Monday, January 22, 2024

२२ जानेवारी २०२४

 

आजचा दिवस खास होता. सर्व भारत देश राममय झाला होता. सर्वजण भारावून काही ना काही करत असताना दिसत होते. प्रसन्न वातावरण सगळीकडेच होते आज ! इतके काही छान वाटत आहे. सर्वांना आनंदाच्या उकळ्या फूटत आहेत जणु ! सणासारखेच वातावरण आहे. रांगोळ्या लाईटिंग दिसत आहे. आजच्या या आनंदाच्या दिवसात अजून थोडी भर पडली. मी अमेझॉनवरून काही वस्तू मागवल्या होत्या. त्याही आल्या. थ्री इन वन मध्ये सिडी-कॅसेट आणि रेडिओ असे आहे. एक जुनी कॅसेट म्हणजे आम्ही दोघी शाळेत असतानाची मी लग्नानंतर आणली होती. त्यात काही काही होते. आता आठवत नाहीये. ती पहिल्याप्रथम लावली आणि एक सुखद धक्का बसला. माझे मन १९८९ सालात गेले. त्या कॅसेट मध्ये मी बरीच गाणी रेकॉर्ड केली आहेत. कॅसेट जेव्हा लावली तेव्हा मी गायलेले चांदणे शिंपीत जाशी आणि बाबांनी गायलेले वाजवी पावा गोविंद ही दोन गाणी होती.


आम्ही दोघे जेव्हा आयाटी पवई मध्ये रहात होतो वसतिगृहात तेव्हा पहिल्याप्रथम आम्हाला आजुबाजूच्या खोल्या होत्या. नंतर लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले. विनायकची शिष्यवृत्ती १२०० वरून २१०० झाली होती. आम्हाला खूप आनंद झाला होता. आमची लग्नानंतरची पहिली खरेदी रेडिओ कम टेप रेकॉर्डर होती. मी बरीच गाणी रेडिओ वरून कॅसेट मध्ये रेकॉर्ड केली होती. रेडिओवर आवडते गाणे लागले की लगेच प्ले व रेकॉर्ड बटण दाबायचे आणि आतल्या आत रेडिओवरचे गाणे कॅसेट मध्ये रेकॉर्ड व्हायचे. एका साईडची सर्व गाणि आज ऐकली आणी खूपच छान वाटले. आता रोज एकेक करत सर्व कॅसेट आणि सिडीज पण ऐकेन. रेडिओवर जर एखाद्या स्टेशनवर हिंदी गाणी लागतात का ते पण पाहीन. तसे तर फोन वर मी इंडिया रेडिओ डा ऊनलोड ऍप डा ऊनलोड केला आहे. त्यावर विविध भारती, पुणे केंद्र आणि एफ एम गोल्ड ही स्टेशने लागतात. अजूनही काही आहेत. विविधभारतीवर अजूनही काही गाणी लागतात जी पूर्वी ऐकलेली आहेत पण स्मरणात नाहीत. अशी गाणी लागली की लगेच गुगल करून लिरिक बघते, युट्युब वर आहेत का ते पण बघते.


नंतर २००१ साली अमेरिकेत असाच टु-इन-वन घेतला होता. ते दिवस पण आठवले. त्यावर २४ तास हिंदी गाणी डॅलस वरून प्रसारित व्हायची. आठवणींना खूप उजाळा मिळाला. मी एक अल्बम पण विकत घेतला आहे. त्यात मी आईबाबंच्या घरातले सर्व फोटो लावणार आहे. शिवाय कृष्ण धवल फोटोही ! अजून काही फोटो डिजिटल कॅमेराने काढलेले की जे फोटो खूप खास आहेत असे. त्याकरता आम्ही पूर्वी कलर प्रिंटर घेतला होता. त्यावरून काही फोटोज प्रिंट केले होते. आता परत एकदा तो प्रिंटर बाहेर काढून ठाकठीक करून कलर फोटो प्रिंट करीन म्हणते. कसे काय जमते ते बघू.


एक सॅंड्विच मेकर घेतला आहे. पूर्वीचा सॅंडविच मेकर बिघडला म्हणून एक घेतला. पूर्वी बरेच वेळा बनवायचे सॅंड्विच व टोमॅटो केच अप बरोबर खायचे. आता परत बनवीन. रॉक पेंटिंगला सुरवात करीन आणि रिकाम्या सीडीज पण रंगवीन. फोनसाठी एक स्टॅंड घेतला आहे. त्याचा पण उपयोग करण्याचा विचार चालू आहे. आजचा दिवस खरच खूपच खास होता. सर्वांचाच. त्यानिमित्ताने मी आज रात्रीच्या जेवणात भरली वांगी, कोशिंबीर, वरण भात, तूप मीठ, लिंबू आणि गोडाचा शिरा बनवला आहे.युट्युबवर अयोध्येत घडलेल्या गोष्टी बघितल्या. त्यात अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, डॉक्टर नेने, जॅकी श्रॉफ, हेमामालिनी, रणबीर कपूर, आलिया भट, सचिन तेंडुलकर दिसले आणि अजूब बरेच जण असतील. सर्वजण अयोध्येत रामाच्या ओढीने आले होते. 
 
तुम्ही सर्वांनी काय काय केले आजच्या दिवशी? कमेंट मध्ये लिहा. आजच्या बनवलेल्या गोडाच्या शिऱ्यात मी नेहमीप्रमाणे काजू बदाम केळे घातले. सढळ हाताने साजूक तूप, दूध आणि सुक्या क्रॅनबेरीज आणि खजूर घातला आहे. जय श्रीराम !!
Rohini Gore


 

No comments: