Wednesday, December 25, 2024

२५ डिसेंबर २०२४

 Wishing you All a Very Happy Merry Christmas and prosperous New Year 2025

काल मंगळवार २४ डिसेंबर रोजी सकाळी सकाळी बर्फ पडणार होता म्हणून सर्व बाहेरची कामे रविवारी उरकली. शनिवारी बर्फ पडला होता आणि तो दिवस कसा गेला हे मी रोजनिशीत लिहिले आहेच. आजचा दिवस बराच उदास गेला. डोके ठणकत होते. ताप आल्यासारखे वाटत होते. सकाळी खूप उशिराने उठलो. कालचा दिवस आराम केला. रात्री उत्तप्पे, सकाळी वालपापडीची भाजी आणि भोपळ्याचे भरीत व भात. दिवसभर तेच होते. काल गुलाबजाम नावाचा सिनेमा पाहिला. वेगळेच कथानक आहे त्यामुळे आवडला. तर आज काय करावे जेवायला की बाहेरच जावे असा विचार चालू राहिला आणि जेवायला बाहेर पडलो. जेवण छान होते आणि आयते असल्याने बरे वाटले. मी दर वर्षी ख्रिसमसला वेगळे काहीतरी करते. त्यामुळे रात्रीचे जेवण वेगळे करायचे असे ठरवले होते. सकाळीच बटाटे व तोंडली उकडून ठेवली होती. 

 
विनायक जेवण करून आल्यावर परस्पर चालायला गेला. मी थोडी आडवी झाले. बुफे म्हणजे बरच काही खाणे पण आम्हाला काही मानवत नाही म्हणून एखाद वेळेस जातो. खरे तर कालची थोडी उपासमार झाल्याने आजचे जेवण खूप नाही तरी थोडे जास्त खाल्ले गेले. चवही लागली. दुपारी ४ ला उठले आणि चहा प्यायला आणि लगेचच स्वयंपाक करायला सुरवात केली. बाहेर थोडा उजेड होता. शून्य अंश सेल्सिअस पेक्षा थोडे जास्तीचे तापमान होते म्हणून बाहेर फिरून आले. बोचरा वारा अजिबात नव्हता म्हणूनच चालणे झाले. नेहमीप्रमाणे फोटो काढले. शनिवार - रविवार कडे मायनस १० ते १२ रात्री आणि दिवसाही थोडेफार प्रमाणात कमी-जास्त असेच तापमान होते. अर्थात हिवाळा म्हणजे असेच तापमान असणार ना? हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जास्त गरम/जास्त गार अशा लाटा येत रहातात. उलट ज्या वेळी जे हवे ते व्हायलाच हवे, नाही का? जे ठरवले होते ते केले रात्रीच्या जेवणात. फक्त ओल्या नारळाची चटणी आणि पुऱ्या केल्या नाहीत. यावेळी भरली तोंडली करताना ती आधी उकडून घेतली. आता मूड बराच बदलला आहे. चालून आल्यावर मूड लगेच बदलतो असा अनुभव आहे.


तर आज एक गोष्ट घडली. माझा चष्मा काही केल्या सापडत नव्हता. सगळीकडे शोधला. कुठे ठेवला मी असा विचार करता करता बहुतेक कट्यावर विसरले असेल असे माझ्या ध्यानात आले. जेवण डीश मध्ये वाढले. त्याचा फोटो काढला. विनायक झोपला होता त्यामुळे त्याला उठवले नाही. मी साधारण १ मैलाची फेरी मारते आणि आमच्या घराजवळ एक कट्टा आहे तिथे थोडावेळ बसले. मी खरे तर चष्मा असा कधीच काढून ठेवत नाही. परत बाहेर गेले तर कट्यावर चष्मा होता !असा होता आजचा दिवस. पुढचे वर्ष ५-६ दिवसात सुरू होईल. मी एक ठरवले आहे ते आता मी करणार आहे रोजच ! रोज कमीत कमी १५ मिनिटे मांडी घालून बसायचे. आधी या उरलेल्या दिवसात करून बघते आणि एकदा का सुरू झाले की झाले. दर आठवड्याला १ मैल चालणे व व्यायाम झालाच पाहिजे हे मात्र मी मनावर घेतले आहे.
rohinigore


















 

No comments: