथे मी वेगवेगळ्या स्टोअर्समधून नारळ आणून पाहिले पण एकही चांगला निघाला नाही. इथे फोजन किसलेला नारळ मिळतो पण चव नाही. इथे इंडीयन स्टोअर्स मध्ये मिळणाऱ्या गुळाच्या ढेपी पण घरी फोडता येत नाहीत. एक तर लाकडी घरे आणि कोणताही दणदण आवाज घरी केला की ते अमेरिकनांना सहन होत नाही. त्यामुळे या ढेपी मी अपार्टमेंट समोरच्या रस्त्यावर जाऊन फोडल्या आहेत.



अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा अपार्टमेंटमध्ये रहायला लागलो. शेजारी एक इंडीयन मैत्रिण पण मिळाली. तिच्या घरासमोर मी एकदा केराचा डबा पाहिला म्हणून मी पण केराचा डबा बाहेर ठेवला. एक दोन दिवस गेले आणि बघितले तर केर जसाच्या तसाच. मग कळाले की इथे केर आपला आपणच बाहेर जाऊन टाकायचा असतो. इथे मोलकरीण नाही. धुणे भांडी करायला लागतात हे माहिती होतेच पण आता केरही टाकणे आलेच! मला साधा एक चमचा पण विसळायची सवय नव्हती. ही मोलकरीण किती काम करते ना! झाडू मारणे, लादी पुसणे, धुणे धुते, भांडी घासते, दळण आणून देते. कपड्याच्या घड्या घालते, बाथरूम घासते. भारतात घरी असो किंवा नोकरीवर आपण जात असलो तरी ही सर्व कामे आपल्याला हातावेगळी करता येतात. इथे डीशवॉशर आहे, २४ तास वीज आहे पाणी आहे मग त्यात काय अवघड आहे? असे विचारल्यावर म्हणावेसे वाटते. इथे या आणि घासा बरं भांडी! १-२ महिने नाही तर वर्षानुवर्षे घासत राहा म्हणजे बघा कामाचा कसा 'उबग' येतो ते. त्यातुनही नोकरी करत असले तर या घरकामचे एवढे काही वाटत नाही. कारण घरी आल्यावर वेगळेपणा आल्याने जरा उत्साह येतो हे अनुभवाने सांगते. पण तुम्ही घरी असाल, आत्ता घरीच आहे. घरी असून जर ही घरकामे केली की एक प्रकारचा खूप कंटाळा साचून राहतो आणि तोचतोच पणा खूप येतो. रांधा, वाढा, उष्टी काढा, असेच सारखे वाटत राहते. आपल्याकडे आपली आई, आजी हेच करत आल्या आहेत. खरे तर त्यांनाही हे काम दिवसभर पुरवत असेल. शिवाय पुर्वी बाहेर खाणे पण नव्हते. सर्व घरीच करायचे. अगदी तसेच इथेही आहे. भारतीय पदार्थ पटकन कुठेही उपलब्ध नसल्याने घरी करा आणि खा.




इथे माझ्या ओळखीच्या अमेरिकन बाईकडे एक मेक्सीकन कामाला येते. या अमेरिकन बाईला ३ मुले आहेत. ती मेक्सीकन बाई महिन्याचे २०० डॉलर्स घेते. संडास बाथरूम साफ करते, आणि व्हॅक्युमिंग करते आणि महिन्यातून २ दा येते. इथे धुणे घरात असेल तर ठीक आहे. धुणे घरात म्हणजे वॉशर ड्रायर घरात असेल तर धुणे सोपे आहे पण जर का घरी नसेल तर काही वेळेला अपार्टमेंटच्या बाजुलाच ही धुलाई यंत्रे असतात नाहीतर वॉशर ड्रायर असणाऱ्या दुकानातून आठवड्याचे धुणे धुवावे लागते. हेही एक मोठे काम आहे. आठवड्याभराचे सर्व कपडे ३-४ मोठ्या बास्केट मधून भरून त्या कारमध्ये ठेवा. आठवणीने सोप बरोबर घ्या. सुटे पैसे घ्या. सुटे पैसे नसतील तर धुलाई यंत्राच्या दुकानातून घेता येतात. मुले असतील तर त्यांनाही बरोबर न्या. मुलांकरता इथे वेगळ्या 'कार सीट' घ्याव्या लागतात. त्या उचलायला खूप जड असतात. मग मुलांना त्या कार सीटमध्ये ठेवून, कारसीटचे पट्टे लावून त्याना कारमध्ये ठेवा. थंडी असेल तर त्यांना स्वेटर्स, जाकीटे घाला. असा सर्व जामानिमा करून मग धुण्याला जा. तिथे वॉशर ड्रायर मिळून २ तास जातात. मग कपड्याच्या घड्या घाला, बास्केटमध्ये लावून घ्या. आणि मग परत असाच सर्व जामानिमा करून निघा. या धुलाईयंत्र दुकानात अशा मेक्सीकन, व ब्लॅक बायका मी बघितल्या आहेत. आम्ही पण सुरवातीला असेच बाहेर कपडे धुवून आणायचो. युनिव्हरसिटीमध्ये विद्यार्थी असायचे. तेही यायचे धुणे धुवायला. ज्यांच्याकडे कार नाहीत ते बसमधून यायचे. व काही जण कार शेअर करून यायचे. अमेरिकन विद्यार्थी यायचे ते धुणे वॉशर मध्ये घालून कार घेऊन एक चक्कर मारून यायचे. नंतर ड्रायर लावून परत जायचे. काही जणांचे कपडे असेच ड्रायरमध्ये रहायचे. एकदा आमचे धुणे असेच वॉशरमध्ये अडकले होते. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग त्या दुकानात टोल फ्री टेलीफोन नंबर होता. तिथे फोन केला व त्यांनी काही सुचना दिल्या. त्याप्रमाणे केले आणि आमचे धुणे मोकळे झाले.

.....पूढील भाग घेऊन येतेच....

Friday, January 08, 2010

इंग्रजीचा वर्ग

मेथॉडीस्ट चर्चमध्ये कॅथेलीन नावाची ७० वर्षाची बाई इंग्रजीचा वर्ग घ्यायची. हसत खेळत वर्ग चालायचा हा. या इंग्रजी वर्गाची सर्वात प्रमुख बाई बॉबी ८५ वर्षाची आहे. पाच सहा वर्ग आहेत. या इंग्रजी शिकणाऱ्या वर्गांमध्ये प्रामुख्याने चिनी, कोरीअन, टर्कीश, पाकिस्तानी या देशातील विद्यार्थ्यांच्या बायका होत्या. या बायका त्यांच्या मुलांना पण घेऊन यायच्या. या चर्चमध्ये त्या बायकांना इंग्रजी नीट शिकता यावे याकरता तात्पुरती बेबीसीटर्सची सोय केलेली असते.



मी व माझी एक श्रीलंकन मैत्रीण रेणूका या मुलांचे बेबीसिटींग करायचो. (अर्थातच वर्क परमिट होते म्हणून). ही मुले आमच्याकडे राहायची नाहीत. एक तर यांना बेबीसीटर्सकडे राहायची सवय नसते जशी अमेरिकन मुलांना जन्मापासूनच असते. आम्हाला खूप वैताग यायचा, एक तर त्या मुलांना इंग्रजी बोललेले कळायचे नाही आणि खूप रडायची ती मुले. त्यांना आई दिसायची नाही व खूप कावरीबावरी व्हायची. अशा वेळी मग त्या बायका मुलांना घेऊनच इंग्रजी वर्गात बसायच्या, मग आम्ही पण त्या वर्गात उपस्थित राहायचो.



हा इंग्रजीचा वर्ग असायचा आठवड्यातून दोन दिवस दोन तास. एका दिवशी एक धडा. त्या धड्यातील सर्व वाक्ये एकेकीने वाचायची. प्रत्येकीचे उच्चार वेगळे. या सर्व बायका इंग्रजी वाक्यांच्या खाली त्यांच्या भाषेतून इंग्रजी उच्चार लिहून घ्यायच्या. जसे मराठीतून ("माय नेम इज" याप्रमाणे) इंग्रजी शिकवताना शिकवणे कमी व गप्पा जास्ती. कॅथेलीन तिच्या नातवंडांची, पतवंडांची छायाचित्रे दाखवायची. प्रत्येक विद्यार्थिनीची चौकशी करायची.




इंग्रजी शिकवताना इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये एकदा साडीचा विषय निघाला. प्रत्येकीने साडीबद्दल खूप उत्सुकता दाखवली व मला विचारले की " तू आम्हाला साडी कशी नेसायची हे शिकवशील का?" कॅथेलीनच्या वर्गात ७-८ विद्यार्थिनी होत्या. प्रत्येकीलाच उत्सुकता आहे म्हणल्यावर एके दिवशी "साडी नेसण्याचा दिवस" घोषित केला. एका चीनी बाईकडे तिने भारतातून आणलेल्या ३-४ साड्या होत्या, त्याप्रमाणेच मॅचिंग पेटीकोट व ब्लाऊज पण होते. २ चिनी मुलींना साड्या नेसवल्या. नंतर लगेच साडीमधले छायाचित्रणही झाले. एका कोरिअन बाईला शर्ट पॅन्ट वरच साडी नेसवली. त्यातील पाकिस्तानी बाईने माझ्याकडून ३-४ साड्या सेट करुन घेतल्या. (सेट करून घेतल्या म्हणजे लहान मुलींची "कल्पना" साडी असायची त्याप्रमाणे). सेट केल्या म्हणजे निऱ्यांना व पदराला पिना लावलेल्या तिने तशाच ठेवल्या. साडी नेसणे शिकवल्याबद्दल या सर्व बायकांनी मिळून माझे आभार मानले. साडीबद्दल इतकी उत्सुकता दाखवल्याबद्दल मला तर खूपच छान वाटत होते.




एकदा कॅथेलीनने आम्हाला तिच्या घरी ख्रिसमस पार्टीला बोलावले. तिथे ८५ वर्षाची "बॉबी" व तिची १०२ वर्षाची आई "जुली" पण आली होती. ख्रिसमसचे झाड सुंदर सजवले होते व त्या झाडाखाली आम्हाला द्यायच्या भेटवस्तू ठेवल्या होत्या. रंगीबेरंगी व आकर्षक कागदी पिशव्यांमध्ये भेटवस्तू व त्या पिशव्यांमध्ये एकेकीच्या नावाची चिठ्ठी. प्रत्येकीला वाटले की आपल्याला काहीतरी वेगळी भेटवस्तू आहे, पण सगळ्यांच्या भेटवस्तू एकसारख्याच होत्या. नंतर सगळे मिळून स्मरणशक्तीचा खेळ खेळलो. स्मरणशक्तीच्या खेळात तिच्या घरांतील फक्त वस्तूंची नावे घ्यायची होती.




जेवणामध्ये सलाड, सँडविच, चॉकलेट केक, ज्युसेस, सुकामेवा, बटाटा चिप्स, आल्याची वडी (भारतीय नाही), कुकीज असे होते. आम्ही पण सर्वांनी कॅथेलीनला भेटवस्तू दिल्या. कॅथेलीनने प्रत्येकीच्या नवऱ्याला जेवण बांधून दिले.



"ख्रिसमस सुखाचा जावो" अशा शुभेच्छा देऊन एकमेकींचा निरोप घेतला. पार्टी सकाळी ११लाच होती. त्यादिवशी मायनस ५ अंश सेल्सिअस तापमान व कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल असे काळेकुट्ट आकाश भरून आले होते. असे पावसाळी वातावरण मला खूपच आवडते त्यामुळे ही पार्टी माझ्या कायमच्या लक्षात राहिली.

Thursday, January 07, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (२)

अमेरिकेत पहिल्यांदा आलो ते पोस्ट डॉक (Post Doctorate) करण्यासाठी. भारतीय अमेरिकेत वेगवेगळ्या निमित्ताने येतात. विद्यार्थी MS करायला. ते झाले की काहीजण पीएचडी करतात म्हणजे नोकरी मिळाली नाही तर देश न सोडता पीएचडी करतात. नंतर काही जण लग्नही जमवतात. काही जण एच १ व्हीसा घेऊन नोकरीवर येतात. अमेरिकेत 80 ते 85 टक्के (अंदाजे) लोक हे सॉफ्टवेअर क्षेत्रातले असतात. गुजराथी मोटेल बिझिनेस साठी इथे येतात तर काही जण फिरतीवर येतात नोकरीवरच त्यांचे हे फिरतीचे पोस्टींग असते बिझीनेस मिळवण्यासाठी. जे पुरूष इथे येतात त्यांच्या बायका dependent visa वर इथे येतात. काही dependent visa वर work permit काढून नोकरी करता येते तर काही वर नाही. मग अशा वेळेला आम्ही बायका काही ना काही मार्ग काढतो. प्रत्येकीचा मार्ग वेगळा. काही जणी शिक्षण घेतात, काही जणी त्यांच्या मुलांचे संगोपन करतात, तर काही जणी कोणत्याही प्रकारचे वर्क परमीट नसताना काम करतात, तर काही जणी voluntary work करतात.



तर ही पोस्ट डॉक कम्युनिटी खूप लहान असते. पोस्ट डॉक (post doctorate) ही degree नसते जशी पीएचडी असते तशी. ही एक प्रकारची कमी पगाराची नोकरीच असते. Post Doc means Research Experience in Foreign Countries यामध्ये paper publications असतात. Universtiy Campus खूप चांगले असते. पोस्ट डॉक करण्यासाठी अमेरिकेत भारतीयांसारखे चिनी, ब्लॅक, अमेरिकन्स, श्रीलंकन्स, बांगला देशीज, पाकिस्तानीज असे सर्व प्रकारचे लोक असतात. युनिव्हरसिटीमध्ये शिक्षणाचे वातावरण असते त्यामुळे सर्वजण एकमेकांशी मिसळून वागतात. पोस्ट डॉक करण्यासाठी तेलुगू लोक जास्त पाहिले. मराठी खूप कमी येतात. त्यामुळे आम्हाला आत्तापर्यंत एक-दोन असेच मराठी मुले भेटली. मराठी कुटुंब असूनपर्यंत भेटलेले नाही. आमचे भारतातील २-३ मित्र इथे पोस्ट डॉक साठी आलेले आहेत ते सोडून मराठी नवीन कुटुंब अजून तरी प्रत्यक्षात भेटली नाहीत.



आम्ही पहिल्यांदा ज्या युनिव्हरसिटीमध्ये आलो ते टेक्साज राज्यामध्ये. तिथे प्रचंड उन्हाळा असतो. तिथे ३-४ तेलुगू कुटुंबे होती. आम्ही सर्व जणी मिळून फिरायला जायचो, लायब्ररीत जायचो, एकमेकींकडे सहज म्हणून गप्पा मारायला जायचो. मी या सर्वांना मराठी पदार्थ खाऊ घातले आहेत आणि त्यांना ते आवडलेही आहेत. इथे आम्ही सर्व जणी चालत जायचो गोसरीला शुक्रवार संध्याकाळी पंजाबी ड्रेस घालून. इथल्या उन्हाळ्यात पंजाबी डेस घालता येतो इतका प्रचंड उन्हाळा असतो. १ वर्षानंतर दुसऱ्या राज्यात आलो तिथे आम्हाला २-३ कुटुंबे मिळाली. पाकिस्तानी, नॉर्थ इंडियन, श्रीलंकन. यातले काही पीएचडी करणारे होते. इथे ग्रोसरी स्टोअर्स लांब होते. पण बस सेवा छान होती. बसमध्ये जास्त करून भारतीय विद्यार्थी असायचे त्यामुळे मुंबईत प्रवास केल्यासारखेच वाटायचे. मी या बसमधून भरपूर हिंडलेली आहे. सुरवातीला ओळखी पटकन होत नाहीत अशा वेळेला मला एकटेपणा कधी आला नाही. बसमधून जायचे. प्रत्येक स्टोअर्स बघून यायचे काय काय आहे ते. असे केले की वेळही चांगला जातो, भटकंती होते आणि आपण कुणावर अवलंबून नाही. एकटे कुठेही फिरू शकतो हे पण महत्त्वाचे आहेच. कारण की अमेरिकेत public transport म्हणजे आनंदी आनंदच आहे. तुम्हाला कार येत नसेल तर घरी अडकून पडायला होते. पुण्यात कसे प्रत्येकाच्या बुडाखाली गाडी असते, इथेही तसेच आहे. पण भारतात रिक्षा टॅक्सी सेवा किती छान आहे. इथे आल्यावर मला हे खूप जाणवले. तिथे मला रिक्षातून हिंडायची खूप सवय होती. हात केला की रिक्षा हजर. मुंबईत तर काय कुठूनही कुठेही तुम्ही एकटे जाऊ शकता. कोणाचीही गरज भासत नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची पाळी तर भारतात कधीच येत नाही. काही मोठ्या शहरात आहेत बस सेवा व ट्रेन्स पण मी अनुभवलेले नाही. काही दिवसानी जेव्हा आम्ही कार घेतली तेव्हा आम्ही दोन विद्यार्थीनींना गोसरीकरता बरोबर घेऊन जायचो.



इथली ग्रोसरी स्टोअर्स इतकी मोठी असतात की सुरवातीला आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू किंवा खाण्याचे पदार्थ शोधायलाच वेळ लागतो. नंतर सवयीने "टकाटक" कार्ट मध्ये टाकायचे. मुंबईमध्ये मी रहायचे तेव्हा आमच्या घरासमोरच एक स्नॅकबार होता तिथले मला बटाटेवडे, इडली, डोसे खायची खूप सवय झाली होती. इथे आल्यावर इतके हाल झाले ना! खूपच जाणवले मला ते! इथे काहीही मिळत नाही असे. पुण्यामध्ये आपण किती भटकतो आणि चरत असतो. अगदी गावाबाहेर घर असेल तर भाजी आणायला मंडईत आले तरी घरी जाताना फरसाण, ढोकळे, चितळ्यांच्या बाकरवड्या काही ना काही घेऊन जातोच ना. मला आठवतयं पार्ल्याला मी रिक्षेतून जायचे. आधी लायब्ररीत पुस्तके बदलणे, मग भाजी, बरोबर काही ना काही घ्यायचे खादाडीसाठी. घरी आल्यावर जे काही आणले असेल ते खाऊन चहा प्यायचा व मग स्वयंपाकाला लागायचे. इथे आल्यावर खूप जाणवले, आता सवय झाली. ही सवय इथे कशी बदलते पहा. समजा इंडियन स्टोअर्स जवळ नसेल तर अमेरिकन स्टोअर्समधून आयस्क्रीम, कुकीज, कोक व बटाटा चिप्स खूप खाल्ले जातात. इथे तर काय आयस्क्रीमच्या बादल्याच मिळतात. बटाटा चिप्स तर तुम्ही एकदा खायला बसलात ना तर खातच बसतो माणुस! रोज दुपारी चहा ऐवजी कोक ढोसायची खूप सवय लागून गेली होती. वजन खूप वाढले. एक दिवस असा आला की आता हे सर्व थांबवायलाच पाहिजे. आता आम्ही वरील कोणतेही पदार्थ आणत नाहीत, मग खाणे तर राहिले खूप दूर!!


...... पुढील भाग घेऊन येतेच ......

Monday, January 04, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (१)

गवार कितीला दिली गं? ८ रुपये पाव ताई. बापरे, ८ रु. पाव! ७ नि दे ना! ताई न्हाई परवडत, तुम्हाला म्हणून ७.३० रू पाव ने देते. घ्या ताई. माल एकदम चांगला आहे. ताजी भाजी आहे एकदम. असे संभाषण होते ते भारतात. दररोज जर का तुम्ही ठराविक भाजीवालीकडून भाजी घेत असाल तर तुमचा संवाद वाढतो. मुले किती? कोणत्या ऑफीसला जाता? साडी किती छान आहे ताई तुमची असे करत करत तुमच्या जीवनातला भाजी व भाजीवाली हा एक अविभाज्य घटक ठरून जातो. इथे तसे नाही. इथे म्हणजे अमेरिकेत. सर्व दुकानातून भाजी आकर्षकरित्या मांडलेली असते. स्वच्छ सुंदर भाजी. कोणतीही कीड नसलेली. माती न लागलेली भाजी. कोणतीही भाजी तुमची तुम्ही, हवी तशी घेऊ शकता. शक्य वाटल्यास वजनही करून घेऊ शकता. वजन काटे बाजूला असतातच. पैसे देवून बाहेर पडा. इथे पण कॅशिअरशी संवाद होतो, पण तो ठराविकच. hi, hello, how are you? you have a good day. that's it.



पुढे पुढे भाजी घेणे खूपच मेकॅनिकल होऊन जाते. जेव्हा आपण पहिल्यांदा अमेरिकेत येतो तेव्हा आपल्याला हा भाजी नामक प्रकार खरेदी करायला खूप छान वाटते, पण नंतर कंटाळवाणा होतो. कितीही कंटाळा आला तरी जावे हे लागतेच नाहीतर आठवडाभर भाजी नाही. भारतात कसे सहज म्हणून चक्कर मारायला बाहेर पडले तरी आपण येताना एक दोन जरुरीपुरत्या भाज्या आणू शकतो. काही ठिकाणी तर टोपलीभर भाजी घेऊन घरी तुमच्या दारात येतात विकायला. इथे अमेरिकेत भाजीची दुकाने काही जवळ नसतात. त्यासाठीच इथे कार लागते. तुमच्याकडे कार नसली तर तुम्हाला कोणीही विचारत नाही तुम्हाला भाजी/किराणा आणायचा आहे का? सुरवातीला लगच्या लगेच तुमच्याकडे कार नसते. त्यातून तुम्ही युनिव्हरसिटीत असाल तर जवळपास किराणामालाची दुकाने असतात. तुम्ही चालतही जाउ शकता. दुकान दूरवर असेल तर बस सर्विस असते, त्यातुनही जाऊ शकता. बसस्टॉप हा काही वेळेला घरापासून थोडा लांब असू शकतो. मग अशा वेळेला घरापासून किराणा माल/भाजीची ने आण करणे कठीण होऊन बसते. कडाक्याच्या थंडीत तर ओझी उचलून जीव जातो तुमचा. चक्क हमाली. नशिबाने तुमची एखादी मैत्रिण/मित्र असेल तर सांगतो आमच्याबरोबर या तुम्ही भाजी आणायला.



तर ही भाजी म्हणजे नुसती भाजी नाही तर सर्व सामान दैनंदिन जीवनात लागणारे आणावे लागते. भाजीपाला, फळे, दूध, ज्युस, काही वेळेला पाणी पण विकत आणावे लागते. शिवाय तेल, साखर, चहा, पीठे, मीठ, ब्रश, कोल्गेट, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, यादी बरीच मोठी आहे. पेपरटॉवेल, लहान मुलं असेल तर डायपर, साबण, अजून बरेच काही दैनंदिन जीवनाला लागणारे. ही झाली अमेरिकन स्टोअर्स मधली यादी. इंडीयन स्टोअर्सची यादी वेगळी. हे इंडियन स्टोअर्स जर जवळ असेल तर ठीक. खूप दूर असेल तर एकाच वेळी आठवणीने बरेच सामान आणावे लागते. त्यात डाळी, पिठे यांचे वजन खूप असते ना. त्यातून वरचा मजला असेल तर त्रासदायक ठरते. दूध, ज्युस, पाणी यांचेही ३-४ लिटरचे कॅन असतात ते वाहून आणायचे. कार्टमधून कारमध्ये, कारमधून काढून घरी. वरचा मजला असेल तर वैताग. सध्या आम्ही वरच्या मजल्यावर राहतो. बाहेरून जिना आहे त्यामुळे पायऱ्या कमी आहेत इतकेच. कडाक्याची थंडी असेल आणि बर्फ पडत असेल तर काय छान वाटतयं ना ही ओझी उचलायला. एक तर जाड जाड कोट, स्वेटर्स, मफलर, हातमोजे घालून शरीर वजनदार होते, त्यात ही सामानाची भर! ओझी उचलून मनगट बळकट बनते. जड जड सामानाची ने आण करून ,जिने वर खाली उतरून व्यायाम होतो. ऱ्हदयाचे ठोके वाढतात म्हणजेच श्वासाचा व्यायाम पण छान होतो.



मी मुंबईत असताना तर टेलिफोनवरून किराणामालाची यादी सांगायचे. दोन तासात स्वच्छ व नीटनेटके पॅकींग केलेले सामान घरपोच! नाहीतर जाता येता यादी द्या तुमच्या दुकानदाराकडे, माल घरपोच. तुमच्याकडे कार नसेल तर भारतीय किराणामाल तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. ५० डॉलर्सच्या वर बिल असेल तर घरपोच मालाचे वेगळे पैसे घेत नाहीत. पॅकींग चांगले असते. भारतात बाकीचा किराणा सोडला तर भाजीपाला आणावाच लागतो. मुंबई मध्ये असाल ट्रेनच्या धक्याबुक्यातून पटकन फलाटावर उतरून घरी जाता जाता भाजी. पुण्यात असाल तर प्रचंड गर्दीतून कसरत करत भाजी आणायला लागते. धूळ व धुर असतोच सगळीकडे पसरलेला. पण भाजी सोडली तर किराणा, दूध, पेपर, घरपोच असते! धुणे भांडी नाहीत! ऑफीसमधून घरी आल्यावर फक्त स्वयंपाक. घरी असाल तर बाकीची दमणूकही नाही. तसा काही ठिकाणी वीज व पाण्याचा तुडवडा आहेच, तिही एक कटकट असतेच. या सर्वातून मला जाणवले ते असे की भारतात इतर सुखसोयी असल्या तरी हवेतले प्रदुषण, वाहनांचे आवाजाचे प्रदुषण, मुंबईत तर सतत घाम येत असतो, या सर्व गोष्टींनी खूप दमायला होते. इथे बाकीची हमाली कामे करून दमायला होते पण एक प्रकारचा व्यायाम होतो, शिवाय स्वच्छ शुद्ध हवा आणि आपल्याला ही सर्व कामे करायचीच आहेत मग तुम्हाला कंटाळा येवो, बरं नसू देत, किंवा तोचतोचपणा साठून रहू देत. आपल्याला सतत काम करण्यासाठी सज्ज रहायचे आहे त्यामुळे ओघाने सतत तरतरीत रहाने आलेच. मुंबई पुण्यात तर संध्याकाळच्या स्वयंपाकालाही बायका मिळतात. ऑफिसमधून आले की स्वयंपाक तयारच असतो. मी माझ्या मैत्रिणीकडे बघितले आहे की स्वयंपाकाला बाई संध्याकाळची. शिवाय सकाळी ६ लाच मोलकरीण हजर. धुणेभांडी केरवारे करून ७ लाच घर एकदम चकाचक. असो.


.....पूढील भाग घेऊन येतेच....

Friday, December 25, 2009

गोंधळात गोंधळ

सकाळी मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॅलस विमानतळावर. आमचे दोन मित्र आम्हाला विमानतळावर सोडणार होते. सामान बरेच असल्याने दोन कार कराव्या लागल्या. अर्धा संसार ups तर्फे पाठवला व अर्धा आमच्या चार बॅगांमधे.



निघण्याच्या वेळी रविने जाळ्यावर विमान कोणत्या गेटवरून सुटणार आहे ते बघून त्याने तसे श्रीनिवासला सांगितले. श्रीनिवास अवाजवी आत्मविश्वासात म्हणाला," हो हो. मला माहित आहे सर्व. मी आत्तापर्यंत बऱ्याच जणांना विमानतळावर सोडले आहे."



आमच्या कार निघाल्या. एका कारमधे मी व श्रीनिवास व दुसऱ्या कारमधे रवि व विनायक. विमान दुपारी साडेबाराचे होते म्हणून २ तास आधी निघालो. एक तास जाण्यामधे व एक तास सामानाची क्ष किरण तपासणी याकरता. श्रीनिवास व मी ११ ला विमानतळावर पोहोचलो व रवि-विनायकची वाट पाहू लागलो. साडेअकरा व्हायला आले तरी ह्यांचा पत्ता नव्हता. श्रीनिवास ३-४ वेळा शोधायला गेला त्यांना. तसे रवि-विनायक पण वेळेवर पोहोचले होते विमानतळावर, ते पण आम्हाला शोधत होते. शोधता शोधता भेटले एकमेकांना त्या अवाढव्य विमानतळावर. कोणाकडेही जागोजागी भटकणारे दूरध्वनीयंत्र नव्हते .



गंमत काय झाली होती की रवि ज्या गेटवरून विमान सुटणार त्या गेटवर उभे होते. श्रीनिवास व मी चुकीच्या गेटवर उभे होतो. श्रीनिवासच्या अवाजवी आत्मविश्वासामुळे सगळा गोंधळ उडाला होता.



आम्ही दोघे काउंटरवर गेलो तेव्हा तेथील बाई म्हणाली, " आता १२ वाजले आहेत. तुमच्या सामानाची क्ष किरण तपासणी होईपर्यंत एक तास जाईल. तुमचे विमान चुकले आहे. पण मी तुमच्याकरता एक काम करू शकते. जास्तीचे पैसे न घेता तुम्हाला शिकागोतर्फे ग्रीनवीलचे बुकींग करून देते." आता परत सगळा उलटा प्रवास करण्यापेक्षा वेळ जास्त लागला तरी चालेल म्हणून आम्ही लांबचा पल्ला पत्करून जाण्याचा निर्णय घेतला.



श्रीनिवास रविला टाटा बाय बाय केले आणि परत काउंटरपाशी येऊन उभे राहिलो सामानाची क्ष किरण तपासणी करायला. एक गोंधळ संपल्यावर दुसरा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी ११ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील अतिरेकी हल्यामुळे एकूणच विमानतळावरची तपासणी व्यवस्था खूपच कडक झाली होती. चार बॅगांमधला भरलेला संसार उलथापालथा केला गेला.



आमचे विमान उड्डाण असे काहीसे होते. ३ ते ५ डॅलस-शिकागो, शिकागोला ३ तासांच्या अवधीनंतर ८ ते १० शिकागो ते ग्रीनवील असे दुसरे उड्डाण. विमानतळावरील धावपळ संपल्यावर आम्ही थोडे खाऊन घेतले आणि प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आमचे विमान चुकले आहे, त्यामुळे दुपारी ३ च्या ऐवजी रात्री ११ च्या सुमारास आम्ही ग्रीनवीलला पोहोचत आहोत." आणि डॅलस-शिकागो विमानात प्रवेश केला.



शिकागो विमानतळावर पहिल्याप्रथमच आम्हाला अमेरिकेतील विविध माणसांची गर्दी दिसली. आता विमानतळावर तीन तास थांबावे लागणार होते. मला गर्दी पाहून खूप आनंद झाला. त्या गजबजलेल्या विमानतळावर तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर. सरकती पायवाट व सरकते जीने यावरून फिरले. प्रत्येक विमान आले की गर्दीचा लोंढा इकडून तिकडे जात होता. बरीच विमाने जमिनीवरून आकाशाकडे व आकाशातून जमिनीकडे झेपावताना पाहिली. काचेच्या तावदानातून विमानतळाच्या बाहेरील दृश्य सहज दिसत होते की जेथून विमाने प्रत्यक्षात उडतात. बरीच वर्दळ असते तिथे. वर्दळीचे निरिक्षण करताना लक्षात आले की तेथील कर्मचारी खूपच व्यग्र असतात.



विमानतळावर फिरताना एका गेटवर एकीचे विमान अगदी थोडक्याकरता चुकले, तिने तिथल्या माणसाला खूप विनवले, पण तो म्हणाला, आता विमानाचा विमानतळावरचा संपर्क तुटला आहे. मी काहीही करू शकत नाही. दुसरीकडे सर्व प्रवासी विमानात बसले होते पण विमानचालक गायब होता, शेवटी माईकवरून त्याचे नाव २-३ वेळा पुकारण्यात आले.



इकडे तिकडे फिरल्यावर बरीच भूक लागली म्हणून विमानतळावरच्या उपहारगृहात शिरलो. तिथे एक मद्रासी दिसला. त्याला पाहिल्यावर असे वाटले की आत्ता इथे गरम गरम इडली सांबार मिळाले तर किती छान होईल! उपहारगृहात पण विमानचालक त्यांच्या गणवेशात बसून त्यांचे जेवण घेत गप्पा मारताना दिसले.



फ्राईड राईस खाऊन घेतल्यावर परत एकदा प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आम्ही शिकागोवरून निघालो आहोत, दोन तासात पोहोचू" ८ ला निघणारे विमान ९ वाजता गेटवर लागले. विमानात बसल्यावर पण विमान लवकर उडेना. विमानातील छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले तर एकापाठोपाठ एक अशी विमाने लागली होती. धावपट्टीवरून हळूहळू विमान सरकत होते. विमानांचा वाहतुक मुरंबा झालेला पाहून खूप आश्चर्य वाटले. पाऊस व जोराचा वारा असल्याने विमाने उड्डाणाकरता हळूहळू सोडली जात होती. डेंटनच्या घरातील साफसफाई करण्याने व सामानाची बांधाबांध करण्याने आधीच जीव मेटाकुटीला आला होता, त्यातून हा दीर्घकाळ प्रवास!! पण काय करता?



शेवटी एकदा पंखातील सर्व बळ एकवटून घेतली उडी आकाशात आमच्या विमानाने. थोड्याचवेळात हवाईसुंदरीने शीतपेय आणून दिले, त्यामुळे थोडे बरे वाटले. खिडकीतून खाली पाहिले तर एकदम नयनरम्य दृश्य दृष्टीस पडले. आकाशात जणू काही पिवळ्या रंगांच्या माळा पसरल्या आहेत. हवामान चांगले नसल्याने विमानाचा वेग कमी होता. रात्री सुमारे १२ ला आम्ही ग्रीनवील साऊथ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सरकत्या जिन्यावरून खाली उतरताच प्राध्यापकांना हस्तांदोलन केले. आमची छायाचित्रे त्यांना आधीच पाठवल्याने आम्हाला त्यांनी लगेचच ओळखले.



तिकडे प्राध्यापकांचाही थोडा गोंधळ उडाला होता. आन्सरिंग मशीनवर ठेवलेले ४-५ निरोप न ऐकताच ते आम्हाला दुपारी ३ ला ग्रीनवील विमानतळावर न्यायला आले होते. घरी परत गेल्यावर निरोप ऐकले व रात्री परत १२ ला आम्हाला घ्यायला आले. डेंटन ते ग्रीनवील साधारण १००० मैलाचा प्रवास. तीन तासाची थेट फ्लाईट बुक केली होती. पण या गोंधळामुळे सकाळी ९ वाजता निघून तब्बल १५ तासांनी ग्रीनवीलला पोहोचलो.



ग्रीनवील ते क्लेम्सनचा तासभराचा प्रवास रात्री दिसणाऱ्या घनदाट झाडांनी सुखावून गेला. विनायक प्राध्यापकांशी बोलत होता. मी मात्र डोळे मिटून दिवसभर झालेल्या गोंधळाची उजळणी करत होते.

हे आमचे अमेरिकेतील येथे आल्यापासून वर्षाच्या आतले पहिले स्थलांतर. दुसऱ्या स्थलांतरात A to Z सर्व सामान ups तर्फे पाठवले. फक्त आमचे पिटुकले दूरदर्शन यंत्र व संगणक आमच्याबरोबरच आमच्या कारमधे. अर्थात दुसरे स्थलांतर कारने जाण्याच्या टप्यात होते.

Wednesday, December 23, 2009

दूध

दूध अशी हाक आली की आम्ही स्टीलचे/हिंडालियमचे पातेले विसळून टेबलावर उपडे करून ठेवायचो कारण की आम्हाला तसे तांब्यांनी सांगून ठेवलेले होते की मी बऱ्याच ठिकाणी दूध घालतो, मला अजिबात वेळ नसतो, पातेले तयार ठेवलेत तर मला पटकन दूध घालून दुसरीकडे जाता येईल. त्यांचा एक टेंपो होता त्यामध्ये ३-४ मोठाले कॅन असायचे. कॅनमध्ये ३-४ मापे असायची. प्रत्येकाच्या घरी ४ मापे, ६ मापे असे ठरलेले दूध ते घालत असत. जेव्हा जास्तीचे दूध हवे असेल तर सांगायचे आधी ८ दिवस सांगून ठेवत जा. सणासुदीचे दिवस असतील तर, किंवा कुणी पाहुणेरावळे आलेले असतील तर, किंवा घरी लहान मूल आलेले असेल तर दूध जास्त लागते. थंडी असो, पाऊस असो, नियमितपणे दूध घालणे आणि ते सुद्धा घरोघरी जाऊन हे काही सोपे काम नाही. दूध नासले की कॅलेंडरवर टीक मार्क करायचो आम्ही. कमीचे, जास्तीचे दूध, दूध ज्यादिवशी आले नाही, अशा सर्व नोंदी कॅलेंडरवर असायच्या. दूध एकदम चांगले दाट असायचे. श्री तांबे अजूनही आमच्या आईच्या घरी दूध घालतात, आता ते पिशवीतून येते.



श्री. तांबे यांच्या आधी खूप पूर्वी आईकडे सरकारी दूध घेत असत. हे सरकारी दूध एका चौकोनी लाकडी टपरीमध्ये येत असे. त्यांच्या एक लिटरच्या काचेच्या बाटल्या खूप जाडजूड असायच्या. त्यावर चांदीसारखी दिसणारी टोपी होती. चांदीसारख्या दिसणाऱ्या कागदावर थोडे पट्टे, काहींवर निळे, तर काहींवर हिरवे, लाल. निळ्या रंगाचे पट्टे म्हणजे म्हशीचे दूध आणि हिरव्या किंवा लाल रंगाचे पट्टे असतील तर ते गायीचे दूध असे काहीतरी होते. हे दूध आणायला पहाटे पहाटे जायला लागायचे. सरकारी दूधाची गाडी यायची. त्यातून बाटल्या खाली उतरवल्या जायच्या आणि मग त्याचे वाटप व्हायचे. रिकाम्या बाटल्या देवून भरलेल्या बाटल्या द्यायच्या. बाटल्यांचे दूध घरी आले की ते पातेल्यात काढून तापवायचे व रिकाम्या बाटल्या धुतल्या जायच्या दुसऱ्या दिवशी नेण्याकरता. पहाटे ४ ला चौकोनी टपरीसमोर रांग लावावी लागत असे. वेळेवर गेले नाही तर दूध संपायचे. सरकाअरी दूध घेणाऱ्यांकरता एक कार्ड असे ते दाखवायचे व दूध घ्यायचे. पहाटे दूध आणण्याचे काम माझे आजोबा नाहीतर बाबा करत असत. उन्हाळ्यात पहाटे उठायला काही वाटायचे नाही. उलट गार हवेत छान वाटायचे. आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर जायचो कधीकधी दूध आणायला. थंडीपावसात जायला थोडे कठीण असे. त्यावेळेला पुण्यात कडाक्याची थंडी पडायची. पहाटे पहाटे दूध आणण्याकरता बाबांनी दार उघडले की इतके काही थंडगार वारे आत यायचे की आम्ही दोघी बहिणी लगेच ओरडायचो बाबांवर " बाबा दार लावून घ्या ना पटकन, खूप थंडी वाजत आहे" आई बजावायची "अंधार आहे, जाताना बाहेरचा दिवा आठवणीने लावून जा. बाबांचे मित्र दूध आणायला यायचे. तिथे कधीकधी निरोपांची देवाणघेवाण होत असे. "आज आमची सौ येणार आहे बरंका वहिनींना भेटायला. त्यांना आठवणीने निरोप द्या."




लग्न झाल्यावर सासरी आमच्याकडे कॅनचेच दूध होते. दूध घालायला घरी आले की लगेच मनीमाऊ यायची दूध प्यायला. दूध गॅसवर तापवायला ठेवायच्या आधी ही मनीमाऊ इतकी काही भंडावून सोडायची की तिला पहिले बशीत ओतून द्यायचे दूध मग गॅसवर तापवत ठेवायचे. नंतर चितळ्यांचे दूध सुरू केले. जेंव्हा मुंबईत आलो तेव्हा घरी येऊन नाही कुणी दूध घातले. घरी येऊन दूध घालायची फॅशन फक्त पुण्याचीच असावी. मुंबईत जिथे आम्ही राहत होतो तिथे खालीच एक डेअरी होती. तिथे पातेले घेऊन जायचे. हे पातेल्यातले दूध घरी घेऊन जाताना श्वास रोखून जावे लागत असे कारण की पातेल्यातले दूध हेंदकाळून खाली सांडायची भीती. हे दूध इतके काही "महापातळ" होते की काय बिशाद चहाचा रंग बदलेल. नंतर जरा थोड्या लांब असणाऱ्या डेअरीतून चांगल्या प्रतीचे दूध आणायला लागलो. हे दूध तो डेअरीवाला आम्हाला एका पातळ प्लॅस्टीकच्या पिशवीतून देत असे. त्यावर एक छोटा दोरा बांधून. अलगद पिशवीत भाजीच्या सर्वात वर ठेवायचे मी हे दूध. हे दूध पातेल्यात ओतताना पण एक कसरतच असे. एक तर आधी त्या पिशवीला निरगाठ असायची. डाव्या हाताने पिशवी धरायची व उजव्या हाताने ती गाठ सोडवायची. गाठ सोडवायची म्हणजे ब्लेड घेऊन ती अचुक कापायची. कापली की प्लॅस्टीकची पातळ पिशवी पूर्णपणे उघडायची त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हे दूध पातेल्यात ओतावे लागायचे. त्याकरता मी एक युक्ती काढली. ही पिशवी पातेल्यातच ठेवायची व वरून कापायची निरगाठीच्या खालूनच म्हणजे दूध पातेल्यात आणि मग प्लॅस्टीकची पिशवी काढायची. थोडे दिवसांनी पिशवीतले दूध सर्रास येऊ लागले. आधी महानंदा आले, नंतर वारणा व गोकुळ.



इथे अमेरिकेत आल्यावर अगदी पहिल्यांदा सवयीने कॅनमधले दूध मी पातेल्यात घेऊन तापवायचे. पण इथे कुठची साय, नि कुठचे लोणी, नि कुठचे तूप! जरूरीपुरते दूध काढा, तापवा अगर तापवू नका, तसेच प्या. खरे तर दूध म्हणजे चहा आलाच. चांगला चहा हा पूर्णपणे दूधावर अवलंबून असतो. अगदी थोड्या दुधाने चहाचा रंग बदलायला पाहिजे. चहा म्हणजे कसा अमृततुल्य चहा लवकरच घेऊन येते!!

Monday, December 21, 2009

पक्षी

















यातील काही पक्षी ब्रेड खाताना तो हवेतच झेलून खातात. परत बागडत एक फेरी मारून येतात. पाण्यात एक डुबकी मारतात. परत पंख हालवत येतात ब्रेड खायला. खूप मजा येते यांना ब्रेड देताना.

Monday, December 14, 2009

मी जरा फ्रेश होऊन येते !

तीन चार महिने झाले की माझी चुळबुळ सुरू व्हायची. चार महिने म्हणजे खूप झाले. विनुला सांगायचे मी जाऊन येते रे पुण्याला. खरे तर मुंबईवरून पुण्याला जाणे म्हणजे काही खूप लांब जाणे नाही, अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याइतपत जवळ आहे. ही चार पाच दिवसांची ट्रीप म्हणजे जाताना जितका उत्साह तितकाच किंवा त्याहूनही अधिक उत्साह मला येताना असायचा. खूप फ्रेश होऊन यायचे मी. बॅग पण छोटी सुटसुटीत असायची. ही छोटी बॅग भरताना पण मला भारी उत्साह असायचा. जाता येताना डेक्कन एक्सप्रेस ठरलेली असायची. रेल्वेमध्ये ही एक छान सोय असते. बायकांचा एक वेगळा डबा असतो. आपण एकटे जरी असलो तरी इतर बायकांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात. ऐकून करमणूक होते आणि प्रवासही छान होतो.



पंजाबी ड्रेस घालून, गळ्यात एक पर्स लटकवून व बॅग घेऊन मी डेक्कनमध्ये प्रवेश करायचे. गाडी सुटताक्षणी कानातले गळ्यातले सेट घेऊन विक्रेते यायचे. हा एक छान टाईमपास असतो. तीन चार चौकोनी बॉक्स असायचे ते सर्व बायकांमध्ये फिरायचे इकडून तिकडे. हे बघण्यात पण छान वेळ जातो. खिडकीत जागाही कदाचित मिळायची थोड्यावेळाने. कर्जत आले की बटाटेवडे खाणे हे ठरलेले. खिडकीतल्या बायकांना विनंती करून बाकीच्या "ए माझ्यासाठी घे गं पटकन" अशा सांगायच्या. मग खिडकीतून हळूच बटाटेवडे घेऊन ते बायकांकडे द्यायचे व पैसे बटाटेवडेवाल्याकडे. सगळ्यांचे मग बटाटेवडे व त्यावर कॉफी चहा वगैरे सुरू व्हायचे.



सर्व बायका थोड्या स्थिरस्थावर होऊन मग "तुम्ही कुठे निघालात? " "कोणत्या स्टेशनवर उतरणार? शिवाजी नगर की स्टेशन? " "मुंबईत कुठे राहता? " अशा थोड्या गप्पा टप्पा सूरू व्हायच्या. नंतर घाटातले सृष्टीसौंदर्य पाहण्यात खूप मजा यायची. घाट पाहता पाहता मनातच "हं आता तासाभरात येईलच शिवाजी नगर" कधी एकदा पुणं येतयं आणि मी आईकडे जाते असे होऊन जायचे मला. शिवाजी नगरला उतरायचे मी. स्टेशन येताक्षणी अगदी लगेचच उतरायचे. भराभर जिना चढून पूल ओलांडून पलिकडच्या पायऱ्या पण अगदी पटापट उतरायचे. मला अजिबात धीर नावाचा प्रकार नाही. असे भराभर चालून गेले की मग शिवाजी नगरला पटकन रिक्षा मिळते नाहीतर नंतर थोडे कठीण होऊन बसते.



रिक्षात बसल्यावर पण किती ही रहदारी! केव्हा येणार घर! असे मनातल्या मनात पुटपुटायचे. आईच्या घरासमोर रिक्षा थांबली रे थांबली की हातातले पैसे देऊन धावतच बॅग टाकून आईला आवाज द्यायचे आले गं मी! आई पण लगेच म्हणायची आलीस का! आम्ही वाटच बघतोय! चल लगेच हात पाय तोंड धूऊन घे. जेवायलाच बसू या. मी आमटी गरम करत ठेवते. का आधी चहा ठेऊ? " नको चहा नको. माझे खाणेपिणे झाले आहे मधेवाटेत" इति मी. जेवायलाच बसूया लगेच. मला खूप भूक लागली आहे. जेवत जेवता "आई तुझ्या हातचं जेवायला किती चांगलं वाटतं गं!! एकीकडे गप्पा सूरू व्हायच्या लगेच आमच्या. जेवल्यावर रंजनाला फोन. ती पण लगेच ऑफीस सुटल्यावर घरी यायची आणि सई पण माझी भाची! मग आमच्या तिघींची जी टकळी चालू व्हायची ती अगदी मी निघेपर्यंत! बडबड करून डोके दुखायला लागायचे. रात्री झोपताना पण "आता झोपू या हं १२ वाजून गेलेत, सकाळी उठवत नाही मग" आई म्हणायची. ५ ते १० मिनिटेच शांत जात असतील. परत कुणाला तरी काहीतरी आठवायचे की परत वटवट सूरू.



आईकडे गेल्यावर एक दिवस चतुर्श्रुंगी व कमलानेहरू पार्क हे कार्यक्रम ठरलेले. चतुर्श्रुंगीला देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे एक गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. या दोन ठिकाणी जाऊन आले की मन प्रसन्न व्हायचे. कमला नेहरू पार्कला तर खूपच मजा यायची. सई जायची घसरगुंडी खेळायला. बाबा पार्कला एक चक्कर मारून यायचे व येताना सईला परत घेऊन यायचे. तोपर्यंत आम्ही तिघी म्हणजे आई, मी व रंजन माझी बहीण हिरवळीवर बसून निवांत गप्पा मारत बसायचो. तिथे आमच्या ओळखीचा एक भेळपुरीवाला व पाणीपुरीवाला होता. तिथे मनसोक्त खादाडी करायचो. भेळपुरी, पाणीपुरी, दहीबटाटापुरी व रगडा पॅटीस. जाताना व येताना आईबाबा व सईला रिक्षेत बसवून द्यायचो. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींच्या वेगळ्या गप्पा व्हायच्या. रिक्षेत बसल्यावर आई बजावायची. लवकर या बरं का! आम्ही दोघी "हो गं आई. " आम्ही दोघी मुद्दामुनच रमत गमत यायचो कारण की तोच वेळ आमच्या दोघींच्या गप्पांसाठी असायचा! या दोन कार्यक्रमांच्या आधी १-२ दिवस मी सासरी जाऊन यायचे. तिथे माझी जाऊ वसुधा व पुतणी सायली माझी वाटच पाहात असायच्या कारण की आमच्या तिघींचाही कार्यक्रम ठरलेला असायचा तो म्हणजे तुळशीबाग व पुष्करिणी भेळ!!



मुंबईला परत निघायच्या दिवशी मी थोडे लवकर जेवायचे. नंतर एक छोटी डुलकी काढून साबणाने स्वच्छ तोंड धूउन पावडर कुंकू लावायचे. तोपर्यंत आईचा चहा व्हायचा. चहा घेऊन आजीआजोबांच्या फोटोला व आईबाबांना नमस्कार करून निघायचे. निघताना आई हळदी कुंकू लावायची. सोबत डिंकाचे लाडू, साजूक तूप, थालिपीठाची भाजणी काही ना काही द्यायचीच!! मुंबईला निघताना मी एकदम फ्रेश असायचे. बहीण भाची किंवा कधी कधी आईबाबा मला सोडायला यायचे पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनला बसायला जागा मिळायची. गाडी सुटल्यावर रंजना सई किंवा आईबाबा जे कोणी सोडायला येणार असेल त्यांना हात हालवून टाटा करत रहायचे मी खिडकीतून ते दिसेनासे होईपर्यंत!


गाडी सुरू होऊन प्लॅटफॉर्म सोडायची. आता मात्र थोडे अश्रू वाहायचे डोळ्यातून. थोड्यावेळाने चहा यायचा. चाय चाय ! गरम चाय! कितने को दिया?..... गाडीनेही भरपूर वेग घेतलेला असायचा.

Friday, December 11, 2009

टंकलेखन (३)

तक्ते बनवताना सर्व गोष्टींचा अंदाज आधीच घ्यावा लागतो. त्यात रकाने किती आहेत, प्रत्येक रकान्यात मजकूर किती आहे, आकडेवारी किती आहे. शिवाय डाव्या व उजव्या बाजूने कितीवर मार्जिन सेट करायचे. तक्त्याच्या खाली जो कोणी सही करणार आहे त्याचे नाव व पद. सही करण्याकरता सोडलेली जागा, शिवाय तक्त्यावरचे शीर्षक. प्रत्येक गोष्टीचे मोजमाप, अंदाज घेणे, शिवाय तक्ता कशा प्रकारे सुबक दिसेल हे पण विचारात घ्यावे लागते. तक्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॅब लावणे. किती अंतरावर किती टॅब लावायचे आणि टॅब लावताना विचारात घ्यावे लागते ते म्हणजे दोन टॅबमधले अंतर. उदाहरण घ्यायचे झाले तर पहिला रकाना no. of items तर याचे आधी स्ट्रोक मोजायचे, दोन शब्दांच्या मधली जागा मोजायची, शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक मोकळी जागा आणि दोन रकान्यांमधल्या रेषा मोजायच्या. आता no. of items मध्ये १२ स्ट्रोक आहेत दोन शब्दांच्या मधल्या मोकळ्या जागा धरून. शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक आणि दोन रेषा म्हणजे १२ + ४ = १६ म्हणजे पहिला टॅब १६ अंकावर लावायला लागेल याप्रमाणे सर्व टॅब लावून घ्यायचे. टॅब लावायची एक की असते कळफलकावर ती दाबायची प्रत्येक टॅब लावल्यावर म्हणजे मग ते लागतात. हे टॅब नेमलेल्या ठिकाणी लागलेले आहेत का नाही ते कळफलकाच्या सर्वात वरची पट्टी असते स्पेसबारसारखी दिसणारी ती दाबली की कळते. सर्व तक्ता कळफलकाच्या साहाय्याने बनवता येतो. उभ्या रेषेसाठी एक युक्ती आहे. कॅरेज वर कागद लावलेला असतो त्यावर एक पट्टी असते तिथे एक छोटे भोक असते तिथे बॉलपेन घालायचे व रोलर फिरवायचा की त्या रकान्यासाठी उभी रेष मारली जाते. अशाच बाकीच्या उभ्या रेषा मारून घ्यायच्या. तक्ते बनवून झाले की सर्व लावलेले टॅब मोकळे करायचे. याकरताही एक की असते. स्पेसबार सारखी दिसणारी पट्टी दाबायची की ज्या ठिकाणी टॅब लावलेले आहेत तिथे जाता येते. त्या त्या ठिकाणी जाऊन टॅब मोकळे करण्याची की दाबायची की ते मोकळे होतात.



टंकलेखन मशीनमध्ये रिबीन बसवण्यासाठी ती नीट बघून बसवायला लागते कारण की रिबीन अर्धी लाल व अर्धी काळी असते. उलटी बसली तर लाल अक्षरे उमटतील. कार्बन पेपर दोन कागदांमध्ये घालताना तो सुद्धा नीट घालावा लागतो. तोही उलटा नजरचुकीने बसवला जाऊ शकतो. दोन कागदांमध्ये कार्बन पेपर नीट खोचला गेला आहे ना हे बघावे लागते. आता टंकताना ज्या चुका होतात त्या चुका खोडणे पण त्रासदायक आहे. चुका टाळण्यासाठी टंकलेखन वेगाबरोबर कमालीची अचूकता असणे फायद्याचे ठरते. एखादे अक्षर चुकीचे टंकले गेले तर ते एकतर खोडरबराने खोडायचे नाही तर व्हाईटफ्ल्युएडने. खोडरबराने खोडायचे असेल तर मुख्य कागदाच्या मागे जिथे खोडायचे असेल तिथे एक जाड कागद ठेवायचा व खोडायचे कारण की कार्बन पेपर लावलेला असल्याने खोडताना सर्व प्रतींवर खोडले जाते व बाकीच्या प्रतींची वाट लागते. सर्व काळे होऊन जाते. व्हाईट फ्ल्युएडने खोडायचे असल्यास ते आधी पातळ करून घ्यायचे व अलगद नेमक्या चुकलेल्या जागी नेलपॉलिश लावतो त्याप्रमाणे लावायचे. ते लावल्यावर थोडी फुंकर मारायची की मग ते वाळते आणि मग बरोबर शब्द अगदी त्याच जागेवर परत टंकायचा. हे खूपच कटकटीचे व त्रासदायक असते. शिवाय बाकीच्या कार्बन लावलेल्या कागदांवरही असेच नेमके व अचूक करायचे.

http://www.youtube.com/watch?v=CIBnKb-L-D8&feature=related इथे टंकलेखन प्रात्यक्षिक पहा.

सुधारित टंकलेखन पुढील भागात पाहू.

क्रमश:...

Thursday, December 10, 2009

चिटुकली पिटुकली









आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे तिथे हे पक्षी येतात. बदकांबरोबर त्यांनाही ब्रेड देते मी. पण हे पक्षी बदकांना काही खाऊ देत नाहीत. नुसते टणाटण उड्या मारत असतात. किलकिलाट तर फारच. ब्रेडचा तुकडा फेकला की लगेच उडी मारून हवेतच झेलतात. त्यांचे मी नामकरण केले आहे. चिंटुलं पिटुकलं, गोटुलं, छोटुलं .....

Friday, December 04, 2009

गीतसंगीतांचे ऋणानुबंध

भावगीते भक्तीगीते लागली की मला नेहमी शाळेची आठवण होते. सकाळी साडेसातची शाळा त्यामुळे सहाला उठून गाणी ऐकत ऐकतच आम्ही आमचे सर्व आवरायचो. सव्वासातची बस असायची. माझ्या आईबाबांना गाण्याची आवड असल्याने आमच्याकडे सतत रेडिओ लावलेला असायचा. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड, विविध भारतीवर छायागीत, बेलाके फूल हे तर अगदी आठवणीतले. गाण्यांची आवड असलेले सर्वच गाणी ऐकतात. रेडिओ, दूरदर्शन, किंवा गाण्यांच्या कार्यक्रमातून विविध गाण्यांची ओळख होते. त्यातली काही गाणी आवडली की आपण तीच तीच ऐकतो आणि अशातूनच काही गाण्यांच्या आठवणी पण कायमच्या जोडल्या जातात. काही वेळेला गाणे आधी ऐकले जाते व ते गाणे आवडले म्हणून तो चित्रपट आपण पाहतो तर काही वेळेला एखादा चित्रपट पाहिला तर त्यातले गाणे आपल्या मनात कायम घर करून राहते.



कौसल्येचा राम बाई, रूप पाहता लोचनी, पूर्व दिशेला अरूण रथावर, उठी उठी गोपाळा ही गाणी सकाळी रेडिओवर लागायची आणि थंडी पावसाळ्यात दुलईतून उठणे जीवावर यायचे. असे वाटायचे ही गाणी ऐकत असेच झोपावे, नको ती शाळा! माझे बाबा सुधीर फडक्यांचे खूप चाहते आहेत. "सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला" व "शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम" ही दोन्ही गाणी ऐकली की मला माझ्या बाबांची आठवण येते. ही गाणी बाबा इतके काही छान म्हणतात कि हुबेहूब सुधीर फडके! पूर्वी सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेमध्ये लाऊडस्पीकरवर गाणी मोठमोठ्यांदा वाजवली जायची त्यातले हे एक गाणे. पुणे सातारा रोडवर मी नोकरी निमित्ताने जायचे तेव्हा सकाळी सकाळी हे गाणे मी बरेच वेळा ऐकलेले आहे. " जब हम जवाँ होंगे जाने कहाँ होंगे.. " हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे व मनातल्या मनात गुणगुणायचे. हे गाणे आधी ऐकले व नंतर बेताब पाहिला. मला वाटते की या चित्रपटात गायक शब्बीरकुमार, सनी देओल व अमृतासिंग हे सगळे नवीनच होते. गणपती आणि "होठोमें ऐसी बातमें... " ही जोडी ठरलेली. पूर्वी पुण्यात आम्ही गणपती उत्सवात गणपती पहायला जायचो तेव्हा बाबू गेनू चोकात जो गणपती असायचा त्यावर हे गाणे लायटिंगवर असायचे. त्या फिरत्या लायटिंगवर अगदी तल्लीन होऊन जायचो. कितीही वेळा पाहिले तरी समाधान व्हायचे नाही.




"आखोही आखोमें इशारा हो गया.... " व हम किसीसे कम मधली दहा मिनिटांची मेलडी म्हणजे आमचे कॉलेजचे गॅदरिंग. आमच्या वर्गात एक मुलगा किशोरकुमार फॅन होता आणि आवाजही अगदी सेम किशोरकुमार. त्याचे दुसरे विशेष असे की तो मुलगा व मुलगी दोन्ही आवाजात गाणे गायचा. आँखोही आँखोमें इशारा... हेही असेच दोन्ही आवाजात गायले होते आणि "मै हँ झूम झूम झुमरू बनके.... " हे गाणे आवाजांच्या कसरतीसह म्हणले होते. हम किसीसे कम नही च्या मेलडीवर तिघांनी डान्स केला होता टायकोट घालून. त्यातल्या मुलीला आम्ही नंतर काजलकिरण म्हणायचो. नंतर बरेच दिवस आमच्या मैत्रिणींमध्ये हीच चर्चा की आँखोही आँखोमें कसे काय दोन्ही आवाजात गायले असेल गाणे??




" राधा कैसे न जले... " हे लगानमधले गाणे अगदी न चुकता रोज अमेरिकेतल्या रेडिओवर लागायचे. डॅलसवरून २४ तास हिंदी गाणी प्रसारित व्हायची. एक दिवस लागले नाही तरी चुकल्यासारखे वाटायचे. यामध्ये आशाचा आवाज खूपच मधूर आहे. सकाळी उठून रेडिओ ऑन . घरातली कामे करता करता कान मात्र राधा कैसे न जले कडे. आता युट्युबचा जमाना आला आहे. पूर्वी बरेच वेळा ऐकलेली गाणी युट्युबवर पाहिली आणि एक वेगळाच आनंद देवून गेली. त्यातले "निगाहे मिलाने को जी... " हे गाणे पूर्वी बरेच वेळा ऐकले होते पण ते जेव्हा युट्युबवर पाहिले तेव्हापासून मी या गाण्याच्या प्रेमातच पडले आहे. इतके सुंदर चित्रिकरण आहे. नूतनचे बोलके डोळे, निरागस चेहरा त्यावरील गाण्यांच्या ओळीप्रमाणे केलेले हावभाव. हे सर्व पाहिले की त्या गाण्यामध्ये अगदी तल्लीन व्हायला होते.




आजकालच्या नेटच्या जमान्यात पूर्वीचे ऋणानुबंध संपल्यासारखे वाटतात. रेडिओच्या माध्यमातून गाणी ऐकणे. tape recorder जरी असला तरी आपल्याला पाहिजे असलेली गाणी शोधणे, त्याकरता कॅसेट विकत घेणे. एखादे आवडीचे गाणे एखाद्या कॅसेटमध्ये असले तरी ती पूर्ण कॅसेट विकत घेणे किंवा two-in-one मध्ये रेडिओवर आवडीचे गीत लागले की ते आपल्या कॅसेटमध्ये साठवून घेण्यासाठी अगदी लगच्यालगेच हातातले काम टाकून, play +record एकाच वेळी ऑन करणे. टेपचे ट्युनिंग सेट केलेलेच असायचे. अर्थात अनेक आवडीची गाणी आपण घरबसल्या कितीही वेळा आणि कोणत्याही वेळेला ऐकूबघू शकतो हे मात्र मान्य करायलाच हवे.



रेडिओवरून टेपवर आवडती गाणी साठवून घेताना काहीवेळा ते नीट घेता आले नाही तर खूप चिडचिड व्हायची. एकदा कुणीतरी टेपचा आवाज बंद करून ठेवला होता, एकदा टेप संपली होती आणि एकदा घाई गडबडीत पलंगावरून उठले गाणे टेप करायला तर पायच मुरगळला. अश्या आठवणी आहेत. मी माझ्या आवडत्या गाण्यांच्या २ कॅसेट तयार केल्या होत्या. त्यातली एक अजूनही माझ्याकडे आहे आणि एक हरवली. त्यावेळची मजा काही औरच होती. रेडिओवरचे पुढचे गाणे कोणते लागणार हे माहित नसल्यामुळेच जास्त रेडिओ ऐकला जातो. आणि मुख्य म्हणजे गाणी ऐकता ऐकता बाकीची कामे पण होतात. शिवाय गाण्याच्या अधूनमधून जे निवेदन करतात ना ते पण छान असते त्यामुळे गाण्याची एक वातावरणनिर्मिती होते.