Saturday, January 13, 2024

आई कुठे काय करते.... (मराठी मालिका)

 आई कुठे काय करते.... (मराठी मालिका)

संजनाची बहीण गौरी अमेरिकेतून भारतात येते. देशमुखांच्या समोरच्या इमारतीत ती भाड्याने जागा घेते आणि रहायला लागते. समोर कुणीतरी रहायला आले आहे ते यशच्या लक्शात येते. हळूहळू त्या दोघांची मैत्री होते आणि गौरी देशमुखांच्या घरातली एक सदस्यच होऊन जाते. गौरीला अमेरिका पसंत नाही. तिला भारतातली नातीगोती पसंत आहेत. भारतात येऊन ती फॅशन डिझाईनचा कोर्स करते. तिला तशी कामेही मिळू लागतात. यशचे क्षेत्र हे पण वेगळेच आहे. त्याला संगीतात करीयर करायचे आहे. तसे त्याचे प्रयत्न चालू असतात. आता यश आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. इतके की दोघेही आता एकमेकांशिवाय राहू शकत नाही. देशमुखांच्या घरात गौरी लाडाची होऊन जाते. अरूंधती तिचे खूप लाड करते. अनिरूद्धला गौरी आवडत नसते. यश हा अनिरूद्धचा दोडका मुलगा असतो. त्यानंतर एक दिवस गौरी तिचे गुपित यशला सांगते. तिचा पूर्वी एक अपघात होतो आणि त्यातच तिचे गर्भाशय काढून टाकण्यात येते. यश तिला खूप समजून घेतो. नंतर देशमुखांकडचे सर्वच तिला समजून घेतात. आता आजी म्हणते इतके दिवस नुसते तुम्ही फिरत आहात तर साखरपुडा करा. यश आणि गौरी एकमेकांना अंगठ्या घालतात. देशमुखांच्या घरात गौरी इतकी रूळते की देशमुखांच्या घरातले तिला सर्व प्रसंग माहिती होतात. आणि एकदम अचानक गौरीला वाटु लागते की परत अमेरिकेत जावे, तिथे करीयर करावे. यश ला ती समजावते की आपण इथे किती दिवस रहाणार. बाहेरच्या जगात जाऊ आणि अनुभव घेऊ. यशला हे अजिबात मान्य नसते. तो गौरीला सांगतो की माझ्या कुटुंबाला सोडून कुठेच जाणार नाही. यशही आता त्याच्या संगीत क्षेत्रात धडपड करून चांगले पैसे कमावत असतो. त्याकरता तो मध्ये इंग्लडलाही जाऊन येतो. 
 
 
गौरीला म्हणे एक ऑफर आलेली असते. ती यशला त्याच्या सोबत यायला भाग पाडत असते. यशचे मत ठाम असते की मी येणार नाही. शेवटी गौरी म्हणते की मी ही संधी सोडणार नाही. मी जाणार. यश चालाख असतो. तो म्हणतो की आता ही काही परत येणार नाही. तो म्हणतो मी तुझ्या करियरच्या आड येणार नाही. ती म्हणते आपण एकमेकांच्या संपर्कात राहू की ! विडिओ कॉल करू, मेसेज करू. यश म्हणतो ठीक आहे. या दोघांच्या मतभेदात यशने तिला घातलेली अंगठी की रागारागात देते आणि म्हणते की जाते आता. साखरपुडा का करतात? नंतर लग्न होणार असते म्हणून ना? जास्तीत जास्त एक वर्ष लग्न लांबणीवर टाकू शकतो ना ? गौरी अंगठी जेव्हा परत करते तेव्हा यश समजून चुकतो की आता आपले आणि गौरीचे संबंध संपल्यातच जमा आहेत. अमेरिकेत गौरी जाते. नंतर ती त्याचे फोन उचलत नाही. की मेसेजला उत्तर देत नाही. गौरी लग्न करत आहे असे इशाकडून यशला कळते. 
 
 
यशला खूप नैराश्य येते. त्यातून तो बाहेरही येतो. आता त्याच्या आयुष्यात आरोही आलेली आहे आणि ती दोघे आता एकमेकांना अंगठ्या घालणार आहेत. आता ही उपटसुंभी गौरी परत भारतात आली आहे ती केवळ तिचे करियर सोडून ?! बरं का? आणि तिने आता तिचा जीव संपण्याचा प्रयत्नही केला आहे म्हणे ! माणसाने किती स्वार्थी असावे? जेव्हा ती अमेरिकेला जाते तेव्हा पण ती म्हणते की आता म्हणे तिला तिच्या आई वडिलांकडे पहायला हवे. या आधी तिला तिच्या आई वडिलांची कधीच आठवण आली नाही. तिची आई तर खूप मोठ्या पोस्ट वर असते आणि सतत फिरतीवर असते. आणि आता सर्वजण यशला दोषी ठरवत आहेत. गौरी आल्यामुळे त्याचेही मन दोलायमान झाले आहे. अरूंधती यशला सांगते की आता गौरी हा विषय मागे पडला आहे. तू जर गौरीला भेटायला गेलास तर आरोहीवर अन्याय होईल. संजनाला गौरीचा पुळका कधीपासून यायला लागला. तिचे आणि गौरीचे तर कधी पटायचे नाही. मूर्ख अभिषेक, अति लाडावलेली आणि स्वार्थी ईशा आणि आजी हे सर्वजण यशला दोषी ठरवत आहेत. अरूंधतीने यशचे कान भरवले आहेत ही पण बोंब ठोकत आहेत.
 
 
यश आणि गौरीच्या प्रेमात यश मनापासून गौरीवर प्रेम करत आहे. गौरी स्वार्थी आणि व्यवहारी आहे. यश भावनाप्रधान आहे याचा गौरीने पुरेपुर फायदा घेतला आहे. व्यवहारी मन कधीच प्रेम करत नाही. गौरीला वाटले असेल की देशमुखांच्या घरात काही ना काही घडतच असते. ती म्हणते आता आपण आपल्या करियरवर फोकस करायला पाहिजे. आता अजून किती फोकस करायचा? त्या दोघांचे काम व्यवस्थित चालू आहे. जेव्हा ती यशच्या प्रेमात पडली? तेव्हा तिला सर्व माहित होते की! आणि तिलाही एकत्र कुटुंब आवडत होते की! गौरी एक नंबरची दुटप्पी आहे. यश तसा नाही. तो अगदी पहिल्यापासूनच म्हणत आहे की मी माझ्या कुटुंबाला सोडून कधीच कुठे येणार नाही. आणि गौरी तिचे अमेरिकेतले करियर सोडून परत आली? साफ खोटे ! तिथे तिचे काहीच जमलेले नाहीये म्हणून ती परत आलेली आहे.
गौरीने साखरपुडा कशासाठी केला? या आधी तिला सांगता येत होते ना यश ला की मला परदेशात करीयर करायचे आहे ते ! म्हणजे काय साखरपुडा करून ठेवायचा. अमेरिकेत जायचे. तिथे मुलाच्या प्रेमात पडायचे, लग्न करायचे आणि यशला डच्चू द्यायचा हाच तिचा इरादा होता. 
 
मुली मुलांना गृहीत धरतात. त्याला प्रेम हे लेबल देतात. अशी काही उदाहरणे मी प्रत्यक्षात पाहिली आहेत.
 
१. दोघांचे प्रेम होते. मुलगी अमेरिकेत गेली. मग मुलगा गेला. मुलगा तिथे गेल्यावर मुलगी म्हणते आता मला विसरून जा. तो भारतात परत येतो आणि निराशेत जातो.
२. दोघांचे प्रेम, लग्नाचे रूपांतर प्रेमात, नंतर काही वर्षांनी ती अमेरिकेत येते आणि दुसऱ्या मुलाशी लग्न करते आणि प्रियकर (लग्न झालेल्या नवऱ्याला) घटस्फोट देते.
३. इथे २ विद्दार्थिनी अशा होत्या. बरेच वर्ष एकत्र राहिलेले दोघे. सांगताना सांगितले की तो माझ मित्र आहे. मुलीचा एम. एस नंतरचा ओपिटी काळ संपला आणि तिने लगेच त्या मुलाशी लग्न केले. ओपिटी काळ संपला आणि नोकरी मिळाली नाही की देश सोडावा लागतो. मग लगेच या मुली लग्नानंतर डिपेंडंट विसावर (Dependent Visa )जातात.
 
४. एक जण लग्न होऊन इथे आले. ती भारताचे खूप कौतुक करायची. तिच्या नवऱ्याने भारतात नोकरी घेतली आणि भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. नंतर तिचा मूड पूर्णपणे गेला आणि नंतर भारतात गेल्यावर त्या दोघांचा घटस्फोट झाला. आणि ती आता इथे अमेरिकेत येण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. घटस्फोट घेतला याचा तिला आता पश्चाताप होत आहे.
 
५. लग्न होते. आणि नवऱ्यामुळे तिलाही ग्रीन कार्ड मिळते आणि घटस्फोट होतो. लगेच दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडून लग्नही होते.
rohini gore

No comments: