मनोगतावर प्रकाशित झालेला लेख विनायक गोरे (माझा नवरा) माझ्या ब्लॉगवर सेव्ह करत आहे.
संगीतकार रोशनच्या काही गाण्यांचे दुवे असलेला लेख याबरोबरच प्रसिद्ध होत आहे. पण ४२ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नुसती गाण्यांची जंत्री न देता लेखही लिहावा असे काही मित्रांनी सुचवल्याने हा लेख लिहीत आहे.
रोशनलाल नागरथ ऊर्फ "रोशन" चा जन्म १४ जुलै १९१७ मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या गुजरानवाला शहरात झाला. लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली.
पुढे बडोदा रेडिओस्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागला. १९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशनला दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन बडोद्याला परत जायला निघाला. त्यावेळी केदार शर्मांनी त्याला समजावले "आपण अजून एक चित्रपट करू, तो अयशस्वी झाला तर मग तू परत जा. " त्यानंतर राज कपूर आणि गीताबाली यांचा प्रसिद्ध "बावरे नैन" चित्रपट आला, चित्रपट आणि गाणी कमालीची यशस्वी झाली. मृत्यूच्या काही महिने आधी रेकॉर्ड झालेल्या "जयमाला" कार्यक्रमात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख करून म्हटले आहे "चित्रपटसंगीत हे ऐकण्याचे तसेच बघण्याचे माध्यम आहे. त्यामुळे जी गाणी ऐकताना चांगली वाटतील ती बघताना वाटतीलच असे नाही. हे माहिती नसल्याने "नेकी और बदी" ची गाणी यशस्वी झाली नाहीत. पुढे "बावरे नैन" मध्ये मी ही चूक सुधारली आणि ती गाणी गाजली. "
रोशनकडे सतत नवीन शिकायची वृत्ती होती. त्यामुळे अनिल बिस्वास, गुलाम हैदर, सचिनदेव बर्मन, यांच्याकडून जमेल त्या गोष्टी शिकतानाच संगीतकार खुर्शीद अन्वर यांच्याकडे सहाय्यक म्हणून उमेदवारी पण केली आहे.
रोशन यांच्या १९४९ ते १९६८ अश्या सुमारे वीस वर्षांच्या कारकीर्दीचे दोन भाग आहेत. पहिला भाग १९४९ ते १९६० आणि दुसरा १९६० ते १९६८. पहिल्या भागात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. त्यात विविधता आणि टवटवीतपणा माझ्यामते जास्त आहे. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. मात्र १९६० ते १९६८ या काळातले संगीत प्रचंड गाजले. इतके की रोशन म्हणजे "बरसात की रात" ते अनोखी रात" अशीच बऱ्याच लोकांची अजूनही समजूत आहे.
सुरूवातीला मी पण जसे शंकर - जयकिशनचे गीतकार शैलेंद्र - हसरत, सी. रामचंद्रांचा राजेंद्र कृष्ण, नौशादचा शकील बदायुनी तसेच रोशनचे साहिर - मजरूह अशी समजूंत करून घेतली होती. मात्र लगेचच या समजुतीला धक्के बसायला लागले. "मैं दिल हूँ इक अरमान भरा" या "अनहोनी" च्या आणि "एरी मैं तो प्रेम दीवानी" या "नौबहार"मधल्या गाण्यांची गीतकार सत्येंद्र अथैय्या, "इस दिल की हालत क्या कहिये" या "अनहोनी" च्या गाण्याचे अली सरदार जाफ्री आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे "बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी कसम" या "मल्हार"मधल्या सदाबहार गाण्याचे चक्क इंदीवर हे समजल्यावर संगीतकार - गीतकार जोड्यांच्या आपल्या कल्पना निदान रोशनबद्दल तरी बदलल्या पाहिजेत असे लक्षात आहे.
१९४९ ते १९६० या काळात रोशनचे ३२ चित्रपट आले आणि त्यात ४४ गीतकारांनी गाणी लिहिली होती. नीरज यांच्या "कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे" "देखती रहो आज दर्पन ना तुम" "आज की रात बडी शोख बडी नटखट है" अशा सुंदर गाण्यांनी नटलेला "नई उमर की नई फसल" हा चित्रपट १९६५ साली आला तरी त्याची गाणी १९६० मध्येच रेकॉर्ड झाली होती तसेच १९६२ साली आलेला "जिंदगी और हम" हा गाण्यांच्या शैलीवरून १९६० पूर्वीचा असावा, या गोष्टी लक्षात घेतल्या तर १९४९ ते १९६० मध्ये ३४ चित्रपटांकरत रोशनने ४८ गीतकारांबरोबर काम केले.
त्याकाळी नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात. कदाचित त्यामुळेच १९४९ ते १९६० मधली गाणी टवटवीत वाटत असावीत.
इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "
पुढे १९६० मध्ये "बरसात की रात" आला आणि सगळेच बदलले. त्यानंतर रोशनच्या संगीतात फक्त साहिर, मजरूह, शैलेंद्र, आनंद बक्षी, प्रेम धवन, इंदीवर, शकील, कैफी आज़मी अश्या मोजक्याच प्रथितयश गीतकारांची गीते दिसायला लागली. संगीतावर गजला, नज्मे, कव्वाल्या अश्या मुसलमानी संगीताचा वरचष्मा जाणवायला लागला. संगीत आधीच्या मानाने थोडेसे एकसुरी वाटायला लागले. कदाचित संगीत व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी रोशनची इच्छा असूनही निर्माते दिग्दर्शकांच्या दडपणामुळे रोशनला नवीन, होतकरू गीतकारांची गाणी घेता आली नसावीत असे वाटते.
या काळात गीतकार योगेश, ज्यांनी १९६२ मध्ये गीतलेखनाला सुरूवात केली, ते म्हणतात "रोशनजींबरोबर काम करायची इच्छा राहून गेली. तसा मी त्यांच्या नजरेत भरलो होतो. लवकरच तुझी गाणी चित्रपटात घेईन असे आश्वासनही त्यांनी मला दिले होते पण तो योग यायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला."
असा हा काव्यप्रधान संगीताचा बादशहा १६ नोव्हेंबर १९६७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला तरी आज असंख्य गाण्यांच्या रूपाने आजही आपल्यात आहे.
या १६ नोव्हेंबरला संगीतकार रोशनचे निधन झाल्याला ४२ वर्षे पूर्ण होतील. त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशनने ५२ गीतकारांबरोबर काम केले. त्यापैकी ३७ गीतकारांच्या गाण्यांचे दुवे मला जालावर मिळाले. ते इथे देत आहे.पहिल्या दुव्यामध्ये गीतकार नीरज रोशनबद्दल बोलताना म्हणतात "चित्रपटसृष्टीत मोठेमोठे संगीतकार होऊन गेले. पण जिथे कवितेचा संबंध येतो तिथे रोशनपेक्षा चांगला कोणीही नाही. रोशन यांनी जितकी साहित्यिक गीते, शेरोशशायरी असलेली गीते दिली तितकी दुसऱ्या कोणी दिली नाहीत. " नीरज यांची ती मुलाखत या दुव्यावर बघा.
आता पाहूया गाण्यांचे दुवे. दुवे देताना योजना अशी केली आहे की अप्रसिद्ध गीतकारांच्या गाण्यांचे दुवे सुरूवातीला असून प्रसिद्ध गीतकारांची गाणी शेवटी घेतली आहेत. दुव्यावर कर्सर नेला असता गीतकाराचे नाव आणि त्यापुढे गाण्याचे बोल दिसतील.
No comments:
Post a Comment