लांबसडक केस आता अजिबातच दिसणार नाहीत. पूर्वी आमच्या तायांचे व आम्हां दोघी बहिणींचे केस लांबसडक होते. अर्थात त्यांचीनिगाही तितकीच राखावी लागत असे. दररोज न चुकता खोबरेल तेल डोक्यावर घालून ते खसाखसा घासून लावले की डोकेही शांतहोत असे. आणि नंतर रीतसर वेणीफणी. भांग पाडून जटा काढून, आधी कंगव्याने केस विंचरायचे, मग फणीने. केसात कोंडा झाला आहेका ते पाहावे लागे. डोक्यावरून अंघोळ जेव्हा असे तेव्हा कधी लिंबू लावायचो तर कधी उन्हाळ्यात कैरी उकडून त्याचा गर लावायचो.
एक वेणी किंवा दोन वेण्या, काही वेळा ४ वेण्याही. कधी कधी वेण्यांचे झोपाळे बांधायचो.वेणीवर गजरा. गजराही बाद झालाय आता. दर रविवारी डोक्यावरून अंघोळ म्हणजे एक मोठा कार्यक्रम असायचा. शिकेकाई पाण्यात घालून उकळायची. ती गार झाली की त्याने नहाणे व्हायचे. रिठेही अधून मधून असायचे. रिठ्यांनी तर केस न केस सुटा होई. त्यादिवशी केसाचे टोपले होत असे. केस शिकेकाईने धुवून झाले की ते पंचात गुडाळून त्याचा एक अंबाडा घालायचा. तो अंबाडा तसाच मानेवर रूळत असायचा दुपारपर्यंत.. अंबाडा सोडून पंचाने केस खसाखसा पुसायचे. नंतर पंचाने ते झटकावे लागत. इतके करून सुद्धा थोडासा ओलसर पणा असायचा. मग थोडावेळ केस मोकळेच सोडावे लागत.केस वाळले की जटा काढायला लागायच्या. आधी कंगव्याने सर्व केस पाठीवर येतील असे विचंरायचे. मग भांग पाडायचा. तो सुद्धा मधोमध,की डावीकडे की उजवीकडे ? आई सर्व विचारून आमचे केस विंचरायची. आधी डोक्याच्या वरचा भांग, नंतर डोक्याच्या पाठीमागचा भांग.
मला चार वेण्या खूप आवडायच्या. कधी बट वेणी, कधी सैलसर शेपटा, तर कधी दोन वेण्या. दोन वेण्यांमध्ये पण काही वेळा रिबिनी, तर काही वेळा गोंडे बांधायचो. मला क्लिपा लावायला कधीच आवडल्या नाहीत. आई आणि माझ्या बहिणीला क्लीपा लावायला आवडायच्या. रिबिनीमध्ये काळ्या, लाल , गुलाबी आठवतात. शेवटपर्यंत वेणीच्या पेडी घालून मध्येच रिबिनी लावायला सुरवात करायला लागायची. शेवटपर्यंत पेडी घालून मग त्या वेण्या वर बांधायच्या. कानाच्या मागे रिबिनीची फुले यायची. जटा काढताना अर्धे केस बोटांमध्ये गुंडाळून जटा काढाव्या लागत. जटा काढल्या की व्यवस्थित २ वेळा केस विंचरले की खऱ्या अर्थाने डोक्यावरून अंघोळ केल्याचे समाधान व्हायचे. गजरा माळताना काही वेळा सेफ्टी पिनेत अडकवून केसात ती पीन लावायची नाही तर क्लिपे मध्ये लावून ती क्लिप केसात अडकवायची. काही वेळा पूर्ण गजरा असाच वेणीच्या पेडीत अडकवायचो. गजऱ्यांप्रमाणे गुलाबाची फुले केसात डावीकडे किंवा उजवीकडे पिनेत अडकवून लावायचो. किती छान दिसायचे. त्यावेळेच्या मुली लग्नामध्ये नटताना लांबसडक केसांच्या छान छान रचना करीत असत. आकडे लावून अंबाडेही घालत असत. अंबाड्यावर एक जाळी पण असे. केसांच्या लहानसहान बटा देखील काढत. किती सौंदर्य होते लांब केसामध्ये ! आता उरल्या त्या फक्त आठवणी !
2 comments:
छान लिहिलंय, केसांबद्दल सगळ्या स्वत:च्याच आठवणी वाचते आहे असं वाटलं :)
Thank You Prachi :)
Post a Comment